Avyakt - 8 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | अव्यक्त (भाग - 8)

Featured Books
  • जंगल - भाग 12

                                   ( 12)                       ...

  • इश्क दा मारा - 26

    MLA साहब की बाते सुन कर गीतिका के घर वालों को बहुत ही गुस्सा...

  • दरिंदा - भाग - 13

    अल्पा अपने भाई मौलिक को बुलाने का सुनकर डर रही थी। तब विनोद...

  • आखेट महल - 8

    आठ घण्टा भर बीतते-बीतते फिर गौरांबर की जेब में पच्चीस रुपये...

  • द्वारावती - 75

    75                                    “मैं मेरी पुस्तकें अभी...

Categories
Share

अव्यक्त (भाग - 8)

कुसुमाग्रजांनी ज्या काळात लिहायला सुरुवात केली तो काळ पारतंत्र्याचा काळ होता. त्या काळात लिहिली जाणारी कविता ही देशप्रेमानं प्रेरित झालेली होतीच पण त्याचबरोबर निसर्ग, प्रेम तसेच जीवनविषयक भाष्य अशा विषयांवर केंद्रित झालेली होती. कुसुमाग्रजांच्या बहुतेक कविता या अशा आशयाभोवती फिरताना दिसतात. कुसुमाग्रजांचा लेखनकाळ हा जवळजवळ साठ-सत्तर वर्षांचा. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. तेव्हापासून जवळजवळ त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९९ पर्यंत ते लिहीत होते. इतक्या प्रदीर्घ काळात सातत्यानं कसदार लेखन करणं ही साधी गोष्ट नाही. पण कुसुमाग्रजांना ती जमली.
कुसुमाग्रजांनी कवितेबरोबरच नाटक, रूपककथा, लघुनिबंधही लिहिले. त्यांची कविता असो की नाटक त्यांच्या लेखनात मानवतावादाचं दर्शन आपल्याला सतत घडत असतं. त्यांची कविता सौंदर्यलक्षी असली तरी तिच्यात आवेश आहे, नाटय़पूर्णता आहे. ‘गर्जा जयजयकार’, ‘कोलंबसाचे गर्वगीत’ यांसारख्या अनेक कवितांत आपल्याला ती दिसते. ‘विशाखा’मधील अनेक कवितांत तर त्या काळातील समाजाची ध्येयवादी मानसिकता दिसून येते. पण अर्थात ती प्रचारकी स्वरूपाची नाही. त्यांच्या अनेक कविता तरल आणि उत्कट भावकविता आहेतच पण त्याचबरोबर त्यांच्या काही कवितांत त्या त्या काळातील सामाजिक वास्तवाचं भानंही दिसून येतं. केशवसुतांच्या क्रांतिकारी कवितेशी नातं सांगणाऱ्या या मानवतावादी कवीनं त्यामुळेच स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहिले.
कुसुमाग्रजांचा एकूण लेखनकाळ आणि त्या काळात लिहिलेली कविता पाहिली तर लक्षात येतं की हा कवी एकूणच सामाजिक भान जपणारा कवी होता. त्यांना सामाजिक भावनांचे उद्गाते, किंवा अग्निसंप्रदायाचे प्रणेते म्हटले गेले आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेतील स्त्रीवर मात्र फार कमी लिहिले गेले आहे. एकूणच कुसुमाग्रजांच्या कवितेत किंवा नाटकात आलेली स्त्री ही तशी खूप लक्षणीय नसली तरी त्यांच्या ज्या काही स्त्रीविषयक कविता होत्या त्या महत्त्वाच्या होत्याच, पण त्यांनी निर्माण केलेली जुलेखा, देवयानी, किंवा ‘नटसम्राट’मधील सरकार यांसारखी काही महत्त्वाची स्त्रीपात्र कायमची लक्षात राहण्यासारखी होती. या स्त्रियांना त्यांनी स्वत:चं असं व्यक्तिमत्त्व दिलंच पण स्वत:चा आतला आवाजही दिला.
