शिक्षकांचं शिकवणं प्रभावी असावं.
लोकं म्हणतात की लहान मुलांना अक्कल नसते. काही शिक्षकही तसंच समजतात. परंतु जेवढी अक्कल लहान मुलाना असते. तेवढी अक्कल मोठ्यांना नसतेच कदाचीत. हे अलिकडील काळावरुन दिसून येते. अलिकडील काळातील मुलं हे मोबाईल वा स्मार्टफोन अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळतात. जो मोठी माणसं हाताळू शकत नाहीत. फरक एवढाच आहे की काय वाईट व काय चांगले हे त्या लहानग्या वयात कळत नाही. कारण त्यांना स्वतःचा अनुभव यायचा असतो. जो अनुभव एखादं संकट आल्यावर सहज येतो.
संकट....... संकटं येत असतात. जातही असतात. ज्याप्रमाणे सुर्य चंद्राला उदय व अस्त असतं, त्याप्रमाणेच संकटांनाही उदय व अस्त असतंच. याबाबत एक उदाहरण देतो.
तो वर्ग पाचवा. तसं पाहिल्यास पाचव्या वर्गातील मुलांना तेवढी अक्कल नसतेच. असं आपण समजू शकतो. परंतु त्या वर्गातील मुलं अचानक एकदा आपल्या शिक्षकाला म्हणाले,
"सर, तुमची जन्मतारीख सांगा."
शिक्षकांनी प्रथम आढेवेढे घेतले व नंतर अगदी सहजरित्या आपल्या विद्यार्थ्यांना आपली जन्मतारीख सांगीतली. त्यानंतर शुक्रवार उजळला. तसं दर शुक्रवारी विद्यार्थी सरस्वतीपुजन करायचे. तसा तो दिवस उजळला. आजही सरस्वतीपुजन होतंच. तसं त्या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकाची वर्गात यायची वाट पाहात होते. त्यानंतर थोड्या वेळानं शिक्षक वर्गात आले.
शिक्षक ज्यावेळेस वर्गात आले, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकांच्या ध्यानीमनी नसतांना आणलेला केक आपल्या शिक्षकांच्या पुढ्यात ठेवला. तसं शिक्षकानं विचारलं,
"हे काय?"
"सर, हा केक. आपला आम्ही वाढदिवस साजरा करतोय."
ते विद्यार्थ्यांचं बोलणं. तो केक समोरच होता. तो शिक्षक त्या केकला न्याहाळत होता. अशातच तो विचार करीत होता आपल्याला असलेल्या शाळेतील त्रासाचा. त्यानं आजपर्यंत त्या शाळेत अतिशय वेदनादायी त्रास भोगला होता. कधी वार्षीक वेतनवाढ बंद तर कधी पत्र देवून त्याचेवर ताशेरे ओढणे, कधी नोकरी सुरु असतांनाही वेतन बंद. मग घरी हालअपेष्टा. कधी उपाशी राहणे आणि आताही त्रासच होता त्या शिक्षकाला. आता त्याचं वेतन बंद होतं व तो आपल्याला वेतन मिळावं म्हणून न्यायालयात शाळेविरुद्ध भांडत होता.
तो केक त्या शिक्षकाच्या पुढ्यात होता व तो केक त्याला पाहात हसत होता. कारण त्यानं बऱ्याच वर्षांपासून आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. गतकाळातील बऱ्याच दिवसापुर्वी त्यानं वाढदिवस साजरा केला होता. परंतु जेव्हापासून शाळेचं दुखणं खुपणं मागं लागलं. तेव्हापासून त्याला आपला वाढदिवस साजरा करणं आवडत नव्हतं आणि इतरांनीही त्यांचा साजरा केलेला वाढदिवस आवडत नव्हता. परंतु शाळेतील मुलंच ती. त्या मुलांची ती भावना. तो केक त्या शिक्षकासाठी महत्वाचा नव्हता. त्याची किंमत त्या शिक्षकासाठी महत्वाची नव्हती. तर त्या केकमधून जे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा विद्यार्थ्यात निर्माण झाला होता. ते प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा महत्वाचा होता. ज्याला कोणत्याही मापानं मोजता येत नव्हतं.
अलिकडील काळ असाच आहे. सर्वांवर काही ना काही प्रमाणात संकट असतंच आणि हे संकट पाचवीला पुजलेल्यासारखं वागत असतं माणसाच्या आयुष्याशी. त्यातही काही सुखाचे क्षण येतात. तो विद्यार्थ्यांनी अकस्मात आणलेला केक असंच काही त्या शिक्षकाच्या जीवनाला वळण देवून गेला. तो विचार करु लागला. विचार करु लागला की आपल्या या भांडणात या विद्यार्थ्यांचा कोणता दोष? दोष प्रशासन आणि शाळेचा. मग आपल्याला वेतन भेटो अगर न भेटो, आपण शिकवायचंच. चांगलंच शिकवायचं. त्यानंतर त्या शिक्षकानं आणखी चांगल्या प्रकारे शिकवणं सुरु केलं होतं.
एकदा तेच शिक्षक एका मैदानात उभे असतांना एक मुलगी त्याचेजवळ आली. तिच्या कडेवर एक लहान मुल होतं. येताबरोबर ती त्या शिक्षकाच्या पायावर नतमस्तक झाली. त्यानंतर ती तिच्याच जवळ उभ्या असलेल्या आपल्या पतीला सांगू लागली. यांच्यामुळंच माझं जीवन घडलं.
