Khara Mitra - 1 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | खरा मित्र - 1

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

खरा मित्र - 1

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने

आवडती नावडती

एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य होता. त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. जी नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्ट पडत. कोंबडा आवरल्यापासून ती कामाला लागे. ती दिवसभर सारखे काम करी. विहिरीचे पाणी तीच भरी. नदीवर धुण्याची मोट घेऊन तीच जाई. गुराढोरांचे तीच करी. दळणकांडण तीच करी. खटाळभर खरकटी भांडी तीच घाशी. झाडलोट, सडा-सारवण, दिवाबत्ती, सारे तीच करी. क्षणाचीही तिला विश्रांती नसे. इतके काम करूनही तिच्याजवळ कोणी गोड बोलत नसे. तिला गोड घास मिळत नसे. तिच्या वाटयाला रोज उठून शिळवड असायची. नेसू फाटके जुनेर असायचे. निजायला फटकुर मिळायचे. तिच्या अंगाखांद्यावर मणीमगळसूत्राशिवाय काही नव्हते. हातात नीटसा बिल्वरही नव्हता. दागदागिन्यांचे एक असो मेले. त्याच्यावाचून माणसाचे अडत नाही; परंतु फुकाचा गोड शब्द, तोही महाग असावा? परंतु या जगात गोड बोलण्याचाही पुष्कळदा दुष्काळच असतो.

नावडतीची सवत तिला चारचौघांदेखत घालूनपाडून बोलायची. सर्वांच्यादेखत अपमान करायची. चारचौघांत अपमान होण्यापेक्षा मरण बरे असे माणसास वाटते. नावडती मनात म्हणे, 'मेलं मर मर मरावं, उरापोटी काम करावे; परंतु त्याचं चीज नाही. शिव्या, शाप व निंदो. अपमान यांची वर बक्षिशी'' मनुष्य कामाला कंटाळत नाही. 'दमलास हो' असे गोड शब्द त्याच्या जवळ बोला की त्याचा थकवा दूर जातो. मनुष्य प्रेमाचा भुकेलेला आहे. नावडतीला या जगात प्रेम मिळेना. ज्याला सहानुभूती मिळत नाही, प्रेम मिळत नाही, त्याच्याहून अधिक अभागी व दु:खी दुसरे कोण आहे?

मनुष्याच्या सोशिकपणालाही काही मर्यादा आहे. अधिक ताणल्याने तुटते. नावडती एक दिवस वैतागली. ती जिवाला कंटाळली. देव निष्ठुर आहे असे तिला वाटले. कशाला या जगात राहा, असे मनात म्हणून ती बाहेर पडली. त्या जिवंत नरकातून, त्या कोंडवाडयातून ती बाहेर पडली. बाहेर बरीच रात्र झाली होती. सर्वत्र सामसूम होते. दूर काही कुत्री भुंकत होती. कोल्हयांची हुकीहुकी मधून मधून ऐकू येत होती. एखाद्या पक्ष्याचे मध्येच दीनवाणे ओरडणे कानावर येई. आकाशात चंद्र नव्हता. कृष्णपक्ष होता. बाहेर अंधार होता. तार्‍यांचा काय प्रकाश मिळेल तो खरा.

ती नावडती चालली. एकटी चालली. तिचे दु:ख तिच्याबरोबर होते. तिचे अश्रू तिच्याबरोबर होते. तिच्या पायांत काही नव्हते. रस्ता दिसत नव्हता. काटे बोचत होते, दगड टुपत होते, परंतु सवतीने दिलेल्या शिव्याशापांपेक्षा त्या काटयांचे बोचणे, त्या दगडाधोंडयांचे टुपणे अधिक दु:खदायी नव्हते. ठेचाळत, अडखळत ती जात होती.