खरं तर कुसुमाग्रजांनी इतर कवींच्या तुलनेनं प्रेमकविता खूप कमी लिहिली. अगदी क्वचित कुठं तरी या प्रेयसीमध्ये ते रमलेले दिसतात. त्याला कारण कुसुमाग्रजांचा काळ. हा काळ दिव्यत्वानं भारलेला काळ आहे. क्रांतीचा जयजयकार करणारा काळ आहे. स्वातंत्र्य लढय़ाचा काळ आहे. कदाचित त्यामुळेच असेल पण त्या काळातला पुरुष हा एका विशिष्ट ध्येयानं भारलेला होता. मातृभूमीपुढे प्रेम, कुटुंब, संसार त्याला क्षुद्र वाटत होत्या. त्यामुळेच त्यांच्या कवितेतला पुरुष आपल्या सखीला त्याच्या गळ्यातले तिचे चांदण्यांचे हात काढायला सांगतो.
असं असलं तरी प्रेमावर त्यांची श्रद्धा आहे. तो काळ प्रेमाकडेही एक उदात्त भावना म्हणून पहाण्याचा काळ होता. कुसुमाग्रजांनाही त्यातली उदात्तता भावत होती. पण तरीही त्यांच्या कवितेतून व्यक्त होणारं प्रेम हे जास्त मानवी होतं. ते म्हणतात,
माझ्या प्रीतीत दिव्यता न असली,
ती मानवी सर्वथा
आहे ती तुझियावरी नि रमते
ती वर्तमानामध्ये
‘प्रीतीलाच कसला चिरंतनपणा जी जन्मली नश्वरी’, असं म्हणणाऱ्या या कवीच्या प्रेमाविषयी व प्रेयसीविषयीही काही आदर्श कल्पना होत्या. त्यांच्या कवितेतली प्रेयसी ही मुग्ध, सर्वसाधारपणे पुरुषाच्या मनात असलेल्या प्रतिमेतीलच आहे. उदाहरणार्थ ‘बंदीवान’ या त्यांच्या कवितेतली ‘ती’ म्हणते,
असे यायचे तुझ्याकडे पण
भयकर कारा माझ्याभवती
खणखणती चहुकडे शृंखला अन
उग्र पहारे दारावरती
या तिमिरी बंदीवान रे दुर्बलतेची सदैव सोबत,
किंवा भय वाटे, मी अशीच जगता
चिराच होईन इथे चिऱ्यातिल
तिमिरामधली ज्योत अकेली
तिमिरामध्ये विलिन होईल
आपल्या समाजातील स्त्रीचं असहायपण आणि तिचं प्रियकरावरचं म्हणजेच पुरुषावरचं अवलंबित्वही कवीला जाणवत राहिलं. त्यामुळेच प्रेयसीविषयीच्या अवास्तव कल्पना त्यांनी केल्या नाहीत. म्हणजे ज्या काळात खांडेकर, फडके लिहीत होते त्या काळात कोणत्या नवलनगरीतल्या राजकुमारीची वगरे कल्पना कुसुमाग्रज करत नव्हते हे विशेष आहे. त्यांच्या मनातली स्त्री ही अतिशय साधी होती. ते म्हणतात,
मादक सुगंधानं दरवळणारी
ती कोणी रातराणी नव्हती
चांदण्यांचे हात असलेली
ती कोणी भाऊक प्रणयीनी नव्हती.
ती नव्हती कोणी लावण्यवती रूपगर्वतिा
ती नव्हती कोणी प्रतिभावंताची स्फुर्तीदेवता
ती होती फक्त एक किनारा
भरकटलेल्या गलबताचा एकमेव निवारा
