अशीही एक शोधमोहीम राबवावी?
*सध्या देशात पार्किंगची गैरसोय होत आहे. लोकं अवैध पार्किंगने परेशान आहेत. कारण रस्त्यारस्त्यावर गाड्या पार्किंग केल्या जातात व रस्ते अडवले जातात. यात काही धार्मिक स्थळं, काही शाळा महाविद्यालये, काही दुकाने, काही शिकवणी वर्ग व काही आम लोकं की जे गल्लीबोळात राहतात. अशा सर्वच ठिकाणी शोधमोहीम राबवली व दंड लावण्याचे प्रकार प्रशासनानं केले तर देश सुधारण्यासाठी निधी उपलब्ध होवू शकतो. तसाच देश एकप्रकारे सुजलाम सुफलाम करता येवू शकतो व देशाला सुधारणेच्या कक्षेत आणू शकतो.*
रस्ता आणि त्यातही आमरस्ता हा काही कोणाच्या बापदादाचा नसतो की त्यावर कोणी अतिक्रमण करावं. परंतु सध्या भारताच्या उपराजधानीत तेच सुरु आहे. रस्त्यारस्त्यावर पार्किगची जागा नसूनही बरेचसे दुकानदार आपले लहान उद्योग सुरु करतात. त्यातच त्या उद्योगधंद्यावर लोकांची झुंबड उडून लोकांच्या ज्या गाड्या रस्त्यावर लागतात. त्यानं रहदारी जाम होते. लोकांना साधं पायी देखील चालायला जागा उरत नाही. त्यामुळं अशा काही काही आमरस्त्यावर गर्दी झालेली आहे. तो आमरस्ता असूनही. शिवाय ती एक चिंतेची बाब ठरलेली आहे. याबाबत दोनचार दिवसापुर्वी नागपुरच्याच एका सुप्रसिद्ध दैनिकात एक बातमी छापून आली होती व त्या बातमीत लिहिले होते की नागपूरच्या मुख्य बसस्थानकाजवळ अवैध खाजगी बसचालकाचे थांबे असल्याने रहदारीला अडचण निर्माण होते. शासनानं याकडे लक्ष वेधावं. परंतु कोण ऐकतोय. ना त्याकडे नागपूरच्या महानगरपालिकेचं लक्ष आहे ना कोणता व्यक्ती त्यावर बोलू शकत. तसं पाहिल्यास लोकं सामान्य लोकांचं ऐकतच नाही अन् सामान्य व्यक्तीही अशा प्रकरणात कोणाकडे तक्रारही करीत नाही. त्याचं कारण आहे, ज्या कोणत्या सामान्य माणसानं त्याची तक्रार केली. त्याच सामान्य व्यक्तीचं नाव जाहीर करुन त्यालाच धारेवर धरलं जातं. मग ज्याचं नाव जाहीर होतं, त्या सामान्य माणसांचा राग धरला जातो व त्याचा वचपा काढण्थाचे प्रयत्न केले जातात. हेच नाव जर प्रशासनानं गुप्त ठेवलं तर सामान्य व्यक्ती अशा प्रत्येक समस्येची तक्रार करु शकते व प्रशासनात सुधार करण्यासाठी तो मदत करु शकतो. जर त्याचं नाव ट्रशासनीक व्यवस्थेत गुप्त ठेवलं जात असेल तर.......
