Praktan - 10 in Marathi Motivational Stories by अबोली डोंगरे. books and stories PDF | प्राक्तन - भाग 10

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

प्राक्तन - भाग 10

प्राक्तन -१०


" आणि यश तुला अजून एक विचारू, पण खरं सांगायचं हं.. लपवाछपवी किंवा उडावाउडवीची उत्तरं नाही द्यायची. " तिने आधीच बजावलं त्याला. त्यावरून आता ही काय बॉम्ब टाकणार या विचाराने तो तिच्याकडे बघायला लागला. आणि त्याने तिला 'बोल बिनधास्त' असा इशारा केला.

" प्रेमाबद्दल तुझं मत काय आहे? आयुष्यात खरं प्रेम फक्त एकदाच होतं का?" ती विचार करत म्हणाली.

" अरे प्रेम हा कधीच न आटणारा झरा आहे. आणि हो ते एकदाच नाही अनेकदा होतं अगदी आपल्याही नकळत... पाडगावकर म्हणतात ना प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं..." त्याने सांगितलं. पण यावर तिचं समाधान झालेलं दिसत नव्हतं.

" मग आजपर्यंत अशा प्रेमाचा किती वेळा आस्वाद घेतलाय तू..." तिने परत विचारलं. तो मात्र हसला यावर.

" आम्हा पुरूषांना काय जी दिसेल तिच्यावर क्षणात प्रेम होऊन जातं. तरूण वयातलं प्रेम अल्लड असतं म्हणतात. मग मीही कसा सुटेन त्यातून. हो पण जे असेल ते मनातच ठेवायचो आम्ही.. चोरून प्रेम करायचो. पण लग्नानंतर नशीबाने असं प्रेम न मागताच मिळालं की प्रेमाचा प पण विसरून गेलो. आमचं अॅरेंज मॅरिज होतं पण सुरुवातीला सगळं काही ठीक होतं. पण एकदा तिने मनात संशयाचं गारूड बसवलं ते त्यातून ती कधी बाहेर पडलीच नाही. माझ्या प्रेमावर फक्त तिचा हक्क होता पण तो तिला अबाधित ठेवता आला नाही. आणि एकदा दुध पोळल्यावर माझी पून्हा प्रेमात पडायची इच्छाच मेली. बस्स जेवढं नशिबात होतं ते मिळालं पण ते मला टिकवता आलं नाही याचा दोष मी तिला नाही देणार. कारण तिच्या या स्वभावामुळे मी तिला इग्नोर न करता आपलंसं केलं असतं तर आजची परिस्थिती वेगळी असती. आज ती जीवन मृत्यूच्या मध्ये संवेदना हरवून ताठकळतेय, या गोष्टीला मीच जबाबदार आहे. " त्याने त्याच्या पूर्ण आयुष्यातला प्रेमाविषयीचा जीवनपट मांडला. ते ऐकून अनिशा हळहळली. पण शेवटच्या वाक्याने मात्र तिला नवीन प्रश्न पडला.

" जीवन मृत्यूच्या मध्ये ताठकळतेय म्हणजे ?? ती आहे अजून या जगात? आणि असेल तर कुठे आहे नि कशी आहे??" तिने गंभीरपणे विचारलं.

" ती डीप कोमामध्ये आहे. डोक्याला प्रचंड मार लागलेला तिच्या. " तो हताशपणे म्हणाला.

तिला वाईट वाटलं त्या गोष्टीचं, म्हणून तीही अचानक शांत झाली. दोघांनाही आता काय बोलायचं सुचत नव्हतं.

" पण अनिशा, तू तुझ्या पार्टनरला गमावू नकोस आणि त्यालाही तुला गमावू देऊ नकोस. आपल्याला क्षणागणिकही कुणी आवडत गेलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची शेवटपर्यंत साथ फक्त आपली हक्काची व्यक्तीच देऊ शकते. गैरसमज होतात पण त्याचा परिणाम नातं तुटेल इथपर्यंत नाही येऊ द्यायचा. एक मित्र म्हणून सांगतोय मी हे... ऐकशील ना?" तो तिला भावनिक साद घालत म्हणाला.

