Totaya Vaarasdar - 3 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तोतया वारसदार - भाग 3

Featured Books
Categories
Share

तोतया वारसदार - भाग 3

तोतया वारसदार

पात्र परिचय-

धनशेखर        – पोलिस इंस्पेक्टर

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

व्यंकटेश राव    - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचे  डायरेक्टर

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.

बबन          - सारंग वकिलांचा चपराशी

भाग  ३  

भाग २  वरून पुढे  वाचा....

 

“अरे, मग हे काय आहे?” धनशेखरांनी प्रश्न केला.

“हे इच्छापत्र आहे.” सारंग वकील पुढे म्हणाले. “आता मी हे पत्र वाचणार आहे. ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला कळून येईलच. आणि नंतर मी सगळे मुद्दे समजावून सांगेन. तर आता मी वाचायला सुरवात करतो.”

वाचन पूर्ण झाल्यावर, सारंग वकिलांनी पुन्हा एकदा बोलायला सुरवात केली.

“तर आता यातले महत्त्वाचे मुद्दे पाहू.”

“मुद्दा न. 1 : विनायक रावांनी आपल्या सर्व स्थावर आणि जंगम संपत्तीचा जो ट्रस्ट बनवलेला आहे त्याच्यावर एक जबाबदारी सोपवलेली आहे. ही जबाबदारी म्हणजे विनायकरावांचा जे कोणी वारसदार असतील, त्यांना शोधून काढणे, आणि सर्व संपत्ति त्यांच्या हवाली करणे. ही जबाबदारी आम्ही तिघांनी ट्रस्टी या नात्याने स्वीकारली आहे. या करता पांच वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. सुरवात करायला अडचण जाऊ नये म्हणून १५ लाखांचा चेक आधीच विनायकरावांनी देऊन ठेवला आहे.” सारंग वकील पाणी पिण्या साठी थोडे थांबले आणि त्यांनी पुन्हा बोलायला सुरवात केली.

“मुद्दा  न. २ : या पांच वर्षात जर कोणी वारसदार मिळाला नाही, तर मग काय करायचं आहे, यांच्या बद्दल पण उल्लेख आहे. ट्रस्ट ने हुशार पण आर्थिक दृष्ट्‍या गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करावी, त्यांच्या साठी शिष्यवृत्ती जाहीर करावी.” सारंग वकिलांनी सर्वांवर नजर टाकली. कोणाची काही प्रतिक्रिया दिसली नाही तेंव्हा पुन्हा बोलायला सुरवात केली.

“मुद्दा न. ३ : पांच वर्षांचा कालावधी उलटे पर्यन्त  कुठलीही मालमत्ता विकू नये. तो पर्यन्त अर्थात मालमत्तेचा सर्व व्यवहार विश्वस्त मंडळींनीच पहावयाचा आहे. जर कोणी वारसदार मिळाला नाही तर ट्रस्टी विचार विनिमय करून योग्य तो निर्णय घेतील.”

हे महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले, बाकीचे तपशील डीड मधे लिहिले आहेत.

धनशेखर आत्तापर्यंत लक्षपूर्वक ऐकत होते, ते म्हणाले “ वारसदार शोधण्यासाठी काही योजना तुमच्या मनात आहेत का ?”

“गेल्या पंधरा दिवसांत आम्ही सतत भेटतो आहोत आणि या बद्दल चर्चा पण केली.” सारंग वकील सांगत होते. “आमच्या मते असं ठरलं की कोणी अनुभवी खाजगी इन्व्हेस्टिगेटर नेमावा, जो हे त्यांच्या पद्धतीने शोधून काढण्याचा प्रयत्न करेल. त्या साठी धनशेखर साहेब, तुम्हीच एखाद्या एजन्सी चं नाव सुचवू शकाल.”

“ते ठीक आहे, पण तुम्ही सुद्धा एखाद दोन एजन्सी ची नावं ठरवली असतीलच की. ते तर सांगा.” धनशेखर म्हणाले.

