भाग ५ : काळाच्या सावल्यांमध्ये
पोलीस मुख्यालयात एका कोपऱ्यात विजया एका जुन्या लाकडी टेबलाजवळ बसली होती. तिच्या समोर साखर विरघळलेला गरम चहा अजूनही किंचित धुरकटत होता, पण ती त्याकडे पाहतही नव्हती. खिडकीबाहेर धूसर सकाळ ओसंडून वाहत होती. रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू होती, पण या खोलीत एक निराळी शांतता होती. खोल, खोल जणू अंतःकरणात घुसणारी.
तिच्या समोर पडलेलं ते A4 चं पान, जणू काळाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून उगम पावलेलं भयंकर साक्ष्य होतं. त्या चिठ्ठीवर एकच अक्षर: 'R'. तेही सरळसोट न होता, थोडं झुकलेलं, जणू त्याचं स्वतःचंही काहीतरी लपवण्याचं प्रयत्न होतं. अक्षराच्या खाली एक सरळ रेष. काहीशी कंपलेल्या हाताने ओढलेली वाटावी, तरीही अचूक.
“हे अक्षर... सहज कुणी वापरणारं नाही. कुठलातरी जुन्या काळातला टाईपरायटर आहे हा... नवा झळाळता फॉन्ट नव्हे, काहीतरी ओळखीपलीकडचं.”विजया तोंडातल्या ओठांत, कुंद स्वरात पुटपटू लागली.
तिने थोडंसं पुढे झुकून तो कागद उचलला. टाईपरायटरच्या शाईचा तो विशिष्ट गंध, हलकासा अजूनही शिल्लक होता. तो गंध विजया ओळखू शकत होती. तिच्या वडिलांनी १९८० च्या दशकात वापरत असलेल्या टाईपरायटरमधून उगम पावलेला गंध.
त्या एका ‘R’ च्या आत एक मूक घोषणा दडलेली होती – रुद्रचा पुन्हा नव्याने सुरू झालेला खेळ. पण यावेळी फक्त शरीरं नव्हत जात, तर विचारांवर हल्ला होत होता.
दरवाजाच्या पलीकडून एक तरुण अधिकारी दबकत आत आला. त्याने आवाज न करता विजया समोर आणखी एक फाईल ठेवली, पण ती तिथे नव्हती – ती त्या झुकलेल्या ‘R’ मध्येच हरवली होती.
तिच्या मनात विचार फिरत होते:
"हा टाईपरायटर कोणाकडे आहे?
का वापरतोय रुद्र हे साधन?
आणि... ही रेषा, ही खरंच केवळ रेषा आहे का, की संकेत?"
दरवेळी रुद्र मागे काहीतरी सोडत होता – एक संकेत, एक सावली...
आणि या वेळेस, सावलीनं सूर्यसुद्धा झाकला होता.
मुख्यालयाच्या जुनाट, हलक्याशा शिळसर वासाने भरलेल्या खोलीत सकाळच्या सुर्यकिरणांचा एक लकेर खिडकीतून आत घुसला होता. तेवढ्याच उजेडात विजयाचं तेजस्वी पण थकलेलं चेहरा चमकत होता. समोरचा चहा थंड झाला होता. पण तिचा विचारांचा उकळता कप अजूनही प्रचंड गरम होता.
तिच्या समोर एका पातळ, पांढऱ्या चिठ्ठीवर काळं झुकलेलं ‘R’ आणि त्याखाली एक रेषा — काहीशी अस्वस्थ, पण निश्चित झालेली. हे अक्षर फक्त टंकलेखन नव्हतं. ती एक घोषणा होती.
ते अक्षर नव्हत – तो साक्ष होता.
विजयाने डोळे थोडेसे संकुचित केले. मनात एकच विचार फिरत होता —
"हे अक्षर... हे काहीतरी जास्त सांगतंय."
ती अचानक मोबाईलकडे वळली. तिच्या लक्षात आलं की ही गूढ रचना उलगडण्यासाठी तिला एका विशिष्ट व्यक्तीकडे जायला हवं.
मेजर सागर परांजपे, लष्करी फॉरेन्सिक लिपी-विशेषज्ञ. अक्षरांच्या गूढतेतून सत्य शोधणारा एक हुशार अभ्यासक. विजयाचा मित्र होता. तिने लगेच मोबाईल काढला आणि त्याला कॉल केला.
दुसऱ्याच बेलला त्याने कॉल उचलला.
