Savadh Chaal - 3 in Marathi Crime Stories by Akshay Varak books and stories PDF | सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 3

Featured Books
Categories
Share

सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 3

 भाग ३ : पोलिसांची घडी आणि पहिला सापळा

संध्याकाळच्या फुटत्या उजेडात, भंडारा पोलीस मुख्यालयाची चौथी मजला तलम नारिंगी प्रकाशात न्हाऊन निघाली होती. कॉरिडॉरमध्ये पायऱ्यांचे आवाज प्रतिध्वनित होत होते, तर कंट्रोल रूमच्या काचेमागे मॉनिटर्सवर निळ्या-हिरव्या रेषा सतत लुकलुकत होत्या. जणू शहराची धडधड त्या स्क्रीनवर झगमगतेय. याच धडधडीच्या पलीकडे, निरीक्षिका विजया राणे वेगात चालत आपल्या कॅबिनमध्ये शिरली. टेबलावर पडलेला तणाव तिच्या भुवईव्यतिरिक्त कुणालाच दिसत नव्हता, पण सगळ्यांनाच जाणवत होता. आता खेळ खरोखर गंभीर झाला होता.

विजयाने आता ठाम निर्णय घेतला होता. तपासाच्या गतीला आणखी धार देण्याचा. एका लक्षवेधी अंतर्गत बैठकीनंतर तिने दोन स्वतंत्र पथकं नेमली, ज्यांचं काम स्पष्ट, आणि दिशा ठरलेली होती.

पहिलं पथक — तांत्रिक विश्लेषणासाठी.

या पथकाची जबाबदारी होती सीसीटीव्ही फुटेजचं बारकाईनं विश्लेषण करणं, चोरीच्या घटनास्थळी मिळालेले इलेक्ट्रॉनिक लॉग्स तपासणं, आणि सापडलेल्या गुप्त चिप्स किंवा डिजिटल संकेतांची उकल करणं.

विजयाने या पथकात आयटी क्राईमशी संबंधित तज्ज्ञ अधिकाऱ्यांना नेमलं होतं.

जे फिंगरप्रिंट्सच्या पलीकडे जाऊन डाटा ट्रेस, इनक्रिप्टेड कमांड्स, आणि लॉगमधून लपवलेली चाले शोधण्यास सक्षम होते.

या पथकाचा उद्देश होता. चोराच्या डिजिटल सावलीचा माग काढणं.

दुसरं पथक — मैदानी माहिती संकलनासाठी.

हे अधिकारी थेट जमिनीवर उतरून काम करत होते.

त्यांचं काम होतं.

चोरीच्या ठिकाणी लागून असलेल्या गल्ल्यांमधील फुटेज गोळा करणं, प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधणं, आणि त्या भागात रात्रीच्या वेळी घडलेल्या शक्य त्या हालचालींचं टिपण.

ते स्थानिक वॉचमन, हॉकर्स, किंवा गुपचूप बघणाऱ्यांनाही शोधून काढत होते. कारण अनेकदा गुन्हेगार फक्त दिसत नाही, पण त्याचा आवाज कुणीतरी ऐकलेला असतो.

विजयाचं नेतृत्व शांत होतं, पण तिची रणनीती अत्यंत धारदार होती.

तिने स्पष्टपणे सांगितलं होतं:

 "तांत्रिक पुरावे आपल्याला त्याच्या सावलीपर्यंत घेऊन जातील,

आणि मैदानी पुरावे त्या सावलीला चेहरा देतील."

दोन्ही पथकं आता परस्परांशी समन्वय साधत वेगवेगळ्या दिशांनी धावू लागली होती.

एक लक्ष्य, एक प्रेरणा आणि एकच हेतू:

गुन्ह्याच्या अंधाराला ठाम प्रकाशात ओढून बाहेर काढणं.

तीनच मिनिटांत विजयाने तपासाची कमान पुन्हा तुटक आवाजात ताणली.

१. तांत्रिक विश्लेषण पथक —

“सीसीटीव्ही फुटेजच्या प्रत्येक फ्रेमचा हॅश पॉर्न टाका; इलेक्ट्रॉनिक लॉग्जची टाइमलाईन जुळवा; आणि त्या चोरीच्या ठिकाणी सापडलेल्या ‘गुप्त चिप्स’—त्या डिक्रिप्ट व्हायला हव्याच.”

