अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ५२ )
प्रेम : अंजु.....! मला असं वाटतंय की, चुक तुझी नव्हतीच कधीच...! खरं तर चुक माझी होती. मी माझ्या मर्यादा ओळखायला हव्या होत्या. खरच खुप चुकलोय मी, आणि माझ्या या चुकीची शिक्षा तुला आणि तुझ्या फॅमिलीला पण भोगायला लागत आहे. मी जर तेव्हाच स्वतःला थांबवलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती.
माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय. माफ कर मला. पण एक गोष्ट खरी आहे. तु तुझ्या परिवारासाठी काय आहेस याची कल्पना कदाचित तुला नाही.
माझ्यासाठी फक्त एक गोष्ट करशील...! कधीही तुझ्या मॉम डॅड ना दुखवू नको. तु सर्वस्व आहेस त्यांच्यासाठी. हे विसरू नकोस. कारण जगात आईवडिलांसारखे प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही.
तसं बोलायचं तर खुप आहे. पण उशीर होतोय, आणि बाहेर मॉम डॅड आहेत. त्यांना अजुन टेन्शन नाही द्यायचं आहे मला.
जमलच तर मला माफ कर आणि यापुढे एक नवं आयुष्य जगायला सुरुवात कर, स्वतःसाठी नाही तर, मॉम डॅड साठी...! कारण त्यांच्या जगण्याचं एकमेव कारण फक्त तु आहेस, आणि त्यांना तुला खुप मोठं झालेलं पहायचं आहे. आणि हेच तुझं सर्वात मोठं कर्तव्य आहे. हे लक्षात ठेव.
आजपर्यंत आपल्यात जे काही झालं गेलं ते विसरून जा. आणि एक नवीन आयुष्याची सुरुवात कर. खुप शिक आणि खुप मोठी हो. तुझ्या मॉम डॅड ना अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखव.
* प्रेम खुप आकांताने तिला समजावत होता, ती पण शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती. रूम चा डोअर थोडा ओपन असल्याने त्याचा आवाज बाहेर पण जात होता. तो जे काही बोलत होता ते मॉम, डॅड पण ऐकत होते. त्याचे हे बोलणे ऐकुन त्याच्याबद्दल आपण वेगळाच विचार करत होतो. असे तिच्या डॅड ना वाटू लागले होते. तो कसा मुलगा आहे हे आज त्यांना कळत होतं.
* त्याचे बोलणे संपल्यावर अंजली ऊठुन उभी राहिली. ती एकटक त्याच्याकडे पहात होती. तिचे डोळे पाण्याने भरले होते. तिलाही खुप काही बोलायचं होतं. पण बाहेर मॉम डॅड ऐकत होते. म्हणुन ती जाऊन आधी रूमचा दरवाजा बंद करते. त्याच्याजवळ येते आणि त्याला बोलते....
अंजली : तु जे काही बोललास ते सर्व मी ऐकुन घेतले. आता माझं एक काम करशील.
प्रेम : काय....?
अंजली : मला एकदा तुझ्या घट्ट मिठीत घे ना....!
* तिच्या अशा बोलण्याने प्रेमला काय करावं, तिला काय बोलावं तेच सुचत नव्हतं.
अंजली : काय झालं प्रेम...? नाही घेणार आहेस का...? मला माहितीय तुझं लग्न ठरलं आहे. काही दिवसांनी तु कायमचा दुसऱ्या कोणाचा तरी होणार आहेस. पण त्याला अजुन काही दिवस बाकी आहेत, तोपर्यंत तरी तु फक्त माझा आहेस. मग माझा तेवढाही हक्क नाही का...?
खुप मिस केलीय तुझी मिठी, खुप म्हणजे खुप...! फक्त एकदा प्रेमाने मला मिठीत घे, कदाचित पुढे हा क्षण माझ्या आयुष्यात येईल न येईल. असं बोलुन ती प्रेमच्या डोळ्यात डोळे घालून ती अजुन त्याच्या जवळ जाते. प्रेम स्वतःला खुप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. ती अजुनच त्याच्या जवळ येते. आता मात्र त्याला राहवत नाही. तो पटकन तिला आपल्या मिठीत घेतो. दोघेही काही वेळ सर्व काही विसरून एकमेकांच्या मिठीत सामावून गेले होते. प्रेमला जेव्हा कळतं की, आपण कुठे आहोत आणि काय करतोय, तेव्हा मात्र तो मिठी सैल करून तिला बाजुला करण्याचा प्रयत्न करतो. पण अंजली त्याला घट्ट मिठीत पकडुन ठेवते. ती त्याला सोडतच नव्हती. प्रेमला काही सुचत नव्हतं, तो तिला बोलतो...
