Yesterday's and today's curriculum. Practicality is important. in Marathi Moral Stories by Ankush Shingade books and stories PDF | कालचा व आजचा अभ्यासक्रम. कार्यान्वीतता महत्वाची

Featured Books
Categories
Share

कालचा व आजचा अभ्यासक्रम. कार्यान्वीतता महत्वाची

कालच्या व आजच्या अभ्यासक्रमात विशेष असा फरक? नाही.

         आज शिक्षणात औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही स्वरुपाचे शिक्षण आलेले आहे. शिवाय आज शिक्षणाची व्याख्याच बदलली आहे. अलिकडच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना शिकवावेच लागत नाही तर तो स्वतः शिकतो यावर भर दिला जात आहे. त्यानुसार आज शिक्षणाचा साचेबद्ध प्रकार बंद झाला असून मुक्त शिक्षणाचा आकृतीबंध शासनाने स्विकारलेला आहे. असं सरकार म्हणतं. त्यानुसारच विद्यार्थ्यांना वर्गात शिकवले जात आहे. त्यासाठी कृतीवर जास्त भर दिला जात असून त्यासाठी शिक्षकांची कृती जेवढी महत्वाची आहे. विद्यार्थ्यांची कृतीही तेवढी महत्वाची आहे व त्याच कृतीला वाढविण्यावर जास्त भर दिला जात आहे. अन् हे करीत असतांना विद्यार्थ्यांच्या औपचारिक शिक्षण घेण्याचे वयही बदललेले आहे.
         शिक्षण...... कालमितीला शिक्षणाचा इतिहास पाहिल्यास जेव्हा कानाला हात पुरायचा. तेव्हा त्याचं नाव शाळेत दाखल केलं जात असे. ते तसं वय ठरविण्याचं कारण होतं, त्या मुलांचं आत्मनिर्भर होणं. ते मुल वयाच्या सातव्या वर्षीच आत्मनिर्भर व्हायचं. आपली कामे आपण स्वतःच करायचं ब्रीद, ते मुल शाळेत येण्यापुर्वीच शिकून येत होतं. ते ब्रीद त्याला शिकवावंच लागत नव्हतं. जसे प्रातःक्रिया करणे. आज प्रातःविधीपासून तर सर्व प्रकारच्या क्रिया शाळेत शिकविल्या जाणार. कारण नर्सरीपासून म्हणजे मुलाच्या वयाच्या तीन वर्षापासून मुलांना शिक्षण प्रवाहात आणायचे आहे. काही दिवसानं तोही स्तर बदलणार व मुलांच्या जन्मापासूनच त्याला शाळेत ठेवावं लागणार. ही शंका नाकारता येत नाही. 
         तो काळ व ते वय. जरी आज त्या शिकण्याला घोकंपट्टीचं वय समजत असले तरी खरं शिक्षण तेच वाटायचं. ज्या शिक्षणातून पुढे प्रत्येक विद्यार्थी अगदी अल्पवयातच आत्मनिर्भर बनायचा. विद्यार्थी आत्मनिर्भर असायचा. त्याचं कारण असायचं त्याचं वय. ते वय वाढलेलं असायचं व त्या वाढलेल्या वयात त्या विद्यार्थ्यांचा मेंदू हा अधिक विकसीत झालेला असायचा. त्यातील काही विद्यार्थी घोकंपट्टी करीत शिकायचे. काही विद्यार्थी शिकत नव्हते. कारण त्या विद्यार्थ्यांच्या शिकण्यात वातावरण वा परीसर कारणीभूत असायचा. वडीलांचं सतत आईला मारणं तसंच वडीलांचंही दारुचं व्यसन हे त्याला कारणीभूत असायचं. शिवाय त्या शिक्षणाला महत्वपुर्ण अडथळा होता, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या घरी असलेले त्याचे भाऊबहिण. ते जरा जास्तच असायचे. आज हा भाग कालबाह्य झाला व प्रत्येक बालक आज शिकू लागला आहे. कारण आज शिक्षण शिकण्याचं व शिकविण्याचं महत्व वाढलेलं आहे. 
         शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कालची मुले महामारीत डॉक्टर औषधाला सापडत नाहीत व महामारीत लेकरं विना औषधानं मरण पावतात, म्हणून जन्मास घालावी लागायची. त्यानंतर त्याचे आईवडील मुलांना शाळेत तर टाकत असतच. परंतु मुलं शिकलीच पाहिजे ही काही त्यांची अपेक्षा नसायची व मुलांनाही मी शिकलोच पाहिजे असंही वाटायचं नाही. ज्यातून मुलं जरी स्वतः कोणाचीही मदत न घेता आत्मनिर्भर बनत असली तरी त्याला त्या काळात विशेष महत्व नव्हतं. आज तीच मुलं आहेत की जी मुलं आपल्या मुलांना शिकवितात. हे केवळ आज वाढल्या असलेल्या शिक्षणाच्या महत्वामुळे. आज काळ हळूहळू बदलला व मुल जन्मास कात्री लागली. त्याचं कारण म्हणजे औषधे व तंत्रज्ञानाचा शोध. तसेच महागाई. या तीन भात्यातील तलवारीनं जुन्या काळातील आत्मनिर्भर करणाऱ्या शिक्षणाची हत्या केली. अन् त्या जागी नवीन शिक्षण आणलं. त्यासाठी फार मोठी जाहीरात केली गेली. जाहीरात होती, जुनं शिक्षण बेकार होतं, आजचं नवीन शिक्षण चांगलं आहे. 
