Khara Mitra - 4 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | खरा मित्र - 4

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

खरा मित्र - 4

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने

गोसावी

एक होता राजा. त्याला सर्व प्रकारचे सुख होते. त्याला कसली वाण नव्हती. एकच दु:ख होते व ते म्हणजे त्याला मूलबाळ नव्हते. राजा व राणी यामुळे नेहमी खिन्न व दु:खी असत. राणीने पुष्कळ उपासतापास केले, व्रतवैकल्ये केली; परंतु तिची इच्छा पुरी होईना. राजवाडा संपत्तीने भरलेला होता. दारी हत्ती झुलत होते. घोडे होते, रथ होते. दासदासींना तोटा नव्हता; परंतु मूल नव्हते. त्यामूळे सारे असून नसून सारखे असे राणीस वाटे.

एके दिवशी कोणी एक भिक्षेकरी गोसावी आला. त्याच्या अंगाला भस्म लावलेले होते. गळयात रूद्राक्षांच्या माळा होत्या. डोक्यावर मोठमोठया जटा होत्या. त्याला पाहून लहान मुले भिऊन पळू लागली. भिक्षा मागतामागता तो राणीच्या अंगणात आला. राणी दु:खी कष्टी होती. तो यती राणीला म्हणाला, 'तुम्ही दु:खी का? तुमचे राज्य मोठे, तुमची संपत्ती अगणित; मग तुम्हाला, दु:ख का?' राणी म्हणाली, 'जगात एक पुत्ररत्‍न

खरे, बाकीची रत्‍ने काय कामाची? पोटी संतान नाही, म्हणून जीव दु:खी आहे. माझया मनास चैन पडत नाही. खाणेपिणे सुचत नाही. 'तो गोसावी म्हणाला, 'मी तुम्हाला दोन पुत्र देतो. परंतु माझी एक अट आहे. तुम्हाला जर दोन मुलगे झाले, तर त्यांतील एक तुम्ही मला द्यावा. मी बारा वर्षांपर्यंत केव्हाही येईन. जर बारा वर्षांत आलो नाही तर दोन्ही मुलगे तुमचे. 'राणीने मनात विचार केला की एक मुलगा गेला तरी एक राहील. ती त्या गोसाव्याला म्हणाली, 'ठीक आहे. एक मुलगा देईन. तुमच्या कृपेने एक तरी आमच्याजवळ राहील. बारा वर्षे तुमची वाट पाहू. द्या, मला पुत्ररत्‍न द्या. माझया मांडीवर बाळ खेळो. माझी मांडी धन्य होवो.'

त्या गोसाव्याने राणीस कसली तरी मुळी दिली. तो म्हणाला, 'ही मुळी खा. पुढे तुम्हाला दोन आवळे जावळे मुलगे होतील. मी आता जातो. 'असे म्हणून गोसावी निघून गेला.

राणीने सारी हकीगत राजाला सांगितली. राजाला फार आनंद झाला. पुढे राणीला दोन मुलगे झाले. ते फारच सुंदर होते. जसे चंद्र सूर्य तसे ते दिसत. राजाने मोठा सोहळा केला. हत्तीवरून साखर्‍या वाटल्या. तुरूंगातले सारे कैदी सोडण्यात आले. शेतकर्‍यांना शेतसारा एक वर्षभर माफ करण्यात आला. शाळांना देणग्या मिळाल्या. प्रजेला सुख झाले. सारी प्रजा म्हणू लागली, 'राजाचे मुलगे उदंड आयुष्याचे होवोत.'

दिवसेंदिवस राजाचे मुलगे वाढू लागले. त्यांच्या अंगाखांद्यांवर हिर्‍यामोत्यांचे दागिने होते. त्यांचे केस काळेभोर होते डोळे कमळासारखे होते. नाके सरळ व तरतरीत होती. त्यांचे दात मोत्यांसारखे होते. मुलांवरून डोळे काढून घेऊ नये असे पाहणारास होई. राजाराणी आनंदी झाली. मुलांना खेळताना पाहून राणीला धन्य वाटे. आईच्या मांडीवर आधी जाऊन कोण बसतो अशा शर्यती ते लावीत. एकदम धावत येत व आईला मिठी मारीत. राणीला मुले कोठे ठेवू, कोठे न ठेवू असे झाले.

