********************** १२ *******************
ते आरक्षण..... आरक्षण होतं, नोकरीसाठी. राजकारण करण्यासाठी अन् शिक्षणासाठी. परंतु ते आरक्षण जरी असलं तरी प्रभास आणि सृष्टीनं त्यांची नोकरी जाताच आरक्षणाचा फायदा घेतला नाही. आपली मुलं शिकवली स्वतःच्याच पैशानं. शिक्षणाचंही शुल्क भरलं. कारण होतं समाधान. आत्मीक समाधान. ते समाधान की उद्या काळ गेल्यानंतर स्वतःला वाटेल व अभिमानानं सांगता येईल की मी स्वतःच्या पैशानं शिकवलं. त्यावेळेस आपली छातीही इंचभर वाढलेली असेल. तसंच त्यांना वाटत होतं की आपली मुलंही समाधान व्यक्त करतील. म्हणतील की आरक्षण होतं, परंतु आम्ही आरक्षणाचा फायदा घेतला नाही. आम्ही स्वतःच शिकलो. आमच्या वडिलांनी स्वतःच त्यांच्या पैशानं शिकवलं. कुणासमोरही आमच्या शिक्षणासाठी लाचार झाले नाही. सरकारलाही सरकारी मदत मागितली नाही. याचा अर्थ प्रभास व सृष्टी आरक्षणाचा विरोध करीत नव्हते. त्यांनाही वाटत होतं की आरक्षण असावं. आरक्षण हे तळागाळातील लोकांना वर आणण्यासाठी असतं. आरक्षण नसेल तर अशी तळागाळातील मंडळी वर येवू शकणार नाही. हे खरं आहे. परंतु जे लोकं वर आलेले आहेत. त्यांनी आरक्षण न मागता स्वतःच्या खर्चानं आपल्या मुलांना शिकवावं. ज्यांना त्याबद्दल स्वाभिमान वाटेल. त्यांच्या मुलांनाही स्वाभिमान वाटेल. त्यांनी स्वतः लाचार मानून सरकारला आरक्षण असल्यानं फायदा मागू नये. कारण त्यांचं लाचारपण हे त्यांना जीवनभर दोष देत राहिल.
सृष्टी व प्रभासला नोकरी नव्हती. आंदोलनातून त्यांना टेट परिक्षेत राहत मिळाली. टरंतु त्याचा फायदा घेत त्यांनी नोकरी केली नाही व आता त्यांना नोकरीही आवडत नव्हती. त्यातच त्यांना जेव्हा कोणी नोकरीबद्दल विचारत असत. तेव्हा ते अगदी चिडून उत्तर देत. म्हणत असत की तुम्हाला सरकारीच नोकरी दिसते काय? सरकारी नोकरीत किती काटे असतात, ते आम्हाला विचारुन घ्या. सरकारी नोकरी ही दूरुन चांगली दिसत असते. परंतु जेव्हा आपण त्यात पडतो ना. तेव्हा ब्रम्हांड आठवतं. वाटतं की ही नोकरीच करु नये. सोडून द्यावी. परंतु ती ऐनवेळेस वेळेवर सोडताही येत नाही. अन् ती सोडल्यावर दुसरं कामंही करणं जमत नाही. आळस येतो, तसंच कोणी कोणतंही काम जरी करतो म्हटलं तर लाज वाटते. एवढंच नाही तर सरकारी नोकरी करीत असतांना माणूस आळशी बनतो. तो स्वतःचाही विकास करु शकत नाही. सर्व गोष्टीवर पाणी फेरावं लागतं त्याला. ना त्याला कोणाच्या मरणाला जाता येत. ना कोणाच्या विवाहसमारंभात सहभागी होता येत. घाण्याचा बैल असल्यागत त्याला बांधून राहावं लागतं. सरकारी नोकरी करतांना सबंधीत जगणं हे कुत्र्यागत असतं. कोणी काहीही म्हणून जातो. तेव्हा फारच वाईट वाटत असतं. तेव्हाही लाज वाटते. अन् लाज तेव्हा वाटते, जेव्हा न केलेला गुन्हा लादला जातो जाणूनबुजून.