"विजया! एवढ्या वर्षांनी कॉल करतेस म्हणजे काहीतरी विशेषच वाटतंय. गुन्हेगार सापडला की अक्षरांनी तुझी चक्कर उडवली?"सागरने मिश्कील हसत, नेहमीच्या हलक्याफुलक्या शैलीत विचारलं.
"माझ्याजवळ एक चिठ्ठी आहे. त्यावर ‘R’ आहे… पण साधं नाही. झुकलेलं, ठळक… काहीतरी वेगळंच. हे अक्षर सांगतंय काही, पण शब्दांशिवाय." विजयाने गंभीर आवाजात, थेट मुद्द्यावर येत सांगितलं.
"हं… स्कॅन करून पाठव. मग बघतो काय म्हणते ती सावली." सागरने थोडा रस घेत, त्याच्या सवयीप्रमाणे थोडं विनोद करत उत्तर दिलं.
विजयानं चिठ्ठी स्कॅन करून लगेच पाठवली. काही मिनिटांत सागरचा व्हिडीओ कॉल आला. तो एका मोठ्या स्क्रीनसमोर बसला होता. स्क्रीनवर तीच चिठ्ठी झूम करून उघडलेली होती. त्याच्या नजरा त्या अक्षरावर स्थिरावल्या होत्या. त्याचे डोळे हळूहळू बारीकसारीक गोष्टी टिपू लागले.
"हा आहे Remington 17D – १९८५ सालचा टाईपरायटर.
याचं टंकण ओळखता येतं – झुकलेलं, थोडं खोल, आणि शाई थोडी ओलसर.
आता फारच क्वचित सापडतो.
कदाचित एखाद्या जुन्या पत्रकाराच्या ऑफिसात,
शाळेच्या रेकॉर्ड सेक्शनमध्ये, किंवा एखाद्या विसरलेल्या मुद्रणालयाच्या कोपऱ्यात." सागरने निश्चयाने, अभ्यासकाच्या आत्मविश्वासाने सांगितलं.
विजया काही क्षण गप्प राहिली. तिचा चेहरा गंभीर झाला. डोळे मिटले. तिच्या डोक्यात आता फक्त एकच ओळ घुमत होती. तिची नजर त्या झुकलेल्या 'R' वर स्थिरावली होती. जणू ते अक्षर काहीतरी मागत होतं, एक साक्ष देत होतं.
"तर रुद्र हा फक्त चोर नाही... तो एक हरवलेला आवाज आहे. जुन्या यंत्रांचा, विसरलेल्या शब्दांचा, आणि सावध नजरेने टिपलेल्या सावल्यांचा." विजयाने शांत, गंभीर स्वरात, जणू स्वतःशीच बोलल्यासारखं म्हटलं.
.रुद्र – सावलीतले आठवणीचे डाग
त्या अंधाऱ्या, कुबट वासाने भरलेल्या बेसमेंटमध्ये एक जुनाट टेबल होता. त्यावर धूळ साचलेली होती, आणि मध्यभागी एक काळसर, गंजलेल्या टाईपरायटरची शांत छाया पसरलेली. फक्त एका डागलेल्या बल्बच्या प्रकाशात त्या टाईपरायटरचे खिळखिळे टंक चमकत होते. रुद्र त्या समोर बसलेला होता. शांत, स्थिर, आणि खोलवर काहीतरी जिव्हाळ्याचं लिहीत असल्यासारखा. त्याचे हात हलकेच टाईपरायटरवर फिरत होते, पण डोळे.ते कुठे तरी दूर गेलेले होते.
तो फक्त मजकूर टंकत नव्हता. तो भूतकाळ पुन्हा एकवार जगत होता.
१० वर्षांपूर्वी...
रुद्र .पत्रकारितेच्या शेवटच्या वर्षाला असलेला धडाडीचा विद्यार्थी. डोळ्यांत प्रश्न, आणि लेखणीत सत्य. त्याने एका स्थानिक जिल्हा राजकारणीच्या घोटाळ्याचं धाडसीपणे भांडाफोड केलं होतं. बातमी छोटी होती, पण स्फोट मोठा. सत्तेच्या नखात साचलेली माती त्याने दाखवली होती. मात्र परिणाम... कॉलेजमधून निलंबन. कारण ‘संस्थेचं नाव बदनाम केलं’. समाजाकडून उपेक्षा. "काय गरज होती तोंड उघडायची?" घरच्यांकडून निर्वासन. "आम्हाला यात ओढू नकोस." आणि आयुष्यभरासाठी मनात साचून राहिलेली कटुता.
त्या कटुतेचं आज एक रूप होतं. टाईपरायटरवर टंकलेली त्याची एक एक ओळ.
