आपलं नेतृत्व सक्षम असावं?
नेतृत्वाला शालेय दृष्टीकोनातून जास्त महत्व आहे. नेतृत्व नसेल तर शाळा चालवणे कठीण होवून जातं. नेतृत्व ही संकल्पना व्यापक व मूलगामी आहे. समुहाचा नेता जेवढा चाःगला. तेवढा समूह अधिक बळकट होतो. यादृष्टीनं नेतृत्वाचं महत्व आहे.
नेतृत्वाबद्दल सांगायचं झाल्यास नेतृत्व करणारा व्यक्ती काय करतो? तर याचं उत्तर आहे, नेतृत्व करणारा व्यक्ती हा दिशा दाखवतो व आपल्या विचारानं प्रभावीत करतो. कधीकधी त्याला जास्त काम करण्याची गरज नसतेच. तो फक्त मार्गदर्शन करतो. त्यानुसार दिशा ठरत असतात. जर नेताच डामडौल स्वरुपाचा असेल, तर दिशा कळत नाहीत. आपण ऐकलं असेल पुर्वीच्या युद्ध कहाण्या. पुर्वीच्या युद्धात आपले भारतीय राजे हे हत्तीवरुन युद्ध करायचे. ज्या हत्तीवर आरुढ होणाऱ्या राजांना सरासरी कैद करता येत नव्हतं. शिवाय त्यांना शब्दभेदी बाण सुद्धा मारता यायचे. याच नेतृत्वगुणांमूळे आपले भारतीय राजे कित्येक लढाया जिंकत असत. त्यांना गुलाम करता येत नसे. ज्यातून पराभव होताच घोड्यावरुन येणारे विदेशी घोड्यावरुन पळून जात व त्यांना ते घोड्यावरुन आल्यानं लवकर पळता येत असे. म्हणतात की राजा दाहिरनं तेरा वेळेस युद्ध जिंकले व त्यांनी मोहम्मद बिन कासीमला तेरा वेळेस माफ केले. हे तेरा वेळेस युद्ध जिंकणं म्हणजे राजा दाहिरच्या नेतृत्वगुणांचा परीचय होय. तसेच चौदाव्या वेळेस पराभव होणं. हा नेतृत्वगुणांचा ऱ्हास होय. तसेच राजा पृथ्वीराज चव्हाण हे सतरा वेळेस युद्ध जिंकले. म्हणजेच त्यांचं नेतृत्वगुण हे सतरा वेळेस चांगलं होतं व अठराव्या वेळेस बिघडलं. ज्यातून त्यांना कंदाहारला बंदी बनवून नेल्या गेलं.
सध्या निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण सुरु आहे. यात सर्वांनी दहा मिनीट लवकर निघा व मनात कोणताही ताण न ठेवता, जाणीवपूर्वक पुढे लक्ष ठेवत सावकाश हळूवार वाहने चालवीत या. परंतु लवकर या. हे झालं नेतृत्वाअंतर्गत बोलणं. त्यावर जर कोणी उशिरा येत असेल आणि त्यावर उपाय म्हणून हजेरी स्वाक्षरी ऑनलाईन करणं ही आहे नेतृत्वाची कार्यवाही. परंतु कितीही झालं आणि कितीही बदडून सांगितलं. (बदडूनचा अर्थ जोरजबरदस्तीनं सांगणे.) तरीही शेवटी उशिरा आले तर काय होईल? प्रशिक्षणातून काढून टाकलं जाईल. काल रत्नागिरीला शिक्षकांच्या गाडींना अपघात झाला. का? तर धाक. नेहमीच्या सवयीप्रमाणे घरुन उशिरा निघणं. ज्यात लवकर पोहोचायचं आहे म्हणून गाडी वेगात चालवणं. अशातच अचानक पुढं वाहन येणं. त्यातच चालकाचं नियंत्रण सुटणं. मग ताशेरे. हुकूमशाही पद्धत म्हणणं. ज्यात आपल्याला वाटते की ही प्रशिक्षण राबविणाऱ्या यंत्रणेचं नेतृत्व गुण चुकलं. आता यावर विचार केल्यास कोणी म्हणतील की नेतृत्व बरोबरच आहे. ज्याप्रमाणे आपण वर्गातील मूल उशिरा आल्यास त्याचेवर रागावतो. कारण शिस्त पाहिजे. त्याप्रमाणे इथेही वेळ ही शिक्षकांनी पाळलीच पाहिजे. थोडं दहा मिनीट लवकर निघावं. त्याचेसाठी नेतृत्व गुण बरोबर ठरतं आणि जे अशा प्रकारच्या गोष्टी विचारात घेत नाहीत, त्यांचेसाठी इतर सर्वच गोष्टी. या प्रकारात नेतृत्व व प्रशासन. या दोन्ही गोष्टी दिसतात.