२. मैदानी माहिती पथक —

“शेजारचे सगळे फुटेज अंगठ्यालाही सुटू नये इतकं बारकाईने स्कॅन करा; प्रत्येक साक्षीदाराची स्मृती पुन्हा उजळवा; आणि रात्रीच्या अस्ताव्यस्त हालचालींमधून एक नीटस चित्र बाहेर काढा.”

याच वेळी दरवाज्याबाहेरून ठाम टकटक. सब-इन्स्पेक्टर देशमुख आत येताच निळ्या फाईलचे वजन हातात सांभाळत म्हणाले,

“मॅडम, एका चोरीच्या ठिकाणी एक विचित्र गोष्ट सापडली.”

त्यांनी फाईल उघडत एक फोटो पुढे केला. दुकानाच्या काचेला चिकटलेला छोटासा QR कोड.

“स्कॅन केलं, तर एका लो-लाइट वेबसाइटवर फक्त एकच वाक्य चमकलं.”

‘खेळ चालू आहे. गती वाढवा, मुळं खोल आहेत.’

कॅबिनमध्ये क्षणभर सुई जर नीट ऐकू आली असती, तरी त्या शांततेत तिचा आवाज उमटला असता. विजयाने डोळे बंद केले; तिच्या कपाळावरची बारीक नस हलकेच ताणली गेली. काही सेकंदांचे विचारगर्भ मौन संपवून ती उभी राहिली, आणि हळूच खिडकीपाशी जाऊन शहराकडे नजर टाकली. दूरवरच्या पथदिव्यांची शुभ्र रेषा तिला शतरंजच्या पटासारखी दिसली.

ती धीट पण संयत स्वरात म्हणाली,

 “हा चोर नाही… हा ग्रँडमास्टर आहे.

प्रत्येक चालीचं ठिकाण आधीच आखून ठेवलेला.

पण”

ती वळली आणि पथकावर कटाक्ष टाकत पुढे म्हणाली,

 “या पटावर मी प्यादं म्हणून फिरणार नाही.

आता माझी गती त्याच्या गतीपेक्षा जास्त,

आणि माझी चूक त्याच्या शक्यतोपेक्षा कमी असणार!”

त्या शब्दांबरोबरच एक नवा आदेश तिच्या आवाजात उमटला. जणू ऑर्केस्ट्रातलाच षड्ज:

“सर्व युनिट्स, ‘ऑपरेशन गाथा’चं पुढील टप्प्याचं टाइमर सुरू करा.

शहराच्या प्रत्येक स्क्रीनवर, प्रत्येक सावलीवर.आपली नजर हवी.

खेळ पुढे सरकतोय… आपणही!”

कॅबिनचे दरवाजे पुन्हा उघडले. अधिकारी पाऊले पडली. कॉरिडॉरमध्ये उजेडाचा रेषांवर पडलेला तिचा पुढाकार आता स्पष्ट होता. विजयाची मोहीम, तिचे नियम, आणि तिचे पटावरचे पहिले ‘चेक’… चालू झाले होते.

      शहराच्या सीमेवर, एका मोडकळीस आलेल्या गोडाऊनमध्ये, धुळकट काचांमधून येणाऱ्या किर्रर प्रकाशरेषा आणि हलक्या कुजबुजीतलं वातावरण होत…

रुद्र आणि त्याची टोळी एका अर्धवट तुटलेल्या टेबलाभोवती बसली होती.

गोडाऊनचं भिंतींवरचं निस्तेज पांढरं रंग उतरलेलं होतं, आणि कोपऱ्यात पडलेली काळी पोती, जणू त्यांच्या बेतांसारखीच. सावध आणि धूर्त वाटत होती.

रुद्रच्या हातात वाफाळता चहा होता.

तो खिडकीकडे पाठ फिरवून बसला होता, पण त्याचे डोळे पलीकडं चाललेल्या हालचालींना टिपत होते.

जणू तो नुसता पाहत नव्हता… वाचत होता.