प्रेम : अंजु....! प्लीज....! सोड आता, उशीर होतोय, मला निघायचं आहे.
अंजली : आधीच यायला एवढा उशीर केला आहेस. निदान काही वेळ तरी मला हे क्षण जगू दे. प्लीज....!
प्रेम : अंजु....! आपण घरी आहोत तुझ्या...! बाहेर मॉम डॅड आहेत.
अंजली : माहितीये मला...!
प्रेम : हे बघ... असं वेड्यासारखं नको वागु, एवढा वेळ मी तुला समजावून पण तु अशी करतेय...! प्लीज सोड आता...!
अंजली : मी ऐकलय सर्व तुझं...! आणि मला हे ही कळुन चुकलं आहे की, हा क्षण माझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही आहे.
* प्रेम तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून तिला बोलतो.
प्रेम : अंजु...! प्लीज समजुन घे. बस् झालं आता...! यापुढे आपण कधीच भेटणार नाही आहोत. हि आपली शेवटची भेट आहे. मी आज जे तुला बोललोय ते तु कायम लक्षात ठेवशील. आणि पुढे तशीच वागशील. हे मला प्रॉमिस कर...!
अंजली : ठिक आहे करते प्रॉमिस...! पण माझी पण एक अट आहे.
प्रेम : काय....?
अंजली : तु लग्न करतोय...! ठिक आहे...! मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. पण मला तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर करू नको, मी नाही जगू शकणार.
प्रेम : तु काय बोलतेय हे कळतंय का तुला...? ज्या गोष्टी घडणं अश्यक्य आहेत, त्याबद्दल बोलुन काही होणार आहे का...?
अंजली : मला माहित नाही ते...! पण मी खरं बोलतेय. आजपर्यंत मी जिवंत आहे कारण, कधीतरी तु येशील हा विश्वास होता मला. आणि तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. प्लीज प्रेम, कसं सांगु तुला, प्लीज समजुन घे मलाही.
प्रेम : काय समजुन घेऊ हेच कळत नाही. तु मला समजुन घेशील हा माझा विश्वास होता म्हणुन मी हे धाडस केलं तुला भेटण्याचं. आता वाटतं....!
अंजली : प्रेम...! मी तुझा विश्वास आजपर्यंत कधी तोडला नाही, आणि पुढेही कधी तोडणार नाही. मला माहितीये तुला कसली भीती वाटते ती...! पण विश्वास ठेव माझ्यावर तुझ्या पर्सनल आयुष्यात माझ्यामुळे कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ते मला करायचंही नाही. तु तुझं आयुष्य तुला हवं तसं जग. मला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तुझ्या आयुष्यात माझ्यासाठी कुठेतरी छोटीसी जागा हवी आहे. एवढच मागतेय मी, दुसरं मला काहीही नकोय.
प्रेम : अंजु....! हे चुकीचं नाही वाटत का...?
अंजली : चुक की बरोबर ते मला माहित नाही. मला जे आतुन वाटतंय ते मी बोलतेय.
प्रेम : सॉरी अंजु पण, मला नाही पटत हे....! मी नाही करू शकत असं...!
अंजली : प्रेम...! तु फक्त एकदा माझ्या बाजूने थोडासा विचार करून बघ ना...!
प्रेम : हो...! अंजु तुझा विचार मी सर्वात आधी करून मगच हा निर्णय घेतलाय...! तुला का नाही कळत आहे...?
अंजली : बरं ऐक....! तु एक मित्र म्हणुन तरी राहु शकतोस की नाही माझ्यासोबत...? का... ते ही नाही होणार....! आता एवढं सर्व मान्य केलंय मी...! मग माझ्यासाठी फक्त हा एकच पर्याय उरतो ना...! आणि मी तुझी शपथ घेऊन बोलतेय, मी कधीच इंटर-फिअर नाही करणार तुझ्या पर्सनल आयुष्यात...! मग तर झालं...!
प्रेम मला माझ्या आयुष्यात तु हवा आहेस, कोणत्याही स्वरूपात...! मग ती मैत्री असो वा अजुन काही...! पण मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नाही.