परंतु राणीच्या मनात एक दु:ख होते. दोन्ही मुलगे ती जवळ घेई व तिच्या डोळयांतून एखादे वेळेस पाणी येई. कुठला मुलगा यांतून जाईल, तो गोसावी कोणता मुलगा मागेल, हे मनात येऊन तिचा जीव खालीवर होई. एक दिवस गेला म्हणजे तिला हायसे वाटे.

त्या दोन मुलांतील एक राजाचा आवडता होता व एक राणीचा. एक राजाजवळ निजे, एक राणीजवळ निजे. एक राजाबरोबर फिरावयास जाई, एक राणीबरोबर.

पाच वर्षे गेली, दहा वर्षे गेली. राणीला वाटले की तो गोसावी अजून येत नाही. तो मेला असेल. तिला वाटले आता कोणी येत नाही, मुलगा काय कोणी मागत नाही. बारा वर्षे संपत आली. राणी राजाला म्हणाली, 'उद्याचा शेवटचा दिवस गेला की बारा वर्षे संपतात. देव करो व दोन्ही लेकरे नांदोत.'

दुसरा दिवस उजाडला. राणीच्या मनाला अस्वस्थ वाटत होते. बाहेर गार वारा वाहात होता. आकाशात ढग आले होते. राहून राहून राणीला रडू येत होते. आज तिने दोन्ही मुलांना डोळयाआड होऊ दिले नाही. होता होता सायंकाळ झाली. पाखरे घरटयात गेली. गाई हंबरत गोठयात आल्या. दिवे लावण्याची वेळ झाली. राणी तुळशीच्या अंगणात दोन्ही मुलांना घेऊन बसली होती. इतक्यात अंगणात तो गोसावी येऊन उभा राहिला. जणू काळपुरूष येऊन उभा राहिला. राणीच्या पोटात धस्स झाले. ती उठेना, बोलेना. तो गोसावी रागाने म्हणाला, 'सारे जग कृतघ्न आहे. घ्यायच्या वेळी जगाला आनंद वाटतो. द्यायच्या वेळेस मात्र दु:ख, घ्यायच्या वेळेस दुनिया पाया पडते, द्यायच्या वेळेस कोणी नाही. राणी, मला ओळखलंस का? मीच तुला हे मुलगे दिले. यातील एक मला दे.'

राजा तेथे धावत आला. राजा राणी रडू लागली. एक राजाचा आवडता, एक राणीचा आवडता. कोणता घ्यावा, कोणता सोडावा? शेवटी राजाने स्वत:चा आवडता मुलगा गोसाव्यास दिला. राजा म्हणाला, 'बाळ, जा. देव तुला सुखी ठेवो.'

तो मुलगा जाताना आईला म्हणाला, 'आई रडू नकोस, बाबा, रडू नका. माझ्यावर जर काही संकट आले तर अंगणातले हे तुळशीचे झाड जोराने सारखे हलू लागेल. जर या झाडाच्या फांद्या जोराने हलू लागल्या तर समजा की माझयावर संकट आहे. मग माझ्या शोधासाठी धाकटया भावास पाठवा, तो मला सोडवून आणील. असे बोलून त्याने धाकटया भावास पोटाशी धरले. आईबापांस वंदन केले. गडीमाणसांचे निरोप घेतले. सर्वांच्या डोळयांत पाणी आले. बायकामाणसांना हुंदके आले व ते आवरत ना.

तो गोसावी त्या वडील मुलास घेऊन निघून गेला. गोसाव्याच्या पाठोपाठ तो वडील मुलगा जात होता. मधूनमधून त्याला घरची आठवण येत होती. त्याला मध्येच ठेच लागे. 'आईने आठवण काढली का बाबांनी' असे तो स्वत:शी म्हणे. जाताजाता वाटेत एके ठिकाणी त्याला दोन सशाची पिले दिसली. त्या पिलांतील एक आपल्या आईस म्हणाले, 'आई, त्या दोन राजपुत्रांतील एक चालला, त्याच्याबरोबरच मी जाऊ?' आई म्हणाली, 'जा' ते सशाचे पिलू त्या राजपुत्राच्या पाठोपाठ जाऊ लागले. किती सुंदर व गोजिरवाणे होते ते. त्याचा रंग पांढरा होता. राजपुत्राने ते पिलू उचलून घेतले व आपल्या पिशवीत ठेवले. ते पुढे गेले तो एका झाडावर दोन लहान साळुंकीची पिले होती. त्यांतील एक आपल्या आईला म्हणाले 'आई, तो बघ दोन राजपुत्रांतील एक चालला, मी पण त्याचाबरोबर जाऊ?' आई म्हणाली 'जा बेटा. 'ते सांळुकिचे पिलू राजपुत्राच्या खांद्यावर येऊन बसले. राजपुत्राने त्याला आपल्या खिशात लपवले. गोसावी व राजपुत्र आणखी पुढे गेले. तेथे एक कुत्री होती. कुत्रीची दोन पिले होती. एक पिलू आईस म्हणाल, 'आई, त्या दोन राजपुत्रांतील एक चालला, मी जाऊ त्याच्याबरोबर?' आई म्हणाली, 'जा. काही हरकत नाही. 'ते कुत्रीचे पिलू कुरकुर करीत राजपुत्राच्या पाठोपाठ निघाले. राजपुत्राने ते आपल्या पिशवीत ठेवले. असे करताकरता ते दोघेजण घोर जंगलात आले. अगदी किर्र झाडी होती. सूर्याचे किरण सुध्दा तेथे शिरकत नव्हते.

