Is selfishness so bad? in Marathi Short Stories by Ankush Shingade books and stories PDF | स्वार्थपण एवढं खराब?

Featured Books
Categories
Share

स्वार्थपण एवढं खराब?

स्वार्थीपणा ; एवढा खराब?

स्वार्थपण.......माणसाला खात असतं त्याचं स्वार्थपण. स्वार्थपण केल्यानं माणसाचा विकास होतो. विकास नाही होत असं नाही. स्वार्थी व्यक्तींजवळ संपत्ती अगाढ वाढू शकते. तो चार पाच इमारती सहज बांधू शकतो. वाटल्यास स्वार्थी माणूस कितीतरी पुढेही जावू शकतो पैशानं व मालमत्तेनं. परंतु संबंधानं तो माणूस मागेच राहतो. कोणीही त्याचेशी व्यवहार करु पाहात नाहीत. म्हणतात की तो व्यक्ती स्वार्थी आहे. कोण त्याला मदत करणार.
अलीकडे समाजात असाच स्वार्थ वाढत आहे. तो एवढा वाढत आहे की त्या स्वार्थी माणसाला आपण काय करतो हेच दिसत नाही. शिवाय आपल्या हातून कोणती चूक होते हेही दिसत नाही. तो चुकांवर चुका करीत जातो व फसतो.
स्वार्थपण.......माणसानं स्वार्थी राहावंच थोडसं. कारण स्वार्थ जर नसला तर हित संपेल. अन् हित जर नसलं तर त्या माणसांची अवस्था एखाद्या वेड्यागत होईल वा भिकाऱ्यागत होईल. परंतु खरं सांगायचं झाल्यास आजच्या वेड्या माणसांनाही स्वार्थ असतोच. आपलं पोट भरावं असंही त्याला वाटत असतं. तो स्वतः उपाशी राहून इतरांच्या पोटाला अन्न देत नाही.
मुख्यतः माणसांचे स्वार्थपण जोपासणारी व स्वार्थपण न जोपासणारी अशा दोन गटात विभागणी केल्यास आज आपल्याला असं दिसेल की स्वार्थपण जोपासणारीच माणसं जगात भरपूर आहेत. प्रत्येक माणसालाच नाही तर प्राण्यांनाही स्वार्थ आहे. हा माझा, तो तुझा हे सगळं साऱ्यांनाच कळतं. साधा कुत्राही आपल्या मालकांना कोणी काही म्हणत असेल तर ते ओळखून भुंकतोच. जरी त्याचा मालक वाईट स्वभावाचा असला तरी आणि तो त्याला सतत मारहाण करीत असला तरी. तेच इतरही प्राण्यांचं आहे. आजची मांजरही फार हुशार झाली आहे. पुर्वीची मांजर सात घरं फिरुन खात होती. ती विप्रासारखी वागत होती. जसे विप्र. विप्र एका दिवशी फक्त पाचच घरची भिक्षा मागायचे. त्या पाच घरी भिक्षा नाही मिळाली तर तो सहाव्या घरी जात नसे. तो चक्कं उपाशी राहात असे. म्हणूनच त्याला पुढे समाजात प्रतिष्ठेचं स्थान मिळालं. आजच्या काळात जे विप्रांना प्रतिष्ठेचं स्थान आहे. ते त्यांची कृपा. मात्र आजचे विप्र तसे नाहीत. हं, आजच्या विप्रांना माधुकरी मागण्याची वेळ आलीच तर ते पाचच घरी भिक्षा न मागता जास्त घरी भिक्षा मागतील. परंतु उपाशी राहणार नाहीत. याचं कारण आहे स्वार्थपण.
