Dominant - 1 in Marathi Thriller by Nilesh Desai books and stories PDF | डॉमिनंट - 1

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

डॉमिनंट - 1

डॉमिनंट

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी तिचा संबंध नाही, असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

भाग एक

डिग्री गेल्यावर सर्वप्रथम मंदार संपूर्ण रूमची पाहणी करत काही आक्षेपार्ह मिळतेय का ते पाहू लागला. परंतु रूममध्ये तसे काही त्याला आढळले नाही.

घडलेल्या सर्व घटना जरी सामान्य माणसासाठी नॉर्मल वाटत असल्या तरी, एका डिटेक्टीव्हच्या दृष्टिकोनातून नक्कीच कुठेतरी पाणी मुरत होते.'

दुपारी दोन वाजता कल्याणच्या फलाट क्रमांक सहावर येऊन गाडी हळूहळू स्लो होऊ लागली तसं मळकट निळ्याशार रंगाची अमेरीकन टुरीस्टर सॅक त्यानं खांद्यावर अडकवली. गर्दीतून रस्ता मोकळा करत तो बाहेर येऊ लागला. एकदोन आडदांड शरीरयष्टीच्या माणसांना बाजूला करत कोल्हापूरी हिसका दाखवत तो गाडीच्या डोअरजवळ येऊन थांबला.

गाडी पूर्णपणे थांबण्याअगोदर दरवाज्यावर आलेल्या मंदारची ओघळती नजर थोडंसं मागे गेलेल्या कॅन्टीनवर पडली, आणि पोटाने भुकेचा सिग्नल दिला.

खाली उतरून मंदारची स्वारी कॅन्टीनकडे वळू लागली. अंगात फिकट हिरव्या रंगाचं शर्ट.. रेल्वेसफरामुळे त्या हिरव्या शर्टच्या हाताच्या बाह्या घामाने थोड्या काळपट झालेल्या.. हलके आकाशी रंगाची काहीशी जुनाट डेनिम.. आणि लोकल ब्रँडचे स्पोर्टस् शूज..

निळ्या सॅकशिवाय बाकी काहीच सामान त्याच्याकडे नव्हते. तीन वडापाव पाच सहा हिरव्या मिरच्यांसोबत खाल्ल्यानंतर कुठे त्याची पोटातली आग जरा शांत झाली. खिश्यात नाहीतरी फारसे पैसे नव्हते. जे होते त्यातच त्याला इथे जम बसवायचा होता.

मंदार जाधव.. लहानपणापासूनच एक वेगळंच रसायन. कोल्हापूराजवळच्या गावात मास्तराच्या घरात वाढलेलं. डिटेक्टीव्ह, क्राईम स्टोरीज या विषयांची पुस्तके आणि सिनेमे पाहुन तश्याच मानसिकतेला त्यानं अवलंबलेले. गावात कुठं खुट्ट झाले की त्याची इत्थंभूत खबर काढल्याशिवाय चैन नाही पडायचं पठ्ठ्याला.

चेहर्याने दिसायला साधाच पण कमालीचं स्मार्टनेस झळकायचं त्याच्या व्यक्तीमत्त्वातून. कोल्हापूरी पैलवानासारखे कसलेले शरीर.. पण तितकंच चपळ.. भेदक नजर.. आणि अंगात तुफान धाडसं. भय नावाच पाखरू त्याच्या आसपासपण नाही फिरकले कधी.

पंचवीशीच्या आसपासच वय त्याचं.. बी. ए. पास डिग्री गाठीशी.. त्यातूनच गावभर हेरगिरी करत राहायचा. गावच्या दरिद्री लोकांत चोरचमार कुठून येणार.. मग झाडून सगळ्यांची लफडी शोधायची आणि गावकर्यांच्या नजरेत आणून द्यायची. यातच काय तो डिटेक्टीव्ह असल्याचा आनंद घ्यायचा.

मंदारने गावातल्या बर्याच जणांना त्यांच्या कर्मानुसार पंचायतीसमोर नाक घासायला लावलं होतं. मग ते रेशनिंगवाल्या बबन्याची बेईमानी असो वा माधवाने चोरलेले आंबे असो. खालच्या आळीच्या सुनीलचं कोवळ्या रूपालीशी केलेलं प्रेमप्रकरण तर जगजाहीर करून टाकलं. आणि चार वर्षांपूर्वी दुसर्यांच्या बायकांवर नजर ठेवणार्या विक्रमला मंदारमुळेच गावकर्यांचा बेदम चोप मिळाला होता.

मागच्याच आठवड्यात गावाबाहेर स्टॅन्डजवळच्या केशकर्तनालाबाहेर एका पॅम्प्लेटने मंदारचे लक्ष वेधून घेतले होते.

"साहसी कामासाठी तरूण पाहीजे.. हेरगिरीसंबंधीचे ज्ञान असल्यास प्राधान्य.. आकर्षक मोबदला. राहणे-खाणे मोफत.. "

खाली कॉन्टॅक्ट नंबरही दिला होता.

केशकर्तनालय मंदारच्या घरापासून जवळच होतं. मग तिकडे नेहमीचे त्याचे येणेजाणे व्हायचे.