तो गोसावी तेथे थांबला. जवळच एक घर होते. त्या घराकडे बोट करून गोसावी म्हणाला, 'बेटा, हे तुझे घर. तू ह्या घरात राहात जा. या जंगलात वाटेल तिकडे हिंड, फीर. वाटेल त्या झाडाचे फळ खा, वाटेल त्या झर्‍याचे पाणी पी. येथील झाडांना नेहमी बारा महिने फळे असतात व ती अमृतासारखी गोड असतात. येथील ओढयांना बारा महिने तेरा काळ पाणी असते, ते स्फटिकासारखे स्वच्छ, भिंगाप्रमाणे निर्मळ असते. येथे अनेक फुलझाडे आहेत. त्यांचे हार घाल. मोरांची पिसे सापडतील, त्यांचे मुगुट करून डोक्यात घाल. तुला येथे मोकळीक आहे. या रानाचा तू राजा; परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की उत्तर दिशेला मात्र जावयाचे नाही. तिकडे जाशील तर धोका आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण या दिशांत तुला मोकळीक आहे. मी आता जातो. मी केव्हा येईन त्याचा नेम नाही. तू काळजी करू नकोस. सुखाने राहा. 'असे म्हणून तो गोसावी निघून गेला.

राजपुत्र तेथे एकटाच राहिला. त्याने पोटभर फळे खाल्ली. झर्‍याचे गोड पाणी प्यायला. फुलांच्या वनमाळा त्याने गळयात घातल्या. त्याने साळुंकीच्या पिलास, सशाच्या पिलास, कुत्रीच्या पिलास खायला दिले. त्यांना बरोबर घेऊन तो हिंडला. शेवटी दमला व त्या घरात जाऊन झोपला.

एके दिवशी त्या राजपुत्राला एक सुंदर हरिण दिसले. त्या हरणाच्या पाठोपाठ तो जाऊ लागला. हरिण उत्तर दिशेला पळू लागले. उत्तर दिशेस जावयाचे नाही ही गोष्ट राजपुत्र विसरला. त्याला जणू भूल पडली. हरणाचा पाठलाग करीत तो चालला; परंतु हरिण एकदम दिसेनासे झाले. तो इकडेतिकडे पाहातो तो हरिण कोठेही नाही. तो चकित झाला. इतक्यात त्याला एका झाडाखाली एक सुंदर स्त्री दिसली. तो तिच्याजवळ गेला व म्हणाला, 'तुम्हाला हरिण दिसले का? किती सुंदर होते! कोठे गेले कोणास माहीत?'

ती म्हणाली, 'मला माहीत नाही. मी येथे बसलेली असते. येणारा जाणारा पाहून खेळायला बोलावते. या. तुम्ही माझ्याबरोबर खेळा. काही तरी पणास लावा. हे पाहा फासे तुमची वाट पाहात आहेत. 'असे म्हणून तिने फासे हातात खुळखुळवले. राजपुत्र स्वाभिमानी होता. त्याने खेळण्याचे ठरविले. दोघेजण खेळू लागली. राजपुत्राने प्रथम सशाचे पिलू लावले, परंतु त्या स्त्रीने ते जिंकून घेतले. राजपुत्रावर हार आली. राजपुत्र पुन्हा खेळू लागला. त्याने ते साळुंकीचे पिलू पणाला लावले. पुन्हा राजपुत्र हरला. तो अधिकच हटटास पेटला. त्याने ते कुत्रीचे पिलू पणाला लावले, तेही त्या स्त्रीने जिंकून घेतले. आता पणाला लावावयास काय उरले? तो राजपुत्र म्हणाला, 'मी सर्वस्व गमावून बसलो. आता खेळ पुरे. 'ती स्त्री म्हणाली, 'आता स्वत:ला पणास लाव. अजून तू शिल्लक आहेस.'