बेसमेंटच्या कोपऱ्यात पडलेलं त्याचं जुनं प्रेस कार्ड अजूनही त्या वेळच्या ओळखीचं स्मरण करून देत होतं. भिंतीवर एक मोडकं फोटोफ्रेम. त्यात त्याचं कॉलेजमधील पहिलं छापलेलं संपादकीय. त्या क्षणांना पुन्हा जन्म देण्याचा हा त्याचा एक प्रकार होता.
रुद्रच्या डोळ्यांत आजही तेच तेज होतं. पण आता त्यात थोडंसं सूडाचं सावट मिसळलेलं होतं. त्याचे हात थांबले, टाईपरायटरवर एक क्षण स्थिर झाले. त्याने स्वतःशी पुटपुटलं:
"सत्य जेव्हा ऐकले जात नाही,
तेव्हा ते हिंस्र होतं."
रुद्रने हलक्या पण धीरगंभीर आवाजात, स्वतःशीच म्हटलं.
त्यानंतर त्याच्या बोटांनी टंकलेखन पुन्हा सुरू केलं. टकटक… टकटक… त्या प्रत्येक टंकेत एक दडपलेला आक्रोश होता, एक आवाज होता जो कुणालाही ऐकू येत नव्हता. पण तो लिहीत होता, स्पष्ट करत होता, आणि तयार करत होता...
टाईपरायटरवर त्याने टंकलेली ओळ:
"जेव्हा सत्य बोलायचं थांबवलं जातं,
तेव्हा गुन्हेगार जन्माला येतो."
त्या ओळीला पाहत तो काही क्षण स्थिर बसून राहिला. त्याच्या चेहऱ्यावर ना संताप होता, ना दुःख. फक्त एक विचित्र स्थिरता. जणू तो स्वतःशीच करार करत होता.
सत्याचा आवाज दाबल्यावर,
सावल्या उरतात.
आणि रुद्र. आता त्याच सावलीत जगत होता.
पुढील कारवाईसाठी विजयाने एक अत्यंत कुशल आणि आकर्षक योजना आखली होती. तिने शहराच्या मध्यवर्ती वर्दळीच्या भागात एक बनावट दागिन्यांचं दुकान उघडलं – ‘शांती ज्वेल्स’. बाहेरून बघायला ते एखाद्या नामांकित ब्रँडसारखं वाटावं असंच होतं – स्फटिकासारख्या शोकेस, हिऱ्याच्या तेजात चमचमणारे लाइट्स, आणि काचेमागे ठेवलेले खोटे पण भासवलेले खरे दागिने. दुकानाच्या दारावर एक सुरक्षारक्षकही ठेवण्यात आलेला होता – पण तो देखील विजयच्याच पथकातील.
पण खरी यंत्रणा चालू होती दुकानाच्या गाभ्यात. एका गुप्त भिंतीआड एक संकुचित, पण पूर्णपणे सज्ज नियंत्रणकक्ष होता. तिथे मेजर सागर, सबइन्स्पेक्टर देशमुख आणि दोन प्रशिक्षित कमांडो सतत नजरेतून हालचाली टिपत होते. त्यांनी सीसीटीव्ही स्क्रीनवर नजरें खिळवलेल्या होत्या. दुकानाच्या प्रत्येक इंचावर त्यांचं लक्ष होतं – प्रवेशद्वारापासून शोरूमच्या आतल्या दारांपर्यंत.
रात्र झाली, शहर झोपलं. आणि नेमक्या १:१७ वाजता,शून्य टोळीच्या खास कोडेड नेटवर्कवर एक खळबळजनक संदेश झळकला.
विजयाने अत्यंत हुशारीने रुद्रच्या टोळीला आणि रुद्रला जेरबंद करण्यासाठी,अटकेत असलेल्या राकेशचे डिव्हाईस वापरून टोळीच्या नेटवर्क पर्यंत तो संदेश पाठवला. तिला माहीत होतं की हे सोबत असले तरी कायम सोबत तर नाही राहणार. आपण त्यांना शोधतोय म्हणजे हे वेगवेगळे नक्कीच झाले असणार. आणि तिचा हा कट खराच झाला.
टोळीच्या नेटवर्कवर हा संदेश झळकला.
“माल नवा, सेक्युरिटी जुनी. संधी हुकवू नका.”
हा संदेश पाहताच रम्या आणि मंट्या. टोळीतील कसबी, पण थोडे उतावळे सदस्य. एका बाईकवरून झपाट्याने ‘शांती ज्वेल्स’कडे वळले. दोघांनी एकमेकांकडे नजरा टाकत हमसफर ची खूण केली आणि संधीचा फायदा उचलण्यासाठी ते दुकानाच्या दिशेनं वळले.