त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ, हलकंसं हसू होतं. जणू काही डाव यशस्वी झाल्याचं नव्हे, तर पुढचा डाव अधिक मनोरंजक असणार याची खात्री.

राकेश, जो नेहमी टोकाच्या निरीक्षणांनी काम करायचा, त्याने आपली डायरी बंद करत एक खोल श्वास घेतला:

“ही विजया राणे साधी नाही वाटत. तिच्या नजरा... त्या रिपोर्ट्समध्ये काहीतरी छुपं चालू आहे.”

रम्या, थोडासा अस्वस्थ, आपले हात चोळत म्हणाला:

“फार झपाट्यानं चाललो आपण.

ती मागावर आलीय, रुद्र… कदाचित थोडं थांबायला हवं.”

रुद्रने चहा हळूच टेबलावर ठेवला.

त्याने वळून सर्वांच्याकडे पाहिलं. डोळ्यात न भीती, न घाई.

फक्त सावध आत्मविश्वास.

त्याचा आवाज खालचा, पण ठाम होता:

“जेव्हा खेळात एक हुशार विरोधक समोर येतो, तेव्हाच खेळ ‘खेळ’ वाटतो. बाकी सगळं — सराव!”

त्याने नकळत टेबलावर बोटांनी एक आकृती आखली.

एक चतु:स्र, जणू शतरंजचा पट.

तो पुढे म्हणाला:

 “पुढचा डाव — महालक्ष्मी ज्वेलर्स.

आणि… लक्षात ठेवा,

हा शेवट नाही… हे फक्त सुरुवातीच्या सावल्याच आहेत.”

     रात्रीचे अकरा वाजले होते. महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये दिवे अजूनही चालू होते, पण बाहेरून पाहणाऱ्याला काहीच वेगळं जाणवत नव्हतं.

दुकानातील प्रत्येक गोष्ट नियोजनबद्धपणे सजवलेली होती.

शोकेसमध्ये ठेवलेलं आकर्षक सोनं, काउंटरवर बसलेला बनावट कर्मचारी, आणि कोपऱ्यात दिसणारा सीसीटीव्ही कॅमेरा. पण खरा खेळ वरवर नव्हता. तो आतल्या थरात सुरू झाला होता.

विजया राणेने महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक प्रभाकर माने यांना विश्वासात घेतलं होतं.

त्या पहिल्या बैठकीत तिने थेट विषयाला हात घातला होता:

 “म्हणजे, प्रभाकरजी… आम्ही तुमचं दुकान लुटून दिल्यासारखं भासवणार आहोत. पण खरंतर हा एक सापळा असेल. आणि तुम्ही त्या सापळ्याचा भाग असाल.”

प्रभाकरजी गोंधळलेले होते.

“म्हणजे… माझंच दुकान? आणि खरंच चोरी व्हावी असं दाखवायचं?”

विजया थोडीशी हसली. तिचं हास्य खात्रीचं होतं.

 “हो, पण फक्त ‘दिसायला’.

खरे सीसीटीव्ही बंद असतील, आणि जे दिसतील, ते फक्त दाखवायचे.फसवणारे! अलार्म सिस्टीम दिसेल, पण ती चालू नसेल. पण… आम्ही एक ‘अदृश्य अलार्म सिस्टीम’ लावलेली आहे. ती कुठल्याही हालचालीवर आम्हाला थेट सिग्नल देईल.”

तिने दुकानाच्या कोपऱ्यातील काचेच्या शेल्फखाली लपवलेला सूक्ष्म सेन्सर दाखवला.

डोळ्याला सहज न दिसणारा, पण हालचाली टिपणारा. थेट कंट्रोल रूमशी जोडलेला.

त्या रात्री, दुकानाच्या मागील स्टोअररूममध्ये एक गडद पण तणावपूर्ण शांतता होती.

विजया, देशमुख, आणि तिच्या खास पथकातील अजून चार प्रशिक्षित पोलिस, सर्वजण काळ्या कपड्यांत, कानाला वायरलेस, आणि डोळ्यांत पूर्ण जागरूकता ठेवून थांबले होते.

कोण बोलत नव्हता, पण सगळ्यांचे कान टवकारलेले होते.

सीमित श्वास, आणि अंतर्मनात साठलेला एकच विचार.