नागपूरच नाही तर अख्ख्या देशातील शहरे अशा अवैध पार्कींगने त्रस्त आहेत. काही ठिकाणी तर लोकांनी अख्खे रस्तेच गायब करुन टाकले आहेत. ते रस्ते आमरस्ते जरी असले तरी ते खाजगी रस्ते बनलेले आहेत. या रस्त्याची जागा दुकानदारांनी नाही तर आम लोकांनी हडप करुन टाकलेले आहेत. प्रशासनाला त्याची माहिती नाही आणि कशी असेल. कारण प्रशासनाकडे कोणीच तक्रार केलेली नाही आणि करुही शकत नाहीत. कारण तक्रारदाराला प्रकरणात गुंतविण्यात येतं म्हणून. हे जीवन आहे व जगणं अतिआवश्यक आहे. असं जीवन जगत असतांना बरीचशी मंडळी ही लोकांना त्रास देत देत जगत असतात. त्यात ते आपल्यावर होणार असल्याच्या परिणामाची पर्वा करीत नाहीत. होईल तेव्हा होईल कारवाई. आज तर आपलं भागतं ना. असा विचार करुन लोकं अख्खा रस्ताच ताब्यात घेवून टाकतात. हे सामान्य माणसं व दुकानदारच करीत नाहीत तर काही धार्मिक स्थळंही आमरस्त्याला धार्मिक स्थळाचा रस्ता बनवून टाकतात. काही ठिकाणी तर चक्कं धार्मिक स्थळ अगदी रस्त्याच्या मधोमध असतात. ज्यात गर्दी होते व गाड्या लावण्यातून रस्ता रहदारी जाम होते. त्याठिकाणी व्यक्ती काहीच करु शकत नाहीत. कारण ती धार्मिक स्थळं श्रद्धेची स्थळं असतात व तशी श्रद्धा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. ते धार्मिक स्थळाच्या नावावर बोंब मारत नाहीत.
हिंस्र प्राणी..... हिंस्र प्राणी हे पाळीव प्राण्यांना मारुन खात असतात. तसंच मानवाचंही आहे. मानव प्राण्यातही जो बलशाली घटक असतो. तो घटक गरीब, लाचार घटकावर अत्याचारच करीत असतो. हे जीवन जगणं काही सोपं नाही. अशाच बलशाली लोकांचा सामना करीत करीत जीवन जगावं लागतं. ज्यातून आपल्याला महाभयंकर वेदना होत असतात. जीवन जगत असतांना काही लोकं निव्वळ त्रासच देत असतात रस्त्यावरच कब्जे मारुन. ते केवळ प्रशासनाच त्रास देत नसतात तर त्यांचा त्रास सामान्य लोकांनाच होतो. ते केवळ त्रास देण्यासाठीच जन्मास आलेले असतात. असंच वाटायला लागतं. ते म्हणतात की आम्ही कुणाला त्रास देत नाहीत. परंतु त्यांचा कळत नकळत त्रास वाटतोच. ही झाली आम रस्त्याची गोष्ट. काही वस्तीतील लोकंही असेच असतात. एक याबाबत उदाहरण आहे. या उदाहरणात सिमेंटच्या बांधकामाचं उदाहरण देता येईल. अलिकडील काळात रस्त्यावर सिमेंटचे बांधकाम झाले आहे व रस्ते फारच उंच आणि घरे रस्त्याच्या खाली गेली आहेत. त्यातच लोकं रस्त्याच्या लगतच असलेले फुटपाथ वापरत आहेत. या फुटपाथवर गडर बनवलेले आहेत. ज्या गडरातून रस्त्यावर गोळा झालेले पाणी पास होत असते. ज्यातून वासही येत असतो. परंतु रस्त्यावर पाणी राहात नाही. परंतु लोकांनी दुर्गंधी येते म्हणून हे रस्त्याच्या कडेवरील गडर सिमेंटने बंद केले आहे व त्या गडरावरच फ्लोरिंग केले आहे. जेणेकरुन पाहायला किंवा तपासायला येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही तो गडर दिसणार नाही. असे बरेच लोकं आहेत. त्यांना कोण काय म्हणणार. म्हटलं तर अशी मंडळी भांडायला तयार होतात व पत्रव्यवहार केलाच तर नावानं करावं लागतं. मग कोण वाकडं घेणार. अशी अवस्था.