मंदारला तसंही गावात राहून फारसं काही मिळत नव्हतं. लग्न हा विचारदेखिल मनाला शिवला नव्हता अजून. तिन-चार दिवस नीट विचार करून मंदारने संबंधीत जाहीरातीत दिलेल्या नंबरवर कॉल केला होता.

------------------

रेल्वे फलाटावरच्या कॅन्टीनमधून हात धुवून बाहेर पडणार इतक्यात... मंदारला त्याच्या डेनिमच्या मागच्या खिश्यात काहीतरी हालचाल जाणवली.. मागे फिरला तसा एक साधारण शरीरयष्टीच्या इसमाच्या हातात त्याचं पाकीट.. तो इसम जीव खावून उडी मारून पळण्याच्या प्रयत्नात असतानाच..

मंदारने एकाच झेपेत त्याची मानगुटी पकडली. एक-दोन झोकांड्या घेऊन जेव्हा आपल्या पळून जाण्याच्या सगळ्या शक्यता नाहीश्या झाल्या असे त्या इसमाला वाटले तेव्हा तो गप्प उभा राहीला. अंगात लाल टि-शर्ट आणि निळी फडतूस जीन्स्.. गळ्यात रंगबेरंगी रूमाल बांधलेला..

मंदारच्या डाव्या हाताचा ठोसा अक्षरशः त्याच्यावर पडणारचं होता.. पण तितक्यात तो इसम पुटपुटला.. "कोड.. थ्री वन् फाय सीक्स्..."

मंदारला त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक जाणवून आली. पब्लीक एव्हाना आपला हातसाफ करायला सरसावलीच होती.. पण मंदारनं त्या इसमाला गळाभेट देऊन सर्वांसमोर तो आपला मित्रच असल्याचे भासवले.

त्या इसमानं मंदारला त्याचं नाव आरीफ म्हणून सांगितले. फारसा तिथं न थांबता, त्या इसमानं मंदारला इशार्यानंच त्याच्या मागून यायला सांगितले. मंदारनेही कल्याण स्टेशनच्या बाहेर पडण्याकडे प्रस्थान केले..

मंदारच्या चालण्यात एकप्रकारचा बेफीरपणा होता. त्याच्यातल्या निडर वृत्तीचाच तो एक भाग असावा.
हातातल्या घड्याळाने सवादोन वाजल्याचे दर्शवीले, मंदारने स्टेशनबाहेर येतायेता पाहीले.

मुंबईलगतच्या तापमानात हल्लीच्या काही वर्षात चांगलीच वाढ झाली होती. वैतागून मंदारने वर तापत्या सूर्याकडे पाहीले. उन्हाची बरीच झळ बसत होती.

पण अजून एक प्रश्न तर निरुत्तरीतच राहीला होता...

का बरे, वाचवले असावे त्याला मंदारने..?

------------------

दोन दिवसांपूर्वी...

कल्याणमधलं नुकतचं सुरू झालेलं क्युबा रेस्टॉरंटने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती. सकाळ संध्याकाळ माणसांची बरीच वर्दळ असायची तिथे.
कदाचित व्हेज-नॉनवेज दोन्ही मिळत असल्याकारणाने असावी.

पण तिथले वातावरण अगदी प्रसन्न वाटण्यासारखे होते. मेन रोडला लागुनच असं ते टुमदार हॉटेल होतं. समोरील बाजूला पूर्णतः सेकंड फ्लोअरपर्यंत असलेली ट्रान्स्परंट ग्लास.. आत प्रवेश करताच दोन्ही बाजूने सजवलेली छोटी छोटी झाडं.. वेल कल्चर्ड स्टाफ.. आकर्षक सिटींग अरेंजमेंट.. वर सेकंड फ्लोअरला असलेले ए सी सेक्शन.. सगळंच लाजवाब होतं...

सकाळी अकराची वेळ.. क्युबा रेस्टॉरंटच्या ए सी सेक्शन मध्ये कोपर्यातल्या एका टेबलावर चार व्यक्तींची खाजगी कुजबुज चालू होती. आसपास अजून आठ टेबल होते. पण त्यापैकी दोन वगळता बाकी सहा रिकामेच होते. एकीकडे एक कपल आणि दुसरीकडे एक मिडल एज्ड व्यक्ती असे त्या दोन भरलेल्या टेबलांवर होते.

कोपर्यातल्या चार माणसांत चालू असलेलं संभाषण संपले तसे त्यातल्या एका दाढीवाल्याने कोणालातरी फोन लावला.. बाकी तिघांकडे पाहत त्याने इशार्यानेच रिंग वाजतेय असे सांगितले. पलीकडून फोन उचलला गेला..

"हं.. हॅलो... मिस्टर मंदार जाधव..?"

पलीकडून होकार मिळाला तसे इथुन पुन्हा याने बोलायला सुरूवात केली.

"ईगल कंपनीसे बात कर रहा हु.. आपने फोन इंटरव्हयू दिया था.. आपके स्कॅनड् डॉक्यूमेंट और फोटोज के आधार पर आपका सिलेक्शन हो गया है... आपको परसो सुबह तक कल्याण आना होगा..." आपली दाट दाढी कुरवाळत तो फोनवर बोलत होता.