राजपुत्राने स्वत:ला पणास लावले. खेळता खेळता राजपुत्र हरला. त्या स्त्रीने राजपुत्राला जिंकले व त्याला गुलाम केल ती स्त्री म्हणजे एक दुष्ट राक्षसीण होती. ती कपटी व मायावी होती. तिने राजपुत्राला लहान डुक्कर केले. सशाचे पिलू, साळुंकीचे पिलू, कुत्रीचे पिलू व तो डुक्कर झालेला राजपुत्र, चौघांना घेऊन राक्षसीण निघाली. ती आपल्या गुहेत आली व म्हणू लागली की, 'चार दिवस आता चांगली मेजवानी होईल. पहिल्या दिवशी सशाचे पिलू, दुसर्‍या दिवशी साळुंकी, तिसर्‍या दिवशी कुत्र्याचे पिलू आणि चौथ्या दिवशी मजा!'

इकडे काय झाले, तुळशीच्या अंगणातील ते झाड गदगदा हलू लागले. राणीला दासदासी सांगू लागल्या. राजाराणी अंगणात आली. धाकटा राजपुत्र तेथे धावत धावत आला. तो म्हणाला, 'आई, दादा संकटात आहे, त्याची ही खूण. मला जाऊ दे. दादाला मी सोडवून घेऊन येतो. 'राणीला रडू आले, एक गेला व आता दुसरा चालला. काय होईल कोणास कळे. कठीण प्रसंग शेवटी शोक आवरून तिने निरोप दिला. आईबापांच्या पाया पडून राजपुत्र निघाला.

वाटेत एके ठिकाणी ते सशाचे दुसरे पिलू होते. तेआपल्या आईस म्हणाले, 'आई, तो दुसरा राजपुत्र निघाला. मी पण जाऊ?' आई म्हणाली, 'जा' गुबगुबीत सशाचे पिलू राजपुत्राच्या पाठोपाठ निघाले. राजपुत्राने ते उचलून घेतले व आपल्या पिशवीत ठेवले. तो पुढे गेला. तो ते दुसरे साळूंकीचे पिलू तेथे होते. ते पिलू आपल्या आईस म्हणाले, 'आई, तो बघ दुसरा राजपुत्र चालला, मी पण जाऊ?' आई म्हणाली, जा बेटा. ' ते साळुंकीचे पिलू राजपुत्राच्या खांद्यावर येऊन बसले. राजपुत्राने त्याचा मुका घेतला व आपल्या खिशात ते ठेवून दिले. आणखी पुढे जातो तो तेथे कुत्रीचे दुसरे पिलू होते. ते आपल्या आईस म्हणाले, 'आई, तो बघ छोटा राजपुत्र पण चालला, मीही जाऊ?' आई म्हणाली, 'जा. 'ते कुत्रीचे पिलू राजपुत्राच्या पाठोपाठ जाऊ लागले. राजपुत्राने ते उचलून घेतले व त्याला मोठया पिशवीत ठेवून दिले. असे करताकरता तो राजपुत्र घनदाट रानात शिरला. झाडांवर रसाळ फळे होती; ओढयांना स्वच्छ पाणी होते. त्याने पोटभर फळे खाल्ली; तो मनमुराद पाणी प्यायला. फुलांच्या माळा करून त्याने गळयात घातल्या. असे करीतकरीत तो उत्तर दिशेला चालला, इतक्यात त्याला एक सुंदर हरिण दिसले. तो हरणाच्या पाठोपाठ लागला. दूरवर तो पळत पळत आला. परंतु एकाएकी हरिण अदृश्य झाले. ते कोठेच दिसेना. राजपुत्र चारी दिशांस पाहात उभा राहिला. त्याला एका झाडाखाली एक सुंदर स्त्री दिसली. तो तिच्याजवळ गेला व म्हणाला, 'बाई, तुम्हाला एखादे हरिण दिसले का? मी त्याच्या पाठोपाठ येत होतो, परंतु ते एकाएकी नाहीसे झाले.'

