लष्कराच्या पूर्व मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत.
जनरल अरुणकुमार वैद्य (१९८३- १९८६) यांच्यानंतरचे महाराष्टाचे सुपुत्र असलेले नरवणे हे लष्करप्रमुख पदाची धुरा सांभाळत आहेत. एप्रिल २०२२ पर्यंत ते आपला पदभार सांभाळतील.
लष्करप्रमुखांचे वडिल मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत तसेच ऐतिहासिक विषयांवर त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत.त्यांच्या आई सुधा नरवणे या एक प्रसिद्ध लेखिका होत्या तसेच पुणे आकाशवाणीवर निवेदिका म्हणून कार्यरत होत्या.
नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत झाले आहे.शालेय वयापासूनच ते हुशार आणि सर्व क्रीडा प्रकारात कुशल असे विद्यार्थी होते. १९७६ साली प्रबोधिनीतून दहावीची परीक्षा ते उत्तीर्ण झाले.
राष्टीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडी च्या कठीण अशा चाचण्यांमधून लीलया उत्तीर्ण होत त्यांनी एनडीए मधील आपले प्रशिक्षण पूर्ण केले.त्यानंतर डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमधील खडतर प्रशिक्षणही त्यांनी पूर्ण केले.
डिफेन्स स्टडीज या विषयात नरवणे यांनी चेन्नई विद्यापीठाची पदवी प्राप्त केली आहे तसेच डिफेन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज या विषयात एम.फील पदवीही प्राप्त केली आहे.
जून १९८० साली ७ शीख लाईफ इनफंट्रीमधून त्यांनी आपल्या लष्करातील सेवेची सुरुवात केली.
त्यांची लष्करातील कामगिरी प्रेरणादायी आहे ती समजून घेऊया.
लष्करातील आपल्या कामात नैपुण्य दाखवत त्यांनी आसाम रायफल्सचे महानिरीक्षक म्हणून काम केले आहे. जम्मू आणि काश्मीरमधे राष्टीय रायफल्सचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले.गेली अनेक वर्षे संघर्षमय राजकीय स्थिती असलेल्या या प्रांतांमधे त्यांनी आपल्या नेतृत्वकौशल्याच्या आधारे आपले काम चोख बजावले आहे.म्यानमार येथे भारताचे डिफेन्स अटॅची म्हणूनही त्यांनी जबाबदारी पूर्ण केली आहे.मध्य प्रदेशातील महु येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रात त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही महत्वाचे काम केले आहे.
केवळ इतकेच नाही तर कोलकाता येथील लष्करी प्रशिक्षण कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
अनुभवाचा, नेतृत्वाचा आणि देशाच्या लष्करसेवेतील गुणवत्तापूर्ण कामगिरीचा हा चढता आलेख असल्यानेच नरवणे यांच्याकडे देशाच्या लष्करप्रमुख पदाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच!
या सर्व कारकिर्दीची नोंद घेत मनोज नरवणे यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे!
परमविशिष्ट सेवा पदक,अतिविशिष्ट सेवा पदक,सेना पदक अशी अनेक पदके त्यांच्या देशाभिमानाची आणि देशाप्रती आस्थेची साक्ष देत त्यांच्या छातीवर विराजमान झाली आहेत.
आपल्या यशाचे गमक उलगडताना लष्करप्रमुख नोंदवितात की चित्रकला आणि अभियांत्रिकी हे त्यांचे आवडते विषय.त्यामुळे कोणत्याही प्रश्नाकडे तीन कोनातून पाहण्याची सवय हे त्यांच्या यशाचे गमक आहे.याखेरीज देशाची सेवा करताना झपाटलेपणा,समर्पित भावना आणि सकारात्मकता हे गुण आपल्याला सर्वोच्च पदावर नेऊ शकतात असेही त्यांचे मत आहे.आपल्या शालेय जीवनात मिळालेले बाळकडू आयुष्यभर आपल्याबरोबर आहे असेही ते नमूद करतात.
कुशल नेतृत्व,खिलाडू वृत्ती,सकारात्मकता असे गुण अंगी असलेले भारताची लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे!
लहानपणापासून मनात देशप्रेम आणि देशाविषयी आस्था बाळगत आपल्या देशाचे रक्षण करण्याचा सर्वोच्च बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे!
त्यांच्या व्यक्तिमत्वातील हे गुण आपणही अंगी बाणवण्याचा प्रयत्न करूया! या प्रजासत्ताकदिनी देशाप्रती आस्था व्यक्त होईल अशी पराक्रमी कृती करण्याचा निश्चय करूया!