सकाळ झाली होती… पण ती साधी सकाळ नव्हती. पावसाची एकसुरी सरसर चाललेली सळसळ, ओल्या मातीचा उग्र वास आणि वाऱ्याच्या झोताने वाड्याच्या भिंती चिवटपणे चरकावत होत्या. त्या जुन्या, विस्मरणात गेलेल्या वाड्याच्या तहखान्यात एक अनामिक जडपणा भरलेला होता. जणू तिथं हवाच थांबून बसली होती, काळाची नोंद घेत.
त्याच तहखान्याच्या मध्यभागी एका फाटलेल्या, काळसर टेबलासमोर रुद्र शांतपणे बसलेला होता. डोळे मिटलेले नव्हते, पण हालचाल नव्हती. त्याच्या समोर नकाशा होता . एखाद्या युद्धाच्या पूर्वसंध्येसारखा.
त्याच्या डोळ्यांत विचारांची धग होती. रम्या आणि राकेश अटकेत होते, पण त्याच्या डोक्यात ती 'अटक' म्हणजे शेवट नव्हे, तो होता सुरुवातीचा नाद.
तो नकाशा रेखाटलेला नव्हता, तो कोरला गेलेला वाटत होता . एक एक रेषा म्हणजे योजना नव्हे, ती होती जिद्द.
मीडिया ओरडत होती –
"गुप्त चोरी प्रकरणात पहिला अटक!"
"जिल्ह्यात धक्का. सायबर तज्ज्ञ पकडला!"
पण या तहखान्यात कुठलीही घाई नव्हती.
इथे केवळ थंड, मोजून टाकलेली प्रत्येक चाल तयार होत होती.
रुद्रनं डोळे मिटले.
त्याच्या श्वासात धीर होता.
आणि त्या क्षणी, त्याच्या ओठांवर हलकीशी, पण धारदार पुटपुटी उमटली.
"विजय मिळवणं सोपं आहे... पण शह देणाऱ्या प्रत्येकाला जिंकणं अशक्य करतं".
पोलिसांच्या ताब्यात असलेले दोन संवेदनशील कैदी,सायबर तज्ज्ञ राकेश आणि डेटा विश्लेषक रम्या. दुपारी चारच्या सुमारास कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होते. संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या अटकेचा धसका भरलेला होता. मीडिया सतत ब्रेकिंग न्यूज चालवत होती.
"सायबर चोरी प्रकरणात मोठा खुलासा!"
"जिल्ह्यातून अटक झालेल्या रम्या आणि राकेशचं काय होणार?"
पोलीस व्हॅन भंडाऱ्याच्या बाहेर पडताच, एका सुनसान फाट्यावर दोन बाईक्स अचानक वेगात समोर आल्या. चालक. सार्थक आणि मंट्या, रुद्रच्या टोळीतील शहाणे आणि धाडसी खेळाडू.विशेष पोझिशन घेऊन तयार होते.
"सिग्नल मिळाला. आता की नाही!" – मंट्या कानातील इयरपीसवरून बोलला.
"आता!" – सार्थकने जोरात आरोळी ठोकली.
त्याच क्षणी एक पेट्रोल कॅन भरलेली बाटली व्हॅनच्या पुढच्या टायरवर फेकली गेली आणि जोरदार आवाजात स्फोट झाला. धुराच्या गडद पडद्यामागे पोलीस गोंधळले. संधीची वाट पाहत असलेल्या सार्थकने मागून येताच ड्रायव्हरला एक प्रखर लाईट फेकून चकित केलं, तर मंट्या बाजूच्या गेटवर धावला.
“रम्या! उठ! तू फक्त माझ्या आवाजाकडे ये!” मंट्याचा आवाज ऐकून रम्याच्या डोळ्यांत आशेचा नवा उजेड पसरला.
