भारत, भारत आहे, पाकिस्तान नाही
*'भारत, भारत आहे. हा पाकिस्तान नाही. तशीच मी मुस्लीम आहे व त्याआधी भारतीय आहे. तसाच आतंकवाद्यांना कोणताच धर्म नसतो.' असं सोफिया कुरैशीचं मत. खरंच ती मुस्लीम असूनही तिनं भारताबद्दल केलंलं कार्य फार अनमोल आहे व ते भारतीय संविधानाला धरुन आहे. अशीच प्रत्येक मुस्लिमांनी भुमिका घेतली तर कोणतीच विदेशी ताकद भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही. आतंकवादी तर नाहीच नाही.*
आतंकवादी म्हणजे गुंड प्रवृत्तीची मंडळी. ज्याप्रमाणे गुंडांना जात धर्म नसतो. त्याचप्रमाणे आतंकवाद्यांनाही जात धर्म नसतोच. ही बाब सत्य आहे. असे असतांना पहलगाम इथं जो आतंकवादी हल्ला झाला व त्यात आतंकवाद्यांनी हिंदू नावाच्या विशेष धर्माला लक्ष पकडून जो धर्मवादी हल्ला केला आणि हिंदू हा धर्म ओळखण्यासाठी कलमा पठन करायला लावल्या. त्यातून दिसून आलं की आतंकवादी हे कट्टर मुस्लीम होते व त्यांना भारताला मुस्लीममय बनवायचं आहे. जरी आतंकवाद्यांना कोणताही धर्म नसतो हे आपल्याला माहित असलं तरी. आतंकवादी हे मुस्लीमच. म्हणूनच त्यांच्या दहशतवादी स्थळावर भारतानं हल्ला करताच पाकिस्ताननं कठोर भुमिका घेवून भारतावर हल्ला चढवला. बदल्यात भारतानं जो काही प्रतिकार केला. ते इथं महत्वाचं आहे. तसाच महत्वाचा आहे पाकिस्तानचा आतंकवाद्यांबाबतीतील दृष्टिकोण. तो दृष्टिकोण आतंकवादी लोकांच्या हितसंबंधातील दृष्टिकोण आहे. जणू तोच दृष्टिकोण भारतीय मुस्लिमांना. खुणावत आहे की तुम्ही भारतात राहून स्वतःत हिंदू मुस्लीम फुट पाडा. हिंदूंच्या वाट्याला जा. हिंदूंसोबत भांडणं करा. मारा, पिटा, कापा, इत्यादी सर्वकाही. परंतु आतंकवादी व पाकिस्ताननं काही गोष्टी लक्षात घ्याव्यात की हे भारतीय मुसलमान आहेत. हे काही पाकिस्तानचे मुसलमान नाहीत की पाकिस्तानची बाजू घेतील? भारतीय मुस्लीम काही काफिर नाहीत की ते आपलं जमीर विसरतील. त्यांना माहित आहे की त्यांचा जन्म हा भारतातच झाला. ते इथेच लहानाचे मोठे झाले. इथंच त्यांचं शिक्षण झालं व इथेच ते रोजगारालाही लागले. तसाच इथे हिंदू मुस्लीम असा भेदभाव नाही. तो हिंदू असो की मुस्लीम वा इतर कोणत्याच धर्माचा. इथं सर्व धर्मांना समान लेखलं जातं. वागवलंही जातं. त्यांना गर्व आहे, ते भारतीय असण्याचा. त्यांनाही माहित आहे की भारत त्यांचाही देश आहे व येथील सर्व लोकं त्यांचे भाऊबहिण आहेत. मग ते पहलगामला मारले गेलेले हिंदू लोकं का