Nidhale Sasura - 2 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | निघाले सासुरा - 2

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

निघाले सासुरा - 2

२) निघाले सासुरा!
आपल्या खोलीत पलंगावर पडलेल्या छायाच्या मनात विचारांचे थैमान माजले होते. एक- एक नकाराचे प्रसंग तिच्या मनात रुंजी घालत होते. या ना त्या कारणाने तिला मुले नकार देत होती. त्यादिवशी सकाळीच पंचगिरींचा फोन खणाणला. हातातील वर्तमानपत्र बाजूला सारुन फोन उचलून पंचगिरी म्हणाले,
"हॅलो, मी पंचगिरी बोलतोय..."
"अरे, मी देविदास बोलतोय..."
"आज कशी काय आठवण झाली बुवा?" पंचगिरींनी काहीशा आनंदात विचारले
"आपल्या छायासाठी माझ्याकडे एक ठिकाण आहे, सांगू का?"
"अरे, असे का विचारतोस? सांग ना..."
"आपल्यासोबत देशपांडे होता, तुला आठवत असेल. त्याचा एकुलता एक मुलगा इंजिनिअर असून तो लग्नाचा आहे."
"सांगतोस काय, ही तर आनंदाची गोष्ट आहे. देशपांडे आपला चांगला मित्र होता. त्याचा मुलगा निश्चित चांगला असणारच. त्याचा पत्ता सांगशील?"
"अरे, शिवाजीनगरजवळ ते गांधीनगर आहे..."
"हो. माहिती आहे मला. तिथे राहतो काय?"
"होय. गांधीनगरमध्ये त्याचे घर आहे."
"ठीक आहे. मी आत्ताच जातो. शुभस्य शीघ्रम!..." असे म्हणून पंचगिरींनी फोन ठेवला. घाईघाईने सारा वृत्तान्त कुटुंबात सर्वांना सांगून, देवाला नमस्कार करून पंचगिरी उत्साहाने बाहेर पडले.
गांधीनगरमध्ये त्यांना देशपांडे यांचे घर शोधणे अवघड गेले नाही. योगायोगाने स्वतः देशपांडे यांनी दार उघडले. पाहताक्षणी दोघांनी एकमेकांना ओळखले. दोघांनाही खूप आनंद झाला.
"पंचगिरी, तू या शहरात आहेस?"
"हो. तू या शहरात आहेस हे थोड्यावेळापूर्वी मला देविदासकडून समजले."
"अरे, देविदास मला कालच भेटला. आमचे दोनच मिनिटे बोलणे झाले. बरे झाले तू आलास ते आनंद झाला. किती वर्षांनी भेटतोय आपण?"
"हो ना. पण मी जरा वेगळ्याच कारणासाठी आलोय."
"अरे, मग काय ते बोल पटकन."
"अरे, माझी मुलगी छाया उपवर आहे. तुझा मुलगा लग्नाचा आहे..." पंचगिरीचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच वरच्या मजल्यावर बघत देशपांडे म्हणाले,
"नाही रे. सहा महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले आणि...
"आणि काय?" पंचगिरींनी वेगळ्याच शंकेने विचारले
"नशिबाचा भोग दुसरे काय? लग्नाच्या आठव्या दिवशी सूनबाईने वरती माडीवर वेगळा संसार थाटलाय. तुझी मुलगी सून म्हणून आली असती तर माझ्यावर ही वेळच आली नसती. काल देविदासला हे सांगणार होतो पण तो फारच गडबडीत होता. त्याला वाटले असेल की, माझा मुलगा लग्नाचा आहे म्हणून." देशपांडे निराशेच्या स्वरात म्हणाले. पंचगिरी काही क्षण तिथे बसले आणि देशपांड्यांचा निरोप घेऊन निघाले...
कुणाची तरी चाहूल लागली आणि भानावर येत छायाने डोळ्याच्या कडा साफ करीत दाराकडे पाहिले. तसे पाहताना तिला एक आशा वाटत होती की, कदाचित बाबा होकार घेऊन आले असतील. परंतु दारात बाईआत्याला पाहून मनोमन ती निराश झाली पण तसे न दाखवत पटकन सावरून बसत म्हणाली,
"बाईआत्या, ये ना."