रम्याला खेचत बाहेर काढण्यात आलं. पण राकेश. तो मागच्या खिळलेल्याच दरवाज्यामागे अडकलेला. त्याचं बुट टेकवलेलं शरीर आतून हलताना दिसत होतं. पण वेळ नव्हती.
“राकेश! अजून वेळ नाही!आम्ही परत येतो!” – सार्थक ओरडला.
पोलिस शुद्धीत येताच गोंधळ माजला....मात्र एका क्षणात, रम्या त्या धुरकटशा गर्दीतून गायब झाला होता. पोलीस त्याच्या मागं धावले, पण फक्त त्याच्या पायाचे अर्धवट ठसे मातीवर राहिले. बाजूला एक कागद उडताना दिसला.कोणीतरी मुद्दाम सोडलेला?
राकेश आत अडकलेलाच होता. पोलिसांनी व्हॅनच्या मागचं गेट उघडलं, तोवर तो धापा टाकत मागे सरकत म्हणाला,
"रम्याला… त्यांनी नेलं. पण हे… हे सगळं आधीच ठरवलेलं होतं!"
एक पोलीस अधिकारी पुढे झाला,
"कोण आहेत हे? कुठं घेऊन गेलेत?"
राकेश थोडा वेळ शांत होता. नंतर त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांत भाव उमटला, आणि तो हळू आवाजात म्हणाला,
"ही फक्त सुरुवात आहे… रुद्र अजूनही खेळ खेळतोय."
आकाशात गडगडणाऱ्या ढगांसारखा त्या क्षणाचा भार वातावरणावर पसरला होता. भंडाऱ्याच्या रस्त्यावर, जिथं धूर विरत होता, तिथं एक मोठा प्रश्न हवेत रेंगाळत राहिला.
"रुद्रचा पुढचा डाव नेमका काय आहे?"
मीडियामध्ये आणि संपूर्ण भंडारा जिल्ह्यात खळबळ माजली होती. रम्याच्या सुटकेनंतर लोकांमध्ये भीतीची लाट उसळली होती. पोलीस यंत्रणेवर राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रचंड दबाव आला होता. या सगळ्या प्रकरणाचा केंद्रबिंदू आता राकेश झाला होता. साखळीचा तो एक महत्त्वाचा दुवा.
पोलीस स्टेशनाच्या तळघरात एका साध्याशा, पण मजबूत लाकडी खुर्चीवर राकेश बसलेला होता. दोन्ही हात खुर्चीच्या हातांवर घट्ट दोऱ्यांनी बांधलेले. चेहऱ्यावर सूक्ष्म हसू, पण डोळ्यांत थेट उद्दामपणा. समोर टेबलावर ठेवलेली फाईल जणू त्याच्या आयुष्याचा आरसा होती. त्याचे सायबर गुन्हे, बनावट ईमेल आयडी, खोट्या सिम कार्डांचे व्यवहार, आणि अन्य साक्षांकित पुरावे.
त्याच्या समोर बसलेली होती डीसीपी विजया राणे. डोळ्यांत एक जागरूक कठोरपणा, पण चेहऱ्यावर नेहमीचं संयमित शांत हसू. ती त्या फाईलमधून एक पान हलकेच उलटून म्हणाली,
विजया राणे म्हणाली, आवाज मृदू पण थेट मनात भिनणारा होता:
“राकेश, तुझ्या डावात अक्कल होती, हे मान्य. पण एक मोठी चूक झाली रे . तुझा घमेंड. तू समजून बसलास की तू सगळं हाताळू शकतोस... पण एक वेळ येते, जिथे खेळ संपतो.”
राकेशने थोडसं मान वळवून, खुर्चीत मागे रेलून उत्तर दिलं,
“तुम्हाला वाटतं मी काही बोलणार? मॅडम, रुद्र बोलत नाही... फक्त खेळतो.”
