पांदीतून जातायेता
तिचीमाझी भेट झाली
ओळखीचे हसू देता
खळी गाली उमटली
खळी गाली उमटली
पांद अवघी शहारली
तिच्या माझ्या गुजगोष्टी
ऐकू हळूच लागली
ऐकू हळूच लागता
तिला पाहिले वाऱ्याने
काय बाई भानगड
विचारलं तिला त्याने
विचारलं तिला त्याने
तरी झाली नाही फितूर
उनकोवळ्या प्रेमाचा
तिने जपला ग नूर
तिने जपला ग नूर
प्रीत अमुची फुलली
अशी पाणंद मायेची
घेत कानोसा राहिली
घेत कानोसा राहिली
वाटेतल्या बघ्यांचा
पानांचिया सळसळ
करुन दिला इशारा
या पाणंदीत रुजलं
तिचंमाझं प्रीतफूल
होता इथेच हरवला
तिच्या कानातला डूल
------सौ.गीता गजानन गरुड.