मार्च महीना उन्हाचा चांगलाच तडाखा होता.
पण बँक लोन रिकव्हरीची टारगेट बँक मॅनेजरला स्वस्थ बसु देत नाहीत
एक वीट भट्टीवाला कर्जदार थकीत होता म्हणुन विज़िट ला गेलो
कर्जदार तर गायब होता
पण काम चालु होते
एका खोपट्यात दुपारच्या जेवणाची तयारी चाललेली
समोर बायका होत्या म्हणुन सहज हसत प्रश्न केला
काय मावशी जेवायची वेळ का ?
व्हय जी येता का सायब तुमी बी ?
तिचा प्रश्न
मोठ्या गाडीतुन आलेली बँकेची सायबीन आपल्याशी बोलते याची खुशी वाटली तीला..
आता बाजूच्या बायकांच्या पण मनातली भीती पण गेली
एक जण पुढे आली माझ्या मोबाईल कडे पाहून बोलली
ह्याच्यामंदी फुटु येतात जनू
मी म्हणले मावशी तुमचे दाखवू काढून ?
आता आमच कोन काड्नार वो
मग मात्र मी खरेच मोबाईल समोर घेतला फोटोसाठी.
नगं.नगं.आमी पावडर त्येन कूट लावलाय तुमावाणी ?
वंगाळ दीस्त्याल तसल फुटु.
मावशी याच्या मधे तुमचे फोटो चांगले करायची पण सोय आहे
मी बोलले.
मावशीचा चेहेरा खुलला
या बया काय सांगतासा...
तीला नवल वाटले
मग मी तिच्या समोरच तिचा काळा फोटो गोरा करून दाखवला
आता ती जाम म्हणजे जाम खुश झाली
मी एखादी महान जादुगार असल्या प्रमाण माझ्या कडे पाहु लागली
एवढ्या छोट्या गोष्टीत तीला झालेला आनंद पाहून मला ही बर् वाटले
आणि आम्ही पुढील ठिकाणी मार्गस्थ झालो