What is the use of learning? in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | शिक्षण शिकून काय उपयोग

Featured Books
Categories
Share

शिक्षण शिकून काय उपयोग

आपला शिक्षण शिकून उपयोग काय?

         *शिक्षण शिकणारे गुलामच. आपला शिक्षण शिकून उपयोग काय? कारण शिकणारे सर्व घटक हे आदर्श गुलामागत वागतात. त्यांचं वागणं एखाद्या अडाणी असलेल्या व्यक्तीच्या हातातील कळसुत्री बाहुल्याप्रमाणे असतं. ते एकाद्या कारखान्यातील न शिकलेल्या अडाणी मालकानं बस म्हटल्यास बसतात व उठ म्हटल्यास उठतात. असलं शिक्षण कोणत्या कामाचं. आजच्या काळात शिक्षण त्याला म्हणता येईल. जो शिकेल व ते शिक्षण घेतल्यानंतर रोजगार निर्माण करुन इतरांना रोजगार देईल. परंतु प्रत्येक व्यक्ती असे करु शकत नाहीत. ते उच्च अर्हता प्राप्त केल्यानंतर नोकरीच्या मागे लागतात व एखाद्या श्रीमंत असलेल्या व कारखाना उभारलेल्या अडाणी माणसांच्या कारखान्यात उच्च नोकरीला लागतात व त्याच अडाणी व्यक्तीच्या तालावर ताल धरुन चालत असतात. त्यासोबतच तिथे नोकरी करतांना आपलं मन, आपले उच्च विचार आणि आपल्या भावना मारुन टाकत असतात.* 
          आपला शिक्षण शिकून उपयोग काय? शिर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल. परंतु ती सत्य बाब आहे. कारण अलिकडील काळात शिक्षणाची अवस्था अशीच झालीय. अलिकडील शिक्षणानं आदर्श गुलाम निर्माण करण्याचं काम केलं आणि करीत आहे, असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. 
         शिक्षणाच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्या. काही विचारवंतांनी शिक्षण म्हणजे ज्ञान आणि कौशल्ये शिकण्याची प्रक्रिया, तर काहींनी शिक्षणाला व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकास घडवणारी प्रक्रिया म्हटलं आहे. 
           शिक्षणाबद्दल प्लेटो नावाचा विचारवंत म्हणतो की शिक्षण म्हणजे सद्गुणी नागरिक घडवणे. जॉन लॉक म्हणतो, शिक्षण म्हणजे एखाद्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान नसून, गरज पडेल, तेव्हा ज्ञान मिळवण्याची क्षमता निर्माण करणे होय. शिक्षणाबद्दल महात्मा गांधी म्हणतात, शिक्षण म्हणजे मुलाच्या आणि माणसाच्या शरीराचा, मनाचा आणि आत्म्याचा विकास घडवणे.  त्यातच रवींद्रनाथ टागोर म्हणतात, शिक्षण म्हणजे ज्ञानासोबतच सौंदर्य आणि आनंदाचा अनुभव घेणे होय. 
           शिक्षणाबद्दल वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे विचार मांडलेत. प्रत्येकांच्या विचार करण्यात व अर्थ काढण्यात फरक आहे. जॉन ड्यूई म्हणतात, शिक्षण म्हणजे अनुभव आणि त्या अनुभवांवर विचार करण्याची प्रक्रिया. तसेच मारिया मॉन्टेसरी म्हणतात, शिक्षण म्हणजे मुलाला स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी देणे. पावलो फ्रेरी म्हणतात, शिक्षण म्हणजे सामाजिक न्यायासाठी संघर्ष करण्याची क्षमता निर्माण करणे. या व्याख्या व व्याख्यांमधून शिक्षणाबद्दलची व्यापक संकल्पना दिसून येते. एवढंच नाही तर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाबद्दल म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल, तो गुरगुरेल. परंतु सध्याच्या काळात असं घडत नाही. सध्याच्या काळात जो जेवढे उच्च शिक्षण घेतो, तो तेवढा गुलाम बनतो. त्यामुळंच आजच्या काळात उच्च शिकलेली मंडळी ही एखाद्या कारखान्यात, कार्यालयात मॅनेजर पदावर कार्य करतात. कोणी उच्च पदावरचे अधिकारीही बनतात. जे कारखाने एखाद्या श्रीमंत असलेल्या परंतु जास्त न शिकलेल्या व्यक्तीने काढलेले असतात. जे अधिकारी कमी शिकलेल्या व जनतेच्या भरवशावर निवडून आलेल्या आमदार, खासदारांच्या दबावात काम करीत असतात. ज्यांना एखादा विषय न पटल्यास आपले मतही मांडता येत नाही. अन् मांडलेच तर तबादबे किंवा निलंबन. त्यामुळं अशी परिस्थिती आपल्यावर येवू नये म्हणून बरीचशी मंडळी जी शिकलेली असतात, ती चूप बसतात. बोलणं भरपूर असतं मनात. परंतु त्या बोलण्याच्या भावनाच व्यक्त करता येत नाही. मग त्या व्यक्तीच्या उच्च शिक्षणाचा उपयोग काय? काहीच नाही. 