पलीकडून बहुधा पैश्यासंदर्भात विचारले गेले असावे.

"पचास हजार महीना मिलेगा.." इकडून दाढीवाल्याने हसत सांगितले.

"अपने आने की डिटेल्स मॅसेज कर देना.. हमारा आदमी स्टेशनपर मिलेगा.. ध्यान रहे हमें एक डिटेक्टीव्ह की जरूरत है.. आप तो जानते ही होंगे बाकी चीजें. और सबसे जरूरी शब्द नोट कर लिजिये.." आणि एक दीर्घ सुस्कारा सोडून तो म्हणाला..

"कोड.. थ्री वन् फाईव्ह सीक्स्..."

इतके बोलून त्याने फोन कट केला. चौघे एकमेकांकडे पाहुन हसले. त्यांच्यातला दुसरा ज्याच्या नाकाजवळ चामखीळ होते, त्याने खिश्यातून सॅमसंगचा स्मार्ट फोन काढला.. आणि 'bhai' नावाने सेव्ह केलेला नंबर डाईल केला.. पलीकडून कॉल उचलला गेला..

"भाय.. 'डिग्री' ने अपना काम कर दिया है...!"

............ पलीकडून काही विचारले.

"हा भाय.. आपके मुताबीक 'डिग्री' ने ही बात की उससे.. वो दो-तीन दिन मे आ जायेगा..!"

हॉटेलमध्ये बसलेल्या चौघांपैकी दाढीवाला जरा जास्त शिकलेला होता. कदाचित म्हणूनच त्याचं नाव 'डिग्री' असावं.

पलीकडून थंड रिस्पॉन्स मिळाला तसा दात विचकत हसत याने काॅल कट केला..

-----------------

कल्याण स्टेशनच्या बाहेर पडताना मंदार आरीफच्या मागोमाग थोडं अंतर ठेवून चालत होता. एकंदर आरीफच्या कपड्यांवरून तरी मंदारला काही शंका आली होती. पण आता इथपर्यंत आल्यावर पुन्हा मागे जाणे त्याला कधीच पटणारे नव्हते. किमान काम काय आहे हे जाणल्याबिगर तर नक्कीच नाही.

आणि तसंही आपल्या कामाची परीक्षा घेण्याची ही एखादी पद्धत असू शकते, असा विचार करून मंदारने 'गो अहेड' करायचे ठरवले.

थोड्याच वेळात मुख्य रस्त्यावर आरीफ एका काळ्या इनोव्हाच्या पुढच्या दाराशी खेटून उभा होता. त्याच्या मवाली टाईपच्या कपड्यांमुळे त्या चकचकीत गाडीची इमेज कमी झाल्यासारखी वाटत होती. मंदार त्याला फॉलोव्ह् करत तिथं पोहोचला, तसं आरीफने मागचा दरवाजा उघडून मंदारला खुणावून आत बसण्यास सांगितले.

मंदारने आत पाहीले. गाडीत दाढीवाल्या ड्रायव्हरशिवाय कुणीच नव्हतं. मंदार आत बसला तसं आरीफने दार बंद केलं.

"डिग्री तुम्हे सही जगह पहुचा देगा...!" अर्धवट उघड्या खिडकीच्या काचेवर आपली हनुवटी ठेवत आरीफ उद्गारला.

मंदारने आरीफच्या चेहर्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न केला पण आरीफच्या चेहर्यावर शुन्य भाव अवतरले होते.

गाडी सुरू झाली. स्टेशन परीसरातून बाहेर निघताना ऑटो रिक्ष्यांच्या घोळक्यामुळे वेळ लागत होता. मंदारच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागले होते. इथे आल्यापासून ते आरीफ जाईपर्यंत एक एक क्षण त्याने पुन्हा आठवून पाहीला. अजूनतरी काहीच चूकीचं वाटलं नव्हतं, पण काहीतरी वेगळं नक्कीच असावं असं त्याचं अंतर्मन सांगत होतं.

काय असावं याचा पडताळा मंदारला होत नव्हता. तरीही तो थोडा सावध झाला होता.

"तो आपका नाम 'डिग्री' है..?" मंदारने ड्रायव्हरला विचारलं.

"हो.." ड्रायव्हर समोरच्या मिरर् मध्ये पाहत उत्तरला.

त्याच्या उत्तरावर मंदारच्या चेहर्यावर हसु उमटले. एकतर त्याचं नाव विचीत्रच होतं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्याच्या 'हो' मधून तो मराठी असल्याचा दाखला मिळाला होता.

डिग्रीने मंदारला ते जात असलेल्या जागेची, आसपासच्या गावाची जुजबी माहीती दिली. अर्थात मंदारने ती काढून घेतली. मात्र कामासंबंधी विचारल्या गेलेल्या प्रश्नावर 'डिग्री' निरुत्तर झाला. त्याबद्दल काही माहीती नसल्याचे त्याने सांगितले.

गाडीने आता वेग पकडला होता. गाडीसोबत मागे जात असलेला रस्ता, आजूबाजूचे फलक, नदी, तिच्यावरचा निमुळता ब्रिज, मुख्य शहरानंतर नुकतेच मागे पडलेले गाव इत्यादी सगळं काही मंदार बारकाईने पाहत होता. त्याची चौकस नजर शक्य तितकं सारं काही टिपण्याचा प्रयत्न करत होती.

