Anubandh Bandhanache - 43 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 43

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 43

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ४३ )
शहरातुन बाहेर दुर एका मोठ्या हॉटेलच्या गेट मधुन त्यांची गाडी आत जाते. 
तोपर्यंत प्रेम फक्त हाच विचार करत होता की, आता नक्की काय झालं असेल. आज तर यांच्यासोबत मेघाचे वडील पण नव्हते. मग आज जर काही झाले तर यांच्या तावडीतून मला कोण सोडवणार....? 
डोक्यात खुप काही येत होते, तेवढ्यात गाडी त्या हॉटेलच्या पार्किंग मधे थांबते. डॅड गाडी बंद करून बाहेर पडतात. प्रेम घाबरतच गाडीचा डोअर खोलून बाहेर येतो. त्याला असं पाहून ते तिथेच त्याला बोलतात.
डॅड : मी पुन्हा एकदा तुला सांगतोय... घाबरू नको...! आपण इथे फक्त बोलायला आलो आहोत, सो रिलॅक्स...!
* असं बोलुन ते त्याला त्या हॉटेल मधील गार्डन मधील एका टेबलजवळ घेऊन जातात. ते एका चेअर वर बसतात आणि प्रेमलाही समोर असलेल्या चेअर वर बसण्यासाठी सांगतात. 
प्रेम त्या चेअर वर बसतो. अजुनही तो गोंधळलेल्या अवस्थेत असतो. पुढे काय होणार होतं, त्याची काहीच कल्पना त्याला नव्हती. तसं बघायला गेलं तर, आज ते रागात नव्हते. थोडे शांतच होते. पण त्यांना काय बोलायचं असेल माझ्याशी, हाच विचार तो करत होता.
तेवढ्यात एक वेटर तिथे ऑर्डर साठी येतो. ते त्याला दोन कॉफीची ऑर्डर करतात. तो निघुन गेल्यावर हातातील मोबाईल आणि गाडीची चावी टेबलवर ठेवतात आणि प्रेमला बोलतात....
डॅड : नाव काय तुझं...प्रेम देशमुख... ना..?
प्रेम : हो साहेब...!
डॅड : हे बघ प्रेम आज मी जे बोलतोय ते कदाचित तुला आवडणार नाही, किंवा पटणार नाही, पण एका मुलीच्या बापाच्या आयुष्यात कधी असा प्रसंग येतो ना, तेव्हा त्या बापाची अवस्था काय असते. ते दुसरं कोणी समजु शकत नाही. 
मला माहित आहे, त्या दिवशी मी जे वागलो ते चुकीचं होतं, पण तिथे माझ्या जागी कुणीही असतं तरी तसंच काहीतरी वागलं असतं, कारण माझं माझ्या मुलीवर जिवापाड प्रेम आहे. आणि तिच्या जन्मापासून तिला आम्ही अगदी तळहातावरील फोडासारखी जपलीय. 
 तिच्या बाबतीत कधी असं काही होईल, हा विचार मी कधीच मनात सुद्धा आणला नव्हता.
कारण, माझा खुप विश्वास होता तिच्यावर... आणि तो तिने तोडला. आजपर्यंत तिला जे जे हवं होतं ते सर्वकाही देण्याचा प्रयत्न केला पण, एक बाप म्हणुन मी कुठे कमी पडलो ते माहित नाही.
मी असंही बोलत नाही की, तिने काही चुक केलीय, फक्त ती चुक करताना तिने आपल्या बापाचा विचार केला नाही, या गोष्टीचे खुप वाईट वाटतंय.
* ते बोलत असतात... तेवढ्यात एक वेटर तिथे कॉफी घेऊन येतो. तो कॉफीचे दोन्ही कप टेबलवर ठेऊन निघुन जातो. ते कॉफीचा कप उचलतात आणि प्रेमला सुद्धा कॉफी घ्यायला सांगतात. 
एक सिप पिऊन ते पॉकेट मधुन सिगरेट बॉक्स आणि लायटर बाहेर काढतात. त्यातील एक सिगारेट काढून ते पेटवून त्याचा धूर एका साइड ला सोडतात. 
