तोतया वारसदार
पात्र परिचय-
धनशेखर – पोलिस इंस्पेक्टर
सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
भाग २
भाग १ वरून पुढे वाचा....
बॉडी शव चिकित्सा करण्यासाठी पाठवल्यावर, त्यांनी सर्व खोल्या तपासायला आपल्या टीमला सांगितलं.
बाकी खोल्यांमध्ये तर काही विशेष सापडलं नाही, पण लायब्ररी मधे डॉक्टर, वकिल आणि CA च्या नावाने काही फाईल्स मिळाल्या. आणि एक खासगी असं लिहिलेली फाइल मिळाली. त्या त्यांनी पंचनामा करून ताब्यात घेतल्या, आणि घर सील करून पोलिस स्टेशनला गेले.
तो दिवस जरा खूपच कटकटीचा गेला, त्यामुळे फायली वाचायला त्यांना संध्याकाळ पर्यन्त फुरसत मिळाली नाही. संध्याकाळी जरा निवांत पणा मिळाल्यावर त्यांनी प्रथम डॉक्टरची फाईल वाचायला घेतली. हलका BP चा त्रास सोडल्यास त्यांना कुठलाच आजार नव्हता.
मग त्यांनी CA ची फाईल वाचायला घेतली. त्यात मात्र बऱच काही सापडलं. बँकेत जवळ जवळ ७-८ कोटींची फिक्स्ड डिपॉजिट होती. त्याच्यावरच्या व्याजावर किती टॅक्स बसेल यांचा हिशोब होता, शेतांवरच्या कामगारांच्या पगाराचा हिशोब होता. आणखीही खर्चाच्या बऱ्याच नोंदी होत्या. शहरातल्या या मोक्याच्या जागी असलेली एवढी मोठी हवेली, इंस्पेक्टर विचार करत होते की इतक्या प्रचंड इस्टेटिला वारस नाही हे कसं ?
पण त्याचं उत्तर त्यांना खाजगी फाईल मधे मिळालं. ती वाचताना बऱ्याच गोष्टी उलगडल्या, पण बरेच प्रश्नही उपस्थित झाले.
सुशीला म्हणाली होती त्या प्रमाणे एक बैठक झाली होती ज्यात वकील, डॉक्टर आणि CA हजर होते, त्याचा वृत्तांत फाइल मधे मिळाला. चार हजार संत्र्याची झाडं असलेली ४० एकर बागाइती शेती होती, त्याचा उल्लेख त्या फाइल मधे होता. कामगारांची नाव आणि पत्ते होते.
वकिलाला १५ लाख रूपयांचा चेक दिल्याचा उल्लेख होता, पण तो नेमक्या कोणत्या कारणांसाठी दिला यांचा उल्लेख नव्हता. वकील, डॉक्टर आणि CA यांना दिलेल्या फी बद्दल वेगळी नोंद होती. म्हणजे हा चेक वेगळ्याच कारणांसाठी दिल्या गेला असला पाहिजे. धनशेखर विचार करत होते, की फी जर वेगळी दिल्या गेली होती, तर हा १५ लाखांचा चेक कशा करता दिला असेल? आणि तो ही याच महिन्यात. शेवटी त्यांनी तो विचार बाजूला सारला आणि पुढे वाचायला सुरवात केली. एका कागदावर विनायकरावांनी मृत्यूपत्र केल्याचा उल्लेख केला होता. हे मृत्यूपत्र त्यांनी वकील, डॉक्टर आणि CA यांच्या सोबत बसून तयार केलं होतं, आणि ते बँकेच्या लॉकर मधे सुरक्षित ठेवलं होतं आणि मृत्यू नंतर १५ दिवसांनी ते उघडून त्याच्या अंमलबजावणीला सुरवात करावी असं लिहिलं होतं. विनायक रावांनी त्यांच्या संपत्तीचा एक ट्रस्ट बनवला होता आणि ते स्वत: मुख्य ट्रस्टी आणि बाकीचे तिघं अन्य ट्रस्टी, अशी योजना केली होती, आणि हा ट्रस्ट चॅरिटी कमिश्नर कडे रजिस्टर केला आहे अशी नोंद होती. मृत्यूनंतर त्यांच सर्व क्रिया कर्म करण्याची संपूर्ण जबाबदारी वकिलांनी उचलली आहे, आणि त्याच्या खर्चा पोटी १५००० चा चेक वकिलाला दिल्याचाही त्यात उल्लेख होता. या कागदावर तिघांच्याही सह्या होत्या. या कागदाची आणि चेक च्या पावत्या यांच्या कॉपीज एका लिफाफ्यात धनशेखरांच्याच पोलिस स्टेशनला, त्यांच्या माहिती साठी, रजिस्टर पोस्टाने पाठवल्याची नोंद होती. आणि तारीख होती चार दिवसांपूर्वीची. आज पर्यन्त तरी धनशेखरांना ते पत्र मिळालं नव्हतं. कामं संपवून धनशेखर घरी गेले.