आणखी एक गाव मागे पडलं आणि साधारणतः पंचवीसाव्या मिनीटाला गाडीचा वेग कमी झाला.

----------------------

'उत्कर्ष लॉजिंग ॲन्ड बोर्डींगस्'

मंदारने समोरच्या बोर्डवरचे नाव वाचले. पार्किंग लॉटमध्ये गाडी लावल्यावर डिग्री आणि मंदार दोघे बाहेर येऊन रिसेप्शनकडे जाऊ लागले. अर्थात मंदार फक्त डिग्रीच्या मागोमाग चालत होता.

त्या जागेच्या नुकत्याच रिन्होवेशन केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ग्राउंड फ्लोअरचा हॉल बर्यापैकी ऐसपैस होता. दोन बाजूला दोन सोफे. डाव्या बाजूला समोरच्या भिंतिला खेटून रिसेप्शन टेबल होते. तिथे साधारण वीशीचा एक तरूण मुलगा चेहर्यावर निर्विकार भाव ठेवून हातातील रजिस्टर चाळत होता. उजव्या बाजूने वर जाणार्या स्टेप्स् होत्या. एकुण चार मजली असा तो लॉज होता.

डिग्रीने रिसेप्शनच्या हातावर शंभर रुपयाची नोट टेकवून तिथे अगोदरच बुक असलेल्या रूम नंबर २०१ ची किल्ली मागितली. खात्रीसाठी ज्या नावाने रूम बुक केली होती त्या नावाचा उल्लेख केला.

रिसेप्शनवर असलेल्या तरूणाने शंभर रुपयाची नोट हसत स्विकारत शांतपणे रूमची किल्ली डिग्रीकडे दिली.

डिग्री मागे वळाला आणि मंदारला उद्देशून म्हणाला,

"सेकंड फ्लोअर... लिफ्टने जाऊया.."

या एका वाक्यात मंदारला काहीतरी आठवल्यासारखे जाणवले. मंदार आणि डिग्रीमध्ये जेमतेम फुटभराचं अंतर होतं, आणि तितकसं अंतर पुरेस होतं डिग्रीचा स्पष्ट आवाज कानावर पडण्यासाठी.

"साहेब, लिफ्ट तासाभरापूर्वीच बंद पडली आहे.. माणूस येतच असेल नीट करण्यासाठी. पण आता पायर्यांनीच जायला लागेल.." रिसेप्शनवरचा तरूण खंत करत उद्गारला.

"काय यारर्...." डिग्री त्रासिक चेहर्याने स्टेप्स्कडे वळाला.

मंदार त्याच्या मागोमाग होता.

पहील्या मजल्यावरच्या पायर्यां संपताच वर कुणाची तरी कुजबुज ऐकू आली. दुसर्या मजल्यावरच्या पायर्यांवर वळताच डिग्री समोर बघत एक दोन क्षण थबकला.

स्काय ब्ल्यू रंगाचा शॉर्ट स्लीव्हलेस टॉप आणि खाली डार्क नेव्ही ब्ल्यू जीन्स घातलेली एक तरूणी पाठमोरी होती. तिच्या सोबत आणखी तीन माणसे होती. त्यातल्या एकाने ज्याच्या नाकाजवळ चामखीळ होते, तिच्या खांद्यावर आपला हात टाकला होता. त्यांच्या आपापसांतल्या कुजबुजण्यावरून त्यांच्यातली 'खास' मित्रता दिसून येत होती.

डिग्री एकवार मागे मंदारकडे पाहत हसला,

"हे सर्व इथे नॉर्मल आहे...' डिग्रीने पुढे पुष्टी केली.

मंदारने मान हलवत आपल्याला काही फरक पडत नसल्याचे सांगितले.

डिग्री आणि मंदारची चाहूल लागताच त्या तरूणीने मागे वळून पाहीले.

आता मात्र मंदारच्या चेहर्यावर थोडीशी आश्चर्याची किनार उमटली.

'ती' स्त्री नसून एक तृतीयपंथी आहे, हे कळण्यासाठी मंदारला फारसे कष्ट पडले नाहीत.

तिने प्रथम डिग्रीला स्माईल दिली आणि मागे असलेल्या मंदारला वरून खालपर्यंत न्याहाळले. मंदार आणि डिग्रीची नजरानजर झाली. नजर चोरून डिग्री पुढे भरभर चालू लागला.

त्या चौघांकडे पाहत मंदारही निघाला..

एव्हाना डिग्रीची चाल आणि हावभाव यांत कमालीचा बदल झाला होता. मंदार समोर काहीच झाले नसल्याचे दाखवण्याचा त्याचा निष्फळ प्रयत्न सुरू होता.

रूम नंबर २०१ मध्ये मंदारला आतपर्यंत सोडून कसाबसा डिग्री तिथून लवकर सटकला. आज किंवा उद्या फोन करून कुणीतरी भेटण्यासाठी येईल असे त्याने सांगितले.

डिग्री गेल्यावर सर्वप्रथम मंदार संपूर्ण रूमची पाहणी करत काही आक्षेपार्ह मिळतेय का ते पाहू लागला. परंतु रूममध्ये तसे काही त्याला आढळले नाही.