विजया राणे थोडा वेळ राकेशकडे पाहत राहिली. मग ती उठली, शांतपणे एक मोबाईल त्याच्यासमोर ठेवला आणि वळत म्हणाली, आवाज आता थोडासा गंभीर आणि इशारा देणारा होता:
“ह्या खेळात तुला फासावर जावं लागेल. आणि एक लक्षात ठेव. तू जिंकलास म्हणण्याआधी मी मात करीन. हा मोबाईल ठेवते... कधी गरज वाटली, तर स्वतः फोन कर.”
ती एका विश्वासानं चालत तिथून बाहेर निघून गेली. खोलीत एक भयंकर शांतता पसरली होती. त्या मोबाईलकडे पाहत राकेशच्या डोळ्यांत क्षणभर अस्वस्थतेची झलक चमकून गेली...
श्रीविद्या गोल्ड हाउस – भंडारा जिल्ह्यातील एक छोटंसं, जुनं पण विश्वासार्ह दागिन्यांचं दुकान. दुकानाच्या भिंतीवर अजूनही विसाव्या शतकातील लाकडी फलक झळकत होता – "श्रीविद्या गोल्ड हाउस – १९५२ पासून तुमच्या सेवेत".
रम्याला पोलिसांच्या तावडीतून सोडवल्यानंतर रुद्र आता विजयाला मानसिक आणि व्यावहारिक पातळीवर नामोहरम करण्यासाठी सज्ज झाला होता. त्याने मंट्या, रम्या आणि सार्थकसह एक नवा डाव आखला. कट होता, पुन्हा एका दागिन्याच्या दुकानावर हल्ला, पण अशा दुकानावर, जे पोलिसांच्या सततच्या नजरेत नव्हतं.
श्रीविद्या गोल्ड हाउस ही निवड अचानक वाटली नाही. रुद्रला माहिती होतं की, हे दुकान सुरक्षा यादीत नव्हतं – आणि म्हणूनच पोलिसांच्या संशयाच्या बाहेर होतं. पण विजया राणे वेगळी होती. तिच्या अनुभवाला काही तरी चुकत असल्याची चाहूल लागली होती. तिने तातडीने पोलिस अधिकाऱ्यांची मिटिंग बोलावली – सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले. पण रुद्रच्या जाळ्यात ती आधीच अडकली होती.
रुद्रने कटात एक क्रूर वळण घेतलं. दागिने चोरणं नव्हे, तर पोलिसांना चेतावणी देणं – मानसिक धक्का देणं हेच त्याचं अंतिम उद्दिष्ट होतं. त्या रात्री, श्रीविद्या गोल्ड हाउसच्या मागील बाजूस, वयोवृद्ध सुरक्षारक्षक दत्ता पाटील याचा मृतदेह सापडला.
शहरात खळबळ उडाली. दुकानात काही चोरल नव्हतं, पण माणूस मारला गेला होता.
गर्दीत एक गोंधळलेला आवाज ऐकू आला –
“अहो, काहीच गेलं नाहीय दुकानातून... पण माणूस गेला ना!”
विजया घटनास्थळी पोहोचली. पहिल्याच नजरेत तिला जाणवलं – ही केस वेगळी आहे.
काच तशीच. दरवाजे बंद. अलार्म बंदच नव्हते, तर CCTV पण बंद होता.
कोणताही चोरट्या हालचालींचा पुरावा नव्हता.
पण एक गोष्ट मात्र थरकाप उडवणारी होती.
दुकानाच्या गेटच्या आतल्या भिंतीवर, खिळ्याने कोरलेलं एक वाक्य:
“तुमच्या नीट सुरक्षेचं काय उपयोग,
जेव्हा धडधड चाललेलं हृदयच थांबतं...”
विजया फाईल हातात धरून स्तब्ध झाली.
रुद्रचा हा खेळ आता केवळ चोरीपुरता नव्हता…
तो थेट मनांवर घाव घालू लागला होता.
