प्रकरण १३
रात्री दोन वाजता पाणिनीला फोन च्या आवाजाने जाग आली. फोन वर सौंम्या होती.
“ अत्ता माझ्या दारात पोलीस आले होते,सर. आणि मला उद्या कोर्टात ‘ती’ डायरी घेऊन हजर राहायचा समन्स बजावला गेलाय.न्या.कोलवणकर यांच्या कोर्टात. मला खूप टेन्शन आलंय.मी काय करू? ”
“ आता दिवे बंद कर आणि मस्त पैकी झोपून जा.” पाणिनी म्हणाला.
“ अहो सर, किती सहज घेताय तुम्ही! मला खरंच झोप येणार नाही अत्ता. कर्णिक ने नक्कीच खांडेकराना सगळ सांगितलंय.”
“ काळजी करू नको. झोप निवांत.”
पाणिनी पुन्हा आडवा झाला. अर्ध्या तासाने त्याच्या दाराची बेल वाजली. दारात पोलीस ऑफिसर उभा होता.त्यालाही समन्स बजावला गेला. त्याने तो सही करून घेतला.उद्या कोर्ट सुरु होण्यापूर्वी काय करायचं याचा विचार त्याच्या मनात पक्का होता. तो कोणतेही टेन्शन न घेता आरामात झोपला.
दुसऱ्या दिवशी कोर्ट चालू झालं आणि खांडेकरांनी सौंम्या सोहोनी,पाणिनी पटवर्धन ची सेक्रेटरी हिला सरकार पक्षाची साक्षीदार म्हणून बोलवावे अशी कोर्टाला विनंती केली.
“ अशी परवानगी नाही देता येणार.ज्या प्रमाणे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद, किंवा वकील आणि त्याचा क्लायंट यांच्यातील संवाद यांची गोपनीयता जपायची असते तशीच वकील आणि त्याची सेक्रेटरी यांच्यातील संवादाचीही.” न्या.कोलवणकर म्हणाले.
“ त्यांच्यातील संवाद बद्दल मला काही विचारायचं नाहीये, मी चोरीचा माल परत मिळवण्याचा प्रयत्न करतोय.” खांडेकर म्हणाले.
“ चोरीचा माल ! ” न्यायाधीश उद्गारले.
“ हो युअर ऑनर.” खांडेकर म्हणाले. “ आम्हाला दाखवायचंय की बंब यांच्या घरातून एक वस्तू चोरली गेली होती आणि ती पटवर्धन यांची सेक्रेटरी सौंम्या,हिच्याकडे दिली गेली. आम्ही सौंम्या सोहोनी आणि पाणिनी पटवर्धन दोघांवर समन्स बजावलं आहे. ”
“ अरे ! हे फारच अघटित असं आहे.”-न्यायाधीश
“ नक्कीच युअर ऑनर!” खांडेकर म्हणाले. “ माझ्याकडे मोठ्या न्यायालयाचे निवाडे आहेत ते सांगतात की वकील आणि त्याचा क्लायंट यांच्यातील संवाद यांची गोपनीयता जपण्याचा मुद्दा हा क्लायंटने वकिलांचा जो सल्ला घेतलेला असतो त्या संदर्भातील संवादापुरताच मर्यादित असतो.वकिलाने जर एखादं बेकायदेशीर कृत्य केलं असेल, उदा.पुरावा लपवणं, चोरीची वस्तू स्वत:कडे ठेवणं, तर अशा पासून त्या वकीलाला सुटका मिळत नाही.”
“ ठीक आहे चालू करा.” न्या.कोलवणकर म्हणाले. “ तुमचे प्रश्न या एकाच विषयाचे संदर्भात असतील आणि मिस सोहोनी यांची उलट तपासणी घेण्याचा अधिकार वकिलांना असेल.”
सौंम्या सोहोनीला पिंजऱ्यात उभं करून शपथ दिली गेली.
“ मिस सोहोनी, तुम्ही पाणिनी पटवर्धन यांच्याकडे त्यांची खाजगी सेक्रेटरी म्हणून कामाला आहात?”-खांडेकर
“ हो.”
