Nava Prayog - 1 in Marathi Children Stories by Sane Guruji books and stories PDF | नवा प्रयोग... - 1

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

नवा प्रयोग... - 1

नवा प्रयोग...

पांडुरंग सदाशिव साने

१. जा, घना जा !

भग भग करीत आगगाडी स्टेशनात आली. सुंदरपूरचे स्टेशन तसे फार मोठे नव्हते. परंतु स्टेशनात नेहमी गर्दी असायची. आज पुन्हा तिकडे दसगावचा आठवड्याचा बाजार होता. याच गाडीने लहानमोठे व्यापारी दसगावला जायचे. इतरही माणसे जायची. म्हणून स्टेशनात आज रोजच्यापेक्षा अधिक गर्दी होती. केळी, संत्री, चिवडा वगैरे विकणा-यांची गर्दी होती. वर्तमानपत्रे, मासिके, वगैरे विकणारेही दिसत होते. चहाच्या दुकानाजवळ पुष्कळ मंडळी होती. गाडी येताच धावपळ सुरु झाली. चहा हिंदू, चहा मुसलमान, वगैरे आवाज कानावर येऊ लागले. हमाल मजुरी शोधू लागले. कोणाचे सामान आहे का बघत होते. स्टेशनच्या बाहेरुन टांगेवाले स्वारी आहे का, स्वारी आहे का, - विचारीत होते.

अशा त्या गर्दीत ती पाहा एक विचित्र व्यक्ती दिसत आहे. आगगाडीतूनच ती उतरली. नेसू एक खादीचा पंचा नि अंगात खादीची कोपरी. डोक्यावर टोपी नव्हती. हातात एक पिशवी होती. खांद्यावर घोंगडी होती. उंच सडपातळ व्यक्ती, डोळ्यांना चष्मा होता. तोंडावर एक प्रकारची उत्कटता आहे. ओठांवर मंदस्मित आहे. त्या गर्दीत ती तरुण मूर्ती उभी राहिली. चोहो बाजूंना तिने पाहिले, नंतर गर्दीतून वाट काढीत ती तिकिट देण्याच्या फाटकाजवळ आली. तिकिट देऊन ती बाहेर आली.

“स्वामी, टांगा पाहिजे का, स्वामी?”

“अहो महाराज, कोठे जायचे? संस्कृतीत जायचे का?”

“या, इकडे या. मठात जायचे का महाराज?” टांगेवाले तरुणाभोवती गर्दी करु लागले.

“मला टांगा नको.” तो तरुण म्हणाला. थोडा वेळ सारे शांत झाल्यावर त्याने तेथील गृहस्थाला विचारले, “भारतीय संस्कृती मंदिर येथे कोठेसे आहे?”

“या बाजूने जा. नंतर डाव्या बाजूने वळा. पुढे नदी आहे. नदीकाठीच ती इमारत आहे. दिसेलच तुम्हाला. तुम्हाला आगगाडीतून दिसली नाही संस्था?”

“गाडीत अतोनात गर्दी. कसा तरी उभा होतो. अच्छा, नमस्ते.” असे म्हणून तो तरुण झपाट्याने पावले टाकीत निघून गेला.

ती पहा नदी आणि तिच्या तीरावर ते भारतीय संस्कृती मंदिर.

तो तरुण संस्थेच्या फाटकाजवळ आला. बाहेर मोठी पाटी होती. तो तरुण आत शिरला. आत शिरताच सुंदर फुलबाग होती. दोन्ही बाजूंना कारंजी होती. मधून उंच झाडे होती. तो तरुण पुढे गेला, एका बाजूला त्याला ‘व्यवस्थापकांची कचेरी’ अशी पाटी दिसली. तो तेथे गेला. कचेरीत एक गृहस्थ होते; तेच व्यवस्थापक असावेत.

“नमस्ते.” तो तरुण म्हणाला.

“नमस्ते, बसा.” ते व्यवस्थापक म्हणाले.

“मी आलो आहे. आपल्या संस्थेत मी अर्ज केला होता. मला सर्व संस्कृतींचा अभ्यास करायचा आहे. घ्याल का संस्थेत, म्हणून विचारले होते. येथून होकारार्थी उत्तर आले होते. हे पहा तेथले पत्र.” असे म्हणून संस्थेचे पत्र त्याने दाखविले.

“आपणच का सखाराम?”

“हो, मीच.”

“ठीक. तुम्हाला महिना ३० रुपये मिळतील. येथे अभ्यास करा, वाचा; केवळ जगण्यापुरती शिष्यवृत्ती तुम्हाला देण्यात येईल.”

“मला अधिकाची जरूर नाही.”

