तोतया वारसदार
पात्र परिचय –
महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष.
सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक
विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.
कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.
दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून
कानपूरला गेला पुढे पत्ता नाही.
नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर
पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.
रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला
स्थायिक
रेवती सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला
स्थलांतर.
अंबिका सखाराम पंतांची मुलगी अकाली मृत्यू.
कावेरी रंगनाथाची मुलगी.
श्रीरंग कावेरीचा मुलगा दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला.
सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली.
विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
भाग ४
भाग ३ वरून पुढे वाचा....
“डॉक्टर साहेब, असं आहे, विचारपूस करावीच लागणार आहे, पण ही जरा काळजीपूर्वक करण्यासारखी गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की, हा करोडो रूपयांचा मामला आहे, मालमत्ता प्रचंड आहे, जर एखाद्याच्या मनात काही वेडे वाकडे विचार आले, आणि तो पूर्ण तयारीनिशी यात उतरला, तर त्या तोतयाला ही संपत्ति देण्यावाचून आपल्याजवळ पर्याय उरणार नाही. हा माणूस खरा नाही, हे समजत असून सुद्धा, आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे.” निशांतनी त्यांच्या म्हणण्याचा अर्थ फोड करून सांगीतला.
“प्रशांत, हा म्हणतो आहे ते बरोबर आहे, कोणी वारसदार सापडेल, याची शक्यता धूसर आहे, पण जर कोणी सापडलाच, तर मी त्या माणसाची, माझ्या पद्धतीने इत्थंभूत आणि कसून चौकशी केल्याशिवाय, प्रॉपर्टीचं हस्तांतरण करणारच नाही, पण तरी सुद्धा सुरवाती पासून काळजी घेतलेली चांगलीच आहे. आता समजा ही गोष्ट षट्कर्णि झाली, आणि कोणी या अफाट संपत्तीच्या मोहाने ऊभा राहिलाच आणि त्या माणसाने येन केन प्रकारेण अनेक लटपटी करून माहिती मिळवली आणि संपत्ती वर दावा ठोकला तर आपलीच पंचाईत होईल, कारण आपल्यालाच फारशी काही माहिती नाहीये. कोणाचेही फोटो किंवा पत्ते नाहीयेत, त्यामुळे जितकी जास्त काळजी घेता येईल तेवढी घ्यावीच लागणार आहे. या संदर्भात पूर्ण गुप्तता बाळगणं अत्यंत आवश्यक असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वंशावळी कोणाच्याही हातात लागणार नाही यांची १०० टक्के खात्री आणि काळजी घ्यायची.” सारंग वकिलांनी, निशांतच्या बोलण्याला दुजोरा दिला.
सारंग वकिलांनी ऑफिसचा चपराशी बबनला बोलावलं आणि सांगितलं की “आपल्या झेरॉक्स मशीन वर हे फोल्डर पूर्ण कॉपी कर आणि ती कॉपी उद्या, या निशांत साहेबांना नेऊन दे. निशांतनी समंतिदर्शक मान डोलावली, आणि तो आणि व्यंकटेश राव साहेब दोघेही बाहेर पडले. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सारंग, प्रशांत आणि किरीट हे सुद्धा तिघंही घरी जायला निघाले. कामाच्या गडबडीचा दिवस, संपला होता.
दूसरा दिवस रविवार होता, सोमवारी बबननी फोल्डर झेरॉक्स करायला घेतलं. पण कागद रोल मधे अडकून मशीन जाम झाली. मशीन दुरूस्त व्हायला संध्याकाळ झाली. मग मंगळवारी निशांतच सारंग वकिलांच्या ऑफिस मधे आला. सारंग सरांना थोडा वेळ होता म्हणून बबननी निशांतला बसायला सांगितलं.
“मग काय निशांत, काही आराखडा तयार झाला का ?” सारंग वकिलांनी विचारलं.
