निदान शिक्षणात तरी जातीचा वापर होवू नये?
*जात आणि जातीप्रथा केव्हा नष्ट होणार. हा एक चिंतेचा प्रश्न आहे. जातीप्रथा देशात पाळली जात आहे व त्याच आधारावर भेदभाव करुन जाणीवपूर्वक जाणूनबुजून अत्याचार केला जात आहे. ज्याचे बिजारोपण शाळेतच केले जात असून शाळेतही जातीप्रथा अस्तित्वात आहे व तिथंही शिकतांना विद्यार्थ्यांचा पदोपदी अपमानच होत आहे. अन् तेवढाच त्रासही.*
काल जातीनं जातीवरच अत्याचार केला. आजही जातच जातीवर अत्याचार करीत आहे. तसं पाहिल्यास आज पाश्चात्त्य लोकांच्या सानिध्यात समाज आल्यानं समाज थोडासा सुधारला आहे. परीवर्तन झालं आहे. त्यामुळं आज जात नष्ट व्हायला हवी असं वाटत आहे. परंतु आज जातीला अधिकच घट्टं केलं जात आहे. शिक्षणातही जात आणली आहे. विविध लाभाच्या योजना जाती माध्यमातून राबवल्या जात आहेत. शिष्यवृत्या, आरक्षण या माध्यमातून जातीला अधिकच घट्ट केलं जात आहे. शिवाय जात टिकून राहावी म्हणून मुलाला ज्यावेळेस शाळेत टाकले जाते. त्यावेळेसच त्याच्या पालकांना जात विचारली जात आहे. त्यानंतर त्याचं शाळेत नाव टाकलं जात आहे. अशा पद्धतीनं आजच्याही काळात जातीप्रथा टिकवली जात आहे व जातही टिकवली जात आहे. हे कार्य केवळ समाजमाध्यमच नाही तर सरकारकडून होत आहे. ही एक चिंतेची बाब आहे.
आज काळ बदलला. पोशाख, रहनसहन शिक्षण सारं बदललं. लोकं शहाणे झाले. परंतु काळ बदलला असला तरी आजचा काळही असाच अनाडी काळ आहे असं वाटत आहे. त्याचं कारण आहे जात आणि जातीप्रथा. कारण अनाडी माणसंच जात व जातीप्रथा जास्त पाळतात. सुशिक्षित तेवढी पाळत नाहीत. हे तेवढंच सत्य आहे. तसेच काल वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र. आज ते वर्ण नाहीत. आज जात आहे आणि जातीवरुन भेदभावही आहे.
काल माणूस जेव्हा झाडावरुन खाली आला. तेव्हा त्याला त्याची जात कोणती हे माहीत नव्हतं. तो कामं करायचा, वडीलधारी मंडळी सांगतील तीच कामं. कालांतरानं त्यात वर्ण तयार झाले. मात्र जात, जात नसल्यानं जात म्हणजे काय? ते माणसाला माहीत नव्हतं. शिवाय माणसं कामं करीत असतांना ज्या तत्सम जाती तयार झाल्या. त्याचं कारण होतं कसब वाढवणं व कसब वाढल्यानं कामं भराभर होणं.
कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सुरुवातीला काम करतांना स्वार्थ नव्हताच. कामाचं कसब वाढवणं हे धोरण होतं. ज्यातून जात निर्माण झाली. शिवाय जात ही बदलवता येत असे. एका जातीतून दुसर्या जातीत जाता येत असे माणसांना. परंतु काळ बदलला व बदलत्या काळानुसार जातीवर बंधनं आली. कोणीच आपली जात बदलवू नये अशी. त्याचंही कारण स्वार्थ नव्हताच. तर त्या जातीत येणाऱ्या नवीन व्यक्तीला ती कामं भराभर करता येत नाहीत म्हणून जात बदलविण्याची पद्धत बंद झाली.
नवीन जातीची माणसं. बदलत्या काळानुसार जे वर्ण निर्माण झाले होते. त्या प्रत्येकच वर्णात सुरुवातीच्या काळात जाती होत्याच. मात्र कालांतरानं त्या त्या वर्णातील तत्सम जाती बंद झाल्या. जातीची वर्गवारी तयार झाली व जातीचे भाग पाडण्यात आले. ज्या जातींची विभागणी वर्णात केली गेली. तेव्हाही भेदभाव नव्हताच. अशातच विदेशी लोकांचं देशात आगमण झालं व त्यांनी या देशावर राज्य करण्यासाठी एक नवी जातरहित व्यवस्था निर्माण केली. ज्या जातीव्यवस्थेचा बळी त्या काळातील ब्राम्हणच वर्ण नाही तर इतर सर्व वर्ण ठरले. ज्याची झळ संत ज्ञानेश्वर हे जरी ब्राम्हण असले तरी त्यांनाही शोसावी लागली. शिवाय त्या काळातील शुद्र वर्णातील स्रियाच नाही तर ब्राम्हणवर्णीय सर्व स्रियांना शोसावी लागली. त्या जाचातून कोणालाच सोडलं नाही. शुद्र जातींनाच नाही तर कर्तबगार स्रियांनाही सोडलं नाही. मग त्या ब्राम्हण वर्णातील का असेना.