त्यांच्या अनेक कवितांत ही अशी कायम पुरुषामागे उभी राहणारी, त्याला जपणारी स्त्री येत रहाते व अनेकदा पुरुष आपल्या या स्त्रीमध्ये आधार शोधत असतात. पुरुषाला ही स्त्री प्रेयसी म्हणून कितीही भावत असली तरी ती आपली आई व्हावी आपला आधार व्हावा, असं वाटत असतं आणि हा असा आधार तुटला की जे रिकामपण येतं, एकटेपण वाटतं ते फार अस असतं. कुसुमाग्रजांच्या काही कवितांतून हे एकटेपण व्यक्त झालं आहे.
चमच्यांच्या स्टँडवर
सात चमचे होते
एक चमचा एके दिवशी गहाळ झाला
उरलेल्या सहांच्या गळ्यांतून प्रथमच
अनावर हुंदका फुटला
ती असती तर, ते उद्गारले
तो हरवला नसता
मीही अनावरपणे
सातवा चमचा झालो
आणि त्याची जागा घेऊन
सहांच्या हुंदक्यात सामील झालो
आणि पुटपुटलो खरं आहे मित्रांनो
ती असती तर मी हरवलो नसतो.
त्यांची सर्वात गाजलेली कविता म्हणजे ‘पृथ्वीचं प्रेमगीत’. या कवितेत स्त्रीच्या तिच्या मनातल्या आदर्श पुरुषावर असलेल्या प्रेमाची महती गायली गेली आहे. हे प्रेम उत्कट आणि भक्तीसदृश आहे. पुरुषातल्या देवत्वाचं, दिव्यत्वाचं, भव्यतेचं स्त्रीला असलेलं वेड या कवितेत व्यक्त होते. ‘नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा’ वगरे ती म्हणते. मी या कवितेत व्यक्त झालेल्या प्रेमाकडे थोडं वेगळ्या पद्धतीनं पाहते.
ही कविता आपल्या व्यवस्थेच्या मानसिकतेचं दर्शन घडवणारी आहे. सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी म्हणजे पुरुष या केंद्राभोवती फिरणारी स्त्री आहे असं म्हटल्यास हरकत नाही. ‘युगामागून चालली रे युगे किती करावी भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना’ असं म्हणणारी या कवितेतील स्त्री आपल्याला आजच्या काळातही दिसून येते.
– न जाणे न नेणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती
अमर्याद मित्र, तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धूलीकण
आपण एक धूलिकण आहोत, असं मानणारी स्त्री आजही आपल्याला आजूबाजूला दिसत असते. परंपरेनं दिलेलं दुय्यमत्व स्वीकारून जगणारी ही स्त्री जे जगणं नको आहे ते नाकारण्याचा हक्क घेतेच असं नाही. या कवितेतली स्त्री मात्र अशी नाही. जरी ती युगानुयुगे या भास्कराभोवती फिरते आहे तरी आपल्याला हवं ते मिळायला हवं, ही इच्छा ती व्यक्त करताना दिसते. तिला ज्याची ओढ आहे त्यालाच ती वरते आहे. तडजोड म्हणून ती समोर येईल त्याचा स्वीकार करत नाही. त्याचबरोबर आपल्याला स्वत:भोवती फिरवणाऱ्या सूर्याला म्हणजेच पुरुषाला जाब विचारण्याचं धाडस तिच्यात आहे. स्वत:चा आत्मसन्मान जपणारी ही स्त्री कुसुमाग्रजांच्या या कवितेत येते हे जास्त महत्त्वाचं वाटतं.
आई या कल्पनेचं उदात्तीकरण सारेच कवी करतात. कुसुमाग्रजांनीही ते केलं आहे. ते म्हणतात-