प्रेम... तुझं माझ्या आयुष्यात असणं हे माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुला कळणार नाही, आणि मला ते तुला पटवूनही देता येणार नाही. प्लीज फक्त एवढच मागतेय मी तुझ्याकडे. त्यासाठी तु जे काही बोलला आहेस ते सर्व काही करायची तयारी आहे माझी. पण मला तुझ्यापासून कायमचं वेगळं करण्याचा विचार करू नकोस. मी हात जोडून विनंती करते तुला....!🙏🏻😌
* तिच्या या बोलण्यावर प्रेमला आता काय बोलावं हे सुचत नव्हते. खरं तर ते दोघे खुप वेळ बोलत होते. बाहेर मॉम डॅड टेन्शन मधे होते. याची त्याला कल्पना होती. म्हणुन तो आता अजुन जास्त वेळ तिथे थांबु शकत नव्हता. हा विचार करून तो तिला बोलतो.
प्रेम : ठिक आहे...! मग हे सर्व तु बाहेर मॉम डॅड समोर कबुल करायचं....!
अंजली : चालेल...! पण त्याआधी मला तुझा फोन नंबर दे. आय प्रॉमिस मी विनाकारण कॉल करून तुला त्रास देणार नाही. तसं केलं तर ब्लॉक कर मग तर झालं.
* प्रेम तिला मोबाईल नंबर देतो.अंजली यातच समाधानी होती. ती प्रेमसोबत बाहेर येते. मॉम डॅड दोघेही त्यांच्याकडे पहात होते. त्या दोघांना प्रेम बोलतो.
प्रेम : सॉरी...! थोडा वेळ झाला...! पण सर इथुन पुढे अंजली तुमच्या म्हणण्याप्रमाणेच वागेल. हे तिने प्रॉमिस केले आहे. जे काही आहे ते तिने ॲक्सेप्ट केलं आहे. मला आशा आहे की, यापुढे सर्व काही ठिक होईल.
आणि यापुढे आम्ही फक्त मित्र म्हणून राहू. अशी तिची इच्छा आहे. फक्त तेवढी परवानगी द्या आम्हाला. कधीतरी मित्र म्हणुन बोलायला किंवा भेटायला.
बाकी मी आता जास्त काही बोलत नाही. माझ्यामुळे तुम्हाला जेो काही मानसिक त्रास झाला असेल तर मला माफ करा.
मी निघतो आता...!
* सर्व शांत उभे होते. प्रेम दोघांकडे पाहून हात जोडतो आणि तसाच डोअर ओपन करून बाहेर येतो. बाहेरूनच तो अंजलीला बाय करतो आणि जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली येतो. सोसायटी मधुन बाहेर निघुन तो सरळ घरी येतो.
फायनली त्याने जे ठरवलं होतं ते तो करून आला होता. पण त्या रात्री त्याला नीट अशी झोप लागली नाही. खुप सारे विचार डोक्यात येत होते. पण जे होईल ते होईल असा विचार करून तो झोपण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात मोबाईल वर एका नंबर वरून मॅसेज येतो.
" हाय फ्रेंड.... थॅन्क्स...🙏🏻 गुड नाइट. 😊
तो मॅसेज पाहून त्याच्या पण चेहऱ्यावर थोडेसे हसु येते. त्या मॅसेज ला तो रिप्लाय करतो. " गुड नाइट 😊 आणि मोबाईल सायलेंट करून झोपुन जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऊठुन जेव्हा तो मोबाईल बघतो. तेव्हा तो पहातो की, रात्री उशिरा एक खुप मोठा मॅसेज टाईप करून अंजलीने त्याला पाठवलेला होता. प्रेम तो मॅसेज वाचायला लागतो.
' प्रेम...! मला माहितीय मी तुझ्या मनाविरुद्ध तुला माझ्याशी मैत्री कायम ठेवायला भाग पाडले आहे. काल हे मला जाणवत होतं. पण मी अगदी मनापासून हे स्वीकारलं आहे. तु तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेस. तुझी जोडीदार पण तुला हवी तशीच मिळाली असेल. यात काही शंकाच नाही. मी तुम्हा दोघांनाही तुमच्या या नवीन प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा देते. तुमचं पुढचं आयुष्य सुखी समाधानी आणि भरभराटीचे असो हिच गॉड कडे प्रे करते. आणि प्रेम पुन्हा एकदा थॅन्क्स कारण यासोबत तु मलाही एक नवीन आयुष्य दिले आहेस. आणि मी खरच खुप खुश आहे. तु पण खुश आणि नेहमीसारखा हसत रहा. कारण तुझा हसरा चेहरा कितीतरी लोकांच्या चेहऱ्यावर हसु आणतो. सो किप स्माईलिंग अल्वेज...😊 आणखी एक गोष्ट सांगु....! तु खरच खुप म्हणजे खुप छान आहेस. बस्... हॅप्पी रहा...😊 गॉड ब्लेस यू... टेक केअर. मला माहितीय तुमच्या लग्नाला काहीच दिवस उरलेत, खुप कामं असतील, त्यामुळे तुला आता डिस्टर्ब नाही करणार. बाय...
