बदलापूर : बँक कर्मचारी यांना लोकल प्रवासात मुभा दिली नसल्याने नाराजी
करोनामुळे करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये केवळ महानगरपालिका कर्मचाऱ्यांनाच उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. खासगी बँका, वित्तीय सेवा किंवा अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही रेल्वेचा वापर करता येत नसल्याने पुन्हा एकदा मागील लॉकडाउनप्रमाणे या कर्मचाऱ्यांचे प्रवास करताना हाल होत आहेत. आम्ही अत्यावश्यक सेवेत मोडत असून आम्हाला रेल्वेप्रवासाची मुभा का नाही, असा संतप्त सवाल खासगी क्षेत्रातील कर्मचारी विचारत आहेत.
राज्यात गुरुवारी रात्रीपासून लागू झालेल्या कठोर निर्बंधांच्या पाश्वभूमीवर बँक कर्मचाऱ्यांनाही रेल्वे प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नाही. विरारला राहणाऱ्या वृषाली अनारसे यांनी सांगितले की, ‘मला फोर्टला कामावर जायचे असते. त्यामुळे प्रवासासाठी रेल्वे ही सगळ्यात सोयीची असते. बस उपलब्ध नसल्याने खासगी वाहनातून खर्चिक आणि वेळकाढू प्रवास सध्या मला करावा लागत आहे.’ बँक ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने लॉकडाउनमध्ये बँक बंद झाली नसल्याने बँक कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास करायला मिळावा, अशी विनंती रोज बदलापूर ते भांडूप असा प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी केली. सध्या सुरू असणारे लॉकडाउन १ मेपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘असे असले तरी हे लॉकडाउन पुढे वाढण्याची चर्चा सगळीकडे आहे. अशा वेळी आणखी काही दिवस दुचाकीवरून टिटवाळा ते ठाणे असा प्रवास करणे केवळ अशक्य आहे,’ असे मत आकाश शिंदे या तरुणाने व्यक्त केले.
खासगी बँकांमध्ये ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना घरात राहून काम करण्याची मुभा दिली आहे. काही बँक कर्मचाऱ्यांनी घराजवळील ब्रँचमध्ये काम करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांची रहदारी, खड्डे, प्रवासाला लागणारा दुप्पट वेळ अशा अनेक समस्यांचा सामना करत बँक कर्मचारी कामावर जात आहेत. ब्रँचमधील अर्ध्या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने आम्हाला जीव मुठीत धरून कामावर जावेच लागत आहे.’ केवळ अत्यावश्यक सेवांमधील व्यक्तींना रेल्वे प्रवासाची मुभा असताना फेरीवाले, छोट्या मोठ्या गोष्टी विकणारे यांना मात्र अजूनही प्रवास करता येत आहे. ‘तिकीट काढण्यापासून स्थानकात प्रवेश मिळेपर्यंत जर सगळीकडे तपासणी होते तर या लोकांना प्रवेश कसा मिळतो. ते जसे मेहनत घेतात तशीच मेहनत आम्हीही घेतो. मग आम्ही अत्यावश्यक सेवेत वर्षानुवर्षे नोकरी करत असूनही प्रवासासाठी मुभा न देणं हे अयोग्य आहे