७
रामदासला आठवत होते ते जुने दिवस. रामदासजवळ सर्वकाही होतं. त्यानं लाच घेवू घेवू सर्वकाही जमवलं होतं. सर्वच गोष्टी जुळवून आणल्या होत्या. भ्रष्टाचारातून त्याला सगळं मिळालं होतं. फक्त विवाहयोग्य पत्नी मिळवायची तेवढी बाकी होती. अशातच त्याच्याजवळ सगळं काही असल्यानं एक रिश्ता त्याचेकडे चालून आला. ती मुलगी साजेशी होती व तिच्या वडिलानं त्याची नोकरी पाहून त्याला देवून टाकली होती. तसं पाहिल्यास तिनं जणू त्याची नोकरी पाहूनच विवाह केला होता.
रामदासचा विवाह झाला होता. त्याला लवकरच दोन मुलंही झाली होती. त्याच्या मुलांचं शहरात शिक्षणही सुरु झालं होतं. परंतु काळाला ते काही मंजूर नव्हतं. अशातच एक वाईट प्रकार घडला. जो प्रकार त्याच्या वर्तनाला बदनाम करणारा ठरला होता.
कोणत्याही गोष्टी या जेव्हा घडतात. त्या गोष्टी काही सांगून येत नाहीत. रामदासचंही तसंच झालं. रामदास असाच भ्रष्टाचार करणारा असल्यानं व तो शेतीच्या कामाचे पैसे घेत असल्यानं त्याच्यावर लोकांचा डोळा होता. लोकांनी ठरवलं होतं की त्याला एखाद्या प्रकरणात फसवावं. तसे ते त्याचेवर डोळाच ठेवून होते व तशी संधी शोधत होते. अशातच एकदा तशी संधी चालून आली व एका व्यक्तीनं त्याला फसवलं.
तो एक गरीब शेतकरीच होता. त्याच्या वहिलांची शेती होती. ती शेती अल्प होती व त्या शेतीचे तुकडे करुन त्याला बहिणीला हिसा द्यायचा होता. ज्यात त्याचा व बहिणींचा वाद निर्माण झाला होता. त्या व्यक्तीला शेती विकायची नव्हती. मात्र त्याच्या बहिणीला शेती विकायची होती. परंतु शेतीचे वाटणीपत्र बनत नसल्यानं वाद होता. त्या प्रकरणात रामदासला त्या शेतकऱ्यानं विचारलं असता त्यानं स्पष्ट नकारच दिला होता. प्रकरण जेव्हा त्याला माहित झालं. तेव्हा त्यानं त्या प्रकरणाचा फायदा घ्यायचं ठरवलं व बदल्यात एक मोठी रक्कम त्यानं त्या व्यक्तीला मागितली.
अनिरुद्ध त्या व्यक्तीचं नाव. अनिरुद्ध हा त्या शेतकऱ्याचा मुलगा. त्याचेजवळ पैसे नव्हते. तसा तो गरीब. त्याच्या बहिणी त्याला शेती विक म्हणून तकादा लावायच्या. परंतु त्याला शेती विकायची नव्हती. वाटत होतं की शेती जर विकली तर आपण काय खाणार? जगणार कसे? शिवाय रामदासचा सल्ला घेतला तर तोही आढेवेढे घेतच होता. शेवटी त्यानं ठरवलं. आपला वाद अशानं सुटत नाही. आपल्याला तलाठ्यानं मदत करायला हवी होती. त्याबदल्यात पैसे मागायला नको होते. जे त्याचे कर्तव्य आहे. हे एका झटक्यात होणारे काम आहे. परंतु आपण अडलोय. तलाठ्यानं आपली अडवणूक केलीय. आता आपण तलाठ्यालाच फसवायला हवं. कारण तो लाच घेवून गलेलठ्ठ बनलाय.
अनिरुद्धला तलाठ्याच्या घरची परिस्थिती माहित होती. तो पुर्वी कसा होता? त्याच्या घरची परिस्थिती पुर्वी कशी होती? नोकरीवर लागल्यावर त्याच्या घरची परिस्थिती कशी सुधारली? लाच म्हणून तो पैसे खातो की नाही?