“ प्रज्ञा पांडव यांचा आणि तुमचा परिचय आहे?”
“ आमची भेट झाल्ये.”-सौंम्या.
“ या महिन्याच्या ६ तारखेच्या मंगळवारी संध्याकाळी तुम्ही त्यांना भेटला होता का?”-खांडेकर.
“ हो.”-सौंम्या
“ त्यावेळी तुमच्या बरोबर कोण होतं?”
“ पाणिनी पटवर्धन.”
“ तुमचं आणि प्रज्ञा पांडव यांचं बोलणं झालं?”
“ हो.”
“ तुमच्या माहिती नुसार या प्रज्ञा पांडव, पटवर्धन यांच्या अशील आहेत?”
“ माझ्या माहिती नुसार नाहीत.”
“ मिस पांडव यांचे विनंती नुसार नाही तर स्वत:हूनच पाणिनी पटवर्धन त्यांच्याकडे काही माहिती घेण्यासाठी गेले होते?” –खांडेकर
“ हो.”-सौंम्या.
“ तर मग आता मला सांगा, मिस सौंम्या,की प्रज्ञा पांडवने तुम्हाला हे सांगितलं की नाही, की या महिन्याच्या पाच तारखेच्या सोमवारी डॉ.बंब यांच्या घरातून तिने एक डायरी चोरली होती? मिस सोहोनी, फक्त हो किंवा नाही या स्वरुपात उत्तरं द्या. ”-खांडेकर म्हणाले.
सौंम्या काही बोलणार तेवढ्यात पाणिनी उठला आणि म्हणाला,
“ ऑब्जेक्शन! गोपानीयतेच्या मुद्यावरून.”
“ मी सांगतो, युअर ऑनर, पटवर्धन यांचा क्लायंट आहे, आरोपी निनाद धुरी.धुरीसाठी माहिती गोळा करायला पटवर्धन प्रज्ञा कडे गेला होता.प्रज्ञा पांडव ही पटवर्धन यांची क्लायंट नाही. त्यामुळे तिने पटवर्धन यांना काही माहिती दिली असेल तर ती सांगणे हा गोपनीयतेचा भंग होतं नाही. ९ तारखेच्या रात्री नेमकं काय घडलं ते दाखवण्याचा आमचा मानस आहे. आम्ही सिद्ध करू शकतो की आरोपी प्रज्ञा पांडव ला खुनाच्या ठिकाणी घेऊन गेला. ती परत येई पर्यंत तो वाट बघत थांबला.त्यानंतर घाई घाईत त्याने तिला हायवे वरच्या हॉटेलात नेलं, तिथे त्यांनी नवरा बायको म्हणून बुकिंग केलं. प्रज्ञाचे हाताचे ठसे त्याच्या गाडीत कसे आले ते सिद्ध करण्यासाठी त्याने एक कथा रचली, ज्या नुसार हातात पेट्रोलचा कॅन घेऊन जाणारी एक असहाय्य तरुणी त्याला दिसली आणि त्याने तिला लिफ्ट दिली आणि हॉटेलात सोडलं. आपल्या या बतावणीला पूरक गोष्ट म्हणून त्याने एक पेट्रोलचा कॅन सुद्धा हजर केला.आम्ही हे सिद्ध करू शकतो की हा कॅन म्हणजे खोटा पुरावा आहे आणि त्यावर पाणिनी पटवर्धन यांच्या हाताचे ठसे आहेत.”
न्यायाधीशांनी पाणिनीकडे पाहून विचारलं, “ तुमचं म्हणणं काय आहे पटवर्धन?”
“ पेट्रोल कॅन च्या रुपात मी खोटा पुरावा पेरल्याचा आरोप आहे का माझ्यावर?”
“ होय.आणि जेव्हा मी बार असोशिएशन कडे तक्रार करीन तेव्हा तुमच्यावर रीतसर आरोप ठेवला जाईल.” खांडेकर गुरगुरले.
