Marathi Quote in Religious by meghana paranjape

Religious quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

गणपती ही पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य आणि मुख्य देवता आहे . आद्य शंकराचार्यांनी गणपती ला पाच मुख्य

१. हरी (विष्णु ) २. शिव (शंकर) ३. तेज (भास्कर ) ४. अंबा (देवी) आणि ५. गणेश

देवतांमध्ये स्थान दिल्यावर गणपतीची लोकप्रियता वाढू लागली.

ज्ञानेश्वर माउलीसुद्धा ज्ञानेश्वरीतील नमनाच्या ओवीतून म्हणतात,

ओम नमोजी आद्या।वेद प्रतिपाद्या।जयजय स्वसंवेद्या।
देवा तुचि गणेशु।सकलमतिप्रकाशु।म्हणे निवृत्तीदासु अवधारिजोजी।


गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला असे मानले जाते .

पहिला अवतार - वैशाख शुक्ल पौर्णिमा (पुष्टीपती विनायक जयंती )

दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी (गणेश चतुर्थी )

तिसरा अवतार - माघ शुक्ल जयंती ( माघी गणेशोत्सव )

ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे माघ महिना जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये येतो.

पुराणानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला "गणेश" झाला असे मानले जाते . "गणेशलहरी" ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या तो दिवस म्हणजेच ज्या दिवशी "गणेशजन्म" चा दिवस - माघ शुद्ध चतुर्थी .स्कंद पुराणातील एक गोष्ट अशी आहे - गणेशाने देवान्तक -नरान्तक या असुर भावांचा आणि धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला . त्यासाठी त्याने "कश्यप -दिती " यांच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला म्हणून श्रीगणेशाचा जन्मोत्सव ( माघी जयंती) साजरी केली जाते.

आजच्या दिवशी हळद अथवा शेंदुरी गणपतीची प्रतिमा तयार करून त्याची पुजा करतात. पुजेच्या आधी तिळाचे उटणे लावुन व त्याचबरोबर पाण्यात तीळ घालून त्या पाण्यानी गणेशाला स्नान घालतात.पुराणानुसार २१ मातृदेवता आहेत असं मानतात आणि गणपती हा मातृभक्त असल्याने त्या २१ मातृदेवतांना स्मरून गणपतीला २१ दुर्वा श्रद्धापूर्वक वाहतात.

या दिवशी दिवसभर उपास करून रात्री गणेशाला तिळाचे लाडू आणि साखरेचे मोदक अर्पण करतात. यालाच "तिळकुन्द चतुर्थी " किंवा "वरद चतुर्थी " असं म्हणतात .

महाराष्ट्राप्रमाणेच गोवा आणि उत्तर प्रदेश ह्या राज्यांमध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो. उत्तर प्रदेशात ह्याला "सकट चौथ " अथवा "तिलो चौथ " या नावानी संबोधले जाते.

मोक्ष प्राप्तीसाठी "तिलकुन्द चतुर्थी " च व्रत करतात याची नोंद अग्निपुराणात आहे.

काही वर्षांपूर्वी माघी गणेश जयंती हा उत्सव फक्त देवळांमध्ये साजरा केला जायचा आता मात्र हा भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे "श्रीगणेशाचा जन्मोत्सव " माघ महिन्यात सगळीकडे आणि पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
भाद्रपदातील गणपतींप्रमाणे माघी गणेशोत्सव किती दिवस साजरा करावा यासाठी निश्चित काळ ठरलेला नाही. माघी गणपतीची स्थापना करणाऱ्या भाविकांनी आपल्या आवडीनुसार व श्रद्धेनुसार एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्ती दिवस साजरा करू शकतात .

अशा या ६४ कला आणि १४ विद्यांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशाची कृपा आपल्या -सगळ्यांवर सदैव राहू दे !!

गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया !!

मेघना वैदय.

Marathi Religious by meghana paranjape : 111661840
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now