          ज्या खरं तर शिक्षण ही अध्ययन सुकर करणे, ज्ञान, कौशल्य, मूल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे. केवळ शिक्षकाने अध्यापन करणे, त्यासाठी प्रशिक्षणं घेणे व संचलीत संशोधन पद्धतीचा वापर आपल्या शैक्षणिक पद्धतीत करणे आणि हे शिक्षण वारंवार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणे. ते पुर्ण झाले की एखाद्या कारखान्यात पोट भरण्यासाठी नोकरी शोधणे व नोकरदार म्हणून काम करणे वा फारच झाले तर एखाद्या शाळेत अध्यापक म्हणून काम करणे, याला शिक्षण म्हणत नाहीत. शिक्षणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी व्याख्या केली. त्याला शिक्षण म्हणतात. परंतु त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या व्याख्येप्रमाणे कोणीही वागत नाही.
          शिक्षणाबद्दल व शाळेबद्दल विचार मांडतांना एखादा उच्चढ्रू शिकलेला शिक्षक ज्या खाजगी संस्थेत नोकरीला लागतो. त्या संस्थेतील संस्थाचालक जो एक ट्रस्ट चालवतो. त्या संस्थाचालकाला दबूनच त्याला चालावे लागते. कारण तो संस्थाचालक एक ट्रस्टी असूनही स्वतःला मालकच समजतो आणि नियुक्ती व निलंबन त्याच्या हातात असल्यानं तो केव्हाही शिक्षकांना कामावरुन काढून टाकू शकतो. शिवाय तो न्यायालयात गेलाच तर न्यायालयीन प्रक्रिया ही गुंतागुंतीची व वेळखावू असल्यानं, तशी ती त्या शिक्षकाला परवडत नफल्यानं शिक्षकही संस्थाचालक म्हणेल तीच पुर्वदिशा असे समजून वागत असतो एखाद्या गुलामागत. वर्गही शिकवितांना त्याला बोलायची उजागिरी नसते. शाळेतही त्याच्या मताचा व विचारांचा आदर केला जात नाही. विद्यार्थ्यांसमोर त्यांचा पदोपदी अपमानच केला जातो. असे जरी घडले तरी त्या शिक्षकांच्या अपमानावर न्याय मिळत नाही. ना पोलीस स्टेशन, ना न्यायालयात. ज्यातून संस्थाचालकांची हिंमत वाढते. म्हणूनच शाळेतील प्रत्यक्ष शिकविणारा घटक शिक्षक हा गुलाम म्हणून शाळेत कार्य करीत असतो. तो आपल्या शाळेतील संस्थाचालकाच्या विरोधात जात नाही. काही शिक्षक म्हणतात की मी संस्थाचालकांच्याच बाजूनं राहतो सर व माझ्या पत्नीलाही सांगीतलेले आहे की तिनंही तसंच वागावं. 
          महत्वपूर्ण बाब ही की जिथं शिक्षकच संस्थाचालकाचे व प्रशासनाचे गुलाम म्हणून वागतात. ते शाळेतील अभ्यासक्रम शिकवितांना दुसऱ्यांना अर्थात विद्यार्थ्यांना अक्कल वाटू शकतील काय? याचं उत्तर साहजीकच नाही असंच येणार. उदाहरण द्यायचं झाल्यास ती एक शाळा. त्या शाळेतील एक शिक्षक इतिहास शिकवीत होता. म्हणत होता की इंग्रज भारतात आले. ते अत्याचार करायला लागले. ते अत्याचार दूर करण्यासाठी भारतीय लोकं लढले. अशातच अचानक त्याचवेळेस त्या शाळेतील संस्थाचालक वर्गात आले. म्हणाले,
       "काय शिकवताय." शिक्षकानं उत्तर दिलं. 
        "इतिहास."
        "इतिहासात नेमकं काय?"
       "इतिहासात इंग्रज आले. ते भारतीयांवर अत्याचार करु लागले. त्यानंतर भारतीयांनी त्यांचा प्रतिकार केला. हे शिकवतोय."
         तो शिक्षक त्या संस्थाचालकांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत होता व थरथर कापतही होता. हेच चाणाक्ष नजरेतून न्याहाळत असलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. थोड्या वेळानं संस्थाचालक महोदय निघून गेले व तो शिक्षक विद्यार्थ्यांना पुर्वत शिकवायला लागला. त्यावर एक वर्गातील विद्यार्थी म्हणाला,
