Nava Prayog - 3 in Marathi Children Stories by Sane Guruji books and stories PDF | नवा प्रयोग... - 3

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

नवा प्रयोग... - 3

नवा प्रयोग...

पांडुरंग सदाशिव साने

3. संपाची तयारी

“मग येणार ना रोज स्वच्छतासप्ताह पाळायला? आपण रोज सकाळी ६ ते ८ जाऊ. तुमच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही. २६ सप्टेंबरला आपण सुरू करू. २ ऑक्टोबरला समाप्त करू. गांधीसप्ताह स्वच्छतासप्ताहाच्या रूपाने आपण साजरा करू. याल ना सारे?” घनाने विद्यार्थ्यांना विचारले. ते विद्यार्थ्यां त्याच्या वर्गाला येत. तो त्यांना रविवारी दोन तास शिकवीत असे. कधी संस्कृत तर कधी इंग्रजी, कधी गणित तर कधी मराठी; असे विषय तो घेई. घना कोणताही विषय शिकवू शकत असे. विद्यार्थ्यांशी संबंध यावा आणि स्वत:चे ज्ञानही जिवंत राहावे म्हणून तो ते दोन तास देत असे. कधी कधी तो त्यांना इंग्रजी वर्तमानपत्रांतले चांगले लेख वाचून दाखवी. कधी त्यांना राजकारण समजावून देई. त्याचा रविवारचा तास म्हणजे मेजवानी असे.

किती तरी दिवसांपासून असा स्वच्छतासप्ताह पाळावा म्हणून त्याच्या मनात होते. सारा गाव या निमित्ताने झाडून स्वच्छ करायचा. त्यासाठी त्याने स्वच्छतेवरची गाणी केली होती. परंतु ते अजून जमले नव्हते. या वेळेस मात्र हे करायचे असे त्याने ठरवले. मुलांच्या उत्तराची तो वाट बघत होता.

“आम्ही येऊ. तुम्ही बरोबर असल्यावर आम्ही काय म्हणून येणार नाही?” एक मुलगा म्हणाला.

“मीही येईन.” एक मुलगी म्हणाली.

“तुम्ही मुलींनी तर आधी यायला हवे. स्वच्छता निर्माण करणे हा तर तुमचा जन्मसिद्ध हक्क. पुरुषांनी घाण करायची, स्त्रियांनी दूर करायची. नरकासुराला सत्यभामेने मारले. माहीत आहे?”

“आपण रोज कोठे जमायचे?”

“माझ्या खोलीजवळ या. म्हणजे सारे सामान घेऊन आपण जात जाऊ. फिनेलची बाटली, पावडर, डबे, पत्रे, झाडू, फावडी- सारे सामान बरोबर हवे ना?”

२६ सप्टेंबर आला; आणि उजाडत मुले आली, मुली आल्या. घनाने त्यांचे स्वागत केले. सामान घेऊन ती स्वच्छता तुकडी निघाली. शहराची सात दिवसांत वाटणी करण्यात आली. होती. आज सारा बाहेरपुरा स्वच्छ करायची होता. घनाने आपल्या हातात पत्र्याचे तुकडे घेतले होते. जेथे जेथे विष्ठा दिसे, तेथे तो जाई; वर माती टाकी नि खरवडून भरून घेई. मुलांमुलींनीही ती विद्या आत्मसात केली. सारे स्वच्छ होऊ लागले. घाण दिसताच मुलांना स्फूर्ती येई. ‘अरे ही बघ इकडे घाण. ही बघ-!” असे म्हणून त्या घाणीवर ती तुटून पडत. जणू शत्रूवर तुटून पडत आहोत असे त्यांना वाटे. आणि हेच आपले खरे शत्रू नव्हेत का? अज्ञान, अस्वच्छता, आळस, रूढी, नाना भेद, हेच आपले शत्रू आहेत. यांना दूर केल्याशिवाय कोठले स्वराज्य? यांना दूर न करता स्वराज्य आले तरी ते टिकणार नाही.

स्वच्छ करू स्वच्छ करू।
हा गाव आपुला स्वच्छ करू।।
निर्मळ करू या अपुला गाव।
दुर्गंधीला नुरवू ठाव।
स्वच्छ असे अपुला देव।
नवोपासना सुरू करू।।

अशी गाणी गात ते झाडू मारीत होते. कचरा भरीत होते. ते सारे मस्त झाले होते. सेवेचा एक थोर आनंद असतो. त्याची चटक लागली म्हणजे मग सुटत नाही.

“पुरे आता. आजचे काम संपले. नदीवर आंघोळीला येता का? गंमत होईल.” घनाने विचारले.

“नदीवरच जाऊ.” एकजण म्हणाला.

“परंतु कपडे कोठे आहेत बरोबर!” दुसरा म्हणाला.

“आपण नदीवर जाऊन हातपाय धुऊन येऊ. ही सारी स्वच्छतेची हत्यारे साफ करू.” घनाने सुचवले.