एखादा पशुतरी बरा की ज्याला दोन वेळचं जेवन बरोबर मिळत असतं. परंतु सरकारी नोकरी करणारा व्यक्ती बरा नाही. आपल्याला वेळ होईल व आपली लेट लागेल म्हणून सरकारी कर्मचारी धावतपळत घरी दोन घास सुखाचे न कोंबता सुटतो. त्याला सकाळीच जावं लागतं व सायंकाळी उशिरा घरी यावं लागतं. पुरेशी उसंत तरी त्याला मिळत नाही. परंतु लोकांना वाटते की सरकारी नोकरी बरी. एकप्रकारचा ओझं वाहणारा एखादा मजूर बरा की दिवसभर काम केल्यानंतर तो जेव्हा घरी येतो. तेव्हा त्याला काहीच समस्या नसते. परंतु सरकारी नोकरी करणाऱ्यांना घरी येतांना वेळ व काळ नसते. कधी आस्थापनेत पार्ट्या असतात, कार्यालय प्रमुखानं ठेवलेल्या. त्यावेळेस रात्रीचे तीन वाजतात. एवढंच नाही तर ऑनलाईन कामं करतांना वा एखादा रेकॉर्ड पुर्ण करतांना त्याला रात्र रात्र जागून काढाव्या लागतात.
प्रभास व सृष्टी जेव्हा सरकारी नोकरीवर होते. तेव्हा भरपूर वेतन होतं. तसं वेतन आज नव्हतं. आज कॉन्व्हेंटची संख्या वाढली होती व आजचा शिक्षक हा कॉन्व्हेंटला शिकवीत होता व त्याला पाहिजे त्या प्रमाणात वेतन नव्हतंच. शिक्षकांच्या नोकरीबाबत प्रभास वा सृष्टीला कोणी विचारल्यास त्यांचं त्यावरही उत्तर असे की शिक्षक कोणीही बनू नये. कारण शिक्षकांना कोणीही काही म्हणून जातो. पालक, नगरसेवक, सरपंच, आमदार, खासदार, संस्थाचालक, मुख्याध्यापक एवढंच नाही तर विद्यार्थीही कधीकधी शिक्षकांवर दोषारोपण करतो. आमचा काळ बरा होता की शिक्षकांना भरपूर वेतन होतं. परंतु आता मजुर वर्ग शिक्षकांपेक्षा जास्त कमवतो. तेवढा शिक्षक कमवीत नाही. अन् जेवढा मजूर वर्ग स्वातंत्र्य उपभोगतो, तेवढा शिक्षक नाही.
शिक्षकांबाबतची खंत व्यक्त करतांना प्रभास व सृष्टीला अतिशय दुःख होत असे. ज्यातून ते शिक्षक बनणाऱ्या वा सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना परावृत्त करीत असत. कारण त्यांनी सरकारी नोकरी करीत असतांना मरण पाहिलं होतं स्वतःचं. जीवन नाही.
टेट परिक्षेच्या प्रकोपानं प्रभास व सृष्टीची नोकरी गेली होती. त्याचा सतत प्रभास व सृष्टी विचार करायचे. विचार करायचे की आपल्याला आता नोकरी नाही. पेन्शनही नाही. अन् आयुष्याची बरीच वर्ष राहिली आहेत. मुलंही लहान आहेत. त्यातच मुलांना मोठं करणं आहे. त्यांना खाऊ पिऊ घालणं आहे. त्यांचं शिक्षण पाणी करणं आहे. त्यासाठी एखादा उद्योगधंदा करणं आहे. तशी एक दिवस विचार करीत असतांना सृष्टी म्हणाली,
"प्रभास, आपली नोकरी गेली हे माहीत आहे न व्हं."
"होय. माहित आहे."