घडलेल्या सर्व घटना जरी सामान्य माणसासाठी नॉर्मल वाटत असल्या तरी, एका डिटेक्टीव्हच्या दृष्टिकोनातून नक्कीच कुठेतरी पाणी मुरत होते.

'डिग्रीच्या वागण्यात झालेला बदल, पायर्यांवर भेटलेली माणसे त्यांसोबत तृतीयपंथी, स्टेशनवर भेटलेला आरीफ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डिग्रीचा आवाज...'

'हो... डिग्रीचा आवाज... रिसेप्शनवर जवळून ऐकलेला डिग्रीचा आवाज आणि इथे बोलावण्यासाठी आलेला कॉल... त्या कॉलवरचा आवाज... हे दोन्ही आवाज जवळपास एकाच व्यक्तीचे असण्याची दाट शक्यता होती..'

मंदार एक एक गोष्ट पुन्हा पडताळून पाहू लागला.

'जर तो आवाज डिग्रीचाच असेल तर, आपल्याला बोलावताना दाखवलेली अदब, त्याच इसमाने ड्राइव्हर म्हणून येणं, त्याचा रिसेप्शनवरचा व्यवहार आणि त्यानंतर पायर्यांवर घडलेला प्रसंग यांत नक्कीच विसंगती दिसून येत होती.'

'आणि तृतीयपंथीयाचे डिग्रीला स्माईल देणं ही त्यांची पूर्वओळख असल्याचे दर्शवीत होती.'

'शिवाय डिग्रीने सांगितले त्याप्रमाणे त्याला आपल्या कामासंबंधी माहीती नाही, याचाच अर्थ कामाची माहीती देण्यासाठी अजून कुणीतरी आपल्याला भेटायला येणार आहे.'

सगळ्या गोष्टींचे ठोकताळे बांधून मंदार शांतपणे रूममध्ये वावरू लागला. तिथे त्याला आक्षेपार्ह असे काही मिळाले नाही. शेवटी त्याने तो प्रयत्न सोडून दिला आणि फ्रेश होण्यासाठी गेला.

-------------------

'उत्कर्ष लॉजिंग ॲन्ड बोर्डींगस्'

पहील्या मजल्यावरच्या कोपर्यात असलेल्या सर्वात शेवटच्या रूममध्ये हलकासा गोंधळ सुरू होता. डोअर बेल दाबून दरवाज्यावर हलक्या हाताने दोन वेळा 'टकटक' झाले. ती एक विशिष्ट खुण होती. चार-पाच सेकंदात दार उघडले.

"भडव्यांनो आत रूम मध्ये नंगानाच करता येत नव्हतां का तुम्हाला...?" डिग्रीने शिव्या घालतच प्रवेश केला.

आत रूममध्ये गेल्या गेल्या कुठल्याही व्यक्तीचं लक्ष पहीले त्या रूममधल्या कोपर्यांमध्ये आपसुकच गेलं असतं. एका कोपर्यात बीयरच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची थोटकं, अर्धवट जेवलेल्या एक-दोन प्लेटस्... दुसर्या कोपर्यात 'राखुन ठेवलेला स्टॉक.. वेगवेगळ्या चवीचा चाखणा सांभाळून ठेवला होता.

आत समोरच्या खुर्चीवर नाकाजवळ चामखीळ असलेला मदन हातात पेग घेऊन बसला होता. दरवाजा उघडण्यासाठी गेलेला चंदू डिग्रीच्या मागून आत येत होता.

"आत ये... शांत हो... झालं ते आपल्याला सांगितलेल्या प्लॅन मध्ये नव्हतं, पण आता काही बदलता येणार नाही त्यातलं..." बेडवर निष्काळजीपणे पहुडलेला नसिर आळस देत म्हणाला.

"म्हणजे म्हणायचं काय आहे तुला.. साल्या आपण प्लॅनच्या बाहेर एकही चाल खेळू शकत नाही.. माहीत आहे ना, भायनी काय सांगितलेले..." डिग्री अजूनही चिडलेल्या अवस्थेत होता.

"त्याचा विचार केला हाय... काय फरक पडत नाही.. याबद्दल भायला कायपण सांगायची गरज न्हाय.." मदन थंड डोक्याने खाली जमिनीकडे पाहत उद्गारला.

"मदन.. पण असं का झालं...? इतका ढिला कारभार आपण नाही करू शकत... नायतर आपल्याला या कामाचे पैसे भेटणं जड होईल.." डिग्रीच्या क्रोधाची जागा आता चिंतेनं घेतली होती.

"डिग्र्या... तू लिफ्टने जाणार होतास.. मी चौकशी केली खाली जाऊन.. लिफ्ट बंद पडणं आपल्या प्लॅनमध्ये नव्हतं.. पण आता मी म्हणालो ना सगळं पक्क झालंय कसं करायचं ते... तसं पण ते आलेलं बुजगावणं 'चू' च वाटतयं.. तू टेन्शन घेऊ नको.. चल एक एक पेग हो जाये...." मदन.

मदनच्या त्या उत्तराने डिग्रीला हायसे वाटले. एकवार त्याने इतर तिघांकडे पाहीले.