सारी मंडळी नदीवर गेली. ती आपोदेवता तेथे खळखळ वाहात होती. सकल धाण वाहून नेणारी ती लोकमाता या मुलांना बघून जणू गाणी गात उचंबळून त्यांचे स्वागत करीत होती.

पहिला दिवस पार पडला. आणि अशाच प्रकारे दिवस जाऊ लागले.

“तुम्ही रोज नवीन भाग दाखवता. हा काळुपुरा मी कधी पाहिला नव्हता.” एक विद्यार्थी म्हणाला.

“मी तुम्हांला या सुंदरपूरचा भूगोल शिकवीत आहे. या गावात कोठे काय आहे. गरीब लोक कोठे राहतात, त्यांची वस्ती कशी असते, त्यांचे उद्योग काय,---सारे कळेल. ज्या गावात आपण राहतो त्याची तरी पुरेशी माहिती आपणास कोठे असते? खरे ना?” घना म्हणाला.

त्या दिवशी काळुपुरा आरशासारखा स्वच्छ झाला. त्या ठिकाणी एक चाळ होती. मालकाने संडासाकडे कधी लक्ष दिले असेल तर शपथ! मो-या तुंबलेल्या, बुडून गेलेल्या. कोठे कोठे किडे वळवळत होते. वसकन घाण येई. लोक तेथे कसे बसत? घणीत हे लोक जगू कसे शकतात? जो घणीत जगू शकतो, राहू शकतो, तो का मनुष्य?

घना आणि ती सारी सेना यांनी ते संडास स्वच्छ केले. सर्वत्र फिनेल टाकले. चाळीच्या मालकाला कळले. तो तेथे टांग्यातून आला. तो शरमला.

“अहो घनाभाऊ, राहू द्या. तुम्ही कशाला करता हे काम?” तो म्हणाला.

“आम्ही हे काम स्वत:चा अहंकार जावा म्हणून करीत आहोत. भंगीबंधूंशी हृदय जोडले जावे म्हणून करीत आहोत. तुम्हांला हिणवण्यासाठी नाही. ही मुले महात्मा गांधीकी जय म्हणतात. परंतु महात्माजी तर म्हणतात की, जय माझ्या नावाचा नको; माझ्या शिकवणीचा जय असो! गांधीजयंती नका म्हणू, चरखा जयंती, रेंटियाबारस असे म्हणा. आम्हाला तुमच्या चाळीच्या संडासात भरपूर काम मिळाले. मुलांना आनंद झाला.” घना म्हणाला.

मुलां-मुलींनी ‘महात्मा गांधीकी जय’ घोषणा केली.

एके दिवशी स्वच्छतेचे काम चालले होते. घना ती घाण भरत होता. तो एकदम कोणी तरी वरून घाण पाणी टाकले. घनाच्या अंगावर पडले. तो भिजला. ते सारे खरकटे होते. आमटीचे पाणी!

“मी नवरदेव शोभतो.” तो म्हणाला.

“नवरी कोठे आहे?” एका मुलीने विचारले.

“स्वच्छता ही माझी नवरी. जन्मोजन्मी ही नवरी मिळो. वाजवा टाळ्या. लावा माझे लग्न. स्वच्छतेचा जयजयकार करा!” तो म्हणाला.

सेवेचे ते प्रात्यक्षिक होते. निरहंकारी होऊन काम करायचे असते. कोणावर रागावणार? कोणावर रुसणार? आपलेच ओठ. आपलेच दात!

तुका म्हणे एका देहाचे अवयव।

आपण सारे एकच आहोत. एकच आत्मा सर्वत्र भरून राहिला आहे, ही जाणीव ज्याला झाली-त्याला क्रोध कसा येईल?

आज शेवटचा दिवस. कामगारांच्या चाळीतून आज स्वच्छता करण्यात आली. येथील लोकांनी सहकार्य केले. घनाने दोन शब्द सांगितले. त्याने मुलामुलींना धन्यवाद दिले.

“आता पुन्हा कोणता सप्ताह पाळायचा?” मुलांनी विचारले.

“आपण साक्षरतासप्ताह पाळू. सर्वांना का शिकावे ते दाखविणारी ३० चित्रे एका मित्राने तयार केली आहेत. बडोद्यास आहे तो मित्र. तो ती पाठवणार आहे. आपण सकाळी गावातून साक्षरतेची गाणी गात फेरी काढू सात दिवस, आणि प्रदर्शनात येणा-या प्रेक्षकांची चित्रे समजावून देऊ.

“कधी घ्यायचा हा सप्ताह?”

“दिवाळीच्या सुट्टीत.”

त्याप्रमाणे ठरले.