‘दिला आहे एक वत्सल पदर
धुळीनं माखलेले तोंड लपवायला
मायेचा एक थरथरता हात
जखमांतील रक्त टिपायला.
एक निरांजनी नजर आमच्या
लांबलचक रस्त्यावरती
सोनपाणी शिंपायला’.
पण याशिवाय पत्नी, प्रेयसी, वेश्या अशा वेगवेगळ्या रूपातील स्त्री ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या ‘तळघर’सारख्या कवितेत ते स्त्रीच्या मनात डोकावतात. सरभर हसणाऱ्या बाईच्या खोल मनात कोणती वेदना सामावलेली आहे हे शोधण्यासाठी ते तिच्या मनाच्या पायऱ्या उतरून जातात तेव्हा त्यांना त्या मनाच्या तळघरात सापडते ‘छोटीशी कबर गुलाबपाकळ्यांनी झाकलेली,धुपाच्या दाट सुगंधात वेढलेली’. तिचं सरभर हसणं म्हणजे चिरंतर वेदनेचा सुंदर अविष्कार असलेला ताजमहालच असल्यासारखं त्यांना वाटतं.
स्त्रीच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या कवीची मला सर्वात महत्त्वाची कविता वाटते. या कवितेतून कुसुमाग्रजांच्या संवेदनशीलतेचा एक वेगळा पलू समोर येतो. दुष्यंत आणि शकुंतला या प्रतिनिधिक पुरुषाचं आणि स्त्रीचं मिथक घेऊन कुसुमाग्रजांनी स्त्री-पुरुष संबंधावर अतिशय मार्मिक भाष्य केलं आहे. आजही स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहणाऱ्या पुरुषसत्ताक समाजाची मानसिकता दाखविणाऱ्या या कवितेच्या पहिल्याच ओळीत ते म्हणतात, ‘आपण सारेच दुष्यन्त कालिदासाच्या संमतीशिवाय’. कालिदासाच्या नाटकातली घटितं घडतात ती त्याला हवी तशी. त्याची पात्र वागतात ती त्याला हवी तशी. म्हणजे त्याच्या संमतीनं सर्व काही घडत असतं. पण या समाजात राहणारे आपण सारेच कोणत्याही, अगदी अदृष्य लेखकाचेही बांधील नसल्यानं आपल्याला हवं ते करत असतो आणि त्याचा जाब विचारणारे कोणी नसल्यानं सोईस्कररीत्या आपली सुटकाही करून घेत असतो.
आजही स्त्रीला दुय्यम वागणूक देणाऱ्या या समाजातील पुरुष, तिला वश करण्यासाठी निर्मळ प्रेमभावनेचा तसेच पराक्रमी, कर्तबगार पुरुषाचा मुखवटा घालून तिच्यासमोर येतात. भुंग्याला मारण्याचा पराक्रम करून तिचं मन जिंकतात. अशा क्षुल्लक पराक्रमाचा अभिमान बाळगणारे पुरुष किती दांभिक असतात हे सांगताना कुसुमाग्रजांच्या लेखणीला आलेली उपरोधाची धार या कवितेत पुढे पुढे अधिकाधिक तीव्र होत जाते. जी स्त्री आपल्याला हवीशी वाटते, त्या स्त्रीनं आपल्या स्वाधीन व्हावं म्हणून तिला अनेक स्वप्नं दाखवली जातात. तिला वचनं दिली जातात. पुढे मात्र ही दिलेली वचनं पाळायची जबाबदारी ते नाकारतात. अशी जबाबदारी नाकारणारे कालिदासाच्या दुष्यंतासारखेच अनेक दुष्यंत कुसुमाग्रजांना सगळीकडेच दिसताहेत. आज द्विभार्याप्रतिबंधक कायद्यामुळे त्यांना अनेक स्त्रियांशी विवाह करता येत नसला तरी असे अनेक पुरुष एखादी कण्वकन्या नजरेला पडली तर केवळ नजरेनंच तिचा