“चला तुमची खोली तुम्हाला दाखवतो.”

सखारामला त्याची खोली दाखवण्यात आली.

ते व्यवस्थापक निघून गेले. संस्थेतील काही विद्यार्थी, काही प्राध्यापक त्याच्याभोवती जमले. थोडेफार बोलणे झाले.

“येथे क्लब आहे, त्याच्यात जेवायला या. आणि माझी बादली घ्या. तिकडे हौद आहे. तेथे अंघोळीची व्यवस्था आहे.” एक तरुण म्हणाला.

“तुमचे नाव काय?” सखारामने विचारले.

“मला सारे घना म्हणतात. घनश्याम माझे नाव. तुमचे नाव?”

“सखाराम.”

“छान नाव ! सर्वांचा सखा होणारा राम, सर्वांचा मित्र होणारा राम. मला सखाराम नाव लहानपणापासून आवडते. तुम्ही दमून आला असाल. मी बादली आणून देतो. स्नान करुन विश्रांती घ्या. जेवायला अवकाश आहे. आज सुट्टी आहे.”

“आज कसली सुट्टी?”

“ही संस्था ज्यांच्या प्रेरणेमुळे स्थापण्यात आली त्यांची आज पुण्यतिथी.”

घना आपल्या खोलीत गेला. त्याने बादली आणून दिली. सखारामला त्याने संडास, हौद- सारे दाखविले.

“तुम्ही आता जा. मी सारे आटपून येतो. तुम्ही जणू जुने मित्रच भेटलात.” सखाराम मधुर हास्य करीत म्हणाला.

घना निघून गेला. सखाराम कितीतरी वेळ स्नान करीत होता. तो लांबून आला होता. दोन दिवसांत अंघोळ नव्हती. त्याने आपले कपडे धुतले आणि मग खोलीत आला. पिशवीतून दोरी काढून त्याने बांधली. तिच्यावर आपले कपडे त्याने वाळत टाकले. खोलीत एक टेबल होते. टेबलावर त्याने आपली दोन-चार पुस्तके ठेवली. एक तुकारामाची गाथा होती. उपनिषदांचे पुस्तक होते. रवीन्द्रनाथांची साधना आणि गीतांजली ही दोन पुस्तके होती. आश्रम भजनावली आणि गीता ही छोटी पुस्तके होती. श्रीरामकृष्ण परमहंसांची एक तसबीर होती. ती त्याने टेबलावर मध्यभागी ठेवली. नंतर तो बागेत गेला. त्याने दोन फुले आणून त्या तसबीरीला वाहिली. नंतर घोंगडी पसरून तिच्यावर तो पडला. थोड्या वेळाने त्याचा डोळा लागला.

घनाने येऊन पाहिले तो सखारामला झोप लागलेली. तो तेथील खुर्चीवर बसला. ती पुस्तके तो चाळीत होता. साधना वाचताच तो रमून गेला. इतक्यात जेवणाची घंटा झाली. सखारामला जाग आली.

“चला जेवायला.”

“चला.” सखाराम म्हणाला.

तेथे दहा-बारा जण जेवायला असत. एक आचारी होता. इतर काम करायला एक वृद्ध गडी होता. त्याचे नाव गणा. गणाचा एक मुलगा गिरणीत कामाला जाई. लहान दहा वर्षांचा रुपल्या अजून कामाला नसे जात. म्हाता-या गणाचा रुपल्यावर फार जीव. रुपल्याही त्या क्लबचेच काम करी. उरले-सुरले अन्न गणा नि रुपल्या यांना पुरे.

“बसा, सखाराम.” घना म्हणाला.

दोघे शेवटी जवळ जवळ जेवायला बसले. त्या जेवणा-या मंडळीत कोणी बंगाली होते, कोणी गुजराती होते, एक तमिळ होता, काही महाराष्ट्रीय होते, एक कन्नड बंधूही होता. जणू ते भारतीय संमेलन होते!

“नूतन बंधूर नाम की!” बंगाली बाबूने विचारले.

“नामटी एकटु सखाराम.” सखाराम हसत म्हणाला.

“बंगाली जानते पोरा?”

“किछु किछु!”

सर्वांना हसू आले. सखारामला एकदम ठसका लागला. त्याला का अळसुद गेले?

“पाणी प्या, पाणी प्या.” कोणी म्हणाले.

“तन्नी कुडी.” तमिळ मित्र म्हणाला.

“कुडच्याची.” पाणी पिऊन सखाराम म्हणाला.

“आप ते हर एक प्रान्तकी भाषा जानते हैं ऐसे मालून पडता है।” एक उत्तर भारतीय म्हणाले.

