शिक्षण कसं असावं?
शिक्षक विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ, तो देशाचा आधारस्तंभ. तो जगाचाही आधारस्तंभच. जर विद्यार्थी मोठा झाल्यावर आपल्या शिक्षकांचा शोध घेवून त्यांच्या पायावर नतमस्तक होत असेल तर. कारण त्या नतमस्तक होण्यातून असं दिसून येतं की त्या शिक्षकाने नतमस्तक होणाऱ्या विद्यार्थ्याला चांगलं शिकवलं की ज्यातून तो घडला. मोठं स्थान प्राप्त केलं. अन् तो घडलाच नाही तर तो विद्यार्थी जवळ येणार नाही. आपल्या शिक्षकांच्या पाया पडणार नाही. नतमस्तक होणं दूरच. याबाबत दोन व्हिडिओंची माहिती देतोय. दोन्ही व्हिडिओ फेसबुकवर आहेत. एका व्हिडिओत एक मुलगा एके ठिकाणी एक शिक्षक अस्ताव्यस्त उभे असतांना आपली कार थांबवतो व त्या शिक्षकांच्या पायावर नतमस्तक होतो व तिथं उभं राहण्याचं कारण विचारतो. त्यावर शिक्षक विचारतो की तो कोण आहे. त्यावर तो विद्यार्थी त्यांना त्यांचा माजी विद्यार्थी असल्याचं सांगतो व म्हणतो की त्याला त्या शिक्षकानं घडवलं. परंतु ते काही शिक्षकांच्या लक्षात येत नाही. तसंच शिक्षकानं आपल्याला अमूक ठिकाणी जायचं आहे हे सांगितल्यावर तो विद्यार्थी त्यांना आवर्जुन त्या स्थानावर सोडूनही देतो. इथपर्यंत त्या शिक्षकाला आठवत नाही की तो मुलगा नेमका कोण आहे. तसं पाहिल्यास शिक्षकांच्या हातून भरपूर मुलं शिकून जातात. ते मोठे होतात. चेहरा बदलतो. त्यामुळं ते जवळून जात असतील तरी आठवत नाहीत. त्यांना फार ताण द्यावा लागतो डोक्याला. मात्र मुलांना शिक्षक आठवत असतात. तसंच घडतं या व्हिडिओत. शेवटी फार ताण दिल्यावर शिक्षकांना तो मुलगा आठवला व त्यांनी त्याला म्हटलं की तो तूच मुलगा आहे ना. जो जास्त मस्ती करीत होता. विद्यार्थी त्याला होकार देतो. त्यानंतर शिक्षक विचारतात की बघ तू त्यावेळेस ऐकला असता तर आज तू मोठ्या पदावर गेला असता. माझं बघ. मी माझ्या मुलांवर उत्तम संस्कार केले की माझा मुलगा अमूक अमूक कंपनीत मॅनेजर पदावर काम करतोय. त्यावर तो मुलगा शिक्षकांना उत्तर देतो की सर, ज्या कंपनीत आपला मुलगा आहे ना, ती कंपनी माझीच आहे. आपला मुलगा हुशार असल्यानं व त्यात चांगले संस्कार असल्यानं मी त्याला मॅनेजर बनवलंय. असं त्या विद्यार्थ्यानं उत्तर देताच शिक्षकांचा चेहरा पडला. त्यांना स्वतःच्या आविर्भावात बोलण्यावर पश्चाताप झाला.
पश्चाताप....... शिक्षकांनाही आपल्या शिकविण्यावर पश्चाताप व्हावा असंच शिक्षण मुलांनी शिकण्याची गरज आहे. शिवाय विद्यार्थ्यात चांगलेच संस्कार असावेत की नोकरी वा कामधंदे देतांना लोकं तुमचाच विचार करतील. जर आपल्यात इमानदारी हा गुण जर नसेल तर कोणीही आपल्याला कामावर ठेवणारच नाही. महत्वपुर्ण पदेही आपल्याला देणार नाहीत.
शिक्षण..... विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं केवळ आपल्याला नोकरी लागावी म्हणून नाही तर आपल्याला दुसऱ्याला रोजगार कसा देता येईल यासाठी घ्यावे. जर त्यानं समाजातील दोन चार अल्पशिक्षित लोकांना जरी रोजगार दिला तरी त्याच्या शिक्षणाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. एक असाच विद्यार्थी आवर्जुन एका शिक्षकाला भेटायला आला. शिक्षकानं विचारलं,
"किती शिकलाय?"
"दहावी."
"काय करतोस?" ते ऐकताच त्यावर त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं.
"सर, पानठेला चालवतोय." त्याचं उत्तर. त्यावर शिक्षकांनी आणखी उत्सुकतेनं विचारलं,
"चांगला चालतो काय?"
"होय सर, चांगलाच चालतो."
"किती पडताय महिन्याला?"
"जवळपास दिड लाख."
"पानठेला चालवणं गैरकायदेशीर आहे. मग पोलिसांच्या धाडी पडत असतील. कसे काय मॅनेज करतोय?"
"सर, पैशानं. पैशानं सगळं मॅनेज होतंय सर. सर, आपल्याला माहित नाही. जास्तच झालं तर न्यायालयात प्रकरणं जातात. वकीलच लढतात माझे खटले. मला न्यायालयात जावंही लागत नाही. सगळं काही पैशानंच होतं. कायदा खिशातच आहे माझ्या असं समजा."