अनिरुद्धच्या घरचा वाद. त्यातच जवळ पैसे नसणं. या गोष्टीनं चिडलेला अनिरुद्ध. त्याला रामदासनं लाच म्हणून पैसे मागताच अनिरुद्ध ठरवलं की त्याला आपण धडा शिकवावा. शेवटी तो रामदासशी गोड गोड बोलला व म्हटलं की त्यानं काम करावं. तो अमूक अमूक दिवशी कामाचे पैसे देणार. शेवटी अनिरुद्धनं रामदासला पैसे देण्याचं आश्वासन देताच रामदास त्याचं काम करुन द्यायला तयार झाला.
रामदासनं अनिरुद्धचं काम करुन देण्याचा होकार दिला होता. त्यानंतर अनिरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेला. त्यानं अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्या भेटीतून त्यानं संबंधीत अधिकाऱ्याला झालेला प्रकार सांगीतला. त्यानंतर संबंधीत अधिकाऱ्यानं जाळं पसरवलं व काही पैसे अनिरुद्धला दिले. अनिरुद्धनं ते पैसे रामदासला दिले व लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी रामदासला रंगोहाथ पकडलं आणि त्याची नोकरी गेली. तसा तो घरी बसला.
आज रामदास घरी बसला होता. त्यानं न्यायालयात खटला दाखल केला होता. परंतु त्या खटल्यात पैसा लागत होता. जवळ पैसा नव्हताच. त्यातच काय करावं सुचत नव्हतं.
रामदास घरी बसला होता. त्याचं निलंबन करण्यात आलं होतं. आता ना लाचेचा पैसा मिळत होता ना त्याला वेतनाचा पैसा मिळत होता. तसं पाहिल्यास आता कोणतंही काम करण्याची त्याला सवय नव्हती आणि तो कोणतंही काम करणार तरी कसा? त्याला ते कामं करण्याचं कसबही अवगत नव्हतं. अशातच त्याला आठवली ती गावाकडची शेती. त्यानं शेती घेतली होती. ती शेती पाहिजे तेवढी जास्त नव्हती. शिवाय वडिलोपार्जितही थोडीशी शेती होती. परंतु शेती करणं हे अतिशय त्रासाचं काम. त्या शेतीत कोण राबणार? तो विचार करु लागला.
रामदास शेतीबद्दल विचार करु लागला. विचार करु लागला की आता तो जर शेती करेल तर त्याला लाज वाटणार. गावातील लोकं काहीबाही बोलणार. दोष देणार, टोमणे मारणार. शेती कशी करावी. शिवाय आपल्याला शेती करण्याचं ज्ञान नाही. शेतात काय पेरायचं? पेरलेल्या मालाला कसं वाढवायचं? अन् हातात आलेला माल कसा आणि कुठे विकायचा? अन् शेत तयार करतांना नांगरणी, वखरणी कशी करायची? वैगेरे प्रश्न त्याच्या मनात होते. तोच त्याला आठवला तो लाजेचा प्रकार. लोकं टोमणे ठेवण्याचा प्रकार. परंतु त्यावर त्यानं विचार केला. शेती करण्यास प्रारंभ करताच दोन दिवस लाज वाटेल. दोन दिवस लोकं हासतील. दोन दिवसानं सगळं बरोबरच होईल. लोकं तर टोमणे मारणारच. आपण त्याची तमा बाळगू नये. तोच त्याला आठवला तो बालपणाचा काळ. अन् शिकल्यानंतर उच्चशिक्षीत झाल्याचा काळ. ज्याकाळात तो बेरोजगार म्हणून गावात फिरत होता. परंतु वडिलांच्या शेतीकडे लक्ष देत नव्हता. धडधाकट तरुण असतांनाही. कारण त्याला तो शिक्षण शिकल्यानंतर शेती करण्याची लाज वाटायची.
रामदासला आताही लाजच वाटत होती शेती करण्याची. परंतु ते पोट होतं. त्या पोटासाठी त्याला कोणतंही काम करावंच लागणार होतं. तसा तो नोकरी लागल्यापासून शहरातच रुळावला होता. शहरातल्या मातीत राबला होता. तशी त्यानं नोकरी लागल्यानंतर शहरातीलच मुलगी पत्नी म्हणून स्विकारली होती.
