Ahamsmi yodh - 8 in Marathi Adventure Stories by Shashank Tupe books and stories PDF | अहमस्मि योधः भाग - ८

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

अहमस्मि योधः भाग - ८

समीर गाडीत जाऊन बसला. डोळे बंद केले..एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा गाडी सुरू केली. थोडं पुढे गेल्यावर सहजच त्याची नजर आरश्यावर पडली.. दृश्य धक्कादायक होतं..डोळ्यांवर विश्वास बसला नाही.खिडकीची काच खाली करून त्याने बाहेर डोकावून मागे पाहिलं.. त्या अज्जी तिथे नव्हत्या त्यांची झोपडी ही गायब..!! हे सगळं एकदम मायावी वाटत होता..आपण तिथे काहीवेळा पूर्वीच नाष्टा केला होता. आणि आता एकदम सगळंच अदृश्य..! हे सगळं कसं शक्य आहे असा विचार समीरच्या मनात आला..दिग्या आणि स्नेहा दोघं बोलण्यात व्यस्त होते. हे त्यांना कळण्याच्या आत समीरने गाडीचा वेग वाढवला आणि तिथून गाडी लवकर काढली.

त्या लहान मुलाने दिलेला नकाशा त्यांने बघितला होता त्याच रस्त्यावरून पुढे जायचं त्याने ठरवलं. वळणदार घाट रस्ता कोकणाच्या आगमनाचे संकेत देत होता. काही वेळातच समीरने गाडी नेहमीचा रस्ता सोडून एका खडतर रस्त्याला घेतली.हा रस्ता कच्चा होता. गाडी सांभाळून चालवावी लागत होती.खड्ड्यांच्या रस्त्यावर जोरजोराचे धक्के बसायला लागले.

" अरे समीर.. हायवे सोडून या कुठला रस्तावर घेतली गाडी." - दिग्या ने विचारलं.

" हा..हा..वेगळा रस्ता आहे आपण लवकर पोहचू इथून..शॉर्ट कट आहे हा.." समीर म्हणाला.

अंधार पडेल तसं पोटात गोळा यायला लागला. तिघंही आता थोडे भ्यायले होते. पण सांगणार कोणाला? आजूबाजूला उंचच उंच दाट झाडी..गाडीच्या हेडलाईट जातील तेवढंच दिसत होतं..बाकी सगळी कडे काळाकुट्ट अंधार.!! मिट्ट काळोख. पावसाळी दिवस. न चंद्र न चांदण्या. ह्या घनदाट जंगलात जर कुठे चिखलात गाडीचा चाक रुतला किंवा पंचर झाला असता तर सगळंच अवघड झालं असतं.अधून मधून गाडी थांबवून समीर नकश्यात बघून रस्ता बरोबर आहे का याची खात्री करून घेत होता याचं स्नेहा आणि दिग्या ला नवलच वाटलं..

जवळ जवळ एका तासाने ते परत चांगल्या रस्त्यावर आले.अंधार, नीरव शांतता, तपश्चर्या संपली. दूरवर दिसणाऱ्या गाड्यांचे प्रकाशझोत माणसांचे अस्तित्व पटवून देत होते. काहीवेळात दापोली फाट्यावर गाडी थांबली. समीर घाई घाईने खाली उतरला आणि गाडी पासून थोडं दूर जाऊन कोणालातरी फोन लावला.

" अरे..काय चाललंय ह्याचं..असा का विचित्र वागतोय हा..? " स्नेहा म्हणाली. तिला आता काळजी वाटत होती.

यावर दिग्या ने खांदे उडवले आणि नकारार्थी मान हलवली.

काही वेळातच तिथे एक मुलगा बाईक घेऊन आला.१८-१९ वर्ष वय असेल त्याच. समीर त्याच्याशी काहीतरी बोलला आणि दिग्याला तिथे बोलवून घेतलं.

" दिग्या..तू लवकर वाडीवर पोहोच..मी येतोच स्नेहाला सोडून.." - समीर.

" अरे पण..मी आलो असतो ना तुमच्यासोबत " - दिग्या.

" नको..तू जा..आणि थोडं आराम कर..." - समीर.

" समीर..काही प्रोब्लेम आहे का..?? निदान मला तरी सांग.." - दिग्या दबक्या आवाजात म्हणाला.