स्वार्थपणाचा कालचा इतिहास पाहता कालचे लोकं हे नियमांचे पक्के होते असा इतिहास सांगतो. ते नियम मोडत नव्हते असाही इतिहास सांगतो. शिवाय त्यांच्यात स्वार्थपण नव्हतं हेही इतिहासच सांगतो. याबाबतीत एक दंतकथा प्रचलीत आहे. नल दमयंती हे एका राज्याचे राजा राणी. परंतु जेव्हा त्यांचेवर नियतीनं पाठ फिरवली. तेव्हा ते वणवण भटकत होते. अशातच त्यांना काही दिवस उपासात काढावे लागले. त्यांच्याबाबतीत एक प्रसंग असा की नल दमयंतींना एके दिवशी फार भूक लागली असतांना एके ठिकाणी अर्धी पोळी मिळाली. नलनं त्या अर्ध्या पोळीतील अर्धी पोळी म्हणजेच चतकोर तुकडा दमयंतीला दिला. परंतु जेव्हा ते तो चतकोर तुकडा खात होते. ज्यावेळेस त्यांच्या पोटात असंख्य कावळे ओरडत होते. त्यावेळेस एक श्वान तिथं आला व तो आपली शेपटी हलवायला लागला. त्यावेळी नलनं आपल्या हिशाची चतकोर पोळी त्याला दिली. तशी ती पोळी त्या श्वानानं खाल्ली व पुन्हा तो आपली शेपटी हालवू लागला. तेव्हा परत दमयंतीच्या हिशातील पोळीही त्याला दिली. याला म्हणतात स्वार्थपण न जोपासणे. आज असे ना दमयंती जगात नाहीत. कारण आजच्या काळात कोणीही स्वतः उपाशी राहून आपली पोळी श्वानाला देत नाहीत. काल तर कर्णासारखा असा राजा होवून गेला की ज्याला माहीत होतं, आपण आपले कवचकुंडलं दान मागायला आलेल्या साधूरुपातील इंद्राला दिले तर आपण मरणार. तरीही त्यानं अगदी सहजतेनं किंतु परंतु न पाहता आपले कवचकुंडलं दिलेत. अन् आजच्या काळात युधीष्ठीरासारखा राजाही होणार नाही की जो स्वर्गात जातांना यमराजाच्या एका दुताला म्हणाला, "या श्वानाला जर माझ्यासोबत स्वर्गात जाण्याची परवानगी नसेल तर मला अजिबात नेवू नये. मिही येत नाही स्वर्गात आणि मलाही नको स्वर्ग."
ही त्यांची बाणेदार उत्तरं आणि तेच त्यांचं बाणेदार वागणं. कोणी त्याला दंतकथा म्हणतात. परंतु त्या दंतकथा वाटत असल्या तरी त्यांची नावं ऐतिहासिक पुस्तकात बरीच गाजली. हे सत्य नाकारता येत नाही. तसं पाहता अर्वाचीन काळातील काही लोकांचा इतिहासही तसाच आहे. जसे. महात्मा गांधी. त्यांच्या घरी काय कमी होतं. त्यांचे वडील पोरबंदरचे दिवाण होते. तसं पाहता ते सुखात राहू शकत होते त्या काळात. कोणी त्यांना आजही बदनाम करतात. म्हणतात की ते व्याभिचारी होते. परंतु तो या काळातील लोकांचा विचार करण्याचा भाग आहे. जर ते तसे असते तर त्या काळातील जिकडे तिकडे संस्काराचे जाळे असतांना लोकांना तसा व्याभीचारीपणा दिसल्यावर खरंच ते महात्मा गांधीमागं उभे तरी राहिले असते काय? ही विचार करणारी बाब आहे. परंतु आजच्या काळातील लोकांचं काय? आपण स्वतः काहीच करायचं नाही अन् आपलं नाव मोठं व्हावं म्हणून महापुरुषांवरच ताशेरे ओढायचे. हा काळ आला आहे आज. आज तर कोणीकोणी शिवरायांच्या काळात मदारी मेहतरच झाला नाही म्हणतात.
महात्मा गांधीनी स्वार्थपण न बाळगता आपली राजशी वस्र त्यागली. यावरुन त्यांच्यात नव्हता काय? होता. तो म्हणजे ते राहात असलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे. आजच्या काळातील स्वार्थपणाचा इतिहास पाहता सर्वच लोकं स्वार्थपणाच्या दुर्बल इच्छेत कैद आहेत. या स्वार्थपणाच्या इतिहासात अर्वाचीन काळातील स्वार्थी वागणारे दोन बालकं होवून गेले की ज्यांच्या मनात कोणताच भीतीभाव नव्हता व ज्या बालकांना बादशाहा औरंगजेबाच्या वजीरांनं अगदी कोमल वयात भिंतीत गाडून टाकण्याचा प्रकार केला. त्यातही त्या इवल्या जिवांनी आपल्या जिवांची पर्वा केली नाही. तो स्वार्थ होता. आपला धर्म. आपला धर्म चांगला की वाईट याचं त्यांना घेणंदेणं नव्हतं.