“फोल्डर अजून माझ्या हातात आलं नाहीये. ते मिळालं की मग आधी फोल्डर मधे जे काही लिहिलं आहे, त्याचा अभ्यास करावा लागेल, त्यांनी, जशी आठवली तशी वंशावळी आणि इतिहास लिहिला आहे असं तुम्ही म्हणता, ती वाचल्यावर कुठे काही त्रुटी आहेत का हे तपासून बघावं लागेल. आणि जर तसं काही आढळलं, म्हणजे तीच शक्यता जास्त आहे, तर त्या रिकाम्या जागा आधी भराव्या लागतील. ज्या, ज्या व्यक्तींचा या प्रॉपर्टीशी संबंध आहे, त्या सर्वांची सत्यता पडताळून बघावी लागेल. रिकाम्या जागा भरण्यातच जास्त वेळ जाणार आहे.” निशांतनी सविस्तर उत्तर दिलं.
“म्हणजे आता फोल्डर मिळाल्यावर तुमचा अभ्यास सुरू होणार. आणि मग तुम्ही निष्कर्ष काढणार की नेमकी कुठून सुरवात करायची ते ?” – सारंग वकील.
“हो तसंच,” – निशांत.
“ठीक आहे वेळोवेळी, आम्हाला अपडेट देत चला.” – सारंग वकील.
“हो, सर, बरं, झेरॉक्स झाली असेल तर आता मी निघतो.”– निशांत.
बबन झेरॉक्स ची फाइल घेऊन आला. आणि मग ते बाड घेऊन निशांत तेथून निघाला.
रात्री, सर्व कामं आटोपल्यावर, निशांत ती डायरी घेऊन बसला. डायरी कसली, बखरच
होती ती. आधी थोडी पानं चाळल्यावर त्यांच्या लक्षात आलं की बऱ्याच गोष्टी तपशीलवार लिहिल्या आहेत. शोध कर्ता म्हणून तपशीलात शिरणं हे त्याचं कामच होतं. त्यानी वाचायला सुरवात केली...
*****
साधारण सन १८०५ च्या आसपासचा काळ असावा वेळणेशवरचे सखारामपंत गोखले वैद्य, यांच नाव पंचक्रोशीत गाजत होतं. एक निष्णात वैद्य म्हणून त्यांची ओळख होती. पंत वैद्यांचं नाव माहित नाही असा माणूस नव्हता, अगदी गुहागर पर्यंत आणि इकडे देवपट पर्यन्त किर्ती पसरली होती. .
पंतांचे वडील महादेवराव पौरोहित्य करायचे. त्यावेळी वेळणेश्वर जेमतेम ४० – ५० घरांचं गाव होतं. त्यात गोखल्यांची १०-१२ घरं. घरची अगदी सामान्य स्थिती, महादेवराव, त्यांच्या पत्नी आणि चार पोरं आणि दोन मुली असा परिवार, खर्च कमी व्हावा म्हणून त्यांना आपल्या मुलांना गुरुकुलात शिकायला पाठवायचं होतं, पण एकटे पंत सोडून कोणीच तयार नव्हतं. म्हणून त्यांनी पंतांना ओळख काढून शृंगेरी च्या मठात शिकायला पाठवलं. तेवढाच खर्च कमी. चौदा वर्ष मठात राहून पंत वेद पारंगत झाले. इकडे, तिन्ही मुलांना त्यांना येत होतं तेवढं पौरोहित्य महादेव रावांनी शिकवलं. त्यातला मोठा मुलगा विश्वनाथ गोकर्ण महाबळेश्वरला गेला आणि वर्ष भरात तिथल्याच एका गुरुजींच्या मनोरमा नावाच्या मुलीशी लग्न केलं आणि तिकडेच स्थायिक झाला. दूसरा मुलगा कौशिक, समुद्रावर पोहायला गेला होता तो तिसर्या दिवशी तरंगत किनार्यावर आला. धाकटा दिनकर, त्याला भिक्षुकी मधे काहीच स्वारस्य नव्हतं. तो भिक्षुकीला कंटाळून, साताऱ्याला गेला. तिथून पुण्याला गेला. पुण्याहून जी अनेक कुटुंब श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे, यांच्या सोबत कानपूरला गेली, ते पाहून त्यांच्या मागे मागे, हा पण गेला.
