fate in Marathi Motivational Stories by अबोली डोंगरे. books and stories PDF | प्राक्तन - भाग 12 (अंतिम)

Featured Books
  • सजा.....बिना कसूर की - 11

    और जैसे ही दरवाजा खुलता है...सब लोग अंदर प्रवेश कर जाते हैं...

  • सुरमई रात, रेड वाइन और तुम

    शाम का धुंधलका अब एक गहरी, रहस्यमयी रात में तब्दील हो रहा था...

  • Shakti ke Shiv - 18

    "थोड़ा पानी से दूर खड़ा रहा कीजिए..."शिवाय की बात सुनते ही श...

  • मंजिले - भाग 53

    बोध ------कहानी सगरहे की जबरदस्त कहानी मेरी पिरये सबसे जयादा...

  • PLATFORM - 6

    अध्याय 6: वह रातउस रात अंगद घर नहीं गया।वह स्टेशन के बाहर लग...

Categories
Share

प्राक्तन - भाग 12 (अंतिम)

प्राक्तन -१२ 

यश मयुरेशला सगळं सांगत होता. त्याची आणि अनिशाची भेट इथे किती अनपेक्षितपणे घडली, त्यानंतर तिचं नैराश्य, त्याला कंटाळून तिने घेतलेला टोकाचा निर्णय... त्यानंतर त्याने तिला रोखलेलं, शिवाय तिला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला. शिवाय सुखरूपपणे ती यातून बाहेर पडली. यातून त्यांची झालेली मैत्री, आणि त्याच कालावधीत तिने जास्त ताण न घेता मयुरेशकडे दुर्लक्ष केलेलं. कदाचित यामुळेच त्याला त्याची चुक लक्षात आली. आणि काल यशने त्याच्या आयुष्याचा तिच्यासमोर केलेला उलघडा, त्यातून त्याला आलेला मिनी अटॅक, तेव्हा अनिशानेच त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि त्याची काळजी घेतली. म्हणूनच तिला घरी यायला उशीर झाला. आणि आज मयुरेशने त्याच्या चुकीची दुरुस्ती करण्याची दाखवलेली तयारी, दोघांचे आपापसातले निवळलेले मतभेद.. त्यानंतर संभ्रमित अवस्थेत असलेल्या तिला यशने वास्तविकतेची करून दिलेली जाणीव, तिला तिच्या क्षुल्लक चुकीमुळे झालेला मनस्ताप.. आणि यातूनच यशने तिच्याशी याच मैत्रीचं नातं निभावण्यासाठी आज पुन्हा तिला एक मैत्रीण म्हणून दिलेलं जगण्याचं बळ... हे सगळं पहिल्यापासून घडत आलेलं त्याने मयुरेशला सांगितलं. हे सगळं ऐकून मयुरेशच्या पायाखालची जमीनच सरकली. गर्भगळित झाल्यासारखा तो तसाच खाली कोसळला. यशने त्याला सावरलं. 

" मयुर काल्म डाऊन. आता सगळी परिस्थिती नियंत्रणात आलेली असताना तू असा कोलमडून जाऊ नकोस. अनिशा आणि अमेयचा विचार कर आणि इथून पुढे त्यांच्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी जग. आतापर्यंतच्या आयुष्यात तू प्रत्येक संघर्षातून मार्ग काढत यशस्वी झालास, तसं आता आयुष्यातलं खरं सुख मिळवण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष दे. तेव्हा तुला कळेल तुझं सुख तुझ्या कुटूंबातच सामावलेलं आहे. " यश त्याला धीर देत समजावत होता. मयुरेशच्या डोळ्यातून एव्हाना अश्रूधारा वाहायला सुरुवात झालेल्या.. पण मोकळेपणाने तो रडूही शकत नव्हता. कारण त्याच्या एका नाईलाजामुळे किती जीवघेणी शिक्षा अनिशा आणि अमेय भोगत होते या विचारानेच त्याला स्वत:ची कीव येत होती. 

" मयुरेश.. मला माफ कर. मी चुकले रे खरंच चुकले तुला समजून घ्यायला. तुझा, अमेयचा विचार न करताच मी खूप टोकाचा निर्णय घ्यायला निघालेले. पण यशने मला वाचवलं. आणि समज गैरसमजाचं जाळं माझ्या मनातून काढून टाकलं. त्यामुळेच मी पून्हा उभी राहिले. पण आता तू प्लीज हे सगळं विसर आणि मला माफ कर. " अनिशा रडत काकुळतीला येऊन मयुरेशचा हात धरत त्याला विनवत होती. 