आजवर प्रेम ने त्यांना कधी एवढं हळवं होताना पहिलं नव्हते. हे सर्व बोलताना त्यांच्या त्या ओलसर झालेल्या डोळ्यातलं अंजली बद्दलचं प्रेम त्याला दिसत होतं. आज तो त्याचं एक वेगळं रूप पहात होता. 
कॉफी पित पित ते इकडे तिकडे पहात सिगरेट ओढत होते. प्रेम पण मधुन मधून कॉफीचा एक एक सिप घेत होता. थोड्या वेळात ती कॉफी आणि सिगरेट संपल्यावर ते पुन्हा बोलू लागले....
डॅड : सॉरी...! पण आज मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे. ते म्हणजे 'माझी मुलगी मला परत दे.'
* त्यांच्या या अशा बोलण्याने प्रेम गोंधळुन जातो, त्याला काय बोलायचं ते सुचत नव्हते. तरीही तो बोलतो. 
प्रेम : सॉरी साहेब...! पण आता आमच्यात असं काहीही नाही. गेले कित्येक महिने आमच्यात कोणत्याही प्रकारचे बोलणे झालेलं नाही. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे, मी सिद, मेघा कोणालाही कॉन्टॅक्ट केलेलं नाही. त्यांना माहितही नाही की मी मुंबईत आहे ते. साहेब...! मला माहित आहे, माझ्यामुळे तुम्हाला खुप त्रास सहन करावा लागत आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागतो. जे काही झाले, ती माझी एक खुप मोठी चुक होती आणि ती चुक मी मान्य केलीय, आणि पुन्हा मला तसं काही करून तुम्हाला त्रास द्यायचा नाही. 
डॅड : ते मी समजु शकतो. कदाचित मी तुला ओळखायला उशीर केला. मला माहित आहे, टाळी एका हाताने वाजत नाही. ती जरा लाडात वाढलीय, तिने तुला फोर्स केला असेल, पण जे झालं ते झालं. पण एक मुलगी म्हणुन तिने हे सर्व करताना आपल्या बापाचा थोडा तरी विचार करायला हवा होता. आजपर्यंत तिने जे मागितलं ते सर्व काही तिला दिलं, त्याबदल्यात तिने आम्हाला काय दिलं तर हे...😔
* डॅड खुपच भाऊक झाले होते. त्यांचा चेहरा आणि पाण्याने भरलेले डोळे, सर्व काही सांगत होते. 
बोलता बोलता ते पुन्हा एक सिगरेट काढून ते पेटवून ओढायला लागले होते. 
प्रेम शांतपणे त्याचं बोलणं ऐकुन घेत होता. आपल्या लाडक्या मुलीने असे काही पाऊल उचलले तर एका बापाची अवस्था काय होते, हे तो जवळुन अनुभवत होता. या सर्व गोष्टीला कुठेतरी आपणही जबाबदार आहोत याची खंत त्याला वाटत होती.
सिगरेट संपल्यावर डॅड पुन्हा बोलू लागले...
डॅड : तुला माहितेय आज तिची अवस्था काय आहे...? त्या दिवशी तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. नशिबाने ती त्यातुन वाचली. पण त्या दिवसापासून तिने खाण्यापिण्याकडे पुर्णपने दुर्लक्ष केलं आहे. पूर्ण सुकून गेलीय ती...!
एक बाप म्हणुन मलाच पाहवत नाही तिच्याकडे. आणि मी काहीच करू शकत नाही याचे जास्त वाईट वाटते. 
* त्यांचे बोलणे ऐकुन त्यालाही धक्का बसतो, अंजलीने सुसाइड करण्याचा प्रयत्न केला हि गोष्ट त्याला खुप भीतीदायक वाटते, तो स्वतःला सावरत त्यांना बोलतो...
प्रेम : सॉरी साहेब...! माझ्यामुळे कदाचित हे सर्व झालं आहे, या सर्वासाठी मीही तितकाच जिम्मेदार आहे, पण आता मी काय करू शकतो...! तुम्हीच सांगा...?