रामदासची नोकरी गेल्यानंतर त्यानं शहरात कामधंदे शोधून पाहिले. परंतु जिथं प्रारब्ध खराब असतं. तिथं पुरेसं काय मिळणार? त्यानं सुरुवातीला आलू कांद्याचा धंदा लावला. परंतु ग्राहक नसल्यानं त्यात भरलेले आलू कांदे सडले व त्याला अतोनात नुकसान झालं. एकदाचा प्रसंग तर वाईटच अनुभवायला आला त्याला. पोळ्याचा सण होता व लोकं सायंकाळी पोळा फुटताच काकड्या फोडतात, लोकं पोळ्याच्या दिवशी काकड्या जास्त घेतात. असं वाटून त्यानं काकड्या आणल्या व तो ठरवलेल्या किंमतीनं विकू लागला. तसं काकड्याचं आणखी एक दुकान शेजारीच होतं. त्याच्याहीजवळ काकड्या होत्याच. त्यानं त्या काकड्याची किंमत रामदासजवळच्या काकड्यापेक्षा जास्त ठेवली होती. परंतु ग्राहक त्या शेजारील व्यक्तीजवळ जात होते. रामदासजवळ येत नव्हते. अशातच रामदासचं नुकसानच झालं.
रामदासला भाजीपाल्याच्या धंद्यातून होत असलेलं नुकसान. तो जवळचा पैसा लावायचा. त्याच्या जवळचा पैसा जायचा. परंतु त्याच्याजवळ जास्तीचा पैसा यायचा नाही. अशातच वारंवार नुकसान व्हायचं. याच चक्करमध्ये जवळ होता नव्हता, तेवढाही पैसा संपला होता. काही मोजकाच पैसा शिल्लक होता. उपासमार व्हायला लागली होती. मुलांचं शिक्षणपाणी सारं सुटलं होतं. कॉन्व्हेंटला असणारी त्याची मुलं शाळेत शिक्षणाचं शुल्क मागतात म्हणून शाळेत जात नव्हती. काय करावं सूचत नव्हतं. अशातच त्याला आठवली गावची शेती. तसं त्यानं ठरवलं आपण शेती करायची. परंतु शेती करण्याचं कसब? ते कुठून आणायचं. तसं क्षणातच आठवलं की जेव्हा तो लहान होता, तेव्हा वडीलांच्या मागं फिरायचा. कधी वखरावर बसायचा. कधी नांगर धरुन पाहायचा. कधी वखर हाकलूनही पाहायचा. ते त्याला त्याच्या वडिलांकडूनच शिकता आलं होतं. शिवाय वडिलांनी आवर्जून आपल्या लेकराला गुण अवगत असावा म्हणून लहानपणीच त्याला शेतीचं तंत्रज्ञान शिकवलं होतं. त्यातच त्याला ते चांगलंच आठवायला लागलं होतं.
रामदासला जशी बालपणातील शेतीची गोष्ट आठवली. तसं त्यानं शेती करायचं ठरवताच तोच बेत त्यानं आपल्या पत्नीला बोलून दाखवला. त्यावर पत्नीनं नाराजी व्यक्त केली. म्हणाली, "आपण शहरातच काम करावं."
ती शहरातील कामं. त्या शहरातही जीवघेणी स्पर्धाच होती कामधंद्यातही. ज्यात काबाडकष्ट व मेहनत भरपूर होती. तशी मेहनत ग्रामीण भागात नव्हती. हं, एवढंच होतं की ग्रामीण भागातील लोकांना कामासाठी चिखल तुडवत शेतावर जावं लागायचं. शेतात राबावं लागायचं. ज्यात हिंस्र श्वापदांची भीती होती.
शहरातील तो कामाचा मार्ग रामदाससाठी योग्य नव्हता. तो खडतर मार्ग होता. त्याला शहरातील कामं आवडत नव्हती. वाटत होतं की अशानं आपल्या कुटूंबाची उपासमार होईल व उपासानं एखाद्यावेळेस आपण मरुन जावू. त्यापेक्षा आपण गावात गेलेलं बरं व गावात शेती केलेली बरी. असा विचार करताच तो आपल्या पत्नीचं न ऐकता गावात राहायला आला.
रामदास जसा गावात आला. तसं गाव त्याला हसत होतं. शिवाय तेव्हा जास्तच हसत होतं, जेव्हा तो शेती करायला लागला होता. परंतु त्यानं लोकांच्या हसण्याकडं लक्षच दिलं नाही. लोकांना हसू दिलं. जो हसेल त्याचे दात दिसेल अशी वृत्ती ठेवली.
