५) निघाले सासुरा!
स्वयंपाक घरात बाई, सरस्वती आणि अलका स्वयंपाकाची तयारी करीत असताना दिवाणखान्यात गप्पांचा फड रंगलेला असताना पंचगिरीच्या भ्रमणध्वनीवर कुलकर्णींचा फोन आला. फोन उचलत पंचगिरी म्हणाले,
"कुलकर्णीसाहेब, खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन!"
"तुमचेही अभिनंदन! खुश आहात ना? असे करा, रविवारी सकाळी अकरा वाजता आपण सारे कुटुंबीय आमच्या घरी या. आणि हो, आमच्या सूनबाईला आणायला विसरू नका. आता जे काही ठरले आहे ते चारचौघात जाहीर करू."
"ठीक आहे. नक्की येतो. ठेवू?" असे विचारत पंचगिरींनी फोन ठेवला.
"भाऊजी, पाहुण्यांनी आपल्याला सर्वांना रविवारी बोलावले आहे. देशपांडे, तुम्हीही यायलाच हवं."
"बरे, झाले. तू निमंत्रण दिले ते. तसे कुलकर्णीही यांना निमंत्रण देतीलच पण एखादेवेळी गडबडीत ते विसरले तर दोन्हीकडील पाहुणा..." दामोदर बोलत असताना त्यांना थांबवत देशपांडे म्हणाले,
"मी कसचा उपाशी राहतो भाऊजी! हक्काने जेवायला जाईन... दोन्ही घरी..." त्यावर सारे हसत असताना आकाशने ताटं वाढली असल्याची सूचना दिली आणि सारे जेवायला म्हणून निघाले...
हसतखेळत, आनंदी वातावरणात जेवणे झाली. काही वेळातच देशपांड्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि ते निघाले. तसे पंचगिरी म्हणाले,
"भाऊजी, तुम्ही आता बोलाचालीपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत थांबा हं."
"आता कोणती बोलाचाली?अलकाची?" दामोदर हसत म्हणाले. तशी अलका लटक्या रागाने मामांकडे बघत आत्याला म्हणाली,
"आत्या, मामाला सांग ना ग काही तरी..."
"अग, गंमत केली ग. तू तर लगे माझी तक्रार घेऊन राष्ट्रपतीकडेच गेलीस ग. दयानंद, अरे, बोलाचाली तर आत्ताच झाली की... मोबाईलवर!"
"अहो, असे कसे बोलता तुम्ही? भाऊजी आणि वन्स दोघेही आता छायाचे लग्न लावूनच जाणार. आपल्याला तरी कोण आहे त्यांच्याशिवाय?" सरस्वती म्हणाली
"अग पण..." बाई बोलत असताना तिला बोलू न देता आकाश म्हणाला,
"आत्या, मामा नाही म्हणायचे नाही. राहायचे म्हणजे राहायचे. ही.. ही माझी म्हणजे आकाश पंचगिरीची ऑर्डर आहे."
"बरे, माझ्या आजोबा!" बाईसुद्धा हात जोडून हसत म्हणाली.
"हे अस्स! ऐ ताई, ती तुझी चारोळी ऐकव ना." आकाश म्हणाला.
"चारोळी? कोणती रे?" छायाने विचारले
"ती ग... हुंडाविरोधकाची..."
"आकाश, नाही हं. ती नाही." छाया म्हणाली
"अरे, सांग ना. छाये, आम्हाला ऐकू तर दे." दामोदर म्हणाले
"मामा, हुंडा या विषयावर प्रसिद्ध कवयित्री छाया पंचगिरी ह्या त्यांनी केलेल्या एका चारोळीत असे म्हणतात, की...
'हुंडा विरोधक म्हणून
बोलबाला ज्याचा,
लग्नाच्या बाजारात
सौदा झाला त्या बैलाचा!..."
"व्वा! कित्ती सुरेख आहे!" बाई म्हणाली
"खूप छान! छाया, तू कविता करतेस हे मला माहिती नव्हते. कधीपासून करतेस? का कुलकर्णीचे ठिकाण पाहिल्यावर सुचली?" दामोदर म्हणाले
"मामा, हे हो काय?..." छाया लाजत म्हणाली तसा आकाश तालासुरावर म्हणाला,
"एक लाजरा न साजरा मुखडा,
चंद्रावाणी खुलला गं..." तशी छाया उठल्याची पाहून आकाश आत पळाला...