बाईआत्या पलंगावर तिच्याजवळ बसली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिने विचारले,
"छाया, हे काय? ते मंगलाष्टक ऐकून अशी निघून का आलीस?"
"काही नाही ग, आत्या. असंच..." छाया म्हणाली परंतु आवाजातील नैराश्य ती लपवू शकली नाही.
"छाये, मी तुझी आत्या आहे म्हटलं. असं छोट्या छोट्या कारणांमुळे नाराज होऊ नये. प्रत्येकाचा योग असतो, उचित वेळ असते. तो योग जुळून आला, ती वेळ आली ना तर आठ दिवसात तुझा हनिमूनही होईल."
"आत्या, हे ग काय?" छाया लाजत म्हणाली
"व्वा! कशी मस्त लाजली ग बाई! छाया, नाही तरी हे आजकाल पाहणे वगैरे फारच पुढे गेलंय ग..." बाईआत्या बोलत असताना खोलीत आलेली अलका म्हणाली,
"बाईआत्या, तुमच्या काळातही हे असे पाहायचे कार्यक्रम होतेच का गं? मामा, तुला पाहायला आले होते का?"
"अलके, आम्ही दोघांनीही एकमेकांना पहिल्यांदा पाहिले ते लग्नात एकमेकांना हार घालताना."
"काय सांगतेस आत्या? खरेच की काय?" अलकाने आश्चर्याने विचारले
"आत्या, मग दाखविण्याचा कार्यक्रम.... शिरा-पोहे?" छायाने विचारले.
"कशाचा शिरा नि पोहे? माझे सासरे एके दिवशी संध्याकाळी दोन-तीन माणसे घेऊन आपल्या घरी आले. त्यावेळी मी असेन फार तर आठ-नऊ वर्षांची! घरासमोर पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मी मैत्रिणींसोबत खेळत होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करायला माझे बाबा म्हणजे तुमचे आजोबा बाहेर आले. तिथे मी खेळतेय हे पाहून ते म्हणाले,
'पाहुणेहो, जिला पाहायला तुम्ही आलात ना ती हिच आमची बाई...'
"धुळीने माखलेल्या आमच्या आत्याला पाहून काय म्हणाले ते लोक?" छायाने विचारले
"त्या लोकांनी मला त्या अवस्थेत पाहिले आणि हसतच आत गेले. मी आपली खेळण्यातच दंग! चहापाणी घेऊन, बोलून ती मंडळी बाहेर आली आणि मला त्याच मातीच्या ढिगाऱ्यावर खेळताना पाहून एका जणाने विचारले, 'काय सूनबाई, केंव्हा येणार आपल्या घरी?"
"आत्या, डायरेक्ट घरी? पाहण्याचा कार्यक्रम नाही, प्रश्नोत्तरे नाही. कमाल आहे?" अलका म्हणाली.
"आत्या, तू काय म्हणालीस ग?" छायाने विचारले.
"अग, मला तरी ते काय म्हणतात ते माहिती होते? माझे लग्न होणार आहे हेही मला ठाऊक नव्हते. त्यांनी तसे म्हणताच मी ताडकन म्हणाले की, 'माझे नाव कांचन आहे. सगळे मला बाई म्हणतात. तुम्हीही मला बाईच म्हणा. ते सूनबाई... बिनबाई म्हणू नका...' मी असे म्हणताच सारे मोठ्याने हसत निघून गेले..."
"वॉव! क्या बात है। मानलं बुवा!" अलका म्हणाली. या संवादामुळे छाया बरीच मोकळी झाली.
"मग आमच्या वन्स होत्याच तशा..." खोलीत आलेली सरस्वती सांगत असताना पाठोपाठ आत आलेला छायाचा भाऊ आकाश म्हणाला,
"धुळीने माखलेल्या..." ते ऐकून सारे हसत सुटले
"आत्या, तुला एक सांगू का, खरेतर छायाताईचे लग्न पूर्वीच झाले असते..." आकाशने स्वतःचे वाक्य सहेतुक अर्धवट सोडले
"मग काय झाले रे?" आत्याने विचारले
"गेली एक मांजर आडवी..." अलकाकडे पाहून आकाश म्हणाला
"आक्या, थांब. बघतेच तुला..." अलका चिडून म्हणाली
"अरे, थांबा. काय झाले?" आत्याने विचारले
"वन्स, काय होणार? जिल्हा परिषदेत नोकरीस असणारा एक मुलगा छायाला पाहायला आला. त्याचे आईवडील गावी राहात असल्यामुळे मुलगा मित्रांसोबत आला होता. पोहे वगैरे झाले. छायाची मुलाखतही झाली. नंतर अलका चहा घेऊन आली आणि तिथेच घोटाळा झाला..."