आत रात्र संपत आली. झुंजमुंज झाले. दंवबिंदू टपटप पडत होते. ते का नावडतीसाठी रडत होते? झाडांवर बसल्या बसल्या पाखरांची किलबिल सुरू झाली. झाडांच्या आकृत्या हळूहळू स्पष्ट दिसू लागल्या. दिशा फांकू लागल्या. प्रकाश पसरू लागला; परंतु नावडतीच्या मनात अंधारच होता. जग जागे होत होते. नावडती कायमचीच झोपायला जात होती.

दाट जंगल समोर होते. त्या जंगलातून ती चालली. जाता जाता काय मला झाली, नावडती ज्या पायवाटेने जात होती, तिच्या जवळच एक तुळशीचा माडा उगवलेला होता. नावडतीचे त्या तुळशीच्या माडयाकडे लक्ष गेले जाणार्‍यायेणार्‍यांनी त्या तुळशीची पाने ओरबाडून खाल्ली होती. ते तुळशीचे झाड दीनवाणे दिसत होते. ती नावडती त्या तुळशीजवळ गेली व तिला नमस्कार करून म्हणाली, 'जय आई तुळसादेवी, तुला वाटेच्या वाटसरूंनी ओरबाडून खाल्ले. तुझी पानांची संपत्ती त्यांनी सारी लुटली; परंतु तुला कोणी पाणी घातले नाही, तुझ्या उघडया मुळांवर कोणी माती लोटली नाही. थांब हो. मी घालते मुळाशी माती, मी देत्ये तुला पाणी-'असे म्हणून नावडती आजूबाजूला पाणी पाहू लागली. एक लहानसा ओढा खळखळ करीत वहात होता. पळसाच्या पानांचा नावडतीने द्रोण केला. त्या द्रोणाने तिने पाणी आणून त्या तुळशीला घातले. आजूबाजूचे रान उपटून तुळशीच्या मुळाशी तिने माती घातली. नंतर तिला नमस्कार करून ती नावडती पुढे निघाली.

मनात विचार करीत ती चालली होती. भेटेल एखादे तळे, दिसेल एखादी नदी, असेल मोठा डोह, त्याच्यात जीव देऊ असे मनात म्हणत ती जात होती. तो काय झाले, तिला एक देवकापसाचे झाड दिसले. देवकापूस छान असतो, त्याचा धागा सुंदर दिसतो. बायका वाती वगैंरे बहुधा या कापसाच्या करतात. म्हणून याला देवकापूस म्हणतात. त्या देवकापशीवरची बोंडे जाणार्‍यायेणार्‍यांनी तोडून नेली होती. त्या झाडाची ती शुभ्र पांढरी दौलत सर्वांनी लुटली; परंतु त्याची काळजी कोणी केली नाही. ना घातली मुळाशी मुठभर माती, ना घातले थेंबभर पाणी. सारे फुकट घेणारे. नावडती त्या झाडाजवळ गेली. जगात सहानुभूती जर मिळाली नाही, कोणी विचारपूस केली नाही, तर जिणे कसे असहय होते, त्याचा तिला अनुभव होतो. ती त्या कापशीच्या झाडाजवळ गेली व म्हणाली, 'उगी, रडू नको कापशीच्या झाडा. मी घालते हो तुला पाणी, मी घालते मुळाशी माती.’ असे म्हणून तिने त्याला पाणी घातले, मातीही घातली. नंतर ती पुढे गेली.

ती आता अधीर झाली होती. अजून कसे आढळत नाही एखादे तळे, एखादी विहीर, एखादा नदीचा डोह असे म्हणत होती. तो वाटेत एक पेरूचे झाड दिसले. येणार्‍याजाणार्‍यांनी त्याचे पेरू नेले होते, खाल्ले होते. नीट पिकण्याचीही कोणी वाट बघत नसत. मारीत दगड. पाडीत पेरू. पाखरांनाही पेरू राहात नसत. कारण पाखरे पेरू पिकला म्हणजे खातात; परंतु माणसाला कुठला धीर. तो आधीच खाऊन टाकी. पाखरे म्हणत, 'हा मनुष्य प्राणी सार्‍या दुनियेचा हावरा दिसतो. भारीच आधाशी सर्वभक्षक आहे.’ परंतु ही नावडती तशी नव्हती. ती त्या पेरूच्या झाडाजवळ गेली व म्हणाली, 'पेरूच्या झाडा, कोणी तुझी विचारपूस केली नसेल, पाणी घातले नसेल; मी घालते हो तुला पाणी, घालते मुळाशी माती.’ तिने त्याप्रमाणे केले व ती पुढे गेली.

