Ahamsmi yodh - 7 in Marathi Adventure Stories by Shashank Tupe books and stories PDF | अहमस्मि योधः भाग - ७

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

अहमस्मि योधः भाग - ७

समीर आणि दिगंबर दारा जवळ गेले आणि पाहिलं तर समोर स्नेहा उभी होती.


" स्नेहा तू..!! " - समीर विस्फारलेल्या डोळ्यांनी स्नेहा कडे बघत म्हणाला..


" अशी अचानक कशी काय आलीस..न सांगता..?" - दिग्या.


" का..तू न सांगता काल निघून गेलास..हा समीर काही न बोलताच घाईघाईने फोन ठेवून देतो..ते चालतं का..? " - स्नेहा जरा रागातच म्हणाली. " मी ऐकलंय तुमचं बोलणं.."


हे ऐकुन समीर आणि दिग्या क्षणभर का होईना पण..जरा घाबरलेच.


"काय..ऐकलंय तू..?" - समीरने विचारलं.


" हेच..की तुम्ही इथे फिरायला जायचं नियोजन करताय..! " - स्नेहा म्हणाली. तिच्या आवाजातला रोष काही कमी नव्हता.


" अच्छा..ते होय..!! " - समीर ला जरा हायस वाटलं.


" घरात येऊ देणारेस की इथूनच परत जाऊ.." - स्नेहा.


" ओह.. सॉरी..ये ना.." - समीर.


" काहीही झालं तरी स्नेहाला यातलं काही कळत कामा नये.." मागून जाताना समीर हळूच दिग्याच्या कानात पुटपुटला.


घरच्यांची विचारपूस..कॉलेजच्या गप्पा-गोष्टी असं नाही म्हणता तिघांच्याही तासभर तरी गप्पा चाल्या..थोड्यावेळाने चाहा नाष्टा झाला..आणि स्नेहा घरी निघणार इतक्यात तिला फोन येतो..


फोनवर बोलून झालं पण ती जरा हिरमुसल्या सारखी दिसत होती..म्हणून समीरने तिला विचारलं..


" काय झालं स्नेहा..काही प्रोब्लेम आहे का..?? "


" प्रॉब्लेम असं नाही..पण मला ट्रेनच तिकीट नाही मिळालं..आई-बाबांकडे गावी जाणार होते चिपळूण ला..आणि मामा पण हल्ली खूप व्यस्त असतो कामात म्हणून त्याला ही सांगू शकत नाही सोडायला... आता त्याचाच फोन येऊन गेला.." - स्नेहा.


"अरे मग तर काही टेंशनच नाही.!! आम्ही उद्या समीरच्या गावालाच चाललोय..दापोली फाट्यावरून पुढे दीड दोन तासातच आहे चिपळूण..आमच्या बरोबरच चल..चालेल ना समीर.!! " - दिग्या म्हणाला.


" हो..चालेल.." - समीर.


समीरने होकार तर दिला पण स्नेहाला काहीही कळू न देता हे कसं जुळवून आणायचं ह्याचा तो मनोमन विचार करू लागला.


" ओके..मी निघते आता..मला फोन करून कळवा किती वाजता निघायचं ते.." - स्नेहा.


" हो..चालेल बाय.." - दिग्या.


स्नेहा निघून जाते समीर आणि दिग्या पुन्हा निघायच्या तयारीला लागतात..कपडे व इतर सगळ्या सामानाची बांधाबांध सुरू झाली...किती दिवसांचा मुक्काम असेल हे काही माहित न्हवत म्हणून काही सामान बाजारातून आणायला दोघं बाजारात जातात..रोज लागणारं समान म्हणजेच टूथ पेस्ट , साबण इत्यादी याच बरोबर नवीन टॉर्च , रिचार्ज बॅटरी अशी यादी होती.. प्रवासात काही अडचण नको म्हणून कारची व्हील बॅलन्सिंग, एअर..इत्यादी तपासून घेतलं.