डॅड : हो...! तुच तिला यातुन बाहेर काढू शकतो. मी हे बोलतोय ते समजुन घे, तु त्याचा वेगळा अर्थ काढू नको.
पहिली गोष्ट जर तिला यातुन बरं करायचं असेल तर तिला जे हवं आहे ते तिला पाहिजे. म्हणजे ती अजुन तुला विसरलेली नाही. आणि जर तुझं पण खरच तिच्यावर प्रेम असेल, आणि तुलाही तिच्यासोबत रहायचं असेल तर तुझ्याजवळ एकच पर्याय आहे, 
तो म्हणजे तुला आमच्या कास्ट चा स्वीकार करावा लागेल. हे जर तुला मान्य असेल तर, मी तुला माझ्या कंपनीत एक चांगल्या पगाराची नोकरी देऊ शकतो. भविष्यात पुढे तुम्हाला एखादं चांगलं घर घेऊन देऊ शकतो. 
मला माहित आहे तुझ्यासाठी हे सर्व करणं खुप अवघड आहे. पण हवं तर तु यासाठी थोडा वेळ घे, आणि मग मला सांग...माझी काही हरकत नाही. 
हा एकच पर्याय आहे माझ्याजवळ जेणेकरून, मी माझ्या मुलीला जे हवं ते देऊ शकतो. आणि माझ्या समाजातील, आणि फॅमिली मधील लोकांना समजावू शकतो. बघ तु विचार कर याबद्दल....
* त्यांचे हे असे बोलणे ऐकून प्रेमला धक्काच बसतो. यावर त्याला काय बोलायचं तेही सुचत नव्हते. थोडा वेळ विचार करून तो डॅड ना बोलतो....
प्रेम : सॉरी साहेब...! तुम्ही जे बोलताय ते सर्व ठिक आहे, पण मला नाही वाटत की, हे शक्य आहे, कारण माझ्या परिवारामध्ये हे कोणी स्वीकारेल असं वाटत नाही. 
डॅड : तु सध्या फक्त तुझा विचार कर, आता जे तु कमवतोय त्या पैशात तु तुझ्या फॅमिलीला खरच सुखी ठेऊ शकतो का...? अजुन तुझे स्वतःचे घर नाही, आणि मी पाहिलंय, लोकांची अख्खी लाईफ निघुन जाते मुंबई मधे घर घेण्यासाठी. तु आहे या पगारात फक्त तुझ्या फॅमिलीच्या निवडक गरजा भागवू शकतो. त्यापलीकडे तुला काहीही करता येणार नाही. 
भविष्याचा विचार कर, किती वर्ष लागतील तुला स्वतःचे घर घ्यायला, अशा परिस्थितीत, काही वर्षांनी तुझा पगार थोडासा वाढेल पण दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. तो तेव्हाही कमीच पडणार आहे.
अंजु अजुन शिकतेय, आणि मला या गोष्टीची खात्री आहे की, काही वर्षात ती तिच्या करिअर मधे नक्कीच काहीतरी चांगलंच अचिव्ह करेल. आणि भविष्यात त्याचा फायदा तुलाच होणार आहे. आणि त्यासोबत आम्ही आहोतच तुमच्यासाठी....! एक हॅप्पी लाइफ जगाल तुम्ही...! 
बघ पुन्हा एकदा विचार कर. फक्त मी सांगतोय म्हणुन नव्हे. मी हे बोलतोय कारण, मला माझ्या मुलीचं सुख हवं आहे. त्यासाठी एका बापाचा हा प्रयत्न आहे असं समज. तु विचार करून सांगु शकतो. 
फक्त एक गोष्ट सांगतोय, तुझ्या निर्णयावर खुप गोष्टी अवलंबून आहेत. तुला पटत नसेल तर एकदा तिला लांबुन तरी बघ...! तुलाही ओळखता येणार नाही, अशी तब्येत झालीय तिची. 