“ केवळ त्या कॅन वर माझ्या हाताचे ठसे आहेत म्हणून?” पाणिनीनं विचारलं.
“ मी काय बोलतोय तुम्हाल व्यवस्थित समजलंय पटवर्धन.” –खांडेकर
“ तुम्ही स्वत: तो कॅन तपासलाय नीट? ” पाणिनीनं विचारलं.
“ अगदी व्यवस्थित. तो कॅन माझ्याच ताब्यात आहे सध्या.”
“ तर मग तुमचेही ठसे आहेत त्यावर.मी पण तुमच्या विरुद्ध बार असोशिएशन कडे तक्रार करीन ” पाणिनी म्हणाला.
खांडेकरांचा चेहेरा रागाने लालबुंद झाला. न्यायाधीश कोलवणकर हसले.
“ खरं तर कॅन चा विषय अत्ता येणे अपेक्षितच नव्हतं” न्यायाधीश म्हणाले. “प्रज्ञा पांडवने चोरलेल्या वस्तूचा विषय चालू होता. मिस्टर पटवर्धन, तुम्ही त्यावेळी किंवा अत्ता, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे प्रज्ञा पांडव चे वकील म्हणून प्रतिनिधित्व करताय असं तुमचं म्हणणं आहे का? ”
“ नाही ” पाणिनी म्हणाला.
“ तर मग तुमचा आक्षेप चुकीचा आहे पटवर्धन.” न्यायाधीच म्हणाले आणि खांडेकरांचा चेहेरा उजळला.
“ आणखी एका गोष्टीवर माझी हरकत आहे की हा प्रश्न वादग्रस्त आहे.साक्षीदाराच्या अंदाजावर अवलंबून आहे, माहितीवर नाही. आणि ऐकीव गोष्टीवर अवलंबून आहे.” पाणिनी म्हणाला.
“ मला तो प्रश्न पुन्हा वाचून दाखवा.” न्यायाधीश क्लार्क ला म्हणाले.
कोर्टाच्या क्लार्क ने पुन्हा प्रश्न वाचला: “ तर मग आता मला सांगा, मिस सौंम्या,की प्रज्ञा पांडवने तुम्हाला हे सांगितलं की नाही, की या महिन्याच्या पाच तारखेच्या सोमवारी डॉ.बंब यांच्या घरातून तिने एक डायरी चोरली होती? मिस सोहोनी, फक्त हो किंवा नाही या स्वरुपात उत्तरं द्या. ”
न्यायाधीशांनी विचार केला, आणि म्हणाले, “ ज्या पद्धतीने प्रश्नाची रचना केली आहे, त्यावरून पटवर्धन यांची हरकत मान्य करतो मी.”
“ प्रज्ञा पांडवने त्या रात्री तुम्हाला एक डायरी दिली की नाही? तुम्ही हो किंवा नाही असं उत्तरं देऊ शकता.” खांडेकर म्हणाले.
“ जो पर्यंत सरकारी वकील या डायरीचा या खटल्याशी संबंध आहे हे सिद्ध करत नाहीत तोवर हा प्रश्नच गैरलागू आहे.मागच्या मंगळवारी रात्री सौंम्या सोहोनीने अनेक जणांकडून अनेक गोष्टी घेतल्या असतील. त्या सगळ्या या केस शी संबंधित असू शकतात का? नाही. त्यामुळे माझा आक्षेप आहे या प्रश्नाला.” पाणिनी म्हणाला.
“ मान्य.” न्यायाधीश म्हणाले.
“ ओह युअर ऑनर, आता बचाव पक्ष कायद्यामधील प्रत्येक तांत्रिक बाबींचा फायदा ......” खांडेकर म्हणाले.
“ कोर्टाने निर्णय दिलाय खांडेकर.आक्षेप जरी तांत्रिक असला तरी योग्य आहे.” कोलवणकर म्हणाले.
“ प्रज्ञा पांडवने त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं, मिस सोहोनी, की ही डायरी तिने डॉ.बंब यांच्या कडून चोरून आणल्ये म्हणून?” –खांडेकर.