दुसऱ्या दिवशीही धनशेखर विचारच करत होते. ‘एवढी मोठी इस्टेट, मृत्यूपत्र करून कोणाला द्यायची ठरवलं असेल? सुशीलाच्या सांगण्या वरून तरी त्यांचे कोणी वारसदार नातलग असतील अशी शक्यता दिसत नव्हती.’ थोड्या विचारानंतर त्यांनी फाइल मधे तिघांचे फोन नंबर होते, त्यावर फोन करून तिघांना बोलावून घेतलं. धनशेखरांनी त्यांना लगेच या असं म्हंटलं होतं, पण तिघांचाही नाईलाज होता. सारंग वकील कोर्टात होते, डॉक्टर प्रशांत, हॉस्पिटल मधे ऑपरेशन मधे व्यस्त होते आणि CA किरीट भाई इन्कम टॅक्स ऑफिस मधे एका केस च्या सुनावणी मधे होते. तिघांनीही संध्याकाळी ७ वाजता येतो म्हणून सांगितलं.
संध्याकाळी ७ वाजता तिघंही पोलिस स्टेशनला आले. सारंग वकिलांना पोलिस स्टेशन नवीन नव्हतं पण बाकीचे दोघं आल्यावर, एकमेकांना पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं. किरीट नी सारंगला विचारलं सुद्धा “ काय भानगड आहे, सारंग ?” सारंग वकिलांनी काही माहीत नाही या अर्थाने खांदे उडवले. धनशेखर पोस्ट मार्टेम करणाऱ्या डॉक्टरशी बोलायला गेले होते, ते थोड्याच वेळात आले. तो पर्यन्त या तिघांना काहीच अंदाज येत नव्हता. त्यांना धनशेखरांची वाट पाहत बसावं लागलं. त्यांनी विचारायचा प्रयत्न करून पाहीला, पण पोलिसांना प्रश्न विचारायची सवय असते, उत्तरं सांगायची नाही, त्यामुळे कोणीच काही सांगितलं नाही.
धनशेखर आल्यावर त्यांनी या तिघा जणांना विनायकरावांच्या मृत्यूची बातमी दिली.
साहजिकच सर्वांनाच धक्का बसला. डॉक्टर प्रशांतच प्रथम बोलले. “काय सांगता आहात साहेब, कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं, आवाजावरून तरी त्यांची तब्येत ठीकच असेल असं वाटलं. आणि आज अचानक गेले? केंव्हा झालं हे? आणि तुम्हाला कसं कळलं ?”
धनशेखरांनी आदल्या दिवशी सकाळी काय घडलं ते सांगितलं आणि डॉक्टरांना विचारलं की “काल तुमचं काय बोलणं झालं?”
“मी दर रविवारी त्यांचं चेक अप करायला जात असतो. वर्षानुवर्ष हा क्रम चालू आहे. मागच्या आठवड्यात व्हिजिट करायला जमलं नाही म्हणून फोन केला होता. सगळं ठीकच होतं साहेब” डॉक्टर प्रशांत म्हणाले.