पाहता पाहता शनिवारची सकाळ झाली. कुलकर्णी यांनी पुन्हा पंचगिरींनी फोन करून रविवारच्या कार्यक्रमाची आठवण करून दिली, सर्वांना रीतसर आमंत्रण दिले. त्यावेळी कुलकर्णी यांनी विचारल्यानुसार दहा माणसे येतील असा निरोप पंचगिरींनी दिला. फोनवर बोलणे होताच दामोदर आणि दयानंद दोघे बाजारात गेले. त्यांनी होणाऱ्या जावयासाठी पेढे, हार, कपडे तसेच कुलकर्णी पती-पत्नीसाठी पूर्ण आहेर आणला. तसेच कुलकर्णी यांची विवाहित कन्या आणि जावाई यांच्यासाठीही आहेर आणला. खरेदी करीत असताना दामोदरपंतांनी सुचविल्याप्रमाणे देशपांडे यांच्यासाठीही चांगला आहेर घेतला. सायंकाळी पंचगिरींनी देशपांडे यांना फोनवरून विचारले,
"देशपांडेसाहेब, कुठे आहात?"
"घरीच आहे. बोला."
"विशेष काही नाही. उद्याची आठवण आहे ना?"
"ते कसे विसरेन बरे! आत्ताच तुमच्या व्याहीबुवांचाही फोन आला होता."
"सकाळी दहा वाजता घरीच या. मिळूनच जाऊ."
"तिकडे कशाला? मी इथेच थांबतो."
"ठीक आहे. परंतु कुठे जाऊ नका हं."
"नाही. नाही. तसे कसे करीन? ठेवू?" असे विचारत देशपांडे यांनी फोन ठेवला.
"अहो, ऐकलत का?" सरस्वतीने विचारले
"काय म्हणतेस? बोल."
"काल जे ठरलय तेवढेच पक्के करायचे बरे."
"हो ना.त्यात काहीच बदल होणार नाही."
"कसे असते, काल सारे फोनवर ठरलंय. आयत्यावेळी उद्या बैठकीत मुलाचा मामा, काका किंवा असाच कुणी तरी नातलग उठायचा आणि काही तरी अवास्तव मागणी करायचा. देशपांडे यांना अगोदरच तशी कल्पना द्या."
"सरस्वतीचे बरोबर आहे. तुम्हीसुद्धा लक्षात असू द्या हो." बाई म्हणाल्या
"पक्के लक्षात आहे. पण दयानंद, कालच्या आपल्या बोलाचालीत तशी काही मजा आली नाही रे."
"मामा, काय झाले? मजा का नाही आली?" आकाशने विचारले
"आकाश, बोलाचाली हा प्रकार वेगळाच असतो रे. काय थाट असतो त्या बैठकीचा... बस्स! दोन्हीकडील मिळून पंधरा-वीस माणसे अशी समोरासमोर बसतात. चहा, फराळ, गप्पाष्टकं, एकमेकांचे लग्न जुळविण्याचे अनुभव, मध्येत तोंडी लावायला लोणचे असावे त्याप्रमाणे थोडा वादविवाद, प्रसंगी खडाजंगी ह्या प्रकाराने बैठकीला वेगळाच रंग चढतो. एका पक्षाने म्हणजे वरपक्षाने चेंडू टोलावला म्हणजे हुंड्याची मागणी केली, की वधूकडील प्रमुख माणसे उठून आत जाणार. तिथे वरपक्षाच्या मागणीवर थोडी चर्चा करणार. मग बाहेर येऊन त्यांचा प्रस्ताव मांडणार. थोडावेळ त्या प्रस्तावावर चर्चा रंगणार. मध्ये कुणीतरी पुन्हा पूर्वानुभव सांगणार. माझ्यासारखा एखादा बैठकीला विनोदाची फोडणी देणार. नंतर वरपक्षाची काही माणसे बाहेर जाणार. तिथे चर्चा करून नवी मागणी घेऊन आत येणार..."
"मामा,भलताच इंटरेस्टिंग प्रकार वाटतोय."
"तर मग अधूनमधून धृपद असावे त्याप्रमाणे वधूकडील कुणीतरी... बहुदा वधूपिता हात जोडून म्हणणार, 'सोयरेहो, गोड मानून घ्या. आम्हाला पदरात घ्या.' असा विनंतीवजा आळवलेला सूर ऐकून वरपक्षाला भलताच भाव येतो... तुझ्या भाषेत सांगायचे म्हणजे त्यांची कॉलर टाईट होते. अरे, तुला सांगतो, बोलाचालीची बैठक एकदा बसली ना, की दोन-दोन दिवस चालायची आणि प्रसंगी मोडायचीसुद्धा!"