“ ऑब्जेक्शन !” पाणिनी म्हणाला. “ ऐकीव माहिती होईल ही.”
“ मान्य.” न्यायाधीश हसून म्हणाले. खांडेकरांचा पार आता चढला.ते जरा गुश्श्यातच म्हणाले,
“ मी एक जबाबदार सरकारी अधिकारी म्हणून सांगतोय, ही डायरी मी कोर्टात सादर करू इच्छितो. केस मधे ही फार म्हणजे फार महत्वाची आहे. पाणिनी पटवर्धन कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ती कोर्टापुढे आणायचं टाळताहेत, कारण त्यांना ती अडचणीत आणणारी गोष्ट ठरणार आहे.”
“ कोर्टात आवाज वाढवून बोलू नका.” न्यायाधीश म्हणाले. “ शांतपणे पुढचे प्रश्न विचारा.”
खांडेकर शांत झाले नव्हते. ते सौंम्याकडे वळून जोरात म्हणाले,
“ तुम्ही ती डायरी अत्ता इथे हजर करा.”
“ कुठली डायरी?” सौंम्याने विचारलं.
“ जी मंगळवारी रात्री तुम्हाला प्रज्ञाने दिली ती.”
“ पुराव्यात नसलेल्या गोष्टीची मागणी परस्पर साक्षीदाराकडे केली जात्ये.” पाणिनी म्हणाला. “ मी मगाशी म्हंटल्याप्रमाणे त्या डायरीचा या खटल्याशी संबंध आहे हे सिद्ध करत नाहीत तोवर हा प्रश्नच गैरलागू आहे ”
“ मी कोर्टाला खात्री दिल्ये, जबाबदार अधिकारी म्हणून की ही डायरी महत्वाची आहे.” खांडेकर गुरगुरले.
न्यायाधीश काही बोलणार तेवढ्यात पाणिनी म्हणाला, “ तुमच्या खात्री देण्याला कायद्याने काहीही अर्थ नाही.तुम्हाला त्या डायरीचा खटल्याशी संबंध आहे असं सिद्ध करायचं असेल तर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जा आणि साक्षीदार म्हणून शपथ घ्या.मग मी तुमची उलट तपासणी घेईन आणि सिद्ध करेन की तुम्हाला जी माहिती आहे ती फक्त ऐकीव माहिती आहे. ” पाणिनी म्हणाला.
खांडेकरांचा आता मात्र नाईलाज झाला.जे जळफळले.शेवटचे अस्त्र म्हणून त्यांनी सौंम्या सोहोनी कडे आपले बोट नाचवत जोरात विचारलं, “ जी डायरी तुम्हाला मंगळवारी रात्री प्रज्ञा पांडव कडून मिळाली तिचा संबंध डॉ.बंब यांच्या खुनाशी आणि त्या संबंधित पुराव्याशी होता हे मानण्याजोगे कारण तुझ्याकडे होतं की नाही? ”
“ ऐकीव माहिती आणि साक्षीदाराच्या अंदाजावर उत्तर अवलंबून आहे या प्रश्नाचं. माझी हरकत आहे याला.” पाणिनी म्हणाला.
“ मी मान्य करणार आहे पटवर्धनयांचा आक्षेप.” न्या कोलवणकर म्हणाले. “ तुम्ही चुकीच्या पद्धतीने जाताय मिस्टर खांडेकर. मुळात सोहोनी मॅडम कडे तथाकथित चोरीची डायरी आली असेल हे तुम्हाला दाखवायचं असेल तर मुळात ती चोरलेली होती हे सिद्ध करावं लागेल. ”
“ मी माझ्याच पद्धतीने आणि शेवट पर्यंत लढेन!” खांडेकर म्हणाले.
“ हा साक्षीदार जो पर्यंत स्वत:च्या ज्ञानानुसार किंवा माहितीच्या आधारे ही डायरी चोरीची होती हे सांगू शकत नाही तो पर्यंत तुम्ही ते सिद्ध करू शकत नाही. उगाच तेच तेच प्रश्न विचारू नका आणि आदळ आपट करू नका.” न्यायाधीश म्हणाले.