" अरे सवाल... तुझं ऐकलं म्हणूनच मी आज जीवंत आहे आणि सावरलेय. काहीही झालं तरी मी आता इथून पुढे अतातायीपणाने कोणताच निर्णय घेणार नाही. आणि हो तुझ्यासारखा मित्र मिळाला खरंच खूप भाग्यवान आहे मी यासाठी. " ती स्मितहास्य करत म्हणाली. तोही हलकेच हसला.

" बरं बाईसाहेब, मीही खूप लकी आहे की तुझ्यासारखी आज्ञाधारक आणि दिलखुलास मैत्रिण मिळाली मला... तुला जेव्हा कधी मदतीची किंवा इतर कसलीही मदत लागली तर विनासंकोच मला बोलव मी नक्कीच तुझ्या मैत्रीखातर तिथे हजर होईन. " त्याने जणू ग्वाही दिली तिला...

" हो नक्कीच... आणि तुला माहितीय मला इथे येताना एक दिवशी बिल्डिंगमधल्या एका ओळखीच्या ताईंनी बघितलेलं. म्हणजे त्या जरा वयस्कर आहेत. पण बरंच काही ठासून सांगत होत्या मला बाईची जात, बाईची कर्तव्य याबद्दल. म्हणजे बघ ना एक स्त्रीच स्त्रीला समजून का घेऊ शकत नाही, हेच मला कळत नाही. " ती चिंता व्यक्त करत म्हणाली.

" असे भरपूर लोक असतात आपल्या आजूबाजूला आणि जे असायलाच हवेत. कारण त्यांना सुतावरून स्वर्ग गाठायची सवयच असते. त्यांना उलटसुलट काहीच बोलायचं नाही आणि इग्नोरही करायचं नाही. फक्त त्यांचं बोलणं निगेटिव्ह जरी असलं ना तरी ते पॉझिटिव्हली घ्यायचं आपण.. " तो हसत म्हणाला.

" म्हणजे मला नाही कळलं..." ती गोंधळून म्हणाली. कारण आताचं त्याचं बोलणं तिच्या डोक्यावरून गेलेलं.

" म्हणजे बघ ना, त्या लाख बोलतील आपण फक्त हसून त्यांना प्रतिसाद द्यायचा. यामुळे एक प्रकारे त्यांच्या मनात आपल्या बद्दल सहानुभूती तयार होते. आणि जसं जसं सहानुभूती वाढत जाईल तसं त्या आपसूकच आपल्याला समजून घेतील. संयम हा सर्व समस्यांवर गुणकारी ठरणारा पर्याय आहे. आणि तुला सांगू, बाईची जात स्वत:च स्वत:ला या एका परिमाणात जखडून घेते की लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल.. पण जेव्हा आपण आयुष्याच्या उत्तरार्धात पोहोचलेलो असतो ना तेव्हा कळतं आपण ज्यांचा विचार करत अख्खं आयुष्य याच सावटाखाली जगलो त्या लोकांनी मात्र आपल्याकडे कधी लक्षच दिलेलं नसतं. आणि पन्नाशीपर्यंत संसार, घर कौटुंबिक जबाबदारी या नादात आपण स्वत:ला विसरून जातो म्हणूनच या काळात आपण स्वत:साठी जगायचा एक छोटासा प्रयत्न करायचा. जेणेकरून शेवटी आपल्याला कोणतीच इच्छा पूर्ण करता आली नाही हे शल्य राहत नाही. " तो तिला व्यवस्थित समजावत म्हणाला. तिला हे सगळं पटत होतं.

" यश यू आर रिअली ग्रेट...!" ती इम्प्रेस होत हलकेच त्याच्या दंडाला एका बाजूने आलिंगन देत म्हणाली.

" अनू तू इथे काय करतेस?" तेवढ्यात मागून आवाज आला. तिने आवाजाच्या दिशेने बघितलं तर तिथे मयुरेश उभा होता. त्याला अचानक समोर बघून ती जराशी चपापली.

क्रमशः
©️®️ अबोली डोंगरे.