उपभोगही घेतात. आजचे असे दुष्यंत या कवीला जास्त अस्वस्थ करताना दिसतात. ‘मानसिक जनानखाना’ हे रूपक पुरुषांच्या मनात दडलेल्या स्त्रीविषयीच्या अभिलाषांचं, वासनेचं योग्य वर्णन करतं. प्रत्येक स्त्रीकडे भोगवस्तू वस्तू म्हणून पाहणाऱ्या आणि मनातल्या मनात हव्या त्या स्त्रीला भोगणाऱ्या पुरुषी मानसिकतेचं अस्वस्थ करणारं चित्र ही कविता आपल्यापुढे उभं करते. स्त्रीला अशा तऱ्हेनं उपभोगणं हे अर्थात कोणत्याही प्रकारच्या प्रेमभावनेवर अथवा त्या त्या स्त्रीशी प्रमाणिक रहाण्याच्या कल्पनेवर आधारलेलं नसतं हे सांगताना कुसुमाग्रजांमधील कवी पुरुषाची दुटप्पी वृत्ती दाखवतानाच स्त्रीच्या भावनांविषयी आदर व्यक्त करताना दिसतो. ज्या पुरुषाच्या प्रेमात स्त्री पडते त्या पुरुषाला शरीर मनानं समर्पित होणाऱ्या स्त्रियांच्या भावनांचं वर्णन ते ‘स्फटिक भावना’ म्हणून करतात. पण पुरुषाला सर्वस्वाचं समर्पण करण्याच्या स्त्रीच्या या स्फटिक (पवित्र) भावनेवर त्वचेच्या अभिलाषांचे लाल महाल बांधणारे आजचे दुष्यंत प्रेम, त्याग, समर्पण या भावनांपेक्षा क्षणिक वासनांना महत्त्व देतात याविषयीची खंत ते व्यक्त करतात. स्त्रीकडून तिच्या सर्वस्वाचं दान घेईपर्यंत आपल्या पुरुषार्थाचा, पराक्रमाचा, प्रेमाचा आव आणणारे हे पुरुष ती वश झाल्यावर आणि त्यांची कामतृप्ती झाल्यावर मात्र सारंच विसरून जातात किंवा विसरल्याचं नाटक करतात. स्वत:ला सुसंस्कृत समजणारे हे पुरुष इतक्या सहज, इतक्या निसंकोचपणे सगळं कसं काय नाकारू शकतात याचं आश्चर्य कवीला वाटत नाही. कारण समाजात स्वत:चं स्थान निर्माण करणारे, आपल्या कर्तृत्वानं मोठे झालेले हे पुरुष त्यांच्या खासगी आयुष्यात काय घडतं आहे याचा पत्ता लागू न देता अगदी मानभावीपणानं कसे जगत असतात हे आपल्या प्रमाणेच या कवीनंही पाहिलेलं आहे.
महाभारतातील उपाख्यान असो किंवा कालिदासाचे ‘शाकुंतल’ या दोन्ही कलाकृतीत त्या त्या लेखकांना त्यांच्या नायिकेला म्हणजेच शकुंतलेला न्याय द्यायचा असल्यानं महाभारतातील उपाख्यानात आकाशवाणीद्वारे शकुंतला पवित्र असल्यानं दुष्यंतानं तिचा स्वीकार करावं असं सांगितलं जातं तर कालिदासाच्या शाकुंतलमध्ये कालिदास दुष्यंताला माशाच्या पोटातील मुद्रिका पाहून शकुंतलेला ओळखण्यास भाग पाडतो. या कलाकृतीतील दुष्यंत हा पुरुष लेखकाच्या मर्जीप्रमाणे चालणारा असल्यानं ते शक्य होतं. पण प्रत्यक्ष जीवनात मात्र असं घडताना दिसत नाही. कवी म्हणतो आपण सारेच पुरुष मात्र आपल्या मर्जीनं वागणारे, आपलं पाप कबूल करण्यासाठी बांधील नसणारे. म्हणूनच आपण आपल्या मोहजालात अडकवून भोगलेल्या स्त्रियांना सहज सोडून देऊ शकतो. एवढंच नाही तर या फसवणुकीमुळे त्यांच्या वाटय़ाला येणाऱ्या अवहेलनेची कल्पनाही न करता त्यांच्या पुढील भोगवटय़ाचे वाटेकरी होण्याचे सहज टाळतो. कवी म्हणतो, आणि आपलं सद्भाग्य हे की ऋषिकन्यांच्या परित्राणासाठी वा आपल्या पारिपत्यासाठी कोणतीही मुद्रिका (कालिदासाची संमती नसल्याने)तांबडय़ा माशाच्या पोटातून प्रगट होत नाही.