नेतृत्वाला कधी कधी लोकं वाईटही बोलतात. कारण असतं, नेतृत्वानं नियमात व गैरनियमात वागणं. विनाकारणच नेतृत्व आहे म्हणून नेतृत्वगुणांचा गैरवापर करणं. ज्यामुळं कधीकधी आपलंही आपल्या मुख्याध्यापकाशी पटत नाही. जर हीच बाब परिस्थितीशी जुळवून घेतल्या गेली तर सारंच बरोबर. परंतु अशानं भागत नाही. समजा याच प्रशिक्षणात कितीही वाजता या व कितीही वाजता जा. ही सवड असती तर कोणी कितीही वाजता आला असता व कितीही वाजता गेला असता. ज्यातून प्रशिक्षण व्यवस्थित झालंच नसतं.
विशेष सांगायचं म्हणजे शालेय स्तरावर अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला राबवीत असतांना जर आपलं नेतृत्व सक्षम करायचं असेल तर नियमात चालावंच लागेल. परंतु त्यात थोडी शिथीलताही द्यावी लागेल. प्रेमाने बोलावं लागेल. प्रेमाने वागवावं लागेल. नेतृत्व राबवीत असतांना व एक गोष्ट सांगतांना तीच गोष्ट प्रेमानं सांगता येते व तीच गोष्ट रागानंही. प्रेमानं सांगितल्याचा परिणाम रास्त होईल व तीच गोष्ट प्रेमानं सांगितली नाही तर त्याचा परिणाम वाईट होईल. प्रेमानं तर जग जिंकताच येतं. शत्रुलाही प्रेमानं जिंकता येतं. आपल्याला माहितच आहे बाहुबलीची गोष्ट. बाहुबली आणि भरत दोघं भाऊ. त्यांच्यात नेत्रयुद्ध झालं. विनाकारण प्रजेला त्रास नको म्हणून नेत्रयुद्ध. बाहुबली अजस्र आणि बलदंड व धिप्पाड देहाचा होता. त्याला अहंकार नव्हता व तो आपल्या वडिलांकडून मिळालेल्या एका लहानशा तुकड्यावर खुश होता. भरत बुटका आणि तो चक्रवर्ती सम्राट होता. त्याचं कारण तो शुरवीर असल्यानं त्याला त्याचे वडील ऋषभदेव कडून विस्तारीत राज्य मिळालं होतं. ज्यात भरताची महत्वाकांक्षा वाढली ववत्यानं आपल्या भावाचंही राज्य हस्तगत करण्याचं ठरवलं. भरतानं बाहुबलीला युद्धाचं आव्हान दिलं. ज्यानुसार नेत्रयुद्ध झालं. ज्यात सकाळपासून नेत्रयुद्ध सुरु झालं. बाहुबली उंच असल्यानं त्याची मान खाली व डोळेही खाली आणि भरत बटूक असल्यानं त्याची मान वर व डोळेही वर. ज्यात भरताची मान दुखली. त्यानंतर सुर्य डोक्यावर आला. त्याचे कडक उन भरताच्या डोळ्यावर पडले व भरताचे डोळे मिटले. साहजिकच भरत हरला व बाहुबली जिंकला. परंतु त्यानं आपल्या भावाचं राज्य घेतलं नाही. त्याला क्षणातच विचार आला. आपण काय करतो आहोत. एका लहानशा राज्याच्या तुकड्यासाठी आपण भावाशी युद्ध खेळतो आहोत. यासाठी कधीकाळी आपण आपल्या भावाचा जीव घेणार. त्यानं भराभर आपल्या ताकदीनं आपल्या डोक्याचे केसं उपडले आणि तो अरण्यात चालला गेला. ते राज्यही त्याला दिलं व तो अरण्यात निघून गेला. सांगण्याचा अर्थ असा की महान व्यक्तींचं नेतृत्व गुण हे संयमाचं असतं. म्हणूनच ते महान असतात.