ते दाट जंगल संपले व मोकळे मैदान सुरू झाले. सूर्य बराच वर आला होता. आता पायही भाजू लागले; परंतु इतक्यात एक मोठे तळे दिसले. तळेकसले, ते सरोवरच जणू होते. सुंदर कमळे फुलली होती. पाण्यावर मंद लाटा नाचत होत्या. पाण्यात हंस वगैरे पक्षी नावांप्रमाणे डोलत होते. त्या सरोवरला एक बाजूला घाटही बांधलेला होता. नावडती त्या घाटावर जाऊन उभी राहिली. तिचा निश्चय झाला. तिने पदर बांधला. ती आता पाण्यात उडी घेणार तोच 'हे अभागी जीवा, थांब, असा जीव देऊ नकोस. 'असे शब्द तिच्या कानांवर आले.

कोठून आले ते शब्द? अनाथांचा नाथ, दीनांचा कैवारी असा कोण तेथे होता? तेथे एक साधू राहात असे. बाईच्या हावभावांवरून ती जीव देणार असे त्याने ओळखले. त्याचेच ते शब्द होते. ते शब्द ऐकून नावडती चपापली, दचकली. हे जग मला नीट जगूही देत नाही, सुखाने मरूही देत नाही. दुष्ट आहे जग असे तिला वाटले.

तो साधू जवळ आला. तो प्रेमळपणे बाईला म्हणाला, 'तुम्ही जीव का देता? देवाने दिलेला सोन्यासारखा देह का बरे पाण्यात फेकता? हा देह सेवेत राबवावा, परोपकारात झिजवावा, आत्महत्या म्हणजे सर्वांत मोठे पाप नका असा अविवेक करू नका माझे ऐका.'

नावडती म्हणाली, 'महाराज, तुम्ही म्हणता ते खरे. आत्महत्या करणे हे मोठे पाप म्हणून तर आजपर्यंत थांबले; परंतु अत:पर थांबवत नाही, धीर धरवत नाही. कशाच्या आशेवर मी जगू, जगात दिवस काढू? प्रेमाचा एक शब्द मला मिळत नाही. मरू दे मला. मी मेले तर कोणी रडणार नाही. मरणाचे सुख तरी मिळू दे मला.'

साधू म्हणाला, 'कसले तुम्हाला दु:ख आहे?'

नावडती म्हणाली, 'मी आहे नावडती. आवडतीचे सारे गोड. माझे सारे कडू. देवाने रूपलावण्य नाही मला दिले. यात माझा काय दोष? परंतु म्हणून मला छळतात, गांजतात; वाटेल तसे बोलतात. हाल करतात. कुरूप स्त्रीने कशाला जगावे? देव फुलांना, फुलपाखरांना कसे नटवता; परंतु माझ्याच वेळी त्याचं सारं संपलं वाटतं. असो. आपले नशीब. जाऊ दे मला, घेऊ दे उडी.'

साधू म्हणाला, थांब. नको उडी घेऊ. मी तुला रूपलावण्य देतो. देवाचे नाव घेऊन या पाण्यात तीन वेळा बुचकळून बाहेर ये. अप्सरेप्रमाणे दिसू लागशील. खरेच सांगतो.

नावडतीने विश्वास ठेवला. साधूला तिले नमस्कार केला. साधू निघून गेला नंतर तिने देवाचे नाव घेऊन तीन वेळा पाण्यात बुचकुळी मारली आणि खरेच ती फार सुंदर दिसू लागली. जणू राजाची राणी. स्वर्गातील रंभा अशी दिसू लागली.