"असे झाले तरी काय?"
"कही पे निगाहें, कही पे निशाना असा प्रकार झाला." आकाश पुन्हा हसत म्हणाला
"वन्स, ती मंडळी आली होती छायाला पाहायला पण पसंती दिली अलकाला..."
"अग बाई, हे तर भलतेच झाले की. मग द्यायचा की बार उडवून." बाई हसत म्हणाली तशी अलका लाजून म्हणाली,
"आत्या, हे ग काय? जा. मी तुझ्याशी बोलणारच नाही."
"अहो वन्स, अलकीचं वयंच असं काय होतं हो? शिवाय मोठीला ठेवून लहानीला उजवणे म्हणजे आम्हाला नाही पटले. आम्हीच नकार दिला..."
"होकार दिला असता तर ही आपल्या मागची पीडा कायमची गेली असती ना..." असे म्हणून आकाश हसतच बाहेर पळाला
"माझी पीडा काय? थांब. दाखवितेच आता..." म्हणत आकाशच्या पाठोपाठ अलकाही बाहेर निघाली
"आता लागणार यांची मारामारी..." सरस्वती म्हणाल्या
"थांब. मी बघते..." म्हणत छाया खोलीबाहेर जाताच बाईंनी सरस्वतीला विचारले,
"का ग सरस्वती, मागे एक दोन ठिकाणची पसंती आली होती ना ?"
"आली होती हो पण आपल्या छायानेच नकार दिला."
"छायाने नाकारले? का?" बाईंनी आश्चर्याने विचारले
"अहो, वनखात्यात नोकरीस असलेल्या मुलाने छायाला पसंती दिली होती. पण एका दृष्टीने छायाने त्यास नकार दिला हे चांगलेच झाले."
"असे का? असा कोणता दोष होता त्या मुलामध्ये?"
"अहो, मुलगा रंगाने काळाभोर होता. महत्त्वाचे म्हणजे एखादे वेळी रंगाचे सोडले असते पण मुलाच्या अंगावर अगदी भुवया आणि कानावरही लांब लांब केस होते. आम्हाला कुणालाही तो मुलगा आवडला नव्हता..." सरस्वती बोलत असताना बाई हसतहसत म्हणाली,
"बरे, झाले आपल्या छायाला त्या अस्वलाच्या गळ्यात बांधले नाही ते. पण मग पुढे?"
"अहो, त्याला छाया पसंत होती. त्याचे सारखे दिवसातून तीन-तीन फोन येत होते. आज सांगतो, उद्या सांगतो... आठ दिवसात सांगतो असे त्यांना सांगत शेवटी त्याचा पत्ता कट केला."
"मला आठवते, म्हणजे बहुतेक आपले बोलणे झाले होते, एका ठिकाणी बोलाचालीही झाली होती ना? काय झाले त्याचे पुढे?"
"होय हो. ते ठिकाणही खूप छान होते. श्रीमंत होते. मुलगा डॉक्टर होता. देण्या-घेण्याचाही प्रश्न नव्हता म्हणजे बोलाचालीही झाली. दोन-तीन दिवसांनी त्यांनी अचानक नकार कळवला हो."
"का? कुठे माशी शिंकली?" बाईने विचारले
"वन्स, बोलाचालीसाठी माझा भाऊ, वहिनी, भाचा आणि भाची आले होते. बोलाचाली यशस्वी झाली. छायाचे लग्न ठरले या आनंदात ही तरुणाई सिनेमाला गेली. खूप गर्दी होती म्हणून माझी भाची आणि अलका तिकिटे आणायला गेल्या. त्या परत येईपर्यंत माझा भाचा, आकाश आणि छाया गर्दीपासून दूर बोलत उभे असताना काही तरी विनोद झाला आणि छाया आणि माझ्या भाच्याने एकमेकांना टाळी दिली. योगायोगाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा पसंती दिलेला तो डॉक्टर मुलगाही मित्रांसह तोच सिनेमा पाहायला आला होता. त्याने छायाला तिच्या मामेभावासोबत बोलताना, टाळी देताना, हसताना पाहिले आणि त्याने वेगळाच अर्थ काढून नकार कळवला."