" आता खरंच वेळ नाहीये..मी आल्यावर सविस्तर बोलू आपण.." - समीर.

" बरं ठीक आहे..ये लवकर.." - दिग्या.

" चल..मंग्या नीट जा रे.." - समीर बाईक घेऊन आलेल्या त्या मुलाला म्हणाला.

दिग्या त्या बाईक वर बसला आणि त्या मुलाने बाईक स्टार्ट केली..

काही अंतर गेल्यावर तो मुलगा म्हणाला..
" मी मंगेश...इथे गावातच राहतो.. "

" अच्छा..हो का.." - दिग्या.

" मला समीर दादाने आधीच फोन करून सांगितलं होतं की तुम्ही येणार म्हणून.." - मंगेश म्हणाला.

" तुझ्याबद्दल मला काही सांगितलं नाही त्याने.." - दिग्या.

" मला ही अचानक समीर दादाचा फोन आला आणि एवढंच सांगितलं होतं की वाडीची थोडी साफ सफाई करून ठेव.. असं एकाएकी कसं काय ठरलं वाडीवर यायचं..? " - मंगेश.

काही वेळातच एक वळण घेतल्यावर एका प्रशस्त वाड्या समोर बाईक थांबली.हा वाडा तसा लोकवस्ती पासून काही अंतरावर होता. दिग्या ने पाहिलं की, डाव्या हाताला दोन मजली वाडा होता, वाड्यासमोरच खूप मोठा मांडव..वाडा शे-सवाशे वर्षापूर्वीचा होता. सर्वत्र प्राजक्ताच्या फुलांचा सुवास दरवळत होता. आजूबाजूला बरेच लाईटीचे खांब होते.त्यानी सबंध परिसर उजलून निघाला होता. पन्नास एक पावलांवर नारळ-पोफळीची बाग सुरू होताना दिसत होती. समोरच्या इमारतीच्या मागेच लाटांचा आवाज समुद्राची चाहूल देत होता.

" बाप रे बाप..फोटो मध्ये दिसत होता त्यापेक्षा कितीतरी मोठा वाडा आहे.. एखाद्या राजवाड्यात आल्यासारखं वाटतयं.." - दिग्या मंगेशला म्हणाला.

" हो..पण हल्ली बंदच असतो वाडा..अधून मधून मी येतो.आजोबा होते तो पर्यंत त्यांच्या सोबतच असायचो..ते इकडे आले की खूप काही शिकवायचे मला.." - मंगेश.

दिग्या आजूबाजूचा परिसर न्याहाळत होता. मंगेशने दाराचे कुलूप उघडले आणि दोघांनी आत प्रवेश केला. मंगेशने आधीच सगळी साफ सफाई केली होती..त्यामुळे सगळं अगदी स्वच्छ होतं.खिडक्यांना झुळझुळीत पडदे होते; दोन खिडक्यामधल्या उंच मेजावर फुलांनी भरलेले पुष्पपात्र होते.जुन्या काळाची आठवण करून देणारे सागवानच्या लाकडाचे फर्निचर दिवाणखान्यात ठेवलेले होते. काहीशी पुसट झालेली तैलरंगातील पिढ्यांपिढ्यांतील कर्त्या पुरुषांची चित्रे भिंतीला लटकवलेली दिसत होती.उजव्या बाजूला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना होता. डावी कडे पुढे गेल्यावर स्वंपक घर आणि अजून दोन तीन खोल्या होत्या. मागील बाजूला गेले असता राहण्यासाठी खोल्या आणि देवघर होतं. आणि त्यासमोरच एक मोठी खोली होती. धान्य व इतर काही गोष्टींची साठवण करून ठेवण्यासाठी ती खोली वापरली जात असावी.
हे सगळं दिग्या अवाक् होऊन पाहत होता.

" बरं..दादा मी येतोच थोड्या वेळात घरी जाऊन..तू थांब समीर दादाला वेळ लागेल.तो पर्यंत फ्रेश होऊन घे..इकडे उजवी कडे बाथरूम आहे..गिझर मधून गरम पाणी काढून घे.." - मंगेश.

" ओक्के.." - दिग्या.

मंगेश निघून गेला.

-----०----०----०----०----०----०----

.

.

.