घरी येऊन दोघांनी सगळं व्यवस्थित आवरून निघण्यासाठी बॅग्स तयार केल्या.संध्याकाळचे सहा वाजत आले होते..पाऊस पडत नसला तरीही ढगाळ वातावरण होतं.समीर शून्य नजरेने खिडकी बाहेर पाहत होता. दिग्याने आणलेली कॉफी कधीच थंड झाली होती.तेवढ्यात दिग्या आल्यामुळे समीर जरा भानावर येतो.


" काय रे समीर, कसला एवढा विचार करतोय की तुला कॉफी ठेवली होती त्याच्या कडे ही लक्ष नाही..?" कॉफी तशीच बघून दिग्या समीरला विचारतो.


" कसं लक्ष लागेल दिग्या...इकडे आई बाबांचा काही पत्ता नाही कुठे असतील,कसे असतील..काहीच कळायला मार्ग नाही.. आपल्याला गावी जाऊन काही सापडेल..याचीही शाश्वती नाही..! आणि आता स्नेहा पण आपल्या बरोबर येतेय.. ती माणसं आपल्या मागावर असली तर...उगाच तिला पण त्रास होईल याचा..! " - समीर.


" हो..मला कळतंय रे..पण आलेल्या परिस्थितीला तोंड देणे हा एकच मार्ग आहे आपल्याकडे.." दिग्या म्हणाला.


काही क्षण शांततेत गेले.


" बरं..स्नेहाला किती वाजता निघायला सांगू.." - दिग्या म्हणाला.


सात- साडे सात पर्यंत निघावच लागेल..त्याप्रमाणे तयार राहायला सांग तिला. - समीर.


" ओक्के.." - दिग्या.


दिग्या फोन करून स्नेहाला सकाळी लवकरच तयार राहायला सांगतो. स्नेहा खूप खुश असते. पण तिला समीरच्या आयुष्यात गेल्या काही दिवस चाललेला गोंधळ माहीत नसतो. तिच्या साठी ही एक रोड ट्रिप असणार होती पण समीर आणि दिग्या साठी तो एका भयानक अज्ञात शत्रूला लढा देण्यासाठी पुढचा पाऊल..!


समीर आणि दिग्या लवकरच जेवण आटोपून झोपायच्या तयारीला लागले.. अचानक वातावरण आणखी दाट झालं. मग एकच धडाका– काही काळ गडगडाट. सोबतीला विजांचा कडकडाट सुरू झाला..थरकाप उडवणारा! पावसाच्या एकसारख्या सरी कोसळू लागल्या..


" घ्या.. दुष्काळात तेरावा महिना..!! आता सकाळ पर्यंत असाच पाऊस पडत राहिला तर आपलं इथून निघणं कठीण होईल..." - दिग्या कपाळावर हात मारत म्हणाला.


थोड्या वेळाने दिग्या झोपून गेला.


समीर जागाच होता. त्याने मोबाईल वर एक नंबर डायल केला , बराच वेळ रिंग वाजली आणि नंतर समोरून कोणीतरी फोन उचलला.


" हॅलो..काहीही झालं तरी आम्ही उद्या येणार आहोत सगळी तयारी झाली आहे ना.?" - समीर.


" हो..दादा " - समोरून उत्तर आलं.


समीरने फोन ठेवून दिला आणि पुन्हा शून्य नजरेने खिडकीच्या बाहेर पाहू लागला.


***


ती रात्र भूतकाळात जमा झाली. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने आता विश्रांती घेतली होती. बाहेर अजून अंधारच होतं. सहा वाजता अलार्म च्या आवाजाने दोघांना ही जाग आली. गाडीत सगळं सामान रात्रीच ठेवलं होतं. फक्त आंघोळ , न्याहारी वगेरे आटपून थेट निघायचं असच ठरलं होतं. टॉमीला एकटं सोडून जाणं शक्य नव्हत म्हणून त्याला ही सोबत घेऊन जायचं होतं.. कार मधून जायला त्याला खूप मज्जा यायची..