"एका परीने बरे झाले गं. असं संशयी पोरगं गळ्यात पडलं असतं ना तर लग्नानंतर त्याने काही छायाला सुखी ठेवलं नसतं..." बाईआत्या बोलत असताना आत आलेल्या छायाला पाहून बाईने विचारले, "छाया, तू कविता करायचीस ना?"
छाया काही बोलण्यापूर्वीच सरस्वती म्हणाली,
"वन्स, एका मुलाने नकार दिल्याने छायाने कवितेला सोडचिठ्ठी दिली."
"कविता आणि होकार-नकार यांचा संबंध तो काय?" बाईने विचारले
"पोलीस असलेला एक मुलगा छायाला पाहायला आला असताना त्याने प्रश्न विचारला की, कोणकोणते छंद आहेत? योगायोगाने त्याचदिवशी छायाची एक कविता वर्तमानपत्रात छापून आली होती. ह्यांनी ती कविता कौतुकाने मुलाला दाखवली. आणि पोराचा पोलिसी संशय जागा झाला."
"म्हणजे?"
"अग आत्या, ती कविता थोडीशी श्रुंगारिक आणि पहिल्या रात्रीचे वर्णन करणारी होती. ती वाचून..." असे म्हणताना छायाने वाक्य अर्धवट सोडलेले पाहून बाईंनी विचारले,
"काय म्हणाला तो?"
"तो तेव्हा काही म्हणाला नाही पण निरोप घेण्यासाठी फोन केला तेव्हा म्हणाला की, मुलगी 'त्या' विषयावर, तशी कविता करते याचा अर्थ तिला नक्कीच 'तसा'अनुभव असला पाहिजे कारण साहित्य हे स्वानुभवावर असते असे म्हणतात..."
"काय बाई, एकेक माणूस आणि अनुभव विचित्र म्हणावा."
"खरे आहे, आत्या. अग, एक मुलगा तर बोलता बोलता अचानक रागावून निघून गेला."
"असे काय घडले?"
"मला पाहायला एक मुलगा त्याच्या आई वडिलांसह आला होता. प्रश्न विचारताना अचानक म्हणाला, की त्याला मुलीसोबत थोडे बोलायचं आहे. मग मी त्या मुलासोबत याच खोलीत आले. थोडे असेच बोलणे झाले. इकडचेतिकडचे बोलणे झाल्यामुळे वातावरणातील ताण थोडा कमी होताच तो म्हणाला की, तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांची सारी जबाबदारी माझ्यावरच आहे. तुला त्यांचा सांभाळ करावा लागेल, सेवा करावी लागेल. वास्तविक पाहता तो मुलगा खरेच चांगला होता..."
"अग, मग वरातीचे घोडे अडले कुठे?" आत्याने विचारले
"वन्स, त्या मुलाचे आईवडील तसे धडधाकट होते, वयानेही फार वृद्ध किंवा म्हातारे नव्हते त्यामुळे मुलाने सुरुवातीलाच तसे सुचवायला नको होते..." सरस्वती सांगत असताना छाया म्हणाली,
"आत्या, कशात काय नि फाटक्यात पाय असे असताना, काहीही ठरलेले नसताना, आईवडीलांची प्रकृती ठणठणीत असताना तो तसा म्हणाला ते मला आवडले नाही आणि मी मागचा पुढचा विचार न करता पटकन म्हणाले की, तुमच्या आईवडिलांची जबाबदारी मी घेईन पण मग माझ्याही मातापित्यांची जिम्मेदारी तुम्हाला घ्यावी लागेल..."
"व्वा रे, शेरनी!" बाई म्हणाली
"कशाची शेरनी नि काय वन्स. अहो, तुमच्या या शेरनीने स्वतःचाच बळी घेतला की. छाया तसे म्हणाली आणि तो मुलगा तणतणत निघून गेला की हो."
