Agriculture is not affordable in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | शेती परवडत नाही

Featured Books
Categories
Share

शेती परवडत नाही

शेती परवडत नाही?

*आज शेतकऱ्यांची हालत अगदी दयनीय आहे. बरेचसे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्याचं कारण म्हणजे शेती न पिकणे. शेतीत पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन न झाल्यानं जी बिकट परिस्थिती निर्माण होते. ती सहन न झाल्यानं शेतकरी आत्महत्या करीत असतात. कारण शेती पिकवायला पैसा लागतो. बियाणे घ्यायला व ते रुजवायला पै पै पैसा लागतोच. एवढंच नाही तर ते बियाणे अंकुरीत झाले की त्या अंकूराची पुढे रोपे होईपर्यंत आणि पुढं त्याला फुल लागेपर्यंत पैसा लागतो आणि अशावेळेस एखाद्या वेळेस ओला दुष्काळ वा सुका दुष्काळ पडला की बस. शेतकरी हवालदिल होतो. कारण उभी रोपं कोलमडून पडलेली असतात. त्यातच शेतकरी आत्महत्या घडत असतात. यावर उपाय एकच. सरकारनं एक कायदा करावा. सर्व जमीनी आपल्या ताब्यात घ्याव्या. त्यावर शेतकऱ्यांना नोकऱ्या द्याव्यात. त्यांना वेतनही द्यावं व वयाच्या साठ वर्षानंतर त्यांना पेन्शनही द्यावी. तेव्हाच शेतकऱ्यांची हालत सुधारेल व कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतीही चांगली पिकेल व शेतकरी वर्गही खुश राहील व कोणाचीच कुरकुर राहणार नाही. ही सत्य बाब आहे.*
शेती करणं काही सोपी गोष्ट नाही. ती परवडणारीही गोष्ट नाही. कारण शेती करायला कठोर परिश्रम लागतात आणि ती परवडत नाही. कारण तिला पोषायला पैसा लागतो. जेव्हा सुक्या किंवा ओल्या दुष्काळानं शेती बुडते वा शेतीचं नुकसान होतं. तेव्हा त्या शेतीला उभारी देण्यासाठी वा लावायला पैसा लागतो. तो पैसा शेतकऱ्यांजवळ नसल्यानं तो जगेल कसा? त्यातच शेती जर नाही केली दोन वर्ष, तर ती शेती ओसाड बनते. मग तिला पुन्हा उभारी द्यायला जास्त पैसा लागतो. म्हणूनच शेती करणं हे नुकसानदायक काम आहे. तरीही शेतकरी शेती करीत असतात.
शेती करणं वाईट नाही. परंतु बरीचशी मंडळी म्हणतात की शेती करणं वाईट आहे. ती परवडणारी गोष्ट नाही. त्यांचंही कदाचीत बरोबरच आहे. कारण शेतकरी माणसाला रोजच मरणाला समोर जावं लागतं. त्यांच्या पावलोपावली मृत्यू थयथय नाचत असतो. कधी वीजेच्या पडण्यानं त्याचा मृत्यू होतो तर कधी एखादा साप चावून. कधी एखाद्या हिंस्र जनावरांची त्याला शिकार व्हावी लागते तर कधी अकस्मात निर्माण झालेल्या सुक्या ओल्या दुष्काळाचा आघात सहन न झाल्यानं मृत्यू होतो. आत्महत्या तर आता नेहमीच्याच ठरलेल्या आहेत.
आता कोणी म्हणतील की शेती करणं वाईट गोष्ट नाही असं का म्हणावं कोणी? तर त्याचं उत्तर असं देता येईल की ज्याला शेती कराविशी वाटत नसेल आणि त्याला जर म्हटलं की बाबा रे तू शेती करीत नाही तर ती शेती सरकारला दानात दे. तर तो देणार नाही. बदल्यात त्याला सरकारी नोकरी दिली तरी. हं, अनुकंपातही शेती शेतकऱ्यांकडून जबरीनं हिसकावून घ्यावी लागते. आता यात सांगायचं म्हणजे शेती जर परवडत नाही तर शेतकरी आपली शेती कुणी मागीतल्यास स्वखुशीनं सोडतो का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. जर सरकारनं म्हटलं की आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना वेतन देणार. पेन्शनही देणार. तरी कोणी सरकारला शेती स्वखुशीने व सहजासहजी देणार नाही. याचाच अर्थ असा की शेतकरी वर्गाला शेती करणं परवडत असावी. म्हणूनच कोणताच शेतकरी असे पाऊल उचलू शकत नाही. ही सत्यता आहे. याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे बरेचसे शेतकरी शेतीला आपली माय वा माऊली समजतात. जसा आपण आपल्या आईचा सौदा करीत नाही. तसा शेतकरी आपल्या शेतीचाही सौदा करीत नाही आणि दुसरं कारण म्हणजे काही लोकांना शेती ही दुभत्या म्हशीसारखी असते. ते दिमाखानं शेती करतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. शेतीचं व्यवस्थापन शास्र त्यांना कळतं व ते आपल्या शेतीत अस्सल उत्पादन घेतात की त्या उत्पादनावर निसर्गनिर्मीत कोणत्याही संकटांचा परिणाम होत नाही. ते अतिशय कठीण परिस्थितीतही लाभातच राहतात. लाभाचीच शेती करतात.
