Nidhale Sasura - 3 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | निघाले सासुरा - 3

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

निघाले सासुरा - 3

३) निघाले मी सासुरा!
सायंकाळचे पाच वाजत होते. दयानंद पंचगिरी यांच्या घरी समाधानाचे आणि प्रसन्नतेचे वातावरण होते. फार मोठ्या प्रतिक्षेनंतर छायाला पसंती मिळाल्याने घरामध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. मध्यस्थाची भूमिका बजावणारे देशपांडे प्राथमिक चर्चेला काही क्षणातच पोहोचणार होते. पंचगिरी दिवाणखान्यात बसून त्यांची वाट बघत असताना घरासमोर थांबलेल्या ऑटोतून साधारण सत्तरीचे एक गृहस्थ उतरलेले दिसताच दयानंद जागेवर उभे राहत आतल्या खोलीकडे बघत म्हणाले,
"अग ए... अग... ए बाई, बाहेर या. भाऊजी आले आहेत."
तोपर्यंत दयानंदाचे दामोदरभाऊजी दिवाणखान्यात पोहोचले. सर्वांनी त्यांना वाकून नमस्कार केला. तसे दामोदर म्हणाले,
"व्वा! तुम्हाला पाहून, भेटून आनंद झाला." तसा आकाश हसत म्हणाला,
"मामा, तुम्हाला म्हणजे? आत्याला पाहून आनंद झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे का?"
"ऐ गधड्या, काही लाजलज्जा आहे की नाही?" आत्याने विचारले
"वा! आकाश, व्वा! गुड विनोद! आवडला! तुझे काय चालले आहे?" मामांनी विचारले
"खाना-पिना-सोना और ऐश करना!"
"छान करून घे बाबा, मौजमजा! एकदा का संसाराचे जू मानेवर बसले ना तर मग..."
"मामा, हे जू म्हणजे काय हो? तुमच्या मानेवर..." मामांना मध्येच थांबवून विचारणाऱ्या आकाशने स्वतःचे वाक्यही अर्धवट सोडले. तशी अलका पटकन म्हणाली,
"अरे, जू म्हणजे..ते..ते.. मामांच्या मानेवर आत्या..." ते ऐकून सारे हसत असताना दयानंद म्हणाले,
"बरे झाले भाऊजी, तुम्ही आलात ते. आपल्या छायाला पसंती आलीय."
"अरे व्वा! खूप आनंददायी बातमी आहे? काय करतात जावईबापू?"
"ते न्यायालयात अधीक्षक आहेत."
"छानच! बोलाचाली कधी आहे?" दामोदरपंतांनी विचारले
"देशपांडे यांनी हे स्थळ सुचविले होते. ते येतीलच एवढ्यात."
"आजकाल हा बोलाचालीचा नवीनच प्रकार निघाला आहे. पसंती झाली, की मध्यस्थ अगोदरच दोन्ही घराण्यांना विश्वासात घेऊन सारे ठरवतात. बैठकीत फक्त औपचारिक घोषणा तेवढी करतात. मध्यस्थ म्हणा, आणखी कुणी म्हणा केवळ ठरलेला व्यवहार तेवढा घोषित करतात. चट मंगनी पट ब्याह!"
"मामा, तुमची बोलाचाली कशी झाली होती हो?" आकाशने विचारले
"आकाश..." दयानंदानी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला तसे मामा म्हणाले,
"अरे, बोलू दे ना. त्यांनाही अगोदरच्या पिढीतील रीती, सोपस्कार माहिती असायलाच हवेत. आकाश, तुला सांगतो, कसली बोलाचाली आणि काय? मला काहीही माहिती नव्हती आणि कळतही नव्हते. मी आणि तुझ्या आत्याने एकमेकांना पाहिलेही नव्हते. जे काय केले, ठरवले ते माझ्या काकांनी! आमचे एकत्र कुटुंब असल्याने ज्याचे त्याचे व्यवहार आणि विभाग ठरलेले होते. त्यात इतर कुणी लुडबूड करीत नसले तरीही महत्त्वाचे निर्णय एकमेकांशी चर्चा करुनच घेतले जात असत. लग्नाच्या वेळी मानापानाचे वेगळेच महत्त्व असायचे. तुला सांगतो आकाश, त्यावेळी तुझ्या आजोबांनी हुंडा म्हणून मला एकशे एक रुपये दिले होते..."
"एकशे एक? मामा, काहीही हं..."