स्वार्थपण कोणाला नाही. साध्या मुंगीलाही आहे स्वार्थपणा. तिही आपल्या तोंडातील दाणा सोडत नाही. माणसानं स्वार्थपण असं ठेवावं. देशाचं स्वार्थपण. माझा देश स्वतंत्रच असायला हवा. त्यासाठी मरण आलं तरी चालेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक लोकं शहीद झाले. त्यांनी आपल्या प्राणांची पर्वाच केली नाही. त्यात इवल्या आठ वर्षाच्या नंदुरबारच्या शिरीषकुमारचं बलिदान वाया जाणार नाही वा इतिहासात कधीही पुसलं जाणार नाही. त्यावेळेस घनश्यामदास, सुखदास इत्यादी शेकडो बालके प्राणास मुकले. परंतु त्यांनी इंग्रजांसमोर त्या लहानग्या वयातही हार मानली नाही. जे शिकायचं वय होतं. खेळण्याबागडण्याचं वय होतं. तसंच धर्माचं स्वार्थपण. मी मेलो तरी चालेल. परंतु परधर्म स्विकारणार नाही. जसं संभाजीला मारलं गेलं. ते मरण पावले. परंतु त्यांनी परधर्म स्विकारला नाही. म्हणूनच आज इतिहास त्यांची इज्जत करतो. याच शृंखलेत येतात साहेबजादा फतेहसिंह व जोरावर सिंह. जे धर्मासाठी कोवळ्या वयात भिंतीत गाडले गेले. परंतु भिंतीही त्यांना गाडू शकल्या नाहीत. ते जीवंत असतांनाच भिंतीला तडा गेला. ती पडली आणि ते जीवंतच भिंतीतून बाहेर पडले. ते पाहताच बादशाहाचा वजीरही आश्चर्यचकीत झाला. त्याचा राग अनावर झाला व त्यानं शेजारीच उभ्या असलेल्या शिपायाजवळील लटकवलेली तलवार उपसली अन् आव ताव न पाहता तो धावत भिंतीजवळ गेला व त्यानं त्या तलवारीनं त्यांची मान कापली.
फतेहसिंह.......त्यावेळेस तो अवघ्या सहा वर्षाचा. अगदी अल्प वयातील शहीद झालेला पहिला बालक. शिखाच्या दहाव्या धर्मगुरुंचा मुलगा तर दुसराही त्याचाच मुलगा होता जोरावर सिंह. जो फक्त आठ वर्षाचा होता. दोघंही लहान होते. परंतु आपला धर्म वाचवतांना ते कधीही कचरले नाहीत वा धर्म बदलवला नाही. त्यांच्यातही स्वार्थ होताच. परंतु तो स्वार्थ होता धर्माचा. आमचा धर्म श्रेष्ठ मानण्याचा.
स्वार्थ.....आजही समाजात स्वार्थ आहे. एवढा स्वार्थ आहे की आपण केवळ संपत्ती मिळविण्यासाठी भावाभावाची हत्या करतो. साधा शेतातील धुरा थोडासा सरकला की शेजाऱ्या शेतकऱ्यांची हत्या करतो. कधीकधी बाजुवाल्यांचीही एक एक फुट जागेसाठी हत्या करतो. स्वार्थासाठी धर्म बदलवतो. अन् स्वार्थासाठी काहीही करतो. नल दमयंतीसारखा निःस्वार्थीपणा कधीच कोणत्याही स्वरुपाचा दिसत नाही आपल्यात. किंचीतही नाही. ना कर्णाच्या कवचकुंडल दान देणाऱ्या प्रसंगासारखा ना युधीष्ठीरच्या स्वर्गात श्वान नेणाऱ्या प्रसंगासारखा. खरं तर आजच्या काळातील स्वार्थानं गोळा केली असलेली ही संपत्ती वा वैभव मरणानंतर आपण नेत नाही. नेतो ते आपले चांगले कर्म.
