Khara Mitra - 5 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | खरा मित्र - 5

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

खरा मित्र - 5

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने

सोन्याची साखळी

एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या; परंतु दोघींनाही मूलबाळ नव्हते. आपल्या राज्याला पुढे वारस कोण, असा विचार मनात येऊन राजा दु:खी होई. कशाला हे राज्य, कशासाठी ही धनदौलत, ही कोणाच्या स्वाधीन करू, असे विचार सारखे त्याच्या मनी घोळत. राजाचे दु:ख पाहून राण्याही दु:खी होत्या.

एके दिवशी कोणी तरी एक बोवा आला होता. एक राणी तेथे होती. राणी रडत होती. बोवाजी म्हणाला, 'राणी, राणी तुझ्या डोळयांत का पाणी? राजाची राणी असून दु:खी का? दासदासी पदरी असून दु:खी का? रथ, घोडे हत्ती असून दु:खी का? तुम्हाला काय कमी? तुम्हाला कसला तोटा? तुम्हासारख्या श्रीमंतांनी रडावे मग गरिबांनी काय करावे? देवाने तुम्हाला भाग्य दिले. रडू नका, रूसू नका, सुखाने नांदा.'

डोळयांत पाणी आणून राणी म्हणाली, 'शेतात पीक नाही तर शेताला शोभा नाही; तळयात कमळ नाही तर तळयाला शोभा नाही; आकाशात चंद्र नाही तर आकाशाला शोभा नाही; झाडाला फळ नाही तर झाडाला शोभा नाही; शिंपल्यात मोती नाही तर शिंपल्याला शोभा नाही. महाराज, जिला पुत्र नाही, त्या स्त्रीच्या जगण्यात काय अर्थ? मला 'आई' अशी हाक कोण मारील? पुत्रवती जी आहे तीच खरी सुखी, तीच भाग्याची, तीच दैवाची. देवाने सारे दिले परंतु हे दिले नाही; देवाने सोने दिले परंतु सोनुकला दिला नाही. मी रडू नको तर काय करू? राजाचे दु:ख पाहून मला प्राण नको असे वाटते. तुम्ही तरी कृपा करा, मला मुलगा द्या.'

बोवाजीस दया आली. तो म्हणाला, 'माझ्या कृपेने तुम्हाला पुत्र होईल; परंतु दुसरी राणी त्या मुलाचा द्वेष करील. त्याला मारू पाहील. म्हणून मी एक युक्ती करतो. तुमच्या मुलाचे प्राण तुमच्या या राजधानीत जे मोठे तळे आहे. त्या तळयात जो एक सोन्यासारखा मासा आहे त्याच्या पोटात ठेवतो. त्या माशाच्या पोटात मी एक सोन्याची साखळी ठेवीन. ती जोपर्यंत तेथे आहे. तोपर्यंत तुमच्या मुलाचे प्राण सुरक्षित राहातील.'

राणीला वर देऊन तो बोवाजी निघून गेला. पुढे काही दिवस गेले. राणीला मुलगा झाला. नवानवसाचा मुलगा. कोण आनंद, कोण उत्सव! मोठमोठया श्रीमंतांच्या बायका राणीला बाळंतविडा घेऊन आल्या. बाळ कसा नक्षत्रासारखा होता. ही राणी राजाची आवडती राणी झाली. राजा दुसर्‍या राणीचे तोंड देखील पाहीना. ती राणी या राणीचा हेवा करू लागली, हिच्या मुलास पाण्यात पाहू लागली. त्या गोड मुलाला पाहून सार्‍यांना आनंद होई, परंतु त्या सावत्र आईचा संताप होई. सावत्र आई कधी त्याला मारी, कधी रडवी.

राजपुत्र दिवसेंदिवस वाढत होता. तो आता पाचसहा वर्षांचा झाला. बाहेर हिंडे, फिरे, खेळे. तो सर्वांचा आवडता होता. सर्वांना हवासा वाटे. त्याला गर्व नव्हता. तो कोणाशी भांडत नसे. सार्‍यांशी खेळे. दिसायला गोड व गुणांनी गोड. बाहेर गोरापान होता, तसाच मनाचा निर्मळ होता. आनंदात दिवस जात होते. राजपुत्राला कबुतरे फार आवडत. त्याने सुंदर कबुतरे पाळली होती. एक दिवस त्याचे आवडीचे कबुतर उडाले, ते थेट सावत्र आईच्या घरात शिरले. राजपुत्र रडत तेथे गेला. तो म्हणाला, 'माझे कबुतर दे. 'ती सावत्र आई म्हणाली, 'देत नाही जा. तुझी कबुतरे माझ्या घरात कशाला शिरतात? मारून टाकते त्याला. तुमचे होतात खेळ, परंतु आम्हाला त्रास. घरात कबुतरे येतात, हगतात, घाण करतात. जा, नीघ येथून. 'राजपुत्र रडू लागला. शेवटी त्या सावत्र आईने ते कबूतर दिले. राजपुत्र आनंदात व हसत गेला.