त्या रात्रीच्या थकव्यानंतरही विजया राणे आपल्या कर्तव्याच्या रेषा ओलांडून वेगळा मार्ग निवडत होती. राकेश हा या कटाचा महत्त्वाचा कडी होता, पण त्याच्याकडून काहीही माहिती मिळवता येत नव्हती. कधी थट्टा, कधी शांतता, आणि कधी उडवाउडवी, राकेश पोलिसांच्या मनात फक्त संभ्रम निर्माण करत होता.
त्यामुळेच विजयाने एक निर्णय घेतला, राकेशच्या कुटुंबाशी संपर्क साधायचा.
तिने एका जुन्या फाईलमधून राकेशच्या आई-वडिलांचा पत्ता शोधला. त्याच पुण्याच्या उपनगरात एक साधं घर होत. संध्याकाळी ती तिथं पोहोचली. पांढऱ्या केसांची एक वृद्ध स्त्रीने दार उघडले, डोळ्यात काळजी आणि अनामिक भीती होती.
"आम्ही पोलीस... पण आज तुमच्या मदतीसाठी आलोय," असं म्हणून विजयाने त्या घरात प्रवेश केला. घर साधंसुधं होत. भिंतीवर राकेशचा एक जुना फोटो – कॉलेजमध्ये मिळालेल्या पुरस्कारासोबत होता.
विजयाने थेट विषयाला हात घातला. "तुमचा मुलगा अजूनही काहीही सांगायला तयार नाही. पण त्याचं आयुष्य अजून वाचू शकतं… जर तुम्ही मदत केलीत तर."
त्या वृद्ध स्त्रीच्या हातात मोबाईल ठेवत, विजया म्हणाली,
"तुम्हाला फक्त एक वेळेस त्याच्याशी बोलायचं आहे.
त्याला सांगायचं – की आता वेळ निघून जातेय.
तो जर आता सांगणार नसेल, तर पुढच्या वळणावर त्याला कुणीही वाचवू शकणार नाही.
तुमचा मुलगा आयुष्यभर तुरुंगात सडू नये, हे तुमच्याच हातात आहे."
आईचा हात थरथरत होता. पण चेहऱ्यावर काहीसं निर्धाराचं सावट आलं होतं.
“माझा राकेश... असं काही करूच शकतो यावर विश्वास नाही बसत… पण जर त्याचं भलं यात असेल, तर मी प्रयत्न करीन.”
विजया त्या घरातून निघाली — तिच्या मनात एक नवा डाव तयार होत होता. पोलिसी डावपेचांना आता माणुसकीची जोड मिळाली होती.
त्या रात्री झालेल्या मृत्यूने शहरात खळबळ माजवली होती. मीडियाने ही घटना हातोहात उचलली, आणि अगदी त्यांच्या खास शैलीत, थोडीशी भीती मिसळून, ती सगळ्या घरांमध्ये पोहोचवली.
"हे फक्त चोरीचं प्रकरण नाही,
हे मानसिक युद्ध आहे...!"
असं म्हणत मुख्य वाहिन्यांवरील अँकर्स कॅमेऱ्यासमोर गंभीर चेहरा करून प्रकरणात भेसूरपणा भरत होते.
प्रत्येक चॅनेलवर एकच चर्चा होती,"कोण आहेत हे टोळीवाले?", "काहीतरी गूढ चाललंय का?", "पोलीस अपयशी ठरतायत का?"
शहरात वातावरण पूर्ण बदललं होतं.
रात्री आठ वाजता आधी भरलेली बाजारपेठ आता रिकामी दिसायला लागली.
चायच्या टपऱ्यांवर गप्पांचा आवाज थांबला होता.
दुकानदारांनी दहा वाजण्याआधीच शटर खाली ओढायला सुरुवात केली होती.
काही दुकानांच्या बाहेर "आज लवकर बंद" अशा चिठ्ठ्या झळकत होत्या.
रस्त्यांवर गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या चेहऱ्यावर साशंकतेची सावली होती.
बंदूक हातात असली, तरी आत्मविश्वास मात्र गळून पडलेला.