ती घरी परत जावयास निघाली. मनात साधूचे उपकार मानीत, त्याची स्तुती गात ती निघाली. आपला नवरा आता आपल्यावर प्रेम करील, हिडिसफिडिस करणार नाही असे मनात येऊन तिला किती तरी आनंद होत होता. संपली साडेसाती असे तिला वाटले. तिला आता दगड टुपत नव्हते, काटे बोचत नव्हते. जणू पायाखाली सर्वत्र फुलेच पसरली होती.

पुन्हा ते जंगल आले. त्या जंगलातून ती जात होती. वेगाने जात होती. इतक्यात 'अहो बाई, थांबा, इकडे या.’ असे शब्द तिच्या कानांवर आले आजूबाजूस कोणी माणूस तर दिसेना. कोणी मारली हाक, कोणाचे ते शब्द? भ्रम झाला असाव असे मनात येऊन ती पुन्हा चालू लागली परंतु ते शब्द पुन्हा कानांवर आले. भास नाही, कोणी तरी खास बोलावते आहे असे तिला वाटले. तोच तिला ते पेरूचे झाड दिसले. ते झाड जणू आनंदाने डोलत होते. नावडती त्याच्या जवळ गेली व म्हणाली, 'काय रे पेरूच्या झाडा, तू का हाक मारलीस?

झाड म्हणाले, 'हो'

'का हाक मारलीस?' तिने विचारले.

'का म्हणून काय विचारत? तुम्ही स्वत: दु:खी होतात. तरी माझी विचारपूस केलीस. मला ओंजळभर पाणी घातलेत, चार मुठी माती मुळाशी घातलीत. आजपर्यंत सर्वांनी मला लुटले; परंतु असे कोणी केले नाही. तुम्ही कच्चा दोडाही तोडलात नाही आणि शिवाय हे प्रेम दिलेत. तुम्ही थोर आहांत. तुमचे उपकार कसे विसरू, प्रेम कसे विसरू? आम्ही झाडे माणसांप्रमाणे कृतघ्न नसतो. तोडणार्‍यावरही आम्ही छाया करतो. दगड मारणारालाही फळे देतो. मग प्रेम देणार्‍यांबद्दल आम्हाला मी काही तरी देणार आहे. ते घ्या, नाही म्हणू नका.' असे ते पेरूचे झाड म्हणाले.

'काय देणार मला, प्रेमळ पेरूच्या झाडा?' तिने विचारले. 'एक लहानशी करंडी.’ 'करंडीत काय असेल?' 'करंडीत वाटेल ते फळ, वाटेल तितके मिळेल. डाळिंब हवे असेल तर डाळिंब. द्राक्षे हवी असतील तर द्राक्षे. घ्या ही करंडी, माझ्या प्रेमाची खूण.'

ती करंडी घेऊन नावडती पुढे चालली. काही अंतर चालून गेल्यावर 'अहो बाई, थांबा, इकडे या.’ असे शब्द पुन्हा तिच्या कानांवर आले. ती इकडेतिकडे पाहू लागली. ते देवकापशीचे झाड तेथे होते. ते हाक मारीत होते. नावडती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, 'कापशीच्या झाडा, तू का हाक मारलीस?'

'हो. मी हाक मारली.’

'का बरें?'

'असे का म्हणून विचारता? आजपर्यंत माझी बोंडे तोडून नेणारेच मला भेटले; परंतु प्रेमाने चौकशी करून मला पाणी देणारे, माझ्या उघडया पडलेल्या मुळांवर माती लोटणारे कोणी भेटले नव्हते. तुम्ही भेटलात. किती बाई तुमचा प्रेमळ व परोपकारी स्वभाव! प्रेमाचे उतराई होता येत नाही; परंतु राहावत नाही म्हणून काही तरी प्रेमाची भेट द्यायची. मी तुम्हाला काही तरी देणार आहे. आम्ही झाडे केलेले उपकार स्मरतो. आम्ही माणसांप्रमाणे कृतघ्न नाही.’