परंतु रोज आपले असे व्हावयाचे. ते कबुतर त्या सावत्र आईच्या घरात नेमके उडून जायचे. राजपुत्र तिची मनधरणी करावयाचा व मग ते मिळावयाचे. एके दिवशी ती सावत्र राणी काही केल्या कबुतर देईना. राजपुत्र म्हणाला, 'तू सांगशील ते मी करीन, परंतु माझे कबुतर दे. 'सावत्र आई म्हणाली, 'तुझया आईला तू तुझा प्राण कशात आहे ते विचार. ती जे सांगेल, ते मला येऊन सांग. कबूल कर, म्हणजे कबुतर देते.' राजपुत्राने कबूल केले.

कबुतर घेऊन राजपुत्र गेला. तो खेळात दंग झाला. दिलेले वचन विसरला. दुसरा दिवस उजाडला. पुन्हा ते कबुतर गेले. सावत्र आईजवळ राजपुत्र रडत आला. ती रागाने म्हणाली, 'देत नाही. मेल्या, तू खोटारडा आहेस. दिलेले वचन पाळीत नाहीस, दिलेले शब्द मानीत नाहीस. हो चालता येथून.' राजपुत्र गयावया करू लागला. 'आईला आज विचारतो व तुला येऊन सांगतो. एरवी जेवणार नाही. विद्येची शपथ. 'असे तो म्हणाला. सावत्र आईने कबुतर दिले.

राजपुत्र कबुतर घेऊन आपल्या आईजवळ आला. आईने त्याचा मुका घेतला त्याच्या सुंदर केसांवरून हात फिरवला. त्याच्या तोंडावरचा घाम तिने पदराने पुसला. बाळ आईला म्हणाला, 'आई, माझा प्राण कशात आहे ते मला सांग, तू सांगितले नाहीस तर मी जेवणार नाही. मला खरे सांग. खोटे कधी सांगू नये. 'राणी म्हणाली, 'बाळ, हे वेड कोणी शिकविले? कोणी तुला विचारावयास सांगितले? असल्या गोष्टी विचारू नये. तू खावे, खेळावे, सुखाने नांदावे. 'राजपुत्र ऐकेना. तो हटट धरून बसला व रडू लागला. शेवटी राणीच्याने राहवेना. ती म्हणाली, 'ऐक, रडू नको. रडूनरडून डोळे सुजले. किती बरे रडशील! ऐक; परंतु दुसर्‍या कोणास सांगू नकोस. आपल्या गावात जे मोठे तळे आहे, त्यात जो सोन्यासारखा मासा आहे, त्या माशाच्या पोटात एक सोन्याची साखळी आहे. त्या साखळीत तुझे प्राण आहेत. जा, आता खेळ, कुणास सांगू नकोस.'

राजपुत्र बाहेर गेला. तो सावत्र आईकडे आला. त्याच्या मनात शंका नव्हती, लहान मुलाला शंका नसते. त्याचे मन निर्मळ असते, जसे गंगेचे पाणी. लहान मुलांचा सर्वांवर विश्वास असतो. राजपुत्राने आईने जे सांगितले, ते सावत्र आईस सांगितले व खेळावयास निघून गेला.

त्या सावत्र आईने गावातील एका कोळयाला बोलावले. ती त्या कोळयाला म्हणाली, 'रात्रीच्या वेळी त्या तळयावर जा. त्या तळयातील मासे पकड. त्या माशांत एक सोनेरी रंगाचा मासा आहे, तो पकडून घेऊन ये.'

बाहेर रात्र झाली. सारी सृष्टी झोपली. घुबडे जागी होती आणि तो कोळी जागा होता. त्याने आपले भले जाळे टाकले होते. जाळे टाकी व थोडया वेळाने ओढी, किती तरी मासे त्याने मारले, परंतु सोनेरी मासा दिसेना. आता शेवटचे एक वेळ जाळे टाकू असे म्हणून त्याने जाळे फेकले व ओढले, एकच मासा त्यात आला होता व तो चमकला. कोळयाला आनंद झाला. सोन्यासारखा मासा त्याने पिशवीत घातला. केव्हा उजाडतो याची तो वाट पाहू लागला.

सकाळ झाली. सूर्यनारायण वर आला. फुले फुलली. तळयातून कमळे माना वर करून सूर्यास पाहून हसू लागली; परंतु राजपुत्र आज अजून उठला नाही. त्याचे तोंड हसले नाही. त्याची आई त्याला पाहावयास गेली. बिछान्याजवळ जाऊन राणी म्हणाली, 'ऊठ बेटा, किती उजाडले. तो बघ चौघडा वाजत आहे. मंदिरात आरती होत आहे. ऊठ राजा. आज तोंड सुकलेले का? रात्री नीज नाही का आली? मी नेहमी म्हणते, माझ्या कुशीत नीज. आईच्या कुशीतच बाळाला खरी झोप येते. बरे नाही का वाटत?'