तिला यातुन बाहेर काढण्यासाठी मला जे योग्य वाटले. ते मी तुला बोलतोय....! बाकी तुझी मर्जी.
* त्यांच्या अशा बोलण्याने प्रेम अजुनच गोंधळुन जातो. थोडा वेळ विचार करून तो त्यांना बोलतो...
प्रेम : साहेब...! तुम्ही बोलताय ते सर्व पटतंय मला, पण मला थोडा वेळ हवा. कारण एवढा मोठा निर्णय मी असा सहज घेऊ शकत नाही. त्याबद्दल सॉरी...!🙏🏻
डॅड : ठिक आहे ना...! पुढील भविष्याचा आणि अंजु चा विचार करून, प्रयत्न कर तु तुझ्या फॅमिलीला समजवण्याचा, यामधेच सर्वांचे हित आहे.
प्रेम : हो साहेब..! मी कळवतो तुम्हाला...!
* त्यांचे बोलणे झाल्यावर डॅड आणि तो तिथून जायला निघतात. जाताना ते काउंटर वर बिल पेड करतात आणि पार्किंग मधे जाऊन गाडी बाहेर घेऊन येतात. कारचा पुढचा डोअर ओपन करून ते प्रेमला बसायला सांगतात. 
तो त्यांच्यासोबत पुढे बसतो. गाडीमध्ये जाताना ते त्याला बोलतात....
डॅड : आपल्यामध्ये आज जे काही बोलणं झालं आहे ते कोणालाही समजता कामा नये. 
प्रेम : नाही समजणार साहेब..., कारण मी इकडे आलोय ते कोणालाही माहीत नाही, व मी माझा मोबाईल नंबर सुद्धा चेंज केला आहे.
डॅड : ओके....! एक काम कर, माझा नंबर घे, आणि तू यावर विचार करून काय ते कळव मला. 
* असं बोलुन ते त्यांचा नंबर प्रेमला देतात. प्रेम त्यांचा नंबर मोबाईल मधे सेव्ह करून ठेवतो. 
गाडी प्रेम राहतो त्या नगराजवळ येऊन मेन रोड वर थांबते. प्रेम गाडीचा डोअर ओपन करून खाली उतरतो. जाताना तो त्यांना बाय करतो आणि तिथून घरी येतो. 
आज त्याने अंजूच्या डॅड चे एक वेगळे रूप अनुभवले होते. हि तिच व्यक्ती आहे ज्याला अंजू इतकी घाबरत होती. त्याचं हे दुसरं रूप तिने कधी पाहिलं असेल का...? कदाचित नाही...? 
उरला प्रश्न त्यांनी दिलेल्या पर्यायाचा, खरच हे शक्य आहे का...? त्याला बाकीच्यांचा काही फरक पडत नव्हता, पण आई....! ती तयार होईल या गोष्टीला...?
अशक्य वाटत होते, पण बोलुन बघायला काय हरकत आहे. रात्री खुप वेळ या विचारांनी त्याची झोप लागली नाही. 
काही दिवसांनी तो दोन तीन दिवसांची सुट्टी घेऊन गावी येतो. 
एक दिवस संध्याकाळी तो आईसोबत अंगणात बोलत बसलेला असतो. बोलता बोलता तो विषय काढतो...
प्रेम : आई....! एक गोष्ट विचारू...?
आई : कसली गोष्ट...! विचार....? 
प्रेम : हे बघ....! मी जर तिकडे मुंबईत एका श्रीमंत मुलीसोबत लग्न केलं तर...?
आई : चांगलंच हाय की मग....!😊
प्रेम : आणि ती मुलगी जर दुसऱ्या जातीची असेल आणि ती बोलत असेल की, माझ्यासोबत लग्न करायचे असेल तर तुला आमची जात स्वीकारावी लागेल तर....?
आई : ( रागानेच ) काय...? डोसकं बीसकं फिरलय का तुझं....! तिला म्हण.... तुझं पैसं ठेव तुझ्याकडच...! पैशासाठी जात बदलणारी आपली जात न्हाय....! गावचं देशमुख हाय आपून....! तोंड दाखवायला जागा राहणार न्हाय गावात....! आसं काय केलं तर....!