चार वर्ण. ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र. ब्राम्हणांना देव मानलं जाई. ज्यांना देव मानावं असं एका मनुस्मृती नावाच्या ग्रंथानं लिहिलं. त्याचं कारण होतं शिक्षण. शिक्षण देण्याचे हक्कं हे ब्राम्हण वर्णाकडे अबाधीत असायचे. मग गुरु हा देवापेक्षाही मोठा म्हणजेच देवच ठरला. मात्र,त्यानं ज्याला ज्ञान दिलं, त्या व्यक्तीनं पुढं राजा बनून ज्ञानार्जन करणाऱ्या त्या ब्राम्हण वर्णाला राजाश्रय दिला. मात्र त्या वर्णाला त्यापुर्वी तेवढा दर्जा नव्हता की तो राज्याचा आधारस्तंभ असणार. हा इतिहास सांगतोच.
ब्राम्हणाचं आश्रम असायचं शिकविण्याचं. ते आश्रम राजमहालात नसायचं तर दूर अशा ठिकाणी, जिथं वाघ, सिंहांसारख्या हिंस्र प्राण्यांची भीती असायची. जिथं सदैवं साप, विंचू सारख्या प्राण्यांची भीती वाटायची. मात्र हाच ब्राम्हण व्यक्ती त्या सर्व प्राण्यांना न घाबरता तिथं राहायचा व राजाच्या मुलांना ज्ञानार्जन करायचा. तो आपल्या शिष्यांना शिकविण्याचं काम करायचा. ज्यातून काही शिष्य राजे बनत असत. ते राजे बनले की मग ते आपल्याला शिकविणाऱ्या गुरुच्या सल्ल्यानं चालत असत. जे तरुणपणात राजधानीत न राहता आश्रमात, दऱ्याखोऱ्यात शिकण्यासाठी राहायचे. ते राजे बनल्यावर आपल्याच गुरुच्या सल्ल्यानं चालत असत. कारण तेच राजाला ते आश्रमात असतांना शिकवीत असत. पुढे त्याचा शिष्य राजा बनताच राजा सल्ला घेण्यासाठी आपल्या गुरुला आश्रमात बोलावून घेत असे.
ज्ञानार्जन करणारा ब्राम्हण वर्ग. दूर दऱ्याखोऱ्यात असलेला, निसर्गाच्या सान्निध्यात असलेला त्यांचा अधिवास. पुढं ज्या राजांच्या युवराजांना त्यांनी शिकवलं. त्याच युवराजांनी पुढे राजे बनल्यावर आपल्या गुरुंना आपले आपले सल्लागार बनवले. पुढं त्यांचं राजधानीत एवढं महत्व वाढलं की राजे प्रत्येक गोष्टीत वा प्रत्येक नियम बनवितांना ब्राम्हण वर्गाचाच सल्ला घेवू लागले. ज्यांनी तद्नंतर याच गोष्टीचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधला. त्यांनी आपल्या सोईचे नियम बनवून घेतले व जे जे त्यांचे विरोधक होते. त्यांना गुलाम बनविण्याचे कार्य केले. हे जातीआधारावरुनच करता आलं हे नाकारता येत नाही.
कालचा गुरु हा ब्राम्हण वर्णातील असला तरी त्याला पाहिजे तेवढे अधिकार नव्हते. राजा जरी सर्व अधिकाराचा सर्वेसर्वा असला तरी त्याचं तेव्हापर्यंतच चालत होतं, जेव्हापर्यंत त्याची सत्ता असेल. ज्यावेळेस त्याची सत्ता जात असे वा तो म्हातारा होत असे. तेव्हा मात्र त्याचं कोणीही ऐकत नव्हतं व त्याचं कोणी ऐकत नसल्यानं नाईलाजास्तव अपमान सहन करण्याऐवजी तो अरण्यात निघून जात असे. विशेष म्हणजे त्या काळात लोकांच्या वागण्यावरुन भेदभाव होता ना कोणाच्या मतानुसार राज्य चालत असे. स्वातंत्र्य होतं व तेवढंच सार्वभौमत्वही होतं. राजा वयोवृद्ध झाल्यास तो जेव्हा अरण्यात निघून जात असे. त्यासोबतच त्याला सल्ला देणारा सल्लागार असलेला ब्राम्हण वर्णीय त्याचाच गुरु, तोही अरण्यात राजासोबत निघून जात असे. परंतु जसा काळ गेला. तसे राजाच्या अधिवासाचे नियम बदलले. त्याचबरोबर सल्लागार असलेल्या गुरु असलेल्या ब्राम्हण वर्णातील माणसांच्या अधिवासाचेही नियम बदलले. जे नियम ब्राम्हण वर्णातील व्यक्तीच्या सल्ल्यानं बनले. ज्यात भेदभाव शिरला. त्यानंतर माणसाला माणूस समजले जात नव्हते. माणसाला एका पशूगत वागणूक मिळायला लागली होती. वर्ण संपले होते व त्या वर्णाची जागा जातीनं घेतली होती. तद्नंतर जातीच्या आधारावर भेदभावाचं दृष्टचक्र सुरु झालं होतं. हे सर्व भारत स्वातंत्र्य होण्यापुर्वीपर्यंत सुरु होतं.