राजपुत्राला बरे वाटत नव्हते. त्याचे प्राण कासावीस होत होते. जीव व्याकुळ झाला होता. जिकडेतिकडे एकच हाक झाली. राजा आला. राजपुत्राच्या बिछान्याशेजारी सारी बसली. हकीम, वैद्य सारे जमले. मोठमोठे धन्वंतरी आले, नाडी पाहू लागले, लक्षणे पाहू लागले. कोणालाही परीक्षा होईना. सर्वांची तोंडे सुकून गेली. 'आई, आई' असे राजपुत्र म्हणे व तळमळे; त्या वेळेस सर्वांच्या डोळयांना टचकन् पाणी येई.

इकडे तो कोळी सावत्र आईकडे आला. त्याने तो मासा तिला दिला. ती राक्षसीण आनंदली. त्या कोळयाला तिने गळयातील मोत्यांचा हार दिला. कोळी मनात म्हणाला, 'एक रात्रभर उजागरा केला, शंभरदा जाळे फेकले, दमलो, परंतु जन्माचे दारिद्र गेले. घरची ददात गेली, माझी मुलेबाळे सुखाने खातील.'

कोळी निघून गेला. राणीने हातात सुरी घेतली. इकडे राजपुत्राचे प्राण फारच कासावीस होऊ लागले. 'वाचवा हो माझ्या बाळाला! कोणी तरी वाचवा हो!' असा हंबरडा त्याची आई फोडू लागली.

सावत्र आईने तो मासा चिरला. त्या माशाच्या पोटात सोन्याची साखळी होती. ती काढून तिने आपल्या गळयात घातली. तिने ती गळयात घालताच इकडे राजपुत्राचे प्राण निघून गेले. आईच्या मांडीवर तो मरून पडला. तेथील शोक किती वर्णावा, किती सांगावा? आईचा पुत्रशोक आईलाच ठाऊक. दुसर्‍याला त्याची कल्पना कोठून येणार?

राजपुत्राच्या शरीराला अग्नी देणार इतक्यात प्रधानाचा मुलगा तेथे आला. त्याचे राजपुत्रावर फार प्रेम होते. तो राजाला म्हणाला, 'हा देह जाळू नका. हा मला द्या. मला नाही म्हणू नका. 'राजा म्हणाला, 'जशी तुझी इच्छा. घेऊन जा हा देह. 'सारी मंडळी घरी गेली. प्रधानाच्या मुलाने तो देह पालखीत घालून घरी नेला. पुढे त्याने काय केले? गावाबाहेर त्याच्या मालकीची एक मोठी बाग होती. त्या बागेत बरोबर मध्यावर त्याने एक सुंन्दर इमारत लगेच बांधविली. एका दिवसात ती इमारत तयार झाली. त्या इमारतीत एक सुंदर पलंग ठेवण्यात आला व त्या पलंगावर त्याने राजपुत्राचा मृत देह ठेवून दिला.रात्रीची वेळ झाली. सावत्र राणीला फार आनंद झाला होता. त्या आनंदात तिला झोप येईना. गळयातील ती माळ खुपत होती. तिने ती सोन्याची साखळी गळयातून काढताच तिकडे बागेत तो राजपुत्र जिवंत झाला. तो जिवंत होऊन पाहातो तो आजूबाजूस कोणी नाही तो बागेत हिंडला शेवटी दमून त्या पलंगावर जाऊन निजला. रोज आपले असे व्हायचे. रात्री राजपुत्र जिवंत व्हायचा व दिवसा मरून पडायचा. जणू रात्री जागा असे दिवसा झोपत असे.

प्रधानाचा मुलगा एक दिवस सकाळी बागेत गेला. तो त्या इमारतीत शिरला. राजपुत्र एका कुशीवर झोपल्यासारखा पडला होता. राजपुत्राने तोंड टवटवीत दिसत होते. देह सडला नाही, कुजला नाही. घाण सुटली नाही. प्रधानाच्या मुलास आश्चर्य वाटले. रात्री येऊन पाहावे असे त्याने ठरविले.