रस्त्यावर शांतता होती. त्यांच्या चेहऱ्यावर विश्वास होता की ही एक ‘सोप्या कामाची रात्र’ ठरणार. रम्याने सावधपणे दुकानाचं शटर उचललं, तर मंट्याने आत पाऊल टाकलं. दोघंही आत प्रवेश करताच. अगदी दोन सेकंदात. दरवाजे एका न दिसणाऱ्या यंत्रणेमुळे ‘क्लिक!’ करून लॉक झाले. आत-बाहेर जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला.
आश्चर्यचकित होऊन रम्याने मागे वळून बघितलं, पण त्याला फक्त बंद दरवाजाच दिसला. मंट्याच्या चेहऱ्यावर एकाएकी घामाच्या धारा उमटल्या. तो काहीतरी बोलणार इतक्यात, दुकानातल्या स्पीकरमधून एक परिचित आवाज घुमू लागला. प्रत्येक कोपऱ्यात तो आवाज वाजत होता, स्थिर आणि निर्धारपूर्ण.
तो आवाज विजयाचा होता.
“गणपती बाप्पा मोरया… विसर्जन आता तुरुंगातच होईल.”
दोघंही सुन्न झाले. हे दुकान म्हणजे सापळा आहे, हे त्यांना आता पुरेपूर समजलं होतं. पण उशीर झालेला होता...
खाली गुप्त खोलीत सगळं दृश्य एका मोठ्या एलईडी स्क्रीनवर झळकत होतं. कॅमेऱ्यांमधून दाखवलं जात होतं – ‘शांती ज्वेल्स’च्या आत रम्या आणि मंट्या अडकलेले, त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि संभ्रम एकत्र दिसत होता.
मेजर सागर खुर्चीत किंचित मागे रेलून बसला होता, नजर स्क्रीनवर रोखलेली. सब-इन्स्पेक्टर देशमुख त्याच्या बाजूला उभा, कानात वायरलेस सेट घालून होता.
दुसऱ्या टोकाला, विजया त्या गडद प्रकाशात एकटीनं खुर्चीवर बसलेली होती. डोळ्यांत एक विलक्षण स्थिरता होती. जणू हा खेळ ती आधीच जिंकून आली होती. तिनं शांतपणे स्क्रीनकडे पाहिलं, मग हलकेच हसत ती बोलली,
“रम्या... पुन्हा माझ्या तावडीत अडकलास.
ती हलकेच पुढे सरकली. बोटानं स्क्रीनवर एक जागा दाखवत म्हणाली,
“आणि आता हा पण... मंट्या. सगळं आयतं गळ्यात आलंय.”
तिनं टेबलावरची एक फाईल उघडली. आत एक लहान कन्सोल स्क्रीन होती. काही सेकंद विचार केल्यासारखी ती थांबली, मग दोन बटणं दबावली. स्क्रीनवर 'DOOR 1 - LOCKED', 'DOOR 2 - LOCKED' असं झळकलं.
“आता तिघेही सापडलेत...” ती स्वतःशीच म्हणाली.
मेजर सागरनं मान हलवली. देशमुखनं थोडंसं पुढं होत, कुजबुजत्या सुरात म्हटलं,
“विजया मॅडम, तुम्ही तर शिकार स्वतःहून जाळ्यात ओढून घेतलीत...”
विजयानं त्याच्याकडे न बघता एका नवीन सेक्टरवर क्लिक केलं – ‘LOCKDOWN: SECTOR-C’ असा शब्द झळकला. मग ती थोडीशी मागे सरली, हात मागे ठेवून खुर्चीत स्थिर बसली आणि एक हलकीशी, पण जिंकलेल्या सैनिकासारखी शांत नजर स्क्रीनवर रोवली.
“या चोरट्या टोळीच्या विरुद्धचा पहिला डाव... जिंकायचाच आहे,” असं ती ठामपणे म्हणाली.
गुप्त ऑपरेशनच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर विजया, एक USB ड्राईव्ह घट्ट मुठीत पकडून, काळ्या रंगाच्या गाडीमध्ये परत चालली होती. तिच्या चेहऱ्यावर यशाचं समाधान होतं, पण ते समाधानही शिस्तीत दडपलेलं, जसं एका अनुभवी अधिकाऱ्याला शोभेल अस होत.