"मौसम कुठाय...?" डिग्रीने अचानक विचारले.

"२०२ मध्ये..." चंदू म्हणाला.

"एवढ्या लौकर...." डिग्रीने आश्चर्य व्यक्त केले.

"हो, तिला सर्व नीट सांगितलेय.. दमली असेल सकाळपासून.. म्हणून थोडा आराम करायला गेलीय.. वेळ झाला की पहीला राऊंड ती सुरू करेलच.." नसीर गालातल्या गालात हसत म्हणाला.

"चल हे घे.. आणि तु पण आराम कर.. रात्री जागरण आहे आपलं..." मदन नविन बनवलेला पेग डिग्रीला देत म्हणाला.

"तुमच्या आयला... तुमच्या.. मजा मारलीत सकाळपासून.. आणि आता मी आराम करू काय... तुम्ही तिघं आता तासभर रूममधून सटका.. आली रे आली... आता माझी पाळी आली..." आनंदाच्या जोशात डिग्रीने एकाच दमात संपूर्ण पेग संपवला.. आणि मुठभर चिवड्याचा बकाना तोंडात भरला.

"ठिक हाय भावा.. तुझ्यासाठी रूमची कुर्बानी तर दिलीच पाहीजे..." नसीर हसत हसत बेडवरून उठला.

मदन आणि चंदूपण अंगात शर्ट चढवून रेडी होऊ लागले.

डिग्रीने तोपर्यंत 'मौसम' ला फोन करून खाली 'अर्जंट' कामासाठी बोलावून घेतले.

फोन ठेवताच इतर तिघांकडे पाहत निराशतेने डिग्री म्हणाला..

"काय माहीत असला आयटम परत कधी नशिबात असेल.."

"बिच्चारा...." डिग्रीला प्रत्युत्तर म्हणून इतर तिघांच्याही तोंडून एकाचवेळी प्रतिक्रिया आली.

मदन, नसीर, चंदू तिघेही बाहेर जायला आणि मौसम यायला एकच वेळ साधून आली. तिला पाहत छेडत तिघेही खाली निघून गेले.

डिग्रीने अक्षरशः मौसमला आत ओढलेच.. मौसम मघाचीच तृतीयपंथीय होती. अधाशासारखं दरवाजा बंद करून डिग्री पुढचा तासभर मौसमवर तुटून पडला.

तो शांत झाला तसे तिने जवळ्या बाटलीतून बियर ग्लासात ओतली.. आणि ग्लास त्याच्यापुढे धरला. डिग्रीने तो पुढच्याच मिनिटात रिकामा केला.

पुढे काय, कसे करायचे आहे हे डिग्रीने मौसमला सांगितले. अर्थातच मौसमला अगोदरच मदनने याबद्दलची कल्पना दिली होती.

---------------------

डिग्रीला पूर्णपणे समाधानी करून मौसम रूममधून बाहेर पडली.

कंबर चांगलीच ठणकत होती. सकाळपासून डिग्री चौथा माणूस. त्यांची वासना, भूक त्यातून जन्मलेली तप्त अग्नी आपल्यात सामावून घेताना प्रचंड यातना होत. पण तिचं कामंच होतं ते. कस्टमरला कोणत्याही परीस्थितीत निराश करणं तिच्या धंद्याला साजेसं नव्हतं.

किन्नर समाजाचा भाग कधीच होऊ शकला नाही किंवा समाजाच्या निरुत्साही मानसिकतेने होणारही नाही. समाजाने झिडकारून लावलेलं असताना कश्याप्रकारे कुठल्या चांगल्या नोकरीची अथवा कामाची अपेक्षा किन्नरांकडून ठेवायची. भिक मागणे अथवा आपल्या शरीराचेच भांडवल करून जगण्याचा प्रयत्न करणे, याशिवाय कोणता मार्ग आपला समाज तृतीयपंथी व्यक्तीसाठी ठेवतो.

मौसमची कहाणी काही वेगळी नव्हती. ती असेल पंचवीशीची. तिलाही जगायचं होतं. किंबहुना आणखी कुणाच्यातरी आयुष्याची तजवीज तिला करायची होती. आणि त्यासाठी 'हे' सर्व करणं भागच होतं.

मदन मौसमला अगोदरपासूच ओळखत होता. त्याच्याच सांगण्यावरून मौसमला हे एक दिवसाचे काम मिळाले होते.

कल्याण शहरामध्ये सेक्सवर्कर किन्नर तसे जागोजागी दिसतील. त्यातल्या त्यात सोफिस्टीकीटेड, मिडलक्लास कॅटेगरीतले अथवा चिपरेटेड असे गटही होते. प्रत्येक कॅटेगरीचे आपापले प्रभाग वाटून घेतलेले होते.

मौसमची दिवसभराची कमाई हजार-दोन हजाराची होती.

पण आजच्या कामाचे तर तिला एक दिवसाचे एक लाख रूपये मिळणार होते. पन्नास हजाराचा ॲडव्हान्स तिला कालच मिळाला होता. जो तिने घरी तिच्या खास व्यक्तीजवळ सुरक्षित ठेवला होता. अशी व्यक्ती जिच्यावर ती सर्वात जास्त प्रेम करत होती.