* प्रेम आईच्या त्या बोलण्याने घाबरुनच जातो...
आणि तिला बोलतो....
प्रेम : अगं...! मस्करी केली तुझी जरा...!😊
आई : मस्करीत पण बोलू नको हे, आणि आसं काय करायचं आसल ना, तर मग तिकडच राव्हा. गावाला थोडं बी दाखवू नगा...! आपल्या आख्ख्या खानदानीत कुणी आसं काय करायची हिंमत केली न्हाय आजुनपर्यंत...
प्रेम : अगं...! शांत हो...! अशी बोलतेय, जसं की मी लग्न करून तिला घरीच घेऊन आलोय....!😊
आई : तसलं काय बी केलं आसल ना..., तर इसरून जायचं मग, मी पण समजीन मला एकच पोर हाय म्हणून....😠
प्रेम : अगं हो....! किती बोलतेय...! मी असच मस्करीत बोलत होतो. तु तर एकदम खरं खरं घडल्यासारखं वागायला लागलीस.
आई : मग कशाला ह्यो ईशय काढायची गरज व्हती, मला आसलं काय बी सहन होत न्हाय. माहितीय नव्ह तुला....!😠
प्रेम : बरं सोड ते... दुसरं काहीतरी बोल...!
आई : बारक्याची बारावी होईल आता, पुढं काय करायचं त्याचं, नोकरी बिकरी बघ त्याला तिकडच, बास झालं शिक्षण....!
प्रेम : अगं पण शिकु दे त्याला अजुन पुढे,...!
आई : कशाला...! नोकरी करत शिकलं त्यो...!
प्रेम : आणि तिकडे ताईकडे दोघे पण राहणार, बरं नाही वाटत ते...!
आई : म्हणूनच बोलतेय...! एखादी खोली घे तिकडं भाड्यानं आणि तिथं राव्हा. झालं ना एवढी वर्ष सांभाळलं तिनं तुला...! आता बास झालं...! बघा आपलं आपलं...! 
प्रेम : ठिक आहे....! गेल्यावर मी बघतो खोली, पण तु पण मुंबईलाच राहायचं आमच्यासोबत...!
आई : मी तिकडं येऊन काय करू....? नगं मी हितचं बरी हाय...!
प्रेम : मग आम्ही दोघं काय हाताने जेवण बनवून खाऊ का...?
आई : त्यात काय झालं मग.... बनवा की मग...?
प्रेम : अगं आई....! नाही जमत ते, कामावरून कधी यायला उशीर होतो. मग कंटाळा आलेला असतो. मग जेवण बनवणार कधी, आणि खाणार कधी...? 
त्यापेक्षा तु पण चल आमच्यासोबत... आणि तसंही तुला एकटीला इथे सोडुन तर नाही जाणार आम्ही. 
आई : बरं...! ते बघू..., पुढच्या पुढे, तु आधी गेल्यावर खोलीचं बघ....! त्याची परीक्षा संपली की मग, तिकडं यायला रिकामं...!
* आईच्या या बोलण्याने प्रेमला त्याचे उत्तर मिळाले होते. काही झालं तरी अंजूच्या डॅड नी जे सुचवलं होतं ते कदापि शक्य नव्हते. तो आईच्या बोलण्यापलीकडे जाऊ शकत नव्हता. जर त्याने असं काही केलंच तर, त्याची आई त्याला कधीच स्वीकारणार नाही हे त्याला माहीत होतं, पण आज ते पुरतं कळलं होतं.
अंजु सोबत लग्न करून त्याचं सुखी आयुष्याचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकणार नव्हते. या गोष्टीची त्याला खात्री झाली होती. कारण तो त्याची आई आणि भावाला अशा परिस्थितीत सोडुन, स्वतःच सुख बघेल असा विचार तर मुळीच करू शकत नव्हता.
मग आता पुढे काय करायचं....?
अंजलीच्या डॅड ना काय सांगायचं...? 