       "सर मला एक प्रश्न विचाराचाय."
         साधा प्रश्न असेल असा विचार मनात आणून शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला उभं करुन त्याला प्रश्न विचारायला लावलं. त्यावर तो विद्यार्थी म्हणाला,
         "सर, मगाशी ते साहेब आलते. तेव्हा तुम्ही का थरथर कापत होते?"
          ते विद्यार्थ्यांचं बोलणं. शिक्षकांनी त्याला चुपचाप बसायला लावलं. परंतु डसता बसता तो शेजारच्या विद्यार्थ्यांना म्हणाला की सरच आपल्यावर होणारा अत्याचार दूर करु शकत नाहीत, घाबरतात. मग हे काय आपल्याला चांगला इतिहास शिकवू शकतील?"
          विशेष म्हणजे शाळेत आपण कसे वागतो व कसे नाही हे विद्यार्थ्यांना दिसतंच. ते विद्यार्थ्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही. मग प्रतिक्रिया वेगळ्याच उमटतात. आपलं वागणं गर गुलामागत असेल तर तेही विद्यार्थ्यांना दिसतंच. ते आपल्याला त्याबद्दल प्रश्न विचारतातच. अन् ते सत्यही आहे. संस्थाचालकाचा धाक आपल्याला असावाच. परंतु तो आदरयुक्त असावा. त्यासाठी संस्थाचालकानं स्वतः आदर्श वागायला हवं, कर्मवीर भाऊराव पाटलांसारखं. तेव्हाच विद्यार्थीही चांगले घडतील. परंतु अलिकडील काळातील विद्यार्थी असे घडत नाहीत. ते भित्र्या प्रवृत्तीचेच घडतात. त्याचे कारण शिक्षक. शिक्षक हे भित्रे असतात व त्यांचेच गुण विद्यार्थ्यात उमटत असतात. शिवाय शिक्षक तरी भित्रे का राहणार नाहीत. आपल्यावर प्रशासनाकडून वा संस्थाचालकांकडून होणाऱ्या अत्याचारावर त्यांनी आवाज उठवतो म्हटलं तर संस्थाचालक व प्रशासन त्याचेवर जाणूनबुजून कोणतेही आरोप लावून त्याला प्रशासनाच्या बाहेर ठेवतो. त्यानंतर त्यानं आपल्यावर झालेल्या अत्याचारांविरुद्ध न्यायालयात धाव जरी घेतली तरी न्यायालयामार्फत त्याला लवकर न्याय मिळत नाही. जरी त्यानं उचललेलं पाऊल रास्त असलं तरी. या सर्व गोष्टी इतर लोकं पाहात असतात. त्यानंतर तोच बोध इतर शिक्षक घेतात. तद्नंतर ते आपल्यावर संस्थाचालक व प्रशासनाकडून होणारे अत्याचार निमूटपणे सहन करतात. गुलामागत राहतात, वागतात. परंतु अन्यायाच्या विरोधात वागत नाहीत. वागायला पाहात नाहीत. ते विद्यार्थ्यांनाही त्याच गोष्टी शिकवतात. ज्यातून आदर्श गुलाम निर्माण होतात. पुढे जावून असे विद्यार्थी देशाचे नागरीक बनताच त्यांच्यातही मालक बनण्याच्या आशा नसतात. त्या मावळलेल्या असतात. त्या आशाच मावळल्यामुळे त्यांच्यातील विचारांचं परीवर्तन आदर्श गुलामात झालेलं असतं.
          एकंदरीत सांगायचं झाल्यास शिक्षक जसा असेल, तसे विद्यार्थी घडतात. कारण लहान लहान इवली इवली मुलं लहानपणी जेव्हा शाळेत येतात. तेव्हा ते अनुकरणप्रिय असतात. ते शिक्षकांचं अनुकरण करीत असतात. त्यांचं वागणं, बोलणं, रहनसहन हे शिक्षकांसारखंच असतं. त्यांना कळत नकळत शिक्षकांचं वागणं कळतं. त्यातच जर शिक्षक आदर्श असतील तर त्याचे भाव त्यांच्या विद्यार्थ्यात उमटतात. शिवाय नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांचा विकास करायचा आहे. अशावेळेस आपलं वागणंच एखाद्या गुलामागत असलं वा आपलं वागणं दारु पिणारं, सिगारेट ओढणारं असलं वा आपलं वागणं जर आपल्या पेशाला शोभणारं ऑसलं तर त्याचे पडसाद आटल्या विद्यार्थ्यात नक्कीच उमटतात. तेव्हा आपणच शिक्षक म्हणून विचार करुन वागायला हवं. जेणेकरुन आपण घडवीत असलेली पिढी चांगली घडेल. त्यातून उद्याचे भावी विचारवंत व उद्योजक तयार होतील. जे दुसऱ्यांना कामे देतील. नव्हे तर आपल्या विचारांनी दुसऱ्यांनाही गुलामागत वागणे शिकवणार नाहीत.जे उद्याच्या विकसीत भारताचे आधारस्तंभ असतील यात शंका नाही.

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०