आता मात्र खांडेकर पूर्ण पराभूत झाल्या सारखे खाली बसले.
पाणिनी आपल्या जवळ बसलेल्या मिसेस लीना धुरीला म्हणाला,
“ तुम्ही जरा तुमच्या नवऱ्या जवळ बसा प्लीज. ”
लीना त्याला काहीतरी विचारणार तेवढ्यात प्रज्ञा पांडवने पिंजऱ्यात येऊन शपथ घ्यायला सुरुवात केली होती.
“ या महिन्याच्या ५ तारखेला सोमवारी तुम्ही डॉ बंब यांच्या घरी गेला होता?” खांडेकरांनी विचारलं.
“ हो सर.”
“ कोण बरोबर?”
“ निनाद धुरी हे मला घेऊन गेले, म्हणजे ते बाहेरच गाडीत थांबले, मी बंब यांच्या घरी गेले.” प्रज्ञाने उत्तर दिलं.
“ तू बंब यांच्या घरातील त्यांची कोणती वस्तू, त्यांच्या परवानगी शिवाय घेतलीस का?”
“ अवाजवी आणि खटल्याशी संबंध नसलेला प्रश्न.” पाणिनीने आक्षेप घेतला.
“ मला वाटत खांडेकर तुम्ही संबंध जोडून दाखवला पाहिजे.” न्यायाधीश म्हणाले.
“ ठीक आहे ” खांडेकर म्हणाले. “ मला सांगा प्रज्ञा, तुम्ही तिथे असताना तुम्हाला डॉक्टर बंब यांच्या क्लिनिक मधे जायचा प्रसंग आला होता?”
“ हो.”
“ काय होता प्रसंग?”-खांडेकर.
“ मी आत मधून मारामारीचा आवाज ऐकला.धक्का बुक्की किंवा तत्सम...” हे बोलत असताना प्रज्ञाने अचानक आरोपी निनाद धुरीच्या शेजारी बसलेल्या त्याच्या पत्नीला लीनाला पाहिलं.अचानक तिचे डोळे वटारले गेले.तिने आपली तर्जनी लीनाच्या दिशेने नेली आणि एकदम म्हणाली,
“ अरे ! हीच... हीच ती बाई ! ”
“ ही काय भानगड आहे? काय चाललंय हे? ” न्यायाधीशांनी विचारलं.
“ याच बाईने बंब चा खून केलाय !”-प्रज्ञा किंचाळली.
“ एक मिनिट, प्लीज, काहीतरी अचानकच वेगळीच कलाटणी मिळाल्ये.मला जरा हे स्पष्ट करून घेऊ दे प्लीज.” खांडेकर म्हणाले. “ मला सांग प्रज्ञा, ही इथे आरोपीच्या जवळ जी स्त्री बसल्ये तिला तू पाहिलंस तिथे? ”
“ हो हीच ती बाई होती, तिला मी डॉ.बंब यांच्या जवळ ओणवी झालेली पाहिलं.” प्रज्ञा किंचाळून म्हणाली.
“ एकंदरित स्थिती पाहता मी हिला तात्पुरत्या काळासाठी थांबवतो.मला परवानागी असावी. मला तिच्याशी आधी बोलावं लागेल नंतर तिची साक्ष पुढे चालू करू.” खांडेकर कोर्टाला म्हणाले.
“ माझी उलट तपासणी झाल्याशिवाय नाही.” पाणिनी म्हणाला.
“ हिची मानसिकता ठीक नाहीये.” – खांडेकर
“ सरकार पक्षाचा स्वत:चा साक्षीदारच म्हणतोय की आरोपी बाहेर होता आणि दुसऱ्याच कोणीतरी खून केलाय.” पाणिनी म्हणाला.
“ दोघांनी संगनमत करून गुन्हा केला असू शकतो.” न्यायाधीश म्हणाले. “ खांडेकर तुम्हाला असंच वाटतंय?”