रात्र झाली. बाहेर सुंदर चांदणे पडले होते. सावत्र राणी झोपली होती. तिने गळयातील साखळी काढून ठेवली. इकडे राजपुत्र जागा झाला. खावयास न मिळाल्यामुळे तो अशक्त झाला होता. अंथरूणातच तो पडला होता व विचार करीत होता इतक्यात प्रधानाचा मुलगा तेथे आला त्याला पाहाताच तो उठून बसला. मित्र मित्राला भेटला. क्षणभर दोघांना बोलवेना, हृदये भरून आली होती. दोघांना गहिवर आला होता. राजपुत्र म्हणाला, 'मी रोज रात्री जागा होता; परंतु उजाडते कधी ते समजतच नाही. मी दिवसा मरून पडतो व रात्री जिवंत असतो. 'प्रधानाचा मुलगा आश्चर्य करू लागला, परंतु तो आपल्या मित्रास म्हणाला, 'आधी ही फळे आणली आहेत, ती तर खा. रोज तुला मी रात्री खावयास घेऊन येईन. तू काळजी करू नकोस. हे कोडे काय ते उलगडलेच पाहिजे.' दोघे मित्र बागेत हिंडते, फिरले. शेवटी येऊन दोघे निजले. बाहेर उजाडले. पाखरांच्या किलबिलीने प्रधानचा मुलगा जागा झाला, परंतु त्याचा मित्र तेथेच मरून पडला होता.

प्रधानाचा मुलगा रोज रात्री तेथे खावयास येऊन येई. कधी तेथेच झोपे. कधी घरी जाई. कधी गावाला जावयाचे असले म्हणजे तो दोनचार दिवसांना पुरेल इतके खाणे तेथे कपाटात ठेवून जाई. असे चालले होते.

एके दिवशी दूर एका रस्त्याने एक गरीब बाई चालली होती. ती म्हातारी होती. तिच्याबरोबर तिची मुलगी होती. मुलगी मोठी देखणी होती. आपल्या म्हातार्‍या आईला तिचा हात धरून ती नेत होती. इतक्यात कोणी तरी एक विचित्र प्राणी त्यांना दिसला. म्हातारी त्या प्राण्याला म्हणाली 'तू कोण? आमच्याबरोबर तू का येतोस? तुझी आम्हास भीती वाटते. 'तो प्राणी म्हणाला, 'मी तुझ्या मुलीचे नशीब. मी तिच्याबरोबर नाही जाणार, तर कोणाच्या? तू बुढढी झालीस. तुझ्या नशिबाचे सारे खेळ संपले. आता मुलीच्या नशिबाचे खेळ सुरू होतील.'

ती म्हातारी म्हणाली, 'माझ्या मुलीच्या नशिबी काय आहे? कशी सोन्यासारखी पोर आहे; परंतु आम्ही पडलो गरीब. राजाला राणी शोभेल अशी आहे माझी मुलगी; परंतु काय तिच्या नशिबी आहे कोणास कळे? माझ्यासारख्या भिकारणीच्या पोटी तिने जन्म घेतला, म्हणून हे हाल. तिचे पाय फुलाहून कोवळे आहेत, प्राजक्ताच्या फुलाहून नाजुक आहेत; परंतु अनवाणी चालावे लागते. ते पाही तिचे पाय सोलून निघाले आहेत. 'तो प्राणी म्हणाला, 'म्हातारे, उगीच ऐट कशाला सांगतेस? तुझ्या मुलीचे नशीब वाईट आहे. तिचे प्रेताजवळ लग्न लागणार आहे!'

ते शब्द ऐकून म्हातारी धाडकन् खाली पडली. तो प्राणी दिसेनासा झाला. ती मुलगी धीराची होती. तिने पळसाच्या पानांचा द्रोण करून पाणी आणले. आईच्या डोळयांना लावले. झाडाच्या पानांनी ती वारा घालीत बसली. म्हातारीने डोळे उघडले. 'पोरी, कसे ग तुझे होणार? असा ग कसा देव!' असे म्हणून म्हातारी लहान मुलाप्रमाणे रडू लागली. ती शहाणी मुलगी आईला धीर देऊन म्हणाली, 'आई, ऊठ. देव करतो ते सारे बर्‍यासाठी. त्याचा हेतू चांगलाच असतो. तो विष देवो, अमृत देवो; पाऊस देवो, ऊन देवो; सर्व आपल्या कल्याणासाठीच असते. देवाच्या दयेबद्दल शंका का घ्यावी? ती बघ झाडे हलत आहेत, तुला वारा घालीत आहेत. देवाचे हातच जणू तुला विंझणे वारीत आहेत. ऊठ आई.'

आईचा हात धरून ती धीराची मुलगी चालू लागली. होता होता सायंकाळ झाली. राजाची राजधानी दिसत होती. आईचा हात धरून मुलगी चालत होती. आता अंधार पडला. आईला तहान लागली होती. आता रात्री पाणी कोठे मिळणार? कोठे शोधणार? परंतु फुलांचा वास येत होता. जवळपास बाग असावी असे त्या मुलीला वाटले. ती आईला म्हणाली, 'आई, तू येथे बैस. कोठे तरी जवळच बाग असावी. फुलांचा वास येत आहे. रातराणीचा, निशिगंधाचा, प्राजक्ताच्या कळयांचा वास येत आहे. 'असे म्हणून ती मुलगी पाणी शोधावयास निघली.