तिने ड्रायव्हिंग सीटवर स्थान घेतलं. गाडीचा इंजिन स्टार्ट करताच रेडिओ आपोआप कार्यान्वित झाला. एक क्षणभर तिचं लक्ष चकित झालं. आणि मग तो आवाज ऐकू आला... ठाम, हसरा, पण उग्र.
रुद्र.
“शाब्बास, विजया...
तीन प्याद्यं गमावली म्हणजे राजा हरला असं होत नाही.
मी अजून सावलीत आहे.
पुढचं गंतव्य – 'धनविजय'.
पहिलं रक्त तिथंच सांडेल.”
विजयाचं हृदय क्षणभर धडधडायला लागलं. तिचं मन लगेच काळजीच्या लाटांनी व्यापलं. तिने घाईघाईनं ब्रेकवर पाय दिला. पण तेवढ्यात...
“ठांssक!!”
गाडीखालून अचानक एक तीव्र स्पार्क, आणि क्षणात एक भीषण स्फोट झाला.
गाडी आक्राळविक्राळ आवाजात उजव्या बाजूने उलटली, रस्त्यावर आदळली. आसपासच्या झाडांवर पक्षी उडून गेले, रस्त्यावरच्या शांततेत कोलाहल उठला.
धूर आणि बारकुसांचा वास दरवळू लागला.
गाडीच्या दरवाज्याचा तुकडा दूर फेकला गेला आणि त्यासोबत विजया ही . ती रस्त्यावर आदळली. तिच्या शर्टावर लाल रक्ताचे डाग पसरले होते. चेहर्यावर जळाल्याचं हलकं झळकणं स्पष्ट दिसत होतं. गालावर काळसर व्रण उभं राहत होतं.
तिचं श्वास घेणं थोडं जड झालं, पण ती उठण्याचा प्रयत्न करत होती.
भवतालच्या आवाजात अजूनही तिच्या आतील ठामपणाचा नाद ऐकू येत होता.
ती शेरणी होती. जखमी झाली होती, पण पराभूत नव्हती.
आणि तिच्या डोळ्यांत... अजूनही तीच आगीतली ज्वाळा झळकत होती. अधिक उग्र, अधिक जिवंत.
रस्त्यावर अजूनही धुराची लाट वाहत होती. विजया जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेली होती. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग, आणि चेहऱ्यावर आगीनं भाजल्याचे खुणा होत्या. तरी तिच्या डोळ्यांत थरथरणाऱ्या लक्त्यांसारख्या, पण विजयी आणि निर्धारपूर्ण चमक होती.त्या आवाजात मेजर सागर आणि देशमुख तिच्या दिशेने धावत आले. त्यांना पाहताच ती कोसळली. तिच्या उजव्या खांद्यावरून रक्ताचा ओघ सुरू होता, पण चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये एक अद्भुत शांतता होती. जणू या वेदनांचा तिला फारसा फरक पडत नव्हता.
देशमुख थोडा घाबरला. त्याने पटकन तिचं वजन सांभाळत तिला उचललं.
“मॅडम... तुम्ही ठीक आहात का?” त्याच्या आवाजात काळजी होती.
मेजर सागरने विजया कडे पाहिलं. त्याने पाहिलं. तिच्या डोळ्यांत अजूनही आगीचा ज्वाळा पेटलेला होता. ती हरलेली नव्हती... जखमी होती, पण मोडलेली नाही.
ती हळूच म्हणाली, आवाजात संयम, पण धारदार धार होती.
“त्याला वाटतं मी फक्त एक प्यादं आहे… पण त्याला काय माहिती, मीच राजा होणार आहे.”
ती थोडीशी हसली. अंगभर वेदना असतानाही त्या हसण्यात गर्व नव्हता – होता एक भविष्याचा ठाम निर्धार.
मेजर सागरने तिच्या हातात काहीतरी घट्ट पकडलेलं पाहिलं.
"USB ड्राईव्ह!" त्याने पुटपुटलं.
तिने ती ड्राईव्ह अजून घट्ट हातात धरली होती, जणू आयुष्याच्या प्रत्येक श्वासाइतकी ती महत्त्वाची होती.
ती म्हणाली, “हेच त्याचं खेळातलं खरं राजकारण आहे. पण आता पुढचा खेळ... माझ्या पटावर चालेल.”
(भयावह वळण या अंतिम भागात आपण पाहनार आहोत - विजयाची जागृती, अंतिम रणांगण,अंधार आणि प्रकाशाच भान. जर आतपर्यंत कथा आवडली असल्यास आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि कृपया एक चांगली रेटिंग द्या)