मुले दिवाळीच्या सुट्टीची वाट पाहात होती. बडोद्याहून ती चित्रे आली. नगरमंदिराची जागा घेऊन तेथे प्रदर्शन मांडण्याचे ठरले. नागेश, रमेश, उज्ज्वल, भुला – वगैरे बालचित्रकार तेथे सजावटीला धावले. ती चित्रे नीट मांडण्यात आली. पताका, तोरणे, तिरंगी झेंडे यांची शोभा होती. ठायी ठायी ब्रीदवाक्ये होती. राष्ट्रपुरुषांची चित्रे काढली. सर्वांना काही तरी करावे असे वाटत होते. घनाने साक्षरतेची गाणी केली. सुटसुटीत म्हणण्यासारखी ब्रीदवाक्ये त्याने दिली.

“शिका शिका। स्पर्धेमध्ये तुम्ही टिका.”
“मिळवा ज्ञान। नुरेच मग ती कसली वाण.”

अशी वाक्ये किती तरी त्याने करून दिली. साक्षरतेचे महत्त्व सांगणारे फलक मिरवणुकीमध्ये असत. रोज सकाळी ज्ञानाची रुची जनतेत निर्मिण्यासाठी ते फेरी काढीत. गावात चैतन्य आले.

आणि तिसरे प्रहरी प्रदर्शन पाहायला तोबा गर्दी होई. म्हाता-या मायबहिणी येत. स्वयंसेवक चित्रे समजावून देत.

ती पहा एक म्हातारी. घना चित्राचा अर्थ समजावून देत आहे :

त्या चित्रात चार भाग आहेत. या इकडच्या चित्रात हा शेठजी लोडाजवळ दाखवण्यात आला आहे. नोकर त्याला वारा घालीत आहे. जवळ फळफळाव आहे. चैन आहे त्याची. आणि या दुस-या कोप-यात हा कामगार आहे. तो क्षयी झाला आहे. माशा भणभण करीत आहेत. घरात अंधार नि ओल. ना पोटभर खायला, ना नीट हवा, ना नीट उजेड. आणि हे खाली तिसरे चित्र. त्याला एक ज्योतिषी सांगतो, तुला शनीची पीडा आहे. दानधर्म कर, शनिवारी उपवास कर. बिचारा कोठून करील दानधर्म? आणि उपवास तर रोज घडत आहे! या चौथ्या कोप-यात हा सेवा दलाचा सैनिक आहे. हा सांगत आहे की शनी, मंगळ यांची नसते पीडा. ते आकाशातील ग्रह कशाला येतील छळायला? या मालकाने अधिक मजुरी दिली असती, रहायला नीट चाळी बांधल्या असत्या, आजारात पगारी रजा असती, तर हा कामगार आजारी पडता का! आकाशातील शनी छळतो की पृथ्वावरचा हा भांडवलशाहीचा शनी छळतो? कोणता शनी?”

ती म्हातारी शेतकरीण ऐकत हेती. तिच्. सुरकुतलेल्या चेह-यावर क्षणभर प्रकाश फुलला.

या शेठजीच्या चित्राकडे बोट करून ती म्हणाली, “हाच शनी आहे. हाच शनी आहे.”

“परंतु हा शनी कसा फसवतो ते कळले पाहिजे. अडाण्याला सारे लुटतात. सारे फसवतात. खरे ना आजीबाई?”

“मी सुद्धा शिकायला येईन.” ती म्हातारी म्हणाली.

प्रदर्शन फारच यशस्वी झाले. गावात शिकण्याची एक लाट आली. प्रत्येक आळीत साक्षरतेचा वर्ग सुरू झाला. स्वयंसेवक मिळाले. काही शिक्षकांनीही हे काम अंगावर घेतले.

पुस्तके व इतर सामान यासाठी पैसे हवेत. सर्वांनी एक नाटक करायचे ठरविले. घनाने एक सुंदर नाटक लिहिले. अजून सुट्टी होती. नाटकाची तालीम सुरू झाली. घनाही काम करणार होता. गोपाळ व मोती यांचे काम उत्कृष्ट होई. नाटक करण्याचा दिवस ठरला. तिकिटविक्री जोरदार झाली. प्रयोग अपूर्व झाला. गोपाळच्या गाण्यांना वन्समोर मिळाला. साक्षरतेच्या कामाला पैसे मिळाले. घनाने मध्यंतरात सर्वांचे आभार मानले. प्रक्षकांनी देणग्या दिल्या. गोपाळ व मोती यांना कोणी बक्षिसे दिली.

“ही बक्षिसे आम्हांला नकोत. ती साक्षरतेच्या कामी उपयोगी पडतील.” ते तरुण म्हणाले.

अशा प्रकारे सुंदरपुरात सेवेचे सौंदर्य येत होते. स्वच्छता, ज्ञान, सहकार्य, यांचा प्रकाश येत होता. मुलामुलींना बरोबर घेऊन घना ही कामे करी परंतु त्याचा बराचसा वेळ कामगारांच्या संघटनेत जाई. युनियनचे आता बरेच सभासद झाले होते. कामगारांत नवा प्राण आला होता. मधून मधून घना सभा घेई. बाहेरचे व्याख्याते बोलवी. काही हुषार कामगारांचे अभ्यासवर्ग तो घेई. कामगार-चळवळी निरनिराळ्या देशांत कशा झाल्या, ते तो समजावून सांगे. त्याने त्यांच्यासाठी वाचनालय सुरू केले होते. थोडीफार पुस्तकेही तेथे होती.