"मग हे हातावर हात ठेवून बसणं योग्य आहे काय? अहो, आपली बाळं लहान आहेत अजून. त्यांना खाऊ पिऊ घालणं, त्यांचं शिक्षण करणं हे आपलं काम नाही का?"
"होय ते आपलंच काम आहे."
"मग असं हातावर हात ठेवून चूप बसणं चालेल काय? यानं काय आपलं पोट भरेल काय? अहो, जवळ आहे तो पैसा आपल्याला जीवनभर तरी पुरेल काय?"
"तुला म्हणायचं तरी काय आहे."
"मला म्हणायचं आहे की काही कामधंदा करा. काम शोधा. कामावर जा. नाही तर आपल्याला असंच उपासानं मरावं लागेल. मरावं लागेल की नाही."
"मग तुला काय वाटते? मी हातावर हात ठेवून बसलेलो आहे. मी शोधत असेल ना काम. परंतु मला कामच मिळत नाही. मग मी कसा जावू कामाला?"
"लोकांना मिळते आणि तुम्हालाच काम नाही मिळत. हे कसं शक्य आहे?"
"म्हणजे?"
"अहो, तुम्ही मला घरीच दिसता. मग काम विचारायला तरी केव्हा जाता?"
"जातो ना कामाला. परंतु मला कोणी कामंच देत नाही. तर मी तरी काय करु?"
"मी एक उपाय सुचवू का?"
"सुचव. कोणता उपाय आहे तुझ्याजवळ?"
"प्रभास, आपली आता नोकरी गेली आहे. आता आपल्याला पुन्हा नोकरी मिळणे नाही. तसं कोणी आपल्याला कामही देणार नाही आणि आपण आता दुसऱ्यांकडे कामंही करु शकत नाही."
"होय, बरोबर. मग?"
"आपण धंदा केला तर?"
"धंदा? कोणता धंदा कर म्हणतेय आता?"
"तो तुम्ही आपल्या विवाहापुर्वी करीत होते तो."
"असं म्हणतेस. परंतु त्या धंद्यात खुप मेहनत आहे. ती मेहनत माझ्यानं आता या उतारवयात होत नाही."
"मी करु लागणार मेहनत. मी करु लागणार सर्वकाही. आता तर ठीक आहे."
"अन् धंद्याला पैसे?"
"ते आहेत ना बँकेत. त्यातील काढू थोडेसे. धंदा उभारु. चालायला लागला की टाकू परत बँकेत."
"असं म्हणतेस. तर मग ठीक आहे. तू म्हणशील तसं. आपण उद्याच धंदा सुरु करु."
ती सृष्टीची सूचना. प्रत्यक्ष लक्ष्मीच बोलत होती तिच्या तोंडातून. तशी साक्षात ती लक्ष्मीच होती. त्यानं ते सर्व ऐकलं. तसा त्याला धंद्याचा जुना अनुभव होताच. त्यानंतर त्यानं लागलीच दुसऱ्याच दिवशी बँकेतून पैसे काढले व त्यानं एक लहानसा ठेला कारागीराकडून बनवून घेतला. त्या ठेल्याला सजवलं व त्यात गोलगप्पे भरले व तो गोलगप्प्याचा ठेला धकवत शहराच्या गल्लीगल्लीतून हिंडू लागला.
तो सुरुवातीचा धंद्याचा काळ. त्याला फार लाज वाटत होती. जेव्हा त्याला कोणी ओळखीचीही माणसं भेटत. परंतु तो आपल्या बोलण्यातून वेळ मारुन नेत असे. त्यातच त्याला त्या धंद्यात सृष्टीही हिरीरीनं मदत करु लागत असे.
आज धंद्याचा चांगलाच जम बसला होता. धंदा चांगलाच चालू लागला होता. सरकारी नोकरीनं वेळप्रसंगी त्या दोघांचेही हालहाल करुन टाकले होते. परंतु धंद्यानं उभारी दिली होती. तसे दिवसामागून दिवस गेले व कामधंदा चालवीत असतांना म्हातारपण आलं.