"सरस्वती, अग आजकालच्या मुलीही मुलांना नकार देऊ लागल्या आहेत त्यामुळे छायाला दोष देण्यात काही अर्थ नाही. माझ्या पुतणीनेही परवाच एका मुलाला नाकारले. पसंती देण्यापूर्वी मुलीशी एकदा बोलायचे असा निरोप मुलाने दिल्यानंतर दोघेही बाहेर भेटले. बोलता बोलता संततीचा विषय निघाला. माझी पुतणी थोडी पुढारलेल्या विचारांची आहे. ती म्हणाली, की आपण पाच वर्षे तरी अपत्याचा विचार करू नये. शिवाय मुलगा होवो किंवा मुलगी एकच बास!..."
"आत्या, बरोबर आहे, की तिचे." छाया म्हणाली
"तिच्या या विचारानेच घात झाला. त्या मुलाला आणि त्याच्या घरच्या लोकांना एवढी वर्षे थांबायचे नव्हते, 'मंगनी चट, ब्याह पट, मुल झटपट!' हवे होते. शिवाय एका अपत्यावर थांबायचे नव्हते..." बाई सांगत असताना छाया हसत म्हणाली,
"मग काय त्यांना क्रिकेटची टिम हवी होती की काय?"
"अग,त्यांना एक मुलगा, एक मुलगी असा समतोल साधायचा होता. शिवाय त्यांचे एकत्र कुटुंब होते. माझ्या पुतणीला ते नको होते. 'हम दो हमारा एक!' असा सुटसुटीत संसार हवा होता."
"आत्या, तुझी ही पुतणी कशी आहे ग?" खोलीत परत आलेल्या आकाशने विचारले
"ती तुला 'घरनवरा' ही करून घेणार नाही..." पाठोपाठ आलेली अलका म्हणाली आणि खोलीत हशा पिकला
"अरे, ती खरेच खूप सुंदर आहे शिवाय इंजिनिअर आहे."
"आत्या, तिचेही काही खोटे नाही ग." छाया म्हणाली
"तसेच म्हणावे लागेल पण आमच्या दृष्टीने सर्वगुणसंपन्न, आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा अजून एका मुलाने पसंती दिल्यावर त्यालाही हिने नकार देणे..."
"म्हणजे दुसरे स्थळही नापसंत केले ग..." आत्या बोलत असताना आकाश अचानक म्हणाला,
"आत्ते, मला तर वाटते, की तुझ्या पुतणीचे नक्कीच कुणासोबत प्रेमप्रकरण सुरू असणार..."
"ए चूप बस!" सरस्वतीने आकाशला दरडावले
"हा दुसरा मुलगाही उच्चशिक्षित, भरपूर पगार असलेला होता. त्याच्या भावी पत्नीने नोकरी करण्यासाठी त्याचा विरोध नव्हता मात्र पत्नीने अगोदर नवऱ्याच्या करिअरला महत्त्व देऊन मग स्वतःच्या नोकरीस प्राधान्य द्यावे..."
"म्हणजे त्याचे म्हणणे असे, की त्याला चांगली ऑफर आली आणि त्याला शहर बदलण्याची वेळ आलीच तर त्याच्या बायकोने तिची नोकरी सोडावी. नवीन शहरात गेल्यावर तिथे बायकोसाठी नवीन नोकरी शोधत येईल." आकाश म्हणाला
"अगदी बरोबर! त्याला पत्नीची नोकरी, पैसा तर हवा होताच पण तिला किंवा तिच्या नोकरीला प्राधान्य नको. हाच मुद्दा आमच्या बाईसाहेबांना पटला नाही आणि तिने चक्क, स्पष्ट शब्दात नकार दिला." बाईआत्या म्हणाली
"बाईआत्या, आपल्या छायाताईही मुलांना 'दे धक्का' द्यायला मागे नाहीत हं..." आकाश बोलत असताना छाया त्याच्यावर ओरडली,
"आक्या, थांब..."
"क..क..का? खोटे सांगतोय? तो.. तो कोण गं आई? त्याने छायाताईला पसंती दिली परंतु त्याच्या भावाच्या कपाळावर डाग होता म्हणून ताईने त्याला नापसंती दिली."
