Nidhale Sasura - 4 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | निघाले सासुरा - 4

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

निघाले सासुरा - 4

४) निघाले सासुरा!
पंचगिरी यांच्याकडे बसलेल्या देशपांडेंनी चहाचा आस्वाद घेत कुलकर्णी यांना फोन लावला. ते फोनवर म्हणाले,
"कुलकर्णीसाहेब, नमस्कार. तुम्ही धर्मसंकटात टाकले हो."
"तसे काही नाही हो. आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही आहोत."
"तुम्ही दोघेही माझ्या शब्दाबाहेर नाहीत हे मी जाणतो पण हीच परिस्थिती धर्मसंकट निर्माण करते. तुम्ही काही तरी नाव ठेवले ना तर सर्वांनाच एक दिशा मिळाली असती."
"देशपांडेजी, मला वाटते तुमची तिकडे चर्चा झालीय. तेव्हा..."
"कुलकर्णी, तुम्ही आणि पंचगिरी दोघांनी मिळून मला ..."
"तसे काही नाही. तुम्ही मोकळेपणाने बोला."
"ठीक आहे. एक गोष्ट निःसंकोचपणे सांगा, की तुम्हाला हुंडा कोणत्या स्वरूपात हवा आहे?म्हणजे एकरकमी की सोने, कपडा अशा वेगवेगळ्या स्वरूपात चालेल?" देशपांड्यांनी विचारले
"त्यांची कोणती इच्छा आहे?" कुलकर्णींनी विचारले
"त्यांचा तर असाही विचार आहे, की लग्न मुलाकडे करावे काय?"
"कसे शक्य आहे? माझ्याकडे माणसांची कमी आहे हो."
"ते मी आधीच सांगितले. हो-ना करता ते त्यांच्याकडे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे सावधानमध्ये लग्न करायला तयार आहेत." देशपांडे म्हणाले
"ठीक आहे. आता त्यांचा संकल्पही कळू द्या."
"त्यांचे असे म्हणणे आहे, कपडा, सोने, मानपान या प्रित्यर्थ पन्नास हजार रुपये देऊन लग्न लावून देतो." देशपांडेंनी गुगली टाकली.
"कसे शक्य आहे? देशपांडे, हे तुम्हाला तरी योग्य वाटते का? खरेतर माझी स्वतःची इच्छा एक रुपयाही हुंडा घेण्याची नाही. मी हुंडा विरोधक म्हणून काम करतो. भाषणे देतो. लेख लिहितो. त्यामुळे मला हे असे काही पटत नाही. पण काय करणार? घरातील लोकांची तशी इच्छा नाही. कसे आहे, आजकाल स्थिती अशी झालीय, की शिवाजीराजे, गांधीजी, बाबासाहेब यांनी जन्म घ्यावा असे प्रत्येकाला वाटते पण त्याचवेळी हेही मनापासून वाटते, की या साऱ्या व्यक्तींनी शेजारच्या घरी जन्माला यावे, माझ्या घरी नको."
"व्वा! कुलकर्णी, व्वा! अगदी सुयोग्य सामाजिक स्थिती रेखाटलीत हो. ठीक आहे. त्यांचा दुसरा प्रस्तावही सांगतो, असे करूया, का तीन तोळे सोने, मुलामुलीचा कपडा आणि सावधानमधील सारा खर्च ते करतील. मुलाचा कपडा, मुलाकडील मानपान आपण बघावेत. कसे? बाकी लग्न नंबर वन होईल याची मी हमी देतो."
"तो प्रश्नच नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पण... असे करतो पाच मिनिटात फोन करतो." असे म्हणत कुलकर्णींनी फोन बंद केला
"व्वा! देशपांडेसाहेब, व्वा! जाळे टाकलेत हो. येणार पाच मिनिटात फोन येणार. दयानंदा, अरे, पुन्हा एकदा चहाचे बघा." दामोदर म्हणाले. तितक्यात पोहे घेऊन आलेली अलका म्हणाली,
"मामा, चहाच्या आधी गरमागरम पोहे!"
