Nidhale Sasura - 15 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | निघाले सासुरा - 15

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

निघाले सासुरा - 15

१५) निघाले सासुरा!
लग्नाचा दिवस उजाडला तशी वेगळीच लगीनघाई सुरू झाली. चहा, पाणी, आंघोळी अशा कामांनी वेग घेतला. नवरीला हळद लावण्याची तयारी सुरू झाली परंतु वाट होती नवरदेवाकडून येणाऱ्या 'उष्टी हळद'ची.
"आत्या, उष्टी हळद हा काय प्रकार आहे?" अलकाने विचारले.
"अग, तिकडे श्रीपालला तेल, उटणे, हळद लावून आंघोळ घातली जाणार आहे. त्याला तेल-हळद लावून झाली की ती हळद आपल्याकडे येईल आणि मग तीच हळद छायाला लावायची असते."
"असे होय का? मला वाटले उष्टी हळद म्हणजे आधी नवरदेव थोडी हळद खात असेल आणि मग त्याने तोंड लावलेली हळद नवरीला आणून लावत असणार. खाल्ल्याशिवाय ती उष्टी होईलच कशी नाही का?" अलकाने विचारले.
"ये चूप ग. वात्रट कुठली.." कुण्या तरी नातलग बाईने अलकाला दरडावले.
"आत्या, पण हा प्रकार करायचा का?" तरीही अलकाने विचारले.
"अशी हळद लावली म्हणजे ते दोघे लग्नाला सज्ज होतात. त्यांना नवरदेव-नवरी अशी ओळख मिळते. समजले?" आत्याने विचारले.
"समजले.आत्या, एक सांग ना गं, मुलीच्या म्हणजे नवरीच्या मागे तिचा मामाच उभा राहतो, हे का?" अलका म्हणाली.
"अग, ती परंपरा आहे. पण मला असे वाटते की, त्या मागे असा संकेत असू शकतो, मामा वधूच्या एक गोष्ट निदर्शनास आणून देतो की, बाळा, घाबरु नकोस ज्याप्रमाणे मी तुझ्या पाठीशी आत्ता खंबीरपणे उभा तसाच तू सासरी गेल्यावर तुझ्या आईच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन. इकडची काळजी करू नकोस. "
योग्यवेळी नाष्टा झाला. चहा, कॉफी, दूध झाले. फराळाचा बेत आणि चव सर्वांनाच आवडली. 'शितावरून भाताची परीक्षा' याप्रमाणे फराळ उत्तम झाला म्हणजे जेवणही उत्तमच होणार अशी खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली.
नियोजित वेळेच्या एक तास अगोदर वरात निघाली. पाच मिनिटांच्या अंतरावर मारोतीचे मंदिर होते. नाचणारांची हौस पूर्ण भागल्यानंतर, 'नाच नाचूनी थकले रे नंदलाला' अशी अवस्था होऊनही लग्नघटिकेच्या पाच मिनिटे आधी नवरदेवाच्या वेशात राजबिंडा दिसणारा श्रीपाल बोहल्यावर चढला. माईक हातात घेऊन स्वतः कुलकर्णी म्हणाले,
"स्वागत, सुस्वागतम् ! काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी मी उभा आहे. पहिली गोष्ट म्हणजे मंगलाष्टके केवळ पाच होणार आहेत. पहिले आणि शेवटचे ही दोन मंगलाष्टके गुरु म्हणतील तसेच मधली तीन मंगलाष्टके म्हणणाऱ्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. त्यामुळे इतरांनी कुणी मंगलाष्टकं म्हणण्याचा प्रयत्न करू नये कारण मांडवातील अनेकांना लगेचच दुसऱ्या लग्नासाठी इतरत्र जायचे आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार घालताना वधूवरांना कुणीही उचलायचा प्रयत्न करू नये. शास्त्रसंमत आणि पूर्वापार पद्धतीने दोघेही आपापल्या जागेवरून एकमेकांना पुष्पहार घालतील. या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने पंचगिरी कुटुंबीयांनी अत्यंत स्वादिष्ट, रूचकर असे जेवण तयार केले आहे, त्याचा आस्वाद घेऊनच सर्वांनी कार्यालय सोडावे. धन्यवाद!" टाळ्यांच्या कडकडाटात कुलकर्णींनी माईक गुरुंकडे दिला. ही संधी साधून कार्यालयात जमलेल्या काही लोकांमध्ये चर्चा सुरू झाली...
"बाप रे! लग्न वेळेवर लागतंय. लग्न आजकालच्या प्रथेप्रमाणे उशिराच लागेल म्हणून मी जरा उशिराच निघावे या विचारात असताना बायकोने आग्रह केला आणि वेळेवर पोहोचलो."
