This Article is my Tribute to Farmers....including Maharashtrian Farmers.
उन्हाळ्यातील एक दृश्य… आणि एक आत्ममंथन
मे महिना. जळगाव.
मामाच्या मुलीच्या लग्नासाठी मी आलो होतो.
कडक ऊन. अंगावर भाजणारं. श्वास घ्यायला सुद्धा घाम फुटावा, असं उन्हाळ्याचं रूप.
बसस्थानकावर उतरल्यावर, STच्या थांब्यावरचं एखादं फाटलेलं, धूळखालचं कापड शोधून मी चेहरा झाकला.
गुगलमधून तापमान बघितलं तर चक्क ४३ अंश.
मी तिथून एक रिक्षा पकडली – मामाच्या घरी पोहोचण्यासाठी.
रिक्षा रस्त्यावरून धावत असताना, एक बाजूला शेत लागत होतं.
अगदी त्याच वेळी, माझं लक्ष एका दृश्यावर गेलं –
त्या तापत्या उन्हात, शेताच्या मधोमध एक आई आणि तिची लहानशी मुलगी मातीशी झगडत काम करत होत्या.
ना डोक्यावर कोणती सावली, ना डोळ्यांना उन्हापासून वाचवणारे चष्मे.
त्यांच्या चेहऱ्यावरचं उन्हाने जळालेलं कातडं, कपाळावरून ओघळणारा घाम, आणि डोळ्यांमध्ये थोडी थकवा, थोडी वेदना.
त्यांच्याकडे पाहताना माझ्या मनात असंख्य प्रश्न उठले –
"आपण काय करतो? काय देतो या जमिनीला?
आणि ही माणसं… हे किती देतात, आणि किती सहन करतात?"
त्या आईच्या घामात तिच्या मुलीचं उद्याचं आयुष्य ओलावलेलं दिसलं मला.
---------------------------------------
लग्नाची गडबड सुरू होती. जेवणाचा कार्यक्रमही सुरू झाला.
मी एका बाजूला, काही शेतकऱ्यांबरोबर जेवायला बसलो.
तेवढ्यात माझ्यासमोर एक प्रचंड मोठी पोळी आली—रुमालीसारखी. ते म्हणाले, "मांदा म्हणतात याला."
ती खाणं म्हणजे माझ्यासाठी एक युद्धच होतं. मी त्याचं एकच चतुर्थांश संपवू शकलो.
पण माझ्या शेजारी बसलेले शेतकरी ४-५ मांदे सहज फस्त करत होते.
मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं… आणि पुन्हा तो रिक्षातून पाहिलेला शेतातला क्षण आठवला.
माझं मन बोलून गेलं—
"माझ्या अंगात त्यांच्यासारखं श्रमाचं बळ नाही, म्हणून मी खाऊ शकत नाही.
त्यांच्या अंगात शेतातलं कष्टांचं रक्त आहे, म्हणून त्यांना अशा पोळीचा एक तुकडाही थोडा वाटत नाही!"
त्या जेवणाच्या ताटात, मला खवय्येगिरी नव्हे, तर कष्टांचं गणित दिसलं.
त्या एका मांद्यानं मला ‘पोट’ नव्हे, ‘परिश्रम’ शिकवलं.
---
ही गोष्ट केवळ उन्हाच्या झळांची नव्हे,
तर श्रम, आत्मपरीक्षण आणि माणसांच्या जगण्याच्या लढाईची आहे.
कधी कधी आयुष्याचे मोठे पाठ मिळतात असेच एखाद्या शेताच्या कडेला,
किंवा एखाद्या लग्नाच्या पंगतीत…
फक्त पाहायचं, ऐकायचं, आणि आतून जाणून घ्यायचं असतं.