दोन्ही मुलींपैकी मोठी नर्मदा, तिचं लग्न चिपळूणच्या भार्गवराम चितळे या मुलाशी झालं, आणि धाकटी, गोदावरी, तिचं चिपळूणच्याच बळवंत आपटे यांच्याशी लग्न लावून दिलं होतं. दोघी आपापल्या घरी सुखात होत्या.
पंत शृंगेरीचा अभ्यासक्रम संपवून वेळणेश्वरला परत आले, तेंव्हा फक्त वृद्ध आई, वडील घरात होते, घराची अवस्था चांगली नव्हती, म्हातारपणामुळे, पंतांच्या वडीलांना फारसं काम झेपत नव्हतं. वर्ष भरात, सखारामपंतांच्या वेदांवर असलेल्या प्रभुत्वामुळे पंतांचे बस्तान बसायला फारसा वेळ लागला नाही. पण अचानक एक दिवस प्रचंड सोसाट्याचा वारा आला आणि घाई घाईने घरात येत असतांना त्यांच्या आईवडीलांवर एक खूप जुनं सुपारीचं झाड उन्मळून पडलं आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला. त्या दुर्गम भागात ताबडतोब कोणीच वैद्य मिळाला नाही. पंत खूप व्यथित झाले. आई वडीलांना वाचवू शकलो नाही हे शल्य त्यांना खूप लागलं. या अचानक घडलेल्या घटनेने, पंत खूप उदास झाले, त्या वेळेस घरी त्यांच्या लग्नाची चर्चा चालली होती, पण त्या सर्व प्रक्रिया त्यांनी थांबवल्या. मनाशी काही विचार करून त्यांनी एक दिवस चिपळूणची वाट धरली. चिपळूणच्या एका नामांकित वैद्यांचं शिष्यत्व पत्करून त्यांनी ५ वर्षात वैद्यकीचं ज्ञान आत्मसात केल. आणि ते वेळणेश्वरला परतले.
वेळणेश्वरला आल्यावर त्यांनी भिक्षुकी बरोबरच वैद्यकी पण सुरू केली. त्या साठी त्यांना आजूबाजूच्या रानात फिरून औषधी वनस्पती गोळा कराव्या लागत. मुळातच अतिशय हुशार असल्यामुळे लवकरच त्यांची निष्णात वैद्य म्हणून कीर्ती पसरायला फारसा वेळ लागला नाही. मालगुंडच्या केळकरांची मुलगी सुशीला त्यांना सांगून आली. गोरीपान, सरळ नाकाची, बोलक्या डोळ्यांची, आणि हसऱ्या चेहऱ्याची, सुशीला, पंतांना एकदम आवडून गेली. लग्न झालं आणि त्यांचा संसार सुरू झाला. भिक्षुकी बरोबरच वैद्यकी पण चालू असल्याने सांपत्तीक स्थितीत आता सुधार झाला होता. यथावकाश पंतांना रंगनाथ आणि भास्कर अशी दोन मुलं आणि अंबिका आणि रेवती, अश्या दोन मुली झाल्या. पंतांचा संसार आता चांगलाच बहरला होता.
याच काळात घडलेली एक घटना, पंतांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देऊन गेली. एक दिवस पंतांना चिपळूणहून दोघं जण भेटायला आले, ते महाऋद्राचं आमंत्रण द्यायला आले होते. त्यासाठी ४-५ दिवस चिपळूणलाच राहावं लागणार होतं. सगळी व्यवस्था आयोजकच करणार होते. पंतांनी सुशीलाशी विचार विनिमय करून होकार दिला. महाऋद्र आटोपून पंत सहाव्या दिवशी संध्याकाळी वेळणेश्वरला पोचले. घरी पोचताच त्यांना दिसलं की ओसरीवर तुकाराम बसला आहे. पंतांना पाहिल्यावर तो उठून समोर आला.
पंतांनी विचारलं “काय रे तुकाराम काय झालं.?”
“कारभारनीला लई उलट्या, जुलाब होत्यात, चार दिस झाले, आराम काही पडत नाही.” तुकाराम बोलता बोलता रडायला लागला.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com