एंजॉय द मोमेंट....👍🏻
* प्रेम तिचा मॅसेज वाचुन थोडा वेळ तसाच शांतपणे विचार करत होता. पण तिला काहीच रिप्लाय देत नाही. तो मोबाईल मधील तिचे सर्व मॅसेज डिलिट करतो.
त्याने अजुन तिचा नंबर सेव्ह केला नव्हता. हेही तो विसरून जातो.
लग्नाच्या घाईमधे कसे दोन दिवस निघुन जातात हे कळतही नाही. दोघांची कपडे खरेदी वगैरे सर्व तयारी आधीच झाली. होती. पाहुण्यांनी घर भरले होते. रूम छोटी असल्यामुळे काही पाहुणे ताईकडे थांबले होते.
लग्नाच्या एक दिवस आधी साखरपुडा होता. आणि त्या दिवशी आरवचा वाढदिवस पण होता. साखरपुड्यासाठी प्रेमने एक छोटीशी सोन्याची अंगठी घेतली होती. आणि एक दोन वाट्यांचे मंगळसूत्र व चांदीचे पैंजण आणि जोडवी पण घेतली होती.
वैष्णवीची इच्छा होती की, तिला सोन्याचे कानातले हवे होते. लग्नाच्या या सर्व खर्चात प्रेमला ते शक्य होणार नव्हते. ही गोष्ट तो वैष्णवीला पण बोलला होता. त्यामुळे ती थोडीशी नाराज होती.
आरवला हि गोष्ट समजली होती. त्याने ग्रुप मधील सर्वांना सांगितले. मग त्या सर्वांनी मिळुन लग्नाचा आहेर म्हणुन वैष्णवीसाठी सोन्याचे कानातले खरेदी केले होते. दोघांसाठीही हे सरप्राइज होते.
त्या दिवशी दुपारीच सर्व जण साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जायला निघाले. त्यासाठी आरवने त्याच्या मित्राची गाडी अरेंज करून दिली होती.
साखरपुड्याची सर्व तयारी करून प्रेमसोबत त्याच्या घरातुन आई, ताई व काही पाहुणे गाडीतुन जायला निघाले. काही वेळातच ते सर्व वैष्णवीच्या घराजवळ पोचले.
बाकीचे मित्र मंडळी आपापल्या बाईकवरून तिथे पोचले.
त्यांच्या चाळीमध्ये एका ठिकाणी मोकळ्या जागी मंडप उभारला होता. तिथे साखरपुड्याचा कार्यक्रम होणार होता.
काही वेळातच त्याला सुरुवात होते. वैष्णवी तिच्या घरून छान तयार होऊन आली होती. दोघे आजूबाजूला पाटावर बसले होते.
साखरपुड्याच्या विधी चालु झाल्या होत्या.
दोघेही एकमेकांना अंगठी घालतात. त्यानंतर आरव पुढे येऊन प्रेमच्या हातात एक छोटी वस्तू देतो. प्रेम ती उघडुन बघतो. त्यामध्ये कानातले होते. ते पाहून तो आरवकडे बघतो. आरव त्याला पाहून एक छान स्माइल करतो आणि त्याला इशाऱ्यानेच वैष्णवीला द्यायला सांगतो.
प्रेम वैष्णवीच्या हातात ते ठेवतो. वैष्णवी ते पाहून खुश होते. दोघेही ऊठुन तिथे उपस्थित असलेल्या सर्व मोठ्या लोकांच्या पाया पडतात. आणि तिथून दोघे तिच्या घरी येतात. तिथे ते दोघे तिच्या वडिलांच्या फोटोला नमस्कार करतात. घरातील देव्हाऱ्यातील सर्व देवांना नमस्कार करून बाहेर येतात.
तिथेच मंडपात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रुप मधील सर्वजण तिथे हजर होते. मग तिथेच केक कापून आरवचा वाढदिवस साजरा केला गेला. संध्याकाळ झाली होती.
जेवण वगैरे झाल्यावर सर्व घरी जायला निघाले. चाळीमध्ये हळदीची तयारी चालु झाली होती. सर्व मित्रांनी मिळून बेंजो अरेंज केला होता. सर्व मित्रमंडळी, चाळीतील सर्व रहिवासी, आणि प्रेमच्या घरातील सर्व नातेवाईक व काही पाहुणे, सर्वांनी प्रेमच्या हळदीला नाचुन खुप धमाल केली.