“ मोकळेपणाने सांगायचं तर आम्हाला माहित नाही.”
“ तुम्हालाच माहित नसेल तर कोर्टाला माहित असेल अशी अपेक्षा ठेऊ नका.आरोपी आणि ही बाई यांच्यात संगनमत झाल्याचं तुम्हाला सिद्ध करता येत नसेल तर आरोपीला शिक्षा करा अशी विनंती कोर्टाला करायचा हक्क तुम्हाला नाही.तुमच्याच साक्षीदाराने शपथ घेऊन सांगितलंय की मिसेस धुरीने खून केलाय.” न्यायाधीश म्हणाले.
“ आणि हे ही कबूल केलंय की त्यावेळी आरोपी बाहेर गाडीत बसला होता प्रज्ञाची वाट बघत.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही या बाईला कुठे बघितलत नेमकं?” न्यायाधीशांनीच प्रज्ञाला विचारलं.
“ मी डॉ.बंब यांच्या क्लिनिक ला गेले.मी वेटिंग रूम मधे बसले होते.आतल्या बाजूने मला मारामारीचा आणि धडपडल्याचा आवाज आला.नंतर एका बाईचा किंचाळण्याचा आवाज आला.मी काय झालं ते पाहायला आत गेले तर डॉक्टर मला जमिनीवर पडलेले दिसले.आणि ही स्त्री त्यांच्यावर वाकलेली होती.”
“ तिने तुला पाहिलं?”
“ मला नाही वाटत, तिने पाहिलं असाव. तिजोरीच दार उघडं होतं आणि आतली कागदपत्र इतस्तत: पडली होती.ती मागच्या दाराच्या दिशेने पळाली.मी त्या खोलीत आले डॉक्टर बंब यांचेकडे वाकून पाहिलं ते अजून जिवंत असल्याचं लक्षात आलं.त्यांच्या टेबलामधे ठेवलेलं एक डायरी वजा रजिस्टर मला हवं होतं, ते मी घेतलं आणि पळत बाहेर आले.बाहेर गाडीत धुरी माझी वाट पहात होते.मी त्यांना आत काय घडलंय ते सांगितलं, त्यांनी वेगाने गाडी बाहेर काढली आणि मला हॉटेलात नेलं.” प्रज्ञा म्हणाली.
“ मिस्टर खांडेकर, आरोपी आणि मिसेस धुरी यांच्यात संगनमत होतं असं तुम्ही जोवर सिद्ध करत नाही तोवर आरोपी निनाद धुरी हा गुन्हेगार नाही असाच अर्थ निघतो. आता त्याची बायको दोषी आहे का हा मुद्दा वेगळा. तिच्यावर कोणताच आरोप लावण्यात आलेला नाहीये.” न्यायाधीश म्हणाले.
“ मला या साक्षीदाराला एक प्रश्न विचारूदे,” खांडेकर म्हणाले, “ प्रज्ञा ते रजिस्टर किंवा डायरी घेतल्यावर तू त्याचं पुढे काय केलंस.”
“ ऑब्जेक्शन! ” पाणिनी म्हणाला. “ याच साक्षीदाराच्या साक्षीनुसार आरोपी निनाद धुरी हा निर्दोष आहे हे सिद्ध होतंय त्यामुळे या साक्षीदाराने कुठली वस्तू चोरलेली असो किंवा नसो, काय फरक पडतो आरोपी वर?” पाणिनीनं विचारलं.
“ आरोपीवर परिणाम काय होतो या पेक्षा अशी चोरीची वस्तू पटवर्धन किंवा त्यांच्या सेक्रेटरीकडे देण्यात आलेली असताना सुद्धा त्यांनी ती कायद्यापासून लपवली हे महत्वाचं नाही का?” खांडेकर म्हणाले.
“ मला वाटत, पटवर्धन यांना त्याचं म्हणणं सांगायची संधी मिळाली पाहिजे.” न्या.कोलवणकर म्हणाले.