"अरे, खरेच रे. विनोद नाही करीत. पंचावन्न-साठ वर्षांपूर्वीचे शंभर रुपये म्हणजे आजचे लाख रुपये! ते जाऊ देत. दयानंद, एक सांग, स्थळ आवाक्यातील आहे ना? अव्वाच्या सव्वा तर मागणी करणार नाहीत ना?"
"भाऊजी, तसे आटोक्यात वाटतंय पण बघू काय होते ते?"
"हे बघ, अनेक वर्षांपासून तुझी पायपीट चालू आहे हे मी जाणतो. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर यश मिळालय तेव्हा आता संधी जाऊ देऊ नकोस. वाटल्यास त्या काळात मी घेतलेला हुंडा सव्याज परत करतो पण मागे हटू नकोस."
"भाऊजी, तुम्ही आलात हेच खूप मोठे काम झाले. तुमचा भरभक्कम आधार मिळाला, बळ मिळाले. व्यवहार जुळण्याची शक्यता आहे..." दयानंद बोलत असताना बाहेर मोटारसायकल थांबल्याचा आवाज आला आणि काही सेकंदात देशपांडे आत आलेले पाहून पंचगिरी उठून म्हणाले,
"या. या. देशपांडेसाहेब, या."
आत आलेले देशपांडे सोफ्यावर बसले. पंचगिरींनी त्यांचा दामोदरपंतांशी परिचय करून देताच दामोदर म्हणाले,
"देशपांडेसाहेब, आवडले तुमचे कार्य. आजकाल पदरमोड करून, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती बोटावर मोजाव्यात अशा आहेत. शिवाय आजकाल या पोरांच्या अगदी पोरींच्याही आवडीनिवडी फारच वेगळ्या आहेत. ह्या मुलांना बायको कशी हवी तर 'कार्येशू मंत्री, वचनेशू दासी, भोज्येशू माता आणि शयनेशू रंभा' अशी. थोडक्यात काय तर मंत्री, दासी, माता आणि रंभा अशा वेगवेगळ्या भूमिका एकत्रितपणे वठविणारी मुलगी हवी असते."
"व्वा! भाऊजी, व्वा! अगदी यथोचित वर्णन केले आहे तुम्ही. मुलांचे सोडा पण आज मुलींच्याही अपेक्षा, निवड फारच वेगळ्या झाल्या आहेत हो. काही वर्षांपूर्वी कसं होतं, मुलाने पसंती दिली, की झाले सगळे. अपवादात्मक स्थितीत मुलींचा विचार लक्षात घेतल्या जात असे."
"देशपांडेजी, हम दो हमारा एक ह्याचा प्रताप! शिक्षणाचा प्रसार! कमी शिकलेला, कमी पगाराचा, सर्वसाधारण रुपाचा, एकत्र कुटुंबातील किंवा जास्त भाऊबहिणी असलेला मुलगा आवडत तर नाहीच पण अनेक मुलींना सासू-सासऱ्याचीही अडचण होते. लग्न झाल्याबरोबर म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशीपासून त्यांचा राजाराणीचा संसार सुरू व्हावा अशीच बहुतेक मुलींची इच्छा असते. बरे, ते राहू देत. फार मोठा विषय आहे हा. आपण मुद्द्यावर येऊ."
"देशपांडेसाहेब, त्यांच्या काय अपेक्षा आहेत?" पंचगिरींनी विचारले तसे दामोदर म्हणाले,
"त्याचे कसे असते दयानंद,मध्यस्थाची स्थिती खूप अवघड असते हो. परंतु मी हेही जाणतो, की मार्गही मध्यस्थालाच काढावा लागतो. दोन्ही बाजूंच्या एकंदरीत स्थितीचा अंदाज असतो, नव्हे तो असायलाच हवा. त्यामुळे देशपांडेसाहेब, मुलाकडील मंडळीचा काही अंदाज असेल, त्यांनी काही अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त केल्या असतील तर निःसंकोचपणे सांगा. तसा आमचा आग्रह नाही पण वधूकडील मंडळीस थोडी अगोदर कल्पना दिली ना तर विचार करता येतो. अहो, परवा अशीच एक घटना घडली..."