ती प्रधानाच्या मुलाची गावाबाहेरची बाग होती. केवढी थोरली अफाट बाग होती. एकदा आत मनुष्य शिरला की बाहेर निघणे कठीण. रात्रीच्या वेळी कोणी अनोळखी नवखा मनुष्य शिरला की बाहेर पडणे शक्य होत नसे. उजाडले म्हणजे तो बाहेर पडे. ती मुलगी त्या बागेत शिरली. पाणी शोधीत चालली. शेवटी एका कारंजाजवळ आली. रात्रीची वेळ होती. कर्दळीची पाने तिने तोडली, परंतु त्या झोपलेल्या पानांना तोडण्याआधी तिने नमस्कार केला व क्षमा मागितली. त्या पानांचा द्रोण करून तो पाण्याने भरून घेतला व ती निघली. परंतु तिला रस्ता सापडेना. तिला बागेतून बाहेर पडता येईना घुटमळत राहिली, हिंडत राहिली. 'माझी आई तहानेली असेल, पाणी पाणी म्हणून प्राण सोडील' असे म्हणून ती रडे व भिरीभिरी हिंडे, परंतु रस्ता सापडेना.

आता बरीच रात्र झाली होती. प्रधानाचा मुलगा गावाला गेला होता. आज राजपुत्र एकटाच होता. तो रात्री जिवंत झाला व बागेत हिंडू लागला. हिंडता हिंडता त्या मुलीची व त्याची गाठ पडली. ती दोघे एकमेकांकडे पाहात राहिली. 'माझी आई' एवढा एकच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडला. त्या राजपुत्राने सारी चौकशी केली. तो म्हणाला, 'चल, मी तुला रस्ता दाखवतो. 'किती तरी दिवसांत राजपुत्र बागेच्या बाहेर पडला नव्हता. दोघेजण बागेच्या बाहेर आली व आईला शोधीत फिरू लागली. सापडली एकदाची आई.

'आई, हे पाहा पाणी, आई' तिने हाक मारली. आईचे डोके तिने मांडीवर घेतले. आईने डोळे उघडले. 'बाळ, माझा प्राण वाचत नाही. घाल शेवटचे पाणी. तुझ्या हातची गंगा. तुझे कसे होईल?' असे म्हणून म्हातारी मांडीवर पडली. तो राजपुत्र म्हणाला, 'तुमच्या मुलीची काळजी करू नका. मी राजपुत्र आहे. मी तिला माझी बायको करीन. आमचे हात एकमेकांच्या हातांत द्या व आम्हा दोघांस आशीर्वाद द्या.'

म्हातारीने थंडगार होत जाणार्‍या हातांनी आपल्या मुलीचा हात राजपुत्राच्या हातात दिला. झाडावरून फुले डोक्यावर पडली. म्हातारीने दोघांच्या डोक्यावर ते सुकलेले परंतु प्रेमाने भरलेले हात ठेवले व म्हणाली, 'देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो! मुलेबाळे देवो! सुखात ठेवो! एकमेकांस अंतर देऊ नका. कसेही दिवस येवोत, देवाला विसरू नका, उतू नका, मातू नका; कोणाचे वाईट करू नका, वाईट चिंतू नका. कोणाचा हेवादावा नको, मत्सर नको. मी आणखी काय सांगू? माझ्याने बोलवत नाही. आता देवाचे नाव घेत सुखाने मरू दे. 'असे म्हणून ती 'राम राम' म्हणू लागली.

म्हातारीचा प्राण गेला. त्या दोघांनी तो मृत देह बागेत नेला व त्याला अग्नी दिला. दोघेजण दमली होती. ती मुलगी रडत होती. राजपुत्र तिचे सांत्वन करीत होता. हातपाय धुवून दोघे त्या घरात आली. राजपुत्राने तिला खाण्याचा थोडा आग्रह केला. तिने दोन फळे खाल्ली. नंतर राजपुत्राने तिला सारी हकीगत सांगितली, 'मी सकाळी मरून पडेन, परंतु रात्री जागा होईन. काही काळजी करू नकोस. शेवटी चांगले होईल. 'असे म्हणाला.

आपल्या नशिबी काय आहे ते तिला आठवले. 'प्रेताशी लग्न लागणार' हे शब्द तिला आठवले. काय काय होईल ते खरे. आईने हात हातांत दिला. आता यांचे पाय सोडून जावयाचे नाही, आता जन्माच्या गाठी पडल्या;' असे ती मनात म्हणाली.

