दिनांक ०२/१०/२०२५ रोजी ई साहित्य प्रतिष्ठान वर प्रा. श्रीराम काळे यांचा*टुरिंग टॉकीज*कथासंग्रह
लेखक प्रा. श्रीराम काळे यांचा टुरिंग टॉकीज म्हणजे कोकणच्या सुंदर पार्श्वभूमीवरच्या मजेदार कथांचा संग्रह. हा कथासंग्रह म्हणजे कोकणातील परंपरांचा सुगंध आणि आजच्या काळाशी जोडणारा पूल आहे. या कथा कदाचित एखाद्या वाड्याच्या ओसरीवर, वडाच्या झाडाखाली किंवा गावच्या चौकात संध्याकाळच्या गप्पांमध्ये सांगितल्या गेल्या असतील; पण त्यांचा भावविश्वावरचा परिणाम खोलवर रुजलेला आहे. कारण काळ बदलला तरी मानवी मनातील भावना, विचार आणि वृत्ती कायम तशाच राहतात.
या कथासंग्रहात लेखकाने कोकणातील प्रथा, परंपरा, समजुती, हेवेदावे आणि त्यातून निर्माण झालेल्या गावोगावच्या आख्यायिकांना शब्दांत गुंफलं आहे. एका लग्नाची गोष्ट, पडपड आंब्या, टूरिंग टॉकीज, देवाचं देवपण, थंड झाल्यार खावचा, दातारांचा त्रिपुर आणि लिंग्या गुरुवाला लॉटरी लागली या सात कथा कोकणच्या साध्या पण गहिऱ्या अनुभवांना शब्दरूप देतात. जसं टूरिंग टॉकीज गावोगाव फिरत चित्रपट दाखवायचं, तसंच या कथा कोकणातील आठवणी, नाती, सवयी आणि चमत्कारांच्या कथांनी आपल्या मनापर्यंत पोहोचतात.
कोकण ही फक्त निसर्गसौंदर्याची भूमी नाही; इथल्या समुद्रकाठच्या वाऱ्यांत, लाटांच्या गाजेत, भातशेतीच्या मातीच्या सुगंधात आणि डोंगरदऱ्यांतून वाहणाऱ्या ओढ्यांत एक सातत्यपूर्ण अनुभव दडलेला आहे. या अनुभवात कोकणच्या बोलीचा गोडवा, माणसांचं रोजचं जगणं, त्यांच्या श्रद्धा-समज आणि त्यांच्या भोवतालचं गूढविश्व सामावलेलं आहे. टूरिंग टॉकीज हा कथासंग्रह म्हणजे या अनुभवांचा जिवंत दस्तऐवज आहे.
सुनिळ सामंत (ई साहित्य प्रतिष्ठान)