"हो ना. असेच हवे. हे लग्न वेळेवर लागतेय म्हणजे मला दुसरे लग्नही सापडेल. वा! मुहुर्ताची वेळ साधता येते तोच असे नियोजन करतो. व्हेरी गुड!"
"तुम्हाला सांगतो, आज चार पत्रिका आहेत. हिला म्हटलं तू दोन लग्नं कर..."
"का..य? त..त..तुम्ही बायकोला चक्क दोन लग्नं करण्याची परवानगी दिलीत..."
"अहो, नीट ऐकून तर घ्या. तिला म्हटलं, तू दोन ठिकाणच्या लग्नाला हजर रहा. मी दुसऱ्या दोन लग्नांना हजर राहतो. समजले? सहसा दोन लग्ने असली म्हणजे दुसऱ्या ठिकाणी अक्षता टाकण्याचा योग येत नाही. फक्त तोंड दाखवायला दुसऱ्या ठिकाणी जावे लागते परंतु आज हे लग्न अगदी वेळेवर लागतंय म्हणजे मला त्या दुसऱ्या सोहळ्यालाही उपस्थित राहता येईल."
"नवरदेवही मारोतीरायाचे दर्शन घेऊन लवकरच परतला हो. वरात म्हणजे नाचणारी मंडळी स्वतःची नाचण्याची हौस भागवून घेतात आणि त्यामुळे लग्नाला उशीर होतो ही गोष्ट त्यांच्या गावीही नसते." एक जण म्हणाला.
"इथे कसे सगळे वेळेवर आणि व्यवस्थित होतंय त्यामुळे गुरूंनाही सारे विधी शांतपणे करता येत आहेत. नाही तर नवरदेव बोहल्यावर उशिरा पोहोचला की, मग गुरुजींनाही घाई होते."
"अहो, मागच्या आठवड्यात मी एका लग्नाला गेलो होतो. वरात आणि नाचणे या प्रकारांमुळे लग्न तब्बल दोन तास उशिरा लागले. वरात मंगलकार्यालयाच्या प्रांगणात आली तेव्हा उरलेसुरले वऱ्हाडीही नाचू लागले. तितक्यात कुणीतरी नवरदेवाला घोड्यावरून खाली उतरवले आणि मग काय नवरदेव नाचायला लागला म्हणताच जो - तो त्याच्यासोबत नाचण्याची हौस भागून घेऊ लागला. तिकडे गुरुजींची घाई, तळमळ सुरू होती पण नवरदेवाचा 'डान्सबार' बंद होण्याची चिन्हं दिसत नव्हती हे पाहून गुरूंनी माईकवर जोरात 'सा..व..धा..न..' असे म्हटले आणि काय सांगू राव, नवरदेवाला वाटले,की लागली आपली वाट! आपली वाट पाहून पाहून आपल्या नियोजित वधूचे लग्न दुसऱ्याच कुणाशी तरी लावल्या जातेय... या विचाराने तो नवरदेव जो सुसाट धावत सुटला तो थेट व्यासपीठावर ठेवलेल्या चौरंगावर जाऊन उभा राहिला."
"मला तर असे वाटत होते, की वरातीच्या वेळी रस्त्यावरचे वऱ्हाडी मंडळीचे डान्सबार कायद्याने, सक्तीने बंद करायलाच हवेत. घरंदाज महिला रस्त्यावर डान्स करतात हे पाहताना कसेतरी होते."
"अगदी बरोबर. माझ्या मनातले बोललात. असे व्हायलाच हवे. मला एक अजूनही समजले नाही, एखादा अपवाद वगळता नवरदेव हा नवरीपेक्षा उंचच असतो. तरीही त्याला चौरंगावर उभे करून नवरा-नवरीमधील अंतर का वाढवत असावेत?"
"त्याचे काय आहे, नवरी हार घालत असताना नवरदेवाला खाली वाकावे लागते म्हणजे त्या क्षणापासून पुढे आयुष्यभर नवरदेवाला नवरीपुढे वाकायची सवय व्हावी म्हणून! दुसरीकडे नवरी हार घालताना नवरदेवाकडे मान वर करून हार घालताना तिचे डोळेही ताणल्या जातात म्हणजे त्या क्षणापासून आजीवन नवरदेवावर डोळे वटारण्याची सवय व्हावी म्हणून..."
"व्वा! दे टाळी! मार्मिक वर्णन केले हं.." म्हणत दोघांनी एकमेकांना टाळी दिली.
"अहो, नवरदेवामुळेच लग्नाला उशीर होतोय असे नाही तर आजकाल नवरीकडूनही विलंब होतो."
"म्हणजे? वधूसूद्धा वरातीमध्ये डान्स करते की काय?"