सकाळी नित्याप्रमाणे राजपुत्र मरून पडला, त्याच्याजवळ ती मुलगी, ती त्याची पत्‍नी बसून राहिली. ती त्याच्या अंगावर माशी बसू देत नसे. वारा घाली. दिवसभर तिने खाल्ले नाही. रामनामाचा जप करीत पतीजवळ बसून राहिली. रात्रीची वेळ झाली. तिकडे त्या सावत्र राणीची झोपायची वेळ झाली. तिने सोन्याची साखळी गळयातून काढून उशीखाली ठेवताच, इकडे राजपुत्र जागा झाला. तो जागा होताच त्या मुलीच्या जिवात जीव आला. दोघांना आनंद झाला. दोघांनी हौदावर जाऊन स्नान केले. त्या बागेत एक शिवालय होते. 'चला, तेथे जाऊन आपण पूजा करू. रोज रात्री आपण त्या मृत्युंजयाची पूजा करीत जाऊ. 'अ ती त्याला म्हणाली. दोघांनी महादेवाची पूजा केली. घरात जाऊन दोघांनी फलाहार केला. राजपुत्र म्हणाला, 'तू दिवसा खात जा, असा उपवास करू नकोस. ' ती म्हणाली, 'तुमच्याशिवाय मी कशी खाऊ? सीता, सावित्री, द्रौपदी, दमयंती, यांच्या कथा मी उगाच का ऐकल्या? असे मला कसे सांगता? स्त्रियांचे हृदय तुम्ही ओळखीत नाही का? तुमच्याशिवाय जेवणे म्हणजे ते विष आहे. त्यात मला आनंद नाही. दिवसा तुमच्याजवळ 'राम राम' म्हणत बसणे तेच खरे आपणा दोघांना जेवण.' आपल्या पत्‍नीचे ते थोर शब्द ऐकून राजपुत्राला कृतार्थ वाटले. आपल्याला देवाने फार थोर मनाची पत्‍नी दिली म्हणून त्याने देवाचे आभार मानले.

प्रधानाचा मुलगा गावाहून आला. आपल्या मित्राला भेटण्यासाठी तो रात्री आला. तो येऊन पाहातो तो बागेत राजपुत्र कोणा स्त्रीबरोबर हिंडत आहे! त्याला आश्चर्य वाटले. राजपुत्राने त्याला सारी कथा सांगितली. प्रधानाच्या मुलास आनंद झाला. तो म्हणाला, 'आता मी जरी गावाला गेलो तरी तू एकटा राहाणार नाहीस. वहिनींना दुपारी जेवायला पाठवीत जाईन. 'ती थोर मुलगी म्हणाली, 'भावोजी, मी दिवसा खाणार नाही. रोज रात्री बरोबरच आम्ही पारणे सोडीत जाऊ. तुम्ही येथेच स्वयंपाकाचे आणून ठेवा. लाकूडफाटे आणून ठेवा. मी माझया हाताने रसोई करीन. माझया हाताने यांना वाढीन, त्यात खरा आनंद आहे. काही तरी सेवा मला घडू दे.'

प्रधानाच्या मुलाने त्याप्रमाणे सारी व्यवस्था केली. बाहेर रात्र पडली म्हणजे ती मुलगी चूल पेटवी व उत्कृष्ट स्वयंपाक करून ठेवी. आपला पतिदेव केव्हा जागा होईल, त्याला आपण नैवैद्य केव्हा दाखवू, याची ती वाट पाहात बसे. तो उठला म्हणजे उभयता स्नान करीत. देवाची पूजा करीत व केळीच्या पानावर जेवत. जेवण झाल्यावर ती भांडी घाशी व राजपुत्र विसळू लागे. ती नको नको म्हणे, परंतु तो ऐकत नसे. एकमेकांना मदत करावी असे तो म्हणे.

असे कित्येक दिवस गेले. त्या बागेत राजपुत्राला एक मुलगा झाला दिवसा मुलाला खेळवण्यात त्याच्या पत्‍नीचा आता वेळ जाई. तेथे एक सुंदर पाळणा टांगला होता. रात्री राजपुत्र मुलाला खेळवी, नाचवी. परंतु असे या बागेत किती दिवस राहावयाचे? राजाला या गोष्टी माहीत नव्हत्या. प्रधानाच्या मुलाशिवाय कोणालाही हे रहस्य माहीत नव्हते. या रहस्याचा उलगडा कसा व्हावयाचा?

प्रधानाचा मुलगा स्वस्थ बसला नव्हता. त्याने कित्येक दासींना त्या सावत्र राणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. एक दिवस सावत्र राणीला जरा बरे बाटत नव्हते. रात्री एक दासी दासी डोके चेपीत बसली होती. राणीला झोप येईना. शेवटी तिला एकदम आठवण झाली.