त्या दिवशी घना नि काही कामगार-कार्यकर्ते बोलत हेते.

“आपण नुसत्या चर्चा किती दिवस करणार? आता प्रत्यक्ष पाऊल टाकण्याची वेळ नाही का आली? कामगारांची येथील मजुरी किती कमी आहे. इतर ठिकाणी पगारवाढ झाली. येथे कशाला पत्ता नाही. येथील बातमीही कुठल्या वर्तमानपत्रात येत नाही. वर्तमानपत्रांत येईल असा आवाज आपण उठवला पाहिजे.” गंभीर म्हणाला.

“विचार करुनच पाऊल टाकायला हवे. उठलेला आवाज पुन्हा बंद नाही पडता कामा.” पंढरी म्हणाला.

“ब्रिजलाल, तुझे काय म्हणणे?” घनाने विचारले.

“आपल्या मागण्या निश्चित करू या. त्या मालकाकडे पाठवून त्यांना मुदत द्यावी. मालक काहीच करायला तयार न झाला तर संप करावा. संपाच्या आगीतून जायलाच हवे. टक्केटोणपे खाल्ल्याशिवाय प्रगती होणार नाही.” ब्रिजलाल शांतपणे म्हणाला.

“कुछ ना कुछ करना चाहिये. खालीपिली फजूल बाते करणेकसे कुछ नही होता. झंडा उठाकर आगे बढना यही हमारा फर्ज है. चूप बैठना आदमीके लिये अच्छा नहीं.” कुतुब म्हणाला.

“तुमचे काय मत घनाभाऊ? तुम्ही काहीच बोलत नाही.” अर्जुन म्हणाला.

“मी काय बोलू? परंतु एकदा शेठजींना भेटणार आहे. त्यांच्याजवळ बोलणार आहे. संप पुकारणे सोपे, परंतु यशस्वी करणे कठीण. आपल्याकडे बेकारी फार. कामावरून एक दूर झाला तर हजारो त्या जागेसाठी येतील. मालकांचे हस्तक गावोगाव हिंडून कामगारभरती करतील. आपणास सारे शांततेने करायचे. जोवर मी येथे आहे तोवर मी वेडेवाकडे काही एक होऊ देणार नाही. तुम्ही दगडधोंडे मारू लागलेत तर आधी माझे डोके पुढे करीन. परंतु मला तशी भिती नाही. सुंदरपुरचे वातावरण सुंदर आहे. मालक काय म्हणतात, त्यावर पुढचे पाऊल अवलंबून. तुम्ही आपल्या युनियनचे आधी भरपूर सभासद तरी करा. साधी साधी कामेही आपण आधी मनापासून करीत नाही. एकदम क्रांतीच्या चर्चा! मला मूठभर लोकांची क्रांती नको आहे. लाखो लोक जागृत होऊन जेव्हा उभे राहतात तेव्हा एक निराळीच क्रांती होते.” घना म्हणाला.

ते सारे मित्र निघून गेले. घना एकटाच मनाशी विचार करीत बसला. संपासंबंधीचा तो विचार करीत होता. स्वत:ला अटक झाली तर पुढे कसे होणार? सखाराम येईल का? येथील कामगार मायबहिणींत काम करायला मालती नाही का येणार? इत्यादी विचार त्याच्या मनात येत होते. मुख्य गोष्ट ही होती की, संप पुकारावा लागलाच तर खेड्यापाड्यांतून नवीन कामगारांनी येऊ नये, यासाठी प्रचार करणे अवश्य होते. एक मोटार घेऊन सर्वत्र हिंडावे असे त्याच्या मनात आले. प्रचारार्थ गाणी वगैरे करायला हवीत. तो मनात योजना आखू लागाला.

आणि ते नाटक? तो नाटक लिहीत होता. ‘खरी संस्कृती’ हे त्या नाटकाचे नाव होते. त्या नाटकात त्याने आपली नवीन दृष्टी मांडली होती. संप वगैरे सुरू होण्यापूर्वी ते नाटक तो पुरे करू इच्छीत होता. एका साहित्याप्रेमी संस्थेने उत्कृष्ट नाटके बक्षिसार्थ मागवली होती. सर्वोत्तम ठरणा-या नाटकाला पाच हजारांचे बक्षीस मिळायचे होते. घना बक्षिसार्थ भुकेला नव्हता, परंतु बक्षीस मिळले तर आपल्या कामाला मदत होईल. असे त्याच्या मनात येई.