तो ग्रामीण भाग व तो शेतीसाठी असलेला डोंगराळ प्रदेश. त्या भागात शेती करायची म्हटलं तर फक्त पावसाळ्याचे चारच महिने शेती करता येत होती. कारण पावसाळ्यात पाणी असायचं व तेही पाणी पावसाळ्यातच जमीन उताराची असल्यानं वाहून जायचं. शेती करणं हे कसरतीचं काम असायचं. त्यामुळं पावसाळ्याचे चारच महिने लोकं गावात राहात असतं. बरीचशी मंडळी आपल्या घरादाराला कुलूप लावून इतर दिवशी आपलं पोट भरण्यासाठी शहरात येत व शहरात कुणाकडेही काबाडकष्टाची कामं करुन आपलं पोट भरत असत.
ते डोंगरपायथ्याशी वसलेलं गाव. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर गावात इतर दिवसात प्रचंड ऊन्हंच असायचं. सुर्याचे लंबरुप कीरणं पृथ्वीवर थेट पडायचे. ते थेट पडणारी कीरणं पडल्यानंतर जमीन एवढी गरम व्हायची की उन्हाळ्यात भर दुपारी बाहेर निघणं कठीण होवून जायचं. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात शेती व्हायची नाही. त्यामुळंच पोट भरण्यासाठी ती मंडळी शेती न करता शेतीलगत असलेल्या भयाण जंगलात जात व त्या जंगलातील रानमेवे आणत. ते रानमेवे शहरात विकून आपला उदरनिर्वाह करीत असत. काही लोकांकडे दुभती जनावरंही भरपूर होती. ते त्या दुभत्या जनावरांच्या दुधापासून नवनवीन वस्तू बनवून त्या वस्तू शहरात विकून आपले पोट भरीत असत. त्यातच काही लोकं लोणचे तयार करत तर काही लोक शहरात जंगलातील लाकडं नेवून विकत. हे सगळं पोटासाठी असे.
ती शेती..... सुरुवातीस त्याला शेती जमणार का? हा प्रश्न पडला होता. परंतु आता तो प्रश्न सुटला होता. त्यातच लोकं गाव सोडून शहराकडे राहायला जात. तसंच वातावरण एकंदर देशात तयार झालं होतं. मात्र कोणताही व्यक्ती एकदा का शहरात गेला तर तो कधीच गावाकडे परत येत नसे. त्याची गावाकडे परत येण्याची इच्छाशक्तीच मरुन जात असे. अशातच रामदासचं गावाकडे येणं म्हणजे लोकांसाठी हास्यास्पद अशी गोष्ट होती.
गावची शेती. रामदास शेती करु लागताच पहिला प्रश्न पडला, ते त्या शेतीचं ओसाडपण. शेतीवर आधारीत काही भाग हा ओसाड होता. त्या ओसाड शेतीला वाहितात आणणं भाग होतं. रामदासनं शेतीची सुरुवात करताच त्यानं ओसाड शेती वाहितात आणली. त्यातच त्यानं शेतात पीक काढणं सुरु केलं.
ते शेतातील पीक. सुरुवातीला त्याला अनुभव नसल्यानं बरोबर काढता येत नव्हतं. तसं पाहिल्यास सुरुवातीला त्याला शेतात जातांना आवडत नव्हतं. तरीही त्याला तलाठी असतांना शेतात जायची सवय असल्यानं व त्याची शेतात जायची मजबुरी असल्यानं तो शेतात जावू लागला. राबू लागला. त्यानंतर त्याचा लवकरच प्रश्न सुटला.
तो शेतात जायला लागला व त्याला शेती आवडायला लागली होती. सुरुवातीस त्यानं शेती करतांना परंपरागत शेती करण्यास प्रारंभ केला होता. त्यात त्यानं सोयाबीन व धानाचं पीक लावलं होतं. परंतु ते पीक त्याला बरोबर झालं नाही. वर्षातून एकच वेळा पीक झालं व संपुर्ण आठ महिने ओसाड गेले होते.
पावसाळ्याचे चारच महिने तेवढे बरोबर जात होते. बाकीचे महिने त्याला काम नसायचं. त्यातच तो विचार करायचा. विचार करायचा की माझे वडील मी लहान असतांना शेती करायचे. त्यातच ते शेती करीत असतांना त्यांची शेती बुडायची. शेतात असणारं पीक शेवटच्या क्षणाला पाऊस नसल्यानं बुडायचं.
रामदास विचार करु लागला. आपण शेती कशी करायची. चारच महिने पावसाळा असतो. वर्षभर पाऊस पडत नाही. मग वर्षभर जर शेती करायची असली तर कशी करायची? पाणी कुठून आणायचं?