"आज… तो येणार."

देशमुखने हलक्या आवाजात विचारलं:

“मॅडम, जर त्यांनी मागच्या दरवाज्याचा वापर केला तर?”

विजयाने शांतपणे मान डोलावली. तिची नजर स्क्रिनवर स्थिर होती.

“मग ते आपल्या थेट समोर असतील.

दरवाजाच्या मागे सुद्धा ट्रिगर सिस्टिम लावलेली आहे.

कुठूनही आले, तरी यातून सुटणं शक्य नाही.”

घड्याळात अचूक दोन वाजले होते. भंडाऱ्याच्या महालक्ष्मी ज्वेलर्सच्या मागच्या गल्लीत काळोख होता, पण तो केवळ प्रकाशाचा नव्हता. तो होता काय चाललंय याची कुणालाही कल्पना नाही अशा गूढ शांततेचा.

तेवढ्यात, एक काळसर SUV गल्लीच्या शेवटी येऊन थांबली. इंजिन बंद. दिवे बंद झाले. दरवाजे हळूहळू उघडले.

रुद्र, रम्या, आणि राकेश गाडीतून बाहेर आले.तिघांच्याही हालचाली मोजून मापून. तिघांनाही खात्री होती, आजचा डाव त्यांचाच आहे.

राकेशने टूलकिट काढलं. दरवाज्याच्या फटीत तो हळुवारपणे सुई फिरवू लागला.

काही क्षणांतच —

टक… क्लिक! झालं.

“एकदम क्लासिक ओपनिंग. कोणतंही अडथळा नाही.” राकेश हसत म्हणाला.

“ना गस्त, ना कॅमेरे, ना आवाज… काहीतरी फारच सोपं वाटतंय.”रम्या इकडे तिकडे पाहून हळू आवाजात म्हणू लागला.

“जेव्हा विरोधक घाबरतो, तेव्हा तो गोंधळ निर्माण करतो. रुद्र संयमी होत शांतपणे म्हंटला.

इथे शांतता आहे.म्हणजे आपला खेळ सुरू आहे.”

ते तिघं दुकानात आत सरकले. शोकेसच्या रांगा तशाच तळपणाऱ्या, दागिन्यांचं मूक आमंत्रण देत असलेल्या. काहीच वेगळं दिसत नव्हतं.

  “कॅमेरे बंद. अलार्म सिस्टीम शून्य. गेट क्लियर.”राकेशने रम्या आणि रुद्रला इशारा देत म्हंटले.

 “बस्स! आता हे सोनं आपलं... एका क्षणात.”रम्या शेल्फकडे झुकत हसत म्हणाला.

रम्याने खालचं शेल्फ उघडलं.

क्लिक!

त्या छोट्याशा क्लिकसह, त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

सगळं अगदी त्यांच्या स्क्रिप्टनुसार घडत होतं.

 “हा खेळ आता आमच्या ताब्यात आहे…”राकेश खुशीत बोलला.

रुद्र (हळू आवाजात): “गणना सुरू करा – दोन मिनिटांत बाहेर. कोणी मागं वळून पाहायचं नाही.”

...पण...

बीप... बीप... बीप... आवाज झाला.

एका क्षणात सगळं स्तब्ध झालं.

शेल्फखालून हलकासा, पण स्पष्ट आवाज आला. अदृश्य अलार्म सक्रिय झाला होता.

 “अरे… हे… हे तर चालू झालं!”रम्या चकित झाला.

 “कसं शक्य आहे? सिस्टीम तर बंद होती ना?”राकेश घाबरलेल्या स्वरात म्हंटला.

“बाहेर पडा! ही जाळं आहे… आपण फसलो!”रुद्र ताबडतोब मागे फिरला.

आणि त्या क्षणी —

“खडदडदडदड!”

दुकानाचं मुख्य शटर आपोआप खाली आलं.

धाडकन् आवाजात.ते बंद झालं.

आत. काळोखात विसावलेली सापळ्याची धार स्पष्ट झाली. एका आतल्या दारातून विजया राणे बाहेर आली. पाठोपाठ तिचं विशेष पथक. सर्वजण सज्ज, हातात बंदुका, चेहऱ्यावर निर्धार.