बाहेर बरीच रात्र झाली आहे. घना लिहित बसला आहे. त्याला कशाचे भय नाही. त्या नाटकातील उत्कृष्ट भाग तो लिहीत होता. क्षणभर तो डोळे मिटून बसला. जणू ते सारे दृष्य अंतश्चक्षूंसमोर त्याने पाहिले. डोळे उघडून तो पुन्हा लिहू लागणार तो एकदम त्याला काहीतरी दिसले. काय होते ते? केवढा थोरला काळाभोर विंचू! आकडा उभारून तो आला होता. घनाच्या वहीवर होता. घना पटकन् बाजूला झाला. परंतु त्या विंचवाला मारावे असे त्याला वाटले नाही. कोठून आला हा विंचू? त्या नाटकातील प्रसंगात तो प्रेमाचा एक संवाद लिहीत होता. प्रेमाच्या किरणात सारे सुंदर दिसते. काळ्या ढगांवर सूर्याचे किरण पसरले तर ते काळे ढगही किती सुंदर दिसू लागतात. असे तो लिहीत होता. त्याच्या प्रेमाची परीक्षा पहायला का तो विंचू आला होता? त्याने चिमटा आणला आणि त्या विंचवाला पकडले. त्याला बाहेर टाकले.

तो पुन्हा खोलीत आला; लिहिणे थांबले, परंतु त्याला विचार सुचले. या विंचवाची नांगी तोडून टाकली असती तर तो निर्विष विंचू निरुपद्रवी झाला असता. भांडवलदारांच्या हातातील सांपत्तिक सत्ता काढून घेतली तर ते असेच निरुपद्रवी होतील. सापाचे विषारी दात पाडल्यावर साप खुशाल खेळत राहिला म्हणून काय बिघडले? भांडवलदारांना गोळ्याच घातल्या पाहिजेत असे नाही. परंतु त्याच्या हातची सत्ता कोण काढून घेणार? जनतेचे प्रभावी सरकार आले तर तोच हे काम करू शकेल. परंतु अजून स्वराज्यही दूर होते. एकदा परसत्ता गेली म्हणजे पुढे या गोष्टी.

घनाने लिहिणे थांबवले. तो अंथरुणावर पडला. त्याला पटकन झोपही लागली.

आणि झोपेत मनोहर स्वप्न!

तो विंचू झोपेत त्याच्याजवळ बोलत होता : “मी तुझ्यासाठी काय करू? तू मला प्रेम दिलेस; मी तुला काय देऊ? आम्ही विंचूही कृतज्ञ असतो. माणूस एकवेळ कृतज्ञ राहणार नाही, परंतु आम्ही मानवेतर प्राणी उपकार स्मरतो.” असे तो विंचू बोलत होता.

तो विंचूवाला म्हणतो, “बोल, आणखी बोल.”

“काय बोलू? अरे, तुम्ही मानव आम्हांला विषारी विषारी म्हणता, परंतु तुम्ही नाही का विषारी? सारखे तर एकमेकांविरुद्ध फूत्कार सोडीत असता. आमच्याजवळ ही एक लहानशी नांगी, परंतु तुमच्याजवळ शेकडो नांग्या! तुम्ही एकमेकांचा किती हेवादावा करता? साप-विंचू यांच्या दंशामुळे माणसे मरतात, त्याच्या किती पट दुष्काळात मरतात; युद्धात मरतात, खायला नाही म्हणून क्षयी होऊन मरतात. सर्वांत विषारी प्राणी कोण असेल तर तो मानव! तुम्ही स्वत:ला आधी सुधरा. मी अजून विषारी आहे. याला चावा घेतो, त्याला डसतो. याच्यावर टीका करतो, त्याच्यावर सूड धरतो, मला आधी निर्विष होऊ दे — असे येते का तुम्हा मानवांच्या मनांत?” तो विंचू बोलत होता.

ते बोलणे केव्हा बंद पडले कोणास कळे.

एकदम घाबरून घना उठला. त्याला वाटले की विंचू त्याच्याजवळ आहे. त्याने दिवा लागवा. त्याने सर्वत्र पाहिले, ना विंचू, ना काही, परंतु स्वप्नातील ते वृश्चिकोपनिषद त्याला आठवत होते; मनाच्या शक्तीची त्याला गंमत वाटली.

घना व इतर कामगारमित्र रोज सायंकाळी गिरणी सुटल्यावर मोटार घेऊन खेड्यापाड्यांतून प्रचारार्थ हिंडू लागले. घना सारे समजावून देई. गंभीर, कुतुब हे गाणी म्हणत. ब्रिजलालही बोले.

एका गावात सभेत प्रश्नोत्तरे झाली. कोणी तरी पेन्शनर गृहस्थ त्या गावात राहत होते. ते मोठे धार्मिक नि कर्मठ. सभेत उठून ते म्हणाले, “मी काही प्रश्न विचारू का हो?”

“विचारा.” घना म्हणाला.

लोकांना कुतूहल वाटले. ते करारी मुद्रेचे वृद्ध गृहस्थ उभे राहिले. त्यांच्या कानांत रुद्राक्षे होती. डोक्याला पांढरा फेटा होता. अंगावर उपरणे होते. ते प्रश्न करू लागले.

“तुम्ही जगाची सेवा करायला; परंतु काही धर्म आहे का जवळ? सकाळी स्नान तरी तरी करता का? केस वाढवणे, विडी-सिगारेट फुंकणे, वाटेल ते खाणे, हा तुमचा धर्म! कसे व्हायचे तुमच्या हातून कार्य? तुम्ही समाजवादी की कम्युनिस्ट? धर्माला अफू म्हणणारे तुम्हीच ना? भांडवलदारांना तुम्ही शिव्या देता. ते गरिबांची पिळवणूक करतात वगैरे तुम्ही म्हणता. परंतु आमच्या धर्माची टिंगल करून आमची मने नाही का तुम्ही दुखवीत? भांडवलदार म्हणजे गुंड. त्यांच्यामुळे समाजात अशांती येते असे तुम्ही म्टलेत. तुम्ही नाही का गुंड? तुमच्या बडबडीनेही समाजात अशांती नाही का येत? समाजाच्या शांतीला तुम्ही बाधक आहात. धर्मावर टीका करणा-यास तुरुंगातच टाकले पाहिजे. मी अधिकारी असतो तर तुमची ही बडबड कधीच बंद केली असती. म्हणे धर्म म्हणजे अफू!”

“अहो, बसा, पुरे करा. तुम्ही किती कोणाच्या उपयोगी पडता?” असे श्रोत्यांतून कोणी विचारू लागले.

घनाने सर्वांना शांत केले. त्याने एक लहानसे गाणे म्हटले—

खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे...
जगी जे हीन अतिपतित
जगी जे दीन पददलित
तयां जाऊन सुखवावे!
जयाला धर्म तो प्यारा
जयाला देव तो प्यारा
तयाने प्रेममय व्हावे
जगाला प्रेम अर्पावे—

मग तो म्हणाला, “अशा प्रकारचा धर्म असेल तर त्यावर कोण टीका करील? परंतु धर्म धर्म म्हणणारे समाजातील अन्याय दूर करायला कधी पुढे येत नाहीत. आम्ही कदाचित अंघोळ करत नसू. कदाचित सिगारेट ओढत असू. परंतु आम्ही दुस-याचा संसार सुखाचा व्हावा म्हणून प्राण फेकायला तयार असतो. दुस-यासाठी काही न करणारा, परंतु आंघोळ करणारा तो धार्मिक, की आंघोळ लवकर न करणारा, परंतु परार्थ प्राणार्पण करणारा अधिक धार्मिक? त्या धर्माला आम्ही अफू म्हणतो की जो अन्याय सहन करायला शिकवतो; समाजातील विषमता मंगळ-शनीवर ढकलतो. कामगार आजारी पडून क्षयाने मेला तर त्याला का आकाशातील शनीची साडेसाती होती? मालकाने पगारी रजा दिली असती, नीट पुरेशी मजुरी दिली असती तर तो कामगार मरता का? मालक तिकडे कामगारांच्या घामातून पैदा होणा-या संपत्तीतून मंदिरे बांधतो. त्यांवर सोन्याचे कळस चढवतो. देवाच्या मूर्तीला लाखो रुपयांचे दागिने करतो; परंतु इकडे कामगार, त्याच्या बायका, त्याची ती मुलेही उपाशी मरत असतात! या दरिद्रीनारायणांची सेवा म्हणजे का धर्म नाही? तिकडे मंदिर बांधण्याऐवजी इकडे घरे बांधून दिलीत तर का ते धर्म कर्म होणार नाही? गाढवालाही पाजलेली गंगा जर प्रभूला पोचते तर ता श्रमजीवी मानवांची केलेली सेवा का देवाला नाही पोचणार? आम्हांला टिळेमाळांचे धर्म नको आहेत. शनी-मंगळचे रडके धर्म नको आहेत. तू गरीब का, तर तुझे प्राक्तन! असे शिकवणारे धर्म नको आहेत. मी श्रमतो. मी का उपाशी? श्रमणा-यांची प्रतिष्ठा स्थापणे हा धर्म. वेदात म्हटले आहे:

न ऋते श्रान्तस्य सख्याय देवा:।

जो दमलेला नाही त्याची मैत्री देवदेखील इच्छित नाही. लफंग्या धर्मांवर आम्ही टीका करतो. समाजातील विषमता बघून ती दूर करण्यासाठी न उठता जेठे मारून खाल्ल्या पोटी चर्चा करणारे धर्ममार्तंड ते का धार्मिक? तुकाराम महाराज म्हणतात :

तुका म्हणे व्हावी प्राणांसवे ताटी।
नाही तरी गोष्टी बोलू नये

धर्म म्हणजे परम ध्येयासाठी स्वत:च्या प्राणांची ताटातूट करण्यासही तयार असणे. धर्म म्हणजे सर्वांच्या धारणेचा विचार. तो खरा धर्म. तो मानवतेचा धर्म आमच्याजवळ आहे. बाकीच्या धर्मांचा काय उपयोग? तुमची गीता म्हणते—