या कवितेतून स्त्रीला केवळ मादी समजणाऱ्या पुरुषी मानसिकतेवर नेमकं बोट ठेवणारा हा कवी स्वत:ला एक पुरुष म्हणून वगळत नाही हे विशेष महत्त्वाचं वाटतं. अनेकदा लेखक किंवा कवी समाजवास्तवाचा वेध घेताना, समाजातील दुप्रवृत्तीवर, त्यांतील विकृतींवर भाष्य करताना अत्यंत चलाखीनं स्वत:ला वगळतात. आपण या प्रवृतीचा भाग नाही हे गृहीत धरून इतरांनी काय करायला हवं, कसं असायला हवं याविषयी बोलत राहतात. पण कुसुमाग्रज तसं करत नाहीत. एक पुरुष म्हणून पुरुषांच्या या मनोवृत्तीचा आपणही एक भाग आहोत हे सांगण्यासाठी ते ‘सारे पुरुष’ न म्हणता ‘आम्ही सारे’ असं म्हणण्याचं धाडस दाखवतात. आपण समाजातील ज्या अपप्रवृत्तीवर, ज्या दांभिकपणावर, ज्या वास्तवावर हल्ला चढवतो आहोत त्या वास्तवाचे, त्या समाजाचे, त्या संस्कृतीचे अविभाज्य भाग आहोत हे एकदा स्वीकारलं की त्या समाजाच्या, त्या संस्कृतीच्या साऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचे वाटेकरी होणं अपरिहार्य होऊन बसतं हे एक कटू सत्य आहे आणि ते कुसुमाग्रजांनी स्वीकारलेलं आहे हे ही कविता वाचताना सतत जाणवत राहतं.
या समाजातील व्यवस्थेच्या चौकटीतील पुरुषाची मानसिकता नेमक्या शब्दात आणि नेमक्या मिथकातून ते पकडतात. मानवतावादी विचारांवर श्रद्धा असणारा कोणताही सर्जनशील लेखक अथवा कवी राष्ट्रप्रेमाबरोबरच समाजात अस्तित्वात असलेल्या धर्म, जात, लिंगभेदावर आधारित व्यवस्थेविरोधात उभा राहतोच. कुसुमाग्रजांनी या आणि अशा काही कवितांतून ते साधले आहे असं मला मनापासून वाटतं.
तसे आम्ही सारेच दुष्यन्त, कालिदासाच्या संमतीशिवाय,
कुंजात लपून ऋषिकन्यांचे मधुरालाप ऐकणारे,
भुंग्यांच्या संदर्भात देखणा पराक्रम दाखविणारे,
मानसिक जनानखान्यातील शेकडो राण्यांचा समुदाय बाजूला सारून,
वल्कलात न मावणाऱ्या कण्वकन्येच्या स्तनांचा अनाघ्रात यौवनाचा,
लालस नजरेनं उपभोग घेणारे
तसे आम्ही सारेच दुष्यन्त कालिदासाच्या संमतीशिवाय
कोणाच्या तरी स्फटिक भावनेवर
त्वचेच्या अभिलाषांचे लाल महाल बांधणारे,
आणि कोणालाही न दिसणाऱ्या तपोवनातील पर्णकुटीत
सर्वस्वाचं दान घेतल्यावर,
सर्वाना दिसणाऱ्या सुसंस्कृत राजसभेत
अ पासून ज्ञ पर्यंत सगळे काही निसंकोच नाकारणारे
आणि आपलं सद्भाग्य हे की ऋषिकन्यांच्या परित्राणासाठी
वा आपल्या पारिपत्यासाठी कोणतीही मुद्रिका
(कालिदासाची संमती नसल्याने)
तांबडय़ा माशाच्या पोटातून प्रगट होत नाही.