"वाहवा! अलका, तू 'प्रशिक्षणार्थी वधू' आहेस, नाही का? देशपांडेसाहेब, आणा. दुसराही योग आणा जुळवून. उडवून टाकू बार एकाच मांडवात!"
"मा.. मा..." असे म्हणत अलका घरात पळाली
"कसे आहे देशपांडेसाहेब, एकूण साऱ्या परिस्थितीचा आणि विशेषतः आपल्या मध्यमवर्गीय सामाजिकतेचा विचार करता हुंडा, मानपान याकडे कानाडोळा केला पाहिजे हो."
"भाऊजी, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय तशी नुकतीच सुरुवात झाली आहे. स्थितीत आमुलाग्र बदल झालाय असे नाही पण शुभसंकेत मिळत आहेत. परवा एक लग्न माझ्या मध्यस्थीने ठरले. मुलाचे आईबाबा दोघेही डॉक्टर, मुलगाही बालरोगतज्ज्ञ! त्या मुलाने अत्यंत गरीब घराण्यातील सुशिक्षित, सालस, रुपवान मुलगी पसंत केली. मुलाच्या आईवडिलांची एकमेव अट होती, की मुलाला मुलगी पसंत पडली पाहिजे. गोत्र, नाड, हुंडा यागोष्टीला आम्ही महत्त्व आणि प्राधान्य देणार नाहीत."
"मग? ठरले का ते लग्न? फार हुंडा घेतला का हो?"पंचगिरींनी विचारले
"ठरले ना. अहो, मुलाकडील आर्थिक, सामाजिक स्थिती पाहून वधूकडील लोक त्यांच्याकडे जायलाच कचरत होते. मीच पुढाकार घेतला आणि दाखविण्याचा कार्यक्रम घडवून आणला. पसंत- नापसंतीचा निरोप घ्यायला मी मुलीच्या वडिलांना घेऊन मुलाकडे पोहोचलो. त्यांनी एका क्षणात पसंती दिली. तशी आम्ही पुढील व्यवहाराची चौकशी केली..." देशपांडे सांगत असताना पंचगिरींनी पटकन विचारले,
"मग? त्यांनी केली असेल अव्वाच्या सव्वा मागणी. साहजिकच आहे म्हणा. त्यांची तरी का चूक म्हणावी? जगरहाटीच आहे. आजकाल मुलगा डॉक्टर होईपर्यंत का कमी खर्च येतो? मग पुढे?"
"अहो, तुमचा विश्वास बसणार नाही पण त्यांनी हुंडा घ्यायला चक्क नकार दिला."
"काय सांगता?" दामोदरपंतांनी आश्चर्याने विचारले
"पुढे तर ऐका. त्यांचे म्हणणे हुंडा तर नकोच पण कोणताही भपकेबाज खर्च नको. आपण नोंदणीकृत लग्न करूया. पण मुलीकडून त्यास नकार होता. मुलीच्या आईची इच्छा अशी, की एकुलत्या एक मुलीचे लग्न विधिवत व्हावे."
"मग ठरले का लग्न?"
"शेवटी एक दिवसीय सोहळा ठरला. उलट लग्नाचा खर्च दोघांनी मिळून केला."
"काय सांगता राव? अभिनंदनीय आणि अनुकरणीय अशीच घटना आहे. खरेतर आजकाल पराचा कावळा करणाऱ्या या वाहिन्यांनी या घटनेला प्राधान्यक्रम द्यायला हवा होता."
"त्यांचा टीडीपी वाढवणारी ही बाब नव्हती ना. खरेतर देशपांडेसाहेब, तुम्हा आम्हाला ज्याला ही बाब माहिती झाली ना त्या प्रत्येकाने जिथे कुठे लग्नाचा विषय निघेल तिथे हा प्रसंग समाजाच्या लक्षात आणून द्यायला हवा. त्यामुळे कदाचित अशा गोष्टींची पुनरावृत्ती होईल."