ती स्त्री म्हणाली, 'मला हरिणबिरीण माहीत नाही, मी येथे बसलेली असते. येणार्‍या जाणार्‍यास खेळण्यासाठी बोलावते. या. तुम्ही माझ्याबरोबर खेळा. हे फासे तुमची वाट पाहात आहेत. नुसते खेळू नका. त्यात राम नसतो. काही पणास लावा.'

राजपुत्रास नाही म्हणवेना. तो स्वाभिमानी होता. तो खेळू लागला. तो म्हणाला, 'मी हे सशाचे पिल्लू पणास लावतो. परंतु तुम्ही काय पणास लावता?' ती स्त्री म्हणाली, 'मी जर हरले, तर असेच एक सशाचे पिलू मी देईन.'

दोघे खेळू लागली. शेवटी राजपुत्राने तिला जिंकले. त्या स्त्रीने तसेच एक सशाचे पिलू त्या राजपुत्राला दिले. सशाची दोन्ही पिले एकमेकांस भेटली, नाचली. पुन्हा खेळ सुरू झाला. राजपुत्र म्हणाला, 'आता मी साळुंकीचे पिलू पणास लावतो, तुम्ही काय लावता?' ती स्त्री म्हणाली, 'मी जर हरले, तर असेच एक साळुंकीचे पिलू तुम्हास देईन.'

दोघे खेळू लागली. जोराजोराने फासे पडू लागले. पुन्हा एकदा राजपुत्राने तिला जिंकले. तिले साळुंकचे पिलू काढून राजपुत्राला दिले. साळुंकीची दोन्ही पिले एकमेकांस भेटली, नाचली. खेळ पुन्हा सुरू झाला. राजपुत्र म्हणाला, 'आता मी कुत्रीचे पिलु पणास लावतो, तुम्ही काय लावता?' ती स्त्री म्हणाली, मी त्या कुत्रीच्या पिलासारखेच पिलू तुला देईन.'

दोघे खेळू लागली. ती स्त्री मोठया शिताफीने खेळत होती; परंतु काय असेल ते असो. याही वेळेस ती हरली. ती खटटू झाली. तिने कुत्रीचे पिलू काढून राजपुत्राला दिले. दोन्ही पिले परस्परांस भेटली. एकमेकांना चाटती झाली. पुन्हा खेळ सुरू झाला. राजपुत्र म्हणाला, 'आता मी स्वत:ला पणास लावतो. तुम्ही काय पणास लावता?' ती स्त्री म्हणाली, 'मी जर हरले, तर तुमच्यासारखा एक मुलगा मी तुम्हाला देईन.'

राजपुत्र जपुन खेळू लागला. त्याच्या हृदयात आशा खेळू लागली. शेवटी त्याने त्या स्त्रीला जिंकून घेतले. तिने त्या डुकराचा पुन्हा राजपुत्र केला व तो त्याच्या स्वाधीन केला. दोघे भाऊ एकमेकांस भेटले. जशी रामभरतांची भेट. क्षणभर कोणास काहीच बोलवेना. हृदये भरून आली होती त्यांची.

ती स्त्री म्हणाली, 'जा मुलांनो, जा, परंतु एक गोष्ट सांगते, ती लक्षात ठेवा. ज्या गोसाव्याने या राजपुत्राला आणले आहे, तो मोठा दुष्ट आहे. तो या राजपुत्राचा बळी देणार आहे. उद्या त्या रानातील घरात तुला पाहावयास तो येईल व देवीच्या देवळात तुला घेऊन जाईल. तेथे तो देवीची पूजा करील व शेवटी 'देवीला नमस्कार कर' असे तुला तो सांगेल. नमस्कार करावयास लोटांगण घालताच तो गोसावी तुझयावर तरवारीचा वार करील व तुला मारील. यासाठी मी सांगते तसे कर. तो गोसावी जेव्हा नमस्कार कर असे सांगेल, तेव्हा तू त्याला म्हण, 'मी राजाचा मुलगा आहे. मला लोक नमस्कार करतात, मी कोणास करीत नाही. साष्टांग नमस्कार कसा घालावयाचा, हे तुम्ही दाखवा. मग मी तसा नमस्कार करीन. 'तो गोसावी नमस्कार करण्यासाठी वाकताच त्याच्यावर तरवारीचा वार करून ठार करा. जा. तुमचे भले होवो.'