'खरेच, आज साखळी काढून ठेवली नाही. 'असे म्हणून तिने गळयातील ती सोन्याची साखळी उशीखाली काढून ठेवली. दासीने विचारले, 'काढूनशी ठेवलीत?' राणी म्हणाली, 'ती काढून ठेवली नाही तर ती बोचते व झोप येत नाही. मी रोज ती काढून ठेवते. उशीखाली ठेवते. एक क्षणभरही या साखळीला मी विसंबत नाही.'

दासीला ती गोष्ट महत्वाची वाटली. तिने ती गोष्ट प्रधानाच्या मुलास सांगितली. प्रधानाच्या मुलाच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या. राजपुत्राने ज्या सोन्याच्या साखळीबद्दल सांगितले, तीच ही याबद्दल त्याला शंका राहिली नाही. ती सोन्याची साखळी कशी मिळवावी ते त्याला समजेना.

प्रधानपुत्राने ती गोष्ट राजपुत्र व त्याची बायको यांना सांगितली. राजपुत्राच्या बायकोने धाडस करावयाचे ठरविले. आपल्या पतीचे प्राण कायमचे आपणच परत आणावे असे तिने नक्की नेले.

सकाळची वेळ होती. राजपुत्राच्या बायकोने आपले पाहिले फाटके लुगडे काढले. ती ते नेसली. भिकारणीच्या वेषाने आपल्या मुलास कडेवर घेऊन ती निघाली. तिचे रुप राणीला लाजवील असे होते; परंतु तिची वस्त्रे भिकारणीला शोभतील अशी होती. हिंडता हिंडता ती राजवाडयात आली. सावत्र राणी अंगणात होती. ती भिकारीण राणीला म्हणाली,' 'राणी, राणी, मला नाही कोणी. मला उद्योगधंदा द्या, मी गरीब आहे. तुम्ही सांगाल ते काम करीन. मी तुमचे केस विंचरुन देईन. हलक्या हाताने वेणी घालीन. 'राणीला आश्चर्य वाटले. त्या भिकारणीचे रुप पाहून तिचा मत्सर वाटला. अशी सुंदर स्त्री आपली दासी असावी असे तिने ठरविले.

'त्या पाण्याने हातपाय धुवून ये व माझे केस विंचर बघू. ,असे सावत्र राणी म्हणाली. त्या वेषधारी भिकारणीने तसे केले. हलक्या हाताने ती राणीचे केस विंचरु लागली. एक केस तडतडला नाही. इतक्यात मुलगा रडू लागला. कोण रडते म्हणून दुसरी राणी पाहावयास आली. त्या राणीला पाहाताच सावत्र राणी म्हणाली, 'तुमचा मुलगा नाही आला. तो या जन्मी नाही यावयाचा. काय मेली आशा तरी! म्हणे माझा मुलगा येईल, माझा मुलगा येईल.!

त्या भिकारणीला राजपुत्राची खरी आई कोण हे लगेच समजले. आपल्या पतीचा चेहरा व त्या चेहरा यांत तिला साम्य दिसू लागले. आपल्या सासूच्या पाया पडावे असे तिला वाटले; परंतु तिने धीर धरला. ती राणी त्या रडणार्‍या मुलाजवळ आली व म्हणाली, किती गोड मुलगा आहे! माझा बाळ देखील लहानपणी असा दिसे; परंतु दैवाला नाही पाहावले. देव मला मेलीला नेता तर! परंतु सोन्यासारखी मुले नेतो आणि आम्हाला रडायला ठेवतो! द्या, मी जरा घेते त्याला.'

'काही नको घ्यायला. मी माझी दासी आहे आणि तूही खबरदार त्यांच्याजवळ बोलशील तर. तुला कामावर ठेवणार नाही. 'सावत्र राणीचे शब्द ऐकून ती थोर राणी निघून गेली. ती वेषधारी भिकारीण मुलग्याच्या उगी करुन 'उद्या येईल' असे सांगून गेली.

रात्री राजपुत्राला सारी वार्ता तिने सांगितली. लवकरचे तुम्हाला मी मुक्त करीन असे ती म्हणाली.

तो मुलगा आता चारपाच वर्षाचा झाला होता. त्याला सर्व समजू लागले होते. एके दिवशी मुलाला आई म्हणाली, 'बाळ आज त्या राणीकडे आपण जाऊ, त्या वेळेस तेथे तू मोठयाने रडू लाग. मी किती समजावले तरी उगी राहू नकोस. मी तुला विचारीन. 'का रे रडतोस? तू राणीच्या गळयातील सोन्याच्या साखळीकडे बोट कर. ती सोन्याची साखळी मिळेल, तेव्हाच रडावयाचा थांब.'

मुलाला असे पढवून त्याला घेऊन रोजच्याप्रमाणे ती कामाला आली. सावत्र राणीची वेणीफणी ती करु लागली. जवळच बाळ खेळत होता. तो एकाएकी रडू लागला. राणी म्हणाली, 'त्याला आधी उगी कर. वेणीफणी मागून कर.' काही केल्या बाळ रडायचा थांबेना.