कोकणात एका अज्ञात ठिकाणी..
.

.
अगदी तुरळक प्रकशात चार जणं एका खोलीत टेबलाभोवती बसले होते..टेबलावर दारूची बाटली आणि दोन-चार ग्लास ठेवलेले होते. विक्रांत महाजन, नेहमी डोक्यावर हॅट आणि जाड कपड्याचं जॅकेट घातलेला सोबत धोंडीबा आणि आणखी दोघं त्यांचे साथीदार.

" काय रे...साध्या एका गाडीवर लक्ष ठेवता नाही आलं तुम्हाला. साले..सगळेच्या सगळे कमचोर आहात.." - दारूचा ग्लास भरत विक्रांत रागाने म्हणाला.

" मालक..अचानक कुठल्यातरी वेगळ्याच वाटेवर गाडी टाकली त्या पोरानं म्हणून सगळा लफडा झाला.." - धोंडीबाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

" अबे लेकहो..मग तुम्ही काय माश्या मारत होतात का..? " - विक्रांत अजुनच चिडला. एका दमात त्याने दारूचा ग्लास रीचवला.

" मालक..आपल्या माणसांना ती गाडी पुढं कुठच दिसली नाय.." - धोंडीबा बारीक आवाजात म्हणाला.

" जरा जास्तच हुशार दिसतंय म्हाताऱ्याच नातू..त्या दिवशी ही...बरोबर घरी पोहचला होता.. पण हा धोंड्या दोन वर्ष घरात राहून काही शोधू शकला नाही तिथे आपल्याला काय सापडणार होतं.." - विक्रांत.

" हे देवधर म्हणजे डोसक्याला ताप झालेत.." - धोंडीबा.

" नाही धोंड्या..तो समीर म्हणजे ह्या खेळातला एक प्यादा आहे.. त्याचं काम झालं की बघ त्याचा खेळच संपवतो.." - असं म्हणत विक्रांत ने टेबल वर जोरात थाप मारली..

" जाऊदे..पळून पळून जाणार कुठं पोरगा.." विक्रांत म्हणाला." घ्या तुम्ही पण थोडी-थोडी.. घश्याला कोरड पडली असेल.." विक्रांत दारूचे ग्लास भरत म्हणाला.

" चिअर्स..!! " एकमेकांच्या ग्लासला ग्लास टेकवत चौघ म्हणले..

तेवढ्यात विक्रांतला एक फोन येतो..सगळे बोलण्याचं आणि पिण्याचं थांबवून स्तब्ध झाले.

तो उठून थोडं दूर गेला...

"'येस..बॉस.. सगळं प्लॅन प्रमाणेच चालू आहे.." - विक्रांत नम्रपणे बोलत होता.

काही वेळ त्यांचं बोलणं झालं...

" ओक्के बॉस..मी कळवतो तुम्हाला.. " असं म्हणत विक्रांत ने फोन ठेवून दिला..

" चला.. आता पुढच्या तयारीला लागा.. आताच बॉसचा फोन आलेला.. आपण खूप जवळ आलोय आता.." - विक्रांत खुश झाला होता.

अचानक शेजारच्या खोलीतून काहीतरी हालचाल जाणवली..

" मालक..ह्या म्हाताऱ्याचं काय..? " - धोंडीबा.

विक्रांत त्या खोली जवळ गेला..पूर्ण अंधार होता. एका हातात टॉर्च होती म्हणून दुसऱ्या हाताने दरवाजा आतल्या बाजूला ढकलला..

त्या खोलीच्या एका कोपऱ्यात एक वयस्कर माणूस पडून राहिलेला होता. सर्वांगावर जखमा होत्या. शरीर थकलेलं दिसत होतं. वाढलेली केसं आणि दाढी मुळे चेहरा ओळखता येत न्हवता. टॉर्चचा प्रकाश डोळ्यात जाताच आपसूकच त्या माणसाने हाताने डोळे झाकले..

" चला विश्वासराव.. आता फार दिवस त्रास नाही देणार तुम्हाला..लवकरच तुमची सुटका.. तुमच्या नातूचं आगमन झालं कोकणात.. दोघांची ही एकदाच सुटका करतो.." - विक्रांत आणि त्याच्या साथीदार खिदळत होते.त्यांना आतून अगदी उकळ्या फुटत होत्या.