'काय रे देणार कापशीच्या झाडा?'

'एक लहानसे गाठोडे देणार आहे. दुसरे काय आहे माझ्याजवळ?'

'गाठोडयात काय असेल?'

'हवे असेल ते वस्त्र त्यात मिळेल. रेशमी लुगडी, जरीची लुगडी, शेला, शालू, पितांबर. पैठणी सर्व काही मिळेल. नेहमी मिळेल.'

'बरे तर. तुझी प्रेमाची आठवण घेऊन जाते.’

गाठोडे घेऊन नावडती पुढे निघाली. आता झपझप ती जात होती. घरी केव्हा पोचू असे तिला झाले होते. तो 'अहो बाई, थांबा, इकडे या.’ असे शब्द पुन्हा कानांवर आले. तिने पाहिले तो टवटवीत झालेली तुळस तेथे उभी होती.

'जय आई तुळसादेवी, तू का मुलीला हाक मारलीस?'

'होय बेटा. तू मला पाणी घातलेस, मुळाशी माती घातलीस. कोणी नाही हो असे आजपर्यंत केले. हजारो या वाटेने आले गेले; परंतु कोणी असे केले नाही. तुझ्यावर मी प्रसन्न आहे. तुला काही देणार आहे.’

'काय देणार आई?'

'एक लहानसा करंडा.’

'त्यात काय असेल?'

'त्यात पाहिजे असेल तो दागिना मिळेल. सोन्याचांदीचे, हिर्‍यामोत्यांचे हवे असतील ते अलंकार मिळतील. घे हो हा करंडा.’

नावडतीने तो करंडा घेतला. नमस्कार करून ती निघाली. एके ठिकाणी ती थांबली. तिला भूक लागली होती. करंडीतील फळे काढून तिने पोटभर फलाहार केला. नंतर त्या गाठोडयातून सुंदर वस्त्रे काढून तिने ती परिधान केली आणि मग करंडयातील मौल्यवान सुंदर अलंकार तिने अंगावर घातले. किती सुंदर दिसत होती ती. जणू वनदेवताच!

नावडती घरी आली. ती लक्ष्मीप्रमाणे उभी राहिली. नवरा तिच्याकडे पाहातच राहिला. ती आता त्याची आवडती झाली. पहिली नावडती झाली.

एके दिवशी नवीन आवडतीला नवीन नावडतीने, बाई, तुम्ही कोणते उपाय केलेत असे रूपलावण्य मिळावे म्हणून? मला तरी सांगा. तसेच ती करंडी, तो करंडा, ते गाठोडे कोणी दिले? कोणा देवाची तुम्ही आराधना केलीत? कोणते व्रत केलेत, कोणता वसा घेतलात? सांगा मला सारे. नाही म्हणू नका. मी छळले ते मनात आणू नका.

'ती नवीन आवडती साधी सरळ स्वभावाची. तिला कपट माहीत नाही. तिला खोटे बोलणे माहीत नाही. जणू मोकळी निर्मळ गंगा, अशी ती होती. तिने सारी हकीगत सांगितली.

एके दिवशी ती नवीन नावडती रानात गेली, परंतु तिने तुळशीला पाणी घातले नाही. तिची पाने मात्र खाल्ली, तिने देवकापशीला पाणी घातले नाही, बोंडे मात्र तोडली, तिने पेरूच्या झाडाला पाणी घातले नाही, दगड मारून पेरू पाडले, असे करीत ती पुढे गेली. त्या सरोवराच्या काठी जाऊन उभी राहिली. जीव देण्याचे सोंग केले. 'अहो बाई, थांबा; जीव काही देऊ नका.’ असे शब्द तिच्या कानांवर आले. ती त्या शब्दांची वाटच पाहात होती. साधू तेथे आला. त्याने विचारले, 'का देता जीव?'