"कोणती घटना?" देशपांड्यांनी विचारले
"माझ्या मित्राची मुलगी उपवर आहे. एका डॉक्टर मुलाच्या घरी आम्ही दोघे गेलो. घर म्हणजे काय तर राजमहाल हो. तो महल पाहताच मित्राचे अवसान गळाले. तो मला 'घरी परत चल.' असे म्हणू लागला. इथे आपला निभाव लागणार नाही असेच त्याला वाटत होते. पण मीच त्याला मोठ्या आग्रहाने, एकप्रकारचे बळ देऊन त्या राजवाड्यात नेले. नोकराने आम्हाला दिवाणखान्यात बसवले. चहापाणी दिले. दहा-पंधरा मिनिटांनी त्या सद्गृहस्थांचे आगमन झाले. आम्ही केलेल्या आशाळभूत नमस्काराचे त्यांनी मान हलवून प्रत्युत्तर दिले. आमच्या भेटीचे प्रयोजन सांगताच ते म्हणाले,
"गोत्र, पत्रिका, गुण वगैरे काही नाही. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम नंतर होईल. अगोदर हे पहा..." असे म्हणत त्यांनी खिशातून एक कागद काढला. तो माझ्या हातात देऊन म्हणाले,
"घरी जाऊन शांतपणे हा कागद वाचा. पक्का विचार झाला तर म्हणजे यादी मान्य असेल तरच पुढील कार्यक्रम..."
"भाऊजी, कागदावर असे काय होते?" देशपांड्यांनी विचारले
"ती यादी म्हणजे संगणकावर तयार केलेले मागणीपत्र किंवा हुंडा मागणी पत्र होते. सात जन्मातही माझा मित्र त्या मागण्यांची पूर्तता करू शकला नसता..."
" पण मामा, हुंडा घेणे बेकायदेशीर असताना तो माणूस चक्क एक यादी देतो याआधारे त्याची पोलिसात तक्रार करता येईल ना?" आकाशने विचारले
"आकाश, त्याने खालीलप्रमाणे हुंडा द्यावा असे थोडीच लिहिले होते. आपण बाजारात जाताना जशी यादी सोबत नेतो तशी साधी यादी होती ती. बाहेर येताच मित्राने ती यादी टराटरा फाडून त्यांच्याच बागेमध्ये फेकून दिली. म्हणून म्हणतो..."
"कसे आहे, भाऊजी, ती पडली वरपक्षाची माणसे. हुंडा मागणे हा जणू त्यांचा जन्मसिद्ध हक्क आणि तो मिळेपर्यंत ते बजावणारच..."
"अगदी बरोबर! आम्ही कुठे नाही म्हणतो पण..." दामोदर बोलत असताना देशपांडे मध्येच म्हणाले,
"भाऊजी, ती माणसे अतिशय साधी आहेत. तशी श्रीमंत आहेत पण मिळविलेली संपत्ती ही स्वकर्तृत्वावर मिळविलेली आहे."
"अहो, अशीच माणसे वेळेवर काही तरी नवीन खुळ काढतात." दामोदर म्हणाले
"एकदम बरोबर! भाऊजी, परवा अशीच एक बैठक होती. मी मध्यस्थ नव्हतो पण दोन्हीकडील मंडळी परिचयाची होती म्हणून मलाही बैठकीला बोलावले होते. बैठकीत मुलाकडील मंडळी म्हणाली की, आम्हाला काहीही नको. तुम्ही सालंकृत कन्यादान करून द्या. तुमचा जो काही संकल्प असेल तो सांगा..." देशपांडे बोलत असताना दामोदरपंत मध्येच म्हणाले,
"आलं ना धर्मसंकट! घोडे इथेच अडते हो. फार हुशार असतात अशी माणसे जी असा गळ टाकतात. काय आणि किती द्यावे त्या वधूपित्याने? पुढे काय झाले?"
"हो-नाही करीत शेवटी वधूपित्याने स्वतःचा संकल्प जरा ढिल्या हाताने जाहीर केला आणि तिथेच घोळ झाला..."
"काय झाले?" पंचगिरींनी विचारले
"तो संकल्प ऐकून वराकडील लोकांचा असा समज झाला, की वधूपिता अतिशय श्रीमंत आहे. गंगा दारात आली आहे तर नुसते हात धुवून घेण्यात अर्थ नाही तर घरातील लहान मोठी सारी भांडी भरून घ्यावी. बैठकीत मुलाचा मामा होता. तो म्हणाला, ही काय बोलाचाली आहे? त्यांनी सांगावं आणि आपण नंदीबैलाप्रमाणे माना हलवाव्यात हे पटत नाही. तुम्हाला हेच करायचे होते तर आम्हाला बैठकीला बोलावले कशाला? तुम्हीच ठरवायचे असते."
"बघा. खरे तर 'तुम्ही तुमचा संकल्प सांगा.' असे म्हटल्यानंतर समोर आलेला प्रस्ताव तत्क्षणी स्वीकारायला हवा होता. पुढे?"
"त्यावर वधूपिता चाचरत म्हणाला, की तुम्ही बोला. या संधीचा फायदा घेऊन मुलाच्या मामाने अशी काही मागणी केली की बस्स! वधूपित्याने अक्षरशः हात जोडले आणि शेवटी बैठक मोडली."