अजुन एक दिवस गावी राहून तो पुन्हा मुंबईला निघुन येतो. एक दिवस तो अंजलीच्या डॅड ना कॉल करून त्यांना त्या दिवशी भेटतो. त्यांच्या गाडीमध्येच बसुन ते बोलत असतात... प्रेम त्यांना बोलतो...
प्रेम : सॉरी साहेब...! पण तुम्ही जो विचार करत होता तसं काही होऊ शकणार नाही. मी गावी जाऊन आईला भेटुन आलो. तिला हे सर्व बोललो, पण माझी आई हे सर्व स्वीकारायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीत मी त्यांना असं सोडु पण शकत नाही.
डॅड : मला थोडी कल्पना होती या गोष्टीची, खुप कठीण असतं हे समजावणं गावच्या लोकांना... पण तु अजूनही विचार कर की, किती दिवस ते तुझा राग धरून राहणार आहेत. शेवटी ती आई आहे, थोड्या दिवसांनी कधी ना कधी ती स्वीकारेलच तुम्हाला...!
प्रेम : नाही साहेब...! तसं तुम्हाला वाटतं, पण मी माझ्या आईला चांगलं ओळखतो. तिने खुप जिद्दीने कोणाचीही मदत न घेता आम्हाला लहानाचे मोठे केले आहे. ती या गोष्टीला कधीच तयार होणार नाही, आणि भविष्यात ती कधीच आम्हाला स्वीकारणार नाही. आणि एवढी मोठी रिस्क मी सध्या तरी घेऊ शकत नाही, कारण अजुन तरी माझ्या पगारावर माझं कुटुंब चालत आहे. भाऊ अजुन लहान आहे. त्यामुळे मी त्यांना अशा परिस्थितीत सोडुन फक्त स्वतःचा विचार नाही करू शकत. 
डॅड : तु बोलतोय तेही योग्य आहे पण, मग यातुन काय मार्ग काढायचा...?
प्रेम : तुम्ही सांगा...! हे सोडुन तुम्ही बोलाल तसं मी काहीही करायला तयार आहे. 
* डॅड त्याचे असे बोलणे ऐकून थोडा वेळ शांत विचार करत बसतात. आणि थोड्या वेळाने पुन्हा प्रेमला बोलतात...
डॅड : तु एखादी चांगली मुलगी बघुन लग्न करून टाक...! 
* प्रेम त्यांच्या बोलण्याने गोंधळुन जातो... थोडा वेळ विचार करून त्यांना बोलतो...
प्रेम : त्याने काय होणार आहे, आणि एवढ्या घाईत ते शक्य तरी होईल का...?
डॅड : हे बघ...! आता हा एकमेव पर्याय आहे की, जेणेकरून अंजु तुझ्यापासून लांब राहील. तिला जर हे कळलं की, तुझं लग्न झालं आहे, तर पुढे तिला विचार करायला काहीच उरणार नाही. 
प्रेम : पण हे इतक्या सहजासहजी कसं शक्य आहे सर....! मला कोण लगेच मुलगी द्यायला तयार होणार आहे. अजुन माझा रहायचा पत्ता नाही. मीच अजुन बहिणीकडे राहतोय.
डॅड : हे बघ प्रेम...! तु मला वचन दिलं आहेस की, आधीचा पर्याय सोडुन तु काहीही करायला तयार आहेस. मग आता हा एकच मार्ग आहे. ज्यातून आपण बाहेर पडू शकतो. आणि त्यासाठी लागणारी मदत मी तुला करायला तयार आहे. तु फक्त एखादी मुलगी बघ तुझ्या किंवा तुझ्या आईच्या पसंतीने... आणि तुमच्या लग्नासाठी जो काही खर्च होईल तो मी करायला तयार आहे. आणि जर तुला त्यासाठी तुझं स्वतःच घर हवं असेल तर तेही मी तुला घेऊन देईन.