वस्तीत असे बलशाली लोकं राहतात की जे वस्तीतीलच लाचार, गरीब लोकांचा फायदा घेत असतात. काही रस्त्यावर गाड्या लावून रस्ता अडवतात तर काही गडर बुजवून नागरिकांना रस्त्यावरुन चालण्यास प्रतिबंध लावतात. काही समारंभाप्रसंगी मंडप टाकून रस्ता अडवतात. याबाबत आणखी दुसरं उदाहरण आहे. असेही काही व्यक्ती की ज्यांच्या घराचं पुर्णच बांधकाम झालेलं. त्यांनी गाड्या ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था घरात केलेली नाही. ते पार्किंग घराच्या बाहेर असतं. साधारणतः अर्ध्या रोडपर्यंत त्याची पार्किंग असते. त्यातच काहींचे ओटे तर अर्ध्या रोडपर्यंतच असतात. त्यासमोर गाड्या पार्क केल्या जातात. अशा गाड्या लावलेल्या असतात की इतर गाडीवाल्यांनी त्या जागेतून रहदारी करायची कशी? याबाबत बोलायचं झाल्यास एक इंदोर सोडला तर संबंध भारतातील लोकं असेच जगत असतात. फुटपाथवर अतिक्रमण करुन बसलेले असतात. दुकान आपल्या पुर्ण जागेत काढतात व पार्किंग रोडवरच करतात की ज्या जागेतूनच गाड्या आणि माणसांना रहदारी करायला त्रास होत असतो. काहींनी तर अख्खे रस्तेच गायब करुन टाकले आहेत. असे लोक व असा समाज. लोकांजवळ स्वतःची कितीही जागा असली तरी ती जागा कमीच असते. काही लोकं तर असे असतात की आपल्या घरच्या बऱ्याच कबाडीच्या वस्तू परीसरातील खाली जागेत पसरवून ठेवत असतात. त्यांना फुकटची कितीही जागा मिळाली असली तरी कमीच पडत असते. तसंच आपल्या अंगणात गडर असल्यास व बुजविल्यास रस्त्यावर पाणी पसरेल. ज्याचा लोकांना त्याचा त्रास होईल. याचा विचारच करीत नाहीत. उलट आपलं भलं होईल ना. याचाच ते विचार करीत असतात. इतरांचा विचारच करीत नाहीत ते. कोणी गडर बुजवत असतात तर कोणी अख्खा रस्ताच ताब्यात घेत असतात.
विशेष सांगायचं झाल्यास असे बरेच रस्ते आहेत व असे बरेच गडर अहेत की जे लोकांनी स्वतः बुजविलेले असून त्यामुळं लोकांना त्रास होत आहे. जर सर्वेक्षण केलं तर हे सहज सापडू शकते. हे प्रशासनाचं काम आहे. परंतु कोण करेल सर्वेक्षण. होवू द्या लोकांना त्रास होतो तर. आपल्याला तर त्रास होत नाही ना. असा विचार आम जनताच नाही तर प्रशासन करीत असते. एका वर्तमानपत्रात आलं की रस्त्यावर मंडप टाकून रस्ते अडविल्याने दंड लावला गेला. ज्यातून अमूक अमूक एवढी कमाई झाली. कदाचीत तसंच व्हायला हवं. आजही गल्लीबोळात असे कितीतरी विवाहसोहळे होतात की जे संबंध रस्ते अडवतात. काही लोकं गाड्या रस्त्यावर ठेवून बळजबरीनं रस्ते अडवतात. अशा ठिकाणी प्रशासनानं एक पाऊल पुढं टाकून कारवाई करायला हवी व जास्तीत जास्त दंड लावायला हवा ध ताकीद द्यायला हवी की जो गडर बुजवेल. जो रस्त्यावर पार्किंग करेल. जो संबंध रस्ताच ताब्यात घेईल. त्या लोकांची घरंच जप्त करण्यात येतील. असं जर झालं तर रहदारीचे रस्ते मोकळे होतील. लोकांना वाहन चालवितांना परेशानी जाणार नाही. तसेच लोकं राहतही महसूस करतील. त्यातच दंड होते म्हणून लोकं परीसरात कचरा करणार नाहीत. परीसरही फ्वच्छ ठेवतील यात शंका नाही. तशीच स्वतःची पार्किंग ही घराच्या आतच बनवतील याबाबतही शंका नाही. प्रशासनानं ही देखील एक शोधमोहीम राबवावी. देशाला सबळ व आर्थीक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रशासनाला जर निधीच उपलब्ध करायचा असेल तर गरीब लोकांच्या व कामाला जाणाऱ्या मजूरांच्या गाड्यांचे चॅलन करुन त्यांना छळण्यापेक्षा हा उपाय बरा आहे हे तेवढंच खरं. यातून बराच निधी उपलब्ध होवू शकतो. जो देशाच्या सुधारण्याच्या कामात येतो. यासाठी विशेष पथक स्थापन करावं लागलं तरी चालेल.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०