या कामाविषयी मौसमने घरातल्या त्या व्यक्तीलाही कल्पना दिली होती.

डिग्रीकडून निघून आपल्या रूमवर आल्यावर मौसमने घड्याळाकडे पाहीले. पाच वाजले होते. ती अगदी घाईघाईतच वॉशरूमकडे वळाली.

काही वेळातच फ्रेश होऊन आल्यावर तिने तयारी करायला घेतली.

आरश्यासमोर शृंगार करताना तिला दुपारी पाहीलेला मंदार आठवला. त्याला कसंही करून आपल्यासोबत थोडं बोलतं करायचंच असा चंग तीने मनाशी बांधला. तिला सांगितलेल्या कामात तेवढंच तर होतं.

'मंदारशी हसत बोलत त्याच्या रूममधून बाहेर पडायचेय... बस्स.. इतकंच तर काम होतं.. याचेच तर आपल्याला एक लाख रूपये मिळणार आहेत..'

'आणि यात माझ्याकडून तरी काही चुकीचं काम होणारं नाही...'

कामात थोडी जोखीम नक्कीच वाटत होती पण तरी त्याबदल्यात मिळणारा परतावा जास्त असल्याने मौसम या कामासाठी तयार झाली होती. आणि साहजिकच तिला फक्त ॲक्टींग करावयाची होती, बाकी बाबींशी तिचा प्रत्यक्ष काही संबंध येणार नव्हता.

मंदारच्या नजरेतून मौसमने हे ताडले होते की हा माणूस पटकन भाळणारा नाही. त्यामुळेच त्याच्यासमोर इतर कस्टमरसारखे जाणे ठिक वाटले नसते. इतक्या वर्षांत मौसमचा संबंध बर्याच पुरूषांशी आला असल्याकारणाने तिला चांगलेच ठावूक होते की कुठल्या पुरूषाशी कश्याप्रकारे वागावे.

आरश्यासमोर असलेल्या मौसमने आपल्यातले स्त्रीसौंदर्य खुलवण्यासाठी जीन्स सोडून गुलाबी रंगाचा ड्रेस निवडला. चेहर्यावर हलकासा मेकअप आणि ओठांवर फिकट गुलाबी रंगाच्या लिपस्टिकचा आधार घेऊन ती मंदारला भेटण्यासाठी तयार झाली.

मौसम मनोमन या कामासाठी मदनचे आभार मानू लागली.

---------------

साधारण सहा वाजण्याच्या सुमारास रूमच्या दरवाज्यावर चाहूल झाली. डोअर बेलचा आवाज ऐकताच मंदार दार उघडायला सरसावला, समोर चहाचा कप घेऊन रूमबॉय आला होता.

रूम सर्व्हंट चहा देऊन जाताच मंदार दार बंद करण्यासाठी गेला. पण दरवाज्यावर दुपारची तृतीयपंथीय व्यक्ती पाहून तो थांबला.

"हाय.. हॅन्डसम्... मी मौसम.. दुपारी तुला पाहीले होते..."

डाव्या बाजूला हलकीशी सरकलेली आपली फिकट गुलाबी ओढणी सावरत तृतीयपंथीयाने तिची ओळख करून दिली.

मौसम दिसायला उजवी होती, शिवाय स्त्रीयांप्रमाणे तिचा बांधाही कमनीय होता. मानेपर्यंत रूळलेले, मोकळे सोडलेले केस, चेहर्यावर हलकासा मेकअप, फुलांचे नक्षीकाम असलेला तिचा गुलाबी रंगाचा ड्रेस तिच्यातल्या स्त्रीत्वाचे प्रदर्शन करत होता.

"हो.. मग...?" मंदार कोरड्या स्वरात उद्गारला.

"मग काय... तुला पाहताचक्षणी मला जाणवले की आपण चांगले मित्र होऊ शकतो..." मौसम.

"ये भवाने... आपल्याला तसला समजू नकोस..." मंदारच्या मनात पहीली प्रतिक्रिया हीच आली. पण त्याने तसे बोलून दाखवले नाही. किंबहुना इथे आल्यापासून त्याला भेटणार्या प्रत्येक व्यक्तीशी तो जपून वागत होता.

त्याच्या मनात ऊत्सुकता होती त्याच्या तिथे येण्यासंबंधी सर्व काही जाणून घेण्याविषयी. आणि अर्थातच त्याला जे काही थोडेफार क्लू मिळणार होते ते याच माणसांकडून. म्हणूनच मंदार आपल्या वागण्याबोलण्यातून सर्वांना चाचपून पाहत होता.

आणि तसंही या सगळ्यात त्याला थोडंफार का होईना पण एका थ्रिलिंग अनुभवांचं परमसुख मिळत होतं.

"हॅलो... कुठे हरवलास...?" मौसम.

"तुझं काय काम आहे सांगशील का...?" मंदारने शांतपणे विचारले.

"सांगितले ना.. मैत्री करायची आहे..? मौसमने चेहर्यावर स्मितहास्य आणत उत्तर दिले.

त्याच क्षणी डोअर बंद करावे असे मंदारला वाटले. तसे काही तो करणार इतक्यात त्याचे लक्ष नुकत्याच आलेल्या चहाच्या कपकडे गेलं.