"बरोबर केलेस ग छाये, तुम्हाला माझ्या याच पुतणीची अजून एक 'वरास नकार' कथा ऐकवते."
"सांग. सांग. लवकर सांग..." आकाश उतावीळपणे म्हणाला
"थांब रे तू. झाले काय तर, काही मंडळी माझ्या पुतणीला पाहायला आली. चहाफराळ झाला. 'चहा करता येतो का? सिनेमा आवडतो का? क्रिकेट पाहतेस का? नॉनव्हेज करता येते का? पेपर वाचण्याची आवड आहे का?'..."
"बाप रे! प्रश्नपत्रिका तर फारच मोठी होती की. पुढे?"
"का कोण जाणे पण पुतणीने जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे नकारात्मक दिली. त्यामुळे त्यांनी नकार देताना सांगितले की, आजच्या युगात शिकलेली मुलगी असूनही काहीच आवडत नाही म्हणजे न पटण्यासारखे आणि काकूबाई असल्यासारखे वागणे असल्यामुळे योग दिसत नाही."
"वन्स, एक अनुभव मात्र ह्रदयाशी भिडणारा आला..."
"तो ग कोणता?"
"एक वकील मुलगा उपवर होता म्हणून हे प्राथमिक बोलणी करायला त्यांच्याकडे गेले. यांनी भेटीचा मनोदय सांगताच त्या गृहस्थाचे डोळे भरून आले. ते म्हणाले, त्याचं काय आहे, तुमचे बरोबर आहे. मुलगा उपवर आहे पण एक फार वाईट घटना घडली आहे. माझा मोठा मुलगा डॉक्टर होता. त्याचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्न झाले त्याच रात्री त्याला अचानक भयंकर ताप आला. रात्रीच दवाखान्यात शरीक केले. साऱ्या तपासण्या होताच डॉक्टर म्हणाले, की ताबडतोब मुंबईला न्यावे लागेल. लगेचच मुंबईला निघालो. तिथे दवाखान्यात शरीक केले. तापेत चढउतार असे सुरू असताना आठव्या दिवशी कायमचा निघून गेला. बिचारी पोरगी हळद सुकण्यापूर्वीच, कुंकू कपाळावर जेमतेम बसले न बसले की, विधवा झाली हो. आमचा लहाना मुलगा वकील आहे. त्याच्या म्हणण्यानुसार नववधूने आजन्म वैधव्याचा टिळा कपाळी लावून का राहावे? ज्या व्यक्तीची पुरेशी ओळखही झाली नाही त्याच्या नावावर, बोटांवर मोजता येतील अशा आठवणींवर आयुष्य काढायची शिक्षा का द्यावी? म्हणून त्यानेच त्या मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. आम्ही सुनेच्या माहेरी चर्चा केली नंतर सारे मिळून सुनेशी बोललो. हो ना करता करता अखेर ती तयार झाली." सरस्वती म्हणाली. ते ऐकताना डोळे पाणावलेली बाई म्हणाली,
"किती मोठ्या मनाची माणसे म्हणावीत. नाही तर आजपर्यंत मुलाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सुनेला जबाबदार धरून तिचा अनन्वित छळ केल्याचीच उदाहरणे आपल्या ऐकिवात आहेत."
"तायडे, ते डोळा मारणे प्रकरण सांगू काय?" आकाशने हसत विचारले. तसे आत्याने विचारले,
"आक्या, कुणाला डोळा मारलास रे? तू काय करशील ते सांगता येणार नाही."
"आत्या, अग मी नाही ग बाई. ऐक तर. एक साहेब आपल्या ताईबाईस पाहायला आले. कार्यक्रम पार पडला. काही दिवसांनी त्यांनी चक्क कुरियरने पत्र पाठवून सांगितले, की ते मुलीला पाहायला आल्यापासून ते आपल्या घरी असेपर्यंत जेव्हा जेव्हा त्या मुलाची आणि ताईची नजरानजर झाली त्या प्रत्येकवेळी म्हणे ताईने त्यांना डोळा मारला..."