असेना. त्यांनाही माहित आहे की भारतानं त्यांनाही आधार दिलाय. त्यांचं कुटूंब पोषलं. अन्न, वस्र, निवाऱ्यांची सोय करुन दिली. एवढंच नाही तर त्यांना हेही माहित आहे की त्यांच्या धमणीतील जे रक्त आहे सळसळणारं. तेही भारताचंच आहे. त्यांना माहित आहे की ते मुसलमान आहेत. परंतु त्यापुर्वी ते भारतीय आहेत. त्यांना हेही माहित आहे की इथं संस्कार आहे. त्यांच्या संस्कारालाही इथंच खतपाणी मिळालंय. या भारतानं त्यांच्यातील चांगले संस्कार वाढवले. मग ते कसे बेईमानी करणार भारताशी? ते इमानदार आहेत. शिवाय त्यांना माहित आहे की आतंकवाद्यांना जात, धर्म नसतोच. ते गुन्हेगार आहेत. जरी पाकिस्तान त्यांना आपल्या धर्माचे मानत असले तरी. त्यांनाही वाटते की आतंकवाद्यांनी असं करायला नको. गुन्हा नकोच व्हायला त्यांच्या हातून. इथलं कुणाचंही कुंकू पुसलं जाता कामा नये. या देशात हिंदू मुस्लीम वाद होवूच नये. एकजुटता राहावी कमालीची. अन् जो यात फूट पाडत असेल वा पाडू पाहात असेल, त्यांना येथील प्रत्येक मुस्लीम बंधू धडाही शिकवायला तयार आहे. मग तो पाकिस्तान का असेना. त्यांना जुनाट, बुरसटलेल्या गोष्टी त्यागायच्या आहेत. नवा भारत बनवायचा आहे. त्यासाठी ते कितीही संकटं आलीत तरी ते झेलायला तयार आहेत. त्यात त्यांना कितीही वेदना झाल्या, तरी ते त्या शोषायला तयार आहेत. तशी मानसिकताच बनवली आहे त्यांनी. मग कितीही संकट आली तरी आणि ती संकटं पाकिस्ताननं आणली तरी. हीच भारतात राहणाऱ्या प्रत्येक मुस्लिमांची मानसिकता. यातूनच अब्दुल कलाम घडले. यातूनच अब्दुल हमीद घडले. अन् यातूनच मदारी मेहतर व दौलतखान घडले. अन् यातूनच मोहम्मद इम्तियाज व सोफिया कुरैशी. प्रत्येक मुसलमान घडला याच मानसिकतेतून. म्हणूनच भारत, भारत आहे. पाकिस्तान नाही.
आज आपल्याला माहितच आहे की अब्दुल कलाम हे देशाचे राष्ट्रपती होते. त्यापुर्वी ते शास्त्रज्ञ होते. खरे भारतीय शास्त्रज्ञ. भारतानं त्यांच्या विद्वत्तेचा गौरव करीत त्यांना भारताच्या सर्वोच्च पदावर बसवलं. त्यांना राष्ट्रपती बनवलं. सर्वात मोठा सन्मान दिला. त्यांनी मिसाईल तयार केल्या. त्या इतर देशासाठी नाही तर भारतासाठीच तयार केल्या. इथंच जन्मलेला अब्दुल हमीद भारत पाकिस्तान लढाई लढला. अन् इथंच जन्मलेला मदारी मेहतरही शिवाजी महाराजांची सेवा करुन गेला आग्र्याला महाराज कैदेत असतांना आणि शिवा काशिदनं तर पन्हाळ्याच्या कैदेतून स्वतःचा जीव धोक्यात घालून बाहेर काढलं.