शेती परवडते. परंतु कोणाला? ज्याच्याकडे कितीतरी एकर कास्तकारी आहे व जो आपल्या नोकराच्या भरवशावर स्वतः उपस्थीत राहून मेहनत करुन घेतो. ज्याला काहीच करावं लागत नाही. फक्त देखरेख ठेवावी लागते नोकरांवर व नोकरांना राबवून घ्यावं लागतं गुलामागत. ते राबवून घेतात. तसेच ते आपल्या शेतीत वर्षभर पिकं काढत असतात. एक पीक बुडलं तरी चालेल. परंतु दुसरं पीक उत्पादन देत असतं. त्यांनाच शेती परवडत असते. मात्र अल्पभूधारकांना शेती परवडत नाही.
शेती ही महत्वपुर्ण गोष्ट आहे. शेती जर नसेल तर कोणताच व्यक्ती पोट भरु शकणार नाही. कारण शेतीतूनच निघालेल्या उत्पादनावर लोकं आपलं पोट जगवत असतात. त्यामुळंच शेती करणं ही आजच्या काळात गरजेची बाब झालेली आहे.
शेती.......शेती शेतकऱ्यांनी करावी. कारण त्यांनी जर ती केली नाही तर उभा संसार नेस्तनाबूत होईल. या देशातच नाही तर जगातही शेती केली गेली नाही तर जगातही कोणीच जगणार नाही. निसर्ग विराण होईल. म्हणूनच ती मग परवडत असो वा नसो. शेतकरी बांधव शेती करीत असतात. निसर्ग चक्राचा फेराही ते झेलत असतात.
महत्वाचं सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांनी शेती करावी व त्याला ती परवडावी. तसं पाहता शेतकरी शेती करतात. कारण ती एक समाजसेवाच आहे. जी कोणी करीत नाही. करु शकत नाही. ती समाजसेवा शेतकरीच करीत असतात. त्यांना तशी ती समाजसेवा करणं आवडत असते. बदल्यात काय मिळतं त्यांना? तुटपुंजे पैसे. त्यांच्या मालाला तर रितसर भावही मिळत नाही. तरीही ते शेतकरी सर्व संकट सहन करुन शेती परवडत नसली तरी शेती करीत असतात. ज्यावेळेस त्यांना शेतात माल लावणीची वेळ येते. तेव्हा बी बियाणे व खते यासारख्या सर्वच वस्तू महाग होतात आणि जेव्हा त्याचं पीक निघतं, तेव्हा सर्वच वस्तू स्वस्त होतात. त्यातच एखाद्याला शेतकऱ्यानं म्हटलं की अमूक वस्तू अमूक किमतीची आहे तर आपण एवढी महाग का? असं म्हणत भाव करतात आणि शेतकरीही तसा भाव टाव करुन आपलं उत्पादन स्वस्त भावात देतात. त्या शेतकऱ्यानं आपल्यासाठी एवढी मेहनत केलेली असतांनाही. तिथंच जर आपण एखाद्या मोठ्या हॉटेलात वा बारमध्ये गेलो तर तिथं कोणताच भाव करीत नाही. उलट तेथील वेटर पगारी असूनही त्याला टिप्स देतो. इथं दारुचे दर जरी कितीही वाढवले तरी तिथं आपण भाव करीत नाही. ती सर्रास आपल्याला घेणं जमते. त्यातून पोषक पदार्थ मिळत नसले तरी आणि ती दारु हानीकारक असली तरी आणि ज्या वस्तूतून शेतकरी आपल्याला पोषक तत्व देतो. त्या वस्तूचा आपण भाव करतो. ही लाजीरवाणी गोष्ट आहे
शेती आम्हाला परवडत नाही. ही बऱ्याचशा शेतकऱ्यांची ओरड आहे. कारण तो जे शोषतो. ते कोणीच शोषत नाही. तरीही ते शेतकरी शेतीसाठी सगळं सहन करतात. कारण ती त्यांची आई आहे आणि आईचा ते सौदा करीत नाही. त्यामुळंच आपणही त्यांच्याप्रती वागतांना तीच भुमिका ठेवावी. आपणही जसे दुसऱ्यांच्या आईला आई मानतो. तशीच आई शेतकऱ्यांच्या या शेतीलाही मानावं व भावटाव न करता त्यांच्याकडून वस्तू विकत घ्याव्यात. जेणेकरुन त्यांनाही शेती परवडेल. नाहीतर प्रत्येक शेतकरी आपली शेती विकेल व शानमध्ये राहून आपला संसार करेल. त्यात आपलंच नुकसान होईल. त्यात आपल्यावरच नाही तर आपल्याच देशावर भीक मागायची पाळी येईल हे नाकारता येत नाही. कारण शेतीच नसेल तर अन्नधान्य मिळणार कुठून?
शेती परवडावी. कारण ती एक समाजसेवाच आहे. ज्या समाजसेवेतून काहीच मिळत नसलं तरी शेतकरी ती समाजसेवा करतो. कुरकुर करीत नाही आणि ज्याला कुरकुर करायची सवय आहे त्यांनी शेतीच करु नये. त्यानं सरकारला शेती दान करावी. बदल्यात एक सरकारी नोकरी मागून घ्यावी. म्हणजे आलेशान चार भींतीत कुलरच्या हवेत मरतपर्यंत सुख भोगता येईल. सरकारनंही ती द्यावी. परंतु सरकार ती देणार नाही. कारण ही गोष्ट बरेचसे शेतकरी करतील व सरकारवरच संकट निर्माण होईल. ही सत्यता देखील नाकारता येत नाही. हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०