Make trouble your weapon in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | त्रासाला आपलं शस्र बनवावं

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

त्रासाला आपलं शस्र बनवावं

त्रासाला आपलं शस्र बनवावं.?

त्रास.......त्रासाबाबत सांगायचं झाल्यास काही लोकांना भयंकर त्रास होत असतो तर काही लोकांना काहीच त्रास होत नाही. ज्यांना त्रास होत नाही. ते अतिशय भाग्यवान लोकं असतात. अन् ज्यांना अतिशय वेदनादायी त्रास होत असतो. ते कमी भाग्याचे असतात. तसं पाहिल्यास त्रासाचा पुनर्जन्माशी काहीही संबंध नाहीच. कारण काही लोकं पुनर्जन्माला मानत नाहीत. ते पुनर्जन्माला थोतांड असं संबोधतात.
पुनर्जन्म असतो काय? याचं उत्तर होय आणि नाही असं संभ्रमाचं आहे. मागील जन्मात आपल्या काही इच्छा अपुर्ण राहिलेल्या असतात. त्या इच्छा पुर्ण झालेल्या नसतात. त्या पुर्ण करण्यासाठी पुनर्जन्म असतो. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. पुनर्जन्म हा कुणाच्याही रुपात होवू शकतो. साहजीकच एखादे प्राणी वा पक्षी किंवा एखादं झाड. मग हे प्राणी एखाद्या वेळेस आपल्याला अकस्मात चावा घेतात. त्यानंतर आपलं विधान असतं की मी अमूक रस्त्यानं गेलो नसतो तर तो प्राणी चावला नसता किंवा एखाद्याचा अपघात होतो एखाद्या गाडीनं. त्यावेळेसही लोकं म्हणतात की अमूक व्यक्तीनं माझं ऐकलं असतं तर तो मरण पावला नसता. परंतु हे सर्व आपले तर्कवितर्क असतात. त्या व्यक्तीचा मृत्यु हा तसाच ठरलेला असतो. ज्याला कोणी कितीही थांबवलं तरी तो थांबू शकत नाही. हेही काहीसे पुनर्जन्मावर आधारीत असते. जसं मरणाऱ्या व्यक्तीनं मागील जन्मात असंच त्याला तुडवून मारलं असेल. याबाबत एक महाभारतातील उदाहरण आहे. भीष्म पितामहा बाणशय्येवर असतांना विधात्याला विचारतात की मलाच ह्या बाणाची शय्या का? त्यावर विधाता उत्तर देतो,
" आठव की तू तरुण असतांना व राजपद असतांना व तू एका रस्त्यानं लवाजमा घेवून चाललेला असतांना एका सैनिकानं तुला म्हटलं. साप आडवा आला आहे. विशालकाय आहे. काय करावे. त्यावर तू म्हणाला की त्याला बाजूला करा. तसं तुझं ऐकून तुझा आदेश पाळत त्या सैनिकानं त्या सापाला जीवंत असतांनाच दूर फेकलं. ज्यामुळं तो साप एका काटेरी बाभळीवर पडला. ज्यातून त्याला काटेरी बाभळीचे काटे रुतले व अत्यंत करुणेनं व दुखदायी अंतकरणानं तो मरण पावला. तो सापच अर्जुनाच्या रुपानं आलेला आहे, ज्यानं तुला हे बाणरुपी काटे दिलेले आहेत." त्यानंतर भीष्म काय समजायचं ते समजला व चूप बसला.