सूर्योदय झालेला नव्हता. दिशा नुकत्याच उजळत होत्या. बाहेर वातावरणात कमालीचा गारठा होता.घराची दारं खिडक्या बंद करून व्यवस्थित कुलूप लावून दोघं निघाले. कारचा दरवाजा उघडल्या बरोबर टॉमी ने चटदिशी आत उडी घेतली आणि खिडकी जवळ जाऊन त्याची जागा घेतली..बरोबर साडे सात वाजता स्नेहाच्या घरा जवळ गाडी पोहोचली. ती आधीच त्यांची वाट पाहत उभी होती. दिग्या सामान डिक्की मधे टाकायला खाली उतरला आणि नंतर मागच्या सीट वर जाऊन बसला.. तसं त्याला स्नेहाने सांगितलं होतं..


" नीट जा रे पोरांनो..आणि पोहचल्यावर फोन करून कळवा.." - स्नेहाचा मामा म्हणाला..


" हो हो.. बाय मामा.." - स्नेहा.


" चला मामा निघतो आम्ही.." - समीर.


" गणपती बाप्पा.. मोरया..!! " - दिग्या मोठया उत्साहाने म्हणाला.


आणि गाडी निघाली.. कोकणच्या वाटेनं..


प्रवास तर सुरू झाला पण पुढे काय होणार याची गाडीत बसलेल्या कोणालाही कल्पना नव्हती.


वीकएन्ड असल्यामुळे लवकर निघून पण थोडा ट्रॅफिक लागलाच. पनवेल पर्यंत पोहचायला दीड दोन तास गेले..एवढा स्ट्रेसफुल ड्राईव्ह होता..पनवेल पासून पुढे तसा परिसर एकदम निसर्गरम्य. शहर एकदा मागे गेल्यावर बाहेर विस्तीर्ण देखावा आला. थोडा वेळ ब्रेक म्हणून एका चांगल्या ठिकाणी समीरने गाडी थांबवली. स्नेहाने बरोबर थर्मासमध्ये चहा आणला होता, सँडवीच होते ते तिघांनी खाऊन घेतले.


आता पर्यंत प्रवासात समीर एकदा ही स्वतःहून काहीच बोलला नाही.त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव स्पष्ट उमटले होते.हे स्नेहाच्या लक्षात आलं..पण तिने दुर्लक्ष केलं.


पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला. आकाशात बऱ्यापैकी ढग दाटून आले होते, थांबलेला पाऊस काही वेळानंतर जोरदार पुनरागमन करणार हे नक्की होतं. वडखळ फाटा जवळ येताच गाड्यांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या..त्यात पाऊस ही सुरूच झाला.वडखळ नाक्याजवळ एक गाडी पलटी झाल्याचं समजलं म्हणून तिथून निघ्याला जवळ जवळ एक तास गेला..इतकी प्रंचड वाहनांची गर्दी..!!


डावी कडे वळून गाडी माणगाव-महाड च्या दिशेने निघाली..पण इथून पुढे खरी कसरत सुरु झाली. ओला रस्ता आणि पाऊस असल्यामुळे रस्ता दिसण मुश्किल होत आणि त्याचमुळे आपसूक गाडी खड्ड्यात जाण क्रमप्राप्त होत. महाड आता जास्त लांब न्हवत. तेवढ्यात समीरचा लक्ष वेधून घेणारी गोष्ट घडली त्याचा संशय खरा ठरला..! एक काळया रंगाची स्कॉर्पिओ कार त्यांच्या मागावर होती..अगदी वडखळ पासूनच..! हे समीरने खूप आधीच हेरलं होतं. म्हणून हमरस्ता सोडून त्याने एका गावात गाडी टाकली.हा रस्ता पुढे हायवेलाचा मिळतो असं त्याने गुगल मॅप मध्ये बघितलं होतं.


