ठिपक्यांची रांगोळी
लांबचे जवळचे
सारेच ठिपके जोडते ती
इच्छा असो वा नसो
नागमोडी वळणं घेत
नाकदुऱ्या काढते हरेकाच्या
तिची सून मात्र
तसं करत नाही
ज्यांना जवळ यायचंच नाही
त्यांच्या वाटेला जात नाही
जी जवळ येऊ पहातात
त्यांना मात्र जोडते
स्नेहाच्या रंगरेषांनी
तिची रांगोळी इवलिशीच
सासूच्या पसारा रांगोळीसमोर
पण तिला तेवढीशीही सुखावते
आणि सासूलाही
मग सासूही मान्य करते
उगीचच गोतावळा वाढवलेला
त्यापेक्षा चार प्रेमाची, हक्काची
असली तरी पुरे
सुबकशी रांगोळी तयार होते
एकमेकांना धरून ठेवणाऱ्या
एकमेकांना जपणाऱ्या
आपल्या माणसांची
--©®गीता गरुड.