महत्वपुर्ण बाब ही की आपण जसे कर्म करतो. कुणाला सतवतो. परंतु त्याच आपल्या कर्मानुसार तद्नंतरच्या काळात आपल्याला त्रास होत असतो. म्हणतात की मला किती त्रास आहे. कारण त्रास हा सहन होत नसतो. तो जीवघेण्या स्वरुपाचा असतो. आपण जसे मागील जन्मी कर्म केले. कुणाकुणाला कसाकसा त्रास दिला. तसेतसे ते कर्म याजन्मी आपल्याला छळत असतात. कोणी माणूस बनून छळतो तर कुणी प्राणी वा पक्षी तर कुणी झाड बनून. तसंच आपण जर या जन्मात कोणाला मदत केली तर पुढील जन्मात तेच घटक आपल्याला मदतही करीत असतात. शिवाय आपल्या इच्छा आकांक्षा या जन्मात पुर्ण न झाल्यास त्या पुढील जन्मातही पुर्ण होवू शकतात. मात्र तुमच्या इच्छा आकांक्षेत काहीतरी दम हवा. जसं रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं आहे. कारण त्यांनी सीता नावाची एकच पत्नी केली. जी शेवटपर्यंत पुर्णकालीक त्यांच्याजवळ राहिली नाही. त्यात रामाला भयंकर त्रास झाला. परंतु पुढील जन्मात तो जेव्हा क्रिष्ण बनून आला. तेव्हा त्याला अनेक पत्नींचं सुख प्राप्त झालं. याचाच अर्थ असा की ज्या जन्मात त्याला पत्नीविरह सहन करावा लागला. पुढील जन्मात ते पत्नीविरहाचं दुःख सारं संपलं. तसंच याजन्मात राम सुखातच नव्हताच आणि पुढील जन्मात क्रिष्ण बनूनही तो सुखात नव्हताच. कारण त्रासानं कुणालाच सोडलेलं नाही.
त्रासाबद्दल सांगायचं झाल्यास ज्याला जास्त त्रास होतो. त्याला अमरत्व प्राप्त होतं असं म्हटल्यासही आतिशयोक्ती होणार नाही. रामाला चौदा वर्षाचा वनवास झाला. पत्नीविरहाचा त्रास झाला. क्रिष्णाला जन्मापासूनच त्रास झाला. स्वतःची आई सोडून राहावं लागलं. त्यातच जेव्हा तो तरुण झाला. तेव्हा त्याला प्रेम देणारी आई नाईलाजानं सोडावी लागली. शिवाय ते सर्व मित्रमंडळ सोडावं लागलं. परंतु त्या त्रासातूनच ते घडले. एवढंच नाही तर आधुनिक काळातील उदाहरण आपल्यासमोर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र औषधाअभावी मरण पावले. पत्नी रमाबाईही तशीच. त्यात त्यांना किती त्रास झाला असेल, आपण कल्पनाही करु शकत नाही. तरीही ते सगळं सहन करुन शिकले. समाजासाठी झटत राहिले. चवदार तळ्याचा जेव्हा खटला सुरु होता. तेव्हा जवळ जे तुटपुंजे पैसे असायचे. ते पत्नी रमाबाईच्या प्रकृतीला न लावता खटल्याला लावले. ज्यातून खटला जिंकल्या गेला. परंतु रमाबाई मरण पावल्यात. आज समाज आरक्षणाचं सुख भोगतो आहे. तरीही काही समाजकंटक बाबासाहेबांना नावबोटं ठेवतात. तसंच दुसरं उदाहरण थॉमस एडीसनचं. त्यांनी विजेच्या बल्बचा शोध लावला. परंतु तसा शोध लावत असतांना व प्रयोग करीत असतांना त्यांनी आपल्या घरच्याच शेतातील धानाच्या गंजीला आग लावली. ज्यातून कितीतरी मिळकत गेली. त्यावेळेस त्यांच्या वडीलांनी त्यांना घरातून हाकलून दिले. त्यानंतर ते रेल्वेगाडीत वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करुन प्रयोगाचाही छंद जोपासू लागले. त्यावेळेस पांढरा फॉस्फरस सांडल्यानं रेल्वेगाडीच्या डब्याला आग लागली. ज्यांचा त्रास थॉमस एडीसनला भरपूर झाला. परंतु त्यातूनच त्यांना विजेच्या बल्बचा शोध लावता आला.