प्रेम चाफ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या बांधुन हळद लावण्यासाठी बसला होता. प्रेमला पण सर्वांनी हळदीने खुप माखवले होते. त्याची उष्टी हळद वैष्णवीकडे पाठवण्यात आली. तिच्या घरी पण हळदीचा कार्यक्रम खुप जोरात चालू होता.
रात्रीचे दोन वाजेपर्यंत बेंजो वाजतच होता. आरव, राघव, रमेश, साई, विजय, तसेच त्याचे इतर मित्र त्याला खांद्यावर घेऊन नाचत होते. रात्र खुप झाली होती, तरीही कोणी ऐकायला तयार नव्हते. शेवटी आरवने पुढाकार घेऊन त्यांना थांबवले. सर्व आवरून त्याने प्रेमला झोपायला सांगितले.
बाकी सर्वजण आरवच्या घरी चालले होते तेवढ्यात आरवला एक कॉल येतो, त्याला एक वाईट बातमी समजते. प्रेम साठी जी गाडी त्याने बुक केली होती. त्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे आता अचानक गाडी कशी अरेंज करायची हा प्रश्न निर्माण झाला होता.
त्याच्या एका मित्राची गाडी खुप दिवस त्याच्या घराजवळ उभी होती. तो मित्र बाहेर होता. त्याने त्याच्या घरातुन गाडीची चावी घेतली आणि गाडीचे कव्हर काढले. गाडीवर खुप धुळ साचली होती. साई ने डोअर ओपन करून चावी स्टार्टर दिला. काही वेळात गाडी चालु झाली. आरवचे लक्ष टायर वर गेले. गाडीचा एक टायर पंक्चर होता. आणि गाडीमध्ये स्टेपनी पण नव्हती.
दुसरा काही पर्याय नसल्यामुळे सर्वजण मिळुन गाडीला जॅक लाऊन तो टायर काढतात. राघव आणि विजय बाईक वरून तो टायर घेऊन हाय वे ला पंक्चर काढायला घेऊन जातात. ते दोघे परत येईपर्यंत बाकी सर्वजण मिळुन तिथेच थोड्या अंतरावर असलेल्या बोरिंग वरून पाणी आणुन ती कार धुवून काढतात.
काही वेळातच टायर घेऊन ते दोघे येतात. पटकन तो टायर गाडीला लावतात. साई गाडी चालु करून एक राऊंड मारून खात्री करून घेतो. हे सर्व होईपर्यंत पहाटेचे पाच वाजायला आलेले असतात. लग्नाची वेळ दुपारची होती. त्यामुळे सकाळी पण लवकरच तयारी करायला लागणार होती. सर्वजण नाचुन आणि गाडीच्या कामामुळे थकले होते. शेवटी काही वेळ आरवच्या घरी वरती जाऊन झोपले.
काही वेळातच सकाळ झाली होती. दोन्ही लग्नघरात तयारी चालु झाली होती. वैष्णवीच्या घराच्या काही अंतरावर एका मैदानावर भव्य असा लग्नाचा मंडप उभारण्यात आला होता. आत मोठा स्टेज बनवला होता. चारी बाजूने पडदे लावून पॅक करण्यात आले होते. एन्ट्री साठी छान सजावट करून गेट बनवला होता.
स्टेज वर मागच्या बाजुला प्रेम आणि वैष्णवी नावाच्या नेम प्लेट लावण्यात आल्या होत्या. तिच्या भावाने यासाठी कोणतीही कसर ठेवली नव्हती.
अखेर तो दिवस आला होता.
प्रेम सकाळी उठून अंघोळ वगैरे करून आवरून घरातील काही विधी करत होता. ते झाल्यानंतर जवळच असलेल्या हनुमान मंदिरात जाऊन तिथे एक विधी आवरून येतो. घरी पाहुणे खुप होते. सर्वांची अंघोळ वगैरे आवरणं अवघड होतं. पण त्या दिवशी चाळीतील आजुबाजूच्या लोकांनी त्याच्या काही पाहुण्यांना आपल्या घरी अंघोळ वगैरे करण्यासाठी मदत केली. हेच ते आपलेपण होते जे त्याने मिळवले होते. प्रेमने अवघ्या काही दिवसातच आपल्या प्रेमळ स्वभावामुळे चाळीतील सर्वांना आपलंसं केलं होतं. लहान मुलामुलींचा प्रेमदादा, वहिनींचा प्रेम भाऊ, मोठ्यांसाठी एक गुणी आणि संस्कारी मुलगा प्रेम. चाळीमधे अशी त्याची ओळख निर्माण झाली होती.
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️