“हो, आमच्या मनात स्वस्तिक सिक्युरिटी आणि दक्षता ही दोन नाव होती. तुमचं काय मत आहे ?” – सारंग वकील.

“या कामा साठी दक्षता ठीक राहील. चांगलं काम करतात ते.” – धनशेखर.

ठीक आहे, आता आम्ही आपसात चर्चा करून नंतर या दोन्ही एजन्सी च्या लोकांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ.

“ठीक आहे. तुमचं ठरलं की मला सांगा म्हणजे आमचं पण लक्ष राहील.”- धनशेखर

“हो साहेब, तुमचा सहभाग आमच्या साठी मोलाचा आहे. आम्ही वेळोवेळी तुम्हाला  अपडेट देत राहू.” सारंग वकील.

“वारसदार शोधणं हे खूप कठीण काम आहे. या बद्दल काही गाइड लाइन्स दिल्या आहेत का विनायकरावांनी ?” धनशेखरांनी विचारलं.

“हो त्या बद्दल थोडी फार कल्पना त्यांनी आम्हाला दिली  होती. त्यांना जेवढं स्मरणात होतं तेवढं त्यांनी या फोल्डर मध्ये लिहिलं आहे. म्हणजे जवळ जवळ त्यांच्या घराण्याचा इतिहास आहे. साधारण १८०० सालाच्या  आसपास त्यांच्या पणजोबांचे वडील कोकणातून बाहेर पडले तेंव्हा पासूनची जशी आठवली तशी माहिती त्यांनी लिहून ठेवली आहे. आता आधी त्याचा अभ्यास करून, त्यांच्यापैकी  कोण कुठे विखुरले आहेत, त्याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे शोधायला सुरवात करावी लागणार आहे. काम कठीण आहे, साधलं तर उत्तमच, पण त्यांच्या इच्छे प्रमाणे कसून प्रयत्न करावाच लागणार आहे. आणि तो आम्ही प्रामाणिक पणे करायचं ठरवलं आहे. आम्ही तसं विनायकरावांना  वचनच दिलं आहे.” सारंग वकिलांनी उत्तर दिलं.

“ठीक आहे माझी काही मदत लागली तर जरूर सांगा. मला पण फार उत्सुकता लागली आहे.” धनशेखर असं म्हणून तेथून निघाले.

ते गेल्यावर सारंग वकील म्हणाले की “आता या दोन एजन्सीज शी बोलणं करावं लागणार आहे. त्यांना केंव्हा बोलवायचं ?”

“आपल्याला साधारण संध्याकाळी ७ नंतर वेळ काढता येईल आज बोलावलं तरी मला अडचण नाहीये.”- डॉक्टर प्रशांत.

“मी पण येऊ शकेन. काही अडचण नाहीये.” – किरीट.

“ठीक आहे, मग धनशेखर म्हणाले त्या प्रमाणे दक्षताच्या राव साहेबांना बोलावू.” असं म्हणून सारंग वकिलांनी दक्षता च्या डायरेक्टर ला फोन लावला आणि संध्याकाळी भेटायला बोलावलं. एवढं झाल्यावर डॉक्टर आणि किरीट दोघंही तेथून निघाले.

संध्याकाळी, सारंग वकिलांच्या ऑफिस मधे बैठक भरली. दक्षताचे डायरेक्टर व्यंकटेश राव, सारंग वकील, डॉक्टर प्रशांत आणि किरीट सर्व हजर होते. व्यंकटेश रावांच्या बरोबर त्यांचा असिस्टंट निशांत पण होता. निशांत तिशीतला एक तरतरीत, आणि स्मार्ट मुलगा होता. त्यांनी अल्पावधीतच बऱ्याच किचकट केसेस यशस्वी रित्या मार्गी लावल्या होत्या, आणि त्यामुळे एजन्सी चं नाव संबंधित वर्तुळात बऱच गाजत होतं.