विजया थेट राकेशसमोर येऊन थांबली. ती थंडपणे, पण डोळ्यांत रौद्र तेज घेऊन म्हणाली,

“फासात आला का वाघ?”

राकेश गडबडला. रम्याने मागचं दार गाठण्याचा प्रयत्न केला.

पण...

मागच्या दरवाजावर, चार सशस्त्र पोलीस आधीपासूनच उभे होते.

पोलीस: “थांबा! हात वर! तुम्ही वेढले गेले आहात.”

रम्या आणि राकेश – दोघंही गळून गेले.

...पण…

रुद्र?

तो कुठेच दिसत नव्हता.

विजया मागं फिरली. दुकानाच्या कोपऱ्यातल्या वेंटिलेशन डक्टकडे तिची नजर गेली. डक्टचं झाकण ताजंच हलवलेलं होतं. काठावर थोडी धूळ… आणि त्यावरून सरकलेले बोटांचे ठसे.

विजया (हलकं हसत):

“वाघ फासात आला… पण शेपूट वळवून मोकळा झाला.”

शटर जोरात धडधडून बंद झालं होतं, पण त्याचा आवाज अजूनही हवेत रुंजी घालत होता. जणू काळजाच्या ठोक्यांमध्ये मिसळून तो दर काही सेकंदांनी आठवत होता.

दुकानाच्या आत आता तीव्र शांतता पसरली होती.

केवळ एकमेकांच्या श्वासाचा आवाज, आणि धडधडणाऱ्या काळजाचा ठोका ऐकू येत होता.

रम्या आणि राकेश दोघंही हात वर करून घामाघूम उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो सुरुवातीचा आत्मविश्वास आता कुठेच नव्हता. त्याला जागा घेत होती भीती, गोंधळ, आणि "पळून जाण्याची आता संधी नाही" याची साक्षर जाणीव.

विजया राणे, हळूहळू पुढे आली.

चेहरा गंभीर. डोळ्यांत थेट पाहणारं तेज होत.

ती थेट राकेशसमोर थांबली.

 विजया (खालच्या आवाजात, पण धारदार):

"सोनं चोरायला आलात… पण शाप घेऊन जाणार आहात. हे केवळ चोरी नव्हती… ही आमच्या संयमाची परीक्षा होती. आणि आज तुम्ही ती हरलात."

राकेशने तोंड उघडले, पण शब्द फुटले नाहीत.

रम्या, मागून थरथरत्या आवाजात:

 “मॅडम… आम्ही फक्त… रुद्रचं ऐकतो… आमचं वैयक्तिक काही नव्हतं. आम्ही त्याच्या प्लॅनमध्ये… अडकून पडलो.”

विजया त्याच्याकडे वळली

तीने एक क्षण त्याच्या डोळ्यांत पाहिले.अगदी खोल.

 “मग बोल… अडकला आहेस, तर सगळं उघड कर.

रुद्र कुठे जातो? कुणाशी संपर्क आहे त्याचा?

की तू ही आता 'गहिनीत निघालेला शेर' बनणार आहेस?"

रम्याने डोळे खाली झुकवले. त्याच्या हातांची थरथरी बंद होत नव्हती.

तेवढ्यात देशमुख पुढे आले.

 देशमुखकडक आवाजात म्हंटले,

"मॅडम, मागच्या वेंटिलेशन ग्रिलचं कव्हर बाजूला हललेलं आढळलं.

त्यातूनच तो रुद्र पळाला असावा. बाहेरच्या CCTVवर ट्रेस करत आहोत."

विजयाचं चेहरा अजून कठोर झाला.

ती मागे वळतली. सगळ्या टीमकडे पाहिले. आणि एका शांत पण जबर आवाजात म्हणली,

 “हा लढा संपलेला नाही.

आज दोनजण गळ्यात आले, पण वाघ निसटला.

त्याला शोधा… त्याच्या सावलीला कुरवाळा…

आणि पुढच्या वेळी – त्याच्या सावलीपेक्षा पुढे उभे राहा!”

पोलिसांचं पथक सळसळू लागल . आज्ञा मिळाल्याबरोबर हालचाली सुरू झाल्या. 