भारत स्वातंत्र्य झाला. त्यानंतर आरक्षण आलं व आरक्षणाचा लाभ विशिष्ट जातीलाच देण्याची पद्धत रुढ झाली. ज्या जातींनी स्वातंत्र्यापुर्वी अमानुष अमानवीय वागणूक सहन केली. परंतु त्यात एक बदल झाला. तो लाभ आपल्याला घेता यावा म्हणून बऱ्याच लोकांनी लपून छपून आपल्या जाती बदलवल्या. त्या फक्त लाभासाठी होत्या. मुळात वास्तविक रुपात जाती बदलवल्या नव्हत्या. हे बऱ्याच लोकांनी केलं. हे जरी खरं असलं तरी जाती बदलल्या होत्या हे तेवढंच खरं. जात शिक्षणासाठी व शिक्षण आणि नोकरीचा लाभ घेण्यासाठी बदलली जरी असली तरी जात बदलवता आली. मग ती लाभासाठी की असेना.
मध्यंतरीचा काळ असाच आला की जाती बदलल्या. त्या जाती शिक्षण घेण्यासाठी व लाभासाठी बदलल्या. मात्र त्यानंतर आरडाओरड झाली. ज्या जातीवर स्वातंत्र्यापुर्वी अत्याचार झाला. त्यांनी असंतोष व्यक्त केला की आमच्या जातीचं आरक्षण अशा जात बदलविणाऱ्याला नको. त्यांनी काहीच शोषलं नाही. आम्ही बरंच शोषलं आहे. त्यामुळंच जाती पडताळणी आली व पुन्हा एकदा जात शिरजोर झाली.
जात....... जी जात नाही तिला जात म्हणतात. जी जात आरक्षणाच्या निमित्यानं का होईना, बदलली गेली. बदलवताही आली. अशा कित्येकांच्या जाती बदलल्या. परंतु त्यात पुन्हा एकदा पडताळणी नावाचा राक्षस शिरल्यानं जात एखाद्या अमरवेल वा बांडगुळागत घट्ट चिकटली नव्हे तर घट्टं केली गेली.
जातीबाबतीत सांगायचं झाल्यास जात ही शिक्षणात अडचणीची आहे व शिक्षणाचा लाभ घेण्यास अडसरीचा मार्ग आहे. कारण शाळशाळेत हा विद्यार्थी अमूक जातीचा, तो विद्यार्थी अमूक जातीचा अशी चर्चा विद्यार्थी आपापसात करीत असतांना आढळतात. हे अगदी बालवयापासून चित्र दिसत असतं. परंतु ती गोष्ट कोणी समजूनच घेत नाहीत. जात शाळेत असलेली पदोपदी दिसत आहे. तसेच आजही जात घट्ट करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. जरी जातीआधारावर अत्याचार आजही केला जात असला तरी. परंतु तिला नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात नाहीत. तसे आदेश काढले जात नाहीत. जरी गतकाळात जातीआधारावर भेदभाव नावाच्या राक्षसानं माणसाच्या विचाराला गुरफटलं होतं. माणसाच्या मनातील विचारांच्या वाईट प्रवृत्तीवर जातीनं ताबा मिळवला होता. त्यातच जातीनं अस्पृश्यांनाही छळलं होतं त्या काळात. विशेष म्हणजे ज्या जातीनं जातीच्याच माणसांना छळलं नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या यातना सहन करायला लावल्या. विविध प्रकारचे अत्याचार केले. ती जात आज नष्ट करायला हवी. तिला बांडगुळागत चिकटवून ठेवूच नये. निदान शिक्षणात तरी जात आधार म्हणून घेवू नये म्हणजे झालं. विशेष म्हणजे जात काही खेळायचा चेंडू नाही वा एखादा पदार्थ नाही की जी विद्यार्थ्यांचं शाळेत नाव टाकतांना त्याला चिकटवावी. त्याला त्याच्या जातीची ओळख करुन द्यावी. माणसानं वा पालकानं आपल्या स्वार्थासाठी आपल्या पाल्याला जातीचं बंधन घालावं. त्याला बेडी घालावी जातीची विद्यार्थी दशेपासून नव्हे तर त्याला जातीचं बांडगुळ चिकटंवावं. महत्वाचं म्हणजे सरकारनं याकडे विशेष लक्ष द्यावं. शिक्षणात तरी जातीचा वापर करु नये. जातीवर आधारीत शिक्षण नसावं. शिक्षण जातविरहीत असावं. जेणेकरुन विद्यार्थ्यांना तरी शिक्षण घेतांना जातीछळाचा त्रास होणार नाही व वर्गावर्गात तो विद्यार्थी अमूक जातीचा आहे, असे म्हणत त्याचा अपमान होणार नाही. ज्यातून त्याला मध्येच शिक्षण सोडावं लागतं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०