"तसे नाही हो. हल्ली ते ब्युटीपार्लरचे खूळ निघालंय ना. एका लग्नात ज्या ब्युटीपार्लर बाईला सांगितले होते, ती बाई अचानक आजारी पडली. सीमांतपूजनाच्या दिवशी ती बाई येणार होती. तिची वाट पाहता पाहता म्हणण्यापेक्षा ती येणारच या खात्रीने कुणाच्या लक्षात आले नाही. सीमांतपूजनाची वेळ झाली तेव्हा रात्रीचे दहा वाजत होते. तिला फोन केला तेव्हा तिच्या नवऱ्याने 'आजारी असल्यामुळे ती येणार नाही' असे सांगितले. आता झाली का पंचाईत. तितक्या रात्री दुसरी बाई कोण मिळणार?"
"मग?"
"लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी नवीन ब्युटीपार्लरचा शोध सुरू झाला. शेवटी एक बाई लग्नाला अर्धा तास उरलेला असताना आली. त्या बाईने मेकअपचा जो घाट घातला तो अखेर लग्नाचा मुहूर्त टळून गेल्यावर संपला. नियोजित वेळेच्या दोन तासानंतर वधू बोहल्यावर आली बघा."
"माय गॉड! काय हे वेड नि कसले आलेय हे फॅड!"
"इथे मात्र सारी आदर्शवत स्थिती आहे. वरात वेळेवर, मंगलाष्टके पाच आणि महत्त्वाचे म्हणजे वधूवराच्या मागे केवळ दोघांचे मामा आणि दोन करवल्या! फोटोग्राफरलाही बाजूला उभे राहून फोटो घ्यावे लागत आहेत."
"बरोबर बोललात. नाही तर आजकाल मंगलाष्टके म्हणताना स्वतःला किशोरकुमार, आशा भोसले समजून 'आ..' वासतात झाले. इकडे उपस्थितांवर आ वासण्याची वेळ येते. अपवाद सोडले तर ना ताल असतो ना सूर असतो. बरे, मंगलाष्टकेही तीच तीच!"
"अहो, परवा एका लग्नात चक्क पंधरा मंगलाष्टकं झाली हो. वीट आला त्या मंगलाष्टकांचा!"
"तीन दिवसांपूर्वी एक फार मजेशीर प्रसंग घडला हो. झाले काय तर त्यादिवशी लग्नाची तिथी फार मोठी. ते लग्न आटोपून अनेकांना दुसरे लग्न लावायला जायचे होते. सर्वांची अशी इच्छा होती की, पाच मंगलाष्टकं व्हावीत पण ऐकतोय कोण? व्यासपीठावर गायकांची झालेली गर्दी पाहून काही युवक स्टेजवर गेले. चौथे मंगलाष्टक संपताक्षणी त्या युवकांनी खड्या आवाजात शेवटचे मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली."
"व्वा रे शेर! मग?"
"मग काय? हातात कागद घेऊन मंगलाष्टके म्हणण्याच्या तयारीत असलेले आठ-दहा जण हिरमुसले चेहरे करून खाली उतरले."
गुरुजींनी पहिले मंगलाष्टक सुरू करण्यापूर्वी उपस्थितांना विचारले, "अक्षता सर्वांना मिळाल्या का? विवाहाची नियोजित वेळ अजून दोन मिनिटे दूर आहे म्हणून या अक्षताचे महत्त्व एका मिनिटात सांगतो. आपण विवाहप्रसंगी तांदळाच्या अक्षता वापरतो त्या यासाठी की, तांदळाचे बीज लावताना आपण प्रथम एका जागी लावतो. नंतर ते थोडे मोठे झाले की, मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतात. तसेच मुलींचे असते. मुलींचा जन्म, बालपण हे माहेरी जाते. विवाहोत्तर आयुष्य सासरी जाते. सासरी त्यांचा वंश वाढतो ही बाब लक्षात यावी म्हणून तांदळाच्या अक्षता वापरतात." असे सांगून गुरूजींनी पहिले मंगलाष्टक सुरू केले. नंतरची तीन मंगलाष्टकं गाण्यासाठी शहरातील नामांकित गायक-गायिकांचा संच आमंत्रित होता. त्यांनी सुरेल सुरात तीन मंगलाष्टके गाऊन उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले, सोहळा एका वेगळ्या उंचीवर नेला. त्या मंगलाष्टकांना धार्मिकतेसोबत सामाजिक जाणिवांचा स्पर्श होता त्यामुळे जमलेले सारे लोक जाम खुश झाले.