“ काय सिद्ध होणारे त्यातून?” पाणिनीनं विचारलं. “ एक तर हा खटला माझ्या विरुद्ध नाही तर निनाद धुरी विरुद्ध चालू आहे. तो आरोपी आहे.आणि सरकार पक्षाचाच साक्षीदार शपथेवर सांगतोय की आरोपी बाहेर होता खून झाला तेव्हा.ज्यावेळी प्रज्ञा पांडव ने ती डायरी आपल्या ताब्यात घेतली त्याच्या आधीच मिसेस धुरी तिथून बाहेर पडली होती.प्रज्ञाच तिच्या साक्षीत हे सांगते आहे. मिसेस धुरी तिथून निघून गेल्या नंतर प्रज्ञाने तिथून काय घेतलं, काय ठेवलं, आणि काय केलं याची जबंबदारी मिसेस धुरीवर येत नाही. ”
“ मी मिसेस धुरीची जबंबदारी निश्चित करू इच्छित नाहीये, तुमची, जबाबदारी काय आहे ते निश्चित करतोय,पटवर्धन, चोरीची वस्तू बाळगल्याबद्दल .” खांडेकर ओरडले.
“ व्हा पुढे आणि अटक करून दाखवा मला.” पाणिनीने आव्हान दिलं.
“ जरा थांबा दोघेही.” न्या.कोलवणकर म्हणाले. “ दोन स्वतंत्र प्रकरणांचा एकत्रित विचार करू नका खांडेकर. मुळात हा खटला सरकार विरुद्ध निनाद धुरी असा आहे. तुम्ही प्रज्ञा च्या साक्षी नंतर आरोपी निनाद धुरी चं काय करायचं ठरवलंय?”
“ मी.. मी.. खटला काढून... थांबा थांबा, मी उन्मनला पुन्हा बोलावू इच्छितो साक्षीसाठी. उन्मन म्हणजे ज्याने डॉ.बंब यांचं मृत्यू शय्येवरचं शेवटचं बोलणं ऐकलं, तो. माणूस शेवटची घटका मोजत असताना खोटं बोलत नाही असं अध्यात्म मानते आणि कायदा सुद्धा तेच सांगतो.त्यामुळे डॉक्टर बंब यांनी जे नाव घेतलं असेल तो खुनी आहे. ” खांडेकर म्हणाले.
“ सकृत दर्शनी पटवर्धन यांची हरकत दिसत नाहीये. बोलवा त्यांना.” न्यायाधीश म्हणाले.
“ मागच्या साक्षीत तू असं सांगितलं होतंस, उन्मन, की तू साक्षीदारांच्या उपस्थितीत डॉक्टरांना त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव माहित आहे का असा प्रश्न विचारलास तेव्हा डॉक्टर हो म्हणाले होते आणि त्यांनी त्या व्यक्तीचं नाव उच्चारलं होतं. बरोबर ना?” खांडेकरांनी उन्मन हजर होताच पहिला प्रश्न केला.
“ नंतर ज्या घटना घडल्या आहेत त्यावरून मला असं वाटत की तुझ्या कडून आणखी एक मुद्दा स्पष्ट व्हायला हवा, तो असा की निनाद धुरी आणि लीना धुरी याचा उच्चार खूपच मिळता जुळता आहे त्यामुळे तुझ्या मनात गोंधळ निर्माण झालेला असू शकतो? म्हणजे डॉक्टरांनी घेतलेलं नाव हे निनाद नसून लीना असू शकतं?” –खांडेकर.
“ हा प्रश्न जरा आक्रमक आणि सूचक आहे.म्हणजे वकिलांना काय अपेक्षित आहे याची हिंट साक्षीदाराला मिळावी या हेतूने विचारला गेला आहे.” पाणिनीने आपली हरकत नोंदवली.
“ सस्टेंड”
“ ठीक, मी बदलून विचारतो प्रश्न, ” खांडेकर म्हणाले. “ उन्मन, तू म्हणालास की मरणासन्न अवस्थेत डॉ.बंब यांनी हल्लेखोर कोण होता या बाबत सांगितलं?”