2रात्रीचे चार वाजत आले होते. भंडाऱ्याचं आकाश गडद निळं होतं होत, पूर्वेकडून हलकी राखाडी रेषा फक्त सूचित करत होती. “आता दिवस दूर नाही.”

शहरात बहुतेक दिवे विझलेले, कधीकधी एखाद्या पथदिव्यावर टिपूर प्रकाश, तर एखाद्या शटरवर त्याची फिकट छाया होती. परिसरापासून दोन-तीन चौक लांब, एका अर्ध्या बांधून सोडलेल्या इमारतीच्या टेरेसवर रुद्र एकटाच उभा होता.

जुनाट सिमेंटच्या कठड्यावर काळं ओव्हरकोट हवेत फडफडत होतं.

हातात. स्टील बॉडीची, हाय-ग्रेड दुर्बीण. त्यातल्या लेन्सवर क्षिरीत ​ओसाड काचेमुळे पाण्याच्या टपोऱ्या थेंबांची वाफ बसली, तरीही दृश्य स्पष्ट दिसत होतं.

दुर्बीण डोळ्यांपुढं नेताच, त्याचं लक्ष थेट महालक्ष्मी ज्वेलर्सकडे खिळलं.

दुकानाभोवती अजूनही पोलीस बॅरिकेड; गरूड दिव्याखाली पोलिसांची ये-जा; आतमध्ये फॉरेन्सिक टीमचा हलकासा निळसर प्रकाश येत होता.

रुद्रच्या गालांवर अंधुक हसू उमटलं, जणू त्याला पुसट ड्राफ्ट-माहीतीपेक्षा मोठी, सूक्ष्म पटाची मजा अनुभवायला मिळत होती.

काही क्षण तो कुठल्याही हालचालीशिवाय स्थिर होता. फक्त दुर्बिणीतून दिसणारं दृश्य, आणि कधीकधी लांबवरून येणारा एखाद्या मोटारीचा कर्कश ब्रेकचा आवाज येत होता.

नंतर त्यानं हळूच दुर्बीण खाली घेतली. टरटरत्या थंड हवेत तोंडातून निघालेल्या वाफेत शब्द मिसळले. क्वचितच ऐकू येतील इतक्या धीम्या, पण रीढ़ेवरून सरकणाऱ्या आवाजात:

“तुमचा शेर अजून प्याद्यांशी खेळतोय, मॅडम राणे…

आणि हा डाव अजून मोठा आहे.”

त्याने हातातील दुर्बीण सावकाश फोल्ड करून कोटाची आतली खिसा कुबळत ठेवली.

टाळक्यावरून गार वारा झळकत होता, केसांची एखादी बट कानापाशी येऊन थडकली.

रुद्रनं कठड्यावरून मागे एक पाऊल टाकलं; टेरेसवर पसरलेल्या धुळीत त्याचे शूज हलकेसे कुरकुरले.

आता चेहऱ्यावरचं हसू अधिक ठाम झालं होत,डोळ्यात नव्याच डावाची चमक दिसत होती.

त्याने खांदे सरसावले, अंधाऱ्या जिन्यात उतरायला वळला.  एक क्षण थांबून पुन्हा एकदा शहराकडे नजर टाकली. कुठेतरी लांब घंटाघरानं साडेचार वाजल्याची मंद घंटा दिली.

त्या मृत्युसमान शांतीत. रुद्रचा आवाज दुसऱ्यांदा दबक्या कुजबुजनं टाळांवर नाचला, पण शब्द हवा कुरवाळत गेले —

“खेळ रंगत जाणारा आहे…

फक्त आता पटावरचे नियम मी ठरवणार.”

तेवढ्यात तो जिन्यात नाहीसा झाला.

टेरेसवर वाऱ्यानं चुरचुरत धूळ उडाली, आणि आकाशाच्या कडा किंचित फिकट होऊ लागल्या. जणू एका नव्या दिवसाची नवे प्रश्न घेऊन उगवण्याची तयारी सुरू होती.

(पुढील भागात रुद्रचा नवीन डाव,रम्याची तातडीने सुटका,एक खून, गोंधळाचा माजलेला कल्लोळ पाहणार आहोत.)