सृष्टी व प्रभासनं आपली मुलंबाळंही शिकवली होती. त्यांनी त्यांना उच्चशिक्षीत केलं होतं. परंतु त्यांनी आपल्या लेकरांना सांगीतलं की त्यांनी कोणत्याच स्वरुपाची नोकरी करायची नाही. सरकारी नोकरी तर नाहीच नाही. कारण कोणतीही नोकरी ही आपल्याला गुलाम बनवते. आपले हालहाल करते. सरकारी नोकरी बरी आहे तेवढ्यापुरती. परंतु त्यात संघर्ष असून ज्याचं भाग्य चांगलं नसतं. त्याचा विकास होत नाही सरकारी नोकरीत. त्याची अधोगतीच होते. याऊलट आहे धंद्याचं. धंद्याला जर नोकरीसारखं सांभाळलं तर नोकरीपेक्षाही कितीतरी जास्त पैसा कमवू शकतो आपण. तसं पाहिल्यास पैशानं सुख येत नाही आणि कोणताही धंदा करायचा म्हटलं वा सरकारी नोकरी करायची म्हटली तर जबाबदारी ही असतेच. ती जबाबदारी जेव्हा आपण नित्यनेमानं पार पाडू. तेव्हा पैसा दिसतोच. शिवाय असा पैसा कमवीत असतांना तो गैरमार्गानं कमवू नये. कोणाचा हक्कं मारुन कमवू नये तर तो चांगल्या मार्गानं कमवावा. जर तो चांगल्या मार्गानं कमवला तर तो चिरकाल टिकतो. मग धंदा कोणताही का असेना. शिवाय धंद्यात आपण आपले स्वतःचे मालक असतो. केव्हाही आणि कुठेही आपल्याला जाता येतं. मग तो धंदा लहानसा किंवा मोठा का असेना.
प्रभास आणि सृष्टीची लेकरं शिकली. उच्चशिक्षीत झाली. नव्हे तर त्यांना नोकरी लागू शकत होती. परंतु त्यांनी ती नाकारली. त्यानंतर त्यांनी उद्योगधंदे उभारले व एका कारखान्याचे मालक बनून ते राज करु लागले. ते लोकांना रोजगार देवू लागले आपल्या कारखान्यात आणि त्यांच्या आईवडिलांच्या चांगल्या शिकवणुकीतून त्यांनी आपल्या कारखान्यातील मजूरांना चांगली वागणूक दिली. ज्यातून कारखान्याला एक अतिभव्य दिव्य स्वरुपात उभारणी मिळाली.
आज सृष्टी व प्रभासच्याही मुलांचे विवाह झाले होते. त्यांनीही आंतरजातीयच मुली मागितल्या होत्या. परंतु त्यांनी मागितलेल्या मुली चांगल्या होत्या. त्या सृष्टी व प्रभासला किंचीतही अंतर देत नव्हत्या. दोन प्रेमाचे बोल बोलत होत्या. त्यातच त्या दोघांनाही आठवत होतं. आठवत होतं की ज्या सरकारी नोकरीनं त्यांना धोके दिले. त्यांचे हालहाल केले. त्यानंतरचं त्यांचं आयुष्य हे सुखमय झालं. तसे ते सरकारी नोकरीला दोष देत नव्हते, तर ते सरकारी नोकरीचे आभार मानत होते. कारण त्यांना वाटत होतं की जर त्यांची सरकारी नोकरी मधातच गेली नसती तर कदाचित ते आपल्या जीवनाचा विकास करुच शकले नसते. त्यातच ते खितपत खितपत राहून आपलं जीवन उध्वस्त करु शकले असते. सरकारी नोकरी गेल्यानंतर त्यांच्या जीवनाला जी कलाटणी मिळाली. त्या कलाटणीनंतर त्यांचं अख्खं जीवनच बदललं. सुरुवातीला थोडासा त्रास झालाच. परंतु नंतरचं त्यांचं जीवन सुखमय झालं होतं.
*****************************************समाप्त**********************