“ हो सर.” उन्मन म्हणाला.
“ त्यांनी जे सांगितलं ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे सिद्ध करता येईल?”
“ हो सर. मी त्याचं टेप रेकॉर्डरवर रेकॉर्डिंग केलंय.”
“ मला देतोस ती टेप?” खांडेकरांनी विचारलं.
“ माझ्याकडे अत्ता नाहीये.म्हणजे कोर्टात आणली नाहीये. ”
“ ती इथे कोर्टात ऐकवता आली तर नेमकं काय उच्चारलं डॉ.बंब यांनी ते स्पष्ट होईल? ”-खांडेकर
“ नक्कीच.”-उन्मन.
“ तर मग हा टेप रेकॉर्डर आणि ती टेप मला पुरावा म्हणून सादर करून घ्यायचे आहेत.”
न्यायाधीशांनी पाणिनी पटवर्धन कडे पाहिलं.
“ त्यापूर्वी मला एक दोन प्रश्न या संदर्भात विचारायचे आहेत.” पाणिनी म्हणाला.
न्यायाधीशांनी परवानगी दिली आणि पाणिनी उभा राहिला.
“ डॉक्टरांचं बोलणं रेकॉर्ड केल्याचं तू आम्हाला आधीच्या साक्षीत का सांगितलं नाहीस?” पाणिनीनं विचारलं.
“ मला विचारलं गेलं नाही.”
“ जाणून बुजून तू ते सांगायचं टाळलंस?”
“ मला विचारलं तर सांगू असा विचार मी केला.”-उन्मन.
“ हा प्रश्न विचारला गेला नाही तर टेप रेकॉर्डर बद्दल काही बोलायचं नाही अशी सूचना तुला कोणी दिली होती?”
“ ओह युअर ऑनर! ....पुन्हा..” खांडेकर हरकत घ्यायला उठले पण न्यायाधीशांनी त्यांना हातानेच खूण करून खाली बसवलं.
“ उत्तर द्या.” ते साक्षीदाराला म्हणाले.
“ अॅडव्होकेट खांडेकर यांनी.” साक्षीदार म्हणाला आणि पाणिनी हसला.न्यायाधीशांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
“ येऊ दे तो टेप रेकॉर्डर पुरावा म्हणून. डॉक्टर काय बोललेत ते ऐकायला आवडेल मला.” पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे, कोर्ट तीस मिनिटांची सुट्टी जाहीर करत आहे. त्या मुदतीत इथे पुरावा हजर करावा. पण या सगळ्या प्रकारात माझं निरीक्षण असं आहे की सरकार पक्षाचा स्वत:चाच पुरावा आरोपीचं निर्दोषत्व सिद्ध करणार आहे.” न्या.कोलवणकर खुर्चीतून उठले आणि आपल्या चेंबर मधे गेले.
ते आत जाताच निनाद धुरीने आपल्या बायकोला विचारलं, “ लीना, खरंच तू डॉ.बंब यांच्या आतल्या खोलीत होतीस, जेव्हा प्रज्ञा तिथे आली होती?”
“ हो.” अस्फुट आवाजात ती म्हणाली.
“ मिस्टर पटवर्धन, तुमच्याकडे जर ती डायरी असेल आणि त्यांनी ती मिळवली, तर ते कियान पर्यंत पोचतील आणि तो आमचा बेकायदा दत्तक पुत्र आहे हे त्याला कळेल आणि जगजाहीर होईल. समाजात..” धुरी म्हणाला.
“ गप्प बसा, दोघेही.आजू बाजूचे लोक ऐकताहेत.खांडेकरांचे ही लक्ष आहे. माझ्यावर सोडा तुम्ही सर्व. मी ठोस अशी काहीतरी आखणी केल्ये.मला वाटतंय काय झालं असावं ते मला समजलंय.एकदा ते रेकोर्डिंग ऐकू दे मला.” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण १३ समाप्त.)