गुरूजींनी शेवटचे 'आता सावध सावधान...' हे मंगलाष्टक सुरू केले आणि वधू म्हणून उभी असलेल्या छायाचे डोळे पाणावले. अनेक वर्षे ती ज्या क्षणाची वाट पाहत होती. तो क्षण ती अत्यंत आनंदाने साजरा करायला सिद्ध झाली होती. मंगलाष्टक संपताच गुरूंच्या सूचनेप्रमाणे वधूवरांनी एकमेकांना आनंदाने, पवित्र भावनेने, मंगलमय वातावरणात हार घातले. तद्नंतर श्रीपाल-छाया बोहल्यावर ठेवलेल्या खुर्च्यांवर विराजमान झाले न झाले की, दयानंद आणि सरस्वती यांना अनेक हातांनी धरून जवळजवळ ओढतच खाली आणले. त्यांना धड खुर्च्यांवर बसू न देता आहेर करायला सुरुवात केली. आहेर घेणारे हे निश्चितच पती-पत्नी होते परंतु आहेर करणारे? गर्दीत कसे होते, लोटालोटी करताना आहेर करणारापैकी पती पुढे सरकतो, पत्नी मागे राहते. पतीला वाटते बायको सोबत आहे म्हणून तो आहेर घेणाऱ्या पुरुषांला कुंकू लावतो आणि शेजारी पाहतो तर दुसरीच कुणीतरी स्त्री समोरच्या बाईला कुंकू लावत असते...दुसरीकडे कार्यालयातील पांढऱ्या शुभ्र पडद्यावर विश्वचषकाच्या सामन्याचे बिगुल वाजले...
"हे काय? एवढी गडबड कशाला?" सरस्वती कुणाला तर दयानंद कुणाला विचारत होते.
"अहो, अजून एक लग्न आहे. तिकडे जायचे आहे." उत्तरही ठरलेले मिळत होते.
"जेऊन जा बरे." ते दोघे काकुळतीने विनवत होते.
"नक्की! जेऊनच जाणार." असे संवाद सुरू असताना कुणी दयानंदाला तर कुणी सरस्वतीला कुंकू लावत होते. कुणी टोपी घालत होते, कुणी पॉकेट देत होते. तर कुणी टॉवेल पांघरत होते. एखादी स्त्री साडी उकलून देत होती तर दुसरी स्त्री सरस्वतीचीओटी भरत होती. एक ना अनेक! वास्तविक आहेर पतीपत्नीने मिळून शांतपणे करायचा असतो. एक जोडी आहेर करून बाजूला झाल्यानंतर दुसऱ्या जोडीने आहेर करायचा असतो. परंतु तेवढाही संयम कुणाजवळ नसतो. एक माणूस टॉवेल पांघरत असताना कुंकू लावणारी स्त्री त्याची पत्नी असेलच असे नसते. साडी देणाऱ्या बाईशेजारी तिचा नवराच असेल असे कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. ज्या गृहस्थासोबत त्याची पत्नी आलेली नसते असा 'शेर' जिथून घुसता येईल, हात घालता येईल तिथून आहेराचे 'एवरेस्ट' सर करण्याची धडपड करतो. अशा ढकलाढकलीच्या प्रसंगी कुणाचे हात कुठेही रेंगाळतात. एखादी व्यक्ती स्वतःचा आहेर करून झाल्यावरही नकळत होणाऱ्या स्पर्शसुखासाठी रेंगाळते. पंचगिरी जोडपे आहेराच्या दलदलीत फसलेले असताना कुलकर्णी पती-पत्नी मात्र अतिशय समाधानाने सर्वत्र फिरत होते. प्रत्येकाची विचारपूस करीत होते. हास्यविनोदातही भाग घेत होते. तिकडे भोजनकक्षामध्ये तरी कुणी निश्चिंत होते का?शेवटचे मंगलाष्टक संपताच हातातल्या उरल्यासुरल्या अक्षता नवरानवरीच्या दिशेने फेकल्याबरोबर अनेक जणांनी भोजनकक्षाकडे धाव घेतली. हातात प्लेट घेऊन लोटालोटी करताना स्वतःसह हातातील प्लेट सांभाळताना तारेवरची कसरत करत भोजनाचा आस्वाद घेऊ लागले. बहुतांशी लोक उभ्यानेच जेवणावर आडवा हात मारत होते. काही चवीचे भोक्ते मात्र फरशीवर मांडा ठोकून जेवणावर तुटून पडत होते. अनेक महाभाग मात्र स्वतः खुर्चीवर बसूनही दुसऱ्या खुर्चीचा डायनिंग टेबलसारखा उपयोग करून जेवणावर ताव मारत होते. पंचगिरी स्वतः आहेराच्या चक्रव्युहात अडकल्यामुळे दामोदरपंत, आकाश, सुधाकर हे तिघे आलेले पाहुणे, मित्रमंडळी यांची चौकशी करत असताना कुलकर्णीही भोजनकक्षाकडे लक्ष ठेवून असतानाही तिथली परिस्थिती हाताबाहेर जात होती...
**