गावच्या ओढ्याला प्रचंड पाणी. अरुंद रस्ता आणि नाग मोडी वळणं घेत समीर गाडी चालवत होता. हमरस्त्याला लागण्या आधी छोट्या पुलावर नाल्याच्या पाण्याचा मोठा लोंढा.. हे सगळं बघून समीरच्या मनात धाकधूक वाढली..हायवेला लागेपर्यंत रस्त्यावर खूप ठिकाणी पाणी होतं.


बाहेर हायवेला चोहीकडे पाणीच पाणी दिसू लागलं.ती पाठलाग करणारी गाडी आता दिसत नव्हती. त्या ड्रायव्हर ला समीरने चकवलं. पण धोका अजून टळला न्हवता. पुढे हायवेची एक लेन बंद झाली होती पाण्यामुळे आणि सर्व्हिस रोड ही पाण्याखाली! त्यातून वाट काढत गाडी पुढे निघाली.पाऊस थांबला. खड्ड्यांचा रस्ता संपला.पाच वाजत आले होते. आधी ट्रॅफिक आणि नंतर पाऊस या मुळे त्यांचा बराच वेळ वाया गेला होता. पुढे एक घाट लागला. बऱ्याच वेळ एका जागी बसून अंग दुखत होतं आणि सगळ्यांना खूप भूक ही लागली होती समोर एक झोपडीवजा उपहारगृह दिसल्याबाबर त्यांनी थांबून विश्रांती घ्यायचं ठरवलं.


दिग्या ने पटकन जाऊन कांदेपोहे , बटाटे वडे अशी मस्तपैकी ऑर्डर दिली आणि नंतर चाहा हेही आधीच सांगून टाकलं. समीर आणि स्नेहा गाडी पासून थोडं दूर उभे होते.समोरच्या घाटमाथ्यावरून पाणी ओघळत खाली येताना दिसत होतं. समीर गप्पच होता. स्नेहाला आता राहवत नव्हतं. एका भेटी साठी उतावीळ होणारा समीर आज इतका वेळ एकत्र असून ही काहीच बोलत न्हवता याचं तिला नवल वाटत होतं.


दिग्या कॅमेरा घेऊन आला आणि स्नेहा आणि तो दोघं फोटो काढण्यात व्यस्त झाले.


समीर त्या झोपडी जवळ आला. तिथे चार वासे लावून मांडव घातले होते. त्या खाली दोन मोठे बाकडे होते. तो तिथे जाऊन बसला. टॉमी ही शेजारीच होता. आत मधे किमान सत्तर वयवर्ष असलेल्या आज्जी कांदेपोहे बनवत होत्या.त्यांनी आपुलकी ने समीरची चौकशी केली.अशी ही अनोळखी पण हवीहवीशी आपुलकी फक्त कोकणातच सापडते. काही क्षण शांततेत गेले.


तेवढ्यात समीरची नजर पडली ती काही अंतरावर चरत असलेल्या गुरांवर आणि त्यांना राखणाऱ्या आठ - दहा वर्षांच्या चिमुकल्या वर.त्या इवल्याश्या गुराख्याला पाहून समीरला जरा आश्चर्यच वाटलं..पण नंतर मोबाईल काढून काहीतरी बघण्यात तो व्यस्त झाला.


"काय रे.. कुठं निघाला..? "


या अनपेक्षित प्रश्नाचं उत्तर द्यायला समीर समोर बघतो. मगाशी दूरवर असणारा तो चिमुकला आता त्याच्या समोर खांद्यावर काठी ठेऊन उभा होता.त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती.


" मी फिरायला चाललोय मित्रा..! " समीरने हसून उत्तर दिलं.


" फिरायला..खरंच का..? " तो लहान मुलगा परत विचारतो.


" हो रे बाबा..खरंच..!" - समीर म्हणाला. " काही हवंय का तुला खायला..मी बिस्कीट घेऊन देऊ का तुला.."


" मला काही नकोय.. उलट माझ्याकडेच तुला देण्यासाठी काहीतरी आहे.." असं म्हणून त्याने मळलेल्या अंगरख्यातून एक नकाशा काढला आणि म्हणाला " इथून पुढे याच नकाश्या प्रमाणं जा सुखरूप पोहोचशील.."