सोडूनि सगळे धर्म एका शरण ये मज।

गीता ज्या सर्व धर्मांना सोडायला सांगते ते कोणते धर्म? मी मोठा, मी उच्च कुळातला, माझीच जात श्रेष्ठ, माझाच धर्म श्रेष्ठ, माझेच राष्ट्र श्रेष्ठ—असले सतराशे अहंकारी धर्म गीता फेकायला सांगते. सर्व कर्माला एकच कसोटी भगवान गोपालकृष्ण लावायला सांगतात. मी करीत आहे ते देवाला आवडेल का, ही ती कसोटी. ही कसोटी लावून कर्मे तपासा. गरिबांसाठी घरे नसताना मंदिरे बांधणे देवाला आवडेल का? जीवंत माणसात का परमात्मा नाही? तो का केवळ पाषाणात आहे? आईच्या लेकरांना उपाशी ठेवून आईला पंचपक्वान्ने वाढाल तर ते आईला आवडेल का? त्याप्रमाणे देवाची कोट्यावधी लेकरे अन्नहीन, वस्त्रहीन, गृहहीन, ज्ञानविज्ञानहीन, सुखहीन, आनंदहीन, विश्रांतीहीन अशी ठेवाल व देवाला मात्र हार-तुरे वहात बसाल, त्याला हिरामोत्यांनी नटवीत बसाल, तर ते त्या जगन्मातेला आवडेल का? आम्ही ख-या धर्माचे उपासक आहोत. प्रभूच्या समोर सरळ मान ठेवून आम्ही उभे राहू शकू.”

घना जणू सारे अंतरंग ओतीत होता. त्याचा समाजवाद मानवी मूल्यांची पूजा करणारा होता. “ज्या समाजात मानवाची मान खाली आहे तेथे कोठला धर्म, कोठली संस्कृती? दुस-याचा विचार करायला हृदयाला शिकवणे यात धर्माचा आरंभ आहे. ही वृत्ती वाढून संत वसुधैवकुटुंबक होतात. ते खरे मानवाचे कैवारी. ग्यानबा तुकाराम असाच आवाज सर्वत्र घुमतो. कारण ज्ञानेश्वर व तुकाराम यांनी सर्व प्राणीमात्र सुखी व्हावेत असे इच्छिले. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ ही ज्ञानेश्वरांची थोर इच्छा.”

घना म्हणाला, “ज्ञानेश्वरांचे ते स्वप्न सत्यसृष्टीत येण्यासाठी आम्ही धडपडत आहोत. समाजवाद म्हणजे प्रत्यक्षात आलेला वेदान्त. आम्ही मारून मुटकून काही करू इच्छित नाही. लोकांत प्रचार करून त्यांना पटवून सारे काही करू इच्छितो. हाच माझा वैदिक धर्म. वेद म्हणजे ज्ञान. ज्ञानावर, विचारावर श्रद्धा ठेवून आम्ही जातो. माझेच म्हणणे मान्य कर, नाही तर उडवतो मुंडके, अशी दहशतवादी अत्याचारी हुकूमशाही वृत्ती आमची नाही.या देशातील परसत्ता गेल्यावर कधी काळी आम्ही समाजवाद आणलाच तर तो जनतेला पटवून आणू. आम्ही मानवी प्राण पवित्र मानतो. सारे जीवन पवित्र मानतो. तुम्ही धर्म धर्म म्हणणारेच मानवी जीवनाची विटंबना करीत असता. कोट्यावधी हरिजनांना दूर ठेवलेत. हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवीत असता. धर्मांना देणग्या देणारे इकडे कामगारांच्या जीवनाकडे ढुंकूनही बघत नाहीत. हा का धर्म? ही का संस्कृती? ही का मानवता? हे का जीवनाचे, जीवमात्राविषयीचे प्रेम?”

घनाचे भाषण सारी जनता ऐकत होती. प्रचंडच होती ती सभा. ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या ओव्या, अभंग घेऊन तो सांगत होता. त्यांना ते समजत होते. त्यांना ते अनोळखी विदेशी भारूड नाही वाटले; आणि “सुंदरपूरला संप झाला तर तुम्ही कामगारांना सहानुभूती दाखवणार की नाही? आपल्या भावाच्या तोंडातील भाकर काढून घेण्यासाठी तुम्ही नाही ना गिरणीत भरती होणार? बोला. कामगारांबद्दल सहानुभूती असेल तर हात वर करा.” असे त्याने म्हणताच हजारो हात वर झाले. शेकडो मायभगिनींनी हात वर केले.

घनाला आनंद झाला. राष्ट्रगीत होऊन सभा संपली. लोक घरोघर गेले, गावोगाव गेले. घनाची मोटार दुस-या गावाला गेली. असा प्रचार झाला.