माणसानं स्वार्थीपणानं वागावं की वागू नये असं मी म्हणत नाही. स्वार्थपण असावंच. ते नसेल तर आपल्याला आपल्याच देशात कोणीच राहू देणार नाही. कोणीही आपल्यावर ताबा मिळवेल. आपल्याला हरवेल व आपल्याला गुलाम करेल. परंतु एवढाही स्वार्थीपणा नसावा की आपला आपणच जीव घ्यावा. साध्या एक फुट जागेसाठी कुण्या भावाचा वा शेजाऱ्याचा जीव घेणारा स्वार्थीपणा कधीच नसावा आपणात. कारण ती एकफुट जागा काही आपण स्वर्गात नेत नाही. अन् कुणी ती जागा हिसकावूनही घेवू नये कोणाची. आपली एक फुट जागा कामाची. हं जागाच पाहिजे तर विधात्याला साडेपाच फुट हक्काची जागा मागा. कारण आज एवढी माणसं मरतात की त्यांना जगात परमनंट जागा मिळत नाही. एका जागेवर जाळलेल्या प्रेताची राख उचलून त्याच जागी दुसरं प्रेत जाळलं जातं. तसंच एका जागेवर दफन करण्यात आलेलं मुदडं सहा महिण्यानं बाहेर काढून फेकण्यात येतं व त्याच जागेवर दुसरं मुदडं गाडण्यात येत असतं. ही वास्तविकता आहे. कोणताच व्यक्ती कुणाचीच मालमत्ता नेत नाही. ना पैसाही नेत. मग हा मालमत्तेसाठी वा पैशासाठी वा इतर गोष्टीसाठी स्वार्थीपणा का? मुघल बादशाहांनी धर्मासाठी व सत्ताविस्तारासाठी एवढे बळी घेतले. काय मिळवलं त्यांनी? असा विचार केल्यास काहीच नाही असं म्हणता येईल. साध्या औरंगजेबाचं जर उदाहरण घेतलं तर त्यानं धर्मासाठी एवढं केलं. काय मिळालं त्याला. त्याची समाधी देखील साध्या पद्धतीत विराजमान आहे.
आज माणसानं स्वार्थीपणा किंचीत तरी सोडावा. सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. सर्वांना सन्मानानं जगवावं. कारण मृत्यूनंतर फक्त राख होते या देहाची. काहीच कोणाला मिळत नाही. त्याची प्रचीतीही वृद्ध झाल्यावर येते. येत आहे. आज ज्या लेकरांसाठी आपण आपलं स्वार्थपण जपतो ना. तीच लेकरं आपण म्हातारं झाल्यावर आपल्याला वृद्ध अवस्थेत फार त्रास देतात. वृद्धाश्रमात टाकतात आणि मेल्यावर मयतीलाही येत नाही. तसं पाहता मरणोपरांतही आपल्याला गाडायला वा जाळायला कायम स्वरुपाची जागा उपलब्ध होत नाही. म्हणूनच स्वार्थपणाची वास्तविकता जपतांना तोच विचार मनात ठेवावं व तसं वागावं. जेणेकरुन त्याचा फायदा तुम्हालाच होईल. जग तुमचंच नाव घेईल, कर्ण, युधीष्ठीर व नल दमयंतीसारखं. मग ते पाहायला तुम्ही नसले तरी चालेल. माणसानं स्वार्थपण जपावं. स्वार्थीपणानं जगावं. परंतु असं स्वार्थीपण जपावं की ज्यातून आपलाच नाही तर जगाचा उद्धार होईल. तेच स्वार्थीपण आपल्या कामाचं आणि उपयोगाचं आहे. दुसरं कोणतंच स्वार्थीपण आपल्या उपयोगाचं नाही हे तेवढंच खरं. स्वार्थपण आपण आपलं जीवन कसं जगतो यावर अवलंबून आहे. आपलं जीवन आनंददायी जगा, खुश राहा आणि सर्वांना सुखात ठेवा म्हणजे झालं. स्वार्थीपण जोपासत जगणं म्हणजे लोकांच्या विचारांची हत्या करणं होय. तेवढ्या गोष्टी सोडाव्या यातच आपलं भलं आहे. यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०