यावर समीर हसला आणि म्हणाला - " अरे मित्रा , मला रस्ता ठाऊक आहे पुढचा.."


"रस्ता माहीत असेल तुला पण येणारं संकट दिसेल का..?" तो मुलगा स्पष्ट आवाजात म्हणाला.


" अरे काय बोलतोस तू.." - समीर.


" रुद्रस्वामींच्या चंद्रदर्शिका आठवत आहे का.. आज दहावी तिथी आहे..शेवटची. उद्या तो नक्षत्र आकार घेणार..त्या शक्ती तुला आडव्या येऊ शकतात म्हणून ही खबरदारी..! " - तो मुलगा म्हणाला.


रुद्रस्वामींचा नाव त्या मुलाच्या तोंडून ऐकून समीरला दरदरून घाम फुटला.पुढे काही विचारणार तेवढयात तो मुलगा पळून गेला. समीर त्याच्या पाठीमागे धावला पण तो चिमुकला त्या उंच गवतात नजरेआड झाला. समीर पुन्हा माघारी आला तेव्हा त्याला बाकावर त्या मुलाने ठेवलेला नकाशा दिसला.


तो झोपडीच्या आत गेला आणि त्या आज्जींना विचारलं.


" आज्जी मगाशी..तो मुलगा तिथे होता तो.." - समीर.


" तो..इथल्याच जवळच्या गावात राहतो.. इथचं गुरं घेऊन येतो रोज..अंधार पडत आला की जातो माघारी.." - आज्जी म्हणाल्या.


समीर काहीच बोलला नाही..त्याच्या डोक्यात प्रश्नच प्रश्न होते..


" जा पोरा, बोलुवून आण तुझ्या मित्रांना..गरम गरम पोहे , वडे आणि चाहा तयार आहे.." - आज्जी हातात डिश घेऊन बाहेर येत म्हणाल्या.


"तो मुलगा बरोबर बोलत होता..त्या चंद्रदर्शिकेच्या तिथी बद्दल तर मी विसरलोच होतो. पण हे सगळं त्याला कसा कळलं असेल.." समीर स्वतःशीच बोलत होता .त्याची भूक केव्हाच पळून गेली होती.दिग्या आणि स्नेहा तिथे आले पण त्यांना समीरने काही कळू दिला नाही. तिघांनी पोहे वगेरे खाल्ले , चहा घेतला. दिग्या आणि स्नेहा च्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या पण समीरच तिकडे अजिबात लक्ष नव्हतं.


" समीर तुला काही झालंय का..? मी सकाळ पासून बघतेय..तू तुझ्या विचारात हरवलेला आहेस.." न राहून स्नेहा ने समीरला विचारलच.


"काही नाही..थोडा थकवा जाणवतोय बस्स..बाकी काही नाही." - समीर म्हणाला. " तुम्ही दोघं जा गाडीत जाऊन बसा मी पैसे देऊन आलोच. "


समीरने खूप आग्रह करूनही आज्जींनी पैसे घेण्यास नकार दिला. शेवटी समीरने त्यांना नमस्कार केला आणि गाडी कडे जायला निघाला.


" नीट जा पोरा..काळजी घे..! "


"चंद्रदर्शिका...आज शेवटचा दिवस.."

आज्जींचे

हे शब्द कानावर पडताच समीरची पावलं जागीच खिळली.विस्फारलेल्या नजरेने त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा आज्जींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरलं होतं.त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता. त्यांनी होकारार्थी मान हलवली.


समीर पुन्हा गाडीच्या दिशेने चालू लागला..


खरंच हे सगळं अस्तित्वात आहे का..? की केवळ दिशाभूल..? रुद्रस्वामी जर भेटलेच नसते तर..काय झालं असतं..? या प्रश्नांनी तो पुरता चक्रावून गेला होता..


.....................................................................................................................................


क्रमशः