" नाही. चुक माझी आहे. तू माफी मागू नकोस. माफी आणि आभार तर मला तुमच्या दोघांचेही मानायचेत. मी खूप अन्याय केला अनु तुझ्यावर आणि अमेयवर. न केलेल्या गुन्ह्याचीही इतकी भयंकर शिक्षा तुम्हाला माझ्यामुळे भोगावी लागली त्याबद्दल मला माफ कर. आणि यश तू तर देवासारखा धावून आलास रे माझा मोडकळीस आलेला संसार, कुटूंब, माझी माणसं, माझं प्रेम हे सगळं राखेतून पून्हा घडवावं तसं ते तू घडवून आणलंस. तुझे आभार कोणत्या शब्दांत मानू मलाच कळेना. " मयुरेश त्याच्यासमोर गुडघ्यावर बसत भावूक होऊन म्हणाला. तसं यशने त्याला खांद्याला धरून पून्हा उभं केलं. 

" तू मैत्रीचा नियम मोडतोयस मयुर माफी आणि आभार मानून... असल्या क्षुल्लक औपचारिक शब्दांचा आधार घ्यावा लागेल इतकी पोकळ आहे का आपली मैत्री? तुझी जागा इथे आहे हद्याजवळ... कळलं का..." असं म्हणत यशने त्याला कडकडून मिठी मारली. आणि दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला. 

आज त्यांच्यातील सर्व मतभेदांचं मळभ दूर झालेलं. अंधार सरून तो उजाडणारा सूर्य साक्षीदार बनलेला त्यांच्या या मनोमिलनाचा! 

त्यानंतर यश, मयुरेश आणि अनिशा यांच्यात अभेद्य मैत्रीचं निखळ नातं तयार झालेलं. त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं वाढलेलं. प्रत्येक वीकेंडला ते सगळे एकत्र येऊन दिवसभर एंन्जॉय करायचे. फिरायला जायचे. पण मयुरेश आणि अनिशाला मात्र वाटत होतं की यशने दुसरं लग्न करून नव्याने संसार करावा. वीणा अजूनही जन्म मृत्यूच्या मध्यातून अंतिम टोक गाठू शकली नव्हती. आणि यशने स्पष्टपणे नकार दिलेला आता पून्हा संसार, प्रेम, तेच दुखणं, तोच मनस्ताप या सगळ्याची उजळणी नको होती त्याला आता.. तो अमेयलाच त्याचा मुलगा मानायचा. त्याला लहान मुलं प्रचंड आवडतात हे त्या दोघांना माहित होतं. पण यावरून त्यांना एक नवीन कल्पना सुचलेली. की यशने सरोगसीद्वारे एका अपत्याला जन्म द्यावा. हे त्यांनी यशला कळवलं देखील.. त्याने कानकुच केली, पण कदाचित त्याचा ठाम नकार नव्हता म्हणून ते दोघे यशस्वी झाले त्याला यासाठी राजी करण्यात. आणि अखेर तो तयार झाला. सुरूवातीच्या काही टेस्टस् आणि पडताळणी करून त्याच्यातला अंश सरोगसीद्वारे एका महिलेच्या गर्भात सोडण्यात आला. आणि तो अंश तिथेच वाढत होता. सगळेच खुश होते. 

आणि एके दिवशी असंच यश मयुरेशकडे आलेला असताना तो आठवडाभराच्या ट्रेकिंगसाठी जात आहे असं त्याने सांगितलं. पण मयुरेशने आता नुकताच नवीन बिझनेस सुरू केल्याने त्याला येता येणार नव्हतं. आणि अमेयच्या दहावीच्या परीक्षा असल्याने अनिशाही जाऊ शकणार नव्हती. पण यामुळे अमेय मात्र त्याच्या लाडक्या यश अंकलवर नाराज झालेला... म्हणून त्याची एक्झाम झाल्यावर आपण चौघांनी मिळून पिकनिकला जाण्याचं प्रॉमिस यशने त्याला केलेलं. म्हणून त्याचा रूसवा फार काळ टिकला नाही. पण आताच्या या ट्रेकिंगसाठी इतर ग्रुपसोबत यश जाणार होता. आणि तो गेलाही... 