अशी बरीच माणसं आहेत की ज्यांना ते जीवंत असतांना भरपूर त्रास झाला. ज्यात छत्रपती शिवाजी, आग्र्याची नजरकैद व पन्हाळ्याची कैद, प्रतापगडावरील जीवघेणा हल्ला. महाराणी जीजाबाई, शहाजीपासून कितीतरी दिवस फारकत. महाराणी ताराबाई, पतीचं आजारपण, त्यातच पतीच्या मृत्यूनंतर आलेली स्वराज्य टिकविण्याची जबाबदारी. ज्यातून झालेला तीव्र त्रास. महाराज संभाजी, जीवंत असतांनाच जिव्हा व हात कापले गेलेत. डोळेही काढले गेलेत. अनंत हालहाल केले व नंतर एकेक अवयव कापत मान कापली. महाराज पृथ्वीराज चव्हाण, डोळे काढले. महाराणी पद्यावती, महाराणी संयोगीता, जोहार करावा लागला. गॅलिलिओ पृथ्वी गोल आहे असं म्हणताच हत्या, महात्मा गांधी, अछूत म्हणत दक्षीण आफ्रिकेत असतांना रेल्वेगाडीच्या डब्यातून उतरवून देवून अपमान केला.
आज अशी कितीतरी मंडळी आहेत की ज्यांचे नाव जगात आहे. कारण त्यांनी त्यांच्या जीवंत असतांना अतिशय वेदना भोगल्या. ज्यातून त्यांना संघर्ष करावा लागला व असे करीत असतांना त्यांचं नाव जगात वाढलं. आपणाला राजा विक्रमादित्याचं नाव माहीत आहे. नल दमयंती माहीत आहे. राजा भोज माहीत आहे. ते कशामुळे? तर त्याचंही उत्तर त्यांनी भोगलेला त्रासच.
त्रासाबाबत सांगायचं झाल्यास जो जास्त त्रास सहन करतो. जो जेवढा त्रास सहन करतो आणि जो जसा त्रास सहन करतो. त्याला अमरत्वच प्राप्त होत असतं. शिवाय त्रासाची गती, रचना व स्वरुप कसे आहे? यावरुन इतिहास घडतो. कोणी म्हणतात की रामायण महाभारत घडलंच नाही. ते थोतांड आहे. परंतु ते थोतांड नाही. तिही आपल्यासारखीच माणसं असतील. परंतु त्यांचा पुरावा नष्ट करण्यात आला. नालंदा तक्षशिला तसेच भोजशाला आणि इतर तत्सम तमाम हिंदूस्थानातील विद्यापीठं जाळून. नालंदा विद्यापीठामध्ये एवढे ग्रंथ होते की जे जळायला सहा महिने लागले. ज्यात तमाम हिंदूस्थानातील फार पुर्वीपासूनच्या राजे रजवाड्यांचा इतिहास अस्तित्वात होता. जो मिटविण्याचा प्रयत्न केल्या गेला. परंतु ते साहित्य आजही आपल्याला माहीत झालं. कारण ते काही लोकांना मुखोद्गत होतं तर त्याच्या काही प्रती या लोकांच्या घरी अस्तित्वात होत्या. ज्या शोधून जाळता आल्या नाहीत.
महत्वाचं सांगायचं म्हणजे त्रासापासून कोणीच सुटलेले नाहीत. सर्वांना थोड्याफार प्रमाणात त्रास असतोच. तेव्हा त्रासाला कोणीही घाबरुन जावू नये. त्याचा सहर्ष स्विकार करावा. कारण आपल्याला होत असलेला त्रासच आपली दिशा ठरवतो नव्हे तर आपल्याला मार्ग दाखवीत असतो. म्हणूनच त्रासाचा कोणाताही बाऊ न करता, तसंच त्याबद्दल कोणताही किंतू परंतु मनात न बाळगता त्रासालाच आपलं शस्र बनवावं. जेणेकरुन त्यातून आपली दिशा ठरेल व व्यवस्थीत, सुखरुप मार्ग काढता येईल. ज्यातून इतरांना प्रेरणा मिळेल आणि तो एक इतिहास बनेल, इतरांना प्रेरणा देण्यासाठी नव्हे तर दिशा देण्यासाठी आणि मार्ग धरण्यासाठी.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०