रामदास विचार करीत असतांना त्याच्या मनात शेतीच्या पाण्याचा विचार आला. तसा विचार येताच तो शेतात विहीर खोदू पाहात होता. परंतु त्या गावाचा इतिहास होता की गावात शेतात विहीर खोदणं कठीण काम होतं. शेवटी तसा विचार करुन त्यानं कुपनलिकेचाही विचार केला. परंतु तो सुद्धा प्रयोग गावातील लोकांनी आधीच करुन पाहिला होता. तो प्रयोग यशस्वी झाला नव्हता. शेवटी त्यानं ठरवलं. ठरवलं की शेतात पीक विना पावसाचं घ्यायचं. ज्यात त्याला बालपणीचा काळ आठवला. बालपणीच्या काळात गावची मंडळी चाळं, बोरं,आवळे, आंबे जंगलातून आणत व शहरातील लोकांना विकत असत. आजही काही लोकं तीच कामं करीत होते व जंगलाय गेल्यानंतर काही लोकं हिंस्र श्वापदांचे शिकार होत असे. त्यातच रामदासनं विचार केला. आपण रानातील झाडं आपल्या शेतात लावावी. म्हणजे हिंस्र श्वापदांची आपल्याला भीती राहणार नाही. त्यानं गावच्या शेतात काही आंब्याची, बोराची, चाराची, आवळ्याची झाडं लावली. परंतु त्या झाडांनी तग धरलाच नाही. ती मोठीच झाली नाही व रानातल्या जनावरांनी खाल्ली. त्यातच त्याचा धज्जा उडवला. ज्यात त्याची मेहनत तर गेलीच. शिवाय नुकसानही विपूल झालं.
रामदासला शेतात नुकसान झालं होतं. ज्यात तसं पीक घेत असतांना तो विचार करु लागला. विना पावसाचं म्हणजे नेमके कोणते पीक घ्यावे. आपण जरी विना पावसाचं पीक घेतलं तरी त्या पिकांवर रानातील जनावरं तुटून पडतात. नुकसान होतं. मागं तसंच नुकसान झालं होतं. त्यातच जर अशी झाडं मोठी जरी झाली. तरी रानपक्षी आणि माकडं त्यावरील फळं खावून टाकतील. काय करावं, म्हणजे शेतातील पिकंही वाचतील आणि आपल्याला भरपूर पिकंही होईल.
माकडं वा रानातील प्राणी, तसेच रानपक्षी पीक खावून नष्ट करतील. या भीतीनं जे पीक रानातील प्राणी वा पक्षी खाणार नाहीत. शिवाय माणसं देखील खाणार नाहीत. त्यातच आपल्याला भरपूर पीक होईल. असा विचार करीत असतांना त्याला गवसलं. आपण औषधीची झाडं लावावीत. ज्याची ओळख लोकांना नसेल, ज्याची ओळख प्राण्यांना नसेल, ज्याची ओळख रानपक्षांना नसेल आणि असलीही, तरी ते पीक खावून रानपक्षी वा रानातील प्राणी नष्ट करणार नाहीत. ते शेतात येणारच नाहीत व शेताचं एकप्रकारे रक्षणच करतील. तसा विचार करीत असतांना त्याला नेमकं कशाचं पीक घ्यावं. हे कळत नव्हतं. अशातच त्याला आठवलं शेतात आपण मसाल्याचं झाड लावायचं. रबराचं झाड लावायचं. औषधी वनस्पतींची झाडं लावावीत. छी त्याच्या लक्षातच होती.
पुढं पावसाळा होता. आता उन्हाळा सुरु होता. तसा तो शहरात गेला. ज्या शहरात तो यापुर्वी राहिला होता. त्या शहरात कुठं काय काय मिळतं. हे त्याला माहित होतं.
ते शहर......त्याला आठवत होतं ते शहर. ज्या शहरात त्यानं एकेकाळी जम बसवला होता. त्यानं त्याच शहरात प्रगती केली होती आणि त्याच शहरात त्याला अधोगतीही अनुभवयास आली होती. त्याच शहरात त्याची नोकरीही गेली होती. ज्याचा खटला सुरु झाला होता व त्याचा निकालही लवकरच लागून खटला समाप्त झाला होता. ज्यात तो पुरावे त्याच्याविरोधात असल्यानं त्याचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यानं आशाच सोडून देवून शेती करणं पसंत केलं होतं. जेव्हा त्याची नोकरी गेली होती आणि शहरातील मातीत त्याला कामधंद्यात नुकसान झालं होतं. तेव्हा त्यानं पहिल्यांदा आपल्या पत्नीला गावाकडे जावू. असं जेव्हा म्हटलं. तेव्हा त्याच्या पत्नीच्या मनाला आठ्या पडल्या होत्या.