शिवाजी महाराजांच्या सैन्यात काही प्रमुख मुस्लीम सेनापती होते, जसे की सिद्दी हिलाल, दौलत खान, इब्राहिम खान, काझी हैदर, सिद्दी इब्राहिम, सिद्दी वाहवाह, नूरखान बेग, शमा खान, हुसेन खान मियानी, सिद्दी मिस्त्री, सुलतान खान, दाऊद खान आणि मदारी मेहतर. शिवाजी महाराजांच्या नौसेनेची धुरा सिद्दी संबल यांच्याकडे होती. त्यातच शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लीम मावळेही होते की ज्यांच्यामुळे शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करता आलं. अफजल खान वधाच्या वेळीही तीन सरदार शिवाजी महाराजांसोबत होते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याचा प्रसंग इतिहासात आहे. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांतही नेहमी तीन मुसलमान सरदार असायचे. सरदार नूर खान, इब्राहिम आणि सुलतान अशी त्यांची नावे आहेत. शिवाजींचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी सुफी संत शाह शरीफ यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी ठेवली होती. शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासनात मानवतेचं जे धोरण अवलंबलं होतं, ते कोणत्याही धर्मावर आधारीत नव्हतं. लष्कर आणि नौसेनेत सैनिकांच्या नियुक्तीसाठी धर्म हा निकष नव्हता आणि त्यातील एक तृतीयांश सैनिक मुस्लीम होते. त्यांच्या गुप्तहेर प्रकरणांचे सचीव मौलाना हैदर अली होते आणि त्यांच्या शस्त्रागाराची कमान इब्राहिम खानच्या हातात होती. हा झाला शिवाजी महाराजांचा काळ. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे प्रमुख मुस्लीम नेते डॉ. झाकीर हुसेन, मौलाना अबुल कलाम आझाद, खान अब्दुल गफ्फार खान, मौलाना मोहम्मद अली जौहर, मौलाना मोहम्मद अली, मोहम्मद शौकत अली, मोहम्मद बरकतुल्ला, बद्रुद्दीन तय्यबजी आणि हकीम अजमल खान इत्यादी होते. अनेक मुस्लीम अनुयायांनीही या आंदोलनात भाग घेतला. हा कारवा इथंच थांबला नाही. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही कित्येक मुस्लीम सैनिकांनी भारत पाकिस्तान युद्धात हिरीरीनं भाग घेवून पाकिस्तानी सैनिकांचा सफाया केला. कारण काय तर मी मुस्लीम नक्की असलो तरी मी प्रथम भारतीय आहे. म्हणूनच भारतावर कितीही संकट आलं. मुस्लीम देश असलेल्या पाकिस्ताननं जरी भारतीय मुस्लिमांना पहलगाम करुन भडकविण्याचा प्रयत्न केला तरी भारतातील बहुतःश मुस्लीम समुदाय भडकणार नाही. तो सोफिया कुरैशीसारखा व मोहम्मद इम्तियाजसारखा भारतासाठी सर्वस्व अर्पण करेल यात शंका नाही.
महत्वपूर्ण बाब ही की भारत, भारत आहे. तो पाकिस्तान नाही. अन् भारतातील मुस्लीम भारतीय आहेत. ते पाकिस्तानी नाहीत. हेच समजून घ्यायची गरज आहे. त्यामुळं कोणी कितीही एखाद्या विशिष्ट धर्माला वेठीस धरून कितीही वेळा पहलगाम केलं. तरी भारतातील मुस्लीम व इतर धर्मीयांची एकी कोणी तोडूच शकणार नाही. तसा कोणी प्रयत्नही करु नये. अन् तसं कोणी केल्यास पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर करण्यात येईल. यात शंका नाही. कारण मुस्लीमही म्हणतात की आम्ही भारतात राहणारे जरी मुस्लीम असलो तरी त्याआधी भारतीय आहोत व आमच्या रक्तात पुर्वजांच्या इमानदारीचं व पराक्रमाचं रक्त सळसळत आहे. हे गद्दारपणाचं रक्त नाही की आम्ही भारताविरुद्ध दगाबाजी करणार. ज्यांचं खाणार, तिथंच विष्ठा करणार नाही. आमचं इमान हे शिकवीत नाही आणि आमचा इस्लामही तसे करायची परवानगी देत नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०