त्याची आई त्याला म्हणाली' का रे असा ओक्साबोक्शी रडतोस? काय झाले? काय हवे तरी? मुलाने राणीच्या गळयातील साखळीकडे बोट केले. राणी म्हणाली, ' लबाडा, सोन्याची साखळी हवी का? माझ्या पोटी का आला नाहीस? देव भिकार्‍यांना खंडीभर पोरे देईल, परंतु श्रीमंताला देणार नाही., त्या मुलाची आई त्याला म्हणाली,' माझ्या पोटी कशाला आलास? पुढच्या जन्मी राजाराणीच्या-पोटी जन्म घे व सोन्यामोत्यांचे दागिने घाल, उगी.' परंतु मुलाचे रडणे थांबेना शेवटी राणीला त्या लेकराची कीव आली 'घाल त्याच्या गळात थोडा वेळ. जरा थांबला रडायचा म्हणजे निजेल. मग हळूच घे' असे राणी म्हणाली. सोन्याची साखळी मिळताच बाळ रडायचा थांबला. आईच्या मांडीवर तो झोपी गेला. ती राजपुत्राची बायको राणीला म्हणाली, 'मी याला घरी निजवून येते. हळूच तुमची साखळी काढून आणून देते. 'राणी म्हणाली, 'जा, परंतु साखळी लवकर घेऊन ये. ती साखळी माझा जीव की प्राण आहे. त्या साखळीला मी कधी विसंबत नाही. फक्त निजताना उशाखाली ठेवते. नाही तर अक्षयी गळयात असते.'

ती वेषधारी दासी मुलाला घेऊन गेली. ती निघाली आणि बागेत आली; तेथे येऊन पाहते तो राजपुत्र जिवंत झालेला. दोघांना फार आनंद झाला. मुलाच्या गळयातील सोन्याच्या साखळीकडे बोट करुन ती म्हणाली, 'हा पाहा तुमचा प्राण. हा मी परत आणला आहे. 'राजपुत्र म्हणाला, 'आईने सांगितली होती, तीच ही साखळी.'

इतक्यात प्रधानाचा मुलगा पण तेथे आला. डाव सिध्दीस गेला हे पाहून त्याला धन्यता वाटली. तो म्हणाला, 'आता मी राजाला जाऊन सांगतो. तुम्हास हत्तीवरुन मिरवीत नेऊ.'

प्रधानाचा मुलगा राजाकडे गेला. त्याने सारे वर्तमान सांगितले. राजाला आश्चर्य वाटले. केव्हा मुलाला, सुनेला, नातवाला पाहीन असे त्याला झाले. राजपुत्राच्या आईस कळले. राणी धावतच आली. ती म्हणाली, 'त्या लहान मुलास पाहून मला माझ्या मुलाची आठवण होई ती उगीच नसे होत. तो माझाच नातू. माझे ह्दय मला सांगत असे. ह्दयाचा सूर खोटा कसा ठरेल! चला, आपण त्याला डोळेभर पाहू. पोटाशी धरु.'

हा हा म्हणता बातमी शहरात पसरली. लाखो लोक निघाले. हत्ती, घोडे, रथ, चतुरंग सैन्य निघाले. हत्तीवर सोन्याची अंबारी ठेवली होती. वाद्ये वाजू लागली. राजा व राणी बागेजवळ आली. सून पाया पडली. त्यांनी तिला आशीर्वाद दिले. मुलगा भेटला. नातवाला जवळ घेऊन, त्याला आजीने कुरवाळले. राजाराणीचा आनंद गगनात मावेना. मिरवीत मिरवीत सारे राजवाडयात आले. राजाने मोठा सोहळा केला. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान झाले, जो जे मागेल ते त्याला मिळाले. सारे सुखी होते. एकच प्राणी दु:खी होता व तो म्हणजे ती सावत्र माता. राजा तिचे नाक कान कापून हाकलून देणार होता; परंतु राजाचा मुलगा उदार होता. त्याने तसे होऊ दिले नाही. 'दया करणे हाच थोर धर्म.' असे तो म्हणाला. तो सावत्र आईच्या पाया पडून म्हणाला. 'माझे प्राण तुझ्या गळयात होते. मी तुझ्या गळयातील ताईत. झाले गेले विसर व मजवर मुलाप्रमाणे प्रेम कर. मी माझ्या आईचा तसाच तुझा. 'सावत्र आईचे ह्दय भरुन आले व ती म्हणाली, 'आजपासून मी तुझी खरी आई झाल्ये'

शेवट गोड झाला

सर्वाना आंनद झाला.

तसा तुम्हा आम्हास होवो.