"छाये, तो मुलगा तुला पसंत नव्हता. त्याला नकार कसा द्यावा म्हणून त्यानेच नकार कळवावा या हेतूने तर तू तसं वागली नाहीस ना?" आत्याने विचारले
"नाही ग आत्या, तसे काही नव्हते. त्यादिवशी सकाळपासूनच का कोण जाणे पण माझा डोळा सारखा लपलप करीत होता. तो प्रकार का थांबवता येतो? परंतु त्या महाशयांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला आणि नकार दिला. दिला तर दिला. माय फुट!..." छाया सांगत असताना अलकाचा आवाज आला
"बाबा आले, बाबा!" ते ऐकताच सारी मंडळी दिवाणखान्यात पोहोचली. छाया मात्र खोलीच्या दाराशी येऊन कान बाहेर लावून बसली.
दयानंद पंचगिरी दिवाणखान्यातील कोचावर बसले. सर्वांकडे पाहून कुणाची उत्सुकता न ताणता म्हणाले, "बाई, सरस्वती, आनंदाची बातमी आहे. होकार घेऊन आलोय..."
"देव पावला रे बाप्पा! बघ सरस्वती, मी म्हणत होते ना, आज दयानंद होकार घेऊनच येणार म्हणून."
"वन्स, खरेच तुमच्या पायगुणाने झाले हो..."
"हो. बाई, सरस्वती म्हणते ते खरे आहे. तू आलीस आणि बघ पसंती आली. बाई, तुला काय सांगू, गेली चार-पाच वर्षे ते म्हणतात ना चपला झिजविल्या, उंबरठे झिजवले, खस्ता खाल्ल्या, आकाशपाताळ एक केले, नाकीनऊ आले हे सारे सारे अनुभवले ग. पण शेवटी छाया, तू जिंकलीस ग पोरी. लाखात एक असे पोरगं आहे बरे."
"बरे, पुढील व्यवहार वगैरे." बाई म्हणाल्या
"आज सायंकाळी आपले मध्यस्थी देशपांडे येणार आहेत घरी. आधी त्यांच्याशी बोलू."
"दयानंद, चालत आलेली ही संधी सोडू नको. पाच-दहा इकडे का तिकडे. त्यांचा काही अंदाज?"
"नाही. काहीच नाही. पण जुळेल असं वाटतेय. छाया, तुझी काही हरकत नाही ना?"
"बरोबर आहे, दयानंद तुझे. मुलीची पसंती महत्त्वाची आहे. काय गं छाये..."
"हे गं काय आत्या?" असे म्हणत छाया आत पळाली.
"मिळाला हो मिळाला. नवरदेवाच्या होकाराला नवरीचाही होकार मिळाला हो..." असे म्हणत आकाशपाठोपाठ अलकाही छायाच्या मागे आत गेली.
"मध्यस्थी देशपांड्यांचा कल कसा आहे?"
"बाई, ते माझे जवळचे मित्र आहेत आणि मुलाच्या शेजारी राहतात. शिवाय लग्न जुळविण्याची कामेही करतात. चालती बोलती विवाहसंस्था आहे." दयानंद म्हणाले
"अरे, मग त्यांची फिसही तशीच दांडगी असेल बरे. विचारलेस का त्यांना स्पष्ट? समाजकार्य वगैरे गप्पा असतात. आजकाल 'लग्न जुळवणे' हा बिनभांडवली पण भरपूर उत्पन्न देणारा व्यवसाय होऊन बसलाय. अरे, अशी अनेक उदाहरणे आहेत, लग्न जुळविण्याच्या नावाखाली हजार- पाच हजार रुपयांना चुना लावून मोकळे होतात."
"तसं काही नाही बाई. आमच्या देशपांड्यांना चहाचीही अपेक्षा नाही."
"मग लागा तयारीला. वरसंशोधन मोहीम सफल संपूर्ण झाली. दाखवादाखवीच्या कार्यक्रमानंतर आता 'वराची विक्री!' अरे, असे पाहतोस काय? बोलाचालीचे म्हणतेय मी..." बाई म्हणाली आणि सारे मनमोकळेपणाने हसले कदाचित अनेक वर्षांपासून असलेला ताण उतरल्यामुळे असेल...
**
@ नागेश सू. शेवाळकर