"मामा, तुमची बोलाचाली किती वेळ चालली हो?" अलकाने विचारले
"पूर्ण एक दिवस!" दामोदर म्हणाले
"काय? अख्खा एक दिवस घालवून हुंडा घेतला तर किती एकशे एक रूपये! असा सौदा तर एकशे एक सेकंदात व्हायला हवा होता." छाया म्हणाली आणि त्यातला मतितार्थ जाणून सारे खळाळून हसत असताना दामोदर म्हणाले,
"व्वा! कवयित्रीबाई, व्वा! कळलं. तुमचे सौदा म्हणण्याचे कारण समजले. त्या दिवशी दिवसभर कुणाचा फराळ नाही, की जेवण नाही. फारच आग्रह झाला तर चहा किंवा दूध होत असे."
"मामा, जेवणे का नाही झाली?" छायाने विचारले
"जुने लोक बोलाचाली यशस्वी झाली तरच जेवणे करीत. जर ती बैठक मोडली ना तर आलेली पाहुणे मंडळी अन्नाच्या कणालाही न शिवता निघून जात. तुला सांगतो, आमच्या सोयरीकीच्यावेळी आमच्याकडून एकशे पाच रुपये आणि तुमच्याकडून नव्याण्णव रुपये या अटींवर जमलेली मंडळी ताणून बसली होती... चार तास! शेवटी पाच वाजता आमचे लोक 'जमणार नाही.' असे ठणकावून सांगत सरळ बसस्थानकावर निघून गेले."
"बाप रे! मग काय झाले?" अलकाने विचारले
"मग काय तुमच्याकडून कुणी तरी दूत..."
"अरे, आपले दत्तूकाका बसस्थानकावर गेले आणि ते यांच्या लोकांच्या हातापाया पडले, विनवण्या करून त्यांना घरी घेऊन आले. तेव्हा सायंकाळचे सहा वाजून गेले होते. सात वाजेपर्यंत पुन्हा नव्याण्णव ते एकशेपाच या आकड्यांवर दोलक फिरत होता. पन्नास पैसे कमी, एक रुपया जास्त असे करीत गाडी एकदाची एकशे एकच्या थांब्यावर विसावली आणि..."
"तू मामाची झाली." आकाश म्हणाला
"नव्याण्णव ते एकशेपाच या प्रवासात दोन-तीन वेळा आपापल्या लोकांशी चर्चा झाली. एकदा तुमचे लोक चर्चेसाठी आत जात असताना मामांच्या म्हणजे तुमच्या आजोबाच्या धोतराचा काष्टा फिटला. तेव्हा साऱ्या लोकांना काय आनंद झाला म्हणशील..." दामोदर बोलत असताना त्यांना मध्येच अडवत अलकाने विचारले,
"आनंद? काष्टा फिटल्याचा? हा काय प्रकार आहे?"
"अरे, त्या काळात असा एक समज, श्रद्धा होती, की लांबत चाललेल्या बैठकीत जर एखाद्या व्यक्तीच्या धोतराचा काष्टा फिटला तर ती बोलाचाली यशस्वी होणार."
"आणि समजा कुणी जाणूनबुजून, गमतीने कुणाचा काष्टा फेडला तर?" आकाशने विचारले
"आकाश, त्या काळात तुझ्यासारखी चहाटळ माणसे नव्हती. शिवाय प्रत्येकाला वेळ, काळ, स्थळ याचे भान असायचे." बाई गमतीने म्हणाली...
रात्रीचे दहा वाजत असताना सारे आपापल्या खोलीत गेले. नेहमीप्रमाणे अलका छायाच्या खोलीत आली.
"ताई, तुला आज झोप येणे शक्य नाही." अलका म्हणाली
"का ग?" छायाने आश्चर्याने विचारले
"का म्हणजे? अग, तुला श्रीपालभाऊजींची आठवण येत असेल ना. ताई, तू एक काम कर."
"काम? आत्ता? कोणते?" छायाने विचारले
"तू की नाही पटकन झोपी जा. अग, अशी पाहतेस काय? त्याचे काय आहे, तुझ्या स्वप्नात येण्यासाठी तिकडे भाऊजी तळमळत असतील. केव्हा एकदा आमची छायाराणी झोपेल आणि आम्हाला तिच्या स्वप्नात जाता येईल..."
"ये,चावटे..."
"ताई, आज श्रीभाऊजींचा फोन आला होता का ग?"
"अलके, आता झोपतेस का देऊ एक ठेवून?"
"अच्छा! म्हणजे माझ्या झोपण्याची वाट पहातेस तर! त्यांच्या स्वप्नात जाण्यासाठी?"
"थांब. तुला आता दाखवतेच..." असे म्हणत छायाने अलकाला जोरात चिमटा घेतला...