"अहो, हे लग्न लागल्याबरोबर मी स्वतः माइकवर ही सारी कथा ऐकवली."
"छान केलेत. बरे, पुन्हा दुसरीकडे असा प्रकार?" दामोदरपंतांनी विचारले
"होता. एकेठिकाणी योग होता. चांगले श्रीमंत स्थळ होते, करोडपती! मुलगी पसंत पडली, की हुंडा घेणार नाही असा त्यांचा विचार होता. मी दाखविलेली एक कन्या त्यांना पसंतही पडली होती पण ऐनवेळी मुलीच्या मामाने पाय मारला."
"काय केले मामाने?" दयानंदांनी विचारले
"त्याचे म्हणणे असे होते, की एवढे सारे चांगले आहे, गडगंज आहेत अशाच लोकांना हुंड्याची हाव असते. मग ही मंडळी हुंडा नको का म्हणताहेत? त्या मामाने चौकशी करून माहिती मिळवली. तेव्हा त्याला समजले, की मुलाच्या बहिणीच्या नणंदेच्या दिराचा मुलगा..."
"बाप रे! एवढी वंशावळ? पण त्याचा काय संबंध?"
"अशा एका लांबच्या नातेवाईकावर म्हणे खुनाचा आरोप होता."
"याला म्हणतात डोळे येणे! पायावर धोंडा पाडून घेणे. मला वाटते, कदाचित तसे मोठे, सकारात्मक वृत्तीचे ठिकाण पाहून यांनीच पाय मागे ओढले असतील. मामाच्या खांद्यावर बंदुक ठेवून निशाणा साधला. झाले." दयानंद म्हणाले
"पण एक्का-दुक्का का होईना सुरुवात झालीय हे खरे. दयानंद, तुला ते माझे रामराव जोशी नावाचे मित्र माहिती आहेत ना?"
"शिक्षक होते तेच ना?" दयानंदांनी विचारले
"हो. तेच. देशपांडे,रामराव हा एक शिक्षक माणूस. घरी ना शेती ना वाडी! मात्र पठ्ठ्याने तिन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. मोठा इंजिनिअर, मधला प्राध्यापक तर धाकटा माध्यमिक शिक्षक! योग्यवेळी सर्वांची लग्नं लावून दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गृहस्थाने हुंडा म्हणून कशाचीही अपेक्षा ठेवली नाही, की मागणी केली नाही. सून म्हणून येणारी मुलगी हीच लक्ष्मी, तोच आमचा हुंडा याप्रमाणे तो वागला. मुलींच्या वडिलांनी जे दिले तेवढेच या गृहस्थाने मोठ्या आनंदाने, समाधानाने स्वीकारले. अशा घटनांचा गाजावाजा झाला ना देशपांडे तर खरेच आपल्या समाजात क्रांती घडेल क्रांती!" दामोदर म्हणाले
"मामा, मलाही अशा क्रांतीमध्ये योगदान देऊन क्रांतिकारक म्हणवून घ्यायला आवडले असते हो पण कसे आहे, माझ्या आधी माझ्या दोन्ही बहिणींच्या लग्नात झालेला अवाढव्य खर्च पाहता मला कुणी ती संधी देणार नाही असे वाटते." आकाश म्हणाला आणि सारे हसत सुटले. गप्पांच्या ओघात चहा-पोहे झाले मात्र सर्वांचे कान देशपांड्यांना येणाऱ्या भ्रमणध्वनीवर खिळले होते. तशी त्यांची रिंगटोन त्यांच्या कार्याला साजेशीच होती. तितक्यात त्यांच्या भ्रमणध्वनीवर सर्वांना हवी असलेली घंटी ऐकू आली.
'लेक लाडकी माहेरची, होणार सून सासरची...!'
"हॅलो, बोला, कुलकर्णीसाहेब, बोला."
"काय बोलावे देशपांडेसाहेब, फारच कमी..." त्यांना अडवून देशपांडे म्हणाले,
"कुलकर्णीजी, वेगळे काही बोलावेसे वाटत नसेल तर पंचगिरीच्या प्रस्तावाला होकार द्या. खरे सांगू का, राग मानू नका पण माझी अपेक्षा होती, की तुम्ही हुंडा घेणारच नाहीत. म्हणून म्हणतो पर्याय स्वीकारा."