"परंतु कधीकधी तुरुंगाचं दर्शनही होत असेल?"
"त्यात काय एवढं? मोठमोठे क्रांतीकारी गेलेत तुरुंगात. आजचे नेतेही जातात तुरुंगात. मी गेलो तर त्यात जास्त नवल काय?"
त्या मुलाच्या तोंडचं बोलणं. दिड लाख रुपये म्हणताच शिक्षकांची बोबडी वळली. कारण दिड लाख रुपये साधारण उच्च शिक्षण घेणारा मुलगाही महिन्याला मिळवू शकत नाही. हा मुलगा साधारण दहावी असेल, तो दिड लाख कमवतो. अन् आजचा जो काळ आहे, या काळात पैशाला जास्त किंमत असल्यानं त्या विद्यार्थ्याचं शिक्षण कमी असलं तरी त्याचे दिड लाख रुपये अतिशय महत्वपुर्ण आहेत. नाहीतर आजच्या काळात डॉक्टर, इंजिनिअर शिकलेली मुलं बेरोजगार म्हणून फिरत आहेत. काही इंजिनिअर आजच्या काळात वीस पंचवीस हजार रुपयावर काम करीत आहेत आणि शिकायला किती रुपये लागतात याची गणतीच नाही. त्यापेक्षा तो पानठेलेवाला बरा की जो जास्त शिकलेला नाही. परंतु महिन्याला तो दिड लाख कमावतोय. त्याला कायद्याचं ज्ञान नाही. परंतु पैशानं तो कायदेही विकत घेतोय. पुढं हाच मुलगा राजकारणात गेला. पैशाच्या भरवशावर निवडून आला व आमदार बनला. त्याला पुढे मंत्रीपदही मिळेल. याचाच अर्थ असा की शिक्षणातून जर आपण रोजगार मिळवीत असाल तर त्याला काही अर्थ नाही. त्यापेक्षा न शिकलेलं बरं. जर आपण शिक्षणातून दुसऱ्यांना रोजगार देत असाल तर ते अतिशय योग्य आणि त्या शिक्षणालाही अतिशय योग्य स्थान मिळेल. परंतु आजचं शिक्षण अशा स्वरुपाचं नाही.
शिक्षण हे उच्च प्रतीचं घ्यावं. घ्यायलाच हवं. कारण जास्त शिक्षण असेल तर आपल्याला जास्त प्रमाणात मुल्य प्राप्त होईल. जर आपण जासात शिकलो असलो तर समाजात आपली इज्जत वाढते. समाज आपला आदर करायला लागतो. अन् आपलं शिक्षण जर कमी असेल तर लोकं आपल्या जवळून जातात. परंतु कोणीच आपल्याला नमन करीत नाहीत. शिवाय शिक्षकांनीही सर्व विद्यार्थ्यांना चांगलंच शिकवायला हवं. एक व्हिडिओ फेसबुकवर असा आहे की जाया व्हिडिओत ती आई आपल्या लहानग्याला वाकुल्या दाखवत त्याचं मनोरंजन करते. त्याचं कारण असं की त्या मुलानं तिचं ऐकावं. कधी ती आपल्या लहानग्या बाळासमोर नाचतेही. कधी ती त्याला चिडवते. सांगण्थाचं तात्पर्य एवढंच की शिक्षकानेही आपल्यासमोर येणाऱ्या विद्यार्थ्यांना असंच शिकवावं. जेणेकरुन त्या विद्यार्थ्यात आपल्याबद्दल प्रेम निर्माण होईल. कारण तुमच्या शिकविण्यातून जे त्या विद्यार्थ्यात प्रेम निर्माण झालंय. त्याच प्रेमातून तो आत्मनिर्भर झालेला असेल, कोणी संशोधक झालेला असेल तर कोणी उद्योजक झालेला असेल. मग तो जास्त नाही शिकला तरी तो आपल्याजवळ येईल. नतमस्तक होईल व सांगेल की मी पानठेला लावलाय. परंतु सर, मी त्यातून दोनचार अल्पशिक्षितांना रोजगारही दिलाय. तेव्हा आपल्यालाच बरं वाटेल. वाटायलाच हवं. कारण तुम्ही देशाच्या विकासाच्या क्षेत्रात एक नवं पाऊल टाकलंय की ज्यातून अशी मुलं आत्मनिर्भर तर होतात. कधी तुमच्या शिकविण्यातून एखादं मूल कमी जरी शिकलं तरी एखादा शोध लावू शकतो. थॉमस अल्वा एडीसनसारखा. परंतु त्यासाठी तुम्हाला शाळेतून थॉमस एडीसनसारखं विद्यार्थ्यांना काढायची गरज नाही.
विद्यार्थी शिकण्यापेक्षा विद्यार्थी घडणे महत्वाचे आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांवर संस्कार करणे गरजेचे आहे. त्यासोबतच प्रेम करणे गरजेचे आहे. ज्यातून विद्यार्थ्यात आपूलकी निर्माण होईल व आपूलकीतून संस्कार वाढीस लागतील हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०