“ठीक आहे,” धनशेखर म्हणाले “ वकील साहेब आता तुमचं काम सुरू होतं आहे. मॉर्ग मधून बॉडी ताब्यात घ्या आणि सगळं या कागदात लिहिल्या प्रमाणे व्यवस्थित करा. या तुम्ही. लॉकर उघडण्याची सर्व कार्यवाही पूर्ण करून जेंव्हा १५ दिवसांनी मृत्युपत्राचं वाचन कराल तेंव्हा आम्हाला सूचना द्या”
“हो साहेब. नक्की.” सारंग वकिलांनी आश्वासन दिलं, आणि ते गेल्यावर आता धनशेखर विचार करत होते. एवढी मोठी इस्टेट, कोणाला दिली असणार ? मृत्युपत्रात जर नि:संदिग्ध काही लिहिलं नसेल तर हे सगळं धन चोरा पोरी जाऊ शकते. धनशेखर निस्प्रूह पोलिस अधिकारी होते, हा सगळा प्रकार त्यांच्या काही पचनी पडत नव्हता. यात बारकाईने लक्ष् घालायचं त्यांनी ठरवलं. आता मृत्युपत्राचं वाचन होईपर्यंत काहीच करायचं नव्हतं. त्यांनी मनाशी काही निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या स्टाफ मधल्या दोघा हुशार लोकांना बोलावलं आणि तिघा जणांची इत्थंभूत माहिती काढायला सांगितली आणि मगच ते घरी गेले. क्रिया कर्म करण्याची जबाबदारी जरी सारंग वकिलांनी उचलली होती तरी पूर्ण दिवस होई पर्यन्त इतर दोघं डॉक्टर प्रशांत आणि किरीट, सारंग वकिला सोबतच होते.
धनशेखरांच्या माणसांनी बराच प्रयत्न केला पण काही वेडं वाकडं त्यांना आढळलं नाही. तिघंही जण पन्नाशीच्या घरात होते आणि चांगल्या सांपत्तिक स्थितीत होते. तिघांचाही लौकिक उत्तम होता. हे ऐकल्यावर धनशेखरांना समाधान वाटलं, पण तरीही त्यांना पूर्ण खात्री वाटत नव्हती, कारण करोडो रूपयांची संपत्ति कोणाचा मार्ग कसा बदलेल हे सांगता येत नाही, असं त्यांना अजूनही वाटत होतं. असं असलं तरी पण, सध्याच्या परिस्थितीत त्यांना शांत बसण्या शिवाय दूसरा पर्याय नव्हता.
यथावकाश लॉकर उघडण्याचा दिवस उजाडला. सारंग वकिलांनी फोन करून धनशेखरांना बँकेतच बोलावलं. “तुमच्याच समोर लॉकर उघडू, म्हणजे कुठलीही शंका राहणार नाही.” असं म्हणाले.
बॅंकेमद्धे ट्रस्ट डीड पांच वर्षांपूर्वीच सबमिट केलं होतं आणि तेंव्हा पासून ट्रस्टचं खातं हेच तिघं सांभाळत आले होते, त्यामुळे काहीच प्रश्न निर्माण झाला नाही. एका ट्रस्टीचा मृत्यू झाल्याचं सांगून आणि त्याचं डेथ सर्टिफिकेट बँकेत दिल्यावर काम झालं. लॉकर उघडल्या गेला. आत मधे मृत्यूपत्राचा लिफाफा आणि एक बऱ्यापैकी जाड फोल्डर होतं. दूसरा लॉकर उघडल्यावर त्यात सर्व दागिने होते आणि त्यांची रीतसर यादी पण करून ठेवली होती. सर्वानुमते, आधी मृत्युपत्राचं वाचन करू, त्यातल्या तरतुदी आणि अपेक्षा बघू आणि मगच दुसऱ्या लॉकर कडे वाळू असं ठरलं. मग सगळे, सारंग वकिलांच्या ऑफिस मधे जमले.
सारंग वकिलांनी बोलायला सुरवात केली. “खरं सांगायचं तर हे मृत्यूपत्र नसून इच्छा पत्र आहे. कारण यात कोण वारसदार आहे त्याचं नाव नाहीये.” सारंग वकील थोडं थांबले.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद