Nava Prayog - 7 in Marathi Children Stories by Sane Guruji books and stories PDF | नवा प्रयोग... - 7

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

नवा प्रयोग... - 7

नवा प्रयोग...

पांडुरंग सदाशिव साने

७. सीमोल्लंघन

संप सुरू होऊन जवळ जवळ महिना झाला. कामगारांची दुर्दशा होती. खेड्यापाड्यांतून थोडीशी धान्याची मदत झाली. परंतु शेतक-याजवळ जादा धान्य अलीकचे फारसे शिल्लकच नसे. रेशनिंगचे दिवस. दुकानांतून रोखीने आणावे लागे. रेशनिंगमध्ये उधारीने कोण देणार? इतर माल कदाचित कोणी उधारीने दिला तरी रेशनिंगचे काय? जवळ दिडकी उरली नाही, थोडा फंड अजून शिल्लक होता. त्यातून गरीब लहान मुलांना दूध देण्यात येई. डाळे-मुरमुरे वाटण्यात येत. परंतु वेळ कठीण आली होती. मालक काहीच करायला तयार नव्हाता. सरकारही स्वस्थ! काय करावे हा प्रश्न होता.

रात्री सभा भरली होती. घनाने सारी परिस्थिती समजावून दिली. तो म्हणाला, “आपल्याजवळ पैसे नाहीत. फंड संपत आला. मुलाबाळांचे हाल मी बघत आहे. आज माझ्या एका पुस्तकाला पाच हजारांचे बक्षीस मिळाल्याची तार आली आहे. ते बक्षीस मी तुमच्यासाठी देतो. आणखी पाच दिवस जातील. परंतु पुढे काय? बंधुभगिनींनो, मी तुमच्यापुढे एक धाडशी विचार ठेवू इच्छितो. तुम्ही मजबरोबर येता का? कशाला या गिरणीत राहता? येथे माणुसकी नाही, कदर नाही; -- तेथे कशाला राहता? तिकडे इंदूर संस्थानात पडित जमिनी आहेत. माझे मित्र पुढे गेले आहेत. तेथे आपण नवीन वसाहत वसवू. सोने पिकवू. कस न गेलेली जमीन भरपूर पीक देईल. विजेच्या शक्तीवर माग चालवू. इतर कामे करू. एक सहकारी जीवन निर्मू, नवीन संस्कृती निर्मू. तेथे सामाजिक, आर्थिक समता स्थापू. शिक्षणाचे नवे प्रयोग करू. मानव म्हणून जगू. इतर भेद जमीनदोस्त करू. येता माझ्याबरोबर? नवभारत साहसांची अपेक्षा करीत आहे. विधायक साहस, सृजनशील साहस! येथून जाताना वाईट वाटेल. जुन्या आठवणी, जुने संबंध, परंतु एके दिवशी सारेच सोडून जायचे असते. जुन्याला चिकटून बसण्यानेच आपण भिकारी झालो. आपले गाव सोडायचे नाही, जुन्या रूढी सोडायच्या नाहीत, जुने विचार सोडायचे नाहीत, -- असे करून का प्रगती होते? जीवनात सतत सीमोल्लंघन करू तरच सोने एकमेकांस देता येईल. जुन्या सीमा ओलांडून पुढे जायचे नवी क्षितिजे, नवीन आदर्श! बघा विचार करून. माझ्या डोळ्यांसमोर तरी सुंदर चित्र दिसत आहे. ती पाहा नवीन वसाहत. सर्वांना घरे आहेत. तो मध्ये मोठा चौक.

तेथे स्वातंत्र्याचा झेंडा फडकत आहे. ती शाळा. तो दवाखाना. ते क्रीडांगण. तो म्युझियम. ती सभेची जागा. ते पाहा एका बाजूला उद्योगधंदे, आणि ती पाहा सार्वजिक बाग. सारे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एका आकाशाखाली स्वेच्छेने प्रभूची प्रार्थना करीत आहेत!, करा, -- विचार करा. तेथे आपण कोठवर टिकाव धरणार? मजजवळ द्यायला काय आहे? प्रभूच्या कृपेने हे बक्षीस आले आहे. ते तुमच्या सेवेसाठी समर्पित आहे.”

आणखी आठ दिवस गेले. घना कामगारांच्या घरी हिंडे, तो स्वत: दूध वाटी. परंतु अत:पर कामगारांचा अंत पाहणे बरे नाही असे त्याला वाटले. एके दिवशी संप मागे घेण्यात आला! भुकेलेले कामगार पुन्हा कामावर जाऊ लागले. घना त्यांची सेवा करीत होता. त्याच्याविषयी त्यांना आदर होता. एका क्षणात बक्षीस मिळालेले पैसे त्यांच्यासाठी त्याने दिले. ना स्वार्थ, ना अहंकार!

घनाचा वसाहतीविषयक प्रचार सुरू होता. शेतकी-तज्ञ मधु व माधव हे दोन नवतरुण त्याला मिळाले. सखारामचे आशादायक पत्र आले होते. सुंदरपुरातील काही कामगार जायला तयार झाले. आसपासच्या गावांतीलही ज्यांना नीट घरदार नव्हते, शेतीभाती नव्हती, असे काही उत्साही लोक तयार झाले.

कोणी आपल्या घरच्या आईबापांना म्हणाले, “तिकडे नीट व्यवस्था लागली म्हणजे तुम्हांला नेऊ. तोवर तुम्ही येथेच रहा.”

नव-वसाहतवाल्यांची यादी होऊ लागली. स्त्रीपुरुष मिळून जवळ जवळ पाचशे माणसे निघाली. मुलेबाळे वेगळी. एक खास रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आली.

सखारामने सारी व्यवस्था केली होती. तेथे सर्वांचा रसोडा होता. नदीचे पाणी आणण्यात आले होते. काही छोट्या झोपड्या होत्या. काही तात्पुरत्या बराकी होत्या. अमरनाथने अवजारे पाठवली होती. गायीगुरे विकत घेण्यात आली. तिथे जणू गोशाळा सुरू झाली. डोंगराच्या पायथ्याशी ती जमीन होती. डोगरावर जंगल होते. आसपास मोठमोठी झाडे होती. एक वटवृक्षाचे झाड तर केवढे होते! गायीगुरे त्याच्या छायेत बसत. दमलेभागलेले तेथे झोपत. सखाराम व त्याचे मित्र यांनी तेथे आरंभ केला होता. घना व येणारे इतर साहसी जीव यांचे स्वागत करायला ते तयार होते.

घना व त्याचे सहकारी साहसी मित्र याना निरोप द्यायला सुंदरपूरचा आजचा समारंभ होता. शेकडो विद्यार्थी जमले होते. कामगार होते. नागरिक होते.

विद्यार्थ्यांच्या वतीने गजानन म्हणाला, “घनश्यामांना आपण निरोप देत आहोत. त्यांचे सारे जीवन प्रयोगासाठी आहे. त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना नवीन दृष्टी दिली. ते आम्हांला शाळेतील विषय शिकवीतच, परंतु आम्हांला खेड्यापाड्यांतून नेत. जी घाण काढायला आम्ही कचरत असू ती काढायला ते पटकन पुढे व्हायचे. त्यांनी श्रमाची प्रतिष्ठा आम्हांला शिकवली. गरीब जनतेशी एकरूप व्हायला शिकवले. त्यांचा नवा प्रयोग यशस्वी होवो. आपण तो प्रयोग बघायला जाऊ.”

नागरिकांतर्फे शिवरामपंत म्हणाले, “घनश्याम येथून जात आहेत. त्यांनी नागरिकत्वाचे धडे आम्हा सर्वांना प्रत्यक्ष सेवेने दिले. त्यांनी कामगारांत जागृती केली. त्यांच्या संपाला यश नसेल आले, -- तरी कामगार शांततेले राहिले याचे श्रेय त्यांना आहे. त्यांनी मिळालेले बक्षीस कामगारांच्या मुलाबाळांसाठी दिले. स्वत: डोक्यावर डाळे-मुरमुरे घेऊन वाटीत. दुधाची चरवी घेऊन दूध वाटीत. या गावाला त्यांच्यामुळे साक्षरतेची गेडू लागली. शेतक-यांच्या बायका कोठे कागद दिसला तर वाचू बघतात. घनश्याम जातील तेथे चैतन्य निर्मितील. त्यांचा साहसी प्रयोग यशस्वी होवो.”

कामगारांच्या वतीने संपत म्हणाला, “ आमच्यात कसलीच जाणीव नव्हती. घनश्यामांनी आम्हांला माणसे बनवले; स्वाभिमानी बनवले. संप फसला असेल; -- जय-पराजय यांतूनच पुढे जायचे असते. आम्ही आमची संघटना वाढवू. मजबूत करू. आमच्यातील क्ही कामगार आमिषांना बळी पडले. फाटाफुटी झाल्या. नाही तर अपेश येते ना. घनश्यामांचा मोठेपणा की त्यांनी कामगारांना दोष दिला नाही. त्यांनी आपल्या शिरावर सारा बोजा घेतला. ते जात आहेत. आमची हृदये त्यांच्याबरोबर आहेत. काही कामगार बंधू त्यांच्यासंगे जात आहेत. त्यांच्या प्रयोगाला आम्हीही पै पैसा पाठवू. श्रमणा-यांची मान उंच ठेवायला, त्यांचे प्रयोग यशस्वी व्हायला आम्ही तरी मदत केलीच पाहिजे.”

आणि हा कोण येतो आहे बोलावयाला? हा रुपल्या. तो उभा राहिला. परंतु त्याला बोलवेना. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. तो म्हणाला, “सखारामभाऊ-घनाभाऊ यांच्यासारखी माणसे कोठे दिसणार? आज ना उद्या, मीही त्यांच्या वसाहतीत जाईन. माझा बाप गणा सध्या आजारी आहे. मी जाऊ शकत नाही. हा हार घनाभाऊंच्या गळ्यात घालतो. संस्कृति-मंदिरात ते होते तर मला आपल्या पानाजवळ जेवायला वाढायचे. त्यांना गर्व नाही. सारी माणसे त्यांना सारखी वाटतात.” असे म्हणून रुपल्या त्यांच्या पाया पडला. सारी सभा सद्गदित झाली.

घना शेवटी म्हणाला, “मी तुमचे प्रेम घेऊन जातो. काही वर्षे आयुष्यातील येथे जायची होती. मी कामगारबंधूंना एवढेच सांगीन की, त्यांनी काही झाले तरी अत्याचाराची कास धरू नये. आपल्या देशात शांततेच्या मार्गाने समाजवाद येईल, अशी मला आशा आहे. थोडा वेळ लागेल; -- लागू दे. परंतु रक्तपाताचे जवळचे वाटले तरी ते मार्ग नकोत. विद्यार्थ्यांना सांगेन की त्यांनी मिळणारे ज्ञान सेवेसाठी द्यावे. या राष्ट्रला निरनिराळ्या शास्त्रांतील तज्ज्ञांची जरूर आहे. परंतु शिकून फार पगाराची अपेक्षा नका धरू. नाना शास्त्रांत प्रवीण होऊन सेवेसाठी पुढे या. काही करून दाखवा. प्रयोग करा, नागरिकांना सांगेन की ख-या अर्थाने नागरिक व्हा. दुस-याचा विचार करीत जा. सहकारी भावना ठेवा. स्वच्छता-धर्म जीवनात आणा. तुमच्या गावची प्रतिष्ठा तुम्ही कसे वागता यावर आहे. नाव सुंदरपूर, -- परंतु ठायी ठायी उकिरडे असतील तर? तेथील जनतेच्या सुंदर जीनवावे गाव सुंदरपूर होवो. मी दूर जात असलो तर तुमचे प्रेम मला तारील, स्फूर्ती देईल.”

सभा संपली; रात्री घना किती तरी वेळ मित्रांजवळ बोलत होता. दुस-या दिवशा सकाळी दहा वाजता ती खास गाडी सुटणार होती.

उजाडताच घना रुपल्याच्या वडलांना भेटून आला. गणा अंथरुणावर होता. घनाने त्याचा निरोप घेतला. नंतर संस्कृतिमंदिरातील मित्रांना भेटला तो सुंदरदासांनाही भेटायला गेला. सर्वांना आश्चर्य वाटले!

“तुम्ही भेटायला आलात?” त्यांनी विचारले.

“संप करून लढा लढवला. परंतु ते चालायचेच. तुमची काही धोरणे मला पसंत पडत नसली तरी तुमच्यात काही चांगुलपणा आहे. त्या चांगुलपणाला प्रणाम करायला मी आलो आहे. तुम्ही उदार आहात. ज्ञानोपासक आहात. तुमचे औदार्य कामगारांकडे वळत नाही ते निराळे. मंदिर बांधण्याऐवजी चाळी बांधतेत तर अधिक प्रभुसेवा झाली असती, असे मला वाटते. असो. येतो, -- नमस्कार.”

“नमस्कार.”

गाडीची वेळ झाली. आज रविवार. सुट्टी. स्टेशनवर चिक्कार गर्दी होती. गाडी सजवण्यात आली होती. ‘नवभारताचे नवीन साहस’, ‘साहसात संपत्ती’, अशी ब्रिदवाक्ये झळकत होती. जयघोष होत होते. भेटीगाठी होत होत्या. कोणाच्या डोळ्यांतून अश्रूही आले.

निघाली गाडी. हळूहळू सुंदरपूर, ती नदी, ती टेकडी, तो घाट, ती मंदिरे, ती गिरणी, ती संस्कृतिमंदिर संस्था, -- सारे दूर राहिले. जाणारे लोक नमस्कार करीत होते. जन्मभूमीला सोडून ते जात होते. सारा भारत जणू त्यांची जन्मभूमी. जातील तेथे त्यांचे घर.

गाडीत उत्साह होता. गाणी-पोवाडे चालत. घना गोष्टी सांगे. बायकांनीही गाणी म्हटली. मौज आली.

आणि ते स्टेशन आले. तेथे उतरायचे होते. येथून त्या वसाहतीकडे जायचा रस्ता. काही बैलगाड्या आल्या होत्या. एक-दोन लॉ-यांतून माणसे बसली. खेप करून लॉ-या पुन्हा येणार होत्या.

सखारामने घनाला हृदयाशी धरले.

दोघे मित्र क्षणभर बोलले नाहीत.

“मालती कोठे आहे?” घनाने विचारले.

“दोन दिवस झाले तिला ताप येत आहे. फार काम करी. तिने गुलाब लावले होते. तू येईपर्यंत एक तरी फूल फुलेल अशी तिला आशा होती; परंतु कळी आली ती अजून फुललीच नाही.”

रामदास, बाबू वगैरे भेटले. कुतुब, लाला हेही भेटले.

तिकडे वसाहतीत स्वागताची तयारी होती. आलेल्या लोकांना ओवाळण्यात आले. त्यांच्यासाठी जेवण तयार होते. लॉ-या पुन्हा गेल्या. पुन्हा माणसे घेऊन आल्या. माणसे येत होती; तसतशी जेवत होती. आज कामाला रजा होती.

रात्रीच्या वेळेस स्वच्छ चांदण्यात सारी मंडळी जमली. घना म्हणाला, “बंधुभगिनींनो, सर्वांसाठी आधी झोपड्या बांधणे हे काम. तट्टे येऊन पडले आहेत. थोडाफार पाया करून झोपड्या आधी उभारू. जंगलात बांबू आहेत. आपल्याला आणायची परवानगी आहे. आणि जमीन किती लागवडीस आणायची ती ठरवू. दगडधोंडा सारे दूर करायचे. ट्रॅक्टर मिळणार आहे आणि आपले शे-पाचशे हात आहेत. भूमातेच्या कुशीत जितके घुसू तितके ती देईल. तिकडे चरांचे संडास आहेत. त्यातच सर्वांनी शौचास जायचे. आडोसा आहेच वर माती टाकीत जा. घाणीतून स्वर्ग निर्मिता येतो. पिकेल ते सर्वांचे. कोणाला येथे ददात राहणार नाही. एक नवीन स्वर्गच जणू आपण निर्मू.”

मालतीच्या अंगात ताप होता. घना नि सखाराम तिच्याजवळ बसले होते.

“म्हटले—तुम्हांला वेळ होतो की नाही इथे बसायला!” मालती म्हणाली.

“सर्वांची व्यवस्था लावणे हे पहिले काम. मी एकदा येऊन गेलो. मला वाटले, तुम्हांला झोप लागली आहे. हळूच निघून गेलो. परंतु उद्या ताप उतरेल असे मला वाटते.” घना म्हणाला.

“कशावरून?” तिने विचारले.

“मी आलो, आता ताप जाईल.” तो म्हणाला.

आणि खरोखरच दुस-या दिवशी मालतीचा ताप निघाला. जणू जादू झाली. आलेल्या कामगार मायबहिणींनी तिची चौकशी केली. पार्वतीने तिचे पाय चेपले.

“पार्वती, तू आलीस?” तिने विचारले.

“तुमच्याजवळ रहायला आले. येथे मोकळ्या हवेत राहू. खपू नि खाऊ. देवाचे नाव घेऊ. तुम्ही ब-या व्हा. मुलांना शिकवा.” पार्वती म्हणाली.

“मी तुमच्याबरोबर काम करीन.”

“असे आजारी पडायला का? काम कराच, परंतु शिकवण्याचे करा.”

“मी खणीन, पेरीन, कापणी करीन, जंगलातून लाकडे आणीन.”

“बरे-बरे. आधी बरी हो.”

सारे लोक कामाला लागले होते. कुणी रसोड्यात काम करीत होते. लहान मुलेही कामात गुंतली, रिकामे कुणी नाही. ते सर्वांचे काम होते. मध्येच रानफुलांचा गुच्छ घेऊन घना मालतीकडे आला.

“जा कामाला. इकडे कशाला आलेत?” ती रागाने म्हणाली.

“ही जंगलातील फुले आणली आहेत.”

“तुम्ही का जंगली आहात?”

“आणि तू का नाहीस?”

“मला तू म्हटलेत! फजिती झाली. किती छान आहेत फुले! तुम्हांला जंगली म्हटले म्हणून रागावलात? जंगलातच नाही का आपण राहात? जंगलात मंगल निर्मायचे. खरे ना?”

“तू दोन दिवस कामाला येऊ नको. आजारी पडणे पाप आहे!”

“तुम्ही जवळ असल्यावर का आजारी पडेन” अमृत जवळ असून का कोणी मरेल?”

“तू कवी झालीस की काय?”

“येथील सुंदर सृष्टी बघून कोण कवी होणार नाही?”

“आपणाला येथे धनधान्य निर्मितीचे काव्य फुलवायचे आहे.”

“सारी ओसाड जमीन लागवडीस आणा.”

“शक्ती अजमावून काम हाती घेऊ. मी जातो. मला भूक लागली आहे.” घना गेला. तिकडून सखाराम जेवून येत होता.

“अजून तरी ताप नाही.” तो म्हणाला.

“जा—जेव. तू आजारी पडू नको.” सखाराम म्हणाला.

दिवस जात होते. सारी जमीन नांगरून झाली. काही काही तात्पुरती पिके नदीच्या पाण्यावर करण्यात आली होती. भाजीपाला लावण्यात आला. फुलझाडेही फुलू लागली होती. सर्वांना अपार उत्साह वाटत होता.

आणि पावसाळा आला. जमीन भिजली. वाफसा होऊन पेरणी करण्यात आली. सर्वांना आनंद झाला. पिके वाढत होती. फुले फुलत होती. मुले खेळत होती. मोठी माणसे काम करीत होती. स्वर्गनिर्मिती होत होती.

घना, सखाराम व इतर सारे देशाचे काय होणार इकडेही लक्ष देत होते. वर्तमानपत्रे येत. चर्चा चालत. फाळणी होणार, हे ऐकून प्रथम सर्वांना वाईट वाटले. परंतु घनाने सा-या गोष्टी नाट समजावून दिल्या.

तो म्हणाला, “आज ना उद्या हे प्रश्न उपस्थित झालेच असते. सलग अशा कोट्यावधी लोकांना तरवारीच्या जोरावर कोण कोठवर रोखून धरणार? आपणास गेल्या हजार वर्षांत एकजीव होता आले नाही, ही गोष्ट खरी. संतांनी, ध्येयवादी लोकांनी प्रयत्न केले; परंतु सहा हजार मैलांवरची साम्राज्यसत्ता आली आणि तिने तो पूर्वजांचा समन्वयप्रयोग धुळीला मिळवला. फोडा नि झोडा—यावरच तर साम्राज्यशाही टिकत असते. एकत्र राहून रोज कटकटी असण्याऐवजी दूर होऊनही समंजस राहिले तर चांगलेच म्हणायचे, ही गांधीजींची दृष्टी असावी. दोन देशांत एक आत्मा, एक मन निर्मिण्यासाठी ते सारी शक्ती खर्चतील. आपल्याकडे जे मुसलमान बंधू राहतील त्यांना निर्भय वाटेल असे वर्तन हवे. आपण भारतवर्षाचे दहा हजार वर्षांचे, सर्वांना एकत्र नांदवून बघण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी झटू. आपल्या या लहानशा वसाहतीत आपण तो प्रयोग करीतच आहोत. येथे आपण भूमीच सुपीक करीत आहोत. येथे लाला आहे, कुतुब आहे, अहमद आहे; तसेच रामदास, बाबू, रघुनाथ वगैरे आहेत. येथे स्पृश्य आहेत, येथे अस्पृश्य आहेत. आपण भेदांपलीकडे जाऊन मानवतेची स्थापना येथे करीत आहोत.”

१५ ऑगस्ट १९४७! हिंद स्वातंत्र्य घोषवण्यात आले. त्या वसाहतीत तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. रानफुलांच्या माळांची तोरणे सर्वत्र लावण्यात आली. नवीन केलेल्या बगीचातील काही फुले त्या माळांत नि तोरणांत होती.

परंतु एकेक विलक्षण वार्ता कानावर येऊ लागल्या. निर्वासितांच्या करुण वार्ता कानावर येऊ लागल्या. कत्तली, मारामा-या. सखाराम खिन्न झाला. देशात शांती यावी म्हणून त्याने तीन दिवस उपवास केला. तो त्यांच्या वसाहतीच्याजवळच एक गंभीर दृश्य त्यांना आढळले. त्या पाहा. काही बैलगाड्या जात आहेत. कोण आहे त्यांच्यात? रामदास नि बापू गेले. ती दहा मुसलमान कुटुंबे होती. ती दूरच्या एका गावची होती. त्या गावच्या लोकांनी, ‘येथून जा’ असे त्यांना सांगितले. काय करतील बिचारे? होते नव्हते ते गाड्यांत घालून जात होते.

“कोठे जाणार?” रामदासने विचारले.

“अल्लाको मालूम!” एकजण दु:खाने म्हणाला.

“तुम्ही आमच्यात रहा. आमच्यात मुसलमान मित्रही आहेत. आम्ही येथे सहकारी जीवन जगतो. सारे भाऊ भाऊ जणू बनलो आहोत. प्रभूनेच तुम्हांला रस्ता दाखवला असेल. नका जाऊ दूर. ही मुले भुकेली आहेत.” रामदासने गोड वाणीने सांगितले.

इतक्यात कुतुब, लाला, अहमद हेही आले.

“यहीं रहना. ये सब दोस्त है. खतरा नहीं, धोखा-दगा नहीं. सबके साथ काम करना, मैजमें रहना.” कुतुब म्हणाला.

घना व सखारामही आले. त्यांनी त्या सर्वांना आपल्या वस्तीत नेले. त्यांची त्यांनी व्यवस्था केली. मुलांना दूध देण्यात आले.

तिकडे महात्माजी देशातील ज्वाला शांत करीत होते. स्वराज्य आले, परंतु राष्ट्राचा आत्मा मला कोठेच दिसत नाही, असे ते करुणपणे म्हणाले.

घना व सखाराम दु:खी होते. परंतु दु:ख विसरून ते सर्वांबरोबर राबत. पावसाळा संपत आला. पीक मस्त आले. ज्वारी, बाजरी, मकई यांचे पीक. आणि रब्बीच्या पिकाचीही पेरणी झाली. गहू, हरबरा पेरण्यात आला. तिकडे थंडीत होणा-या कोबी वगैरे भाज्या लावण्यात आल्या. काकड्या, भोपळे भरपूर लागले. एकेक भोपळा मोठ्या हंड्याएवढा; आण् टमाटोची नवीन लागवड खूप करण्यात आली. थोडे थोडे सोनखत त्यांना टाकण्यात आले.

एके दिवशी अमरनाथ अकस्मात आला. तो तेथील लोकांना महात्माजींचा आशीर्वाद घेऊन आला होता. अमरनाथ दिल्लीस गेला होता. या नवप्रयोगाची माहिती त्यांनी गांधीजींना दिली. मुसलमान निर्वासितांना कसे आपल्यात घेतले ते सांगितले. त्यांनी वसाहतीला आशीर्वाद दिला. अमरनाथने सरदारांचीही भेट घेतली. वसाहतीचा प्रयोग उद्या विलीनी-करणानंतरही चालू रहायला हवा, या प्रयोगाला मदत मिळायला हवी, असे त्याने सांगितले. त्या प्रयोगाची हकीगत ऐकून सरदारांनी धन्यवाद दिले. अमरनाथ या सर्व गोष्टी सांगायला आला होता.

त्याने सारी शेती पाहिली. तो प्रसन्न झाला.

रात्री सर्वांना जमवून तो म्हणाला, “काळ बदलला आहे. राजे-रजवाड्यांचे युग जात आहे. इंदूर वगैरे संस्थाने विलीन होऊन एक नवीन प्रांत बनवला जाईल. परंतु जो नवे मंत्रिमंडळ येईल ते तुमच्या प्रयोगास सर्वतोपरी मदत देईल. मी दिल्लीला अनेकांना भेटून तुमच्या प्रयोगाची माहिती त्यांना सांगितली. सर्वांनी तुम्हांला धन्यवाद दिले आहेत. आणि तुम्ही परित्यक्त मुसलमान बंधुभगिनींनाही आपल्यात घेतलेत, हे ऐकून गांधीजींचे डोळे आशेने चमकले! तुमच्या या प्रयोगाला त्यांनी शुभ इच्छिले आहे. आणखी काय पाहिजे? असेच येथे खपा. बाहेरची शेती करा नि हृदयाची करा. शेती उभय प्रकारची असते. ज्वारी-बाजरी-गव्हाची ही बाहेरची शेती, आणि प्रेम, दया, धैर्य, ज्ञान, यांची मानसिक शेती. दोन्ही पिके येथे मस्त येवोत.”

अमरनाथ गेला.

थोड्या दिवसांनी वसाहतीचा पहिला वाढदिवस आला. परंतु देशातील परिस्थिती लक्षात घेऊन तो साजरा करण्यात आला नाही. दिवस जात होते. गांधीजींच्या उपवासाची, बाँब फेकल्याची आणि अखेर त्यांच्या खुनाची, -- अशा हृदयद्रावक वार्ता आल्या. सर्वांची तोंडे सुकून गेली. एक दिवस सर्वांनी उपवास केला.

सखाराम म्हणाला, “गांधीजींनी दु:ख गिळून कर्तव्य करायला शिकवले आहे. ते आपण करीत राहू. आपण येथे नीट नांदू तर ते आपल्याजवळ आहेत असा अनुभव येईल.”

काही दिवस वातावरण उदास होते. परंतु कामात पुन्हा सारे रमले. दुसरे वर्ष सुरू झाले होते. मालती लहान मुलांमुलींना शिकवी. ती त्यांच्या बरोबर काम करी, त्यांना गोष्टी सांगे. गाणी शिकवी. मोठ्या माणसांना सखाराम, घना हे शिकवीत. कोणी निरक्षर रहायचे नाही असा संकल्प होता. पार्वतीने तर ध्यास घेतला शिकण्याचा. ती आता वर्तमानपत्रे वाचू लागली होती.

वसाहतीला रंगरूप येत होते. नव-सृष्टी, नव-संस्कृती निर्माण होत होती.

श्रमणा-या, धडपडणा-या ध्येयार्थी जीवांनो, श्रमा. तुमची धडपड वाया जाणार नाही!

***