त्या दिवशी सुंदरपूरला प्रचंड सभा झाली. आधी गावभर पलित्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. घोषणा होत होत्या. जयजयकार होत होते. ‘पगारवाढ ताबडतोब!’ हा आवाज सर्वत्र घुमत होता. प्रचारामुळे सभेला तुफान गर्दी झाली होती. वातावरण प्रक्षुब्ध होते. हे जागृत कामगार काय करतील कोणाला ठाऊक, असे सर्वांना वाटत होते. परंतु सर्वत्र शांती होती. आज सभेत पंढरीने एक सुंदर गाणे म्हटले:

समाजवादी आम्ही आहो वैषम्याचे वैरी
वैषम्याचे जहर झोंबतो अमुच्या या जिव्हारी
मानव्याचे अम्ही पुजारी मानवतेचे भक्त
मानवतेच्या महिम्यासाठी सांडू अपुले रक्त
धनधान्याचा कोण विधाता कोण तयांचा स्वामी
श्रमणा-यांचा आधी त्यावर हक्क, गर्जतो आम्ही
खरा धर्म हा, खरा न्याय हा, यास्तव आम्ही लढतो
यास्तव आम्ही लढता लढता प्राणहि अपुले देतो
सकळांचे संसार सुखाचे करणे, अमुचा धर्म
या धर्मास्तव निशिदिनि अमुचे चाले संतत कर्म
श्रमणा-यांना सुखी कराया अमुचे हे उद्योग
गीतेमधला आचरीतसो उदात्त गंभिर योग
भारतात या मोकळेपणे समाजवादी रचना
आज ना उद्या आणुच ऐशा मनी पूजितो स्वप्ना
या बंधूंनो, या भगिनांनो, करावया सहकार
उदात्त ध्येया, उदात्त धर्मा, करावया साकार
जीवनास या जाचक बोचक तोडु बंधने सारी
सौख्याचे माहेर करू ही भारतभूमी प्यारी
समाजवादी आम्ही आहो वैषम्याचे वैरी
वैषम्याचे जहर झोंबतो अमुच्या या जिव्हारी

असे गाणे झाले. काही कामगार-कार्यकर्त्यांची भाषणे झाली. कामगार भगिनी पार्वतीही काबुली फुटाण्याप्रमाणे बोलली. ती म्हणाली, “मरमर आम्ही मरतो, परंतु अंगावर या चिंध्या! लाखो वार कापड तेथे तयार होतो; परंतु आम्ही उघडी. सारा पापाचा बाजार. सुंदरदास पापाचा धनी आहे. तिकडे देवळे बांधतो; इकडे आम्हांला ठार करतो. हा कुठला दुनियेवेगळा धर्म? हा राक्षसांचा धर्म आहे. आपण संप करू, उपाशी राहू; परंतु हा अन्याय नाही सहन करायचा. सगळ्या गावाने आम्हांला पाठिंबा दिला पाहिजे. माझ्याजवळ द्यायला काय आहे? परंतु संपफंड सुरू केलात तर माझ्या बोटातील ही मुदी देईन. ही मुदी त्यांची आठवण! याच गिरणीत ते काम करीत होते. क्षयी होऊन मेले. परंतु मालकाने पोराबाळांना काही दिले का? ही मुदी उराशी बाळगून आहे, तीही मी देईन.”

टाळ्यांचा कडकडाट झाला.

आणि घनाने समारोप केला. तो म्हणाला, “मी सुंदरदासांची भेट घेणार आहे. पगारवाढ, कामगारांकडून पूर्वी रुपयामागे पैसा घेतलेली दहा वर्षांतील रक्कम परत मिळणे, अशा मागण्या मी करणार आहे. इतरही किरकोळ गोष्टी आहेत. परंतु या वस्तू मुख्य. मालक तयार होईल असे वाटत नाही. आपण संप करायचा ठरविले तर सर्वांना एकजुटीने वागले पाहिजे. एकदा संप पुकारल्यावर मी तुम्हांला मागे जाऊ देणार नाही. संपकाळात मदत म्हणून तुम्ही येत्या पगारास फंड द्या. तसेच एखादा उद्योग शिकून ठेवा. आपण रिकामे नाही बसता कामा. काही मिळवू तरच संप लढवू शकू. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची : सर्वांना शांतता राखायची. नागरिकांनी या न्याय्य लढ्यात सहकार्य द्यावे. आलीच आणीबाणीची वेळ तर आम्हांला मदत द्या. तुम्हा सर्वांचा संसार शेतकरी व कामगार यांच्यावर अवलंबून. कामगार गिरणीत न खपेल तर तुम्ही उघडे रहाल. तुमच्या अंगावर कपडे असतात. तुम्हाला अंथरुण, पाघरुण मिळते ते सारे कोठून येते? ती वस्त्रे, त्या चादरी, तुमच्याजवळ शेकडो जिभांनी बोलतील की आम्ही घामातून निर्माण झालो. श्रमणा-याच्या घामातून आमचा जन्म. परंतु तो श्रमणारा आज उघडा पडला आहे. जनतेजवळ कृतज्ञता असेल तर ते कामगारांची बाजू उचलून धरतील. कामगार सुखी तर जग सुखी, हे ध्यानात धरा.”

सभा मोठ्या उत्साहात संपली. सर्व गावात चर्चेचा एकच विषय होता संप होणार का?

***