“मैं तो भारतका यात्री आज इतने दिन घूमता हूँ। आल्मोडासे कन्याकुमारी तक घूमा। आज यहाँ आया हूँ। मैं शन्तिसमाधान ढूँडता हूँ।” सखाराम म्हणाला.

“समाधान बाहर कहीं नहीं मिलता, समाधान मनका एक धर्म है, मनकी वृत्ती है। विवेकबुद्धीसे समाधान मिलता है। इधर उधर मिलनेवाली यह चीज नहीं है।”

“तो भी स्थानमहात्म्यका असर होता है। सत्संगका परिणाम होता है। वह मै देखूंगा।” सखाराम म्हणाला.

जेवणे झाली. सखाराम आपल्या खोलीत गेला. “तुम्हाला लवंग हवी?” घनाने येऊन विचारले.

“नको.”

“तुम्ही झोपा. जागरण झाले असेल. तुम्ही कोठून आलात?”

“मद्रासकडून.”

“प्रवासाचा खूप शीण झाला असेल. दुपारून सभा आहे. मी उठवीन.”

“ही संस्था सुंदरदासांनी स्थापली ना?”

“परंतु त्यांना प्रेरणा देणारे एक साधे सज्जन होते. त्यांचे माव रामजी मास्तर. रामजी मास्तर मोठे वेदान्ती होते. उत्कृष्ट सतार वाजवणारेही. सुंदरदासांना लहानपणी ते घरी शिकवायला जात. आणि सुंदरदासांना पुढे त्यांनी अध्यात्माची गोडी लावली. संस्कृतीचा, धर्माचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास व्हावा म्हणून ही संस्था काढायला त्यांनी सांगितले येथे पूर्वी विद्यार्थी घेतले जात. अलीकडे ती प्रथा कमी झाली आहे. आता एम्.ए. वगैरे झालेले फेलो म्हणून येथे घेतात. ते अभ्यास करतात. चर्चा करतात. सुंदरदासही चर्चेत भाग घ्यायला येतात. ते अध्यात्मवादी आहेत; परंतु त्यांचे अध्यात्म मला तितके रुचत नाही!”

“मी हिंदुस्थानभर भटकत येथे आलो. येथे तरी किती दिवस राहतो, हरी जाणे!”

“तुम्ही जरा पडा. मी जातो.”

घना निघून गेला. सखाराम पडून राहिला. तो विचारात होता. घनाबद्दल त्याला प्रेम वाटू लागले. याच्यासाठी का मी येथे आलो? आपल्या जीवनाच धागेदोरे कोठून कसे विणले जातात, काही कळत नाही; या विचारांत तो झोपी गेला.

तिस-या प्रहरी संस्थेच्या सभागृहात रामजी मास्तर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सभा होती. रामजी मास्तरांच्या तैलचित्राला हार घालण्यात आले. सुंदरदासशेठ आले होते. ते म्हणाले, “रामजी मास्तरांचा माझ्या जीवनावर कायमचा ठसा उठला आहे. जे काम हाती घ्यावे ते नीट पार पाडावे ही गोष्ट त्यांनी मला शिकवली. लहानपणी एक शब्द मला नीट लिहिता येईना. त्यांनी तो मला पंचवीस वेळा लिहायला लावला. परंतु त्यांचा सर्वात मोठा उपकार म्हणजे वेदान्ताची त्यांनी मला गोडी लावली. जगातील इतर सर्व तत्त्वज्ञानांपेक्षा वेदान्त श्रेष्ठ आहे, असे ते म्हणत. त्यांच्याच स्फूर्तीने ही संस्था स्थापण्यात आली. विवेकानंदांसारखे महात्मे या संस्थेने जगास द्यावे असे त्यांना वाटे. ते नि:स्पृह होते. मी एकदा त्यांना म्हटले आज वाटेल, ते माझ्याजवळ मागा. मी देतो. ते म्हणाले, दोन मुलगे आहेत; दहा एकर जमीन द्या. खपतील आणि खातील. परंतु ते अकिंचन वृत्तीचे होते. मरताना म्हणाले, देह सुटला. राम! जणू आत्म्याला चिकटलेले बंधन तुटले. या संस्थेत तुम्ही आहात. तुम्ही सर्व धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञाने यांचा अभ्यास करा. परंतु आपल्या संस्कृतीत ज्या अद्वैताचा सुगंध भरला आहे, ते अद्वैत तत्त्वज्ञान सर्वत्र न्या. त्याचा जयजयकार करा.”

सुंदरदास यांचे असे भाषण झाले. आणखी काहींची झाली. सभा संपली.

सुंदरदासांनी सखारामची चौकशी केली.

“तुमच्यासारखे तपस्वी तर या संस्थेला हवे आहेत, रहा येथे. अभ्यास करा. तुम्हांला समाधान मिळो.” सुंदरदास म्हणाले.

“तुम्हांला समाधान आहे का?” सखारामने प्रश्न केला.

“ते काय सांगू?”

“तुम्हांला सर्वांभूती समभाव वाटतो का?”

“माझे अध्यात्म निराळे आहे. आपण काहीही केले तरी त्यापासून आपला आत्मा निराळा आहे ही जाणीव अंतरंगी जागृत ठेवणे याला मी वेदान्त समजतो. कर्माने आत्मा मळत नाही. ते कर्म सत्कर्म असो व दुष्कर्म असो; आत्मा सत् आणि असत् यांच्या पलीकडे आहे.”

“हे भयंकर तत्त्वज्ञान आहे! साधुसंतांची साधना का फोल? अद्वैताचा ज्यांनी अनुभव घेतला ते वाटेल तसे नव्हते वागत. त्यांच्या जीवनावरून जर वेदान्त समजून घ्यायचा असेल तर तुम्ही म्हणता त्याचा मेळ कसा घालायचा? शंकराचार्यांच्या भाष्याच्या आरंभीच मुळी म्हटले आहे की,- शम, दम, वगैरे सदगुण अंगी असल्याशिवाय कोठला वेदान्त? कोठले अद्वैत?”

“तुम्ही अजून या क्षेत्रात बाळ आहात.”

“मला बाळच राहू दे.” असे म्हणून प्रणाम करून सखाराम निघून गेला.

संस्थेच्या प्रमुखांना सुंदरदास म्हणाले, “हा तरुण निराळ्या वृत्तीचा दिसतो. हा केवळ चर्चाराम दिसत नाही!”

त्या दिवशी सखाराम आणि घना दूर फिरायला गेले होते. नदीच्या मध्यभागी असलेल्या एका खडकावर दोघे मित्र बसले होते. नदीच्या शंखासारखे स्वच्छ पाणी खळखळ करीत जात होते. तो शरद ऋतू होता. सायंकाळचा कोवळा गंभीर प्रकाश नदीच्या पाण्याजवळ खेळत होता. सूर्याचे किरण सायंस्नान आटोपून जणू पटापट जात होते.

“घना, चोहोबाजूंस पाणी असून मध्ये हा खडक आहे, त्याप्रमाणे जीवनात सर्वत्र निंदा-स्तुती, स्पर्धा, मानापमान यांचे वेगवान प्रवाह वाहत असतानाही आपल्याजवळ असा एखादा भक्कम आधार हवा,- जेथे आपण या सर्व गोष्टींपासून सुरक्षित असू; तेथे आपण परम शांती अनुभवू शकू.” सखाराम म्हणाला.

“असा आधार म्हणजे सर्व चराचराशी एकता अनुभवणे, दुजेपणाची वार्ताही नसणे. आपणास आपले मन क्षणभर तरी या सर्व पसा-यापासून अलिप्त करता आले पाहिजे आणि सर्व विश्वाशी असलेले मूलभूत ऐक्य अनुभवता आले पाहिजे.” घना म्हणाला.

“परंतु हे आंतरिक ऐक्य अनुभवणे सोपे नाही. बाह्य जीवनातही त्याची अनुभूती हवी. मी माझ्या खोलीत गणाला झोप म्हटले तर ते दुसरे पंडित हसले! पाऊस पडत होता. गणाची झोपडी गळत होती. म्हणून मी त्याला म्हटले, ये माझ्या खोलीत झोप. त्या रुपल्याला मी शिकवतो, तर त्यांना बघवत नाही! रुपल्या माझ्या खाटेवर चित्रांचे पुस्तक पाहात बसला तर त्यांना ते कसे तरीच वाटते!”

“कॉलेजमधून एम्. ए. वगैरे होऊन आलेली ही मंडळी. त्यांना गरिबांशी समरस होणे अजून माहीत नाही.”

“आणि हे का संस्कृती आणि वेदान्त यांचा अभ्यास करणारे?”

“जसे शेठजी तसे हे! सुंदरदास वेदान्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. ते दानशूरही आहेत. परंतु गिरणीतील कामगारांसाठी ते काही करणार नाहीत. कामगारांच्या श्रमाने मिळणारा पैसा ते दुस-या शेकडो संस्थांना देतील, परंतु कामगारांसाठी सुंदर चाळी नाही बांधणार. एवढे कशाला, त्यांनी राममंदिर बांधले ना? परंतु तेथे हरिजनांना अजून प्रवेश नाही! एकदा कापसाच्या संस्थेची सभा होती. व्यापारी, शेतकरी दोघांचे प्रतिनिधी तेथे बसून भाव ठरवतात. सारे जमले. सुंदरदास उशीरा आहे. त्यांच्यासाठी तेथे एक खुर्ची होती; परंतु तेथे शेतकरी खुर्च्यांवर बसलेले पाहून ते खालीच बसले रागारागाने! अहो, वर बसा. तेथे ही खुर्ची आहे- असे सारे त्यांना म्हणाले. तर उसळले व म्हणाले, ‘कुणबट्यांबरोबर मी नाही बसणार!’ जणू कुणबटे म्हणजे खाली बसण्याच्या लायकीचे. असा हा वेदान्त आहे! त्यांच्या चर्चा मोठ्या विनोदी असतात. ‘शुनिचैवश्वपाकेच पंडिता: समदर्शिन:’ असा गीतेत चरण आहे. सुंदरदास म्हणाले, पंडित सर्वत्र समदर्शी असतात समवर्ती नव्हे! सारे कमान असे दिसले तरी वर्तणूक समान कशी ठेवायची! गायीचा चारा का आपण खायचा? गायींना चाराच हवा. आपल्याला अन्नच हवे. हाच मुद्दा पुढे नेला तर श्रीमंतांना बंगलेच हवेत, गरीबांना झोपड्याच हव्यात, श्रीमंतांना खुर्चीच हवी, गरीबाने दूरच बसले पाहिजे,-यावर आपण येतो. असे हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. ते म्हणतात, आपण कसेही वागलो तरी आत्म्याचा त्या वागण्याशी संबंध नाही, अशी आत जाणीव असावी. हाच मोक्ष. परंतु हे सारे शब्द आहेत. त्यांचे म्हणणे असे : आत्मज्ञान झाले तरी तुमचे पूर्वसंस्कार कोठे जाणार? ते तुम्हांला खेचून नेणारच. आत्मज्ञानाने सारे चित्ताचे मळ धुतले जातात, जीवनात क्रांती होते असे मानीतच नाहीत.”

सखाराम ऐकत होता, दोघे मित्र आता गप्प झाले.

एकाएकी सखारामने विचारले, “काय रे घना, कामगारांच्या पगारातून या संस्थेसाठी पैसे घेतले जातात, हे खरे का? त्या दिवशी एकाने मला टोमणा मारला की, गरीबांसाठी तुम्हांला इतके वाटते तर गरीबांच्या पैशावर जगता कशाला?”

“गिरणीतील कामगारांच्या पगारातून रुपयामागे पैसा घेतला जाई. हल्ली घेतात की नाही माहीत नाही. कामगार स्वखुशीने देतात असे लिहून घेतले जाई. रुपयापाठीमागे पैसा म्हटले तरी महिन्याला आठ-नऊशे रुपये जमत. वर्षाला जवळ जवळ दहा रुपये प्रत्येक कामगाराचे या मार्गाने मिळत. गेली दहा वर्षे अशा रीतीने पैसे घेतले गेले. म्हणजे कामगारांनी जवळ जवळ एक लक्ष रुपये दिले म्हणा ना. कोणी तरी मागे वर्तमानपत्रातून याला वाचा फोडली होती. परंतु म्हणतात, त्या पत्राला पैसे देऊन ते लेख प्रसिद्ध करणे बंद करण्यात आले. मला तरी एवढेच माहीत आहे.”

“घना, मग मी या संस्थेत कशाला राहू? कामगारांसाठी आपण काही करीत नाही. नाही त्यांची रात्रीही शाळा चालवीत, नाही त्यांती संघटना करीत. माझी तर ही वृत्तीही नाही. मी झाडू हाती घेऊन स्वच्छता करीन. परंतु इतर मला नाही जमत. मी येथे न राहणे बरे. अत:पर येथे राहणे म्हणजे पाप, असेच मन रात्रंदिवस पुकारीत राहील.”

“मी तुला काय सांगू? येथून कोठे जाणार?”

“कोठे जाऊ मनाला शांती मिळावी म्हणून हिंदुस्थान पालथा घातला. विवंकानंद-आश्रमात गेलो, बेलूर येथे गेलो. ते ते महापुरुष मोठे असतील; परंतु या संस्थांतून माझ्यासारख्याला कोठून वाव? पाँडिचेरीला युरोप-अमेरिकेतून येतात, त्यांची किती व्यवस्था! परंतु तेथे मी रडकुंडीस आलो. वाटले की, हे आश्रम म्हणजे जाहिरातबाजी आहे! अरविंदांना माझे प्रणाम. आज इतकी वर्षे ते एकान्तात आहेत. आपण पाच मिनिटे एके ठायी मन निवांत करुन बसू शकत नाही. परंतु त्या आश्रमाचे बाहेरचे व्यवस्थापक! तेथे कोण घेणार गरिबांची दाद? मोठमोठ्या आश्रमांतूनही मला संकुचितता आढळली. एका मोठ्या संस्थेत गेलो. तेथे शास्त्री होते. मी रहाटाजवळ होतो. ते मला म्हणाले, विहिरीत घागर बुडवून ठेवा. मग मी काढीन. त्यांना का माझा विटाळ वाटत होता? एका आश्रमात गेलो, तो मजजवळ कोणी नीट साधे बोलेना! ही म्हणे कामाची वेळ. अरे, एक अतिथी तुमच्या संस्थेत येतो, त्याची सहानुभूताने चौकशी नको करायला? क्षणभर काम ठेवा बाजूला. घना मला तर शिरसी आली! कदाचित मी दोषैक दृष्टीने बघणारा असेन; वर्तमानपत्रांतून मोठेमोठे लेख येतात परंतु जवळ गेल्यावर भ्रमनिरास होतो. कोठे जाऊ मी? या संस्थेत आलो तर येथल्या अद्वैताचा निराळाच अवतार! मी घरी जातो. आज बारा वर्षांत मी घरी गेलो नाही. माझा मोठा भाऊ सर्वांना सांभाळत असेल, त्यालाच मदत करावी. हातचे सोडून पळत्याच्या पाठीस कशाला लागू?”

“घरी कोण कोण आहेत?”

“मोठा भाऊ आणि त्याची बायको. आता मुलेबाळे असतील. एक बहीण मागे आलेली. दुसरी एक बहीण मी घर सोडले तेव्हा सातआठ वर्षाची होती. तिचे कदाचित लग्न झाले असेल. वडील आमचे मागेच वारले. आई आहे ती माझ्यासाठी कंठात प्राण आणीत असेल. आहे की नाही ते तरी काय माहीत? मी घरीत जातो. भारतमातेचे हिंडून दर्शन घेतले; आता जन्मदात्या आईजवळ जातो. तिच्या सेवेत भारताची सेवा येऊन जाईल.”

“तुला येथे राहणे म्हणजे हृदयवेदना असे वाटत असेल तर तू जाणेच बरे.”

“हो मी जाणेच बरे. घना, तुझी येथे ओळख झाली. मैत्री जडली. पत्र पाठवीत जा.”

“तू जाणार आणि मी येथे राहणार? माझे तरी काय कर्तव्य? तुझ्यासारखे धैर्य, तुझी तीव्रता माझ्याजवळ नाही. आपण कोण-कोठले! थोडे दिवस एकत्र आलो. एवढाच का ऋणानुबंध होता? आणखी नाही का आपल्या भेटीला अर्थ?”

“प्रभू जाणे.”

आता अंधा-या छाया पडू लागल्या, दोघे मित्र संस्थेत आले. इतरांची जेवणे आटोपली होती. सखाराम आणि घना दोघेच राहिले होते.

“रुपल्या, तू जेवलास का?” सखारामने विचारले.

“तुम्ही जेवा, मग मी जेवेन.” तो म्हणाला.

“अरे आमच्याबरोबर ये, बस.”

“नाही दादा, आम्ही मागून बसू.”

शेवटी सखाराम आणि घना दोघेच बसले.

रुपल्या पळून गेला.

दोघे मित्र जेवून गेले. घना आपल्या खोलीत वाचीत बसला. सखाराम बगीचात जाऊन अभंग गुणगुणत बसला. रातराणीचा सुगंध सुटला होता.

सायंकाळच्या गाडीने सखाराम जाणार होता. त्याला आज क्लबातर्फे मेजवाणी देण्यात येणार होती. घनाने सारी तयारी केली. केळीची पाने, रांगोळी,- सारा थाटमाट होता. परंतु आयत्या वेळी रसभंग झाला.

“माझ्या पानाशेजारी रुपल्या बसू दे.” सखाराम म्हणाला.

“आम्ही अशाने येणार नाही. तो नको आपल्या पंगतीत. तुम्ही का आम्हांला मुद्दाम हिणवता? मोठे समदर्शी आहात, ठाऊक आहे. आम्ही तुम्हांला सन्मानाने मेजवानी द्यायला निघाले तर त्या पोरट्याला जेवताना बरोबर घेऊन तुम्ही अपमान करणार?” एक पदवीधर म्हणाले.