डोळयात खोटे अश्रू आणून ती म्हणाली, 'पूर्वी माझा नवरा माझ्यावर प्रेम करी; परंतु आत ते मजजवळ गोड बोलत नाहीत, मला पाहून हसत नाहीत. मी आता डोळयांसमोरही त्यांना नकोशी झाले आहे. काय करावे? पतिप्रेम नसेल तर बायकांना जिणे नको वाटते. जाऊ दे मला, घेऊ दे उडी.’साधू म्हणाला, 'हे नवरे सारे स्वत: का मदनाचे पुतळे असतात? स्वत: असतात कुरूप परंतु बायको मात्र पाहिजे अप्सरा आणि तुमचे रूप् काही तसे वाईट नाही. बरे ते असो. जीव काही देऊ नका. या पाण्यात देवाचे नाव घेऊन तीनदा बुचकळी मारा. म्हणजे आहे हयापेक्षाही तुमचे सौंदर्य अधिक होईल. असे सांगून साधू निघून गेला. तिने त्याला नमस्कारही केला नाही. पाण्यात एक बुचकळी मारून ती वर आली तर खरेच पूर्वीपेक्षा ती अधिक सुंदर दिसू लागली. मग तिले दुसरी बुचकळी मारली. तो आणखीच सुंदर झाली. तिने तिसरी बुचकळी मारली. ती आता केवळ सौंदर्याची खाण अशी दिसू लागली. तिच्या मनात असे आले की आणखी एक बुचकळी मारावी. तिने चौथी बुचकळी मारली. तो काय आश्चर्य! तिचे सारे रूपलावण्य नाहीसे झाले. तिचे शरीर कोळशासारखे काळे काळे झाले. नाक नकटे झाले. डोळे बटबटीत दिसू लागले. ती रडू लागली. रडत रडत त्या साधूच्या झोपडीजवळ ती आली. तो साधू बाहेर आला. पाया पडून ती म्हणाली, 'महाराज, क्षमा करा. तुम्ही तीन बुचकळया मारायला सांगितले, परंतु मी चौथी मारली. माझे सारे रूप गेले. येऊ दे पुन्हा माझे रूप, करा एवढी कृपा. '

साधू म्हणाला, 'ती शक्ती मला नाही. 'अतिलोभो न कर्तव्य:' हे खरे आहे. अती तेथे माती आणि शिवाय माझ्या शब्दांवर विश्वास ठेवलात नाही. मला एक प्रकारे फसवलंत तुम्ही. जा आता. भोगा कृतकर्माची फळे. '

ती नवीन नावडती मरायला थोडीच आली होती! मरण्याचे तिला धैर्य नव्हते. रडत रडत ती परत निघाली. 'मारतील दोन लाथा परंतु खायला तर देतील' असे मनात म्हणत होती. वाटेत तिला कोणी हाक मारली नाही. ना करंडा ना करंडी, ना गाठोडे ना काही. हात हलवीत परत आली. काळीकुंद्री होऊन मात्र आली.

घरी येऊन दारी उभी राहिली. तिला कोणी ओळखीना; परंतु मग डोळयांत पाणी आणून म्हणाली, 'बाई, मला ओळखलंत नाही का? मी ती पूर्वीची तुम्हाला छळणारी आवडती. पुन्हा आवडती होण्यासाठी म्हणून रानात गेले. परंतु तीनदा बुडी मारून पुन्हा अती लोभाने चौथ्यांदा मारली. त्याचे हे फळ. माझे सारे रूपलावण्य गेले. मी ही अशी झाले. मला क्षमा करा सर्वांनी. येथे मला राहू दे. '

ती नवीन आवडती म्हणाली, 'राहा हो बाई. हे तुमचे माझे दोघींचे घर. तुम्ही मला छळलंत, परंतु मी तुम्हाला छळणार नाही. ज्या दु:खातून मी गेले ते तुम्हाला भोगू देणार नाही. झाले ते झाले. उगी. रडू नका, पुसा डोळे. आपण दोघी सुखाने नांदू. '

आणि खरोखरच त्या सुखाने नांदू लागल्या.

इटकुली मिटकुली गोष्ट ऐकणारांचे अभीष्ट.