"हे असे असते बघा. बर, देशपांडेसाहेब, आपलं पुढे कसे?"
"हे बघा, मी इकडे येण्यापूर्वी त्यांच्याकडे जाऊन आलोय. त्यांचे असे म्हणणे आहे, की मुलाला मुलगी पसंत पडली यात सारे आले. पुढल्या बाबी गौण आहेत."
"परंतु ते गौणत्व जाहीर व्हावे." दामोदरपंत म्हणाले.
"त्यांचे असे म्हणणे आहे, की बैठक केवळ औपचारिक व्हावी. तिथे चर्चा, वाद नकोत."
"ठीक आहे ना, पण अनौपचारिक बैठकीत सारे स्पष्ट व्हावे." दामोदर म्हणाले
"त्यांचे असे म्हणणे आहे, की पंचगिरींनी स्वतःचे आकडे जाहीर करावेत."
"म्हणजे मग ते त्यांचे पत्ते उघडणार, असेच ना? हे जरा वेगळे वाटत नाही का?"
"तसे म्हणता येणार नाही कारण आजकाल अशाच पद्धतीने बोलाचाली होत आहेत."
"ते ठीक आहे. दयानंद, सांग बाबा, आता तू..."
"भाऊजी, मला तर काहीच सुचत नाही हो."
"असे नाही. दयानंद, मला एक सांग,तुम्हाला, विशेषतः छायाला मुलगा, घर पसंत आहे ना?"
"एकदम पसंत आहे. मुलगा खूप हुशार आहे. मोठ्या पदावर असून चांगला पगार आहे. बंगलाही खूप सुंदर आहे. तसे पाहिले मी त्यांच्यापुढे काहीच नाही. मी चौकशीसाठी जाणारच नव्हतो पण देशपांडेसाहेबांनी आग्रह धरला म्हणून हा योग आला."
"मग ठीक आहे. पुढलेही योग देशपांडेच जुळवून आणतील. बोला. देशपांडेजी, बोला. मला वाटतं तुम्ही परीक्षा घेत आहात. तिकडचा अंदाज तुम्हाला नक्कीच आलेला आहे."
"भाऊजी, व्वा! आता मात्र तुम्ही आम्हाला धर्मसंकटात टाकत आहात."
"नाही. तसे नाही. मला वाटते, दयानंद, तू आता पुढाकार घ्यावा. आपली जी काही ऐपत म्हणण्यापेक्षा तयारी, संकल्प असेल तो सांगावा..."
"पण भाऊजी..." दयानंद काही तरी बोलणार होते पण त्यांना अडवत दामोदर म्हणाले,
"दयानंद, पाण्याच्या खोलीचा आणि वराकडील अपेक्षांचा अंदाज येणे अवघड बाब असते. हे बघ, उगाच देशपांडेसाहेबांना त्रास देण्यात अर्थ नाही. शेवटी योग असतो. कसे आहे, बैठकीत केविलवाणे होऊन बोलण्यापेक्षा, तिथे दीनवाणे होत मान खाली घालण्यापेक्षा आपल्या माणसाजवळ आपली बाजू स्पष्ट केलेली चांगली. इथे मानापानाचा प्रश्न नसतो." दामोदर म्हणाले
"दया, जरा आत ये." बाईंनी आवाज दिला
"अग, देशपांडे आपलेच आहेत."
"तुम्ही थोडं थांबा. दयानंद..." बाई म्हणाली.
"आलो..." असे म्हणत पंचगिरी आत गेले.
"दयानंद, उत्साहात येऊन काहीही भसकन बोलू नकोस. जरा हातचा राखून आकडा सांग."
"अहो, ते मानपान-कपडालत्ता सारे काही स्पष्ट करा. नंतर शुभ मंगल समयी साध्या गोष्टीवरून नाराजी नको. वादविवाद तर मुळीच नको." सरस्वती ठामपणे म्हणाली
"बाई, काय सांगू ते कळत नाही. प्रचंड गोंधळ झाला आहे. भाऊजींना इथे बोलावू का?"
"नको. देशपांड्यांना वेगळे वाटेल. तुम्हीच काय ते स्पष्ट सांगा." सरस्वती म्हणाली आणि दयानंद बैठकीत येऊन म्हणाले,
"भाऊजी, तुम्हीच बोला ना."