आज पाच वर्ष झाली होती. गावाकडे त्याचेसोबत आलेली त्याची पत्नी आजही खुश नव्हती. ती सारखी त्याचेशी भांडत असे. नोकरीवरुन सतत वाद होत असे. ती नेहमी म्हणत असे की काय गरज होती भ्रष्टाचार करायची. नोकरीवर मिळणारं वेतन कमी होतं काय? त्यावर त्याचं उत्तर असायचं की जे काही केलं. ते त्यानं परीवारासाठीच केलं होतं. त्याचा आपल्या स्वतःचा असा स्वार्थ नव्हताच.
ते वारंवार त्याच्या पत्नीचं टोमणे मारणं. विरंवार ती नोकरीचीच गोष्ट काढणं. आता रामदासला सहन होत नव्हतं. त्यातच त्याची पत्नी नित्यनेमानं त्याच्यापासून फारकत घेण्याच्याच गोष्टी करीत असे. त्यानंतर त्याला भयंकर तिचा राग येत असे व त्या प्रकरणाची चीडही येत असे. परंतु भांडण करुन उपयोग नाही, आपल्यालाही परीवार आहे, असा विचार करुन तो स्वतःच त्यानंतर आपल्या बोलण्यातून माघार घेवून तो आपल्या पत्नीला समजावीत असे व घरचं वातावरण शांत करीत असे. त्यानं आपल्या पत्नीला असं बरेचवेळेस समजावलं होतं व त्याची पत्नी बरेचवेळेस शांत झाली होती. मात्र वाद नेहमीच होत व त्याच्या घरातील वातावरण नेहमीच नरम गरम राहात असे.
रामदास त्याच शहरात गेला होता. ज्या शहरातून त्याला ठेच लागली होती. तसा तो त्या शहरात जाताच त्यानं विना पावसानं जगणाऱ्या व डोंगरावरही भर उन्हाळ्यात तग धरुन उभं राहणाऱ्या वनस्पतीचं नाव शोधलं. त्यानंतर त्या वनस्पतीची बीजं घेतली व तो गावाकडे परत आला. त्यानंतर तो पावसाळ्याची वाट पाहू लागला. कारण पावसाळा येताच तो शेतात त्या वनस्पतीची लागवड करणार होता. जी लागवड करताच त्याच्या शेतात वर्षभर टिकणारं व पैसा देणारं पीक उभं राहणार होतं. ज्या झाडाला रानपक्षी, रानप्राणी व माणसंही नष्ट करु शकणार नव्हते.
पावसाळा सुरु झाला होता. अशातच त्या पावसानं जमीन ओलीचिंब झाली होती. पीक लागवण क्षमता शेतात निर्माण झाली होती. ज्यात बिया लावताच त्याची उगवण होणार होती. तसं पाहिल्यास रामदासनं आधीच पिकांसाठी जमीन तयार करुन ठेवली होती.
पावसाळा लागला होता व पावसाळ्यात त्यानं आपल्या तयार केलेल्या शेतात शहरातून आणलेल्या बिया लावल्या. त्यानंतर त्या बियांची रोपं बनली. त्यानं ती रोपं जगवली. आज ती रोपं मोठी झाली होती.
रामदासनं लावलेली रोपं मोठी झाली होती. त्या रोपांचं रुपांतरण आज झाडात झालं होतं. ते टिकणारं झाड होतं. ज्याची कल्पना रानपक्षी व माकडांना तसेच रानातील प्राण्यांना नव्हती. माणसांना तर नव्हतीच. निघालेला माल रामदास खळ्यात गोळा करीत असे. त्यानं पीक गोळा करायला एक खळं बनवलं होतं. जे बाभळीच्या झाडाच्या लगतच होतं. त्याच खळ्यात बाभळीच्या सावलीत रामदास बसायचा. कधी विश्रामही करायचा. कधी त्याच झाडाच्या सावलीत विश्राम करीत असतांना त्याला हायसं वाटायचं. कधी स्वप्नही पाहायचा तो.