रविवारचा दिवस पंचगिरीच्या घरी एक आगळावेगळा आनंद घेऊन उजाडला. ऊठल्यापासून प्रत्येकाची घाई सुरू झाली. छायानेही तयार होण्यासाठी जास्त वेळ घेतला नाही, छाया तयार होतेय म्हणून कुणाला तिची वाट पाहावी लागली नाही. बरोबर बारा वाजता दामोदर, पंचगिरी, बाई, सरस्वती, छाया, अलका, आकाश आणि इतर चौघे अशी मंडळी कुलकर्णींच्या घरी पोहोचली. देशपांडे तिथे हजर होते. सर्वांचे यथोचित स्वागत झाले. परिचय, अभिवादनाचे आदानप्रदान झाले. चहापाण्याची पहिली फेरी झाली. इकडच्यातिकडच्या गप्पा सुरू असताना देशपांडे म्हणाले,
"मला वाटते, आपण मुख्य कार्यक्रम सुरू करायला हरकत नाही."
कुलकर्णी परिवाराकडून कुलकर्णी, त्यांचे पांडे नावाचे मेहुणे, साडूभाऊ जोशी आणि त्यांचे छोटे भाऊ अशी मंडळी होती.
"बाकी काही म्हणा पण देशपांडेसाहेब, तुमच्यासारखी माणसं गाडी अशी रुळावर आणायला पटाईत असतात." पांडे म्हणाले
"काय करणार पांडेसाहेब, मध्यस्थ पडलो ना. तर पंचगिरींची छाया नामक कन्या कुलकर्णी कुटुंबीयांना पसंत पडली आहे. त्यामुळे पुढील कार्यक्रम आणि रुपरेषा ठरविण्यासाठी आपला आज एकत्र येण्याचा योग जुळून आला आहे. तेव्हा कुलकर्णी..."
"अहो, हे काय देशपांडेसाहेब, इथं का कुणी परके आहे? परवा फोनवर जे ठरलय ते जाहीर करा.हे बघा, कुंकू तयारच आहे. एकमेकांना टीळे लावून मोकळे होऊ!" कुलकर्णी म्हणाले
"ठीक आहे. हा योग जुळावा या सद्हेतूने आणि परंपरेप्रमाणे पंचगिरी राजीखुशीने कुलकर्णी यांना ऐंशीहजार एकशे एक रुपये देतील. त्यात सारे आले. सावधान मंगलकार्यालयात आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत सारी चोख व्यवस्था पंचगिरी करतील. ठीक आहे? मान्य आहे?" देशपांड्यांनी विचारले.
"पूर्णपणे मान्य." कुलकर्णी म्हणाले
"आम्हालाही मान्य आहे." पंचगिरी म्हणाले
"काय झटपट बोलाचाली झाली हो." जोशी म्हणाले
"जोशी, हे सोडा. आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून यापेक्षा कमी वेळेत लग्न होत आहेत. आहात कुठे?" दामोदरपंत म्हणाले
"खरे आहे. पण देशपांडेसाहेब, या साऱ्या जुळवाजुळवीचे श्रेय तुम्हाला." पंचगिरी म्हणाले
"तसेच काही नाही. हे सारे योग असतात. जन्मतःच गाठी पडलेल्या असतात. कुणीतरी निमित्त असतं. झालं. ते जाऊ देत. श्रीपालला बोलवा." देशपांडे म्हणाले
काही वेळातच श्रीपाल तिथे पोहोचला. जोश्यांनी सांगितल्याप्रमाणे पाटावर बसला. पंचगिरींनी कुंकू लावून त्याला कपडे दिले. हार घालून पेढा भरवला. नंतर छायाला बोलावणे गेले. अलकासोबत छाया तिथे पोहोचताच सौ. कुलकर्णींनी तिला कुंकू लावून साडी दिली. हार घालून पेढा भरवला. नंतर कुलकर्णी आणि पंचगिरी परिवारांनी एकमेकांना आहेर केले. तसेच उपस्थित पाहुणे मंडळीसही आहेर झाले. देशपांडे यांना मात्र दोन्ही कुटुंबीयांनी आहेर केले. देशपांडे यांनी सद्गदित होऊन कृतार्थ भावनेने ते आहेर स्वीकारले. सर्वांची आनंदाने, समाधानाने जेवणे झाली. जोशी यांनी सुचविल्याप्रमाणे श्रीपाल आणि छाया बाहेर गेले. कुलकर्णी, देशपांडे आणि इतरांचा निरोप घेऊन पंचगिरी आणि सारेजण घरी परतले...
**
@ नागेश सू. शेवाळकर