        विशेष म्हणजे नवीन शिक्षणाबद्दल सांगता येईल की आज मायबापांना दोनच मुलं असतात. त्यातच महागाईची झळ जास्त प्रमाणात सतावू नये म्हणून लोकांनी दोनच लेकरं ठेवली. तसंच अलिकडील काळातील जाहीरातीनुसार जे शिक्षण शिकत असतांना तो विद्यार्थी आत्मनिर्भर होत नसेल तर ते शिक्षण कोणत्या कामाचं? असं म्हणण्याची वेळ येवू नये म्हणून अलिकडील शिक्षण व्यवस्थेची जाहीरात मोठी व त्यामागे काहीतरी मोठी गंभीर बाब, ती म्हणजे जुन्या काळातील राबवलेल्या अभ्यासक्रम यंत्रणा लपविण्याचं षडयंत्र घडत असल्याचं चित्र दिसतं. 
        अलिकडच्या काळातील शिक्षण सांगतं की विद्यार्थी हा केवळ शाळेतच शिकत नाही. तर तो परीसरात शिकतो. त्यासाठी त्याला शिकविण्याची गरज नाही. त्याला फक्त मार्ग दाखविण्याची गरज आहे. हे सगळं करीत असतांना त्याच्या कौशल्यावर व कृतीशिलतेवर आज भरपूर दिला आहे. वय कमी केलं आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी अलिकडील शिक्षणाला हे माहीत आहे की पुर्वीच्या शिक्षणानं विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर केलं. ती मुलं शाळेत शिकत जरी नसली तरी ती आपोआपच आत्मनिर्भर बनायची. उदा. थॉमस अल्वा एडीसनसारखे बरेचसे शास्त्रज्ञ की जे शाळेतच गेले नाहीत. तरीही त्यांनी मोठमोठे शोध लावलेत. काल शाळेत जाण्याचे वय जास्त होते व आज ते कमी झालेले आहे. अर्थात आकृतीबंधानुसार पुर्वप्राथमिक वर्ग शाळेला जोडलेला आहे व एक नवीन स्वरुपाचा आकृतीबंध तयार केल्या गेला आहे. शिवाय या नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलगा हा वातावरणातून अनौपचारिक शिक्षण शिकायला हवा. जे पुर्वी अभिप्रेत होतं व तीच क्रिया आज आपोआपच घडत असे. आज ती घडावी असा आकृतीबंध तयार केला आहे. तसंच आज ज्या शिक्षणावर भर दिलं जातं. तो स्तर आहे, ५+३+३+४. याचाच अर्थ असा की वय वर्ष सात वर्षापर्यंत पहिला पाचचा स्तर. ज्यात बालवाटिका स्तर अर्थात नर्सरी, त्यानंतर केजी वन व केजी टू. या इय्यतेचा समावेश केल्या गेला आहे. याचाच अर्थ असा की मुलगा शिको की न शिको. औपचारिक शिक्षणातून त्याला पुर्वीसारखं स्वतः आत्मनिर्भर बनू द्यायचे नाही तर त्याला आपण आत्मनिर्भर व्यक्ती बनवायचे आहे. त्यासाठी त्यांच्यावर त्यांना समजायच्या आतच क्रिया प्रतिक्रिया करायच्या आहेत. याचाच अर्थ असा की विद्यार्थ्याला मातीची उपमा दिली तर त्या मातीला आपल्याला जसा आकार द्यायचा असेल, तो देण्यात येईल. यात महत्वपुर्ण भाग असा की एकीकडे सरकार म्हणतं की विद्यार्थ्यात काही सुप्त गुण असतात. ते गुण आपण विचारात घेवून त्या गुणांनुसार शिकवायचे. त्या गुणांना वाढीस लावायचे. ज्या गुणांचा वापर करुन मुलांना आत्मनिर्भर बनवायचे व नवनिर्मीती करायला लावायची. तर दुसरीकडं सरकार अशा मुलांचे वय वर्ष लक्षात न घेता त्याच्या अगदी तीन वर्षाच्या काळापासून शिकवायचे. जेणेकरुन तो मुलगा म्हणजे ओली माती व तो नर्सरीचा वर्ग म्हणजे एखादे भांडे आकार देणारं. यात उदाहरण द्यायचं झाल्यास दारु तीच आहे, पिणारेही तेच आहेत. फरक इतकाच आहे की त्याचे भांडे वेगवेगळे आहे. सरकार हे सांगत नाही की आमच्याही देशात आम्हाला कॉन्व्हेटचं शिक्षण आणायचं आहे. परंतु सरकार हे सरळ सरळ सांगत नाही. 
         विशेष सांगायचं झाल्यास सरकारनं नक्कीच कॉन्व्हेंटचं शिक्षण आणावं. त्याला मनाई नाही. ज्याचा पॅटर्न याआधीच कॉन्व्हेंटच्या शाळेच्या स्वरुपात राबविण्यात आला. ज्या शाळेत आतापर्यंत केवळ श्रीमंतांची मुलं शिकत होती. आता शाळा या मराठी माध्यमाच्या राहणार आहेत स्तर आणि अभ्यासक्रम हा कॉन्व्हेंट स्वरुपाचा राहणार आहे. परंतु स्तर व अभ्यासक्रम हा जरी कॉन्व्हेंट स्वरुपाचा असला तरी कालच्या शिक्षणालाही वा अभ्यासक्रम आणि स्तरालाही नावबोटं ठेवता येणार नाही. कालचाही अभ्यासक्रम त्यातच स्तर आणि तेवढंच शिक्षणही तेवढंच महत्वाचं होतं. यात शंका नाही. समजा कालचं शिक्षण जर आत्मनिर्भरतेला बळ देणारं नसतं तर कदाचीत आज जो अभ्यासक्रम तयार केल्या गेला. तोही कदाचीत करता आला नसता हे तेवढंच खरं.

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०