पोलीस वाहनं दिसली, की लोक घरात परत जायला धाव घेत होते.
पोलीस दलावर प्रचंड दबाव तयार झाला होता.
वरून मंत्र्यांचा फोन, खालून नागरिकांचा रोष आणि मधे गुंतलेली तपास यंत्रणा.
मीडियाने निर्माण केलेल्या या भीतीच्या धुक्यात खरी माहिती हरवू लागली होती.
आता प्रश्न केवळ गुन्हेगारांचा नव्हता,
तर संपूर्ण शहर एका मानसिक युद्धाच्या रणांगणात उतरले होते. जिथे भीती, संशय, आणि अफवा यांचं राज्य होतं.
ती रात्री वेगळीच होती. स्टेशनच्या जुनाट, बंद पडलेल्या कंट्रोल केबिनमध्ये फक्त एका टेबललॅम्पचा मिणमिणता उजेड होता. केबिनबाहेर रेल्वे ट्रॅकवर थांबलेली शांतता आणि मधूनच येणाऱ्या लांबच्या ट्रेनच्या शिट्ट्या. या आवाजांनी वातावरण अजून अधिक रहस्यमय केलं होतं.
विजया एकटीच बसली होती. ती पूर्वी कधीही इतकी शांत नव्हती. तिच्या समोर राकेशचा मोबाईल होता. पण तो एक ‘मोबाईल’ नव्हता, तो एक शस्त्र होता. टोळीच्या नेटवर्कचा तो ‘टेक्स्ट टूल’ होता. एक गुप्त संकेत प्रणाली. मेसेजेस कोडिंगमध्ये, फेक नावांनी, वेगळ्या अॅप्समधून. या मोबाईलवर प्रत्येक मेसेज म्हणजे एक पाऊल पुढे, एक सापळा होता.
तिने थोडा वेळ मोबाईलकडे पाहिलं, आणि मग हलकेच हात पुढे करत स्क्रीन ऑन केला. कोड आधीच अनलॉक केला होता. कारण आता ती "त्यांच्या" विश्वासात होती.
ती मनात विचार करत होती…
"मी खेळात उतरलेय.
पण कुठल्या पटावर चालतेय, हेच अजून ठरलेलं नाही...
मी प्यादं आहे की राणी?
किंवा कुणी छुपा खेळाडू?"
अचानक, मोबाईलच्या स्क्रीनवर एक नवीन मेसेज झळकला. कोणत्याही ओळखीशिवाय, कोणत्याही प्रोफाईल पिक्चरशिवाय.
"विजया, आता वेळ फक्त तुझी आहे.
खेळ संपतो एक जागी... पण जीव जातो दुसऱ्या.
तयार राहा."
क्षणभर विजयाचा श्वास अडकला. ती थोडी मागे सरकली, आणि त्या मेसेजकडे काही क्षण न बोलता एकटक बघत राहिली. शब्द कुठल्या गूढ अर्थांनी भरले होते हे स्पष्ट होत नव्हतं. पण हे स्पष्ट होतं की आता खेळ त्याच पातळीवर नव्हता.
ती उठणार होती, पण तिच्या मनात एकच विचार घोळत होता.
"हे कुणाचं चित्तर आहे? कुणाचं नियंत्रण आहे?
आणि सर्वात महत्त्वाचं. मी खेळतेय, की खेळवली जातेय?"
आता ती केवळ तपास अधिकारी नव्हती...
ती स्वतः एका महाभयंकर खेळात एक चलती सजीव प्यादं बनली होती.
(पुढील भाग: काळाच्या सावल्यामध्ये,मृत्यूमागचं थरारक शांततेचं सावट,सावल्यांचा शोध,रुद्र – सावलीतले आठवणीचे डाग,जखमी शेरणी पाहणार आहोत. जर कथा आवडली असेल तर कृपया चांगली रेटिंग द्यावी.)