आपल्या मनातल्या कल्पनेप्रमाणे त्याने मौसमशी थोडं मोकळीकतेने बोलायला सुरूवात केली.

"चहा देण्याइतपत मैत्री करू शकतो मी तुझ्याशी..." मौसमला आत येण्यासाठी जागा देत मंदार उद्गारला.

त्याने तिला चहाकडे खुणावले.

मंदारने सहजासहजी आपल्याला आत घेतल्याने मौसम मनातून सुखावली.

"हो.. हो.. चहा घेईनच मी... पण मग तू.. मी आणखी एक ऑर्डर देऊ का.." मौसम.

"नको... मी बाहेरच सहसा काही खात-पित नाही, म्हणूनच दुपारचं जेवणही मी परत पाठवलं." मंदारने उगाचच काहीतरी फेकायचं म्हणून फेकलं.

खरंतर मंदारला आता जपून पाऊलं टाकायची होती. त्यासाठीच तर त्याने दुपारचे जेवण नाकारले होते. आणि आता मौसमला रूममध्ये घेण्याचे कारण म्हणजे त्याला चहाविषयी संशय होता. जेवणात किंवा चहात गुंगीच औषध असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

मौसमने चहा पिल्यानंतर त्यासंबंधी खात्री झालीच असती.

मौसमने चहा पित गप्पांची सुरुवात केली. मंदारही तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा करू लागला. जर चहामध्ये काही असेल तर मौसमला काही काळ नजरेसमोर ठेवणे गरजेचे होते.

"अचानक नव्याने या शहरात आलेल्या व्यक्तीशी मैत्री...? खरंच तुला मैत्री करायची आहे की मैत्री करून घेण्यासाठी तुला कुणी पाठवलं आहे.." मंदारच्या खोचक प्रश्नावर मौसमला ठसका लागला आणि तिचा चेहरा पडला.

आपला शाब्दिक वार वर्मी बसल्याचे मंदारच्या लक्षात आले. तो अजूनही बारकाईने मौसमच्या डोळ्यांत आणि इतर हालचालींवर लक्ष ठेवून होता.

"अगदीच असं काही नाही..तु इथे नविन आहेस..?
हसत विषयाला बगल देत मौसम उत्तरली.

पंधरा-वीस मिनिटं होऊनही सर्वकाही नॉर्मल असल्याने मंदारची चहाविषयीची शंका दूर झाली.

एव्हाना मौसमचेही मंदारशी ओळख करून घेण्याचे काम संपले होते. त्यामुळे निघण्यासाठी ती उठली, मंदारलाही नाहीतरी तेच हवे होते.

बाहेर येताना मुद्दाम मौसमने मंदारला हग केलं. आणि स्माईल देत म्हणाली,

"अच्छा बाय्.. भेटू पुन्हा..."

मंदारला हे अनपेक्षित असूनही त्याने नकार दर्शविला नाही..

"ओके.. सी.. यू..." मंदार उत्तरादाखल म्हणाला.

मौसम आणि मंदार दोघेही आपापल्या मनात एकमेकांविषयी तर्क लावत होते. तिच्या मतानुसार त्याच्याशी अगदी कमी वेळात ओळख करून घेण्याची तिची चाल यशस्वी ठरली होती. त्याच्या मतानुसार त्याने तिचा परीस्थितीनुसार किमान चहासाठी तरी वापर करून घेतला होता.

अर्थातच ते फक्त त्यांच्या मनातले तर्कवितर्क होते. बाहेरच्या परीस्थितीपासून मंदार अजूनही काहीच अंदाज बांधू शकला नव्हता. शिवाय मौसमही बर्याच गोष्टींबद्दल अजून तरी अंधारातच होती. तिचा सहभाग फक्त या एका भेटीपुरताच मर्यादित होता किंवा आणखी काही तिच्या हातून घडणार होते, या प्रश्नांची उत्तरे फक्त येणारा काळच देणार होता.

मंदार दरवाज्यापासून थोडा बाहेर होता. मौसम त्याच्यासमोरच कॉरीडॉरमध्ये उभी होती.. दोघांच्या चेहर्यावर स्मितहास्य होते..

त्यांच्या नकळत कुणीतरी याच संधीची वाट पाहत होतं... हो.. हीच योग्य वेळ होती...

कॉरीडॉरच्या दुसर्या टोकावर एक कॅमेरा तयारच होता.. एका परफेक्ट क्लिक साठी....

'म्हणजे मंदार आणि मौसमवर वॉच ठेवला गेला होता...? मंदारला इथे बोलावण्यात काय हेतू असावा..? कोड थ्री वन् फाईव्ह् सीक्स् पुन्हा उपयोगी पडणार होता का..? जर एखाद्या अनुचित कामासाठी कुणाला फसवायचंच होतं तर जवळपासच्या भागातलाच माणूस का नाही..? लांब कोल्हापूरवरून मंदारलाच का बोलावले होते..? आणि जरी डाव मंदारसाठी आखण्यात आला होता, तरी मौसमचा या खेळात नेमका किती सहभाग होता..? का ती फक्त कठपुतली होती कि स्वतः सावज...?' या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन पुन्हा भेटू पुढच्या भागात...

क्रमशः