यावर विश्वासरावांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही..जणू त्यांना भविष्य ठाऊक होतं..

ते चौघ पुन्हा बाहेर निघून गेले..आणि खोली पुन्हा अंधारमय झाली. विश्वासरावांना फक्त त्या किर्रर्र अंधाराची साथ होती..

-----०----०----०----०----०----०----
.

.

.

चिपळूणच्या ३० की.मी. आधी खेड जवळ कुठेतरी..

.
.
पावसाचा जोर वाढल्याने असंख्य जलबिंदू समोरच्या काचेवर आधलत होते त्यामुळे समोरचं दृश्य अंधुक झालं. अश्यात ही समीर या मार्गावर ६०-७० च्या वेगाने गाडी चालवत होता चांगल्या भागात १०० ला पोचला, पण त्या पलीकडे नाही..

" हे सगळे संकेत..रुद्रस्वामींनीच दिले असणार..त्याशिवाय त्या दोघांना चंद्रदर्शिके बद्दल कसं कळेल..कदाचित त्यांना काहीतरी सांगायचं असेल..दिग्याला आधीच वाडीवर जायला सांगितलं आणि माघारी जाताना स्नेहा ही नसेल मग एकटाच असलो तर कदाचित रुद्रस्वमी दर्शन देतील.. " असा विचार समीर मनोमन करत होता.

" समीर तुला काय झालंय रे.." - स्नेहा गंभीर स्वरात म्हणाली.

" आगं काही नाही.. सांगितलं ना थोडा थकवा आहे..बाकी काही नाही.." - समीर.

" तू विचित्रच वागतोस आज.." - स्नेहा समीर कडे डोळे रोखून म्हणाली.

" छे..छे.. असं काही नाही.." - समीरने विषय टाळला.

यावर स्नेहा काहीच बोलली नाही. तिनं मान डाव्या बाजूला वळवली आणि कारच्या बंद काचेतून बाहेर पाहत राहिली..

अचानक दोन तीन झटके देऊन गाडी थांबली..त्या निर्जन काळोखी रस्त्यावर कोणीही दृष्टीस पडत नव्हते.समीरने बऱ्याच वेळा स्टार्टर दिला पण गाडी चालू झाली नाही..

" अरे यार..आता हिला काय झालं.. शिट.." समीर काहीसा वैतागला. त्याने स्टिअरिंग च्या खालचं बोनेट उघडण्याच स्विच खेचलं. " स्नेहा तू थांब मी बघतो काय झालंय " असं म्हणून समीर बाहेर आला आणि बोनेट उघडून काहीतरी पाहू लागला.

" स्नेहा..जरा टॉर्च दे ना बॅग मधून.." - समीर.

स्नेहाने मागच्या सीट वरच्या बॅग मधून टॉर्च काढून समीर ला दिली..आणि तो पुन्हा कामात मग्न झाला. सहजच स्नेहा ची नजर बॅग मध्ये असणाऱ्या काही कागदांवर गेली..ती कागदं काही सामान्य नव्हतीच म्हणून कोणाच्या ही मनात त्यांच्या बद्दल कुतूहल निर्माण झालं असतं..शिवाय फिरायला आल्यावर कोण अशी कागदं सोबत घेऊन फिरतो..म्हणून तिने उत्सुकतेपोटी त्यातून एक कागद बाहेर काढला आणि वाचू लागली..थरथरत्या हाताने त्या जुनाट हस्तलिखताचे पान तिने वाचले. त्यातला मजकूर वाचत असताना डोळे विस्फारले गेले.!! चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत होते..!! अर्थात ते हस्तलिखित भूर्ज पत्र समीर आणि दिग्याला जंगलात सापडलेले "ब्राह्मी लिपी" मधे असलेल्या कागदांपैकी एक होतं.

.....................................................................................................................................

क्रमशः

• आता पर्यंत विक्रांत सगळे डाव खेळतोय असं वाटतं होतं..पण त्याच्या ही मागे कोणी तरी आहे..कोण असेल हा "मास्टरमाईंड"..?
• विश्वासराव देवधर जिवंत आहेत, त्यांची आणि समीरची भेट होईल का..?
• स्नेहाला त्या कागदावर असलेला मजकूर कसा समजला.. काय असेल त्यात..?