नेतृत्वगुण हे आपलं राज्य सोडून जा असं सांगत नाही. परंतु प्रभाव पाडा असं सांगतं. ज्यातून आपल्याला आपल्याच राज्याचा कारभार व्यवस्थित सांभाळता यायला हवा. आपल्यात अहंकार नसावा. जेणेकरुन आपल्यानंतरही लोकांनी आपलं नाव घ्यायला हवं. आपल्याला माहितच आहे की जे चांगले राजे होवून गेले. त्यांचं आपण आदरानं नाव घेतो आणि जे झाले नाहीत. त्यांचं नाव घेत नाही. आपण बादशाहा अकबराला चांगलं म्हणतो. परंतु त्याच ठिकाणी बादशाहा औरंगजेबाला चांगलं म्हणत नाहीत. दोघेही एकाच धर्माचे शासक होते तरीही. कारण दोघांचे नेतृत्व गुण हे परस्परविरोधी होते.
आपल्या शाळेत आपले नेतृत्व गुण हे औरंगजेबासारखे नसावेच. ते गुण बादशाहा अकबरासारखेच असावेत. आपल्या नेतृत्व गुणातून बिरबल घडावेत. तानसेन घडावेत. अर्थात आपली शाळा अकबराच्या नवरत्न दरबारासारखी असावी. हे तेव्हाच होईल. जेव्हा आपले नेतृत्व गुण अकबरासारखे प्रभावी ठरतील.
महत्वपूर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे आपले नेतृत्व हे तुघलकी स्वरुपाचे नसावे की ज्यातून आपल्याला लोकं दुषणे देतील. आपलाही कु स्वरुपाचा इतिहास बनेल. आपण पदावरुन उतरल्यावर लोकं आपल्या जवळून जातील. टरंतु आपल्याला विचारणार नाहीत. विद्यार्थी आपल्या जवळून जातील. परंतु आपल्याला विचारणार नाहीत. मग आपलं नेतृत्व कसं असायला हवं?
आपलं नेतृत्व हे शारिरीक व मानसिक दृष्टीनं सक्षम असावं. तसेच ते सामाजिक व भावनिक दृष्टीनंही सोज्वळ असावं. आपण विद्यार्थ्यांच्या भावनांची कदर करायलाच हवी. आपल्या नेतृत्वात धैर्यशिलता, विकासाची मानसिकता, व इतरांना प्रेरीत करण्याची क्षमता असावी. आपल्या नेतृत्वात सहयोग व समुपदेशन असावे. आपले व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असावे. आपल्या व्यक्तिमत्त्वात लवचिकता व बहुकौशल्य असावे. तसंच आपल्या नेतृत्वात संघर्ष व समस्या निराकरण करण्याची ताकद असावी. तंत्रज्ञानाची पुरेशी जाणीव असावी. नाविण्यताही असावी. तसेच विपरीत परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता असावी आणि शेवटी आनंद असावा आपल्या नेतृत्वात. तरच आपण आपल्या विद्यार्थ्यांना आनंदी ठेवू शकतो. आनंद देवू शकतो. आपलं नेतृत्व हे भक्कम विकासाचा पाया असावा की शिक्षकांच्या वर्गखोल्यातून भक्कम स्वरुपाचे आदर्श विद्यार्थी तयार होतील. जे देश महासत्ता बनविण्याला मदत करतील. ते देशाची कधीही अधोगती करणार नाहीत. हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०