"हो म्हणायला पाहिजेत पण..."
"कुलकर्णी, पंचगिरींनी तुमचा मान राखत त्यांची बाजू मांडली..."
"देशपांडेजी, हा मंगलक्षण आहे. आमची अशी इच्छा आहे, की त्यांनी वरदक्षिणा म्हणून एक लाख रुपये द्यावेत किंवा..." बोलता बोलता कुलकर्णी थांबले
"बोला ना. निःसंकोचपणे बोला."
"पाच तोळे सोने, मुलामुलीचा कपडा, वऱ्हाडी मंडळीची ने-आण करावी. कसे? मला वाटते, पंचगिरींनी होकार द्यावा."
"मी तुम्हाला पाच मिनिटात फोन करतो." असे म्हणत देशपांड्यांनी फोन बंद केला. तोपर्यंत बाई, सरस्वती, छाया, अलका आणि आकाशही दिवाणखान्यात येऊन बसले.
"भाऊजी, पंचगिरीजी, ते म्हणतात, की एक लाख रुपये किंवा पाच तोळे सोने, कपडा, जाणे-येणे हा खर्च करावा." देशपांडे यांनी थोडक्यात माहिती दिली.
"भरपूर झाले हो. फार फरक आहे." पंचगिरी म्हणाले
"हे बघा. ते म्हणाले म्हणजे का आपण होकार देणार आहोत का? आपल्या प्रस्तावावर त्यांनी दिलेला हा प्रस्तावच आहे आणि मी असताना तुम्ही टेंशन का घेता? फक्त तुमचे अंतिम म्हणणे सांगा. म्हणजे मी करतो ठिकठाक." देशपांडे म्हणाले
"देशपांडेसाहेब, मला वाटते, दयानंदाची त्यापेक्षा वर तयारी नाही. त्यावेळीच त्याने हात ढिला सोडून सांगितले. ठीक आहे. तुम्ही तुमचा हुकमाचा एक्का मैदानात उतरवावा."
"म्हणजे एकरकमी सत्तर हजार किंवा चार तोळे सोने इत्यादी?" देशपांड्यांनी विचारले
"हो. तेच ते." पंचगिरी म्हणाले
"ठीक आहे." असे म्हणत भ्रमणध्वनी जुळवून देशपांडे म्हणाले,
"कुलकर्णीसाहेब, तुमची आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक स्थिती पाहता तुमचा प्रस्ताव अवास्तव, गैरवाजवी मुळीच नाही. उलट समतोल आहे. पण वधूपक्षाच्या थोडा आवाक्याबाहेर आहे. जसा मी तुम्हाला ओळखतो, तुमच्या जवळचा आहे तसेच पंचगिरीही माझे जवळचे मित्र आहेत म्हणून दोन्ही कुटुंबात हे नाते जुळून यावे हीच माझी तळमळ आहे."
"देशपांडे, तुमची तळमळ का आम्ही जाणत नाहीत? महत्त्वाचे म्हणजे आपण एकमेकांना आज ओळखत आहोत का? तेव्हा कुठलाही आडपडदा न ठेवता बोला." कुलकर्णी म्हणाले.
"कुलकर्णी आणि पंचगिरी दोघांचेही बाजूला राहू देत. एक लाख आणि पन्नास हजार ही दरी तशी फार मोठी आहे पण सेतु बांधणे आवश्यक आहे. तेव्हा कुलकर्णी माझे ऐका, एकाहत्तर हजार एकशे एक रुपये या प्रस्तावाला मान्यता द्या. उद्या तुमच्या घरी नाममात्र बैठक घेऊया."
