A person becomes great not by money, but by deeds. in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | माणूस पैशानं नाही, कर्मानं मोठा होतो

Featured Books
Categories
Share

माणूस पैशानं नाही, कर्मानं मोठा होतो

माणूस पैशानं नाही, कर्मानं मोठा होतो?          स्वतःला असे मजबूत बनवा की लोकं तुमचा आदर्श घेतील. होय, हे म्हणणं खरंच आहे  त्याची पुनरावृत्ती नेते करतातच. जुने आणि आजचेही  फरक एवढाच आहे की कालचे नेते हे सेवेच्या दृष्टीकोनातून स्वतःला मजबूत बनवायचे. आजचे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करुन स्वतःला मजबूत बनवतात.          मजबूत बनवणे. आजचा काळ असाच आहे. आज सर्वच लोकं स्वतःला मजबूत बनविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करीत असतात. ते स्वतःला मजबूत बनवीत असतांना दुसऱ्याचा विचारच करीत नाहीत. दुसरा मरत असेल तरी त्यांना त्यांच्यात काही घेणं देणं नसतंच. अशातच त्यांना आवडत असतं दुसऱ्याला त्रास देणं. आजचे लोकं दुसर्‍याचे रक्त पिवूनच स्वतः मजबूत बनत असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या कारखान्याचं देता येईल. कारखान्यातील मालक हा काही काम करीत नाही. तो फक्त आदेशच द्यायचे काम करतो. त्याची सर्व कामे ही मॅनेजर करीत असतो. तरीही तो सक्षम असतो. त्याचं कारण आहे, त्याच्याजवळ येणारा पैसा. तो पैसा त्याच्या मेहनतीनं येत नाही. तो पैसा येतो, त्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगार वर्गामुळं. तो कामगार वर्ग दिवसरात्र काम करतो आणि त्या कामाचा मोबदलाही त्याला तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. जो पैसा मालकाच्या खिशात जातो. ज्यातून मालक हा अधिकाधिक सक्षम होत जातो. दुसरं उदाहरण शाळेतील संस्थाचालकाचं देता येईल. तो जास्त काम करीत नाही  फक्त संस्था रजीस्टर करतो. त्यानंतर तो एखादी लहानशी जागा घेतो. त्या जागेवर एक लहानशी इमारत बांधतो. त्या जागेवर शाळा उभारतो. ती शाळा उभारली की त्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त करतो. वेळप्रसंगी कर्मचारी नियुक्त करतांना त्यांचेकडून पैसा घेतो. शिवाय विद्यार्थ्यांकडूनही शुल्क गोळा करतो. ज्यातून ती शाळा वाढते. त्याचबरोबर संस्थाचालक. तो पैशानंही वाढतो आणि त्यातल्यात्यात अहंकारानंही. याबाबतीत तिसरं आणखी एक उदाहरण आहे. ते म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार करुन कमविलेल पैसा. तोही भ्रष्टाचार करुन पैसा कमवीत असतो. कालपरवाच्या वर्तमानपत्रातून न्यायाधीश व वकीलांनी पैसा कमवला असं दिसलं.          स्वतःला मजबूत बनविण्यासाठी सर्वात महत्वाची वस्तू आहे पैसा. पैसा जर नसेल तर त्या व्यक्तीला कोणी मोजत नाही वा त्याची इज्जतही कोणी करतांना दिसत नाही. म्हणतात की पैशानं सारं काही विकत घेता येतं. शिक्षण सुद्धा पैशानं विकत घेता येतं. अलिकडील काळात डॉक्टर, इंजीनियर हे पैशाच्या जोरावरच बनत असलेले दिसतात. नेते मंडळीही पैसा खर्च करुन नेतेगिरी प्राप्त करीत असतात. पैसा नसेल तर निवडणूकही लढता येत नाही. दुसरी महत्वाची वस्तू आहे शिक्षण. जी मंडळी जास्त शिकतात. तेही सक्षमच असतात. त्यांच्याजवळ पैसा नसला तरी समाज त्यांना विचारत असतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्याकडे पैसा नव्हता. परंतु त्यांनी शिक्षण घेतलं. ते एवढं शिक्षण घेतलं की त्या शिक्षणाच्या भरवशावर ते समोर गेलेत. आजही त्यांचं नाव आहे.           