ते दोघे राजपुत्र वनात आले. मोठा राजपुत्र घरात राहिला व धाकटा भाऊ बाहेरच लपून राहिला. रात्रीची वेळ झाली होती. तो गोसावी एकाएकी तेथे आला. तो राजपुत्र घरात आहे असे पाहून त्याला आनंद झाला. सकाळ झाली, पाखरे किलबिल करू लागली. तो गोसावी त्या राजपुत्राला म्हणाला, 'तू येथे आहेस, हे पाहून मला किती आनंद झाला! माझ्या सांगण्याप्रमाणे तू वागलास, चांगले केलेस. आता आज तुला मी देवीच्या देवळात घेऊन जाणार आहे. देवीच्या पायांवर वाहाणार आहे. चल.'

ते दोघे निघाले. त्यांच्या पाठोपाठ लपतछपत तो धाकटा भाऊही चालला. रानाच्या मध्यभागी देवीचे मंदिर होते. त्या मंदिरात तो गोसावी व तो मोठा राजपुत्र शिरले. ते आत शिरताच एकदम मोठा हास्यध्वनी आला. राजपुत्र पाहू लागला. तो तेथे त्याला अकरा मुंडकी टांगलेली दिसली. ती मुंडकी त्याच्याकडे बघून खदखदा हसत होती. तो गोसावी देवीच्या पूजेला बसला. पूजा झाली. शंख फुंकला गेला. तो गोसावी बाहेर आला व त्या राजपुत्राला म्हणाला, 'बाळ, चल, देवीला साष्टांग नमस्कार घाल. 'तो राजपुत्र म्हणाला, 'नमस्कार कसा करावयाचा ते मला माहीत नाही. तुम्ही नमस्कार कसा करावयाचा ते दाखवा. 'तो गोसावी नमस्कार करण्यासराठी वाकला. राजपुत्राने तेथली तलवार एकदम घेतली व त्या गोसाव्याचे मुंडके उडवले. गोसाव्याचे मुंडके तुटताच त्या अकरा मुंडक्यांतून अकरा राजपुत्र जिवंत होऊन बाहेर पडले.

राजपुत्राचा धाकटा भाऊ मंदिरात आला. मोठा राजपुत्र त्या सजीव झालेल्या अकरा राजपुत्रांस म्हणाला, 'मी मंदिरात येताच, तुम्ही का बरे हसलात?' ते राजपुत्र म्हणाले, 'आम्हाला त्या गोसाव्याने असेच फसवून आणले व मारले. आमच्याचप्रमाणे तूही फसून आलास, म्हणून आम्ही हसलो. आम्ही तुझे उपकार कसे फेडणार? आम्हाला तू जीवदान दिलेस. आमचे आईबाप आमच्यासाठी झुरत असतील. त्यांची व आमची भेट होईल.'

ते दोघे राजपुत्र त्या अकराजणांस म्हणाले, 'प्रथम तुम्ही आमच्या राजधानीस चला. तेथे तुम्ही काही दिवस राहा. तुमच्या घरी आपण जासूद पाठवू. तुमचे आईबाप येतील. मोठा सोहळा होईल. 'त्या अकराजणांनी कबूल केले. ते अकरा व हे दोन असे तेरा राजपुत्र घरी आले. राजाराणीस आनंद झाला. गुढया, तोरणे उभारली. मोठा समारंभ झाला. त्या अकरा राजपुत्रांच्या घरी कळवण्यात आले. त्यांचे आईबाप धावतच तेथे आले. देशोदेशीचे राजे महाराजे त्या नगरीत आले. आईबापांना मुले भेटली. तो आनंद कसा वर्णावा! किती सांगावा? अगणित संपत्ती वाटण्यात आली. कोटयवधी लोकांस अन्नदान, वस्त्रदान झाले. जिकडेतिकडे आनंदीआनंद झाला. चार दिवस सोहळा होऊन ते अकास राजपुत्र आपल्या आईबापांसह आपापल्या राज्यांत निघून गेले. ते दोघे राजपुत्र मोठया आनंदाने राहिले. ती दोन सशाची पिले, ती साळुंकीची पिले व ती कुत्रीची पिले, ती सर्व आनंदात आहेत. त्यांची काळजी घेण्यात येते.

राजाचा आवडता मुलगा राजास मिळाला, राणीचा राणीस मिळाला. तुळशीच्या अंगणातील झाड हलेनासे झाले. प्रजा सुखी झाली. त्यांना सुख झाले तसे तुम्हा आम्हा सर्वांस होवो, दुसरे काय?

''आमची गोष्ट संपली

शेरभर साखर वाटली''