"दयानंद, मला तरी कुठे अंदाज आहे? मी आत्ताच आलोय की. आपली हुंड्यासंदर्भात काहीच चर्चा झाली नाही. तेव्हा तू स्वतःच बोललेला चांगले राहील..." दामोदर समजावत असताना देशपांडेंचा फोन वाजला. त्यावरील नाव पाहून फोन उचलताना ते म्हणाले,
"बोला साहेब. हो. हो. मी सध्या पंचगिरीसाहेबांकडेच आलोय. चर्चा सुरू आहे."
"काय म्हणतात ते?"
"ते म्हणतात, की तुमचा काही अंदाज कळला असता तर बरे झाले असते. त्यांना विचार करायला थोडी दिशा मिळाली असती."
"देशपांडे, आपल्याला हे लग्न जुळवायचे आहे. चर्चेचे गुऱ्हाळ नको. एक घाव दोन तुकडे. तुम्ही काय ते बोला. मी तुमच्या फोनची वाट पाहतो. लग्न मात्र महिनाभरात व्हावे आणि सावधान मंगल कार्यालयात व्हावे. ही आमची अट आहे. ती मान्य असेल तरच पुढे बोलू. ठेवतो." असे म्हणून तिकडून फोन बंद होताच देशपांडेनी झालेली बोलणी ऐकवली. ते ऐकून पंचगिरी म्हणाले,
"कसे शक्य आहे? एका महिन्यात मुलीच्या लग्नाची तयारी?..." त्यांना थांबवत दामोदर म्हणाले,
"ठीक आहे. एक महिन्यात लग्न मान्य! दयानंद, आजकाल काहीही कठीण नाही. पैसा असल्यावर आठ दिवसात इकडचेतिकडचे करता येते. ते होईल, काही अवघड नाही. बरे, ते जाऊ देत. तुझे काय ते सांग पाहू."
"देशपांडेजी, मानपान ज्याचे त्याने सांभाळावेत. आता तुम्ही मला एक सांगा, कपडालत्ता- सोने इत्यादी एकठोक सांगू, की वेगवेगळे सांगू?" दयानंदाने विचारले तसे दामोदर म्हणाले,
"दयानंद, मला वाटते एकरकमी ठीक राहील. काय म्हणता देशपांडेसाहेब?" दामोदरपंतांनी विचारले
"असे करा, तुमचे दोन्ही संकल्प मला सांगा. मला परका समजू नका." देशपांडे म्हणाले
"हे काय बोलता? सर्व स्थितीचा अंदाज, माझी आर्थिक बाजू लक्षात घेता मी एकरकमी सत्तर हजार रूपये देतो. सारे त्यात आले. सोने-नाणे, कपडालत्ता, मानपान सारे सारे एकठोक! सावधान कार्यालयात आल्यापासून ते मंगल कार्यालय सोडेपर्यंत सारी व्यवस्था अगदी पाहुण्यांच्या रुबाबाला साजेशी अशी करु."
"ठीक आहे. बरे, दुसरा पर्याय?" देशपांडेनी विचारले
"साहेब, खरेतर आता वेगळा पर्याय नसावाच. तसे पाहिले तर दयानंदाने थोडे जास्त सांगितलंय."
"भाऊजी, काळजी करू नका. पंचगिरींचा आकडा मी त्यांच्यापर्यंत पन्नास हजार असाच पोहोचवणार आहे. पण एखादा पर्याय विचार करण्यासाठी समोर असावा म्हणून म्हणतो."
"तुम्ही म्हणता म्हणून सांगतो, चार तोळे सोने, मुलीचा कपडा आम्ही घेऊ. बाकी त्यांनी सांभाळावे." पंचगिरी म्हणाले.
"सरस्वती, चहा टाका." दामोदर म्हणाले. लगेच देशपांडे यांचेकडे बघत म्हणाले,
"देशपांडे, असे केले तर म्हणजे लग्न मुलाकडे ठेवले तर? कसे आहे, यांच्याकडे करणारे कुणी नाही. एकटा दयानंद आहे. आमचा जोर तोंडात. वयोमानाप्रमाणे आता कामे होत नाहीत हो."
"हा पर्याय बहुतेक त्यांना मान्य होणार नाही. तसे मनुष्यबळ त्यांच्याकडेही नाही. वाटल्यास आपण सारी व्यवस्था केटरर्सला देऊ. त्यामुळे काहीही त्रास होणार नाही. शिवाय ती माणसे अत्यंत समजूतदार आहेत. त्यांच्याकडून काहीच अडचण निर्माण होणार नाही. ठीक मी त्यांच्याशी चर्चा करतो..." असे म्हणत देशपांडेंनी एक क्रमांक जुळवला...
**
@ नागेश सू. शेवाळकर