शिक्षकानं ते ऐकलं. तसा त्या शिक्षकाला विचार आला. विचार आला की मी प्राथमिकचा शिक्षक. शेंबड्या मुलांना शिकविणारा. मी काय ह्या मुलीचं जीवन घडवलं असेल. तसं त्यानं विचारलं, विचारलं की मी तुला ओळखलं नाही. तुझं नाव काय?
त्या मुलीनं तो प्रश्न ऐकला. तशी ती म्हणाली,
"सर, आपण मला ओळखलं नाही. मी त्याच वर्गातील मुलगी. ज्या वर्गात आम्ही केक आणला होता."
"सध्या काय करतेय?"
"मी सिनीअर कॉलेजची प्राध्यापिका आहे."
ते मुलीचं बोलणं. त्यानंतर त्यांच्यात बराच संवाद झाला. तसं बोलणं संपलं. तसा नोकरीकाळातील सर्व सारीपाट त्या शिक्षकाला आठवायला लागला. आठवायला लागलं की आपण शिकविलेली मुलगी हीच. हिच्या घरी अनेक बहिणी. त्यातच वडील तिला शिकवायला तयार नव्हते. ते कोणाकोणाला शिकविणार. शिवाय घरी बुरसटलेले विचार. मुलासाठी एवढ्या मुली जन्माला घातलेल्या. त्यातच ती शिक्षकांकडे यायची. वारंवार म्हणायची,
"सर, माझे वडील मला शिकवायला तयार नाहीत. तुम्ही त्यांना म्हणा ना."
त्यानंतर ते शिक्षक त्या विद्यार्थीनीच्या घरी जायचे. त्यांना समजावून सांगायचे की ही तुमची मुलगी उद्या तुमचा उद्धार करेल. कुटूंब पोसेल. त्यावर त्या पालकांनाही बळ यायचं. कधी तो शिक्षकही त्या मुलीला पैसे द्यायचा आणि ज्यावेळेस तो शिक्षक त्या विद्यार्थीनीला पैसे द्यायचा. तेव्हा त्याला अभिमान वाटायचा. कारण त्यावेळेस त्याचं वेतन बंद असल्यानं त्याची न्यायालयीन लढाई सुरु होती.
तोच शिक्षक एकदा शाळेत असतांना शाळेचं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर शाळा सोडून गेलेल्या त्याच विद्यार्थीनींनी एकदा त्यांच्या वाढदिवशी एक दैनंदिनी व पेन त्या शिक्षकाला बक्षीस देण्यासाठी आणला होता.
महत्वपुर्ण बाब की आपलं जर चांगलं शिकवणं असेल तर विद्यार्थी असा केकचा प्रकार करीत असतात. ते विद्यार्थी आपल्या जीवाला जीव लावत असतात. त्यातच बहुतेक सर्वच विद्यार्थी हे हिरीरीनं शिकत असतात. हे प्रत्यक्ष निरीक्षणातून दिसून येतं. परंतु अलिकडील काळात असे चांगले शिक्षक शाळा प्रशासनाला आवडत नाहीत. शाळा प्रशासनाला आवडतात ते शिक्षक. जे नातेवाईक असतात वा देण देत असतात. मग त्यांच्यात शिकविण्याचं मुल्य असो वा नसो. ते शालेय प्रशासन त्या होतकरु शिक्षकांची किंमतच करीत नाही.
आज परिस्थिती अशीच आहे. जी मंडळी चांगले काम करतात. त्यांना समाज स्विकारत नाही. कारण कलियुग आहे. आज जे लोकं काहीही करीत नाहीत. उलट भ्रष्टाचार करुन बक्कळ पैसा कमवतात. त्यांना लोकं ते श्रीमंत असल्यानं मान सन्मान देत असतात. परंतु कालपरत्वे ते कालबाह्य होतात. उलट कालांतरानं मानसन्मान त्यांनाच मिळतो, जे इमानदार असतात आणि तेच कालांतरानं टिकूनही राहतात. शिक्षकांबद्दल सांगायचं झाल्यास पैसा हा क्षणीक असतो. परंतु जे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिकवतात. ते शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या जीवनात चिरकाल टिकून राहतात. अगदी त्यांच्या मरणापर्यंत. तेव्हा शिक्षकांचं शिकवणं प्रभावी असावं. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगलंच शिकवावं. जेणेकरुन त्यांचं भविष्य घडू शकेल. कारण वेळप्रसंगी आपले बालपणातील मित्र आपल्याला कदाचीत आठवत नाहीत. त्यांचं विस्मरण होतं. परंतु चांगले शिक्षक आपल्याला सतत आणि नेहमी आठवत असतात. ही वस्तुस्थिती आहे आणि भविष्यात जर त्या शिक्षकांच्या निवृत्त झाल्यानंतर एखादा विद्यार्थी त्याचेजवळ येवून त्याला नतमस्तक होत असेल वा एखादं लहानसं बक्षीस देत असेल, वा एखादा केक त्यांच्या वाढदिवशी त्यांना न सांगता कापत असतील तर तेच त्या शिक्षकांना मिळालेलं बक्षीस असतं. ते बक्षीस भारतरत्न वा जगरत्न पुरस्कारापेक्षाही अतिशय महत्वाचं असतं. म्हणूनच शिक्षकानं आपल्या मनात कोणतेही आढेवेढे वा विद्यार्थ्यांबद्दल कोणताही आकस न ठेवता अगदी निश्चींत मनानं, कोणताही किंतू परंतु मनात न बाळगता आपल्या विद्यार्थ्यांना शिकवावं. प्रभावी शिकवावं. जेणेकरुन त्यातून ते विद्यार्थी पुढील काळात सन्मान करु शकतील, नतमस्तक होतील वा आवर्जून येवून त्यांची भेट घेवू शकतील. हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०