सारंग वकिलांनी कामाचं स्वरूप काय असेल यांची सविस्तर कल्पना दिली. मग व्यावसायिक गोष्टी दोन्ही पक्षी ठरल्यावर, सारंग वकील म्हणाले, “आम्हाला कामाचे इतरही व्याप आहेत त्यामुळे, लवकरात लवकर शोधून काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण त्याच्यात तुमचाही फायदा आहे. एकाच केस मधे अडकून पडलात तर तुमचाही त्यात तोटाच आहे. आमच्या कामावर तुम्ही जो कोणी नेमाल, तो माणूस फक्त आणि फक्त आमचंच काम करेल, इतर कुठल्याही कामाची जबाबदारी तुम्ही त्याच्यावर सोपवणार नाही.”

“तुम्ही त्याची चिंताच करू नका. आम्ही निशांत वर ही कामगिरी सोपवणार आहोत. आणि तो वारसदारांचा शोध नक्की लावेल याची आम्हाला खात्री आहे. निशांतला आम्ही फक्त आणि फक्त तुमच्याच कामावर नेमतो आहे. तो  सतत तुमच्या संपर्कात राहून तुम्हाला अपडेट देत राहील.” व्यंकटेश राव म्हणाले.

“ठीक आहे. आम्हाला मान्य आहे. याच्या बद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत आणि आशा वाटते आहे की निशांत या कामात यशस्वी होईल. केंव्हा पासून कामाला सुरवात करणार ?” – सारंग वकील.

“निशांत, आता इथून तू पुढे हो. यापुढे सर्व चर्चा तुलाच करायची आहे.” – राव साहेबांनी निशांतला म्हंटलं. “आता येथून पुढे सर्व सूत्र तुझ्या हातात.”

“त्या फोल्डर मधे काय आहे त्याचा अभ्यास करून पहिलं पाऊल उचलावं लागणार आहे. तेंव्हा ते फोल्डर मला द्या मी त्याची कॉपी करून, तुम्हाला वापस करतो. त्याचा अभ्यास करून नक्की काय करणार याचा रोडमॅप तुम्हाला देतो.” – निशांत म्हणाला.

“केंव्हा सांगणार तू आम्हाला ?”  डॉक्टर प्रशांत म्हणाले. “म्हणजे त्या प्रमाणे आम्हाला वेळ अॅडजस्ट करावी लागेल.”

“मी फोन करतो. कारण खोलवर अभ्यास करावा लागेल, आणि योग्य दिशा ठरवावी लागेल. सुरवातच चुकीची झाली तर बराच वेळ वाया जाण्याची शक्यता असते. मला थोडा वेळ द्या. आता प्लॅनिंग मधे थोडा जास्त वेळ गेला तरी चालेल, पण फायनली ते फायद्याचं असणार आहे.” निशांत नी आपला विचार सांगीतला. “ही केस थोडी वेगळी आहे, इथे अस्तित्वाचाच शोध घ्यायचा आहे. बरं आपण काय शोधतो आहोत हे षट्कर्णी होऊन चालणार नाही, कारण करोडो रुपयांच्या संपत्तीचा प्रश्न आहे. म्हणून जरा सावधगिरीनेच पावलं उचलावी लागणार आहेत.”

“का? आपण शोध घेणार आहोत, तर लोकांना कळणारच की, त्यात लपवण्या सारखं काय आहे,? आणि लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय, विचारपूस केल्याशिवाय, शोध तरी कसा घेणार आपण ? ” डॉक्टर प्रशांत.

“डॉक्टर साहेब, असं आहे, विचारपूस करावीच लागणार आहे, पण ही जरा काळजीपूर्वक करण्यासारखी गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की, हा करोडो रूपयांचा मामला आहे, मालमत्ता प्रचंड आहे, जर एखाद्याच्या मनात काही वेडे वाकडे विचार आले, आणि तो पूर्ण तयारीनिशी यात उतरला, तर त्या तोतयाला ही संपत्ति देण्यावाचून आपल्याजवळ पर्याय उरणार नाही. हा माणूस खरा नाही, हे समजत असून सुद्धा, आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे.” निशांतनी त्यांच्या म्हणण्याचा अर्थ फोड करून सांगीतला.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद