Ek chukleli vaat - 4 in Marathi Moral Stories by Vrushali books and stories PDF | एक चुकलेली वाट - 4

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

एक चुकलेली वाट - 4

एक चुकलेली वाट

भाग - ४

प्रकाश बिअर शॉपीच्या समोर एका बाईक जवळ उभ राहून कित्येक वेळपासून दोन तरुण काहीतरी बोलत होते. बोलता बोलता मध्येच इकडे तिकडे कोणी जवळपास तर नाहीये ना ह्याचाही कानोसा घेत होते. एकंदरीत अवतारावरून ओझरत पाहिलं तरी जरा छपरी प्रकारात मोडणारे ते दोघे. प्रकाश बिअर शॉप गावातून थोडंसं बाहेर दोन शहरांना जोडणारी सीमेवर. त्यामुळे मालकाची बऱ्यापैकी कमाई होत असावी. प्रकाश बिअर शॉपी नावाचा झगमगता बोर्ड, मालकाची आर्थिक परिस्थती आणि कलेची आवड दोन्हीही दर्शवत होता. बाकीची दारूची दुकानं बंद राहतील मात्र एक ड्राय डे सोडला तर बाकी नेहमीच हे शॉप चालू असल्याने पिणाऱ्यांच्या जिव्हाळ्याच ठिकाण होत. हे शॉप जुनाट देशी दारूच्या दुकानांपेक्षा हे शॉप बरच मॉडर्न आणि स्टेटसवाल होत. मालक..दीपक नाईक..हा एक नंबर बेरकी होता. सगळ्यांशी कामापुरता गोड बोले. गोड गोड बोलून जादाची दारू पाजून त्याचा हिशोब वहीत मांडून महिना अखेरीस कसे वसूल करायचे हे त्याला बरोबर माहित होते. त्याला बाहेरच्या जगाशी तस काही घेण देणं नव्हतंच पण आज तो जरा जास्तच कंटाळला होता म्हणून सकाळचा पेपर हातात घेतला. पहिल्याच पानावर ' सोनिया पाटील ' हे ठळक अक्षरात नाव वाचून पुढील बातमीने हादरून गेला. वेशीवरची पहाडी एकच होती त्याच्या बिअर शॉपपासून साधारण एक किलोमीटरच्या अंतरावर असलेली. आपल्या आसपासच्या भागात अस काही झालंय ह्या नुसत्या कल्पनेनेच तो घाबरला. एका हातात पेपर सावरत त्याने घरी असलेल्या आपल्या मुलीला कॉल केला.

" हा पप्पा..." पलीकडे त्याची मुलगी होती.

" ही सोनिया पाटील म्हणजे तुझ्या वर्गातील का.. अर्जुनची मुलगी...." खातरजमा करण्याच्या हेतूने त्याने विचारलं.

" हो तीच... तशी ती एकदम शांत होती पण तिचा खून म्हणजे..." ती न थांबता पुढे बोलतच सुटली.

" तू घरीच थांब काही दिवस..." कधी नव्हे तो दीपक तिच्यावर ओरडला. आपली एकुलती एक मुलगी त्याच्यासाठी जीव की प्राण होती. तिच्यावर तो सगळ जग ओवाळून टाके. पण त्याच अतीलाडाने ती बिघडून गेली होती. सर्व गोष्टींत फक्त स्वतःची मनमानी. आणि ह्या नादात ती आपल्याच बापाला किंमत देईना झाली.

" अहो पप्पा अस काय करता.... माझा काय संबंध..." पलीकडे तिच्या रागाचा पारा चढला. आधीच बापाचा वाढलेला आवाज तिने आजच ऐकला होता आणि त्यात आता घरी राहायची जबरदस्ती.

" ते काही नाही.. तू घरीच थांब.." दीपकच बापाचं मन भीतीच्या वावटळीत हेलकावे खाऊ लागलं. भीतीने तो बसल्याच जागी थरथरू लागला. न जाणो कधी कोणी आपल्या मुलीला.... कशासाठी.... नको.. नको... त्याने थरथरत्या हाताने कसाबसा एक नंबर डायल केला.
__________________

पोलीस स्टेशन मध्ये अनिकेत बरेचसे कागद मांडून त्याचा काहीतरी बारकाईने अभ्यास करत बसला होता. मधे मधे परबांना काहीतरी ऑर्डर्स देत होता. मग खेळाच्या पाटावर उतरल्यासारखे परबही इकडून तिकडे धावत त्यांच्या ऑर्डर्स पूर्ण करत होते. तोवर शिंदे आणि देसाई एकत्रच आत शिरले. टॉम अँड जेरीच्या त्या जोडगळीला हसत हसत एकत्र येताना पाहून अनिकेतला हसूच फुटलं.

" आज युती आहे वाटत.. विरोधी पक्षांची..." अनिकेत ने हलकेच टोमणा मारला.

" हाहाहा.... तसच म्हण अनिकेत.. पण तुझा हा शिंदे एकदम हुशार आहे बर का...?" अनिकेत च्या टोमण्याला हसत प्रतिसाद देत देसाई उत्तरले.

" शिंदे तर हुशारच आहेत.. खरेतर ते मुंबई पोलीस मध्ये असायला हवे होते.... पण आता नवीन काय केलंय..." अनिकेतला शिंदेंच फारच कौतुक होत. सगळ्याच केसमध्ये ते नेहमीच काही ना काही कमाल करून जात. अनिकेतच्या कौतुकाने शिंदे मात्र गोरेमोरे झाले.

" हे बघ.." हातातील फाईल अनिकेत समोर ठेवत देसाई नी खुर्चीवर आपला अधिकार प्रस्थापित केला.

देसाईंनी साधं बसायलाही सांगायचं त्याच्या ध्यानात आल नाही. एव्हाना अनिकेतने ते पेपर आधश्यासारखे वाचायलाही घेतले. " उशिरा का होईना मिळाले शेवटी कॉल रेकॉर्डस.."

" मिळाले नाही... शिंदेंनी भांडून घेतले....तिकडे मारमारीची वेळ आली तेव्हा मला कॉल करून बोलावलं...मी पहिल्यांदा कोणा पोलिसाला वाचवायला गेलो... हाहाहा..." आपल्या गडगडाटी आवाजात त्यांनी स्पष्टीकरण दिले. " नुसतेच रेकॉर्डस नाही आणलेत त्याने तर सगळी कुंडली घेऊन आलाय तो फोन कॉल्सची "

अनिकेतने भराभर सारे पेपर नजरेखालून घातले. वाचता वाचता मध्येच तो काहीतरी खुणा करत होता. " एकाच दिवशी येवढे सगळे कॉल्स ते ही पी सी ओ वरून... का... नक्की कुठले पी सी ओ आहेत हे...? प्रत्येक नंबर वरून एकदाच कॉल आहे..." अनिकेत स्वतःशीच बोलत होता.

" पी सी ओच्या लोकशन ची लिस्ट मिळाली.." अनिकेत च्या हातातील एक पेपर खेचत त्यांनी त्याच्या समोर ठेवला."

" वाह... मानलं शिंदे तुम्हाला... खरंच कुंडली आणलीत की.. " अनिकेतने उठून शिंदेंची पाठ थोपटली.

" बर आता मी ही लिस्ट बघितली नाहीये... पण आताच त्याचा अभ्यास केला पाहिजे..." देसाई आपली डायरी सरसावून बसले. पुढला काही वेळ ते तिघेही सगळे पेपर आळीपाळीने बघत त्यावर काही ना काही मार्किंग करत होते.

" आल्या माझ्या ध्यानात काही गोष्टी.... थांबा.... मी दाखवतो.." अनिकेतने पटापट काहीतरी आकडे मांडले.

" हा पहिला फोन तिला आलाय साडेआठला... पी सी ओ नंबर.. त्यावर पाच मिनिट अडतीस सेकंद बोलणही झालंय. याचा अर्थ ती नक्कीच कोणातरी ओळखीच्या माणसाशी बोलत असण्याची शक्यता आहे.... देसाई तुम्ही ह्या लिस्टमध्ये चेक करा की हा पी सी ओ कोणत्या एरियात आहे...?" त्या बऱ्याचशा अस्ताव्यस्त पसरलेल्या पेपर मधून एक पेपर उचलत त्याने देसाईंच्या हातात दिला. किचकट प्रिंट मधून नेमका नंबर शोधून देसाईंचे डोळे दुखायला आले पण नंबर काही सापडेना. बऱ्याच वेळाने त्यांना तो नंबर सापडला.

" हं.... अरे हा तर तळेगावातील शाळेजवळचा पी सी ओ..." देसाई जरा आश्चर्यचकित झाले. " सोनियाच घर पण ह्या शाळेजवळ आहे ना..." त्यांनी आपली शंका उपस्थित केली.

" हो.. म्हणजे ही व्यक्ती जी कोणी होती ती सोनियाच्या आसपास राहणारी होती.."

" बरोबर.." देसाईंचा दुजोरा.

" त्यानंतर तिच्या आईच्या आणि बाबांच्या नंबर वरून कॉल्स आहेत. साडेआठला तर सोनियाच्या दोन्ही बहिणी आपापल्या कॉलेज मध्ये होत्या.." अनिकेत विचारात पडला. " त्यानंतर दुसरा पी सी ओ कॉल नऊ तेवीसचा आहे... हा कुठला नंबर आहे देसाई...?"

" थांब जरा... ही किचकट लिस्ट मला आंधळं करणार आहे आज..." लिस्ट ला मनातल्या मनात शिव्या घालत त्यांनी पुन्हा चाळल. " हा... नंबर... तालुक्याच्या डेपो जवळचा आहे..."

" तालुक्याचा डेपो..." अनिकेत मनातल्या मनात तेच घोकत होता. अचानक त्याला काहीतरी आठवल.." परब... तळेगांव ला साडेआठ च्या दरम्यान कोणती एस टी आहे का हो...? "

" हो.. साडेआठची आहे... पण आठ चाळीस पर्यंत येते.." हातातील काम बाजूला सारत परब उत्तरले.

" तळेगांव ते तालुका..साधारण चाळीस मिनिटांचा प्रवास आहे..." स्वतःच्या मनाशी पुटपुटत अनिकेत काहीतरी मांडणी करत होता. " अस तर नसेल की तळे गावातील व्यक्तीने च तालुक्याला पोचल्यावर तिला कॉल केला असेल...?"

" शक्यता नाकारता येत नाही.... "

" त्यानंतर सोनियाने काही कॉल केलेयत.. तिचा होणारा नवरा अमित, तिची बहिण निशा.. पुन्हा अमित.. त्या नंतर पुन्हा पी सी ओ कॉल आहे.. सेम नंबर वरून चार कॉल्स आहेत.. शेवटचा कॉल आहे अकरा बत्तीसचा... देसाई हा नंबर बघा जरा.... " पानावरील नजरही न हटवता अनिकेत भराभर बोलू लागला.

" अनिकेत काय योगायोग आहे हा नंबर पहाडीच्या भागातील आहे..म्हणजे.." देसाई देखील विचारात बुडाले.

" म्हणजे इथे तिची कोणीतरी वाट बघत होत.. एकतर ती एकटी आली असेल अथवा त्या तळे गावातील व्यक्ती सोबत..." अनिकेतला समजल असाव देसाई नक्की काय विचार करतायत. शेवटी पोलिसी डोकं... त्यानेच देसाईंचे विचार बोलून दाखवले.

" तीच एकटं येणं ते ही पहाडी वर मला थोड पटत नाहीये.... ह्या गावच्या पोरी पण ना... बॉयफ्रेंडला भेटायला ही एकट्या येत नाहीत.. नक्कीच तिच्या सोबत असेल बघ कोणीतरी... "

" बॉयफ्रेंड... हम्म... असू शकतो... पण तिच्या एकंदर कॉल रेकॉर्ड वरून आई बाबा तिचा होणारा नवरा आणि ठरावीक मैत्रिणींच्या कॉल्स शिवाय काहीच मिळत नाहीये.." अनिकेतने हातातील पेपर पुन्हा पुन्हा चेक केले पण त्याला वावग अथवा संशयित अस काहीच आधळल नाही.

" त्याचा नंबर सेव्ह नसेल अथवा तो पी सी ओ वरून कॉल करत असेल.." देसाईंची शक्यता.

" नाही... रोज रोज कॉल्स नाहीयेत पी सी ओ वरून आणि तसेही फारसे कॉल्स नाहीयेत तिला कोणत्या नंबर वरून. " अनिकेतच्या मनात काहीतरी चाललं होत.

" पहाडी जवळचा पी सी ओ कोणाचा आहे ते समजलं तर आपण विचारू शकू कोणालातरी..." देसाईंनी सुचवलं आणि लगेच सगळे कामालाही लागले.
_________________

माजघरात धाय मोकलून रडणाऱ्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आवाज ऐकून निशा आपल्या रूम मधून धावत गेली. समोर अमितच्या घराची मंडळी सांत्वना साठी आलेली बघून ती ओढणी घ्यायला उंबऱ्यावरून मागच्या मागे वळली.

" माझी पोरगी गेली हो...." तिच्या आईने पुन्हा टाहो फोडला. त्या आवाजानेच निशाची पुन्हा माजघरात जायची हिम्मत होईना. दुःखाने तिचेही हात पाय थरथरू लागले. कशी बशी स्वतःला सावरत ती भिंतीच्या आधाराने खाली बसली. सर्वांगात कसलीशी कणकण भरून आली.नाकपुड्या थरथरू लागला. मानेपासून एक सनक मेंदूच्या दिशेने झेपावली. गळ्याशी आलेला आवंढा आवरायला तिने ओढणीचा बोळा तोंडात कोंबला. दुःखाने गदगदत असतानाही तिचे कान मात्र माजघराकडे होते.

" आता काय करणार त्याला... तिच्या नशिबात तेवढंच आयुष्य असेल.." त्याचे बाबा थोड्या कोरडेपणाने हळहळले.त्यांच्या कोरड्या सांत्वनाने निशाच्या काळजात बारीकशी कळ उठली. बाकी सर्व जाऊदे... पण.. तिला आता सोनियाच्या बाबतीत काही उलट सुलट ऐकायचं नव्हतं.

" पण तुम्ही पोरींकडे थोड लक्ष दिलं पाहिजे होतं..." सरतेशेवटी तिच्या मुखातून उद्गार निघालेच. आईची मुसमुस एव्हाना वाढली होती. " तरणीताठी पोरी अशी शिक्षणाच्या नावाखाली घराबाहेर राहिली. धाक म्हणून कोणाचं काही उरलच नाही. तुम्ही शहरात राहिलेले... म्हणून इतकं स्वातंत्र्य द्यायचं का.. कोणास ठावूक त्या पहाडी वर का गेलेली... आणि म्हणे तिच्यावर बलात्कार झालाय.. पेपरात आलेलं म्हणे... रवळनाथा.. बाबा.. अशा पोरिशी माझ्या मुलाचं लग्न झालं असत तर बरबाद झाला असता..." त्याच्या आईच्या तोंडाचा पट्टा बेलगाम चालू झाला होता. तिच्या घरच्यांचा... त्यांच्या मनाचा विचार न करता बाकीचेही बरच काही बोलले. फिरून फिरून प्रत्येक मुद्दा तिच्यावर झालेल्या बलात्कारावर येऊन ठेपायचा. सोनियासोबत खरंच झाला असेल की नाही माहित नाही पण तिच्या कुटुंबीयांवर अशी माणसं आता राजरोस रोजच बलात्कार करत होती.
___________________

" रोहन आता काय झालंय..." उदास बसलेल्या रोहनच्या पाठीवर थोपटत अनिताने विचारलं.

" काही नाही... बस " तिच्याकडे न बघताच अनिकेत उत्तरला.

" राग आलाय ना माझा.. निशापासून दूर राहायला सांगितलं म्हणून.." अनिताने त्याला खेटत विचारलं.

" नाही ग.. " दोघंही शांत झाले. अचानक रोहनचे डोळे भरून आले. त्याला अस भावनाविवश तिने आधी कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे तिलाही कळेना की नक्की कसं सावराव त्याला. ती केवळ त्याच्या पाठीवर थोपटत राहिली

" तू भांडल्यानंतरही तीन दिवस तिच्या खुशाली साठी फोन करत होतो मी. पण एकही फोन तीने उचलला नाही. उलट मेसेज पाठवला ' stop irritating me ' म्हणून... मी खरंच त्रास देतोय का तिला..का मी खूप लाचार होतोय तीच्यापाठी.." त्याने आपल दुःख तिच्यासमोर मांडलं.

" तुला माहितेय ना ती कशी आहे ती... नाही देत ती तुला भाव... तरीपण तुझी तिच्या मागे मागे करायची सवय कधी जाणार काय माहीत..?" अनिता रागावलीच.

" तस नाही ग... पण... मला वाटतं मीच मूर्ख आहे... उगाच पळत्याच्या पाठी लागलोय...." रोहन चुकचुकला.

" सोड तिचा विषय... का स्वतःला त्रास करून घेतोय...?" अनिता रोहनच्या केसात हात फिरवत धीर देऊ लागली.
" जाऊदे... तू आहेस ना माझ्यासाठी.." त्याने भावनावेगाने त्याने अनिताला घट्ट मिठी मारली. त्याला आता निशाला विसरायचं होत. ह्याक्षणी त्याच्या मनातील भावनांना आवरायला त्याला कोणीतरी पाहिजे होत. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू नक्की कोणासाठी होते.... निशासाठी की अनिता साठी... अनिताच्या चेहऱ्यावर मात्र विजयी आनंद झळकत होता.
_________________

" दीपक नाईक आपणच ना..?" काउंटरवर टकटक करत घामेजलेल्या अनिकेतने विचारलं.

" हो मीच... पण काय झालंय...?" पोलिसांना भूतो न भविष्यती अचानक समोर बघून दीपकची बोबडीच वळली. आता जेऊन आराम करायच्या त्याच्या प्लॅनमध्ये पोलिसांनी एन्ट्री घेतली होती.

" सोनिया पाटील केस माहीतच असेल तुम्हाला..... म्हणजे वाचली असेलच पेपरात.." जुन्या वर्तमानपत्राकडे बोट दाखवत देसाईंनी पुढाकार घेतला.

" अं... हो... माहित आहे पण त्याच काय..?" दिपकच उलट उत्तर.

" त्याच संदर्भात बोलायचं... त्याच अस आहे की सोमवारी सकाळी मृत्यूआधी काही वेळापूर्वी तुमच्याच ह्या पी सी ओ वरून काही कॉल्स केलेयत तिला... त्या बद्दलच चौकशी करायची होती..... म्हणजे कोणी कॉल्स केले होते ते... " देसाईंच्या आवाजात एक तिरसटपणाची धार होती.

" ते कॉल्स तर पी सी ओ वरून केले होते..." दीपक चाचरत बोलत होता. पोलिसांच्या एकेका वाक्यासरशी भीतीने त्याच्या काळीज धडधडत होत. नक्की काय बोलायचं ते त्याच त्यालाच कळत नव्हतं.

" मी ही तेच बोललो..... ते ही शुद्ध मराठीत..." देसाई दिपकच्या कानशिलात भडकवायला तयारच होते. श्रीमुखात भडकावण ही देसाईंची खासियत होती. त्यांचा हात म्हणजे... दगडही मऊ असावा हातापेक्षा... ज्याला कोणाला एकदा पडली त्याने उलटून पाणीही मागितले नाही कधी. हे प्रकरण सुरू झाल्यापासून कोणीच आरोपी त्यांच्या समोर येत नव्हते त्यामुळे प्रसाद द्यायला त्यांचे हात शिवशिवत होते.

" त्या सोमवारच.... आज कसं आठवेल....?" दीपकला कसही करून पोलिसांना कटवायच होत.

" तुमच्याही नंबरवरून एक फोन होता...तो तरी कधी केलेला ते आठवतंय का..?" अनिकेतने गुगली टाकली.

" हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.. मी कोणाला काही फोन केलेला नाही. मला माझ्याच कामातून फुरसत नाही मिळत.." एव्हाना त्याच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते.

" घेऊन चला रे ह्याला पोलीस स्टेशनला...." देसाई गरजले. आता दीपककडे पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. परंतु पळून जाणं म्हणजे आयतच पोलिसांच्या संशयाला कारणीभूत होण. त्यापेक्षा जे होईल ते बघून घेऊ म्हणत तो चुपचाप त्यांच्या स्वाधीन झाला.

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या हेडलाईनमध्ये दीपक नाईक हे नाव संशयिताच्या यादीत प्रसिद्ध झालं.
__________________

तालुक्याच्या त्या पाराभोवती नेहमीच गर्दी असे. कोणाच्यातरी स्मरणार्थ पिंपळाला सिमेंटचा कट्टा बांधलेला तो पिंपळ रिक्षावाल्यांना कित्येक वर्ष सावली देत होता. त्यांच्या हक्काचं आणि विश्रांतीच ते एकच ठिकाण. एका बाजूला कॉलेज आणि दुसऱ्या बाजूला रिक्षांची लाईन त्यामुळे तो भाग असल्याने नेहमीच गजबजलेला असे. नुकतीच एक गाडी येऊन गेल्याने आणि पुढचा तासभर कोणतीही गाडी यायची नसल्याने सर्व रिक्षावाल्यांची मैफिल पारावर जमली होती. सर्वांच्या तोंडी एकच सणसणीत विषय होता तो म्हणजे दीपक नाईक.

दीपक नाईक हे प्रस्थच तस होत. गावापासून तालुक्यापर्यंत सगळीकडे प्रसिद्ध. तो संशयित आहे म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी आणि वरच्या लेव्हलची भानगड असावी. त्यातही दीपक नाईकची नियत कशी आहे हे कोणीही सांगेल अगदी त्याची बायकोही त्याच्या बाहेरख्याली वृत्तीला वैतागली होती. अश्या कित्येक पोरींना त्याने उपभोगल होत. कोणी त्याच्या पैशाच्या मोहाला बळी पडली तर कोणी त्याच्या धाकाला.

सगळ्यांच्या तोंडी ही गरमागरम चर्चा चालू असताना तो मात्र तिकडून उठला. इकडे तिकडे पाहत थोड पुढे जाऊन त्याने कोणाचा तरी नंबर डायल केला.

" काय आहे रे @#* दुपारी तुझं.... झोपी दे ना ..." पलीकडून कोणीतरी खेकसला.

" दीपक नाईकला अटक केलाय पोलिसांनी...." तो गांगरून गेला होता.

" नाय खोलनार तो तोंड... त्याच्या पोरीला पटवलीय.... त्याची पोरगी माहितेय ना कशी आहे ती.... बापाला तर घाबरतच नाय... धमकीच दिलीय दीपकला... कधी ह्या प्रकरणात तोंड उघडल तर पोरीच.... हा हा हा... झोपू दे आता #@&*.. " फोन कट झाला. ह्याची मात्र फाटली होती. दीपक नाईक किती नीच आहे हे त्याला माहीत होत. स्वतःला वाचवण्यासाठी दीपक कोणत्याही थराला जाईल. भलेही पोरीच्या काळजीपोटी कच खाईल थोडी. पण शेवटी तो दीपक आहे साला... नुसत्या विचारानेच त्याच अवसान गळाल. विचार नको वाटत असतानाही त्याच्या डोक्यात नुसते उलटे सुलटे उड्या मारत होते. विचारांतून सुटका मिळावी म्हणून तो बाजूच्या देशी दारूच्या दुकानात घुसला. कदाचित ही देशी त्याला काही काळ विचारांपासून पळण्यासाठी मदत करणार होती.

क्रमशः