त्यानंतर चार पाच दिवसांनी एका अज्ञात नंबरवरून मयुरेशला फोन आला. तो त्याने रिसिव्ह केला. आणि समोरच्या व्यक्तीने दिलेली माहिती ऐकून त्याच्या हातातून मोबाईल गळून पडला. तो फोन पोलिसांचा होता. एक कठीण गड सर करत असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे दरड कोसळून सतरा जणांपैकी बारा जणांचा जागीच अंत झाला. तर उर्वरित पाच गंभीर जखमी आहेत आणि त्यात यश गोसावी यांचाही समावेश आहे. असं त्यांनी सांगितलेलं. 

मयुरेश आणि अनिशा धावत पळत हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलेले... यशला अतिदक्षता विभागात ठेवलेलं. त्याच्या अर्ध्या अधिक शरीराचा चेंदामेंदा झालेला. पण त्याचे श्वास अजूनही चालू होते. डोळे उघडे होते.  बाहेरच्या काचेतूनच त्या दोघांनी त्याला खुणावलं. त्यांच्याकडे पाहताच त्याला आनंद झाला आणि तो त्याही अवस्थेत मंदपणे हसला. त्या दोघांची हालत रडून खराब झालेली. पण मृत्यूलाही तो तितक्याच त्वेषाने आव्हान देत होता हे बघून हॉस्पिटल स्टाफही थक्क झालेला. एक दिवस सरला. त्याची सिच्यूएशन क्रिटिकल होत चाललेली. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. 

आणि त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये एका आयसीयूत मागील पाच वर्षांपासून कोमात असलेल्या एका पेशंटची तब्येत अचानक खालावलेली. यश व्हेंटिलेटरवर असताना एक नर्स दारातून आत येत दुसऱ्या नर्सला ती पाच वर्षापूर्वीची पेशंट अखेर दगावली असल्याची माहिती दिली. मयुरेशनेही ते ऐकलं. आणि अर्धमृतावस्थेत असलेल्या यशनेही... यशचे श्वास खाली वर होत होते. त्याने नर्सला सांगून मयुरेश आणि अनिशाला शेवटचं भेटायची इच्छा व्यक्त केली. 

" मयुर... मी येतो आता, वेळ झालीय रे माझी. कर्तव्यातून, ऋणातून आणि आता या आत्म्यातूनही मोकळा होतोय मी आज. सोबत जगण्याची शपथ घेतलेली. ती तर पाळू शकलो नाही. पण मृत्यूनंतर तरी साथ देईन अशी आशा आहे. माझ्या होणाऱ्या बाळाचे कायदेशीर हक्क तुमच्याकडे सोपवून जातोय. मला खात्री आहे तुम्ही त्याला तुमच्या मुलाप्रमाणे प्रेम द्याल. काळजी घ्या. " यश बोलत होता. 

" यश तुला काही होणार नाही. डॉक्टर प्लीज लवकर या..." अनिशा रडत डॉक्टरांना बोलवत होती. 

" वेळ झालीय ग माझी. आता तुला व्यवस्थित समजवायला तितका वेळ नाही. त्यासाठी मोठ्या मनाने माफ कर मला... मी तुमच्यात नाही असं कधीच समजू नका. यासाठीच माझा अंश माझी आठवण म्हणून तुमच्याकडे सुपूर्द करून जातोय. आणि हेच माझ्या आयुष्याचं प्राक्तन आहे. येतो मी.. " तो शेवटचं बोलला. आणि ते विलासी हास्य त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या चेतना संपल्यावरही तसंच झळकत होतं. ते दोघेही हतबल होऊन तसेच खाली बसले. 

थोड्या दिवसांनी यशला सरोगसीद्वारे एक गोंडस मुलगी झाली. मयुरेश आणि अनिशाने यशच्या आठवणीतून प्रेमानं तिचं नाव यशस्विता ठेवलं. आणि तिचा त्याच मायेने सांभाळ करत होते. अमेयला बहिण मिळालेली म्हणून तोही खुश होता. पण यशच्या अचानक जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली...!

                            *समाप्त*

©️®️ अबोली डोंगरे