प्रेम : त्याची काही गरज नाही पण... एवढ्या घाईत हे सर्व शक्य होईल असं वाटत नाही. त्यासाठी मला थोडा वेळ द्या...! आणि दुसरी गोष्ट म्हणजे, हे सर्व अंजलीला समजल्यावर पुन्हा ती स्वतःला काही त्रास तर करून घेणार नाही ना...?
डॅड : त्याची काळजी तु करू नको. मुळात तिने आम्हा दोघांनाही प्रॉमिस केलं आहे की, यापुढे काहीही झालं तरी असं काही करणार नाही म्हणुन. आणि मला तिच्यावर विश्वास आहे, तिला त्रास होईल या गोष्टीचा, पण तो थोडे दिवस... काही दिवसांनी ती विसरून जाईल. मग तु तुझ्या लाईफ मधे बिझी होशील, आणि ती तिच्या....! 
प्रेम : तुम्ही बोलताय तर ठिक आहे. मी प्रयत्न करतो यासाठी...!
डॅड : हो...! पण शक्य तितक्या लवकर, कारण अंजुला जर यातुन लवकर बाहेर काढायचं असेल तर मग उशीर करून चालणार नाही. त्यासाठी तुला माझ्याकडून हवी ती मदत करायला मी तयार आहे.
प्रेम : ठिक आहे साहेब...! मी कळवतो तुम्हाला लवकरच...!
डॅड : ठिक आहे.... शक्य तितक्या लवकर प्रयत्न कर.
प्रेम : हो साहेब... नक्कीच...!
* असं बोलुन तो त्यांच्या गाडीतुन उतरतो आणि घरी येतो. सर्व आवरून झाल्यावर रात्री झोपताना त्याच्या डोक्यात खुप विचारांची गर्दी झाली होती. 
तो पुन्हा पुन्हा तोच विचार करत होता, काय होईल जर मी कास्ट बदलून अंजली सोबत लग्न केले तर...? काही दिवसांनी तर आई आमचा स्वीकार करेन ना...?
आणि कधीच नाही केला तर...? आणि सध्या अशी परिस्थिती नाही की, मी आई आणि लहान भाऊ यांना सोडून फक्त स्वतःचा विचार करू शकतो. ते कदापि शक्य नव्हते. याचा अर्थ अंजलीसोबत पुढील आयुष्याचा विचार करणं बंद करावं लागेल. तेही कायमचं....
मग उरला दुसरा पर्याय... जर खरच तिच्या भल्यासाठी का होईना मला आत्ता लवकरात लवकरच लग्न करणे भाग आहे. पण अशा परिस्थितीत कोण मुलगी तयार होणार आहे माझ्याशी लग्न करायला...?
प्रयत्न तर करायला हवेत, यातुन कायमचं बाहेर पडायचं असेल तर अंजलीला विसरावं लागेलच. आणि तिला यातुन बाहेर काढण्यासाठी मला लवकरात लवकर लग्न करावं लागेल. 
खुप विचार करून अखेरीस तो या निर्णयावर ठाम होतो. आणि मनोमन तिला सॉरी बोलतो..."सॉरी अंजु मी तुला दिलेले वचन पाळू शकलो नाही, शक्य झाल्यास मला माफ कर. कारण माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नाही. आणि कदाचित यापुढे भविष्यात आपण कधीच भेटणार नाही आहोत."😔
या अंतर्मनातील आवाजाने त्याचे डोळे भरून आलेले असतात. आजपर्यंत तिच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोर एकामागून एक असे येत असतात. मधेच डोळ्यांतील अश्रूंची धार ओघळून कानापर्यंत पोचते. ती पुसत तो पुन्हा त्याच विचारात मग्न होऊन जातो. आता यापुढे या आठवणीच फक्त उरणार होत्या. प्रत्यक्षात मात्र तिला कधीच भेटता येणार नव्हते. या गोष्टीचे त्याला खुप वाईट वाटत होते.
पण हा प्रवास इथपर्यंतच होता...! अशी मनाची समजूत घालून तो झोपण्याचा प्रयत्न करतो. जवळ जवळ पहाट व्हायला आलेली असते. तेव्हा त्याचा डोळा लागतो.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️