"धर्मसंकटात टाकले बुवा देशपांडे तुम्ही. असे करा. आता माझे ऐकाच. चार तोळे सोने, वधूवरांचा कपडा..." कुलकर्णी बोलत असताना त्यांना थांबवून देशपांडे म्हणाले,
"थोड्या वेळाने फोन करतो." म्हणत देशपांड्यांनी फोन बंद करून कुलकर्णींचा प्रस्ताव सांगितला आणि म्हणाले,
"पंचगिरीसाहेब, जुळेल असे वाटतेय."
"आलेय, देशपांडेसाहेब, तुमच्यामुळे सावज टप्प्यात आले आहे. दयानंद, नक्कीच जुळणार."
"काय सांगू त्यांना?" देशपांडे यांनी विचारले
"सुरुवातीला काही वेळ ठाम रहा." दयानंद म्हणाले
"एकाहत्तर म्हणता पंचाहत्तर करा पण बाकी आपल्याकडे काहीच नको. तुम्हाला माहिती आहेच, की मुलाचा कपडा म्हटले, की फार अवघड जाते. सरस्वती, अग एका सर्वसामान्य वधूपित्याने असाच प्रस्ताव स्वीकारला आणि त्या नवरदेवाने स्वतःसाठी चक्क साठ हजाराचा कपडा निवडला." बाई म्हणाली
"बाप रे! मग?" सरस्वतीने विचारले
"घर विकून लग्न लावावे लागले बिचाऱ्याला..." दामोदर सांगत असताना देशपांड्यांनी पुन्हा कुलकर्णींना फोन लावला.
"कुलकर्णीसाहेब, माझ्या मते एकाहत्तर हा शुभ आकडा आहे. तेव्हा..."
"देशपांडे, असे करा, ऐंशी हजार..."
"कुलकर्णीसाहेब, काय हे? ठीक आहे. तुमच्या मनासारखे ऐंशी हजार रूपये देतील पंचगिरी. अहो, सुनेच्या रुपाने लक्ष्मी घरात येतेय. शिवाय देवाच्या कृपेने आपणास काहीही कमी नाही. अहो, तसे नाही. मी तुमच्या दोघांच्याही जवळचा आहे. फक्त तुम्ही दोघांनी जवळ आहे हीच आंतरिक इच्छा आहे. बाकी काही नाही."
"अहो, देशपांडे, असे काय बोलता? गंमत केली हो. ठीक आहे. तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही म्हणाल तसे. ओ. के." कुलकर्णी म्हणाले.
"कुलकर्णीसाहेब, मनःपूर्वक धन्यवाद! तुमचे अभिनंदन! मी जोडलेले हे मोजून पंचाहत्तरावे लग्न आहे. ठेवतो." असे म्हणत देशपांड्यांनी फोन बंद केला आणि पंचगिरींकडे बघत म्हणाले,
"पंचगिरीसाहेब, ठरले! अभिनंदन! "
"देशपांडेसाहेब, तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही हो. तुमचे अनंत उपकार आमच्या कुटुंबावर आहेत..." कंठ दाटलेल्या अवस्थेत पंचगिरी म्हणाले
"नाही हो. असे काही म्हणवून मला लाजवू नका..." बोलताना देशपांडेही भाऊक झाल्याचे पाहून वातावरणातील ताण कमी व्हावा म्हणून दामोदर म्हणाले,
"सरस्वती, आणि तू ग, स्वयंपाक करा. गोडधोड होऊन जाऊ देत. देशपांडेजी जेऊनच जातील..."
कुणी काही बोलणार तितक्यात छाया अचानक जागेवरून उठली. भरल्या डोळ्यांनी तिने अगोदर देशपांड्यांना नमस्कार केला. ते पाहून बाई, सरस्वती, अलका यांचेही डोळे पाणावले. वातावरण पुन्हा गंभीर होतंय हे पाहून दामोदर पुन्हा म्हणाले,
"बायांनो, छायाचे लग्न ठरले हे पाहून तुमच्या पोटात कालवाकालव होत असेल, पण आमच्या पोटात कावकाव होते आहे..." ते ऐकताच दिवाणखान्यात गडगडाटी हास्य पसरले.
**
@ नागेश सू. शेवाळकर