“यात अपमान कसला? त्या मुलावर माझा लोभ आहे. मी त्याला शिकवतो. स्वच्छ खादीचा सदरा त्याच्या अंगात आहे. तो का घाणेरडा आहे? आपलेच हे सारे बांधव. देशात स्वराज्यासाठी लढे चालले आहेत आणि इकडे सुशिक्षित तरुण या मुलाला आपल्याजवळ जेवायला बसवायला तयार नाहीत! तुम्ही आधी जेवा...मी तुमच्या पंगतीला बसत नाही. मी रुपल्याला बरोबर घेऊन मग जेवेन. तुम्ही उच्च माणसे आधी बसा!”

शेवटी सखाराम व घना मागून बसले. इतर मंडळी आधी जेवून गेली. गणा, रुपल्या, वगैरे सखारामबरोबर जेवले.

सखाराम आणि घना दोघे बराच वेळ बोलत बसले. शेवटी गाडीची वेळ झाली. दोघे मित्र स्टेशनवर जायला निघाले. सामान नव्हतेच. पिशवी नि घोंगडी.

सुंदरपूर स्टेशनवर गर्दी होती. संध्याकाळच्या गाडीला नेहमीच गर्दी असे. गाडी आली. घना एका डब्यात चढला. त्याने जागा मिळवली. मागून सखाराम आत आला. इतक्यात रुपल्या, त्याचा बाप गणा तेथे आले.

“दादा हे घ्या फूल.” रुपल्या म्हणाला.

“गरिबांवर नजर ठेवा.” गणा म्हणाला.

“गणा, नजर देवाची, आपण एकमेकांना कोठवर पुरणार? तुझा रुपल्या मोठा होईल. तोही गिरणीत जाऊ लागेल. तुला काही कमी पडू देणार नाही. रुपल्या, गणाला जप.”

“आता तुम्ही परत कधी येणार? तुमची आम्हांला आठवण येईल. तुमच्याप्रमाणे मला कोण शिकवील? कोण चित्रांची पुस्तके देईल?” रुपल्या डोळ्यांत पाणी आणून म्हणाला.

“हा घना येथे आहे. तो तुला शिकवील. शहाणा हो. चांगला मुलगा हो.” सखाराम म्हणाला.

गाडी सुटायची वेळ होत आली. घनाकडे सखारामने भावनाभराने पाहिले.

“सखाराम पत्र पाठवीत जा. तू पुढे काय करतोस ते कळवीत जा. येथे जडलेला संबंध कायम राहो. कधी कधी माणसे अकस्मात एकत्र येतात, परंतु ती जणू शतजन्मांची एकमेकांचीच असतात. एकमेकांना जणू धुंडीत येत असतात. परंतु त्यांना त्याची जाणीव नसते. तू का मला धुंडीत येत होतास? तुझे-माझे नाते का जडायचे होते? जन्मोजन्मीचे नाते का पुन्हा प्रकट व्हायचे होते? हा भावबंधनाचा खेळ सखारामच्या बुद्धीला समजू शका नाही? एखाद्याकडे एकदम अंत:करण धावते, एखाद्याबद्दल एकदम तिरस्कार वाटतो. का बरे असे होते? तुझा-माझा काय संबंध? परंतु तू आलास नि जणू माझा झालास; माझ्या हृदयात घुसलास. मी एकदम तुला तू म्हणून संबोधू लागलो. जणू परकेपणा नव्हेच. आणि असे नाते जोडून तू जात आहेस. का अकस्मात आलास नि का चाललास?”

घनाला पुढे बोलवेना.

सखारामने त्याचा हात हातांत घेतला.

“घना प्रभूचा काही हेतू असेल. या जगात हेतुहीन काहीच नसते. तुमच्या-आमच्या मर्यादित बुद्धीला पुष्कळ गोष्टी हेतुशून्य वाटतात. परंतु मोठ्या यंज्ञात लहानशा स्क्रूचेही स्थान असते, त्याचप्रमाणे लहानसान घटनांनाही विश्वाच्या योजनेत स्थान असते. पत्र पाठवीत जा. मी पत्ता कळवीनच. प्रकृतास जप. माझ्यासारखा फाजील चिकित्सक नको होऊ.”

घना आता खाली उतरला. घंटा झाली. निशाण दाखवले गेले. शिट्टी झाली. भग भग करीत गाडी निघाली. घना बघत होता. रुपल्या, गणा बघत होते. गेली गाडी! सखाराम तेथे शून्य दृष्टीने बघत होता. तो दु:खी होता. रुपल्या नि गणा गेले. घना एकटाच फिरत फिरत नदीतीरी गेला. तो विचारात मग्न होता. सखाराम गेला मी का जाऊ नये, असा प्रश्न त्याच्या डोळ्यांसमोर होता. परंतु तो कोठे जाणार? किती तरी वेळ तो नदीकाठी बसला होता. इतक्यात कोणीतरी नदीमधून जात असताना पडले. तो एक म्हातारा होता. घना धावला. त्याने त्या म्हाता-याला उठवले. त्याच्या डोक्यालरचे सामान पाण्यात पडले होते. त्याने ते उचलून घेतले.

“भिजले असेल.” म्हातारा म्हणाला.

“होय बाप्पा. चला. पलीकडे तुम्हांला नेतो.” घनाने त्या बाप्पाला पलीकडे पोचवले. ते सामान त्याच्या डोक्यावर दिले. म्हातारा गेला. घनाला बरे वाटले. त्याच्या मनातील खिन्नता गेली. क्षणभर का होईना, जीवनाचा उपयोग झाला. अंधारात प्रकाशाचा एक किरणही आशा देतो. आपल्या जीवनाचा काय उपयोग, असे विचार घनाच्या मनात येत होते, आणि इतक्यात कोणाच्या तरी उपयोगी पडण्याची संधी आली. घनाला एका कवीचा एक चरण आठवला : एखाद्याचीही जावनकळी फुलवायला जर तुझ्या आयुष्याचा उपयोग झाला तर तुझे जीवन कृतार्थ समज.

घना आनंदाने आपल्या खोलीवर आला.

काही दिवस गेले. या संस्थेच्या पैशावर आपण जगू नये, असे घनाच्याही मनाने घेतले. आपण येथे राहतो, पगार घेतो, आपला जगाला काय उपयोग? तेथे आम्ही तत्त्वज्ञानाच्या चर्चा करतो. कोणाच्या जीवावर आमच्या ह्या वैचारिक चैनी चालल्या आहेत? ज्यांच्या जीवावर आम्ही जगतो, पुस्तके वाचतो, संस्कृती-तत्त्वज्ञानांची स्तोमे माजवतो, त्यांच्या जीवनात प्रकाश न्यायला आम्ही कधी धडपडतो का? येथील गिरणीतील कामगारांच्या घामावर ही संस्था चालली आहे. सुंदरदासशेठांनी संस्थेसाठी पैसे दिले. त्यांनी कोठून आणले? कामगारांच्या श्रमातून जन्मलेली संपत्तीच ना त्यांच्याजवळ असते? मग त्या कामगारांसाठी हे काय करीत आहेत? ज्यांच्या श्रमातून उत्पन्न झालेल्या संपत्तीतून हे धर्मादाय करतात, संस्थांना देणग्या देतात, त्यांच्यासाठी स्वच्छ सुंदर चाळी बांधून देतील तर शपथ! त्यांचा पगार दोन पैशांनी वाढवतील तर शपथ! त्यांना आजारात पगारी रजा देतील तर शपथ! वाटेल तेव्हा काढतील, वाटेल तेव्हा पुन्हा कामावर घेतील. गिरणीला वाटेल तेव्हा टाळे ठोकतील, वाटेल तेव्हा उघडतील. या मालकांच्या लहरीवर लाखो जीवने लोंबकळत असायची. यांची ही लहर म्हणजे जहर! छे; हा सारा अन्याय आहे. मी येथे नाही राहता कामा. परंतु कोठे जाऊ? मी येथेच का नये राहू? येथील कामगारांची संघटना मी का करु नये? येथील विद्यार्थ्यांतच नवचैतन्य मी का आणू नये? असे विचार घनाच्या मनात सारखे येत होते. तो बेचैन होता. निश्चित ठरेना.

परंतु एके दिवशी त्याने राजीनामा दिला. त्याने सर्वांचा निरोप घेतला.

“तुम्ही कोठे जाणार, दादा?” गणाने विचारले.

“मी गावातच एक खोली घेतली आहे. तेथे राहीन. सुंदरपूरातच मी राहणार आहे. कामगारांत काम करणार आहे. आपण भेटत जाऊच.” घना प्रेमाने म्हणाला. रुपल्याही धावत आला.

तो म्हणाला, “काय दादा, चाललेत? ते गेले. तुम्हीही चालला. येथे राहणे तुम्हांला आवडत नाही. होय ना?”

“रुपल्या मी या गावातच राहणार आहे. परंतु येथे नाही. माझ्या खोलीवर येत जा.” घना म्हणाला.

एका टांग्यात त्याने आपली ट्रंक, वळकटी ठेवली. सर्वांना नमस्कार करुन तो गेला.

जा, घना जा. गरिबांच्या सेवेसाठी जा. तुझ्या जीवनातील निराळा अंक सुरु होऊ दे. परंतु तुझ्या मार्गात अडचणी आहेत, उपहास आहेत, निराशा घेरील, अंधार पसरेल, कर्तव्यबुद्धीने जा. फळ मिळो वा न मिळो. तू तुझी धडपड कर.

***