पुर्वीच्या काळी राजपद्धती होती. त्या पद्धतीत जो राजा राजगादीवर बसत असे. साहजीकच तो सक्षम असे व त्याचा प्रजेत दरारा निर्माण होत असे. तसा दरारा तो राजा निर्माण करीत असे. जसं शिवाजी महाराजांनी केलं. एकेक किल्ले घेत त्यांनी अफजलखानाला मारले. ज्यातून शिवाजी महाराजांची भीती पंचक्रोशीत पसरली. दुसरं उदाहरण संभाजी महाराजांचं देता येईल. त्यांनीही गादीवर बसताच स्वतःला सिद्ध करण्यासाठी बऱ्हानपूर लुटलं व औरंगजेबाच्या फौजेचा धुव्वा उडवला. तिसरं उदाहरण औरंगजेबाचं देता येईल. राजगादीवर येतांना भावाची हत्या आणि वडीलांना नजरकैदेत टाकलं. त्यामुळं त्यांचं सक्षमीकरण प्रजेला दिसलं. त्यामुळं आपोआपच त्यांचा दरारा वाढला. चवथं उदाहरण म. गांधींचं देता येईल. त्यांनीही बार्डोली व चंपारण्याचा उठाव करुन स्वतःला सक्षम केलं होतं. तसंच डॉक्टर बाबासाहेबांचंही उदाहरण देता येईल. त्यांनीही चवदार तळ्याचा सत्याग्रह व तो खटला लढून स्वतःला सिद्ध केलं होतं.           कालच्या परिस्थितीत ज्यानं स्वतःला सक्षम बनवलं. तोच राजा बनला. देवादिकांच्या भाषेत सांगायचं झाल्यास देवांचेही काही चमत्कार सांगीतले आहे. ते चमत्कार म्हणजेच त्यांचं सक्षम असण्याचे पुरावे. आता ते चमत्कार कोणी पाहिले? कोणीच नाही. परंतु आजही त्यांच्या चमत्कारावर आपण विश्वास ठेवतो. त्यामुळंच आजही त्यांचीच आपण प्रतिमा पुजतो ना.         विशेष सांगायचं झाल्यास आजही आपल्याला स्वतः सक्षम होण्याची गरज आहे. आपण जेव्हा स्वतः सक्षम होवू. तेव्हाच हा समाज आपलं ऐकेल. आपल्याला मान देईल. आपली इज्जत करेल. आजच्या काळात असं कोणीही समजू नये की पैशानंच आपण सक्षम होवू शकतो. आज अशी बरीचशी उदाहरणं आहेत की ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे. परंतु तो पैसा पाहण्यासाठी आहे. त्याची कोणी इज्जत करीत नाही. कारण आज पैशाला जरी महत्व असलं तरी पैशानं सक्षम होणाऱ्या व्यक्तीची इज्जत ही तात्पुरती असते. ती कालानुकालीक नसते. कालानुकालीक इज्जत कमविण्यासाठी स्वतःला कर्मानं सक्षम बनविण्याची गरज आहे. ज्यांची कर्म चांगली, तो अधिक प्रभावशाली असतो. शिवाय हे प्राचीनकाळापासून चालत आलेले आहे. आज अशी कितीतरी नावं घेता येतील की जे चांगल्या कर्मानं आजही जगात प्रसिद्ध आहेत. जसे भगवान राम, क्रिष्ण, तथागत भगवान गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, येशु ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, सम्राट अशोक, पृथ्वीराज चव्हान, सम्राट अकबर, शिवाजी महाराज, मं. गांधी, बाबासाहेब आंबेडकर. अशी बरीच मोठी यादी होईल की जे आपल्या डोळ्यासमोरुन जात नाहीत. त्याचं कारण म्हणजे त्या लोकांची चांगली कर्म.           महत्वपूर्ण बाब ही आज लोकांनी चांगली कर्म करावीत. जे जेवढ्या जास्त प्रमाणात चांगले कर्म करतील. त्यांचं नाव जगात इज्जतीनं घेतलं जाईल. पैशावर प्रेम करणारे भरपूर असतात. हे आपण आजपर्यंत पाहात आलो आहोत. परंतु जो कर्मावर प्रेम करतो. तोच अमर होतो व त्यांची जगात जयजयकार होते. आपल्याला गाडगेमहाराज माहीत असेलच. संत ज्ञानेश्वर माहीत असेलच आणि त्याचबरोबर माहीत असेल संत तुकाराम. काय होतं त्यांचेजवळ. तरीही त्यांना आजही जग ओळखतोय. त्याचं कारण आहे, त्यांच्यातील चांगले कर्म. त्यांनी स्वतःला चांगल्या कर्मानं सक्षम बनवलं होतं. म्हणूनच आजही त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं.           महत्वाचं म्हणजे चांगले कर्म करा. म्हणजे त्याचं फळ चांगलंच मिळेल. वाईट कर्माचं फळ वाईटच मिळेल. जो जसा कर्म करेल. त्याचं त्याचं तेवढ्या प्रमाणात कमी अधिक चांगलं वाईट फळ मिळेलच. कर्मानुसार फळप्राप्ती.           विशेष सांगायचं झाल्यास स्वतः वाटत असेल की आपलीही इज्जत समाजानं करावी तर आपण स्वतः सक्षम बनावं. त्यासाठी चांगलं कार्य करावं. कारण वाईट व्यक्तींची इज्जत समाजात नसते. इज्जत असते चांगल्या माणसांची. चांगली इज्जत ही पैशानं मिळत नाही  पैशानं येते फक्त क्लेश, अहंकार व दुःख. ते येवू नये व जीवनात आनंद यावा यासाठी चांगले कर्म करायला हवीत. जेणेकरुन त्यातून आपल्यालाच अधीकच सक्षम बनता येईल व समाज आपली इज्जत करु शकेल. यात शंका नाही.          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०