विंडोतुन प्लॅटफॉर्म दिसायला लागला, हळू हळू गर्दी स्पष्ट झाली. रनींग मध्ये जंप करून विंडो सीट पकडली त्या मागे काही तरी होतं. शून्य स्पीड आणि गाडी थबकली पण ती कुठे आहे? माझे डोळे सगळी कडे निरखून शोधत होते एका चेहऱ्याला. तीच गर्दी निवळली, स्टेशनच्या शेड मधून झिरपलेला सूर्य प्रकाश माझ्या डोळ्यांवर आला, उन्हातुन दिपलेले डोळे उघडले आणि समोरच नेहमीच्या बेंच वर "ती" दिसली.
"ती", जिला मी रोज विंडो सीट वरून बघत बसायचो, खरं तर रोज वाट बघायची तीला पाहण्याची. ती पण रोज त्याच बेंच वर बसलेली असते. शांत, शीतल, हसरा चेहरा, कधी नजर वर करून समोर न पाहणारी, म्हणतात ना एकदम 'सर्वगुणसंपन्न'. माझ स्वप्न की तिने एकदा तरी वर पहाव आणि नकळत माझ्या शी नजरभेट व्हावी. पण गेल्या सहा महिन्यात असा योग नाही जुळला.
"अरे चैन खिचा है।" शब्द कानावर पडले. माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य तेही गुलाबि 😊. आता ट्रेन थोडा वेळ अजून थांबणार म्हणून मी जितका वेळ मिळतोय तिला पहात होतो. इतक्यात समोरची 3 नंबर ची ट्रेन आली तिची उठायची तय्यारी सुरु झाली, त्यात माझ्या मनाची झाली फरफट.
ती उभी राहिली आणि ज्या बेंच वर बसलेली त्यावर लिहिलेलं "𝐇𝐚𝐧𝐝𝐢𝐜𝐚𝐩𝐬 𝐎𝐧𝐥𝐲", ते वाचत नाही तोवर तिने बॅगमधून एक पांढरी-लाल छडी काढली, आजूबाजूचा अंदाज घेत नजर खाली ठेऊनच ती आलेल्या ट्रेन कडे वळली.
अशी "ती", गेली सहा महिने मी जिच्या नजरेची वाट बघत होतो पण तिच्या नजरेत तर काहीच न्हवतं.....
....ती माझ्या आयुष्यातली शेवटची विंडो सीट होती....
संपूर्ण